परीकथेची सव्वा दोन वर्षे - भाग ९

Submitted by तुमचा अभिषेक on 2 July, 2016 - 01:55

३ जून २०१६

जेव्हा केव्हा रस्त्याने येता जाता आम्हाला डॉगी दिसतो .. अर्थात मुंबईच्या रस्त्यावर दर चौथ्या पावलावर कुत्रे दिसतेच .. तेव्हा त्याला बघून परीची बडबड अशी असते,
"मम्मा भूभूऽऽ ...
मम्मा भूभूला घाबरते
माऊ भूभूला घाबरते
अर्चू माऊ भूभूला घाबरते
अप्पू माऊ भूभूला घाबरते ..
परी भूभूला घाबरत नाही
.
.
(कारण...)
....
...
..
परीचे पप्पा भूभूला फाईट देतात Happy
फिलींग सुपर डॅड .. Happy
(फक्त भूभूला आमची भाषा समजत नाही हे माझे नशीब!)

.
.

६ जून २०१६

रात्री झोपण्यापूर्वी, बेडवर पडल्यापडल्या, तासदिड तास, झोप येण्यापूर्वी, रोजच आमची काही ना काही धमाल असते. हल्ली मला उशीवर झोपायचे सुख मिळू न देण्याचा कट रचला जातोय. रोजच माझी ऊशी खेचून घेतली जाते आणि हट्टाने ती स्वत: वापरली जाते.

काल मात्र माझ्याकडे उशांचा स्टॉकच होता. एक डोक्याखाली तर आणखी तीन पायाखाली पडल्या होत्या. परीने एक उशी घेताच मी दुसरी काढली. तिने दुसरी घेताच मी तिसरी काढली.

तिसरी उशीही तिने खेचली आणि मी त्या परत घेऊ नये म्हणून एकावर एक तिन्ही उश्या आणि त्यावर डोके ठेवून ती झोपली.
त्यानंतर मी पायाजवळची चौथी आणि शेवटची उशी काढली. तसे एवढ्या उश्या मी कुठून काढतोय हे तिने पाहिले. ती सुद्धा खेचून घेत, आता उश्या संपल्या हे तिला समजल्याने मला चिडवायला म्हणाली, "आता तू उशी कुठून घेणार..?"

मी सुद्धा म्हणालो तुझाच बाप आहे मी. पायाखाली दोन चादरीही पडल्या होत्या. एकेक करत त्यांची घडी करून उशीसारख्या त्या डोक्याखाली घेतल्या. अर्थातच एकेक करत तिने त्याही खेचून घेतल्या.

आता ती चार उश्या आणि दोन चादरींच्या डोंगरावर डोके टेकवून पसरली होती आणि मला चिडवत होती की आता तू कोठे झोपणार..?
चिडून मी म्हणालो, थांब आता मी मम्मीच्या पोटावरच झोपतो, आणि तशी हूल देणार त्याच्या आधीच तिने तो उश्याचादरींचा ढिगारा उचलला, आणि त्याच्यासकट मम्मीच्या पोटावर जाऊन कोसळली Happy

.
.

७ जून २०१६

शनिवार रविवार असो वा सुट्टीचा दिवस, तिला आंघोळ घालायची ड्युट्टी माझीच लागली असते. जेव्हा केव्हा ती शॉवरचा आनंद उचलते ते माझ्याच हजेरीत होते. पण लक्षात मात्र मी साबण लावताना झोंबवलेले डोळे तेवढे ठेवते.
आणि मग त्याचा अधूनमधून असा वचपा काढते.
माझ्या तोंडावरून, डोक्यावरून हात फिरवते .. आणि म्हणते,
डोक्याला साबण लावला..
तोंडाला साबण लावला..
गालूला साबण लावला..
डोळ्यांना साबण लावला..
.
.
पाणी टाकणार नाsssय Happy

.
.

१२ जून २०१६

सध्या आमच्याकडे हाय रे जबरा, होय रे जबरा, फॅन हो गया चालतेय.

आज रैवारच्या सकाळी आम्ही दोघे बारा वाजता उठलो. परीने जवळचाच मोबाईल उचलला. फॅनचे गाणे लावले. आणि म्हणाली, "हे बघ माझे फेव्हरेट गाणे लागले" आणि उठून नाचायला लागली. म्हटलं बाबड्या थांब तुला आज याचा विडिओ दाखवतो. लॅपटॉप काढला आणि यूट्यूबवरचा विडिओ लावला. त्यातल्या शाहरूखला नाचताना बघून खुश झाली आणि म्हणाली, "हा बघ दादा कसा नाचतोय"..

पिक्चर भले फ्लॉप गेला असेल, पण परीने दादा म्हटले तिथे शाहरूखच्या मेकअपचा पैसा नक्की वसूल झाला असेल Happy

.
.

१२ जून २०१६

आज पावसाची पहिली सर आली, जी आम्हाला भिजवून गेली.. Happy

परीबरोबर गार्डनमध्ये गेलो होतो. नेहमीसारखे झोका, घसरगुंडी, बदक, लटकणे खेळून झाल्यावर गवतावर धावायचा आनंद घेऊ लागलो. तिथे एक फेरीवाला साबणाचे फुगे उडवत होता, ते घेण्याचा हट्ट झाला. एक छोटी डब्बी वीसची आणि मोठे नळकांडे तीस रुपयाचे. साबणाच्या पाण्याला जरा जास्तच किंमत होती. वीसचेच घेऊया म्हणत छोटी डब्बी उचलली, पैसे देत होतो तेवढ्यात परी मोठे नळकांडे उचलून पळाली आणि फुगे काढायला सुरुवातही झाली. काय कुठून शिकली देवास ठाऊक, माझ्यासाठी तर ते नवीनच होते. मग काय, आणखी दहा रुपये त्याच्या हातात चिकटवून निघालो. पाहतो तर इथे हिने पराक्रम केलेला. नळकांडे आडवे धरून सगळे पाणी रिकामे केलेले. मग काय, आणखी एक विकत घ्यावे लागले. यावेळी मी ते हातात धरले आणि ती त्यात तार बुडवून फुगे सोडू लागली. सोडलेल्या फुग्यांमागे गार्डनभर पळू लागली. स्वत:च सोडत होती आणि स्वत:च फोडत होती. मध्ये एखादा कावळ्यांचा थवा दिसल्यास त्यांनाही सोडत नव्हती. या सर्वात मी नळकांडे धरून तिच्या मागेमागे पळत होतो. आणि अश्यातच अचानक पावसाची हलकीशी सर आली. थोडी थोडी म्हणता वाढतच गेली. गार्डनमध्ये पळापळ झाली आणि अपवाद वगळता प्रत्येकाने झाडाचा आडोसा किंवा पत्र्याची शेड पकडली. आम्ही त्या अपवादांमध्ये होतो हे वेगळे सांगायला नकोच. वरतून हलकासा तो बरसत होता आणि त्याचे तुषार अंगावर झेलत खाली आम्ही गार्डनभर फुगे सोडत पळत होतो. एवढे पावसाळे पाहिले आणि पहिल्या पावसात भिजायचे एवढे वेगवेगळे अनुभव घेतले, पण आजच्या या सरीची सर कशालाच नाही Happy

.
.

१३ जून २०१६

एक तो दिवस होता..
जेव्हा परीने पहिल्यांदा स्वताच्या हाताने पॅन्ट घातली होती.
किती कौतुक वाटले होते. पाठीवर एक शाबासकीची थाप दिली होती.

आणि एक आजचा दिवस आहे...
जेव्हा परीने आमची नजर चुकवून दोन नव्हे, चार नव्हे, एकावर एक, तब्बल सहा पॅन्ट चढवल्या. पाठीवर एक कौतुकाचा धपाटा ठेवून दिला Happy

तरी नशीब, पॅक अर्ध्या डझनाचेच होते Wink

.
.

१५ जून २०१६

1st Day of School
First Compliment from Teacher Happy

"Your Daughter was such a darling today
She helped me with the kids .."

काय तर म्हणे ईतर मुलांच्या डोक्यावरून, पाठीवरून, हात फिरवत त्यांची काळजी घेत होती.
गप जायचे शाळेत, खेळायचे, शिकायचे, तर हि पोरगी काय करत होती तिचे तिलाच ठाऊक Happy

.
.

१६ जून २०१६

मम्माने परीला आज एका प्लेटमध्ये चपाती दिली. गरम होती म्हणून तिच्या हातात न देता प्लेट माझ्या हातात देत तिला भरवायला सांगितले. पण तिला प्लेट स्वताच्याच हातात हवी असल्याने रडायला लागली. मी ऐकले नाही तसे रडत रडत जमिनीवर अंग टाकले. मी हार मानून घे बाबा चपाती म्हणत प्लेट तिच्यासमोर जमिनीवर ठेवली. तसे आणखी मोठ्याने रडायला लागली. मला काही समजेनासे झाले. पण मम्मा समजली. प्लेट उचलून तिच्या हातात दिली. तसे शांत झाली. आणि ईथे मला दिवार आठवला..

मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता ..
- एंग्री यंग लेडी अमिताभ

.
.

१८ जून २०१६

कधी मम्माला मुद्दाम पप्पा हाक मारणार आणि पप्पाला मुद्दाम मम्मा बोलणार.. तर कधी शेजारच्या दादाला मुद्दामच काका बोलणार..
आपण तिच्याकडे सोफ्यावर पडलेला मोबाईल मागितला तर ती शेजारीच पडलेला टीव्हीचा रिमोट उचलणार आणि "हा का?" म्हणून विचारणार.. ते देखील ईतक्या निरागसपणे विचारणार, की मोबाईल जिचे सर्वात फेव्हरेट खेळणे आहे ते ओळखण्यात ती चुकू शकते हा विश्वास आपल्याला सहज बसावा.
मग "हा नाही बाबड्या, तो बाजूचा" असे आपण म्हणताच ती सेटटॉप बॉक्सचा रिमोट उचलून पुन्हा तितक्याच निरागसपणे विचारणार, "हा का....
एव्हाना आपली शाळा झाली आहे हे आपल्याला कळून चुकले असणार. चिडून आपणच मोबाईल घ्यायला उठताच मग मात्र ती बरोबर मोबाईल उचलून पळ काढणार..
खरंच.. किडे शिकवता येत नाहीत.. ते अंगात उपजतच असावे लागतात Happy

.
.

२१ जून २०१६

पाऊस असा पडला पाहिजे, की टॅक्सीतून उतरून बिल्डींग जवळ पोहोचे पोहोचे पर्यंत अर्धे भिजलो पाहिजे..
पाऊस अगदी असा पडला पाहिजे, की परीबरोबर खिडकीत बसल्या बसल्या पुरते भिजलो पाहिजे Happy

.
.

२४ जून २०१६

आपल्या पराक्रमांचा अहंकार करायला आणि बापाची बावळटात गिणती करायला सुरुवात झाली आहे.

आज संध्याकाळी पाऊस बघायला तिला खिडकीत उभे केले होते. थोड्यावेळाने तिची खिडकीच्या ग्रिलवर चढायला सुरुवात झाली. पावसाने ग्रिल ओल्या झाल्या असतील म्हणून तिला हाताने पकडून ठेवले होते. तरी ती सोड सोड म्हणत वर चढत होती आणि मी तिच्या कलाने धर सोड करत होतो. सरतेशेवटी ती माझे हातांच्या कक्षेबाहेर जाऊ लागली तेव्हा तिला खेचून खाली घेतले. तसे माझ्यावर ओरडली, "अरे सोड मला, मी रोज चढते Happy

... तरी मी खेचून खाली घेतलेच आणि पाऊस संपला म्हणत खिडकी बंद करून टाकली. तसे धावत जाऊन वॉशबेसिनला लटकली आणि तंगड्या पाईपाला लावून मला चिडवू लागली, "ए तुला असे लकटता येते का Happy

.
.

२५ जून २०१६

परीला शाळेतून आज हे हस्तकलेचे सामान मिळाले. आधी तिला आम्ही परी बनवायला शिकवले. ते जमताच मग सुमडीमध्ये आणखी उद्योग करत तिने मम्मी-पप्पा बनवून आम्हाला गोड सरप्राईज दिले Happy

page 1 resize.jpg

त्यातही मम्मीपप्पा दोघांना टोप्या घातल्या हे विशेष

.
.

२६ जून

आमच्याकडे हल्ली गाणे असे म्हटले जाते,
लकडीकी कीक्कीकीकी काठी
काठीपे पेप्पेपेपे घोडा
घोडेके केक्केकेके
दुमपे पेप्पेपेपे मारा हतोडा ...
ककक्कक् किरण आठवला असेल ना..
पण हे आमचे बोबडे बोल नाहीयेत
तर हा आमच्यातला ककक्कक् किडा आहे Happy

.
.

२७ जून २०१६

गेल्यावर्षी परीला मोठ्या आवडीने रेनकोट घेतलेले. पण ते वापरायची म्हणावी तशी संधी मिळालीच नाही.
या वर्षी मात्र पहिल्याच मुसळधार पावसाने रेनकोटचा खर्च अक्कलखाती जमा केला.

एकदा पाण्यात लोळण घेतल्यावर कसले रेनकोट आणि कसले काय. साधे डायपर सुद्धा सुके ठेवू शकले नाही Happy

.
.

२८ जून २०१६

धिस इज व्हिच कलर?
पिंक ..
शाब्बास !!

..... शाळा सुरू आहे
फरक ईतकाच, बापाची घेतली जात आहे Happy

- तुमचा अभिषेक

परीकथा ० , परीकथा १ , परीकथा २ , परीकथा ३ , परीकथा ४ , परीकथा ५ , परीकथा ६ , परीकथा ७ , परीकथा ८

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dairy aahe ka hi ......नाहि पण याची डायरि बनवा आनि परि ला १८ व्या वाढदिव्शी भेट द्या. खुप खुश होइल

एकाअर्थी परीला डेडिकेट केलेली डायरीच आहे.. मनस्वि चांगली कल्पना आहे.. जरी तोपर्यंत तिने हे इथे तिथे ऑनलाईन वाचले असले तरी हार्डकॉपीची मजाच वेगळी..

सर्व प्रतिसादांचे आभार Happy