चिनूचा थरार....!

Submitted by जव्हेरगंज on 29 June, 2016 - 10:52

आंतरजालावरच्या काही नव(!)कथा वाचल्या की खरंच डोक्याचं दही होतं. म्हटलं आपणतरी कशाला मागे पडायचं. पाडलीच मग एक.
==========================================================

चिनूचा थरार

प्रारंभ:

चिनू FYBsc चा दुसरा पेपर देऊन घरी निघाला होता. सायकलची घंटी वाजवत वेगानं पँडल मारत होता. वाटेत एका झाडाखाली त्याला मुंग्यांचे वारुळ दिसले. मग चिनू त्यावर चढून दुसऱ्या दिवशीच्या पेपरची तयारी करत बसला. बुडाला आग लागल्यावर चिनू ऊठला आणि पुन्हा सायकलचे पँडल मारत घरी निघाला. एव्हाना संध्याकाळ होत आली होती. चिनू गावात पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. सायकल चालवून दमल्यामुळे चिनू पिंपळाच्या झाडाखाली थोडा वेळ थांबला. मग रुमाल काढून घाम पुसला. सगळीकडे अंधार होता. झाडांची पाने सळसळ करत होती. चिनूने आळस देत हात वर केले आणि अचानक त्याला तेथे अदृश्य शक्ती असल्याचा भास झाला. फांदिवर कोणितरी बसून आपल्याकडे बघतंय असं त्याला वाटलं. चिनू पुन्हा घामाघूम झाला. घाईघाईनं सायकलवर टांग टाकून निघणार ऐवढ्यात त्याला एक आवाच ऐकू आला,
"कसा गेला पेपर?"
चिनू मागे वळून न पाहता सायकलची घंटी वाजवत तसाच गावात पळत सुटला. तरीही त्याच्या मनात एक प्रश्न होता.
कोणाचा आवाज होता तो?
कोण होता तो?

_______________

मध्यांतर:

दुसऱ्या दिवशी चिनू FYBsc चा तिसरा पेपर देऊन घरी निघाला होता. वाटेत अचानक त्याच्या पोटात कळ आली. मग चिनू पुन्हा एकदा मुंग्यांच्या वारुळावर जाऊन 'बसला'. बसल्या बसल्या त्याने चौथ्या पेपरची तयारी सुरु केली. बुडाला आग लागल्यावर चिनू ऊठला. आणि सायकलवर टांग टाकून घंटी वाजवत घरी निघाला.
पिंपळाच्या झाडाखाली आल्यावर चिनू दमला. सायकलवरुन तो खाली ऊतरुन रुमाल काढणार ईतक्यात त्याला कालचा प्रसंग आठवला. मग चिनू घंटी वाजवत तसाच पळत सुटला. मागून त्याला आवाज आला,
"ये पोरा, थांब रे पोरा"
पण चिनूने मागे वळून पाहीले नाही. अदृश्य मायावी शक्ती त्याचा पाठलाग करत होती. चिनूच्या चप्पलचा बंध तुटला तरी चिनू पळतच राहीला. अचानक त्याच्या अंगात दैवी शक्ती संचारली आणि त्याने सायकल रस्त्यातच फेकून दिली. मागून येणारा तो आवाज बंद झाला.
घरी आल्यावर चिनू पहिला टॉयलेट मध्ये शिरला. बसल्या बसल्या त्याने झाल्या प्रकाराचा छडा लावण्याचे ठरवले.

__________

अंतिम:

चिनू आज ऊशिराच ऊठला. आज त्याचा FYBsc चा पेपर नव्हताच. आज रविवार असल्यामुळे त्याला सुट्टी होती. मग चिनूने आंघोळ केली. हाफ चड्डी आणि बनियन घालून गावात तो गावात फेरफटका मारायला गेला. वाटेत त्याला शेखर भेटला. कालची हकीकत त्याला सांगितल्यावर तो म्हणाला, "अरे चिनू त्या वाटेवर खूप वर्षापूर्वी एका चोरट्या बाईला काही माणसांनी मारले होते. म्हणून असे भास आपल्याला होतात".

चिनूला प्रचंड भिती वाटली. मग दिवसभर तो कोणाशी काही बोलला नाही. पण त्याला काही चैन पडेना. संध्याकाळी तो पिंपळाच्या झाडाकडे गेला. तिथे कोणीही नव्हते. आकाशात स्वच्छ चांदणे पसरले होते. आजुबाजुला मिट्ट काळोख होता. संपुर्ण गावात निरव शांतता होती. अचानक वीज कडाडली आणि चिनूला दिसले की एका बाईचे भूत झाडाच्या बुंध्याशी नागडेच बसले आहे. चिनूला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आ वासून तो तसाच बेशुध्द पडला.

सकाळी जेव्हा चिनूला जाग आली तेव्हा तो अजूनही पिंपळाच्या झाडाखाली असल्याचे त्याला समजले. मग तो बोंब ठोकत गावात पळत सुटला. गाववाले त्याला पाहून बोंब ठोकू लागले. त्याला काय होतयं हे समजेना. मग त्याला शेखर भेटला आणि एका कोपऱ्यात नेऊन म्हणाला," अरे चिनू, आज सकाळीच एक वेडी बाई भोकाभोकाचा बनियन आणि ठिगळं लावलेली चड्डी घालून गावातून फिरत होती, आणि त्यात तू असा"
चिनू काय ते समजला. त्या चोरट्या बाईच्या भूताला थंडी वाजत असणार, म्हणून तिने आपले कपडे चोरले. त्याला हसू फुटले. पण आपल्याला एवढं मोकळं मोकळं का वाटतयं हे चिनूला अजूनही समजेना. पण जेव्हा चिनुला कळाले की आपण नागडेच आहोत, तेव्हा मात्र त्याला खुप हसु आले . म्हणजे काय ते आता वाचणाऱ्यांना कळाले असेलच . !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ख्या ख्या ख्या
तुमच्या मानाने फारच सरळसोट आहे.