चहाचे 'अमृततुल्य' रहस्य ...

Submitted by अजातशत्रू on 27 June, 2016 - 01:36

ही गाथा नुसत्या चहाची नाही तर गावाकडच्या साध्याभोळ्या माणसांची आहे...
चहा 'ताजमहाल'मधला असो की 'टेटली टी' असो त्याची चव आमच्या गणूच्या 'अमृततुल्य'पुढे फिकीच !
नावाप्रमाणेच अमृततुल्य चवीचा हा चहा म्हणजे अनंत प्रश्नावरचा 'रामबाण' उपाय !
हा चहा पिण्यासाठी लोकांची पावले आपसूक त्याच्या टपरीकडे वळत..
त्याच्या टपरीत फराफरा आवाज करणारया गॅस स्टोव्हच्या निळ्या पिवळ्या ज्योती म्हणजे जणू तल्लीन होऊन एकसमान तालात कथ्थक करणाऱ्या निळ्या पिवळ्या वेशातील नर्तिकाच !
त्या अद्भुत स्टोव्हवरती त्याचे लख्ख पितळी भांडे मुकाटपणे दिवसभर तापत असते.
शेजारी ठेवलेल्या स्टीलच्या मोठ्या पातेल्यातलं पाणी तो आधणासाठी ऑर्डरप्रमाणे एका ओगराळयाने त्या पातेल्यात ओतत राहतो.
मग झाकणं काढून ठेवलेल्या डब्यातील चहा - साखर चमचाने काढता डाव्या हाताच्या तळहातावर खोलगा करून ओतून घेतो अन फक्कन पातेल्यात टाकतो.
बऱ्याचवेळा चहा पावडरीचे त्या पातेल्यात पखरण होत असताना तिचा तरतरीत वास डोक्यात असा काही घुमतो की जणू काही क्षणासाठी दार्जीलिंगमधल्या चहाच्या मळ्यात उभं राहिल्यागत वाटावं.
त्याच्या चहा पावडरचे ब्लेंड कुठले हे त्याने कधी सांगितले नाही अन त्याला गावातल्या वाण्याच्या दुकानात चहा पावडर खरेदी करताना देखील कुणी पाहिले नाही. त्यामुळे तो नेमका कोणता चहा वापरतो हा एका 'चहापार्टीचा' विषय असे !
त्याने टाकलेली चहा पावडर काही वेळ आधणलेल्या पाण्यावर तरंगत राही, मग त्यातून एकेक रेष सुटून पाण्यात विरघळावी तसे काळपट चॉकलेटी धागे निसटत जात. चहाच्या कणांच्या रेषा रेषा अलगद बाजूला होऊ लागत असत अन पाण्यात आपलं सत्व अर्पण करत असत. धुराची वलये हवेत तरंगावी तशी ही वलये पाण्यात दिसत.
आपला रंगाचा, वासाचा, चवीचा अहंकार त्या कणांनी हलकेच सोडून दयावा अन पाण्याने तो मोठ्या अप्पलपोटेपणाने आपल्यात साठवावा असं हे काम चाले....

तर त्याने चहा साखरेचा शिडकावा करून झाला की हळूहळू ते मिश्रण तापायला सुरुवात होई.....
एकीकडे पितळी पातेल्यात गुडगुड आवाज करत चहाला उकळी येई अन त्याचवेळी त्याच्या तोंडाची टकळी चालू असे..
चहाला उकळी येत असताना एका लांब जर्मनच्या पट्टीने तो पातेल्याच्या कडेला चिटकून राहिलेली चहा पावडरिचा त्या उकळत्या मिश्रणात कडेलोट करून टाकी.
मी देखील घरी जर्मनची पट्टी आणून पाहिली होती अन चहापावडरीशी खेळ करून बघितला अन सारा चहाच पातेल्यासकट पालथा झाला होता.
या पट्टीचे नेमके कार्य काय हे विचारण्याचे धारिष्ट्य मी एकदोनवेळा दाखवले होते पण एखाद्या मुरलेल्या न्यायाधीशाने एखादी चिल्लर 'जनहित याचिका' निकालात काढावी तशी त्याने माझी उत्सुकता 'पट्टीवर' मारली होती !
या दरम्यान आपल्या ओळखीचा कुणी ना कुणी सोम्या गोम्या आपल्याला हटकून शोधत तिथं आलेला असतो अन त्याला देखील तिथल्या तरल चहामय वातावरणात 'फुकटच्या' चहाची उत्कट तलफ न आल्यास त्यात नवल ते काय ?
मग गणूला 'आणखी दोन कप टाक रे' असं फर्मान निघे, तो हसत हसत बोले - 'बाप्पू, मला आधीच माहितीय... मी चार कप जास्तीच टाकलेय !"
त्याने असा म्हणायचा अवकाश की "काय चाललंय मंडळी ! जरा आमाला पण बोलवत जावा की ! " असं म्हणत म्हणत आणखी दोघे तिघे 'घुसगेम' करत असत....

आता गणूचे लक्ष्य आमच्यावरून हटलेले असे अन त्याच्या पुढ्यात येऊन उभ्या असलेल्या दुसऱ्या 'पार्टी'ची तो आस्थेवाईकपणे चौकशी सुरु करे.
त्याचे प्रश्न ठरलेले असत पण त्यात मायेचा ओलावा असे, धंद्याची लाचारी त्यात नसे.
"ताई गावावारून आली का ? कसं चाललंय तिचं ? आण्णा लई दिस झालं भायेर दिसलं न्हाईत, समदं ठीक हाये ना ? काकू काय म्हणत्येत ? त्यांनी माज्या हातचा च्या पिऊन माइंदळ वखत झालाय, लक्कनची शाळा कशी चालू आहे? मंदी दिसभर घरात काय करती ? किती दिसाची रजा काढलीय ? तब्येत वाईच वंगाळ झाल्यागत वाटतीय, खानावळवाल्याला आपल्या गावाकडचं माळवं घेऊन जावा मग बघा त्येच्याच तोंडाला पाणी सुटंल ! आपल्या मंडोदरीची वेत झाली का ? काय झालं वासरू का रेडी ? ....... "
या संभाषणातील ताईने त्याच्या लहानपणी एखादी शेवकांडी हाती दिलेली असे, तिची माया अजून याच्या काळजात तशीच टिकून असे. तर अण्णा म्हणजे त्याच्या वडिलांचे मैत्र ज्यांनी त्यांना कधी काळी खूप मदत केली होती, काकू म्हणजे वरच्या गल्लीतली पाठीला बाक आलेली खाष्ट म्हतारी जी सगळ्या गावाच्या पोटपाण्याची चिंता करी, लक्कन उर्फ लखन हा त्याचा शाळेतला बालमित्र, तर मंदी उर्फ मंदा म्हणजे कधी काळी जिच्यासाठी त्याच्या जीवाला पिसं लागत, मंडोदरी म्हणजे अण्णाची जुनी म्हैस जिचं निरसं दुध टपरीवर पोहोच होत असे ...असो ... शेवटी त्याच्या समोरच्या माणसाला दोनेक कुळांनी गाठलं की तो तिसरीकडे वळे.

एव्हाना त्याने चहात आणखी चार कप पाणी ओतलेले असे.
चहाला जोरात उकळ्या फुटलेल्या असत अन म्हादबाने दिलेल्या निरशा दुधाचे पातेले तो हातात घेऊन हलवत राहायचा.
तो दुध का हलवत असे दे देखील मला कधीच उमगले नाही, त्याचे ते पातेले हलवणे एका हाताने सुरु असे अन दुसऱ्या हाताने गाळणी चहात बुडवून उकळ्यांना खाली ढकलण्याचे काम सुरु असे.
चहाच्या तलफेने अन तिथल्या घमघमाटाने समोरचा माणूस एव्हाना हैराण होऊन गेलेला असे -
"आरं दे की लेका,कपभर चहासाठी दिसभर थांबवतो का काय ?"
असं म्हणायचा अवकाश की हातातल्या कधी काळच्या पांढऱ्या रंगातल्या अन आताच्या विटकरी रंगाच्या एका ओलेत्या फडक्याने तो ते पातेले स्टोव्ह वरून खाली उतरवी अन पालथे घालून ठेवलेले छोटे काचेचे ग्लास सरळ करून ठेवी.
पातेल्यातला चहा शेजारी ठेवलेल्या किटलीत ओतला जाई, या किटलीचे तोंड एका चॉकलेटी कपड्याने किंचित गच्च बांधून ठेवेलेले असे, हळूहळू पातेल्यातला चहा किटलीच्या पोटात जाऊन विसावा घेई !
'किटली'चे निमुळते होत जाणारे तोंड आणि हत्तीची सोंड मला लहानपणा पासून सारखीच वाटत आलीय, असं का वाटायचे ते मात्र माहिती नाही.
देवापुढे उदबत्ती लावताना चेहऱ्यावर जसे तन्मयतेचे भाव असतात तसे भाव त्याच्या चेहऱ्यावर किटलीतला चहा ग्लासात ओतताना असत. .

नाही म्हणायला त्याच्या दुकानात देवांच्या एकदोन तसबिरी अन दर्शनी भागात शिवाजी महाराजांची एक फ्रेम होती, या सर्वांना तजेलदार फुलांचा हार घातलेला असे. एका कोपऱ्यात कागद काळे पडलेले कॅलेंडर दीनवाण्या तोंडाने लटकत असे.
आत काटकोनात ठेवलेली दोन बाकडी, एक पाय तुटलेला लाकडी स्टूल अन लाल रंगाचा विटून तपकिरी रंगाचा झालेला मळकट प्लास्टिकचा स्टूल हे त्याचे फर्निचर !
टपरी बाहेरच्या बाकड्याचे मधोमध पोट खोल गेलेले होते अन एका कोपऱ्यात त्याला बाक आला होता. शेजारीच झाडाचे तोडून आणलेलं खोड होतं. त्याला बघितलं की हटकून खाटकाच्या दुकानातलं खोड आठवायचं ज्यावर सत्तूरच्या असंख्य रेघा उमटलेल्या असत..
गणूच्या टपरीत चहा पिणारी माणसेच जाऊन बसत असे काही नव्हते, चकाट्या पिटणारी माणसे देखील तिथे बसून जगाच्या पाठीवरच्या तमाम विषयाच्या कंडया पिकवत असतात.
तर गणू जेंव्हा चहाचे ग्लास हातात देई तेंव्हा त्याच्या समोरच्या काचेच्या बरण्यात ठेवलेली गोल चौकोनी चपटी बिस्किटे, पाण्याची बाटली यावर नजर जाई.
चारेक बिस्किटे चहाबरोबर कधी फस्त होऊन जात काही कळत नसे.
'चहा'बरोबर 'अटळ' असणाऱ्या या गप्पाष्टकामुळेच कदाचित 'चहाटळ' शब्द आला असावा असं मला राहून राहुन वाटतं...असो.

गणूच्या बडबडया स्वभावामुळे तो दिवसभर एकाच जागी असूनही त्याला सगळ्या गावाची खबरबात असते.
पण तो कधी ह्या कानाची चुगली त्या कानाला करत नाही.
दुपारी वर्दळ कमी झाली की तिथंच बसून चार घास खाऊन घेतो, सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्रीचे सात आठ वाजेपर्यंत उभं राहून त्याचे पाय कसे दुखत नाहीत ह्या प्रश्नाचे मला उत्तर सापडले नाही.
गणूच्या त्या टपरीपाशी उभं राहून अनेकांनी जमिनीचे सौदे निश्चित केलेत, काहींनी भांडणे मिटवलीत, काहींची 'स्थळे' तिथं जमलीत, तर एखादी माहेरवाशिन सासरी जाताना त्याला सांगून गेलीय की 'गणू माझ्या आबांकडे लक्ष दे बाबा, त्यांना आता सुधरत न्हाई न मायचं वय झालंय", कुणी तरी तालुक्याच्या गावात शिकायला असणाऱ्या मुलाचा जेवणाचा डबा तिथं आणून ठेवलेला असतोच, कुणाचं तरी खताचं चुंगडं येऊन पडलेलं असतं, कुणी तरी सोयऱ्या धायऱ्याना देण्यासाठी तिथं पत्रिका आणून ठेवलेल्या असतात, कुणाच्या तरी बस्त्याला जाताना तिथं जमायचा सांगावा कुणी तरी दिलेला असतो,एखाद्या सरकारी अधिकारयासाठी तिथं कधी कधी गावातली म्होरके लोकं गोळा झालेली असतात तर कधी पुढारी लोकं 'आपली माणसं' घेऊन आलेली असत. तर कधी कधी कुणाची मयत झाली तर त्याची आठवण काढता काढता डोळ्यातल्या पाण्याबरोबरच इथला चहा खारट होऊन जाई !

गणू आठ वर्षाचा असताना त्याचे वडील चहाच्या टपरीकडे येताना एसटीखाली आले अन त्यांचे श्वास संपले. गणूने शाळा सोडली, आईचे डोळे पुसले अन सारं ओझं आपल्या चिमुरड्या खांद्यावर घेतले.
त्याच्या भावकीने आधी त्याची टिंगल उडवली पण त्याने नेटाने आपली टपरी सुरु ठेवली. त्याची शाळा अर्ध्यातच सुटली पण त्याने लहान भावाला मात्र शाळेच्या ओढीत गुंतवून ठेवले.
सगळ्या गावाला त्याच्या टपरीचं अन त्याचं इतकं अप्रूप आहे की गावात सगळे धंदे व्यवसाय दोनाचे दहा झाले पण लोकांनी दुसरी चहाची टपरी होऊ दिली नाही !
लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे अन त्याचे लोकांवर प्रेम आहे म्हणूनच त्याच्या चहात या अमृताहून गोड अशा प्रेमाची चव उतरली असावी.

त्याच्या सदोदित हसमुख चेहऱ्याकडे बघताना कधी कधी माझ्या अफाट भौतिक सुखांची मी त्याच्या तोकड्या साधनसंपत्तीशी तुलना करतो अन या मोजदादीत त्याच्यापुढे मी सपशेल हरतो!

- समीरबापू गायकवाड.

ब्लॉगवर भेटा...
http://sameerbapu.blogspot.in/2016/06/blog-post_7.html

13450027_1039798346073569_2674206696891451896_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुर्रेख लिहिलंय....

गणू आठ वर्षाचा असताना त्याचे वडील चहाच्या टपरीकडे येताना एसटीखाली आले अन त्यांचे श्वास संपले. गणूने शाळा सोडली, आईचे डोळे पुसले अन सारं ओझं आपल्या चिमुरड्या खांद्यावर घेतले.>>>>>>>

वास्तव इतके कठीण असताना गणूने त्यावर जी मात केलीये त्याला केवळ सलाम.... असे किती तरी वेगवेगळ्या क्षेत्रातील गणू असतीलच - त्या सार्‍यांनाच सलाम...

त्याच्या सदोदित हसमुख चेहऱ्याकडे बघताना कधी कधी माझ्या अफाट भौतिक सुखांची मी त्याच्या तोकड्या साधनसंपत्तीशी तुलना करतो अन या मोजदादीत त्याच्यापुढे मी सपशेल हरतो! >>>>>

____/\____

छान लेख Happy

फ़ारच छान लिहिलय. डोळ्यासमोर उभं राहतं सर्व.
वास्तव इतके कठीण असताना गणूने त्यावर जी मात केलीये त्याला केवळ सलाम.... असे किती तरी वेगवेगळ्या क्षेत्रातील गणू असतीलच - त्या सार्‍यांनाच सलाम... >>>>>>>>>>+११११११११

एखाद्या रविवारी सकाळी निवांत वाफाळत्या चहाचा कप हातात घेऊन पुरवणी वाचायला बसावे, हा लेख नजरेला पडावा आणि ह्या लेखाने-त्यातल्या शेवटच्या वाक्याने-गणूचा हसरा चेहेरा पाहून ती सगळी सकाळ लख्ख होऊन जावी असं वाटलं वाचताना !!
सुंदर उतरलाय लेख Happy

सुरेख जमलेला चहा..समीरभौ
<<त्याच्या सदोदित हसमुख चेहऱ्याकडे बघताना कधी कधी माझ्या अफाट भौतिक सुखांची मी त्याच्या तोकड्या साधनसंपत्तीशी तुलना करतो अन या मोजदादीत त्याच्यापुढे मी सपशेल हरतो!>>
धन्य!

खुपच सुरेख.
त्याच्या सदोदित हसमुख चेहऱ्याकडे बघताना कधी कधी माझ्या अफाट भौतिक सुखांची मी त्याच्या तोकड्या साधनसंपत्तीशी तुलना करतो अन या मोजदादीत त्याच्यापुढे मी सपशेल हरतो! >>> + १० खरंच.

दैनिक दिव्य मराठी सोलापूर आवृत्तीत आज ह्या लेखाबद्दल उल्लेख आला आहे (ते एक सादर असावे ज्यात आंतरजालावरील काही उल्लेखनीय वाचनीय लेखनाची माहिती दिलेली असते )

असो
खूप खूप अभिनंदन