मौत वेश्यांची ....

Submitted by अजातशत्रू on 30 June, 2016 - 22:14

संशयास्पद मृत्यू झालेल्या सेलिब्रिटी कम सुपरवूमन सुनंदा पुष्कर यांचा व्हिसेरा किती वेळा पोलिसांनी फोरेन्सिककडे तपासणी साठी दिला आणि त्यातून सत्य किती वेळा नागडे झाले माहिती नाही.., याबाबत मध्यंतरी काढलेला निष्कर्षदेखील खरा की खोटा हेही कळायला मार्ग नाही...मात्र मोठ्यांचे एक बरे असते ; मिडीया किंवा पैसा मागे उभा राहतो अन खरी वा खोटी सुनवाई तरी होते. अशाच प्रकारच्या घटना ज्यांच्या आयुष्यात घडून जातात त्या अतिसामान्यांचे अन त्यातही शोषितांचे पुढे काय होत असेल ? ही पोस्ट आहे
मुमताजबद्दलची....मुमताज दक्षिण मुंबईच्या घाटकोपर रेल्वे लाईनला लागून असलेल्या हनुमान गल्ली मधली अभागी स्त्री. ती इथे कशी आणि का आली हा एका वेगळ्या पोस्टचा विषय आहे... ३६ वर्षीय मुमताजला दोन मुली होत्या. मुमताजला जेंव्हा दवाखान्यात दाखल केले तेंव्हा ती अत्यवस्थ होती आणि तिच्या धाकट्या मुलीचं त्या दिवशी 'लगन' होतं. ८५ टक्के भाजलेल्या मुमताजच्या सर्वांगाला रॉकेलचा वास येत होता. तिची बहिण आणि तिच्या मुली इस्पितळात येण्याआधी आपण तिचे स्टेटमेंट घेतले असा पोलिसांचा दावा होता.

मुमताजचे सर्वांग लाल काळे झाले होते. मुमताज हिंदू पण तिचा दल्ला मुस्लीम, त्यानेच तिचे नाव मुमताज ठेवलेले. तिला पहिली मुलगी 'दुर्गा' जेंव्हा जन्मली तेंव्हा मुमताज फक्त १४ वर्षांची होती. इतक्या कमी वयात या धंद्यात मुलें जन्माला घालू दिली जात नाहीत पण आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून तिने सगळ्यांचा विरोध झुगारून पोरगी जन्मास घातली अन ती तिच्या आयुष्याची सर्वात मोठी भूल ठरली. त्या पोरीच्या आडून तिला तिचा दल्ला छळू लागला आणि मुलीसाठी ती वेड्यासारखा त्याचा सारा छळ सहन करू लागली. वयाच्या १९ व्या वर्षी ती पुन्हा आई झाली. पण यावेळेस त्याच्या इच्छेखातर ती आई झाली.

दोन मुली घेऊन मुमताज त्या नराधमाच्या सगळ्या यातना सहन करत करत रोज चुरगळली जाऊ लागली, तिचे अनन्वित शोषण होत राहिले अन केवळ मुलींकडे बघत ती त्याला मेलेल्या मनाने सामोरं जात राहिली. काळ पुढे जात राहिला, तिच्या मोठ्या मुलीचे दुर्गाचे लग्न झाले. ती या दुष्टचक्रातून बाहेर पडली खरी पण लग्नानंतर दोन मुले पदरात टाकून तिचा आयुष्याचा साथीदार डाव अर्ध्यात टाकून देवाकडे गेला. एकवीस वर्षाच्या असहाय दुर्गाला तिचा भूतकाळ आणि तिचे प्रारब्ध पुन्हा इथे घेऊन आले. काही महिने असेच गेले...
इकडे मुमताजला आता रोज मारहाण होऊ लागली, तिने तक्रार करावी तरी कुठे हा तिच्यापुढे सवाल होता. 'अशा वेळी पोलिसात गाऱ्हाणे घेऊन गेलं तरी फारसा उपयोग होत नाही हे मुमताजला ठाऊक होते, त्याचबरोबर यामुळे आपल्या पाठी आपल्या धाकट्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे होईल' याची खुणगाठ तिने मनाशी बांधलेली होती. आपल्या एका मुलीच्या जीवनाचा इस्कोट झाला आहे आता किमान धाकटीला तरी वाचवायचेच हा तिचा दृढ निश्चय होता. त्यासाठी ती काहीही अन कितीही सहन करत होती. तिच्यावरील जुलूम मी इथे लिहू शकत नाही अन तुम्ही वाचू शकणार नाही.

अखेर मुलीच्या लग्नासाठी लागणारया पैशाची सगळी जुळवाजुळव झाली, पोरीचे 'लगन' ठरले. तीन दिवसांवर तारीख जवळ आली होती. अन एकाएकी मार्चच्या धगधगत्या उन्हात मुमताजच्या खोलीत ज्वाळांचे तांडव झाले. सगळ्या खोलीत रॉकेलचा घमघमाट होता फक्त एफआयआरच्या कागदावरच तो आला नाही कारण मुमताज ही एक 'रंडी' होती जिला कुणी नवरा नव्हता मात्र दोन मुली आणि दोन नातवंडे होती. पण ती देखील या देहविक्रीच्या उकीरड्यातलीच असल्याने पोलीस, प्रशासन आणि इतर पांढरपेशी माणसांच्या लेखी त्यांचे जीवनमूल्य आणि उपद्रवमूल्य दोन्ही शून्य असल्याने त्याची फारशी दखल कोणी घेत नसते. मुमताजचेही तसेच झाले. ...

शेवटी मुमताज दवाखान्यात असतानाच तिच्या धाकट्या पोरीचे लग्न झाले, ती कावरीबावरी होऊन 'आई लग्नात का बरे आली नाही?' असं विचारत राहीली आणि सगळे तिला खोटं सांगत गेले. दुसऱ्या दुपारी भाजलेल्या जखमांचे सेप्टिक होऊन मुमताज देवाघरी गेली. गेली म्हणजे या नरकयातनेतून सुटली. तिच्या दोन्ही मुलींना कळवले गेले, दुर्गाने तर आपल्या आईच्या पार्थिवावर उडी मारायचे बाकी ठेवले होते. मुमताजची बहिण कमला आणि तिच्या मुलींचे आर्त टाहो काळीज चिरून जात होते. असा काळीज विदीर्ण करणारा प्रसंग घडूनही तिथे आलेले बघे वखवखल्या नजरेने रडणारया बायकांना न्याहाळात होते...

'सुहागन'प्रमाणे मुमताजची तिरडी बांधली गेली अन तिचा अंत्यविधी हिंदू रिवाजाप्रमाणे करण्यात आला. तिच्या मुली आणि बहिणींनी पोलिसांना खूप विनवून पाहिले की तिला विष पाजून जाळून मारण्यात आले आहे पण पोलीस आपल्या स्टेटमेंटवर ठाम होते. इथे नोटा ढिल्या करायला समोरची पार्टी अगदीच कफल्लक असल्याने इतर काही सत्य बाहेर येण्याची सुतराम शक्यता नव्हती. मुमताज गेली तरी तिच्यासाठी रडणारया या तिघींचे अश्रू काही थांबत नव्हते अन डोळे सुकून गेले तरी आतली ओल कायम होती...

मरण्याच्या काही काळ आधी सोशल एक्टीव्हीटी इंटिग्रीटी (SAI) या NGO साठी मुमताजने काम सुरु केले होते. दीदी (sister) मॉड्यूल नुसार चालणारया या एनजीओसाठी मुमताज मुंबईबाहेर थेट आमच्या सोलापूरात देखील येऊन गेली होती. तेंव्हा तिच्या सोबत हजरा आणि शेनाज या याच क्षेत्रातल्या अभागी महिला हजर होत्या. हजराला देखील मागे जाळण्याचा प्रयत्न झाला होता पण तिच्या भाजण्याचे प्रमाण कमी होते अन तिला उपचार लवकर मिळाले. त्यामुळे तिचा जीव वाचला.मात्र तिच्या देहावर भाजल्याचे अन मनावर अत्याचाराचे व्रण कायमचे कोरले गेले. कामाठीपुरयात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा अभ्यास करण्यासाठी हेलेनने फोटो प्रोजेक्ट सुरु केला होता. त्याच काळात मुमताजची तिची ओळख झाली अन काही दिवसातच ही घटना घडली. हेलेनला या घटनेचा मोठा धक्का बसला होता.

'सिस्टर्स फॉर कामाठीपुरा'कडून आणि SAIकडूनही या घटनेसाठी भरपूर प्रयत्न करून पाहिले पण ही घटना आत्महत्त्या म्हणूनच नोंदली गेली. मुमताजला न्याय मिळाला नाही. कदाचित तिने एनजीओसाठी काम सुरु केल्याने तिच्या मुली ह्या 'लाईन'मधून बाहेर पडल्या तर आपल्या पोटापाण्याचे कसे होईल या विचाराने धास्तावलेल्या तिच्या लिव्हइन मधल्या दल्ल्याने तिला मारले असावे असा संशय होता. पण पोलिसांना असं सांगणारा एकही 'परिस्थितीजन्य पुरावा आढळला नाही. आपल्या देशात पोलीस त्यांना पाहिजे तसे कागद रंगवत असतात हे शेंबडे पोर देखील सांगते, त्यामुळे परिस्थितीजन्य पेक्षा पाकीटजन्य परिस्थितीचा पुरावा देण्यात मुमताज कमी पडली असेच म्हणावे लागेल..

ज्या मुलींच्या भवितव्यासाठी मुमताजने आयुष्याचा बाजार मांडला त्यांचे भविष्य अनिश्चिततेच्या खुंटीला टांगले गेले, पोलिसांनी मुमताजच्या आत्महत्येची केस तिच्या अंत्यविधीनंतर काही दिवसातच बंद केली. इथे कुठली मिडिया वा कुठला पैसा इथे तिच्यासाठी भांडायला येणार नाही त्यामुळे आजघडीला तिची फाईल कायमसाठी दफ्तरदाखल नक्की झाली असेल. एकट्या मुंबईत अशा लाखभर मुमताज सडण्यासाठी जगत आहेत आणि त्यांच्या न्यायाच्या यंत्रणा इतक्या तोकड्या आहेत की इथे एनजीओनी काम बंद केले तर मरणारयांची नावे देखील कळणार नाहीत.

सुनंदा पुष्कर आणि मुमताज ह्यां जमीन अस्मान फरक असणारया दोन अतिभिन्न स्तरावरील आहेत. अशा कित्येक स्त्रिया न्यायाविना आपला जीव सोडत असतील कोण जाणे ? वेश्यांच्या मौती ह्या कुत्र्याच्या मौती व्हाव्यात इतक्या का त्या वाईट आहेत ? त्याचे समाजाला काहीच वाटू नये इतके का आपण बधीर झालो आहोत ? मार्च २०१३ मध्ये ही घटना घडली, मुमताज यातून सुटली पण पुढे काय झाले ? दुर्दैवाचे फेरे सुरुच राहिले, काल परवा कळाले की आता मुमताजच्या दोन्ही मुली याच लाईनमध्ये आहेत. राजरोसपणे त्या चुरगळल्या जाताहेत.

आपल्या सभोवताली इतके काही अक्राळ विक्राळ घडत असते तरीही आपण समानतेच्या, न्यायाच्या, मानवी हक्काच्या आणि महासत्तेच्या गप्पा मारतो याचा आपल्याला जराही विषाद नसतो ही बाब मला अत्यंत अस्वस्थ करून जाते.....

- समीर गायकवाड.

( पोस्टसोबतची सर्व छायाचित्रे हेलेन रीमेल यांनी काढलेली आहेत, त्या कामाठीपुरयासाठी काम करत होत्या तेंव्हा मुमताजच्या कुटुंबियांच्या विनंतीवरून त्यांनी ही छायाचित्रे काढली होती. मुमताजच्या मुलींची शेवटची भोळी आशा होती की या फोटोंचा त्यांना कायदेशीर लढाईत काहीतरी आधार होईल. पण पोलिसांच्या 'कर्तव्यदक्षते'मुळे ती वेळच आली नाही. या पोस्टवर अनावश्यक द्वेषमूलक कॉमेंटस करू नयेत. पोस्ट शेअर करावी वाटली तर त्यातील मजकुरात - फोटोत बदल करू नये वा अश्लील - बीभत्स मजकूर टाकू नये.)
http://sameerbapu.blogspot.in/2016/02/blog-post_91.html

red.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

..............
नि:शब्द! यावर काही बोलणे म्हणजे स्वतःचा वांझपणा जाहीर करणे होईल.

नकोच काही बोलायला........ कित्ती नीच लोक आहेत ती, बोलण्यासारखं काही ठेवलचं नाही आहे ह्यांनी. Sad

छान लिहिलात असं तरी कसा लिहू
मला माहिती नाही पण प्रतिसाद म्हणून संदीप खरेचं गाणं लिहावास वाटलं

कुठंवर आत वर अंधार सोसावा,
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा

कुठंवर आत वर अंधार सोसावा,
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा

पायवाट वेलीपरी जखडते पायी
मागे जाता येत नाही, पुढे ठाव नाही

पायवाट वेलीपरी जखडते पायी
मागे जाता येत नाही, पुढे ठाव नाही

अंधारल्या घुमटीत, भिर भिर वारा

दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा

मातीच्या गंधाने दिशा, भिजतात दाही
दाटून येते नभ तरी, झरतच नाही

येतो ढग जातो ढग, दूरच्याच गावा

दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा

कुठंवर आत वर अंधार सोसावा,
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा

दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
दिवा लागो देवा, दिवा लागो देवा

Sad

समीर,
मन विषण्ण झालं वाचून. Sad तिच्यावर नक्की काय अत्याचार झाले हे विचारवत नाही, कारण तिचा शेवट इतका भयंकर आहे त्याच्याकडे वाटचाल करायला लावणारे अत्याचार ही तितकेच भयंकर असणार.
एकिकडे मन सुखावते असा विचार करून की आपलं नशिब चांगलं होतं म्हणून आपण चांगल्या घरात जन्मलो आणि आज आदरानं जीवन जगतोय.
आणि दुसरीकडे आपण वर मांडलेला विचार करतो त्याची, आपल्या समाजात असं काही घडतंय याची शिवाय त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही याची प्रचंड खंत आणि लाज वाटते.

तलाश मध्ये करीना सुद्धा आमिरशी बोलताना त्याला सांगते (स्वतःबद्दलच सांगत असते) की तिच्या ३ मैत्रिणी होत्या त्यापैकी एक गायब झाली पण त्याची नोंद कुठेही नाही, मूळात त्यांना माणूस समजलेच जात नाही, शिवाय समाजातले कोणतेच हक्क प्राप्त होत नसल्याने जगले काय मेले काय, हिशोब एकच.

सगळे लेख वाचतो, पण प्रतिक्रिया काय द्याव्या तेच कळत नाही.
घाटकोपर स्टेशन जवळच्या या गल्ल्या रहदारीच्या आहेत. अनेक लोक कामानिमित्त ( मी सुद्धा एकेकाळी ) त्यामधून जात येत असतात. पण या स्त्रिया आजूबाजूला असून त्यांच्या बद्दल कायम शिसारीच वाटली ( आता लिहिताना लाज वाटतेय )

आणि त्या बायकाही कधी आपल्या सारख्या लोकांच्या वाटेला जात नाहीत

असा काळीज विदीर्ण करणारा प्रसंग घडूनही तिथे आलेले बघे वखवखल्या नजरेने रडणारया बायकांना न्याहाळात होते...
>>>>
हेच एक नागडं सत्य आहे.

ज्या लोकानी या प्रकरणात गैरफायदा घेतलेला / गैर प्रकार केला असेल ते लोक इथेच ते फेडून जातील.