इस्रोच्या 'बैलगाडी'ची गगनभरारी ....

Submitted by अजातशत्रू on 22 June, 2016 - 22:46

upgrah.jpg

या बैलगाडीत काय असेल ? तुम्हाला काय वाटतंय ?
अंदाज लागत नाही ना ....
१९८१ मधील या फोटोतल्या बैलगाडीत वाहून नेली जात असणारी वस्तू म्हणजे आपला उपग्रह 'अॅपल' आहे.
आपण अवकाश कार्यक्रमाची सुरुवात केली तेव्हा रॉकेट सायकलवर व उपग्रह बैलगाडीवर लादून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवले जात असत.
३५ वर्षापूर्वी आपल्याकडे दळणवळणाच्या साधनांची अन आर्थिक उपलब्धीची किती वाणवा होती याचा अंदाज येण्यास हे छायाचित्र पुरेसे बोलके आहे.

साडेतीन दशकापूर्वी बैलगाडीतून उपग्रह नेणाऱ्या 'इस्रो'ने काल १२८८ किलो वजनाचे २० उपग्रह एकाच वेळी अवकाशात नेऊन सोडले ! प्रक्षेपणानंतर अवघ्या २६ मिनिटांत सर्व उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापन झाले. ही अत्युच्च कामगिरी साधणारा भारत जगातील रशिया-अमेरिकेनंतर तिसरा देश ठरला.

एके काळी भयंकर हलाखीची अवस्था असणाऱ्या आपल्या अवकाश संशोधन संस्थेकडे आज जगभरातील देशांची उपग्रह प्रक्षेपणासाठी रांग लागली आहे कारण जगातील आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत देशांच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपण करण्याचे कसब फक्त भारताकडेच आहे.

सन २००८ मध्ये 'इस्रो'ने एका वेळी १० उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदवला होता. तर २०१३ मध्ये अमेरिकेने २० व २०१४ मध्ये रशियाने एका वेळी ३३ उपग्रह अवकाशात पाठवून कामगिरी केली होती. त्यांच्या रांगेत जाऊन बसताना काल एकाच वेळी २० उपग्रह अवकाशात पाठवून भारताने बुधवारी जगाला थक्क करून सोडले. यातील १७ उपग्रह विदेशी होते. यापैकी १३ अमेरिकेचे व कॅनडा, इंडोनेशिया, जर्मनी या देशांचे चार उपग्रह होते.

असे असूनही आज घडीला १३ लाख कोटींच्या उपग्रह बाजारपेठेत अमेरिकेचा वाटा ४१ टक्के तर भारताचा वाटा ४ टक्के आहे हे देखील ध्यानात ठेवले पाहिजे. सोशल मिडियामध्ये काही लोकांनी अतिआत्मप्रौढीपायी 'अमेरिकेच्या नाकावर टिच्चून, अमेरिकेला नमवून, अमेरिकेला पायाखाली रगडून, भीक मागायला लावून त्यांचे १३ उपग्रह आपण अंतराळात सोडले आहेत' असा खोडसाळ प्रचार चालू केला आहे तो मात्र अतिरंजित आहे. कारण भारत अमेरिका मैत्री सामंजस्य कराराअंतर्गत अमेरिकेने त्यांचे उपग्रह 'इस्रो'कडून प्रक्षेपण करवून घेण्याचे मुक्रब केले होते त्यानुसारच काल त्यांचे १३ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.

२०२४ पर्यंत जगभरातून १४०० उपग्रह प्रक्षेपित होतील असे अनुमान वर्तवले जात आहे, त्याच बरोबर त्यावेळी हा उद्योग १५ लाख कोटींची होईल असाही अंदाज आहे. या बाजारपेठेत आपण आतापर्यंत ५७ देशांचे उपग्रह प्रक्षेपित करून एक हजार कोटी रुपये कमावले आहेत. २०१४-१५ मध्ये 'इस्रो'कडून सर्वाधिक ४० परदेशी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.

काल आपल्या पीएसएलव्ही-३४ ह्या अग्नीबाणाने २६ मिनिटांत २० उपग्रहांचे प्रक्षेपण केले. या २० उपग्रहांमध्ये ७२७ किलोग्रॅम वजनाचा ‘कारटो सॅट २’ हा सर्वात वजनदार उपग्रह आपलाच होता. तर १३ अमेरिकी उपग्रहांत गुगलची मालकी असलेल्या टेरा बेलाचा 'स्काय सॅट जेन२' हा ११० किलोग्रॅमचा उपग्रह समाविष्ट आहे. हा उपग्रह पृथ्वीच्य़ा हलचालींचे फोटो टिपण्य़ासाठी बनवण्यात आला आहे.

काल प्रक्षेपित केलेल्या आपल्या तीन उपग्रहांपैकी दोन उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केलेले होते. 'स्वयम' हा उपग्रह पुण्यातील तर दुसरा उपग्रह चेन्नईतील विद्यार्थ्यांनी तयार केला होता. ‘कारटो सॅट २’मुळे शहरी, ग्रामीण, पाण्याचे वाटप व पाण्याचे स्त्रोत यावर मोलाचे काम केले जाणार आहे. तर सीओईपीतील विदयार्थ्यांनी बनवलेला 'स्वयम' सॅटेलाइट कम्युनिटी रेडिओसाठी मेसेज पाठविण्याचे काम करणार आहे. तर चेन्नईतील सत्यभामा विद्यापीठाचा१.५ किलोंचा 'सत्यभामासॅट' ग्रीन हाऊस गॅस संदर्भातील माहिती गोळा करणार आहे.

आपल्याला इतर देशांचे उपग्रह प्रक्षेपणाचे काम मिळण्याचे प्रमाण आपल्या यशाच्या टक्केवारीवर अवलंबून आहे. या क्षेत्रातील आपल्या यशाचे प्रमाण ८६ टक्के आहे.
१९ एप्रिल १९७५ पासून आजवर ११३ अग्निबाण इस्रोकडून प्रक्षेपित करण्यात आले आहेत. यातील बरेच चाचणीच्या धर्तीवर होते. या काळात ९७ प्रक्षेपणे यशस्वी झाली. यात मंगलयान, चांद्रयान मोहिमांचा समावेश आहे.

आपल्या अवकाश संशोधनाची खरी यशोगाथा आपल्या कमी खर्चात आहे. अमेरिकेची अंतरीक्ष संशोधन संस्था 'नासा'चे चालू अर्ध्या वर्षाचे बजेट आपल्या इस्रोच्या मागील ४१ वर्षांतील बजेटइतके आहे !यावरुन अमेरिकेचा अंतरीक्ष संशोधन मोहिमेचा अवाढव्य अक्राळ विक्राळ पसारा अन अफाट आर्थिक तरतुदीचा अंदाज यावा ! तसे असूनही आपण त्यांच्या स्पर्धेत आलो आणि स्वतःला सिद्ध करून दाखवलं हे अधिक महत्वाचे म्हणावे लागेल.

आपल्यावर आयुष्यभर जळत राहणाऱ्या पाकिस्तानची या क्षेत्रातील कामगिरी आपल्या तुलनेत अगदी नगण्य आहे. पाकची अवकाश संस्था 'सुपार्को' ही आपल्या इस्रोच्या वर्षभर आधी सुरू झाली. मात्र, आतापर्यंत या संस्थेने केवळ दोनच उपग्रह अवकाशात सोडले. तेही परदेशाच्या मदतीने.

सुरुवातीला युरोपियन देश कुत्सितपणे आपल्या अवकाशसंशोधन संस्थेचा 'बैलगाडीचे अग्निबाण' (रॉकेट ऑफ बुलककार्ट) असा उल्लेख करायचे आता मात्र बैलगाडीच्या भारमानाहून अधिक वजनाचे उपग्रह आपण एकाच वेळी अवकाशात स्थिर करून आपला बैलगाडीपासून सुरु झालेला प्रवास उत्तुंग गगनभरारीचा आहे हे जगाला पटवून दिले आहे.

या अभूतपूर्व कामगिरीचे अन या भव्य दिव्य यशाचे श्रेय कोण्या एका राजकीय पक्षाचे वा व्यक्तीचे नसून सर्वस्वी आपल्या संशोधकांचे, वैज्ञानिकांचे, त्यांना मदत करणाऱ्या असंख्य सहायक शास्त्रज्ञांचे आहे ! तेंव्हा इतरांनी त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करून त्यात देखील राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये. कारण सोशल मिडीयावर काही जणांनी आपली राजकीय छाती बडवून घेण्यास सुरुवात केली आहे !

रात्रंदिवस अथक परिश्रम करून दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या आपल्या सर्व वैज्ञानिकांचे अन त्यांना मदत करणाऱ्या सर्व घटकांचे मनापासून अभिनंदन....

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/06/blog-post_61.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शास्त्रज्ञांचे अभिनंदन.

शीर्षक आणि पहिल्या काही ओळी सनसनाटीसाठी लिहिलेल्या वाटल्या. आर्यभट्ट, रोहिणी इ. उपग्रह अॅपलच्या आधी प्रक्षेपित करणाऱ्या संस्थेकडे तेही 1980 मध्ये सायकल आणि बैलगाडी हीच साधने होती, हे अतिरंजित आहे.
एका शास्त्रज्ञाचा लेख आहे कुठेतरी नेटवर त्यात केवळ एका विशिष्ट चाचणीसाठी संपूर्ण लाकडी (रोधक) साधनाची आवश्यकता असल्याने, आणि चाचणी केंद्रापासून अगदी जवळच्या अंतरावर मोकळ्या जागेत करायची असल्याने बैलगाडी वापरली गेली असे लिहिले आहे.

रात्रंदिवस अथक परिश्रम करून दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या आपल्या सर्व वैज्ञानिकांचे अन त्यांना मदत करणाऱ्या सर्व घटकांचे मनापासून अभिनंदन....>>>>>>> खरोखरच देदिप्यमान कामगिरी....

सुंदर लेख ...

अवांतर - कृपया शुद्धलेखनाकडे पहाणार का ??
वाणवा -वानवा
दैदिप्यमान - देदिप्यमान
अमेरिकेने त्यांचे उपग्रह 'इस्रो'कडून प्रक्षेपण करवून घेण्याचे मुक्रब केले होते - मुक्रब हा शब्द बरोबर आहे का ? मला माहित नाहीये..
धन्यवाद...

माहितीपूर्ण लेख, वरिल बैलगाडीवरिल उपग्रह या "ऐतिहासिक" फोटो सहित इथे दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

समीरबापू तुमचा लेख म्हणजे समतोल असलेला भाषा आक्रस्ताळी नसणारा अन समग्र असतो कायम, हा लेख सुद्धा अत्युत्तम जमला आहे , खूप खूप आवडला

-सोन्याबापू

छान माहिती. टायपो कमी झाले तर वाचण्यात रस राहिल असे वाटते. - २०१४ पर्यंत जगभरातून १४०० उपग्रह प्रक्षेपित होतील असे अनुमान वर्तवले जात आहे, त्याच बरोबर त्यावेळी हा उद्योग १५ लाख कोटींची होईल असाही अंदाज आहे .

हे नक्की २०१४ आहे का?


३५ वर्षापूर्वी आपल्याकडे दळणवळणाच्या साधनांची अन आर्थिक उपलब्धीची किती वाणवा होती याचा अंदाज येण्यास हे छायाचित्र पुरेसे बोलके आहे.

https://www.quora.com/profile/Mahesh-C-Shastry/Posts/Satellites-on-bullo...

http://www.isro.gov.in/indian-first-communication-satellite-%E2%80%93-apple

समीरजींचे लेख चांगलेच असतात. मला वाटतं की ते आधिच लिहुन झालेले लेख पुनःप्रकाशित करत असावेत. पण त्यावर योग्य ते संस्कार्/काट्छाट वगैरे न करता ते प्रसिद्ध करतात. त्यामुळे बरेचदा तपशिलांचा घोळ होतो..

छान लेख!!!

रात्रंदिवस अथक परिश्रम करून दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या आपल्या सर्व वैज्ञानिकांचे अन त्यांना मदत करणाऱ्या सर्व घटकांचे मनापासून अभिनंदन....>>>> +१००

मस्त लेख...
रात्रंदिवस अथक परिश्रम करून दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या आपल्या सर्व वैज्ञानिकांचे अन त्यांना मदत करणाऱ्या सर्व घटकांचे मनापासून अभिनंदन....>>>> +१००००००

बैलगाडीच्या भाकडकथेमुळे अजाण बालकांच्या मनांवर चुकीचे बिंब छापले जात आहे. अख्खा लेख वाचून तेवढीच गोष्ट कळतेय काहींना.

https://www.quora.com/Is-it-true-that-ISROs-Apple-satellite-was-carried-...

That day, when the photo was taken, they were taking the satellite out for an antenna-range test. Now, with a basic understanding of physics, you'd know that testing an antenna by placing it, say, on the bed of a truck isn't the best since the truck is metallic.

http://www.independent.co.uk/news/world/bullock-cart-obscures-indian-que...

'We didn't realise what a fuss that photo would make,' said S Krishnamurthi, the press spokesman at the Indian Space Research Organisation (Isro), at their futuristic, moon-grey headquarters in Bangalore, south India. 'Of course, we didn't need to use a bullock cart. We have padded, air-conditioned transport lorries, but the metal was throwing off reflections which were affecting the satellite's antenna. Then somebody hit on the idea of a bullock cart, which is made of wood. It worked perfectly.'

सोशल मिडियामध्ये काही लोकांनी अतिआत्मप्रौढीपायी 'अमेरिकेच्या नाकावर टिच्चून, अमेरिकेला नमवून, अमेरिकेला पायाखाली रगडून, भीक मागायला लावून
गंमत म्हणजे असे लिहिणार्‍या लोकांपैकी एकाचाहि या सर्व प्रकल्पात दुरून देखील संबंध आला नसावा. त्यांना या सर्व गोष्टींमधील तंत्रज्ञान, विज्ञान या बद्दल कितपत माहिती असेल शंकाच आहे. नि अमेरिका नि रशिया यांच्या एकूण तंत्रज्ञान विकासाबद्दल तर नक्कीच काही माहिती नसावी असे वाटते.

आता जे काय भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांनी केले ते अत्त्युच्च प्रतीचे काम होते यात शंकाच नाही. त्याबद्दल त्यांचे जितके कौतुक करावे, जितका अभिमान बाळगावा तो थोडाच.

पण लग्गेच अमेरिकेशी तुलना कशाला? मुळात भारतीयांना अमेरिकेशी तुलना करण्याचे काय काम?

बरीच वर्षे भारतात व अमेरिकेत काढलेल्या लोकांना माहित आहे की शास्त्र, तंत्रज्ञान, त्याचा सार्वत्रिक वापर, अर्थव्यवस्था, राजकारण या सर्व क्षेत्रात भारताला फार फार मोठ्या प्रमाणात अमेरिकेने सध्या मागे टाकले आहे -
अजून भरपूर शिकायचे आहे अमेरिकेकडून नि रशिया कडून तंत्रज्ञाबद्दल नि शास्त्राबद्दल. लग्गेच असली भाषा वापरणे म्हणजे प्रतिपक्षाने ६०० धावा केल्या नि आपल्या फक्त ७० सर्व बाद झाल्यावर, एकाच फलंदाजाने ३५ धावा केल्या म्हणून प्रतिपक्षाच्या गोलंदाजीचा धुव्वा, त्यांच्या नाकावर टिच्चून वगैरे बोलण्यासारखे आहे.

नन्द्या४३, सहमत.

तुम्ही एका नवीन मुद्द्याकडे खेचताय मला. 'खरं तर विमान, अंतराळ-शास्त्र, अत्याधुनिक शस्त्रास्त्र हे सगळं भारतात फार पूर्वी होतच (पुरावा: पुराणकथा), मग ब्रिटीशांनी हे सगळं तंत्रज्ञान चोरून नेलं, आणी नंतर अमेरिकेनी हे सगळं स्वतःचं म्हणून बाजारात आणलं' हा आणी ह्या प्रकारचा दावा मी अनेक वेळा ऐकलाय. हे दावे करणारी लोकं ह्यात टाईमलाईन, भुगोल, कविकल्पना आणी शास्त्रीय पुरावे ह्यात काही हजारो वर्ष, हजारो मैलांची गल्लत आहे ह्यावर चुकूनही गौर फर्मावत नाहीत.