सफर करमाळ्याची

Submitted by मध्यलोक on 27 June, 2016 - 08:59

माहे: जानेवरी, दिनांक: २६, साल: २०१६
ठिकाण: सर्वोच सह्यगिरी "साल्हेर" माथा
वेळ: सकाळी

नुकताच राष्ट्रधव्ज सर्वोच सह्यदुर्गावर फडकावून झाला होता, मानवंदना आणि राष्ट्रगीत सुद्धा झाले होते आमची "नाशिक" मोहीम फत्ते झाली. मांगी-तुंगी, हरगड, मुल्हेर, मोरा,सालोटा आणि साल्हेर अश्या बागलणातील दुर्गम किल्ल्यांची पवित्र माती आमच्या माथी लावून आम्ही सुद्धा ह्या राकट सह्याद्रीतील एक मातीचा कण झालो होतो. इतक्या सुंदर मोहिमे नंतर सिमेंटच्या जंगलात परतावे असे कुणाला वाटेल, आम्हीही त्यातलेच होतो. पुण्याकडे परतीच्या वाटेवर असणारे आम्ही "पुढे काय?" असा बिकट प्रश्न घेऊन घरच्या प्रवासाला निघालो.

आमच्या ह्या बिकट प्रश्नाला उत्तर दिले ते आमच्यातील एका भटक्या सवंगडीने, "कुगावचा इनामदार वाडा आणि करमाळ्याचा किल्ला", इति योगेश पाचंगे. साहेबांनी चार वर्षापूर्वीच्या वर्तमान पत्रातील कुगावच्या वाड्याचे कात्रण ट्रेकला सोबत आणले होते आणि बेत आखायचा होता उन्हाळ्याचा. वा रे पठ्ठया, ह्याला म्हणतात खरा ट्रेक्कर. अजून हिवाळाही संपला नाही आणि गड्याचे उन्हाळ्यातील बेत सुरू होते. प्रकरणही तसेच होते, उजणीच्या विस्तीर्ण जलाशयात जलसमाधी घेतल्येला ह्या वाड्याला यंदाच्या विदारक दुष्काळाने डोके वर काढण्याची संधी दिली होती. २०१६चा उन्हाळा अजून यायचा होता पण त्याच्या प्रखरतेची जाणीव पावसाळा संपल्यापासूनच होत होती. जानेवारीतच महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जलाशयातील पाण्याची पातळी खाली गेल्याचे सूतोवाच झाले होते. साधारण मे महिन्याचा शेवटी ही मोहीम करण्याचे ठरले आणि फक्त कुगाव करमाळा अशी भटकंती न करता ह्याच प्रदेशातील इतरही किल्ले करण्याच्या बेत आमच्या प्रमुखाने (पुन्हा योगेश) आखला.

इतक्यातच मराठी चित्रपटात एक क्रांतिकारी चित्रपट आला, “तिकीटबारीचे” सगळे उचांक "सैराट"रित्या त्याने मोडले. आमची भटकंतीची ठिकाणे ह्यामुळे पर्यटकांच्या नकाशावर ठळक प्रकारे "दिसू" लागली. समस्त मंडळींना "याड लागला" आणि सगळे "सैराट" होवून कधी कुगावच्या वाड्याला तर कधी करमाळ्यात कमालादेवीच्या मंदिराला भेटी देऊ लागले. तश्या ह्या जागा लोकांच्या खिजगणतीत सुद्धा नसतील पण इकडं प्रसिद्धी मिळाली की आपण ही तिकडे जाऊन तसेच फोटो काढावे तशीच सेल्फी काढावी ह्या आपल्याकडे असलेल्या सवयीमुळे हा सगळा परिसर आषाढी एकादशीला जसे पंढरपूर दुमदुमते तसा दुमदुमला आहे ह्याच्या इत्यंभुत बातम्या दूरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रात सर्वत्र झळकु लागल्या.

जसा जसा मे महिना जवळ आला तसे तसे आमचे एक एक मावळे आणि "हिरकण्या" होकाराचे नकार देऊ लागले. तीन दिवसाचा बेत एका दिवसावर येऊन ठेपला. चारचाकीने जावे की दुचाकीने हा प्रश्न आमच्या सरदारा पुढे ठाकला. दिवस ठरला मुहूर्त ठरला आणि ट्रेकची आयुधे सॅकरुपी भात्यात जमा झाली.

माहे: मे, दिनांक: २९, साल: २०१६
ठिकाण: घरातील मखमली गादी
वेळ: पहाटेच्या गजराची

गजर कधी वाजला कळलेच नाही ....वाजला? वाजलाच नाही. AM च्या ऐवजी PM करण्याची चूक पहिल्यांदाच ट्रेकला झाली होती. असे कधी होत नाही पण कदाचित आधल्या रात्री झोपायला झालेला उशीर आणि शनिवारी झालेली लगबग ह्यास कारणीभूत ठरली होती. तरी बरे सकाळी ६ला जाग आली, “अंघोळीची गोळी”घेऊन आणि घरापासून २० किमी अंतर कापून ७ AMला आम्ही तिघे (रुचिरा, मी व आमचा अश्व "ब्लॅकपर्ल") स्वारगेटला "उशिरा" पोहोचलो. एकुणात ४ मावळे आणि २ हिरकण्या अशे ६ स्वार ३ स्वयंचलित अश्वावर एकमेकांशी नीट गळाभेट ही न करता सोलापूरच्या दिशेने निघालो.

पहिला थांबा अर्थातच न्याहारीचा होता, भरपेट पोटोबा (आमचा आणि आमच्या अश्वाचा) झाल्यावर पुन्हा एकदा आम्ही मार्गस्थ झालो. गेल्या काही वर्षात सोलापूर महामार्गाचा कायापलट झाल्याने चारपदरी रस्ता व तुरळक वाहतूक ह्याची सांगड आणि नखशिखांत असलेली सरंक्षक आवरणे ब्लॅकपर्लची घोडदौड सुसाट करण्यास मदत करत होती. कधी उजनी जलाशयाचे पाणी दिसायला लागले कळलेच नाही. कधीकाळी तुडुंब भरलेल्या पात्रात गडप झालेली वारसास्थळे आता दुष्काळाच्या झळा सोसून बाहेर डोकावू लागली होती. ह्यापैकी एक असलेले "पळसदेव" महामार्गावरून सहजच नजरेत येत होते.

Palasdev Mandir.JPG
पळसदेव मंदिर

मंदिराला भेट देण्यासाठी पळसदेव मार्गे होडीने जावे लागते पण यंदाच्या अतिभयंकर दुष्काळाने अलीकडील गावातील तट कोरडा होऊन थेट मंदिरापर्यंत गाडी जाते. शेती आणि धरणाच्या भेगाळलेल्या भुईवरून आडरानातून गाड्या चालवत आम्ही ह्या चालुक्यकालीण शिवमंदिरात पोहोचलो. शिळेवर छन्नी हातोड्याचे घाव घालून शिल्पकाराने जी कलाकुसर केलीये ती अवर्णनीय आहे. एकमेकांशी बंध घालणारे दगड रचून तयार झालेले हे मंदिर म्हणजे त्याकाळी असलेल्या तंत्रज्ञानाचा परमोच्च बिंदू असावा. आखीव रेखीव देवऱ्या, आकाशाला भिडणारा कळस आणि भूमितीची समीकरणे वापरून तयार केलेला शास्त्रोक्त गाभारा पाहून कुठल्या मानवी मनाला नवल होणार नाही? जन्मजन्मांतर आणि अनेक युगे मागे टाकून अजूनही कृत्रिम परिस्थितीशी जुळवून ही वारसास्थळे आपली मुळे घट्ट रोवून उभी आहेत. मंदिर परिसरात आम्हाला वीरगळ, सतीशिळा, कोरीव खांब आणि त्यावरील शिलालेख बघायला मिळाले. देवऱ्या ह्या त्यामानाने अलीकडील काळातील आहे हे त्यांच्या विटांच्या बांधकामावरून स्पष्ट जाणवते.

Palasdev.jpg
पळसदेव मंदिरातील अवशेष (भग्न मूर्ती, सतीशिळा, विरघळ आणि शिलालेख)

Sthapatya.JPG
सुरेख स्थापत्य

DSCF5153.JPG
अश्वमुख असलेली होडी

इथेच आम्हाला भेटली एक "राणी", गोरीपान, उंच, मन मोहून घेणारी, पण तिला सोबत होती तिच्या "बाबांची". हिम्मत करून थोडा जवळ गेल्यावर तिने हसून प्रतिक्रिया दिली आणि आम्हाला ही पुढील बोलणी करायला धीर आला. नाव कळले राणी आणि बाबानी वय सांगितले “५”. इकडे येणाऱ्या पर्यटकांवर मनापासून प्रेम करणारी आणि सगळ्यांना ह्या प्रदेशाची रपेट घडवून आणणारी. एव्हाना ऊन मी म्हणायला लागले होते आणि त्यामुळेच राणी देवऱ्याच्या सावलीत विश्रांती घ्यायला आली होती. आम्हालाही अजून बराच पल्ला गाठायचा होता त्यामुळे आम्ही सुद्धा पळसदेवाला नमस्कार करून निरोप घेतला.

Raani.JPG
“राणी”

साधारण दोनच्या सुमारास आम्ही कुगावला पोहोचलो, चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या ह्या जागी भरपूर गर्दी होती आणि सगळ्या होड्या प्रवाशांनी ओसंडून "वाहत" होत्या. छोटेखानी अश्या ह्या वाड्याने सुद्धा उजनीच्या निळ्याशार पाण्यात जलसमाधी घेतली आहे. पडझड झालेले चार बुरुज, तटबंदी अजूनही पाण्याशी झुंझत आहे. होडीने आम्हाला पश्चिमेकडील अशाच एका तटबंदीला उतरवले. आम्ही लगेच वाड्याच्या पूर्वेकडील असणाऱ्या प्रवेशद्वारा जवळ असणारी वास्तू जीअजूनही आपले थोडेफार असणारे अस्तित्व टिकून आहे ती बघायला निघालो. तटबंदीवरून आम्ही शक्य तितका फेरफटका मारला आणि थोडीफार फोटोग्राफी करून किनाऱ्यावर सोडणाऱ्या होडीची वाट बघत उभे राहिलो.

DSCF5238.JPG
इनामदार वाडा

JaalYaan.JPG
जलयान

Wada Inside.jpg
वाड्याच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराचे अवशेष

Wada.jpg
उजणी जलाशयातील कुगाव येथील इनामदार वाडा

करमाळ्याकडे जाणाऱ्या राज्यमहामार्गापर्यंत येण्यास चार वाजले आणि भुकेने पोटातीळ सगळी प्राणिमात्रा आरडा ओरड करू लागली. उदरभरणाचा कार्यक्रम पार पडून करमाळ्यात प्रवेश केला. आमचा अवतार, गळ्यात लटकवलेले कॅमेरे बघून आम्हाला पहिला प्रश्न झाला, "शूटिंगला आलात का, कोणता पिक्चर?" आणि पुढे "सैराट" च्या सगळ्या शूटिंग लोकेशन्सची यादी आमच्या पुढे गावकर्यांनी उभी केली. वाह! आमच्या ह्या अवताराचा आम्हाला फायदाच झाला. कमलादेवीचे मंदिर आणि तेथील ९६ पायऱ्यांची विहीर हे या यादीत सगळ्यात आघाडीवर, पण आम्ही आमचा मोर्चा "थेट" किल्ल्याकडे वळवला. अबब! २९ बुरुज, गावभर पसरलेली दीड दोन मैल तटबंदी आणि त्यात वसलेले करमाळा शहर बघून आमचे इथवर येण्याचे श्रम सार्थकी लागले. जिकडे पाय ठेवावा तिकडे काही तरी बघण्या सारखे, फक्त तटबंदी वरून फेरफटका मारावा तरी दमछाक होण्याइतपत मोठा पसारा आहे.

Karamala Killa.jpg
करमाळा किल्ल्याचे विविध दरवाजे

Karamala Fortification.jpg
करमाळा किल्ल्याची तटबंदी

BhaldarChopdar.JPG
भालदार आणि चोपदार

DSCF5384.JPG
सातविहीर

Sunset.JPG
सूर्यास्त

पण.... नेहमी प्रमाणे ह्यातील किती वास्तूंची आपण काळजी घेतली असे विचाराल तर मन खट्टू होण्याशिवाय दुसरे काही उत्तर मिळणार नाही. अतिक्रमणाने गडाचा श्वास कोंडला आहे, काही अवशेष तर कचरा टाकण्यासाठी उपयोगात येतात, चक्क पाण्याच्या बारव सुद्धा आपण सोडल्या नाहीत! मावळतीची दिशा सोनेरी होवोस्तर आम्ही किल्ला न्याहाळला आणि इथून पुढे गावकरी म्हणतील ती पूर्व दिशा समजून सगळी शूटिंग लोकेशन्स बघितली. आमची "आर्ची" (म्हणजे आमच्या सौ) फारच खूष झाली हा सगळा प्रकार बघून आणि तेवढीच स्तब्ध ही झाली, म्हणाली "आता इथेही व्यावसायिकरण होणार का हो?" असो. कमलादेवीचे मंदिर, त्यातील ३ उंच दीपमाळ आणि शेजारील ९६ पायऱ्यांची विहीर बघून आम्ही परतीच्या वाटेवर निघालो.
तसे रात्री दुचाकी चालवणे चुकीचे, पण दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कामावर परतणे आवश्यक होते आणि आमचा नाईलाज होता. परतीची वाट ही महामार्ग असल्यामुळे प्रवास थोडा सुकर झाला पण ही सफर दोन दिवसातच करणे योग्य असे सारखे वाटत होते. एका दिवसात पुणे - पळसदेव - टेम्भूर्णी - कुगाव - करमाळा - भिगवण - पुणे असा ४५० किमी प्रवास करून सोमवारी पहाटे ३ वाजता घरी पोहोचून आम्ही करमाळा मोहीम पूर्ण केली.

Baarav.jpg
“बारव” – हीचा उपयोग कचरा टाकण्यासाठी करतात

Step Well.jpg
करमाळा येथील ९६ पायऱ्यांची विहीर

Kamal Devi Mandir.jpg
कमलादेवी मंदिर परिसर

Deepmaal.JPG
दीपमाळ

सवंगडी: योगेश पाचंगे, दीप्ती रानडे, आनंद नाईक, श्रीहरी कुलकर्णी, रुचिरा रोकडे आणि मी.

Team.JPG
आम्ही भटके

प्रवासाचा मार्ग: पुणे (सुस) - स्वारगेट - भिगवण - पळसदेव - टेम्भूर्णी - जेऊर - कुगाव - करमाळा - राशीन - भिगवण - कुरकुंभ - यवत - हडपसर - स्वारगेट- (सुस) पुणे

एकूण अंतर - ४५०किमी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, लोक जाऊनही आले.,... ग्रेट. फोटो सुरेख आहेत. बारवचा उपयोग असा करतात पाहुन आश्चर्य वाटले नाही.

मस्त वर्णन, फोटोज पाहुन मजा आली.
टुरिझम सुरु झालयं ही चांगली गोष्ट आहे पण कचरा होऊ नये सग्ळ्या स्पॉटसचा .
बारवात कचरा दिसतोय. Sad

छान.
सुरेख स्थापत्यच्या वरचा फोटो अगदीच गबाळ्या पद्धतीने रचलेल्या विटा आणि मध्ये भरलेले सिमेंट आहे. हा फोटो जुन्याकाळचा वाटला नाही. चुकून पडलाय का फोटो?

छान सफर घडवलीत करमाळ्याची!

त्या दीपमाळेवर चढता येते का? सैराट झालं जी गाण्यात आर्ची परश्या वर चढून गप्पा मारताना दाखवले आहेत म्हणून विचारले.

@ श्री << कचरा दिसतोय>> नाही, कचरा टाकला आहे लोकांनी Sad

@ अमितव <<सुरेख स्थापत्यच्या वरचा फोटो अगदीच गबाळ्या पद्धतीने रचलेल्या विटा आणि मध्ये भरलेले सिमेंट आहे. हा फोटो जुन्याकाळचा वाटला नाही. चुकून पडलाय का फोटो?>> हे मंदिर पाण्याखाली असते आणि माती व चुना ह्यांचा वापरकरून हे बांधकाम केले आहे. पाण्यामुळे चुना विरघळला आणि प्रवाहित झाला त्यामुळे हे बांधकाम उघडे पडले आहे. ह्यावर सुद्धा त्याकाळी प्लास्टर केले असावे आणि "काळाच्या पोटात ते गडप" झाले असावे

@ गमभन <<त्या दीपमाळेवर चढता येते का? सैराट झालं जी गाण्यात आर्ची परश्या वर चढून गप्पा मारताना दाखवले आहेत म्हणून विचारले>> कदाचित हो, आम्हाला तिकडे तेवढा वेळ मिळाला नाही, त्यामुळे आमच्या मनात दीपमाळेवर चढण्याचा विचारसुद्धा आला नाही. उशीर झाल्यामुळे परतीचे विचार सुरू होते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
तसेच सगळ्यांचे आभार _/\_
पहिल्यांदाच मराठीत लिहिण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांना आवडला त्याबद्दल धन्यवाद!

करमाळ्याचा किल्ला. खूप दिवसांनी आठवण झाली. तिथं मी राहिलो आहे. लहानपण तिथंच. कुगावला एकदा होडीतून गेलो होतो. त्याचीही आठवण झाली. कमलादेवीच्या मंदिरातील ओवऱ्यातील शाळेत एक वर्ष शिकलो आहे मी. त्या तीन दीपमाळा...त्यात मोठा अजगर आहे, अशी मुलामुलांमधली तेव्हाची बोलवा. त्या चांगल्या दगडी मंदिराला गेल्या दोन दशकांपूर्वी ऑइलपेंट फासून रया घालवली सगळी. पायऱ्या 96, ओवऱ्या 96 आणि मंदिराचे खांबही 96. सोबतची विहीर शहाण्णव पायऱ्यांची. ती आता साफसूफ केलेली दिसते. सातविहीर पाहून तर खूप वर्षं झाली. किल्ल्याची पडझड खूप वर्षांपासून सुरू झालेली. बुरुजाचे दगड-माती नेण्याची प्रथाही जुनीच. खंदक बुजवून टाकला त्यालाही कैक वर्षं झाली. तुम्ही जी बारव दाखवली आहेत ना, त्याच्या शेजारी क्रिकेट खेळत असू आम्ही... तुमच्या या लेखामुळं स्मृतिरंजन झालं बऱ्यापैकी.