गावाकडचे दिवस ....भावार्थ रामायण

Submitted by अजातशत्रू on 13 June, 2016 - 06:01

भावार्थ रामायण......

गावात भावार्थ रामायणाचे पारायण सुरु असले की फोटोत दाखवल्याप्रमाणे दृश्य हमखास नजरेस पडतेच..
गावातले वातावरण या काळात संपूर्णतः भारलेले असे असते… रोज संध्याकाळी शेतातली कामे करून थकून भागून आल्यानंतर वेशीतल्या मारुतीरायाच्या देवळात रामायण ऐकायला जाणे हे एक स्वर्गस्थ सुखच…
बत्तीच्या उजेडात थोड्याशा उशीरपर्यंत चालणारया या श्रवण सोहळ्याचे अनेक क्षण मनावर कोरलेले अगदी जसेच्या तसे आहेत…

रामाचा जन्म झाल्यावर आया बायांना आपल्याच घरात पाळणा हलल्यागत वाटायचे. राम लक्ष्मण जसजसे मोठे होत जायचे तसतसे याना स्फुरण चढायचे…

दशरथाकडून श्रावण बाळाला बाण लागून तो घायाळ झाल्यावर यांच्याच डोळ्याला अश्रूच्या धारा लागायच्या, तो अध्याय सुरु व्हायच्या वेळेस एखादी भाबडी म्हातारी सांगायची 'महाराज,तेव्हढे दशरथ राजाला बाण नीट चालवायला सांगा आपल्या श्रावण बाळाला बाण लागून तो जखमी होईल !"
कैकेयीला वर देताना बाया पुटपुटायच्या, "बाईने शब्द मागितला तर त्येचा वापर नीट कराबा अन गड्याने अशा शिंदळकीला कशाला शब्द द्यावा बाई ?"

सीतेच्या जन्माची कहाणी ऐकताना बळीराजा भान हरपून जात असे, त्याला वाटायचे न जाणो आपल्या जमिनीत नांगरताना आपल्या नांगराच्या फाळाला अशीच एखादी सोनेरी पेटी थडकेल ! तो त्या काळात नांगर जपूनच चालवायचा!
'जनक राजा लई भाग्यवान त्याला मातीने पोरगी दिली'… अशी चर्चा म्हातारे कोतारे तोंडात तंबाखूचा बार भरत पारावर बसून करत.

"कौशल्या अन सुमित्रा कशा भणीवाणी राहत्येत, सवती सवती असून एक्काच घरात एका ताटात सोन्याचा घास खाऊन गुण्या गोविदाने राहत्येत, अन तुमी जावा-जावा असून देकील कस जल्माचं दुश्मन असल्यागत राह्ताव, अग बायानू जरा सुदरा की ! रामायण काय म्हणतय ध्येन दिऊन ऐका !" असा उपदेश घराघरातल्या सासवा आपल्या सुनांना करायच्या … त्यांना वाटायचे की कौशल्या अन सुमित्रा या सवती असूनही एकाच ताटात जेवतात मग आपल्या सुना का भांडतात ? त्या काळी एका एका घरात तीन ते सात आठ सुना असायच्या त्यावरून या उपदेशकर्त्या सासूची मानसिकता लक्षात कशी होती ते कळते ....

सीता स्वयंवर काळात गावातल्या तरण्या पोराना उधाण आलेलें असायचे, गावातली जाणती माणसे पोराना म्हणायची, 'अरे तुमच्या का बरगड्या मोजून घ्यायच्या का ? जरा दुध दुभते खात जावा, पोटाला बघा, थोडी तालीम लावा ! नाय तर असल्या मरतुकड्याला कोण जावई करून घेणार ? " विशेष म्हणजे हा सल्ला धडधाकट पोरानाही दिला जायचा अन बरयाचवेळा सल्ला देणारे काबाडकष्ट करून पार थकून माकून गेलेले अस्थिपंजर देहाचे असत.

मंथरेने कैकेयीचे कान भरायला सुरुवात केल्यावर बायांच्या तोंडाचा पट्टा चालू व्ह्यायचा मग कळायचं की, आपल्या गावातल्या बाया दिकून भारी श्या देत्यात…
कैकेयीला दिलेला वर पूर्ण करताना सगळा गाव असा विचारमग्न वाटायचा… त्यानंतर यायचा तो रामाला वनवासाला जाण्याचा दिवस !

रामवनवास जेंव्हा चालू व्हायचा तेंव्हा गावातली काही जाणती मंडळी अन पोरे अंगावर पोत्याचे कपडे घालून अन पायाला पायताण न घालता किंवा पायाला पोत्याचे तुकडे गुंडाळून गावाबाहेर जायची, 'वनवासाला जायची! होय अगदी वनवासालाच!

रामाला वनवासाला जावे लागले त्याचे प्रतीकात्मक प्रायश्चित्त म्हणून गावातील भाविक वृत्तीची साधी भोळी निरलस माणसे चौदा दिवसाच्या वनवासाला जायची. 'रामाला १४ वर्षे वनवासाला जावे लागले म्हणून आपणही १४ दिवस वनवासाला जायचे' ही कल्पनाच अभूतपूर्व अशा सौहार्दतेची अन सृजनशिलतेची आहे…

ज्या ज्या घरातली माणसे वनवासाला जायची त्या घरातलीच नव्हे तर सगळा गाव वेशीजवळ येऊन त्याना निरोप द्यायचा… एक विणेकरी अन बाकीचे सर्व टाळकरी असा हा रामभक्तांचा जथ्था मुखाने जय जय राम कृष्ण हरी चा घोष करत निघायचे…. चौदा दिवसाच्या यांच्या या वनवासात वाटेत लागणारी वाड्या, वस्त्या अन गावे इथले लोक त्यांचे पाय धुवायचे अन त्याना हारफुले अर्पण करायचे…

इकडे गावात दशरथ राजाचा मृत्यू ऐकताना म्हातारे कोतारे कासावीस झालेले असत. नंतर मात्र ज्याच्या त्याच्या मुखात भरताचे नाव झालेले. म्हातारे जाणत्या माणसाना बोलायचे. "अरे एक एकरापायी भावाच्या जीवावर उठू नगासा, बांधाला बांध लागला म्हणून जीव घ्येयाला मरू नका ! भरतराजाने कसं आपलं समद राज्य रामाच्या पादुका ठेवून केलं ! जरा शिका त्येच्याकडनं !"

पुढचे दिवस अगदी गतीने जायचे, अन लक्ष्मण शक्तीचा दिवस यायचा. बहुतांशी हे वनवासाला गेलेले गावकरी तेंव्हा गावात यायचे. गावाला उधाण आलेले असायचे. एक मोठी काहिली भरून खीर केलेली असायचे. सगळ्या गावाला जेवण असायचे. त्या रात्री गाव जागा असायचा.
मारुती राया संजीवनी 'आणण्यासाठी जाऊन अख्खा पर्वतच आणायचा हे ऐकताना अंगावर रोमांच यायचे. लहान पोरे तर उड्या मारायची अन 'बजरंगबली की जय'चा घोष अधून मधून होत रहायचा….

दिवस जात रहायचे अन एके दिवशी रावणाचा वध करून राम अयोध्येत परत आले की गावाला पुन्हा नवा हुरूप यायचा.…
सीतामाई अयोध्या सोडून जाताना बायका रडायच्या अन म्हणायच्या, ' बाईच्या जल्माचा वनवास कधीच संपत नाही गं बायानो ! जल्माचे भोग आहेत हे समदे, ते आपल्यालाबी भोगलेच पाहिजेत !"

पुढे लवकुशाची कहाणी ऐकताना लेकुरवाळया बायका हरखून जायच्या… 'आपल्या गावात बी कंदीतरी वाल्मिकीरुषि यील पर पोरांनू तुमी अब्यास नीट मन लावून करा' हे बोल ऐकताना खरेच वाल्मिकी ऋषिच्या आश्रमात शिकत असल्यागत वाटायचे…
लवकुश अयोध्येत परत आले की लोक खुश व्हायचे…
आता सगळ सुखात होणार असं नेहमी वाटायचे पण सीतामाई जमिनीत परत जाताना ऐकताना अख्ख्या गावाच्या जीवाला हुरहूर लागायची, बायका तर हुंदके देत डोळ्याला पदर लावूनच बसलेल्या असायच्या….

रामायणाचे पारायण पूर्ण झाल्यावर गाव खूप उदास वाटायचे, देवळाजवळून जाताना तर आपले काही तरी हरवले आहे असा भास व्हायचा. गावात रोज सकाळी निघणारी रामटाळी बंद झाल्यावर तर सकाळी सकाळी अवसान गेल्यासारखे वाटायचे....

दिवस, महिने निघून जायचे पण देवळाच्या पांढऱ्या भिंतीवरची ओबड धोबड अक्षरे डोक्यात घर करून असत. ऊन पावसाने मुळच्या ठळक अक्षरातली ती सूचना नंतर फिकट होऊन गेलेली असे मात्र स्मृतीच्या मोह्ळातले रामायणाचे मधुबिंदू त्यामुळे तरतरीत होत असत. देवळाच्या भिंतीवर लिहिलेले असे -
"गावात भावार्थ रामायण चालू आहे, वेशीजवळ आणि देवळाजवळ पायात वाहणे घालू नयेत. जय श्रीराम " !

आज जरी अशी सूचना कुठल्याही गावातल्या देवळातल्या भिंतीवर वाचायला मिळाली की मनात एकच हवाहवासा वाटणारा स्मृतींचा कल्लोळ हो,ज्यात मी नखशिखांत चिंब होऊन जातो ……

रामायण हा गावाकडच्या माणसांचा जगण्याचा आधार होता आणि आहे, म्हणूनच ग्रामीण भागातली कौटुंबिक आणि सामाजिक जडणघडण अजूनपर्यंत टिकून आहे असे आजही वाटते.

- समीर गायकवाड .

http://sameerbapu.blogspot.in/2015/05/blog-post_14.html
RAMAYAN.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अजूनही, केबल टीव्हीच्या आगमनानंतरही, चालू आहे का खरंच? तेव्हा मनोरंजनाची फारशी साधनं नसत, आता सगळंच बदललं आहे. शहर फार लांब नाही, करमणुकीची व्याख्या फार वेगाने बदलली आहे, तेव्हा या गावाकडच्या मानसिकतेतही बदल झालाच असणार.

गमभन, द मा मिरासदारांची एक गंमतशीर गोष्ट आहे या वनवासाला जाण्याबद्दल (नाना चेंगट आणि बाबू पैलवान वनवासाला जातात) Happy

@ वरदा ....
होय अजूनही ही प्रथा चालू आहे ...यंदाच्या वर्षी आमच्या गावाच्या पुढे असणाऱ्या मोहोळ या तालुक्याच्या गावा जवळ अशा वनवासी लोकांना एका बेफाम वेगात जाणाऱ्या ट्रकने चिरडले होते, काही जण जागीच ठार झाले होते तर बरेचसे जखमी झाले...१३ दिवसाचा दुखवटा पाळून गावात लक्ष्मणशक्तीचा कार्यक्रम साधेपणाने पार पडला पण लोकांनी गावातील भावार्थ रामायण बंद पडू दिले नाही ....

मुर्खपणाचा कळस आहे
>> शब्द जरा जपून वापरा, हा शेवटी श्रद्धेचा भाग आहे. आणि ग्रामीण भागातील जनता बहुतांशी मनाने भोळे असतात , त्यांचे मनोरंजन आणि पुण्यसंचय हा देवाधर्माशी जुळलेला असतो.
मी सुद्धा लहानपणी भागवत सप्ताह मध्ये भाग घेतला आहे. शेवटच्या दिवशी गाव सहभागाने गावजेवण असायचे वरण बट्टी (राखेवर भाजलेली) आणि जोडीला कुस्करलेली वांगे बटाट्याची तिखटजाळ भाजी. अगदी अप्रतिम

खुप छान वाटायचे, अजुनही मिसतोय.

छान अनुभव आहे आपला.

*********************************************************************

मुर्खपणाचा कळस आहे .>>> का?

कल्पक आहे. रामायण ही एक ऊत्तम कथा आहे. त्यातील काही प्रसंग लोक प्रत्यक्ष करतात. त्यांना भावलेल्या प्रसंगाला दिलेली ती दाद आहे. आवडलेलं गाणं आपण गुणगुणतो तसं. सामाजिक ऐक्य आणि सुविचारांची पेरणी करण्यासाठी एखाद्या लिखाणाचा उपयोग होत असेल तर त्यात मुर्खपणा कसला?
१४ दिवस वनवासाला जाऊन मनावर ताबा मिळविण्याची शक्ती वाढणार नाही का? रोजचे व्यवहार, आपल्या माणसांची सवय, आराम, सुखसोयी सोडून १४ दिवस स्वतःसाठी रामायणाच्या नायकाच्या निमीत्ताने दिले तर त्यात मुर्खपणा कसला?

खरच अनेक शतक भारतियांच्या मनावर राज्य करणारी कथा लिहणारी लेखक मंडळी धन्य होत. कथा काल्पनिक असली तरी अजोड आहे.रामायणातील आवडती पात्रे सिता व रावण..

खूपच भावपूर्ण आणि ह्रदयस्पर्शी लिखाण...

अवांतर - आपली मानसिकताच आपल्या प्रतिसादातून व्यक्त होत असते.. नाही का ??

छान मांडलंय.
मध्य- उत्तर भारतातही रामायणाचा जनमानसावरचा पगडा अचंबितच करंणारा आहे ! एकदां आम्हीं रावण -दहनाच्या दिवशींच मध्य प्रदेशातील 'पुरी' या मोठ्या गांवीं होतों. अगदींच बिछान्याला खिळलेल्या माणसांशिवाय गांवातील सर्व जण बायका-मुलांसह तिथल्या भव्य मैदानात या सोहळ्याला भाविकतेने हजर होते. सहलीला आलेला आमचा मोठा ग्रूप मुंबईचा आहे ,हें लक्षांत येतांच तिथं ड्यूटीवर असलेला तरूण पोलीस अधिकारी आम्हाला थोडं बाजूला घेवून हिंदीत म्हणाला, " मी कांहीं दिवस मुंबईत राहिलोय म्हणून तुम्हाला सावध करतो; मुंबईत राम, सीता इत्यादींचा मस्करीत केलेला उल्लेख सहज खपून जातो. इथं चु़कूनही तसं कांहीं केलंत तर मात्र मीं सुद्धां तुम्हाला वाचवूं शकणार नाही !"

नाशिकच्या गेल्या कुंभमेळ्याला मीं कुतूहलाने गेलो होतो. तिथं उभारलेल्या 'सीतामैया कुटी'कडे ज्या श्रद्धेने देशभरातून आलेले भाविक बघत होते, नमस्कार करत होते, तें बघून मी चक्रावून गेलो !

हें सर्व योग्य आहे का, बरोबर आहे का, हा चर्चेचा विषय होवूं शकतो, किंबहुना आहेच. पण ही खूप खोलवर मूळं असलेली ग्रामीण भागातील मानसिकता आहे, हें नाकारणं मात्र अशक्य.

छान लिहिले आहे

सीताहरणाचा प्रसंग राहिला, तो ऐकताना बाया सीतेने लक्ष्मणरेषा ओलांडू नये म्हणून प्रार्थना करत Happy

सकुरा | 13 June, 2016 - 08:34 नवीन
मुर्खपणाचा कळस आहे .

>>
हो ना, तुमची पोस्ट म्हणजे मूर्खपणाचा कळसच आहे.....

बुद्धिस्ट असले म्हणून हिंदूंच्या देवतांना नावे ठेवण्याचे पँथरी धंदे बंद करा आता....

जाऊ द्या हो अजय.
तेवढं एक अर्ध वाक्य तरी स्वतःहून लिहिले.
नाहीतर चेपू/कायप्पा वरून काॅपी पेस्ट केले असते. Biggrin

३अ , मी बुध्दिष्ट नाही आहे बुध्दस्ट म्हणजे काय?

यंदाच्या वर्षी आमच्या गावाच्या पुढे असणाऱ्या मोहोळ या तालुक्याच्या गावा जवळ अशा वनवासी लोकांना एका बेफाम वेगात जाणाऱ्या ट्रकने चिरडले होते, काही जण जागीच ठार झाले होते तर बरेचसे जखमी झाले...>>>>>>>हे वाचुन मुर्ख हा शब्द सुचला.

जे मला वाट्ले ते लिहिले लोक अश्या मुर्खपणाच्या पायात जिवानिशी जातात तेव्हां त्याना मदत करायला त्यांचा देव का नाही येत?

@सकुरा ....मरण जिथं यायचे ते येतेच, वाहन बेदरकार चालवून लोक इतरांचे जीव घेतात त्यात कडेने चालत जाणाऱ्या पाठमोऱ्या वाटसरुंचा काय दोष ? तरीदेखील आपणास हा मूर्खपणा वाटत असेल तर त्यातून आपला दृष्टीकोन व्यक्त होतो असे मी समजेन...मत मतांतरे ही असतातच पण त्याला काही आधार असला की ती तर्क सुसंगत वाटतात ...असो आपले मत कळले .

स्कुरा,
शब्द कसाही सुचू दे. तुम्हाला जे वाटलं ते लिहिलंत हे ही ठीकच
पण असं लिहिणं हे अत्यंत असंवेदनशील मनाचं द्योतक आहे.

सॉरी पण असं काही स्वतःचं लिहिण्यापेक्षा तुम्ही हिंदीतला मजकूर / लिंकाच पोस्टत जा. कृपया धन्यवाद
पांशा ऑन
त्यांच्याक्डे दुर्लक्ष करणं जास्त सोपं जातं.
पांशा ऑफ

>>लोक अश्या मुर्खपणाच्या पायात जिवानिशी जातात तेव्हां त्याना मदत करायला त्यांचा देव का नाही येत?>> दरवर्षी लाखांनी लोकं चैत्यभूमीला जातात तेव्हा गड्बड गोंधळ, चेंगराचेंगरीत माणसं गेली तर काय तुमचा देव येईल त्यांची मदत करायला? की तुमच्या धर्मात शहाणीच निपजली आहेत लोकं?

चैत्यभूमीला जाणारी सुपर डुपर मुर्ख आहेत.
चैत्यभूमिला जाऊन काय पदरात पडते ते त्यांना आणि त्यांच्या देवालाच माहित त्या पेक्षा आंबेडकरांची २-४ पुस्तके घेऊन वाचावित किंवा त्यांची शिकवन आचरणात आणावी हे माझे वैयक्तिक मत आहे.

सुंदर लेख! अशा कार्यक्रमात सामील होण्यात वेगळीच मजा असते. ते पारायणे संपल्यावरचे वर्णन ऐकून गणपती विसर्जनानंतरचा तो मोकळा मांडव व वातावरण आठवले. हे केव्हा असते पारायण? गावाकडची शेतीची कामे ज्या काळात कमी असतात तेव्हा हे सहसा केले जाते असे वाचले आहे.

तो अपघात फारच वाईट.

@सकुरा जगप्रसिद्ध नास्तिक अर्थात अथेईस्ट विचारवंत मंडळी आहेत दोघंही विचार बरेच तुम्ही लिहिले तसेच देव का वाचवायला येत नाही वगैरे

Pages