सैराट - रिव्यु (रीडः कौतूक)

Submitted by वैद्यबुवा on 10 June, 2016 - 16:29

पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अ‍ॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!

सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे? Lol कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अ‍ॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं Lol ) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!

पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात. Happy
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))

नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!

खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अ‍ॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे! Happy )

त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!

परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?) Lol स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!

आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..

आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.

सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अ‍ॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.

अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss

ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये. Happy

नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्‍यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अ‍ॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!) Happy

नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्‍या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?) Proud

कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!! Lol

पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!

गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अ‍ॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल! Happy

आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अ‍ॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अ‍ॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!

आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अ‍ॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"

काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....

त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्‍याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो..... Happy

अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….

_/\_

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॅग असते ना?

मग पोलीस येऊन पकडतात आणि परत नेतात तेव्हा ऑब्व्हियसली आर्ची च्या बाबांनीं घेतली असणार ती बॅग ताब्यात.

पकडले जातात ना बिचारे, बॅग जाते.

पोलिसांनी परशाला आत केल्यानंतर त्याची झडती बिडती घ्यायला विसरले बहुतेक. त्याच्या शर्टाच्या खिशात 500 च्या दोन नोटा असतात ज्यातली एक नोट हैद्राबाद स्टेशन वर आर्चि टिसीला देते.

राहुन राहुन मला आश्चर्य वाटतं कसं काम करुन घेतलं असेल प्रत्येकाकडुन मंजुळे आणि टीमने, कोणीही पुर्वी कॅमेरा पाहिलेला नाही , कधी डॉयलॉग सुरु करायचा , कुठे थांबायच काही माहीत नाही , पण रिझल्ट जबरदस्त. त्या आजीचा डॉयलॉग पण असाच.

>>

खरंच, अगदी अ‍ॅक्टिंगचा ओ की ठो माहित नसलेले, कधी स्टॅजची पायरी न चढलेली मुले शोधून काढली आणि त्यानंतर अशी अ‍ॅक्टिंग करवून घेणे की लोकांना वाटतच नाही ही मुले अ‍ॅक्टिंग करतायत म्हणून!
मानलं बुवा, मंजुळेंना!! __/\__

ते चिट्टी प्रकरणात मंग्या पर्श्याला मारतो तेव्हा सल्ल्या,लंगड्या,परश्या फक्त बचावात्मक विरोध करतात(पाटिल असतो ना..).नाहितर तिघ्यांनी सहज मंग्याला लोळवलं असतं.

.

परत तिसर्यांदा पाहाताना काही डीटेलिंग आणि अनुभव सापडले ते हे:

- सैराट झाला जी गाण्याच्या शेवटच्या शॉट मधे जे अप्रतिम कॅमरा वर्क, उजनी बॅकवॉटर्स च्या तीरावर असलेल्या भग्न वाड्यावर परश्या आणि आर्ची बसलेले, कॅमरा लांबून ते दृष्य टिपतो, असंख्य पक्षी मुक्त उडत आहेत, कॅमरा ड्रोन स्टाइल ने उडत परश्या आर्ची जवळ येतो आणि अप्रतिम सूर्यास्त. आहाहा.

हे सर्व बघताना एक डीटेलिंग - सल्या आणि प्रदीप राखण करत वाड्याच्या डाव्या बाजूला पाय लोन्बकळत बसले असतात. कोणी कोणी बघितले हे?

- कर्माळ्याला पत्रे उचकटुन चौघे पळून जातात, तात्यांची माणसे त्याना हुडकत येतात तेव्हा आणी हा डाइलॉग "पाटलाच्या सटवीने पळवलय पोराना". Happy

- परशाचा अभिनय दुसर्या भागात जास्त सफाईदार झालय. "दुसर्‍याच्या जिवावर किती दिवस जगायचे?" हे सांगताना त्याचा बोलका चेहरा, आर्चीबद्दलची काळजी, परिस्थितीची जाणीव ही अचूक दिसते.

- "चहा पन करता नाहीत यत्?" हे बोलताना किती क्यूट दिसतो तो.

खूप वर्षांपूर्वी - दशकांपूर्वी मी आणि नवरा भारताबाहेर नोकरीसाठी आलो. खिशात ५०० डॉलर होते आणि घरभाडे २००० होते. बेंचवर असल्याने कंपनी पूर्ण पगार पण देत नव्हती. किती दिवस आठवड्याच्या २० डॉलर च्या बजेट वर दिवस काढले ज्यात फक्त दाळ, तांदूळ, ब्रेड अँड अंडी यायची. बर्‍याच मुली भारतातून लग्न करून येतात परदेशी आणि त्याना काटकसर, बजेट ह्याची कल्पना नसते. कित्येक मैत्रिणी बजेट च्या पैश्यातून आर्ची सारख्या पोस्टर - किंवा तत्सम काहीसे घेऊन आल्या आणि त्यांच्या संसारात भांडनाची ठिणगी पडलेली पहिली आहे. परशा ने आर्चिला समजून घेतले हे पाहून खूप डोळे ओले झाले. आपल्यापैकी प्रत्येक जण हा पिक्चर वेगवेगळ्या काचेतून बघतो, तसेच हे काहीसे. हझेनबेर्ग म्हणाले तसे - "दुनियेतली बरीचशी प्रेम प्रकरणं ह्या रिअ‍ॅलिटीच्या वेताळाला कायमची बळी पडतात, सगळ्यांनाच सावरण्याची संधी मिळते असं नाही". किती सुंदर विचार.

छान लिहिलयं मोसा. ( हे मोसादचं लघुरुप वाटतयं Proud )
हे सर्व बघताना एक डीटेलिंग - सल्या आणि प्रदीप राखण करत वाड्याच्या डाव्या बाजूला पाय लोन्बकळत बसले असतात. कोणी कोणी बघितले हे? >>> माझ्या नजरेतुन सुटलं हे. दहा वेळा जरी पाहिला तरी प्रत्येकवेळेला काहीतरी नवीन सापडेलच.

सैराट झाला जी गाण्याच्या शेवटच्या शॉट मधे जे अप्रतिम कॅमरा वर्क, उजनी बॅकवॉटर्स च्या तीरावर असलेल्या भग्न वाड्यावर परश्या आणि आर्ची बसलेले, कॅमरा लांबून ते दृष्य टिपतो, असंख्य पक्षी मुक्त उडत आहेत, कॅमरा ड्रोन स्टाइल ने उडत परश्या आर्ची जवळ येतो आणि अप्रतिम सूर्यास्त >>>+१ माझ्या लेकांचा सर्वात आवडता शॉट आहे हा...मी कधीही हे गाणं बघत असले तर धावतच येतात बघायला. Happy
अजुन एक कालच काही भाग बघतांना लक्षात आले की काळ्या चिमणीची राख इथेही आहे. Proud फॅन्ड्री मला काही विशेष आवडला नाही, पण त्यातील काळ्या चिमणीचा शोध मजेशीर वाटला होता.

डीटेलिंगचा अजुन एक आवडलेला पार्ट.

आर्ची घरातून पळून लंगड्या बरोबर परश्याला भेटायला येते. त्या सिननंतर लगेच तिच्या घरी आई पॅनिक होऊन आबा अशी हाक घालते, मग उसाच्या व्यवहाराच्या ठिकाणी - साखरकारखान्यांपाशी अशा उसांच्या ट्रॉल्या दिसतात, तिथे पाटलांना फोन येतो. फोनवरचे संवाद वगैरे नाही पण आर्ची पळून गेल्याची बातमी आहे हे पाटलाच्या हावभावातून दिसतं आणि बॅकग्राउंडला पुढचं महाभारत सुचवणारा गिरणीचा एक जोरदार भोंगा!!
मंजुळे जिंदाबाद!!

अरे खत्रा आहे हे एक एक पॉईंट्स! गावातले हे डिटेल टाली, भोंगा वगैरे नव्हतं माहित मला!

नीधपची पोस्ट पण भारी आहे आलीक्डच्या पानांवर. हेच ह्या सिनेमाचं यश आहे. एकदम रियल वाटतं सगळं.

कपिल शर्माचा शो बघतोय आता. https://www.youtube.com/watch?v=onvkllwM-OI

रिंकू खरंच बिनधास्त आहे. कपिलशी एकदम बिनधास्त बोलतेय.
नागराजने पण अधुन मधुन सांभाळलेय त्यांना.

पण बाळ्याने तर धमाल केलीय. खरंच त्याचा स्वभाव मनमोकळा असावा.

सेकंड हाफ वर पण खूप काही लिहीण्यासारखं आहे. वेळ मिळेल तसं लिहतेच पण एकदाच थेटरात पाहिलाय आणि काही सिन्स युट्युबवर. आणि पहिला पार्ट मस्त आनंदी आहे त्यामुळे अर्थातच जास्त लक्षात राहिलाय. Happy

दुसर्‍या भागात आर्चिच्या आणि अक्काच्या केसांत टिपीकल साउदी गजरे दाखवले आहेत.
अक्काचा रोल पण मस्त आहे - कॅरेक्टर छान लिहिलंय आणि छाया कदमने काम पण मस्त केलंय. तिचा फॅन्ड्रीतला रोल पण मस्त होता.

अरे आक्काच्या काय आर्चिच्या पण केसात दाखवलाय गजरा.
आता खरं मेन लेखात लिहिणार होतो पण लिहू लिहू दमलो म्हणून सोडून दिलं.

तसं पाहायला गेलं तर शेवट ओवर ड्रमाटिक झालाय कारण १) सहसा लग्न व्हायच्या आधी हे कर्मठ टाईपचे घरचे असं मारुन टाकायला वगैरे जातात २) लग्न होऊन इतका काळ लोटल्यावर सहसा ते, गेलीयेस ना आता, तिकडेच रहा, इथे येऊ नकोस परत अशा फेज मध्ये पोहोचतात. पळून जाऊन लग्न केल्यावर पुढे मूल वगैरे झाल्यावर मारुन टाकल्याच्या बातम्या मी तरी फार नाही बघितल्या. इन फॅक्ट कधीच नाही एकल्या. आय मे बी राँग.
आता हे सांगून सुद्धा तरी मी म्हणेन की मंजुळेंना ते दाखवायचं होतं म्हणून त्यांनी दाखवलं, ठीक आहे. पण ज्या पद्धतीनी दाखवलय, ते एक बरं केलय. कारण सहसा हे चांगले डायरेक्टर प्रेक्षकांच्या कोमल मनाचा आजिबात विचार करत नाहीत हे असले सीन दाखवताना. त्यांच्या डायरेक्टरीची म्हणजे प्रेक्षकांच्या भावनांशी खेळता येण्याची ताकद दाखवत ते मुद्दाम आणखिन रियलस्टिक दाखवायला बघतात! तसं काही मंजुळेंनी केलं नाही ते एक बरं झालं.
आय जस्ट चोज टु फरगेट अबाऊट इट. Proud अ‍ॅण्ड आय कुड, तो सीन जास्त ग्राफिक न केल्यामुळे. Happy

(उद्या आर्चि अन परशा ला गोळ्या घालताना दाखवलं असतं तर मला वाटतं त्या आबा अन प्रिन्स वर रियल लाईफ मध्ये लोकांनी हल्ले वगैरे केले असते! अन ते ही जाऊ देत, तसं काही बघितलं असतं तर त्यानंतर मग आमच्या झोपेचं काय? अरे एन कोमल वयात त्या राज अन रश्मीला तसं काही करताना बघून मला एक महिना झोप नव्हती आली, परिक्षेत मार्कं पण कमी पडले होते एकदम) Proud

श्री
मंजुळेनी डोक्याच पार भुस्काट पाडलयं , ' सगळ्चं स्पुन फिडींग होणार नाही तुम्ही पण जरा विचार करा' असा संदेश दिलाय. >>>

अगदी बरोबर श्री , एके ठिकाणी असच कही तरी म्हनाले आहेत बहुदा..
"की आज काल चित्रपटा मध्ये बरचस प्रेक्षकाना बाळबोध समजुन दा़खवल जात...पण प्रेक्षक हा खुप हुशार असतो.. तो १०चित्रपट पाहात असतो.. आणि तो compare करुन पाहातो... etc, etc.." असच काहीतरी."

एकदम पटल..ते.. आणि technical, continuity च तर काय बोलनार, खुपच उत्तम आहे ते..

...उ.दा. एक सीन..

Scene 1 :
आर्चि आणि परश्या ते गुन्डा सोबत च्या बाचाबची नन्तर जाताना..आर्चि तिची खाली पडलेली
प्लास्टिकची पिशवी उचलुन घेते आणि त्या अम्मा मागे चालायाला लागते ..(Looks this "take" is in Hydrabad city)

Scene 2 :
आर्चि आणि परश्या त्या अम्मा सोबत झोपडपट्टि मधे चालत जातात ती प्लास्टिकची पिशवी आर्चिच्या
हाता मधे असते
..(This take is from "Pune" city )

I mean this is very small thing. The attention to details is so good..!!!

"attention to details" आणि "logical continuity" खुपच उत्तम आहे....

पण तो सीन १ जिकडे ते गुंड आर्ची परश्या ला त्रास देतात तो हैद्राबादमध्ये का शूट केला असेल? जर सीन २ पुण्याला शूट झाला तर सीन १ मध्ये मला हैद्राबाद स्पेशल असं काही आठवत नाही. गाड्यां च्या नंबर प्लेट्स दिसतात का?

सशल : पण तो सीन १ जिकडे ते गुंड आर्ची परश्या ला त्रास देतात तो हैद्राबादमध्ये का शूट केला असेल? जर सीन २ पुण्याला शूट झाला तर सीन १ मध्ये मला हैद्राबाद स्पेशल असं काही आठवत नाही. गाड्यां च्या नंबर प्लेट्स दिसतात का? >>>

हो..मला तर तसच वाटल..हैद्राबादमध्ये शूट केला असेल..कारन सीन १ मधे..

१. ते मागे Bank of India (English and , तेलगु मध्ये आहे)
२. अटो चा रन्ग..
३. मागे भि न्तीवर picture चे पोस्टर आणि बरच काही.. तेलगु मध्ये आहे..

वैद्यबुवा, खूप सूंदर लिहिले आहे. सिनेमा अतिशय मनापासून आवडला. सिनेमातले बरेच प्रसंग गावा कडे घडतांना बघितलेत, त्यामूळे सिनेमा प्रचंड आवडला.

पोटात दूखतय हे सांगून बाळ्या आणी परश्या घरी येतात आणी बाळ्या सल्ल्याला सांगतो " काळ्या चिमनीचि राख टाकल्यागत पहात होती". हे कूणी नोटिस केले का.

मोरपंखी पण झोपडपट्टीचे सीन्स पुण्यातलेच आहेत. कंटीन्युटी ब्रेक करण्यासारख काही सीन २ मधे आहे का? मला आठवत नाहीये.

जर कपडे, त्यांचा अवतार, हातातली प्लास्टीकची बॅग सेम नसती तर कंटिन्युटी ब्रेक झाली असती हा मुद्दा आहे ना मोरपंखिस ह्यांचा?

श्री , सशल >> आभार...
हाइट म्हणुन हा किस्सा...माझा आणि आमच्या "सौ" मध्ये हा सन्वाद...

आमची सौ : अरे तिने अशी का ओढनी घेतली आहे.. (त्य अक्क कडे राहतात तेव्हा)
काळी ओढनी, पिवळा dress आणि निळी सलवार..

तीच्या ह्या प्रश्ना नन्तर काय expression दिले तिने..( मना मधे म्हणाली असेल..सापडला अत्ता तावडीत...)
ह्या प्रश्ना नन्तर माझी अवस्था म्हणजे "आमची ही एकदम जोमात.. अन..म्या मातुर कोमात.."

डोसक्याला तान दिला..अन मग नीट लोजीकल..उत्तर दिल..
१. आर्चि, परश्या आणि त्या गाव कडे होनारया मारामारी मधे आर्चि ची ओढनी निळी आहे..जी त्या
झोम्बाझोम्बी मधे पडते...तिथुन ते.. सोन साखळि विकुन नवीन ड्रेस घेई परयन्त आर्चि विना ओढनी असते..

२. नवीन ड्रेस ची ओढनी काळी आहे.. आर्चि कडे २ च ड्रेस आहेत जेव्हा ते अक्का कडे राहतात..

३. आर्चि जवळ त्या वेळी एकच ओढनी आहे जी ती २ ड्रेस वर वापरते..

या उत्तर वर..."म्य मातुर एकदम जोमात.. ". Happy Happy

ओके ओके. समजलं.
अजून डिटेलिंग - आर्चि, परश्या हैद्राबादमध्ये मारामारीच्या आधी जनरल भटकत असतात. तेव्हा पिच्चर पाहून बाहेर पडताना - अंधारातून बाहेर पडताना एकदम लाईट आला की जो त्रास होतो तो दोघान्नी मस्त दाखवला आहे. मोजकेच पैसे असताना , सगळं भविष्य अंधारात असताना असं मुव्ही पाहणं हा त्यांच्या वयाचा, मॅच्युरिटी नसल्याचा पुरावा. Happy

मोजकेच पैसे असताना , सगळं भविष्य अंधारात असताना असं मुव्ही पाहणं हा त्यांच्या वयाचा, मॅच्युरिटी नसल्याचा पुरावा.>> किवा दुसर म्हणजे याना लॉज मिळत नाही मग रात्रिच्या शोला जाउन बसतात.

हैदराबादला आल्यावरचा भाग म्हणजे यान्च प्रेमाच विमान दाणकन रिअ‍ॅलिटीच्या धावपट्टिवर आदळल्यासारखा आहे, त्याबाबतित नताशाच निरिक्षण परफेक्ट आहे एकदम.

Pages