क्रिकेटचं भूत मानगुटीवर बसलेलं असतानाच्या काळातली गोष्ट. भारतीय संघ परदेशात (खासकरून भारतीय उपखंडाबाहेर) खेळायला गेला की पानिपत ठरलेलं असायचं. 'हे हरणार आहेत' हे इतकं व्यवस्थित माहित असायचं की वाटायचं, 'जातात कशाला तिथे खेळायला ?'
पण 'निकाल लागणार' हा निकाल माहित असतानासुद्धा सामन्याची वेळ लक्षात ठेवून मी बरोब्बर तेव्हा टीव्हीसमोर बसायचोच. कधी कधी पहाटे लौकरही उठायचो त्यासाठी. त्यामागे विचार हाच की, 'फाईट किती देतात पाहू !'
'फाईट'.
जिंकणार नाहीत, ह्याची खात्रीच. फक्त 'फाईट'.
'तीन' (TE3N) बद्दलची उत्सुकताही अशीच काहीशी. ही बच्चन वि. नवाझुद्दिन अशी लढत होती. निकाल काय लागणार हे मला आधीच माहित होतं. पण 'फाईट' किती दिली जातेय, हे पाहायचं होतं. अपेक्षेनुसारच निकाल लागला. पण फाईटही चांगली दिली.
बच्चनने नवाझुद्दिनला.
बच्चन हा माझ्या मते एक चांगला अभिनेता आणि महान सुपरस्टार आहे आणि नवाझुद्दिन स्टारही नाही, पण एक महान अभिनेता ! बच्चन पडद्यावर येतो तेव्हा त्याच्या स्टारपणाचं वलय पडदा व्यापून उरतं. नवाझुद्दिन जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा त्याचं काम पडदा व्यापून उरतं. एखादा महासागर किनाऱ्यावरच्या दगडासमोर जसा धडका देऊन देऊन निष्प्रभ ठरतो, तसं बच्चनचं महास्टारपण नवाझुद्दिनच्या खमक्या अभिनयासमोर उसळ्या खाऊन खाऊन कमी पडलं. मला ह्याचाच सगळ्यात जास्त आनंद झाला. 'काव्यात्मक न्याय' दिसला की आपल्यातल्या न्यूनपिडीत सामान्य माणसाला उगाच स्वत:च जिंकल्यासारखं वाटतं, तसंच काहीसं मला वाटलं. 'गडगंज श्रीमंतीपुढे एक मध्यमवर्गीय जिंकला' असा एक भास मला झाला.
मी खूष ! पिक्चर कसा आहे, हा भाग पुढचा !
'तीन' बद्दलची उत्सुकता त्याच्या शीर्षकापासूनच सुरु झाली. अनेक दिवस हे 'टीईथ्रीएन' असंच वाटत होतं. अजूनही काही जणांना तसंच वाटतही असावं. हा पांचटपणा असला, तरी मला आवडला ! पण मुळात सिनेमाचं नाव 'तीन' का असावं, हे नाही आवडलं. 'तीन मुख्य व्यक्तिरेखा असणं', ह्या फुटकळ कारणाशिवाय ह्या शीर्षकाला दुसरं काहीही समर्थनीय मला तरी गवसलं नाही. ह्यापेक्षा तर 'जजबा' शीर्षक चांगलं होतं. ('जजबा'कारांना जर हा व्यक्तिरेखांचा हिशोब मांडायचा असता तर 'देढ' करावं लागलं असतं आणि ते D3DH असं लिहिता आलं असतं. अर्र्र.. कुठे भरकटतोय मी !)
'मॉन्टाज' (Montage) ह्या कोरियन (अर्थातच दक्षिण) चित्रपटावर 'तीन' अधिकृतपणे आधारला आहे.
कोलकात्यात घडणारं हे कथानक. जॉन बिस्वास (अमिताभ बच्चन) ची नात आठ वर्षांपूर्वी अपहृत होऊन नंतर मृतावस्थेत सापडलेली असते. गुन्हेगाराचा छडा लावण्यात यंत्रणा अपयशी ठरलेली असते. मात्र म्हातारा जॉन चिवटपणे रोज पोलीस स्टेशनात येऊन तपासकार्याची चौकशी करत असतो. आठ वर्षांपूर्वी ही केस ज्याने हाताळली असते, तो पोलीस अधिकारी आलेल्या अपयशामुळे निराश होऊन नोकरी सोडून एका चर्चमध्ये पाद्री बनलेला असतो. (फादर मार्टिन/ इन्स्पेक्टर मार्टिन - नवाझुद्दिन सिद्दिकी). तर आता पोलीस ठाण्याचा व पर्यायाने ह्या आठ वर्षं जुन्या केसचा चार्ज सरिता (विद्या बालन) कडे आलेला असतो.
चिवट जॉन, निराश मार्टिन आणि अननुभवी सरिता आपापल्या पद्धतीने ह्या आठ वर्षं जुन्या घटनेच्या स्मृती उगाळत, जपत किंवा दुर्लक्षित करत असतात आणि तेव्हाच अजून एक अपहरण घडतं. ह्या नव्या अपहरणात आणि त्या जुन्या केसमध्ये काही साधर्म्य असतं का ? दोन्हीच्या मागे एकच व्यक्ती असते का ? खरं काय आहे ? ह्या प्रश्नांची उत्तरं सरिता आणि मार्टिन शोधायला लागतात, तर दुसरीकडे जॉन मात्र जुन्या केसचा छडा स्वत:च लावत असतो. अश्या ह्या तिघांची कहाणी म्हणजे 'तीन.'

मांडणी जराशी, नव्हे, बऱ्यापैकी संथ आहे आणि जराशी गुंतागुंतीचीही. दोन कहाण्या एकत्र दाखवत असताना, जी एक विशिष्ट पद्धत वापरली आहे (ह्याविषयी मी नेमकं लिहू शकत नाही कारण त्यामुळे विचका होऊ शकतो.), ती पटेलच असं नाही. कदाचित काही जणांना चटकन लक्षातही येणार नाही. मला ती पटली नाही, पण तरी आक्षेपार्ह काहीच नाही. एक वेगळा प्रयोग आहे असं म्हणू. आपण आजपर्यंत तसं पाहिलेलं नसल्यानेही खटकणं स्वाभाविक आहे. मात्र चित्रपटाची लांबी तरी कमी करता आलीच असती. थ्रिलर आहे, तर पसारा असू नये हा एक अलिखित नियम आहे, असं मी मानतो. अनेक दृश्यांना सरसकट कात्री लावताच आली असती.
'कहानी'ने कोलकात्याचं जे जबरदस्त चित्रण केलं होतं, त्यामुळे आता मी कुठल्याही चित्रपटात 'कोलकाता' पाहिलं की थेट त्याच्याशीच तुलना होते. त्यात हाही सुजॉय घोषचीच निर्मिती असलेला सिनेमा. त्यामुळे तर तुलना अपरिहार्यच ! नाही दिसलं कोलकाता ! हे 'दिसणं' म्हणजे शहराचं पर्यटन नव्हे, ते 'कहानी'तही नव्हतंच. 'कोलकाता' माणसांत दिसायला हवं होतं. ते नाही दिसलं.
विद्या बालनने पोलीस अधिकाऱ्याची देहबोली उत्तम दाखवली आहे. ती दाखवण्यासाठी तिला दृश्यममधल्या तब्बूसारखी 'युनिफॉर्म' आणि विझलेल्या डोळ्यांची गरज पडली नाही. (तब्बूला तर त्यासहसुद्धा जमलं नव्हतंच !) विद्याने स्वत:च्या एकंदरच हालचालीत एक पुरुषीपणा जबरदस्त दाखवून दिला आहे. तिच्या बोलण्यातूनही 'खाक्या' जाणवतो.
तिची व्यक्तिरेखा 'सहाय्यक' म्हणून आहे. मुख्य पात्रं 'जॉन' आणि 'मार्टिन'च आहेत.
'जॉन बिस्वास' हा घटनेला आठ वर्षं उलटून गेल्यावरही रोज पोलीस स्टेशनात येणारा, आजही पुन्हा पुन्हा आपल्या नातीच्या जुन्या ऑडियो व व्हिडियोंना पाहणारा, झोप हरवलेला आणि चोवीस तास फक्त 'तो गुन्हेगार कोण आहे' हाच विचार करणारा एक वयोवृद्ध मनुष्य आहे. त्याच्या मनावर झालेल्या आघातामुळे त्याच्या डोक्यावरही थोडासा परिणाम झालेला आहे म्हणूनच तो इतक्या चिवटपणे एकाच गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे. त्याची पत्नी आणि मित्र (मार्टिन) सुद्धा त्याला टाळत आहेत. हा जो एक प्रकारचा वेडगळपणा आहे, तो बच्चनला दाखवता आलेला नाही. बच्चनचा 'जॉन' फक्त करुण दिसतो. त्याची दया येते, वाईट वाटतं त्याच्याकडे पाहून. पण 'जॉन'चं कारुण्य इतकं मर्यादित नाहीय. त्याच्या कारुण्याला असलेली वेडसर छटा समोर यायला हवी होती. ती आली नाही. तो खिन्नतेचा झाकोळलेला चेहरा ओढून अख्खा सिनेमाभर वावरतो.
दुसरीकडे, निराश होऊन नोकरी सोडून पाद्री बनलेला 'मार्टिन'. He is basically trying to run away from his failure. एक प्रामाणिक पोलीस अधिकारी असतो तो. त्याला आलेलं अपयश त्याचा पिच्छा इतक्यात सोडणार नसतंच. तो जितका त्यापासून पळायचा प्रयत्न करतो आहे, तितकंच ते त्याला जवळ ओढत असणार. ही जी एक प्रकारची कुतरओढ आहे, ती नवाझुद्दिनने जाणवून दिली आहे. ठळकपणे दाखवून देण्याची संधी कथानकात त्याला नाही मिळालेली. पण आतल्या आत ही घुसमट त्याला छळते आहे, हे मात्र तो व्यवस्थित जाणवून देतो.
सव्यसाची चक्रवर्तीला लहान भूमिका आहे. ती त्याने चोख निभावली आहे.
बच्चनने स्वत:च गायलेलं 'क्यूँ रे' हे गाणं लक्षात राहतं. इतरही २-३ गाणी आहेत. त्यांचा कथानकात अडसर होत नाही आणि टिपिकल आजच्या गाण्यांसारखी उच्चस्वरात जाणारी असली, तरी 'गोंगाट' नसल्यामुळे त्रास तरी देत नाहीत.
संवादांबाबत, काही 'वन लायनर्स' चांगले आहेत.
पण संगीत आणि संवादांपेक्षा पार्श्वसंगीत जास्त महत्वाचं होतं आणि ते प्रभावी झालं आहे.
थोडीशी वाढीव लांबी, थोडीशी गुंतागुंत हे जर स्वीकारलं, तर नवाझुद्दिनचं (पुन्हा एकदा) उत्तम काम आणि बच्चनचा (पुन्हा एकदा) जबरदस्त 'स्क्रीन प्रेझेन्स' असा एक मस्त अनुभव 'तीन' देतो.
'फाईट' लक्षात राहते ! सोप्या शब्दांत सांगायचं तर नवाझुद्दिन बच्चनला 'खातो' !
रेटिंग - * * *
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/06/movie-review-te3n-teen.html
त्याने सगळ्यात पहिले नाव
त्याने सगळ्यात पहिले नाव अमिताभचे घेतले.
>>>>>>>>>>>
विनम्रपणा! ज्यासाठी तो फारसा ओळखला जात नाही. कारण मिडीया त्याची तशी इमेज होऊ देत नाही. आपल्या अश्या पोस्टी आणखी शेर व्हायला हव्यात
विनम्रपणा!>>> काहीही हां ऋ
विनम्रपणा!>>> काहीही हां ऋ
त्याचा विनम्रपणा वानखेडेवर सबंध भारताने पाहिलेला आहे
@रीये, पाचशे वगैरेसाठी
@रीये,

पाचशे वगैरेसाठी लागणारे 'कोशन्ट' इथे नाहीत, त्यामुळे पाचशे वाटत नाही मला. पण दीडशेचा लावू शकतो. (थोडी रिस्क आहे, पण लावू !!)
परिक्षण छान लिहिलंयस.. सिनेमा
परिक्षण छान लिहिलंयस.. सिनेमा पाहणारच आहे.. नवाजुद्दिन चे तर आम्ही डाय हार्ड फॅन आहोत.
प्रोमोज बघूनच वाटत होतं,द अमिताभ समोरही , त्याचा प्रेझेंस दर्शकांच्या मनावर तितकाच प्रभावकारी असेल!!
अवांतर - वर एका प्रतिसादात
अवांतर -
वर एका प्रतिसादात कणेकरांची एक कमेंट दिली आहे. अत्यंत हिणकस कमेंट आहे ती. पण मला आश्चर्य वाटलं नाही. ज्यांनी नियमितपणे कणेकरांना वर्तमानपत्रांत वाचलं आहे किंवा त्यांची 'यादों की बारात' ही टुकारकी वाचलीय, त्यांनाही ह्यात काही आश्चर्य वाटणार नाही.
दिलीप कुमारची चाटायच्या अट्टाहासापोटी ह्या माणसाने मनोज कुमारला कळकट, गलिच्छ वगैरे म्हटलं आहे. मला तर कीव आली त्यांची. मनोज कुमारला मूर्ख म्हणा, ठोकळा म्हणा, नार्सिसिस्ट म्हणा किंवा काहीही म्हणा.. कळकट ?
असो.
अति-अवांतर :-
'पुन्हा यादों की बारात' ह्या दुसऱ्या पुस्तकाला राजेश खन्नाची प्रस्तावना आहे. संपूर्ण पुस्तकात सगळ्यात वाचनीय भाग तोच आहे.
रसप, इन जनरल सेंस , अमिताभ
रसप, इन जनरल सेंस , अमिताभ आणी नवाजुद्दिन ची तुलना करत नाहीये.
म्हंजे अमिताभ च्या एंटायर कारकिर्दी ची आणी नवाज च्या कारकिर्दी मधील तुलना नाहीये ही !!
(Amitabh is a phenomenon and an institution in himself)
होप, माझा पॉइंट आता क्लिअर झालाय.
त्याने केलेली दोघांतील तुलना अतिशय संयत शब्दांत असून केवळ या सिनेमा पुरती मर्यादित आहे...
त्याचबरोबर अमिताभ चा स्क्रीन प्रेझेंस ही किती ताकदीचा आहे हे ही नमूद केलंय...
असो!!!
अमिताभ आणी नवाजुद्दिन ची
अमिताभ आणी नवाजुद्दिन ची तुलना करत नाहीये>>>
ऐतेन.
मग ह्याने त्याला खाल्ला म्हणणे म्हणजे काय आहे?
.
.
ऋन्मेष, तुला एक फुकटचा सल्ला.
ऋन्मेष, तुला एक फुकटचा सल्ला. तू जिथे तिथे शाहरुख, सई आणी स्वजोला मध्ये घुसवणे सोडुन दे. हे लोक आमच्या डोक्यात जात नाहीयेत तर तुझी ही अती स्तुती डोक्यात जातेय.
खाल्ला म्हणणे हे संयत शब्दांत
खाल्ला म्हणणे हे संयत शब्दांत
- परमेश्वरा, मराठीचा क्लास लावावा आता ह्या लोकांकडे!
कालच पाहिला. आवडला.
कालच पाहिला. आवडला. शेवटपर्यंत उत्कंठा रहाते.
पण फाईटही चांगली दिली.
पण फाईटही चांगली दिली.
बच्चनने नवाझुद्दिनला.
एखादा महासागर किनाऱ्यावरच्या दगडासमोर जसा धडका देऊन देऊन निष्प्रभ ठरतो, तसं बच्चनचं महास्टारपण नवाझुद्दिनच्या खमक्या अभिनयासमोर उसळ्या खाऊन खाऊन कमी पडलं.
बच्चनचा 'जॉन' फक्त करुण दिसतो. त्याची दया येते, वाईट वाटतं त्याच्याकडे पाहून. पण 'जॉन'चं कारुण्य इतकं मर्यादित नाहीय. त्याच्या कारुण्याला असलेली वेडसर छटा समोर यायला हवी होती. ती आली नाही.>>> त्या छ्टा वगैरे लेखकाला ठरवू देत!
ही जी एक प्रकारची कुतरओढ आहे, ती नवाझुद्दिनने जाणवून दिली आहे. ठळकपणे दाखवून देण्याची संधी कथानकात त्याला नाही मिळालेली. पण आतल्या आत ही घुसमट त्याला छळते आहे, हे मात्र तो व्यवस्थित जाणवून देतो.
------------------------------------
ह्याला तुलना म्हणतात आणि अशा परीक्षणांना बायस्ड रीव्ह्यू!
असो, वाद नको.
असो, वाद नको.
चित्रपट पाहिला नाही. आणि
चित्रपट पाहिला नाही. आणि बघण्याची शक्यता फारच कमी आहे.
पण पण पण
इथे ऋ ने शाखा आणि अमिताभ बद्दल जे काही लिहिलंय ते आजिबात सहनेबल नाहीये.
काय तर म्हणे शाखाने अमिताभला खाल्ला?? ऑ? ह्या कमेंटला हसावं की रडावं हा ऑप्शन नसुन फक्त अतिशय राग येणं हा एकच ऑप्शन आहे.
ऋ, इतरवेळी मी कधी तुझ्या धाग्यांना, शाखा-सई-स्वजो प्रेमाला नावं ठेवली नाहीत. बट धिस इज नॉट फेअर.
चित्रपट बघण्याच्या लिस्टीत
चित्रपट बघण्याच्या लिस्टीत आहेच. बहुदा ह्या आठवड्यात बघिन.
नवाजुद्दिन चे तर आम्ही डाय हार्ड फॅन आहोत.>>> मी पण
ऋन्मेष, तुला एक फुकटचा सल्ला. तू जिथे तिथे शाहरुख, सई आणी स्वजोला मध्ये घुसवणे सोडुन दे. हे लोक आमच्या डोक्यात जात नाहीयेत तर तुझी ही अती स्तुती डोक्यात जातेय.>>> खरतर हो पण आता हे लोकही उगाचच डोक्यात जायला लागलेत.
सिनेमा मस्त आहे. डोक्याला
सिनेमा मस्त आहे. डोक्याला खुराक एकदम. पण नवाजुद्दीनने अमिताभलाच काय, तर कोणालाही खिश्यात टाकणारा अभिनय नाही केलेला. संथपणे वावरलाय तो सिनेमात. त्याचं 'फेल्युअर' त्याला खातंय अशी खंत कुठेच नाही दिसली. इन फॅक्ट त्याचा काही नवाजुद्दिनीय प्रभावच नाही पडला. जे हार्ड कोअर फॅन्स आहेत त्याचे तेही मान्य करतील की ही काही त्याची बेस्ट भूमिका नाही.
अमिताभ! अरे काय वावर या माणसाचा! काहीच बोलायला नको. त्याच्या एनर्जीपुढे बोलतीच बंद.
रसप तू दिग्दर्शनाबद्दल काहीच नाही लिहिलंस? काय सुरेख टचेस आहेत एकेक, नीट पाहिले तर. एक उदाहरण- किडनॅपरला रेल्वे रुळावर पाडतो मार्टिन. त्याला बेड्या घालायच्या आहेत तेव्हाचं त्याचं सवयीनं चाचपडणं- काय मस्त घेतलंय ते. असे बरेच आहेत.
सिनेमा संथ आहे. वेगळा आहे. असे सिनेमे चालत नाहीत जास्त. बघायचा असेल तर लवकर बघा.
>> रसप तू दिग्दर्शनाबद्दल
>> रसप तू दिग्दर्शनाबद्दल काहीच नाही लिहिलंस? काय सुरेख टचेस आहेत एकेक, नीट पाहिले तर. <<
हो. लिहायला हवं होतं. पण एक तर रीमेक असल्याने काही टचेस कोरियन मूव्हीतून घेतले असण्याची शक्यता वाटली. खासकरुन मी जे -
- दोन कहाण्या एकत्र दाखवत असताना, जी एक विशिष्ट पद्धत वापरली आहे (ह्याविषयी मी नेमकं लिहू शकत नाही कारण त्यामुळे विचका होऊ शकतो.
हे लिहिलं आहे ते. मला ती पद्धती विशेष पटली नाही. पण वेगळेपण आहे. जे कदाचित मूळ चित्रपटातून मिळालं असावं.
हॅविंग सेड धिस, लिहायला हवं होतंच. पण एक परिच्छेद लिहिला आहे, मात्र त्यात दिग्दर्शकाचा नामोल्लेख राहून गेला.
शाहरुख आणि अमिताभ जेव्हा
शाहरुख आणि अमिताभ जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर आलेयत, कुणीही काही खाल्लं नाही. लोक्स उपाशी राहिले ना भाऊ ! >>

लोकसत्ता मध्ये ह्या सिनेमाचे
लोकसत्ता मध्ये ह्या सिनेमाचे परीक्षण 'टी ई ३ एन्' ह्या नावाने आले होते.
नवाजुद्दीन गुणी कलाकार आहे. पण तीन मध्ये अमिताभ ला अभिनयात त्याने खाल्लेय असे काही वाटले नाही. उलट बुलेटवर नवाजुदीन शोभत नव्हता असे वाटले. त्याची शरीरयष्टी तगडी, बॉंड टाईप्स नाही.
अमिताभ अमिताभ आहेत आणि ते स्कीनवर असले की बाकी सर्व खुजेच वाटते. माझे तरी तसेच झाले.
सिनेमाची नाव 'तीन्' हे काही पटले नाही.
वजीर सिनेमाशी साधर्म्य वाटले. वर पुन्हा अमिताभ!
तिकडे फरहान ला हाताशी धरून रहस्याची उकल.
इकडे नवाजुद्दीन ला
तिकडे फरहान ची व्यक्तिगत कहाणी बॅकग्राऊंड ला. इथे नवाजुद्दीन ची व्यक्तिगत वेदना दुरान्वयाने आहे.
पण एक परिच्छेद लिहिला आहे,
पण एक परिच्छेद लिहिला आहे, मात्र त्यात दिग्दर्शकाचा नामोल्लेख राहून गेला>>>
रिभू दासगुप्ता!
ज्याने अख्खा सिनेमा बनवला त्याचाच नामोल्लेख राहून गेला म्हणे... नको त्या गोष्टींच्या प्रेमात पडायचे, नको तिथे चिकीत्सा करायची आणि मूळ विषयाला बगल द्यायची.
त्रयस्थ नजरेने परीक्षण करण्याचे तंत्र परीश्रमपूर्वक अंगी बाणवावे लागते महाराज!
तुलना करण्याचे काही कारण
तुलना करण्याचे काही कारण नाही. कुणी कुणाला खाल्ला कि गिळला हा अशा परीक्षणांचा विषय कसा काय होऊ शकतो??
नवी पिढी अधिक अभ्यास करून त्यांचे सिनेमे निवडतात, रोलवर मेहनत घेतात असे अमिताभनेही अनेक ठिकाणी म्हटलेले आहे.
परीक्षण विशेष आहे हे वाटावे म्हणून बच्चनला थोडे इन्फिरीयर दाखवले की लोक आपोआपच तुटून पडतील हे गणित दिसतेय समीक्षकांच्या मनात!
>>>>>>>>>>>>>>>> तुमच्याशि स ह म त.
>>पण नवाजुद्दीनने अमिताभलाच
>>पण नवाजुद्दीनने अमिताभलाच काय, तर कोणालाही खिश्यात टाकणारा अभिनय नाही केलेला. संथपणे वावरलाय तो सिनेमात. त्याचं 'फेल्युअर' त्याला खातंय अशी खंत कुठेच नाही दिसली. इन फॅक्ट त्याचा काही नवाजुद्दिनीय प्रभावच नाही पडला. जे हार्ड कोअर फॅन्स आहेत त्याचे तेही मान्य करतील की ही काही त्याची बेस्ट भूमिका नाही. << +१ सहमत
शाहरुख हा लोकप्रियतेच्या
शाहरुख हा लोकप्रियतेच्या बाबतीत अमिताभच्या बरोबरीचाच आहे. मात्र 'कोन बनेगा करोडपती' ही सिरीयल करुन अमिताभपेक्षा सरस ठरण्याचे त्याचे मनसुबे उधळले गेले निर्मात्यांना शाहरुखला काढुन पुन्हा अमिताभला घ्यावे लागले.
असेल.... पण शाहरुखचे एक
असेल.... पण शाहरुखचे एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
अशा प्रकारच्या कार्यक्रमात प्रश्न विचारणारा व उत्तर देणारा अशा दोन्ही खुर्चीत बसलेला तो एकमेव आहे.
उत्तर देणार्याच्या खुर्चितच
उत्तर देणार्याच्या खुर्चितच तो योग्य होता. प्रश्न विचारण्याच्या खुर्चित आला आणि कार्यक्रम ढेपाळला।
असेना , वर्ल्ड रेकॉर्ड झाले
असेना , वर्ल्ड रेकॉर्ड झाले
चित्रपट छान आहे.. अगदी
चित्रपट छान आहे.. अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
पण बच्चन साहेबांपुढे अक्षरशः लोटांगण घालायला हवे... अगदी पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या दृष्या पर्यंत या एका कलाकाराच्या भोवती कॅमेरा घुटमळत रहातो. ही भूमिका मला तरी बच्चन साहेबांची गेल्या दोन दशकातील सर्वात ऊत्कृष्ट भूमिका वाटली... अगदी क्वचितच टिपिकल बच्चन मॅनरिझम्स डोकावतात अन्यथा कथेतील पात्रं नखशिखांत ऊभे केले आहे.. संवाद, देहबोली, भाव, अभिनय, सर्वच भन्नाट. अमिताभ पंख्यांसाठी मस्ट वॉच..!!
बाकी विद्या व नवाजुद्दीन च्या सहाय्यक भूमिका ही चांगल्या झाल्या आहेत. पण चित्रपट निव्वळ आणि निव्वळ बच्चन..! Just when you think this guy has done it all.... he comes up with another magical performance. Kudos..! कुर्नीसात!
चित्रपट परिक्षण, अभिनय ई. वर लिहीण्यात माझी PhD नाही तरिही:
चित्रपटातील अमिताभ चं पात्र वृध्द आहे, शरीराने थकलेला आणि मनाने थोडासा ढासळलेला.. अमीताभ असला तरी या चित्रपटात तो व्हिलन ला किंवा अगदी रस्त्यातील चिरकूट गुंडाला देखिल मारू शकणार नाही, आणि आता हा अँग्री यंग मॅनही नाही हे आपल्याला पहिल्याच फ्रेम मध्ये कळतं. आणि तरिही जेव्हा जेव्हा तसा प्रसंग येतो तेव्हा कथेतील हे पात्रं. समोरच्याला गारद करेल असं कुठेतरी ठाम वाटत रहातं. Only this man car carry it off... without any accessories or dhaai kilo kaa haath...! यालाच अभिनय म्हणत असतील तर बच्चन साहेबांच्या डीएनए मध्ये हे जन्मजात असावं इतकं ते खरंखुरं आहे.
पाहिला हा चित्रपट . अमिताभ ,
पाहिला हा चित्रपट . अमिताभ , नवाजुद्दीन , विद्या सर्वांचीच काम मस्त झालीत . मला तरी नवाजुद्दीनने अमिताभ कुरघोडी केलीये अस काहीच वाटलं नाही . तिघेही आपल्या भूमिका चोख करतात . दिग्दर्शकाची चित्रपटावर असलेली पकड जाणवते . रहस्य समजलं असलं तरीही शेवतपर्यत कस झालं असेल ही उत्सुकता कायम राहते. ह्या गोष्टीला प्लस पॉईंट म्हणता येईल
कोलकात्याबद्दल रसपने लिहिलेय त्याच्याशी सहमत. कहानीतल कोलकाता इथे दिसत नाही . पण तशी गरजही वाटत नाही .
योग छान पोस्ट
योग छान पोस्ट
ऋन्मेष, तुला एक फुकटचा सल्ला.
ऋन्मेष, तुला एक फुकटचा सल्ला. तू जिथे तिथे शाहरुख, सई आणी स्वजोला मध्ये घुसवणे सोडुन दे. हे लोक आमच्या डोक्यात जात नाहीयेत तर तुझी ही अती स्तुती डोक्यात जातेय.
>>
असं नाही केले तर मायबोलीवर त्याची दखल कोण आणि कशी घेईल?
Pages