अमितुद्दिन सिद्दिकी (Movie Review - Te3n / Teen)

Submitted by रसप on 12 June, 2016 - 02:31

क्रिकेटचं भूत मानगुटीवर बसलेलं असतानाच्या काळातली गोष्ट. भारतीय संघ परदेशात (खासकरून भारतीय उपखंडाबाहेर) खेळायला गेला की पानिपत ठरलेलं असायचं. 'हे हरणार आहेत' हे इतकं व्यवस्थित माहित असायचं की वाटायचं, 'जातात कशाला तिथे खेळायला ?'
पण 'निकाल लागणार' हा निकाल माहित असतानासुद्धा सामन्याची वेळ लक्षात ठेवून मी बरोब्बर तेव्हा टीव्हीसमोर बसायचोच. कधी कधी पहाटे लौकरही उठायचो त्यासाठी. त्यामागे विचार हाच की, 'फाईट किती देतात पाहू !'
'फाईट'.
जिंकणार नाहीत, ह्याची खात्रीच. फक्त 'फाईट'.

'तीन' (TE3N) बद्दलची उत्सुकताही अशीच काहीशी. ही बच्चन वि. नवाझुद्दिन अशी लढत होती. निकाल काय लागणार हे मला आधीच माहित होतं. पण 'फाईट' किती दिली जातेय, हे पाहायचं होतं. अपेक्षेनुसारच निकाल लागला. पण फाईटही चांगली दिली.
बच्चनने नवाझुद्दिनला.

बच्चन हा माझ्या मते एक चांगला अभिनेता आणि महान सुपरस्टार आहे आणि नवाझुद्दिन स्टारही नाही, पण एक महान अभिनेता ! बच्चन पडद्यावर येतो तेव्हा त्याच्या स्टारपणाचं वलय पडदा व्यापून उरतं. नवाझुद्दिन जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा त्याचं काम पडदा व्यापून उरतं. एखादा महासागर किनाऱ्यावरच्या दगडासमोर जसा धडका देऊन देऊन निष्प्रभ ठरतो, तसं बच्चनचं महास्टारपण नवाझुद्दिनच्या खमक्या अभिनयासमोर उसळ्या खाऊन खाऊन कमी पडलं. मला ह्याचाच सगळ्यात जास्त आनंद झाला. 'काव्यात्मक न्याय' दिसला की आपल्यातल्या न्यूनपिडीत सामान्य माणसाला उगाच स्वत:च जिंकल्यासारखं वाटतं, तसंच काहीसं मला वाटलं. 'गडगंज श्रीमंतीपुढे एक मध्यमवर्गीय जिंकला' असा एक भास मला झाला.
मी खूष ! पिक्चर कसा आहे, हा भाग पुढचा !

'तीन' बद्दलची उत्सुकता त्याच्या शीर्षकापासूनच सुरु झाली. अनेक दिवस हे 'टीईथ्रीएन' असंच वाटत होतं. अजूनही काही जणांना तसंच वाटतही असावं. हा पांचटपणा असला, तरी मला आवडला ! पण मुळात सिनेमाचं नाव 'तीन' का असावं, हे नाही आवडलं. 'तीन मुख्य व्यक्तिरेखा असणं', ह्या फुटकळ कारणाशिवाय ह्या शीर्षकाला दुसरं काहीही समर्थनीय मला तरी गवसलं नाही. ह्यापेक्षा तर 'जजबा' शीर्षक चांगलं होतं. ('जजबा'कारांना जर हा व्यक्तिरेखांचा हिशोब मांडायचा असता तर 'देढ' करावं लागलं असतं आणि ते D3DH असं लिहिता आलं असतं. अर्र्र.. कुठे भरकटतोय मी !)

'मॉन्टाज' (Montage) ह्या कोरियन (अर्थातच दक्षिण) चित्रपटावर 'तीन' अधिकृतपणे आधारला आहे.
कोलकात्यात घडणारं हे कथानक. जॉन बिस्वास (अमिताभ बच्चन) ची नात आठ वर्षांपूर्वी अपहृत होऊन नंतर मृतावस्थेत सापडलेली असते. गुन्हेगाराचा छडा लावण्यात यंत्रणा अपयशी ठरलेली असते. मात्र म्हातारा जॉन चिवटपणे रोज पोलीस स्टेशनात येऊन तपासकार्याची चौकशी करत असतो. आठ वर्षांपूर्वी ही केस ज्याने हाताळली असते, तो पोलीस अधिकारी आलेल्या अपयशामुळे निराश होऊन नोकरी सोडून एका चर्चमध्ये पाद्री बनलेला असतो. (फादर मार्टिन/ इन्स्पेक्टर मार्टिन - नवाझुद्दिन सिद्दिकी). तर आता पोलीस ठाण्याचा व पर्यायाने ह्या आठ वर्षं जुन्या केसचा चार्ज सरिता (विद्या बालन) कडे आलेला असतो.
चिवट जॉन, निराश मार्टिन आणि अननुभवी सरिता आपापल्या पद्धतीने ह्या आठ वर्षं जुन्या घटनेच्या स्मृती उगाळत, जपत किंवा दुर्लक्षित करत असतात आणि तेव्हाच अजून एक अपहरण घडतं. ह्या नव्या अपहरणात आणि त्या जुन्या केसमध्ये काही साधर्म्य असतं का ? दोन्हीच्या मागे एकच व्यक्ती असते का ? खरं काय आहे ? ह्या प्रश्नांची उत्तरं सरिता आणि मार्टिन शोधायला लागतात, तर दुसरीकडे जॉन मात्र जुन्या केसचा छडा स्वत:च लावत असतो. अश्या ह्या तिघांची कहाणी म्हणजे 'तीन.'

te3n-trailer-movie-poster-release-date.jpg

मांडणी जराशी, नव्हे, बऱ्यापैकी संथ आहे आणि जराशी गुंतागुंतीचीही. दोन कहाण्या एकत्र दाखवत असताना, जी एक विशिष्ट पद्धत वापरली आहे (ह्याविषयी मी नेमकं लिहू शकत नाही कारण त्यामुळे विचका होऊ शकतो.), ती पटेलच असं नाही. कदाचित काही जणांना चटकन लक्षातही येणार नाही. मला ती पटली नाही, पण तरी आक्षेपार्ह काहीच नाही. एक वेगळा प्रयोग आहे असं म्हणू. आपण आजपर्यंत तसं पाहिलेलं नसल्यानेही खटकणं स्वाभाविक आहे. मात्र चित्रपटाची लांबी तरी कमी करता आलीच असती. थ्रिलर आहे, तर पसारा असू नये हा एक अलिखित नियम आहे, असं मी मानतो. अनेक दृश्यांना सरसकट कात्री लावताच आली असती.

'कहानी'ने कोलकात्याचं जे जबरदस्त चित्रण केलं होतं, त्यामुळे आता मी कुठल्याही चित्रपटात 'कोलकाता' पाहिलं की थेट त्याच्याशीच तुलना होते. त्यात हाही सुजॉय घोषचीच निर्मिती असलेला सिनेमा. त्यामुळे तर तुलना अपरिहार्यच ! नाही दिसलं कोलकाता ! हे 'दिसणं' म्हणजे शहराचं पर्यटन नव्हे, ते 'कहानी'तही नव्हतंच. 'कोलकाता' माणसांत दिसायला हवं होतं. ते नाही दिसलं.

विद्या बालनने पोलीस अधिकाऱ्याची देहबोली उत्तम दाखवली आहे. ती दाखवण्यासाठी तिला दृश्यममधल्या तब्बूसारखी 'युनिफॉर्म' आणि विझलेल्या डोळ्यांची गरज पडली नाही. (तब्बूला तर त्यासहसुद्धा जमलं नव्हतंच !) विद्याने स्वत:च्या एकंदरच हालचालीत एक पुरुषीपणा जबरदस्त दाखवून दिला आहे. तिच्या बोलण्यातूनही 'खाक्या' जाणवतो.
तिची व्यक्तिरेखा 'सहाय्यक' म्हणून आहे. मुख्य पात्रं 'जॉन' आणि 'मार्टिन'च आहेत.
'जॉन बिस्वास' हा घटनेला आठ वर्षं उलटून गेल्यावरही रोज पोलीस स्टेशनात येणारा, आजही पुन्हा पुन्हा आपल्या नातीच्या जुन्या ऑडियो व व्हिडियोंना पाहणारा, झोप हरवलेला आणि चोवीस तास फक्त 'तो गुन्हेगार कोण आहे' हाच विचार करणारा एक वयोवृद्ध मनुष्य आहे. त्याच्या मनावर झालेल्या आघातामुळे त्याच्या डोक्यावरही थोडासा परिणाम झालेला आहे म्हणूनच तो इतक्या चिवटपणे एकाच गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे. त्याची पत्नी आणि मित्र (मार्टिन) सुद्धा त्याला टाळत आहेत. हा जो एक प्रकारचा वेडगळपणा आहे, तो बच्चनला दाखवता आलेला नाही. बच्चनचा 'जॉन' फक्त करुण दिसतो. त्याची दया येते, वाईट वाटतं त्याच्याकडे पाहून. पण 'जॉन'चं कारुण्य इतकं मर्यादित नाहीय. त्याच्या कारुण्याला असलेली वेडसर छटा समोर यायला हवी होती. ती आली नाही. तो खिन्नतेचा झाकोळलेला चेहरा ओढून अख्खा सिनेमाभर वावरतो.
दुसरीकडे, निराश होऊन नोकरी सोडून पाद्री बनलेला 'मार्टिन'. He is basically trying to run away from his failure. एक प्रामाणिक पोलीस अधिकारी असतो तो. त्याला आलेलं अपयश त्याचा पिच्छा इतक्यात सोडणार नसतंच. तो जितका त्यापासून पळायचा प्रयत्न करतो आहे, तितकंच ते त्याला जवळ ओढत असणार. ही जी एक प्रकारची कुतरओढ आहे, ती नवाझुद्दिनने जाणवून दिली आहे. ठळकपणे दाखवून देण्याची संधी कथानकात त्याला नाही मिळालेली. पण आतल्या आत ही घुसमट त्याला छळते आहे, हे मात्र तो व्यवस्थित जाणवून देतो.
सव्यसाची चक्रवर्तीला लहान भूमिका आहे. ती त्याने चोख निभावली आहे.

बच्चनने स्वत:च गायलेलं 'क्यूँ रे' हे गाणं लक्षात राहतं. इतरही २-३ गाणी आहेत. त्यांचा कथानकात अडसर होत नाही आणि टिपिकल आजच्या गाण्यांसारखी उच्चस्वरात जाणारी असली, तरी 'गोंगाट' नसल्यामुळे त्रास तरी देत नाहीत.
संवादांबाबत, काही 'वन लायनर्स' चांगले आहेत.
पण संगीत आणि संवादांपेक्षा पार्श्वसंगीत जास्त महत्वाचं होतं आणि ते प्रभावी झालं आहे.

थोडीशी वाढीव लांबी, थोडीशी गुंतागुंत हे जर स्वीकारलं, तर नवाझुद्दिनचं (पुन्हा एकदा) उत्तम काम आणि बच्चनचा (पुन्हा एकदा) जबरदस्त 'स्क्रीन प्रेझेन्स' असा एक मस्त अनुभव 'तीन' देतो.
'फाईट' लक्षात राहते ! सोप्या शब्दांत सांगायचं तर नवाझुद्दिन बच्चनला 'खातो' !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/06/movie-review-te3n-teen.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच पाहिला. आवडला. तिघांचा अभिनय संयत होता. पहिल्या अर्ध्या भागात नवाज थोडासा झाकोळलाय असं वाटतय. विद्या बालनला 'पाहुणी कलाकार' च्या मानाने बरीच मोठी भूमिका आहे. संपूर्ण सिनेमात सस्पेंस छान राखलाय. कधी कधी ट्रॅक सुटतोय काय असं वाटत असतानाच पून्हा रुळावर यायची गाडी.

पूर्ण सिनेमाभर कलर टोन थोडासा डाऊन / माइल्ड वाटला जसा पावसाळी वातावरण असतं , थोडं उदास. कलकत्ता खरचं विशेष जाणवत नाही. बच्चनच घर मस्त दाखवलय. कोरिअन सिनेमाची छाप काही प्रसंगात दिसते.

नक्की बघण्यासारखा आहे.

सोप्या शब्दांत सांगायचं तर नवाझुद्दिन
बच्चनला 'खातो' !>>>>>>
असहमत. उलट बच्चन तो बच्चनच असं चित्रपटभर जाणवत राहिलं!

सोप्या शब्दांत सांगायचं तर नवाझुद्दिन
बच्चनला 'खातो' !>>>>>>
असहमत. उलट बच्चन तो बच्चनच असं चित्रपटभर जाणवत राहिलं!

>>
काही का असेना , खाल्ले असेल तर ते स्वागतार्हच आहे. बच्चनची स्पेस समर्थपणे भरून काढायला आता समर्थ अभिनेत्यांची गरजच आहे. बच्चनचे वय लक्षात घेता. अन्यथा बच्चननन्तर पोकळी निर्माण होइल...

तुलना करण्याचे काही कारण नाही. कुणी कुणाला खाल्ला कि गिळला हा अशा परीक्षणांचा विषय कसा काय होऊ शकतो??

नवी पिढी अधिक अभ्यास करून त्यांचे सिनेमे निवडतात, रोलवर मेहनत घेतात असे अमिताभनेही अनेक ठिकाणी म्हटलेले आहे.

परीक्षण विशेष आहे हे वाटावे म्हणून बच्चनला थोडे इन्फिरीयर दाखवले की लोक आपोआपच तुटून पडतील हे गणित दिसतेय समीक्षकांच्या मनात!

चित्रपट ठिक वाटला. बच्चनला अभिनयात खाणे ही नवाझुद्दीनच्या बसची बात नाही.७५ व्या वर्षिही अमिताभला ज्या प्रकारचे रोल मिळतात तेच त्याचे श्रेष्ठत्व सांगण्यास पुरेसे आहेत. ७५ व्या वर्षि हे खाणारे अभिनेते कुठे असतील ते बघणे रंजक ठरेल. ह्यांना तरुणपणातच चित्रपट मिळायची मारामार.

नवाझुद्दीन... तो असला कि मुव्ही बघायचा हा नियम ठरवलाय मी एवढ्यात.. पाहू कस जमतयं ते..
आजकाल स्टोॠ कळून येते लोक परिक्षण लिहितात तेव्हा.. तुम्ही लय जपुन लिहिलयं म्हणून आभार..

रमन राघव च्या पतिक्षेत आहे..

७५ व्या वर्षी खास ज्याच्यासाठी रोल लिहिले जातात असा एकमेव भारतीय अभिनेता म्हणजे अमिताभ!

असो सिनेमाबद्दल लिहा, बोला.

परीक्षणाचे शीर्षक अजिबात समजले नाही. नक्की काय म्हणायचे आहे?
चित्रपट पाहिला नाही, पण अमक्याने तमक्याला खाल्ला वगैरे जरा अतिच बाळबोध टाईप होतंय.

उगाचच एकतर्फी खुन्नस ठेऊन पूर्वग्रहदूषित आकस बाळगून (बच्चन बद्दल) परीक्षण लिहिल्याचे जाणवतंय. (देजा वू फिलिंग का येतंय मला). असो, बच्चन बद्दल काही खास प्रेम नसल्याने माझा पास.

{बच्चन हा माझ्या मते एक चांगला अभिनेता}
बच्चनला हे कळलं तर कित्ती गहिवरून येईल नै

<<<< चित्रपट ठिक वाटला. बच्चनला अभिनयात खाणे ही नवाझुद्दीनच्या बसची बात नाही.७५ व्या वर्षिही अमिताभला ज्या प्रकारचे रोल मिळतात तेच त्याचे श्रेष्ठत्व सांगण्यास पुरेसे आहेत. ७५ व्या वर्षि हे खाणारे अभिनेते कुठे असतील ते बघणे रंजक ठरेल. ह्यांना तरुणपणातच चित्रपट मिळायची मारामार. >>>>>

१०० % सहमत !!

ज्या माणसाने कोलकतात वास्तव केलेल आहे, त्याला अमिताभ बच्चनचा अभिनय खुप पटेल, एक हताश वृद्ध
बंगाली त्याने अति उत्तम रित्या उभा केलेला आहे . खुपदा अमिताभ आमच्या कोलकततल्या ऑफिस मधला
एखादा माणुस वाटतो, त्याच सतत तोंड उघड रहाण, त्याची भाषा वैगेरे.
पण त्याच वेळी जेंव्हा सुड पुर्ण होतो त्यावेळेला त्याच्या चेहेर्यावरचा अभिनय पुर्ण बदललेला आहे,
विद्द्या बालन नेही चांगल काम केलेल आहे, पुर्वी कहानी मध्ये काम केलेल असल्याने ह्या सिनेमाच्या
डायरेक्टरला विद्द्याला घेण जास्त सोईस्कर पडल असाव, विद्द्या पुर्ण सिनेमात सराईतपणे वावरते.

सोप्या शब्दांत सांगायचं तर नवाझुद्दिन बच्चनला 'खातो' !
>>>>>

बच्चनला शाहरूखने कैकदा खाल्लेय. जेव्हा जेव्हा ते आमोरेसामोरे आलेत. आता हे अभिनयातील खाणे आहे की स्टारडममधील हे ज्याने त्याने ठरवावे.

मोहोब्बते - बच्चन आणि शाहरूख दोघांना म्हटलं तर होमपीच होता. शाहरूख सरस ठरला.
कभी खुशी कभी गम - हा शाहरूख शो होता. बच्चन आणि हृतिक यात पाहुणे कलाकार वाटले.
वीर झारा - यात बच्चन अगदीच पाहुणे कलाकार होते आणि तसेच वाटले.
कभी अलविदा ना कहना - यात बच्चन पितापुत्र एकत्र येऊनही निष्प्रभ ठरले.

त्यामुळे आपण म्हणता ते खरे असेल तर,
रईस मध्ये शाहरूख आणि नवाझुदीकीनची फायनल बघायला मजा येईल Happy

अमिताभ आणि नवाजुद्दीनबाबत थोडंसं..

नवाजुद्दीन एक चांगला अभिनेता आहेच आणि ते त्याने प्रत्येक भूमिकेतून सिद्ध केलेलं आहेच. याउलट अमिताभ बच्चन हे (त्यांच्याच मतानुसार) दिग्दर्शकाचे अभिनेते आहेत. प्रचंड अभिनयक्षमता आणि अत्यंत जबरदस्त आवाज असणार्‍या या अभिनेत्याने बूम या कॅटरीना कैफच्या पदार्पणाच्या चित्रपटात अत्यंत अगम्य आवाज आणि अतिशय बकवास अभिनय करून दाखविला आहे.

तेव्हा त्यांच्या अभिनयातील कमतरतेचा दोष दिग्दर्शकाकडे जातो. त्यांच्याकडून कसा अभिनय करवून घ्यायचा याचे पूर्ण स्वातंत्र्य दिग्दर्शकाला असते. बच्चनसाब त्यात अजिबात ढवळाढवळ न करता एखाद्या होतकरू उमेदवाराप्रमाणे दिग्दर्शक म्हणेल ती पश्चिम असे मान्य करत त्यास संपूर्ण सहकार्य करतात.

{{{ निराश होऊन नोकरी सोडून पाद्री बनलेला 'मार्टिन'. He is basically trying to run away from his failure. एक प्रामाणिक पोलीस अधिकारी असतो तो. त्याला आलेलं अपयश त्याचा पिच्छा इतक्यात सोडणार नसतंच. तो जितका त्यापासून पळायचा प्रयत्न करतो आहे, तितकंच ते त्याला जवळ ओढत असणार. ही जी एक प्रकारची कुतरओढ आहे, ती नवाझुद्दिनने जाणवून दिली आहे. ठळकपणे दाखवून देण्याची संधी कथानकात त्याला नाही मिळालेली. पण आतल्या आत ही घुसमट त्याला छळते आहे, हे मात्र तो व्यवस्थित जाणवून देतो. }}}

माझ्या मते ही भूमिका अमिताभ यांना द्यायला हवी होती. यात एक प्रकारचे शल्य बोचल्याची भावना आहे जी दाखवायचा अमिताभना दांडगा अनुभव आहे. काला पत्थर आणि एक अजनबी हे दोन चित्रपट ज्यांनी पाहिले असतील त्या़ंना अमिताभ यांनी या प्रकारची भूमिका तरूण वयात आणि म्हातारपणीही किती समर्थपणे पेलली आहे हे पटेल.

बच्चनला शाहरूखने कैकदा खाल्लेय>>>>>>:हहगलो: शतकातला महान विनोद.:हहगलो: बाळ ऋ, बरोबरी करायची तर जरा अमिताभ- संजीवकुमार, अमिताभ- नसीर अशी तरी करायची. हे म्हणजे कॉलेजमधल्या ११ वीतल्या नवतरुणाने एम टेक केलेल्या व्यक्ती ला शिकवण्यासारखे आहे.

ऋन्म्या,

मानता हूँ की मैं 'बाळबोध' हूँ.. वरती तसं सिद्धही करून देण्यात आलंय, लेकिन तुम तो हद कर देते हो यार !

आय मीन, शाहरुख आणि अमिताभ जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर आलेयत, कुणीही काही खाल्लं नाही. लोक्स उपाशी राहिले ना भाऊ !

ॠन्मेष,

{{{ कभी अलविदा ना कहना - यात बच्चन पितापुत्र एकत्र येऊनही निष्प्रभ ठरले. }}}

अतिशय असहमत. हा चित्रपट मी पाहिलाय आणि माझ्या मते तरी इथे तुम्ही लिहिलेय त्याच्या नेमके उलट घडलेय. असो. तुमच्या श्रद्धास्थानांचा उदोउदो करण्याचे आणि तुमचे व्यक्तिगत मत मांडण्याचे स्वातंत्र्य मला मान्य आहेच.

आपटे बाईचा फो .... बिया पाहिला.

अगदी फालतू स्टोरी , डायरेक्शन व अ‍ॅक्टिंग ! १०० डेज मस्त होता

बच्चनला शाहरूखने कैकदा खाल्लेय. जेव्हा जेव्हा ते आमोरेसामोरे आलेत.............
असा विनोद गेल्या हजार वर्षात तरी ऐकला नव्हता .....

अमिताभ तो अमिताभ. शाहरूखने त्याच्या सिनेमांची कितीही कॉपी केली तरी तो अमिताभची उंची कधीच गाठू शकणार नाही. मोहब्बतेतील बच्चनसमोर शाहरूख उभा राहण्याच्या सगळ्या प्रसंगांमध्ये शाहरूख पूर्णतः निष्प्रभ ठरलाय.

ऋन्मेष,

शाहरूखने बच्चनला खाणं म्हणजे आशीश नेहराने सचिनला बॅटींग टेक्नीक शिकवणं किंवा डेव्हीड जॉन्सनने मायकेल होल्डींगला यॉर्कर कसा टाकावा यावर टीप्स देणं अशी तुझी कल्पना आहे काय?

कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी?

बच्चनला शाहरूखने कैकदा खाल्लेय. जेव्हा जेव्हा ते आमोरेसामोरे
आलेत. आता हे अभिनयातील खाणे आहे
की स्टारडममधील हे ज्याने त्याने ठरवावे.
मोहोब्बते - बच्चन आणि शाहरूख दोघांना म्हटलं तर
होमपीच होता. शाहरूख सरस ठरला.
कभी खुशी कभी गम - हा
शाहरूख शो होता. बच्चन आणि हृतिक यात पाहुणे कलाकार वाटले.
वीर झारा - यात बच्चन अगदीच पाहुणे
कलाकार होते आणि तसेच वाटले.
कभी अलविदा ना कहना - यात बच्चन पितापुत्र एकत्र
येऊनही निष्प्रभ ठरले.
त्यामुळे आपण म्हणता ते खरे असेल तर,
रईस मध्ये शाहरूख आणि
नवाझुदीकीनची फायनल
बघायला मजा येईल>>>>>>>
काही दिवसांत स्वजो बच्चनला खाईल.
मग सई नवाज़ला खाईल.

मी शाहरूख फार ग्रेट अभिनेता आहे असे कधीच म्हणालो नाही किंवा म्हणणार नाही.
म्हणून अभिनयाबाबत की स्टारडमबाबत हे आपणच ठरवा म्हणालो.
पण स्क्रीनवर दोघे असतात तेव्हा कोण भाव खाऊन जातो ते शाहरूखच.
आता शक्यता आहे की हे दोघे बरेचदा करण जोहार किंवा चोप्रांच्या फिल्ममध्ये दिसत असल्याने त्यात शाहरूखला अ‍ॅडवांटेज मिळत असेल.

बाकी अमिताभपेक्षाही अभिनयात सरस असलेले कलाकार या देशात आहेतच ना. तरीही अमिताभ सरस आहे, सुपर्रस्टार आहे ते अभिनयापलीकडील काही गुणांमुळे.. तेच शाहरूखमध्येही आहेत

फिर भटकाया...
मूळ चित्रपट, त्याचे परीक्षण राहिले बाजूला आणि ऋणम्याचे नेहमीचे फंडे आणि त्याला बळी पडणारे मायबोलीकर हे रसभंग करणारे कॉम्बो सुरु झाले. त्याची अशा काड्या टाकून कॅमेरा स्वतःवर वळवण्याची पद्धत आहे आणि बाकीचे वेड्यासारखे त्या च्या ट्रॅप मध्ये अडकत आहेत आणि तो त्याची मजा घेतो आहे.

यू आर प्लेईंग हिज गेम हे तुमच्या लक्षात कसे येत नाही?
चला तर, त्याला इग्नोर करून मूळ विषयाकडे या पाहू Wink

Pages