सैराट - रिव्यु (रीडः कौतूक)

Submitted by वैद्यबुवा on 10 June, 2016 - 16:29

पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अ‍ॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!

सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे? Lol कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अ‍ॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं Lol ) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!

पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात. Happy
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))

नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!

खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अ‍ॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे! Happy )

त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!

परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?) Lol स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!

आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..

आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.

सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अ‍ॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.

अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss

ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये. Happy

नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्‍यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अ‍ॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!) Happy

नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्‍या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?) Proud

कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!! Lol

पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!

गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अ‍ॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल! Happy

आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अ‍ॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अ‍ॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!

आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अ‍ॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"

काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....

त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्‍याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो..... Happy

अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….

_/\_

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"आने, तू आम्हाला हिकडचं रान दाखीव की"

"काय झालं"

"काय न्हाई, आनी म्हन्ती तिकडचं रान दावती"

"मी कुटं म्हन्लं रं"

"जा जा आने दाव"

मित्राला एकांत मिळावा म्हणून काय आयड्या लढवलीय बाळ्या सल्याने Biggrin

ललिता प्रीती.. यू सेड इट.
मलाही सैराट झालं जी.. या गाण्यातला फिमेल वाॅइस नाही आवडला. आणि तेवढाच अजय चा आवाज मात्र खूपच आवडला. सैराट झालं जी... ही ओळ कित्ती सुंदर गायली आहे त्याने.. आणि संपूर्ण गाणं ही तसचं.. त्याच्या आवाजाने, गाण्याने अजून श्रवणीय झालयं हे गाणं.
माझं सगळ्यात फेवरेट आहे हे.. अर्थपूर्ण गाणं, अप्रतिम संगीत. मस्त आवाज, सुंदर चित्रीकरण..

मित्राला एकांत मिळावा म्हणून काय आयड्या लढवलीय बाळ्या सल्याने <<
असल्या अनेक प्रकरणांच्यात माझी माठ आनी व्हायची ते सगळे आठवून मी हसून मेले होते बघताना. Lol

सैराट झालं जी मधल्या अजय च्या गायकीबद्दल अगदी अगदी झालं वाचुन.
निरागस कोवळ्या प्रेमात चिंब भिजल्याचं फिलिंग सुरेख पकडलंय त्यानं. जीव ओतून गायलाय !!!

मी पण या फॅन क्लबात...
भयंकर आवडला आहे हा सैराट....
संवाद, गाणी, लोकेशन्स सगळच...

" अय मन्ग्या व्हु भाईर " आणि " मराठीतुन सांगितलेलं कळत नाय? इन्ग्लीश्मद्धे सांगु ? " हे सध्या आमच्या घरात आणि मित्रमंडळीत चालणारे डायलॉग Wink

दुसरा भाग परत एकदा बघायचा आहे...त्यात खुप बारीक सारीक डीटेलिंग आहे....
अर्ची घरातुन निघुन गेल्यावर परशा आणि सुमनताई मधे झालेली चर्चा पण खुप विचार करायला लावते...
असे पळुन लग्न करणारे खुप असतात पण नंतर ते निभावणं अवघड आहे हे पण नागराज सांगुन जातो...

(हा चित्रपट बघुन मुलं बिघडतील असा ओरडा करणार्यानी खरतर चित्रपट नीट पाहीला नाहीये....
पळुन जाणार्या मुलांचे होणारे हाल पण त्यात व्यवस्थीत अधोरेखित केले आहेत....)

तो सीन पण छान आहे

जेव्हा प्रदिप (लंगड्या) पर्श्याला सांगतो, तुझ्या मामाचं पत्र आलं का, तर हा डंबो पर्श्या कोणता पत्र कोणता पत्र विचारतो, त्याला कळत नाही कि लंगड्या बात आगे बढवत आहे.

अक्षरशः कॉलेज चे दिवस आठवलेत

"परश्या ल्यका आईक ल्यका जीवंच मारतील ल्यका"

"मला आर्चीला एकदा भेटू दी चल"

"परश्या ल्यका आईक, आपल्याला मारतील ते मारतील, घरच्यास्नी बी मारतील ल्यका"

असे म्हटल्यावर परशा परत जायला तयार होणे म्हणजे अतोनात प्रेमातही प्रॅक्टीकल विचार करून घरच्यांचा दोष नसताना त्यांना ताप नको हे पटणे.

छोट्याश्या प्रसंगातून परीणामकारकरीत्या दाखवलेले आहे.

मराठीतुन सांगितलेलं कळत नाय? इन्ग्लीश मध्ये सांगू?

अार्ची संपूर्ण सिनेमात फक्त एकच वाक्य इंग्लिश मध्ये म्हणते, तेही फक्त परश्याला उद्देशून
l LOVE YOU

मलाही सैराट झालं जी.. या गाण्यातला फिमेल वाॅइस नाही आवडला. आणि तेवढाच अजय चा आवाज मात्र खूपच आवडला. >>> माझं उलटं झालं होतं Happy
चिन्मयी श्रीपदाचा आवाज काय सुरेख लागलाय. मला तरी तिचे उच्चारही कुठेच नाही खटकले. 'बिल्लोरी पाखरु' ज्या पद्धतीने म्हटलंय ते तर फारच आवडलं. ह्याउलट अजयचाच आवाज मला खूप लाऊड वाटला होता सैराट आणि याड लागलं ह्या दोन्ही गाण्यांसाठी. चक्क ( वाईट अर्थाने ) अंगावर आला होता त्याचा आवाज पहिल्यांदा. असं वाटलं होतं की परश्याच्या लाजाळू, नाजूक व्यक्तिमत्त्वाला शोभेसा आवाज हवा होता तिथे.
पण तसंही परश्याने लिप सिंक केलं नाहीये त्या गाण्यांवर आणि नंतर अजयचं जीव तोडून गाणं चढत गेलं मनावर.

'मन रानात गेलं' आणि 'जीव रंगला' पेक्षा 'आता गं बया' मधले श्रेयाचे उच्चार चांगले मराठी वाटले.

मला तर आधी सैराट झालं जी मधले तिचे शब्द काहीच कळत नव्हते किती दिवस. काय गातेय बाई काही कळत नव्हतं. फक्त अजयचे श्ब्द स्पष्ट कळत होते. मग सतत रीपीट मोडपर ऐकुन कळले. अल्गुज बिलगुज. Happy
आताच बया मधे श्रेया चे उच्चार सगळे पफेक्ट वाटले मला तरी.

अार्ची संपूर्ण सिनेमात फक्त एकच वाक्य इंग्लिश मध्ये म्हणते, तेही फक्त परश्याला उद्देशून
l LOVE YOU >>>
नाय ओ व्होल वावर ईज अवर असं सांगते ना परशाला ती Happy

विहिरीत बेभान उडी मारतानाही त्याला त्याच्यासाठी महागाच्या वस्तुंचं भान आहे. उडी मारायच्या आधी बरोब्बर घड्याळ आणि वॉलेट मित्राच्या हातात द्यायला तो विसरत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी माणसं अगदी खरी वाटतात.

>> ह्या सीनची जेवढे वेळा चर्चा होते तेव्हा मला क्वीनमधली (हंगामा हो गया गाण्याच्यावेळी) स्वेटर गोल गोल फिरवुन (भिरकवण्याच्या ऐवजी) पर्समध्ये कोंबणारी आणि एकाकी भागात एक डेंजर डॉन दिसणारा माणूस पर्स खेचतो तेव्हा जमिनीवर लोळण घेऊन त्याला पर्स न मिळू देणारी कंगनाच आठवते फक्त आणि फक्त.

अताच बया गाण्यात आर्ची आरश्यासमोर साजशृंगार वगैरे करताना त्या आरश्याच्या फ्रेमला शेजारी एक मुलीचे स्केच दिसते. पिवळ्या, निळ्या, लाल रंगाने रंगविलेले. त्यावर इंग्रजीत आर्ची लिहिलेय. शाळकरी वयात काढलेले असावे तिने.

धन्यवाद . Happy

आता मला परत बघावा लागेल सगळे डिटेल्स बघायला. काल पहिला अर्धा तास परत बघितला. पुन्हा तेवढच हसायला आलं! Lol

सैराट झालं मध्ये झन्नानलं (हात हातात घेतात तेव्हा), धडाडलं (परशाच्या अंगावर लाल रंगानी भरलेला फुगा फुटतो) आणि कडाडलं (आर्चि अन परशा पावसात पायर्‍या उतरत असतात) असले परफेक्ट टाईम केले आहेत! धडाडलंच्या पुढे थोडं कडवं म्हणून होईस्तोवर आर्ची आणि आनि पळत सुटतात अन सैराट झालं जी ला परशा भिंती मागून अचानक समोर येउन तिच्या अंगावर बादलीनी रंगाचं पाणी ओततो! ती सगळी स्लो मोशन मध्ये पळतात तो शोट भन्नाट जमलाय!

चिन्मयीचा आवाजा खरच मस्त लागलाय! एकायला खुप गोड आहे!
अजयचा आवाज पण मस्त. ग्रामिण बाज असलेली, ढोल वगैरे असलेली गाणी ही त्यांची टेरिटोरी आहे. अफाट ढोल वाजवातात ते.
सैराट झालं जी मध्ये मला दर वेळेस जेव्हा अजय कडवं संपतानाची शेवटच्या ४ ओळी म्हणतो ते असले झिंग चढवतात! एकून बघा तुम्ही.

रंगल मन हळदीन राणी रंगल
सरल हे जगण्याचं झुरणं सरल

आणि

भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरल
हरलं ह्या पीरमाला समद हरलं

ह्या ओळी अजय म्हणायला लागतो तेव्हा ढोलांचा आवाज असला फिवर पिच ला पोहोचतो! माणूस हातातलं काम टाकून ढोलावर डोलायाला लागणार म्हणजे लागणार!!!!

Mast lihilay buwa.
Afat movie. Solid characterization. Detailing too good.

नी - वरची मोठी पोस्ट आवडली. मला तांत्रिक बाजू माहीत नसली तरी "गल्ली चुकलं काय ओ" फीलिंग आले नाही कोठेही Happy

होल वावर इज आवर बद्दल - ते बहुधा 'वर्‍हाड निघालंय लंडनला' किंवा 'रामनगरी' मधले आहे मूळचे. हे वाक्य त्या नाटकाने लोकप्रिय केले. पूर्वी अनेकदा हे ऐकले जायचे. आता कदाचित ते मूळ नाटकाचा संदर्भ सोडून जनरल गप्पांत तसेच वापरले जाते. चित्रपटातही तसेच घेतलेले दिसते.

चित्रपटात अनेक प्राइसलेस मूमेण्ट्स आहेत. आत्ता ज्या आठवतात त्या:
- हळद पिवळी गाण्याच्या सुरूवातीला ती वेणीला झटका देउन वळते तो सीन व मागचे म्युझिक
- मंग्या सहानुभूती दाखवायला आल्यावर मग पाणी पिताना आर्ची येते तेव्हा त्याला लागलेला ठसका
- झिंगाट गाण्याचे ते सुरूवातीचे इंग्रजी गाणे चालू असताना सुरू झालेला 'ठटाडाक ठटाडाक...' ठेका.
- मालगाडीला "अच्छा, बाय बाय" करणे
- "नाना, हात बरा हाय का?"
- आर्चीची एण्ट्री व पोरांना हाकलण्यापर्यंतचा सीन

'लई ईगोये रं तुला' हे मला वाटतं केवळ 'पिच्चरला जायचं का?' ह्या डोश्याच्या गाडीवरच्या सीन पुरतंच मर्यादित नाहीये.
घरातला कर्ता पुरूष पलंगावर झोपतो आणि बाकी सगळे जमिनीवर अशी परश्याच्या घरी दाखवलेली कौटुंबिक व्यवस्था पुन्हा आर्ची परश्याच्या घरी बघून खूप वाईट वाटलं. आर्चीनं हिरितून हकलून देण्यातही धन्यता मानणारा परश्या, रिअ‍ॅलिटी आणि संशयाचा वेताळ पाठुंगळीवर बसताच, आर्ची म्हणते तसा त्याच्या मेल ईगो ऊफाळून येतो.
संशयापेक्षाही आर्ची स्वतःला परिथितीनुसार एवढं मोल्ड करू शकेन ह्याच्यावरंच परशाला पहिल्याने विश्वास वाटत नाही.

दुनियेतली बरीचशी प्रेम प्रकरणं ह्या रिअ‍ॅलिटीच्या वेताळाला कायमची बळी पडतात, सगळ्यांनाच सावरण्याची संधी मिळते असं नाही. साथियापण सेकंड हाफमध्ये ह्याच वळणानं जातो.

वर्हाड निघालंच्या आधी मला वाटतं मी तो डायलॉग धुमाळांच्या तोंडी एकला आहे आंधळा मारतो डोळा मध्ये. ती बेसिकली मराठी म्हण झालीये आता. Lol

हायझेनबर्ग, मोदक घे भौ. क्रेक्टेय एकदम.

सैराट झालं जी बद्दल बुवा परफेक्ट! आणि फा ने लिहून काढलेले सगळे क्षण.
हळद पिवळी ला त्या गुलाबी ड्रेसमधे आर्ची 'जॅम' गोड दिसलीये. ती वन साईड वेणी! Happy
सैराट झालं जी मधे काॅलेजात दुरूनच परश्या तिला तू सुंदर दिसतीयेस असं सांगतो तेव्हा तो स्वतःच जास्त छान दिसतो की 'मी नेहमीच सुंदर दिसते' असं फक्त खांदे उडवून सांगत भाव खाणारी आर्ची हे ठरवता येत नाही. मेड फाॅर इच अदर!

माझा पण सैराट रिव्ह्यू टाकला तर हाणणार नाही ना मला Wink
sairat.jpg

म्हणजे आवडला, पण इथल्या इतरांच्याइतकी चिंब भिजून डुंबत नाहीये. Happy

Pages