अमितुद्दिन सिद्दिकी (Movie Review - Te3n / Teen)

Submitted by रसप on 12 June, 2016 - 02:31

क्रिकेटचं भूत मानगुटीवर बसलेलं असतानाच्या काळातली गोष्ट. भारतीय संघ परदेशात (खासकरून भारतीय उपखंडाबाहेर) खेळायला गेला की पानिपत ठरलेलं असायचं. 'हे हरणार आहेत' हे इतकं व्यवस्थित माहित असायचं की वाटायचं, 'जातात कशाला तिथे खेळायला ?'
पण 'निकाल लागणार' हा निकाल माहित असतानासुद्धा सामन्याची वेळ लक्षात ठेवून मी बरोब्बर तेव्हा टीव्हीसमोर बसायचोच. कधी कधी पहाटे लौकरही उठायचो त्यासाठी. त्यामागे विचार हाच की, 'फाईट किती देतात पाहू !'
'फाईट'.
जिंकणार नाहीत, ह्याची खात्रीच. फक्त 'फाईट'.

'तीन' (TE3N) बद्दलची उत्सुकताही अशीच काहीशी. ही बच्चन वि. नवाझुद्दिन अशी लढत होती. निकाल काय लागणार हे मला आधीच माहित होतं. पण 'फाईट' किती दिली जातेय, हे पाहायचं होतं. अपेक्षेनुसारच निकाल लागला. पण फाईटही चांगली दिली.
बच्चनने नवाझुद्दिनला.

बच्चन हा माझ्या मते एक चांगला अभिनेता आणि महान सुपरस्टार आहे आणि नवाझुद्दिन स्टारही नाही, पण एक महान अभिनेता ! बच्चन पडद्यावर येतो तेव्हा त्याच्या स्टारपणाचं वलय पडदा व्यापून उरतं. नवाझुद्दिन जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा त्याचं काम पडदा व्यापून उरतं. एखादा महासागर किनाऱ्यावरच्या दगडासमोर जसा धडका देऊन देऊन निष्प्रभ ठरतो, तसं बच्चनचं महास्टारपण नवाझुद्दिनच्या खमक्या अभिनयासमोर उसळ्या खाऊन खाऊन कमी पडलं. मला ह्याचाच सगळ्यात जास्त आनंद झाला. 'काव्यात्मक न्याय' दिसला की आपल्यातल्या न्यूनपिडीत सामान्य माणसाला उगाच स्वत:च जिंकल्यासारखं वाटतं, तसंच काहीसं मला वाटलं. 'गडगंज श्रीमंतीपुढे एक मध्यमवर्गीय जिंकला' असा एक भास मला झाला.
मी खूष ! पिक्चर कसा आहे, हा भाग पुढचा !

'तीन' बद्दलची उत्सुकता त्याच्या शीर्षकापासूनच सुरु झाली. अनेक दिवस हे 'टीईथ्रीएन' असंच वाटत होतं. अजूनही काही जणांना तसंच वाटतही असावं. हा पांचटपणा असला, तरी मला आवडला ! पण मुळात सिनेमाचं नाव 'तीन' का असावं, हे नाही आवडलं. 'तीन मुख्य व्यक्तिरेखा असणं', ह्या फुटकळ कारणाशिवाय ह्या शीर्षकाला दुसरं काहीही समर्थनीय मला तरी गवसलं नाही. ह्यापेक्षा तर 'जजबा' शीर्षक चांगलं होतं. ('जजबा'कारांना जर हा व्यक्तिरेखांचा हिशोब मांडायचा असता तर 'देढ' करावं लागलं असतं आणि ते D3DH असं लिहिता आलं असतं. अर्र्र.. कुठे भरकटतोय मी !)

'मॉन्टाज' (Montage) ह्या कोरियन (अर्थातच दक्षिण) चित्रपटावर 'तीन' अधिकृतपणे आधारला आहे.
कोलकात्यात घडणारं हे कथानक. जॉन बिस्वास (अमिताभ बच्चन) ची नात आठ वर्षांपूर्वी अपहृत होऊन नंतर मृतावस्थेत सापडलेली असते. गुन्हेगाराचा छडा लावण्यात यंत्रणा अपयशी ठरलेली असते. मात्र म्हातारा जॉन चिवटपणे रोज पोलीस स्टेशनात येऊन तपासकार्याची चौकशी करत असतो. आठ वर्षांपूर्वी ही केस ज्याने हाताळली असते, तो पोलीस अधिकारी आलेल्या अपयशामुळे निराश होऊन नोकरी सोडून एका चर्चमध्ये पाद्री बनलेला असतो. (फादर मार्टिन/ इन्स्पेक्टर मार्टिन - नवाझुद्दिन सिद्दिकी). तर आता पोलीस ठाण्याचा व पर्यायाने ह्या आठ वर्षं जुन्या केसचा चार्ज सरिता (विद्या बालन) कडे आलेला असतो.
चिवट जॉन, निराश मार्टिन आणि अननुभवी सरिता आपापल्या पद्धतीने ह्या आठ वर्षं जुन्या घटनेच्या स्मृती उगाळत, जपत किंवा दुर्लक्षित करत असतात आणि तेव्हाच अजून एक अपहरण घडतं. ह्या नव्या अपहरणात आणि त्या जुन्या केसमध्ये काही साधर्म्य असतं का ? दोन्हीच्या मागे एकच व्यक्ती असते का ? खरं काय आहे ? ह्या प्रश्नांची उत्तरं सरिता आणि मार्टिन शोधायला लागतात, तर दुसरीकडे जॉन मात्र जुन्या केसचा छडा स्वत:च लावत असतो. अश्या ह्या तिघांची कहाणी म्हणजे 'तीन.'

te3n-trailer-movie-poster-release-date.jpg

मांडणी जराशी, नव्हे, बऱ्यापैकी संथ आहे आणि जराशी गुंतागुंतीचीही. दोन कहाण्या एकत्र दाखवत असताना, जी एक विशिष्ट पद्धत वापरली आहे (ह्याविषयी मी नेमकं लिहू शकत नाही कारण त्यामुळे विचका होऊ शकतो.), ती पटेलच असं नाही. कदाचित काही जणांना चटकन लक्षातही येणार नाही. मला ती पटली नाही, पण तरी आक्षेपार्ह काहीच नाही. एक वेगळा प्रयोग आहे असं म्हणू. आपण आजपर्यंत तसं पाहिलेलं नसल्यानेही खटकणं स्वाभाविक आहे. मात्र चित्रपटाची लांबी तरी कमी करता आलीच असती. थ्रिलर आहे, तर पसारा असू नये हा एक अलिखित नियम आहे, असं मी मानतो. अनेक दृश्यांना सरसकट कात्री लावताच आली असती.

'कहानी'ने कोलकात्याचं जे जबरदस्त चित्रण केलं होतं, त्यामुळे आता मी कुठल्याही चित्रपटात 'कोलकाता' पाहिलं की थेट त्याच्याशीच तुलना होते. त्यात हाही सुजॉय घोषचीच निर्मिती असलेला सिनेमा. त्यामुळे तर तुलना अपरिहार्यच ! नाही दिसलं कोलकाता ! हे 'दिसणं' म्हणजे शहराचं पर्यटन नव्हे, ते 'कहानी'तही नव्हतंच. 'कोलकाता' माणसांत दिसायला हवं होतं. ते नाही दिसलं.

विद्या बालनने पोलीस अधिकाऱ्याची देहबोली उत्तम दाखवली आहे. ती दाखवण्यासाठी तिला दृश्यममधल्या तब्बूसारखी 'युनिफॉर्म' आणि विझलेल्या डोळ्यांची गरज पडली नाही. (तब्बूला तर त्यासहसुद्धा जमलं नव्हतंच !) विद्याने स्वत:च्या एकंदरच हालचालीत एक पुरुषीपणा जबरदस्त दाखवून दिला आहे. तिच्या बोलण्यातूनही 'खाक्या' जाणवतो.
तिची व्यक्तिरेखा 'सहाय्यक' म्हणून आहे. मुख्य पात्रं 'जॉन' आणि 'मार्टिन'च आहेत.
'जॉन बिस्वास' हा घटनेला आठ वर्षं उलटून गेल्यावरही रोज पोलीस स्टेशनात येणारा, आजही पुन्हा पुन्हा आपल्या नातीच्या जुन्या ऑडियो व व्हिडियोंना पाहणारा, झोप हरवलेला आणि चोवीस तास फक्त 'तो गुन्हेगार कोण आहे' हाच विचार करणारा एक वयोवृद्ध मनुष्य आहे. त्याच्या मनावर झालेल्या आघातामुळे त्याच्या डोक्यावरही थोडासा परिणाम झालेला आहे म्हणूनच तो इतक्या चिवटपणे एकाच गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे. त्याची पत्नी आणि मित्र (मार्टिन) सुद्धा त्याला टाळत आहेत. हा जो एक प्रकारचा वेडगळपणा आहे, तो बच्चनला दाखवता आलेला नाही. बच्चनचा 'जॉन' फक्त करुण दिसतो. त्याची दया येते, वाईट वाटतं त्याच्याकडे पाहून. पण 'जॉन'चं कारुण्य इतकं मर्यादित नाहीय. त्याच्या कारुण्याला असलेली वेडसर छटा समोर यायला हवी होती. ती आली नाही. तो खिन्नतेचा झाकोळलेला चेहरा ओढून अख्खा सिनेमाभर वावरतो.
दुसरीकडे, निराश होऊन नोकरी सोडून पाद्री बनलेला 'मार्टिन'. He is basically trying to run away from his failure. एक प्रामाणिक पोलीस अधिकारी असतो तो. त्याला आलेलं अपयश त्याचा पिच्छा इतक्यात सोडणार नसतंच. तो जितका त्यापासून पळायचा प्रयत्न करतो आहे, तितकंच ते त्याला जवळ ओढत असणार. ही जी एक प्रकारची कुतरओढ आहे, ती नवाझुद्दिनने जाणवून दिली आहे. ठळकपणे दाखवून देण्याची संधी कथानकात त्याला नाही मिळालेली. पण आतल्या आत ही घुसमट त्याला छळते आहे, हे मात्र तो व्यवस्थित जाणवून देतो.
सव्यसाची चक्रवर्तीला लहान भूमिका आहे. ती त्याने चोख निभावली आहे.

बच्चनने स्वत:च गायलेलं 'क्यूँ रे' हे गाणं लक्षात राहतं. इतरही २-३ गाणी आहेत. त्यांचा कथानकात अडसर होत नाही आणि टिपिकल आजच्या गाण्यांसारखी उच्चस्वरात जाणारी असली, तरी 'गोंगाट' नसल्यामुळे त्रास तरी देत नाहीत.
संवादांबाबत, काही 'वन लायनर्स' चांगले आहेत.
पण संगीत आणि संवादांपेक्षा पार्श्वसंगीत जास्त महत्वाचं होतं आणि ते प्रभावी झालं आहे.

थोडीशी वाढीव लांबी, थोडीशी गुंतागुंत हे जर स्वीकारलं, तर नवाझुद्दिनचं (पुन्हा एकदा) उत्तम काम आणि बच्चनचा (पुन्हा एकदा) जबरदस्त 'स्क्रीन प्रेझेन्स' असा एक मस्त अनुभव 'तीन' देतो.
'फाईट' लक्षात राहते ! सोप्या शब्दांत सांगायचं तर नवाझुद्दिन बच्चनला 'खातो' !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/06/movie-review-te3n-teen.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरूखने बच्चनला खाणं म्हणजे आशीश नेहराने सचिनला बॅटींग टेक्नीक शिकवणं
>>>

ईथे शाहरूख आणि अमिताभच्या बाबतीत सचिन आणि कोहली हे उदाहरण समर्पक राहील.
आणि त्या धर्तीवर दिलीपकुमारला ईथे गावस्कर बोलू शकता Happy

सिद्धिकी महान अभिनेता - ये बहोत जादा हो रहा है. इर्फान खान, सिद्धिकी एकाच जातकुळीतले अभिनेते आहेत, त्यांच्या कंफर्ट झोनमधल्या भुमिकांत उठुन दिसणारे. दोघांचा अभिनय एकसुरी आहे, मग तो तोमर असो वा पिकु मधला (इर्फान) आणि बजरंगी भाईजान असो वा बदलापुर (सिद्धिकी). बच्चन किंवा दिलीपसाब सारखी रेंज त्यांच्याकडे नाहि...

बायदवे, आॅल अदर क्रिटिक्स आर गोइंग गा गा ओवर बच्चन्स परफाॅरमन्स... Wink

मोदी आणि रसप ह्यांच्यावर टीकेची झोड उठवणे ही फॅशन झाली आहे. रसप ह्यांचे विचार पटोत न पटोत, ताशेरे झाडण्यातील बोचरेपणा कमी करता येईल का असे एक आपले विचारावेसे वाटले. पिक्चर पाहिलेला नसल्यामुळे अर्थातच पिक्चरबद्दल काहीही लिहिलेले नाही. अवांतराबद्दल क्षमस्व!

अमिताभ, शाहरुखची तुलना एकवेळ ठिक आहे. निर्माता त्यांच्यावर हे पैसे कमावुन देउ शकतात असा विश्वास टाकु शकेल. पण नवाझुद्दीन म्हणजे अति झाल.

{इर्फान खान, सिद्धिकी एकाच जातकुळीतले अभिनेते आहेत, त्यांच्या कंफर्ट झोनमधल्या भुमिकांत उठुन दिसणारे. दोघांचा अभिनय एकसुरी आहे,}

ज्जे बात. मी सहमत.

यात मोदी कुठून आले? कोणत्याही धाग्यावर मोदींचा प्रचार केलाच पाहिजे का? असं करा मोदीस्तुती ची एक गझल लिहाच ...

अहो ह्या धाग्यावर शाहरुख, स्वजो, सई, इरफान खान, संजीव कुमार, नसिर उद्दिन शहा असे सगळे येऊन गेलेले आहेत. एक मोदी आले तर काय बिघडले. आणि अवांतराबद्दल दिलगीरी प्रदर्शीत केली आहे की?

राज, सहमत. ठराविक साच्यातल्या चित्रपटात नवाझुद्दिन, इरफान चांगले वाटतात. पण अमिताभ सारखी अष्टपैलु कामगिरी ते करु शकत नाहित. कुठलाही निर्माता त्यांना सोलो हिरो म्हणुन घेउन बिग बजेट सिनेमा बनवु शकत नाही.जंजिर, काला पत्थर ह्या चित्रपटात तरुणाची आंतरिक घुसमट अमिताभ यांनी प्रभाविपणे दाखवली होती. नवाझुद्दीनशी अमिताभशी तुलना चुकिची आहे. त्याच्या वयाचा असताना अमिताभ सुपरस्टार होता.

राज यांची वरील पोस्ट विचार करण्यासारखी आहे. ह्याच कारणामुळे सुरेश ओबेरॉय, रझा मुराद, सोनू सूद, हे अभिनेते गुणवान असूनही त्यांच्या मर्यादांमुळेच जास्त वर जाऊ शकले नाहीत

बेफिकीर, मोदींना परदेशी फिरण एन्जोय करु द्या. धाग्यावर इतर ज्यांचा उल्लेख झाला ते कलाकारच आहेत. का तुम्ही मोदींनाही चांगला अभिनेता मानता?

त्यांनी 'श्वान्,युवान, मध्वान' न्यायाने मोदींची आणि रसप याना एका माळेत गुंफले आहे...

काही अभिनेत्यांना प्रमुख भूमिका देण्यासारखे त्यांचे व्यक्तीमत्वही नसते. अमिताभची उंची, डोळे, आवाज ह्यामुळे त्याला प्रमुख भूमिका देणे शक्य झाले. (अगदी सुरुवातीला तर त्यालाही मनोजकुमारने 'घोड्यासारखा दिसतोस' असे म्हणून हाकलून दिले होते, ते वेगळे).

त्यामुळे अनुपम खेर, ओम पुरी, नवाझुद्दिन, इर्फान खान अश्या काहीजणांना प्रमुख भूमिका देणे व्यावसायिकदृष्ट्या योग्य वाटेलच असे नाही.

प्रमुख भूमिकेतील नट / नटी दिसायला चांगले असायलाच हवेत अशी एक मानसिकता आहे / असते. (अवांतर - कालपरवाच असा विचार करत होतो की एखादी तुलनेने कुरुप स्त्री हिरॉईन म्हणून घेतली जाणे किती अवघड आहे. खरे तर भूमिकेला शोभत असेल तर घेतली जायला हवी. पण 'इतिहास गवाह है' की प्रत्येक हिरॉईन अगदी प्रत्येक क्षणी प्रचंड सुंदर दिसेल, नटलेली असेल ह्याची दक्षता बाळगली गेलेली आहे. हे विचित्रच आहे जरा!)

अहो ह्या धाग्यावर शाहरुख, स्वजो, सई, इरफान खान,
संजीव कुमार, नसिर उद्दिन शहा असे सगळे येऊन
गेलेले आहेत. एक मोदी आले तर काय बिघडले. आणि
अवांतराबद्दल दिलगीरी
प्रदर्शीत केली आहे की?>>>>>>
कशाला अवांतर?
मोदी म्हणजे नटसम्राट आहेतच कि!

अभिनय कोणत्या युनिट मध्ये मोजतात?
एखाद्याला उच्च दर्जाचा अभिनेता म्हणायला कोणता निकष लावता?

आपण पडद्यावर जे अमुकतमुकने फलाणाढमकाला खाल्ले म्हणून बोलतो ते कुठल्या निकषावर बोलले जाते हे मात्र मी सांगू शकतो.

दोन कलाकार आमने सामने आल्यावर कोण पडदा व्यापून टाकतो, कोणावर आपली नजर जास्त वेळ रोखली जाते हा साधासोपा निकष आहे.

आणि या साठी निव्वळ अभिनयच हवा असे गरजेचे नाही. स्टाईल, सौंदर्य, एक्स फॅक्टर, पर्सनॅलिटी, संवादफेक, वेशभूषा असे काहीही असू शकते ते ..

हाच निकष लावून माझी वरची उदाहरणे आली आहेत.

तिघे नव्हे तर दोघे आवडते.. त्यामूळे मी या लढतीचा निकाल आधीच देऊन ठेवला आहे.
नवाजुद्दीन भुमिकेला जितके समजून घेतो, तसे इतर क्वचितच कुणी करत असेल. त्याला तशी गेट अप ची पण गरज पडत नाही. आहे त्याच चेहर्‍याने वावरला तरी तो ते पात्र जिवंत करु शकतो.

आणि या दोघांच्या समोर विद्याने आपली दखल घ्यायला लावली... यातच सर्व आले.

बच्चन आता बर्‍याच समंजसपणे भुमिका निवडत आहे, हे मात्र खुपच छान.

The Great Gatsby-२०१३, बघा. बच्चनचा पहीला आणी तोही केमियो रोल हॉलिवूड मधला. त्याची रेंज जाणवते.
बाकी नवाजुद्दिन पण फार मोठा होणार यात शंका नाही.

परिक्षण मात्र नेहमीप्रमाणेच बाळबोध.

अर्शद वारशी ची रेंज >>>> तेरे मेरे सपने पासून आवडीचा कलाकार.. त्याचे विनोद कधीच बोर करत नाहीत.. जबर्रदस्त टायमिंग.. त्याचा जॉली एल्लेलबी सुद्धा आवडलेला एक चांगला चित्रपट.. त्यातही सलमान विरोधी चित्रपटात काम करणे हे विशेष आवडले.
(किंबहुना तो तीन खानांपैकी कोणाच्याही चित्रपटात कधी दिसत नाही... कि आहे कुठल्या?)

दिनेशदा, पहेली पाहिलाय.
पण बच्चन ज्याला बाटलीत भरून गाडतो तो शाखा नसतो तर जो उरतो तो खरा शाखा असतो ना..
किंबहुना बच्चन यावरूनच तर खरे खोटे पकडतो, की शाखा ला काही बाटलीत उतरवणे सोपे नाही, मग ज्याला उतरवता येईल तो खोटा आणि उरलेला खरा Wink

निव्वळ अभिनयक्षमतेचा विचार केला तर शाहरुख खान हा अमिताभ, ऋषी कपूर, नसीरुद्दीन शाह, नाना पाटेकर, अनुपम खेर, अमरीश पुरी यांच्या पासंगालाही पुरणार नाही. मी संजीव कुमार, दिलीपकुमार, राज कपूर, मोतीलाल, जयंत, अशोक कुमार यांची नावं घेत नाही कारण हे कोण होते हे ऋन्मेषला माहीत असण्याची शक्यता फार थोडी आहे.

शाहरुखचे सिनेमे चालतात ते केवळ मार्केटींग, स्वतःच्या चमच्या समिक्षकांकडून स्वतःच्या अभिनयाची (नसलेल्या आणि फसलेल्या) वाहवा करुन घेणं आणि त्याने पडद्यावर केलेला कोणताही वेडगळपणा भक्तीभावाने पाहणार्‍या चाहत्यांमुळे इतकंच! याच निकषावर सलमान खानही पुरेपूर उतरतो आणि काही प्रमाणात आमीरही. मात्रं या आमीरने जे वेगवेगळे प्रयोग करण्याचं धाडस दाखवलं त्याच्या निम्यानेही शाहरुखने दाखवलं नाही. आमीरच कशाला, अगदी अक्षयकुमारनेही शाहरुखपेक्षा कितीतरी वेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या (आणि उत्तम केल्या), पण स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात असलेल्या शाहरुखने चौकटीबाहेरचा धोका कधीच पत्करला नाही.

जाता जाता,
"तो शाहरुख खान आहे ना, का कोणास ठाऊक पण त्याला पाहील्यावर मला पॉमेरीयन कुत्र्याची आठवण होते. पॉमेरीयन कसं मागून-पुढून कुठूनही पहा, तोंड कुठलं, पत्ताच लागत नाही." - इति शिरीष कणेकर

शाहरुखचे मार्केटिंग जोर्दार असते ... असू दे ! बाकीच्यानीही करावे की.

शाहरुख चचच्यांकडुन परिक्षणे लिहवतो ..... शहरुखचे चाहते परिक्षणे वाचुन षिनेमाला जात नाहीत.

मनोरंजनाची खात्री ... या एकाच मुद्द्यावर लोक जातात

आता परत शाहरूख ला शिव्या देण चालू झाल का ? Sad

ऋन्मेऽऽष लिहितो ते शाहरूखच स्वतःच स्टेट्मेंट आहे का ? उगाच कुठेही चालू व्हायच .

पण स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात असलेल्या शाहरुखने चौकटीबाहेरचा धोका कधीच पत्करला नाही. >> बर .

"तो शाहरुख खान आहे ना, का कोणास ठाऊक पण त्याला पाहील्यावर मला पॉमेरीयन कुत्र्याची आठवण होते. पॉमेरीयन कसं मागून-पुढून कुठूनही पहा, तोंड कुठलं, पत्ताच लागत नाही." - इति शिरीष कणेकर > Sad

कणेकर कधी कधी टिका करताना वाहावत जातात. पण ते एआयबी रोस्ट सारखे वाहावत जायचेच आहे हा हेतू ठेऊन नाही लिहित.

इथे शाहरूख एवढ्यासाठीच आला की रसप यांनी जे अमिताभला कोणीतरी खाल्ले या घटनेला ऐतुहासिक स्वरूप देत त्याचे कौतुक केलेय त्याच्याशी मी असहमत आहे आणि याआधीही अमिताभला खायची घटना घडली आहे हेच दर्शवायचा हेतू होता.

बाकी आता शाहरूखने आमिताभच्या पिक्चरचा धागाही खाल्ला असे व्हायला नको म्हणून ईथेच थांबूया अशी विनंती करतो.

तसेच आज संध्याकाळी मला शाहरूख संदर्भात काही लिहायचे आहे. त्या लिखाणावर येथील चर्चेचा प्रभाव पडून माझ्या विचारांमधील प्रामाणिकपणा गंडला जाऊ नये म्हणून तुर्तास, मी तरी थांबतो Happy

बाळ ऋ,

शाहरूख खानलाच कुणीतरी विचारलेले एका मुलाखतीत की वाटचाल करताना आदर्श म्हणून कुणाकडे पाहिलेत?

त्याने सगळ्यात पहिले नाव अमिताभचे घेतले मग ऋषी कपूर आणि अजून एकदोन नावे घेतली.

तू स्वतःला शाखाचा फॅन म्हणवतो ना, मग ह्या असल्या गोष्टी बघत, वाचत, ऐकत जा!

अमिताभ - दिग्दर्शकाचा अभिनेता असे वर कुणीतरी म्हटले आहे त्याबद्दल अगदी सहमत!

यश चोप्रांनी एका मुलाखतीत सांगितल्याचे आठवले की बहुसंख्य दिग्दर्शक संपूर्ण कारकिर्दीत अमिताभकडून जे काढून घेऊ शकलेत ते त्याच्या रेंजच्या केवळ ३० ते ३५ ट्क्के असावे. ह्यावरून समजावे!

रसप ह्यांचे समर्थन करताना त्यांनी केलेल्या रीव्यूवरसुद्धा कॉमेंट करावी.

सिनेमांची परीक्षणे अशी एककल्ली कुठल्या भाषेत लिहिली जातात हे समजले तर बरे होईल.

अभिनेते, अभिनेत्रींचा उल्लेख कुठल्याही परीक्षणात अगदी शेवटच्या पाच सहा ओळींत असते. त्यातही त्यांना नेमून दिलेले काम त्यांनी किती चोख केलेय किंवा नाही हे लिहिलेले असते. हे असे सुरुवातीपासूनच नुसती अभिनेत्यांची टिमकी वाजवणे किंवा चिरफाड करणे ह्याला परीक्षण म्हणतात का?

इति.

Pages