भूत

Submitted by Abhishek Sawant on 21 January, 2016 - 12:02

भूत

भूत या संकल्पनेचा शोध कोणी लावला महिती नाही पण भूत म्हंटले की भल्याभल्यांची बोबडी वळते, ज्ञानेंद्रिये काम करत नाहीत आणि पंचमहाभूतांवरचा आपला विश्वास उडतो, अगदी आपल्या सावलीची पण भिती वाटू लागते. जगामध्ये भूतांचे असंख्य प्रकार आहेत, वेगवेगळ्या धर्मांनूसार वेगवेगळ्या गटात भूतांची वर्गवारी होते. मला वाटते जेवढे लोक जीवंत आहेत त्यापेक्षाही भूतांची गणना जास्तच असेल कारण प्रत्यक्षात भूताला पाहणार्यांपेक्षा आमच्या आज्जाला पडक्या विहीरि जवळ दिसलेले भूत, आमच्या मामाला माळावर दिसलेले भूत असे सांगणार्‍यांची गणती जास्त आहे. भूतांना कूटुंब नियोजनाचे नियम लागू होत नसल्याने त्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आपआपल्या कल्पनाशक्तीच्या कुवती नूसार भुताचे चित्र प्रत्येकाने आपल्या मनात रंगवलेले आहे.. तरण्यावयात मेलेल्या माणसांचे भूत हे पैलवानी असते त्यांच्या तावडीत सापड्ल्यानंतर कुस्तीला सामोरे जावे लागते आणि असे भूत सोडवण्यासाठी उतारा म्हणून कोंबडा, मटण असे जंगी मेजवाणीचे आयोजन करावे लागते. गर्भवती बाई मेली किंवा मारली गेल्यास तिची हडळ होते. ती सुड घेतल्याशिवाय एखाद्याला सोडतच नाही. एखादी बाई कितीही सुंदर असली तरी तिचे भूत हे नेहमी कुरुप आणि भयंकरच असते.
अश्याच एका खर्‍या भूताशी माझा सामना झाला, माझ्या एका मित्राला म्हणजे विकासला देवधर्माची खुप आवड होती त्यामुळे तो विविध देवाच्या यात्रेसाठी प्रवास करत असे पण तो तसा देवमाणूस नव्हता ही गोष्ट वेगळी. तेव्हा मी महविद्यालयीन शिक्षणासाठी मिरजेत रहायला होतो, विकास आणि त्याचा एक मित्र माझ्या रुम मध्ये आले आणि ते म्हणाले चल आपल्याला अक्कलकोट जवळ असणार्‍या एका जाग़ृत हनूमान चे मंदीरात जायचय. मला पण भरपूर वेळ असल्याने आणि फिरायची आवड असल्यामूळे मी तो प्रस्ताव लगेचच मान्य केला.
विकास म्हणजे आमच्या गावतले भारदस्त व्यक्तीमत्व, भारदस्त छाती, पांढरी कपडे, झुबकेदार मिश्या, पहाडी आवाज आणि हातात सोन्याचे कडे. पाचवीला पाच वेळा नापास झाल्याने त्याने शाळेचा नाद सोडला आणि टवाळ्क्या करत फिरू लागला. तो जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्याच्या टवाळकीचे रूपांतर राजकारणात झाले आता तो पंचायतीचा मेंबर होता. त्याच्या बरोबर आलेला मित्र म्हणजे बाबु एक प्रकारचे भूतच होते. अंगाची झालेली काडी. मळकट कपडे. तोंडात राहीलेले ३-४ दात त्यामुळे झालेला तोंडाचा चंबु .तो जरा जास्तच वयस्कर वाटत होता. अश्या या पुढारी माणसाने बाबु सारख्या इसमाला सोबत का घेऊन फीरायच याचे मला आश्चर्य वाटत होते, पुढे मी तो संशोधनाचा विचार सोडून दिला. मिरज रेल्वे स्टेशन बाहेरील एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्टा केला आणि सायंकाळची सातची रेल्वे आम्ही पकडली.
कोल्हापूर जयसिंगपूर या मार्गे आल्याने रेल्वे आधीच फूल्ल भरलेली असायची कुठेतरी कोपर्‍यात किंवा दाराजवळ ऊभा राहण्यासाठी जागा मिळावी या आशेने आम्ही शेवटुन दुसर्‍या डब्यात चडलो. आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला पूर्ण डबा रिकामा होता माझ्या नशिबाचा मला गर्व वाटू लागला आता आम्ही पूर्ण डब्यात कसेही झोपून जाऊ शकत होतो. थंडीचे दिवस असल्याने मी सगळ्या खिडक्या आणि दारे बंद केली. रेल्वे मध्ये एका बाजूला चार जणांना बसण्याएवढी सीट असते त्या सीट वर खिडकीलगतची एक जागा सोडून विकास बसला कारण खिडकीतुन थंड बोचरी हवा आत येत होती आणि त्याला लागुन मी बसलो आमच्या पुढच्या सीट वर बाब्या बसला. थोड्याच वेळापूर्वी झालेल्या तुडूंब जेवणामूळे आणि रेल्वेच्या पाळण्यासारख्या हेलकाव्यांमूळे तिघेही लगेच झोपलो. रात्री शरीरधर्म प्रकट झाल्याने मी ऊठलो. विकास ची छाती लव्हारच्या भात्याप्रमाणे खाली वर होत होती, तो एका लयबद्ध चालीमध्ये घोरत होता. मी त्याच्या घोरण्याचा आणि गाडीचा आवाज यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला पण ते काही जमेनाच. बाबू चे बोळ्के तर गेट वे ऑफ ईंडीया प्रमाणे सताड ऊघडेच होते, लाईटाभोवती घोंगावणार्‍या माश्या किडे त्याच्या ऊघड्या गुहेची सफर करून येत होते. मध्येच बाबू तोंड बंद करून दोन तीन माश्या गटकावत होता.
मी ऊठलो आणि बाबूच्या पायांच्या काट्या ओलांडून टॉयलेट कडे कूच केली. सगळे आटोपुन मी परत आमच्या जागे कडे यायला वळालो, रेल्वेच्या उघड्या दारातून थंडगार हवा आत आली आणि त्याचबरोबर एक अत्यंत घाण असा वास आला. मी नाक दाबून परत आमच्या जागेकडे यायला निघालो तेव्हड्यात माझ्यासमोर एक अक्राळविक्राळ आणि घानेरडे भूत येऊन थांबले. भूताचा चेहरा रक्ताळलेला होता, ठिकठिकाणी लागलेले वर्मी घाव त्यातून गळत असलेले रक्त. शरीरावर मांस असे नव्हतेच नूस्ता हाडे दिसत होती. खोल गेलेले लाल डोळे. विस्फारलेले केस, तोंडातून येणारे रक्त आणि त्यामुळे रक्ताळलेले लाल दात.
असा हा हाडाचा सापळाच माझ्यासमोर होता, माझ्या शरिरात त्राण च राहीले नाही, कडाक्याच्या थंडीमध्येही मला दरदरून घाम फूटला होता, अंगातील पूर्ण शक्ति एकवटून ओरडण्याचा प्रयत्न करु लागलो पण माझ्या तोंडून आवाजही बाहेर पडत नव्हता. माझ्या कल्पनेतील सर्व भूतांची अनुभूती करून देणारे हे भूत होते. मी आता पळून जाण्याचा किंवा रेल्वे मधून बाहेर ऊडी मारण्याचा विचार करू लागलो. पण बाहेर ऊडी मारून काही फायदा नव्हता तिकडे जीव जाण्याचे चान्सेस जास्त होते आणि त्यात भर म्हणून जीवघेणी थंडी. तितक्यात भूत झोकांड्या खायला लागले याचाच फायदा घेऊन मी चपळाईने पळ काढला आणि आम्ही बसलेल्या जागेकडे गेलो. विकास झोपेत खिडकीच्या कडेला गेला होता मी गेलो आणि विकासला खिडकीपासून हटवून खिडकीला चिकटून बसलो तसा विकासने झोपेतच डोळे न ऊघडता दोन- चार कोल्हापूरी शिव्या हासड्ल्या पण भूताच्या तावडीत सापडण्यापेक्षा मला शिव्या ऐकणे मला सोईस्कर वाटले.
आता भूताच्या आणि माझ्या मध्ये विकाससारखा वाघ होता. आज पहील्यांदाच मला विकासच्या पिळदार शरीरयष्टीचा आधार वाटू लागला होता. मी खिडकी बंद आहे याची खात्री करून घेतली कारण अनेक भयपटात मी पाहीलेले होते की खिडकीतून किवा भिंतीमधून एकदम भूताचा हात बाहेर येतो आणि गळा पकडतो वैगेरे, तश्या परिस्थीतही मला माझ्या प्रसंगवधानाचे कौतुक वाटले . डोळ्यात जीव आणून मी भूत येत आहे का ते बघू लागलो. हूं हूं असा आवाज येऊ लागला आणि बघतो तर काय भूत आमच्या कप्प्यात दाखल झाले होते. आता मात्र माझ्या संपुर्ण अंगाचे पाणी पाणी झाले, माझे हातपाय थरथरू लागले. मी विकासला ऊठवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तसा विकास झोप मोड झाल्याने चरफडत ऊठ्ला आणि डोळे न ऊघडताच खोपराने मला खिडकीत दाबून गप झोप रे असा खेकसला. त्याचा खोपर जबड्याला वर्मी लागल्याने मनातल्या मनात त्याला शिव्यांची लखोली वाहिली पण भूत अजूनही तेथेच होते.
विकासला ऊठवण्याचा आणखी एक प्रयत्न करायचा ठरवून मी त्याच्या खांद्याला पकडून गदागदा हालवले तसा तो दात ओठ खाऊनच ऊठ्ला आणि मला खोपराने दाबणार इतक्यात मी भूताकडे बोट केले आणि दबक्या आवाजात म्हणालो भ भः भूत. विकासने भूताकडे नजर फिरवली तसा त्याचा सगळा आवेश गळून पडला, पहाडी आवाजाच्या जागी आता तोंडातून शब्दही फूटत नव्हता, भारदस्त छाती आता धपापू लागली आणि विकास सपशेल माझ्या अंगावरच कोसळला मी ऊखळात कांदा चेचावा तसा खिडकी आणि विकासच्या मध्ये चेचलो गेलो होतो पण भूताच्या तावडीत सापडण्यापेक्षा मला हेच जास्त सूरक्षित वाटत होते. विकास पण जाम घाबरला होता, बाब्या अजूनही कुंभकर्णा सारखा घोरत पडला होता . भूत त्याच्या जवळच ऊभे असून त्याला काहीच कळत नव्हते. कदाचीत भूताला निरोगी आणि आडदांड असं शिकार पाहीजे होतं म्हणून भूत बाब्याकडे दुर्लक्ष करत होते असा माझा समज झाला. विकासने बाब्याच्या पेकाटात लाथ घातली तसा बाबू बोंबलत ऊठला त्याचे लक्ष भूताकड गेल्यावर त्याच्या ऊरसूरल्या शरीरातून शक्ती एकवटून तो आमच्या सीटवर आला. माझ्या आणि भूताच्या मध्ये आता दोन दोन सावज होते. तरीपण भूत माझ्याकडे ईशारा करून हूं हूं करत माझ्याकडेच येत होते. माझ्या अंगाचा थरकाप ऊडाला. भूताला माझ्यात काय ईंटरेस्ट आहे हे मला समजत नव्हते. कदाचीत माझा मनूष्यघण वैगेरे काहीतरी असल्याने ते माझ्या मागे लागले असेल असे मला वाटू लागले. भूताचे त्यांच्याकडे लक्ष नाही म्हणून बाब्या आणि विकासने तेथून पळ काढला.
आतामात्र माझ्या भितीने ऊचांक गाठला, डोळ्यापूढे अंधारी येवू लागली, हळूहळू सगळे अंधुक होवू लागले आणि मी बेशुद्ध झालो. जाग आली तेव्हा एक किळसवाणा चेहरा माझ्या तोंडासमोर होता, मी दचकलो आणि ओरडून सैरभैर पळत सूटलो. गाडी थांबलेली होती पहाटेची वेळ होती स्टेशनवर तीन चार माणसेच होती. मी सावधानतेने डब्यात चढलो तर तिथे चहा ची किटली लवंडली होती म्हणजे मला ऊठवत होता तो चहावाला होता. मला बेशूद्ध पडलेलं पाहून त्याची भूतदया जाग्रुत झाल्याने मला मदत करण्याच्या ऊद्देशाने तो मला ऊठवत होता आणि माझ्या ओरडण्याने तो घबरून पळून गेला.
त्या धक्क्यातून सावरल्यानंतर स्टेशनवर तोंड वैगेरे धुवून चहा घेतला तेव्हड्यात बाबू आणि विकास तेथे आले घाबरून त्या दोघांनी रेल्वे थांबल्यावर रात्री मला भूताच्या तावडीत सोडून ते निघून गेले आणि त्यांनी डबा बदलला. आणि आता स्टेशनवर मला बघून ते आश्चर्यचकीत झाले होते. तेव्हढ्यात स्टेशनवर आम्हाला गलका दिसला काय झाले बघायला म्हणून आम्ही गर्दीमध्ये घुसलो आणि बघतोतर काय काल रात्रीचेच भूत तिथे होते. विचारपुस केली तेव्हा आम्हाला कळाले की हा माणूस त्या गाडीमध्ये भीक मागत होता, त्याला गेल्या काही महिन्यांपासून कुष्ठरोग झालेला होता. बिच्यार्‍याकडे ईलाजासाठी पैसे नव्हते, म्हणून तो प्रत्येक डब्यात जाऊन पैसे मागत होता. त्या रात्री मला बघून तो मदतीसाठी यातना करत होता आणि आम्ही भूत म्हणून घाबरत होतो. पोलीस आले पंचनाम्यासाठी प्रेत ताब्यात घेतले तशी गर्दी पांगली. त्या दिवशी मात्र मला कळाले की गरिबी हेच समाजातील सगळ्यात मोठे भूत आहे. गरिबी मुळे लोक ऊपाशी मरत आहेत त्यांना रहायला घर नाही, घालायला कपडे नाहीत. ज्या दिवशी गरिबी या देशातून नाहीशी होईल तेव्हाच या अजस्त्र भूताच्या तावडीतून आपला समाज बाहेर पडेल.
.
.
समाप्त.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान आहे, भुताची सामाजिक संदेश देणारी कथा.. आवडली Happy

मात्र हे नाही पटले
<<<< एखादी बाई कितीही सुंदर असली तरी तिचे भूत हे नेहमी कुरुप आणि भयंकरच असते.>>>
खरे तर सुंदर बाई ही जिवंतपणी जास्त भयंकर असते, आणि भूत झाल्यावर तिचे सौंदर्य आपल्या कामी येत नसल्याने कुरूप वाटते Wink

छान Happy

<<<<<<शेवट विचार करायला लावणारा आहे .
गुंगवून ठेवत महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेतले आहे.>~`=+ १

प्रयत्न छान केला. पण खुप जागी बारक्या बारक्या गोष्टी राहुन गेल्या. लेखन चांगले आहे. दुसऱ्यांचे विष्लेशन वैगरे. शेवट जरा पटेनासा वाटतो पण ही खरी परिस्थिती आहे. लिहत रहा.
माझी ही एक् कथा आहे. सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. जरुर वाचा.

Suyog thanks for the complenent...nakki vachen tumachi katha