गोष्टी बुधवारपेठेतल्या - : वर्तुळ .......

Submitted by अजातशत्रू on 8 June, 2016 - 06:38

पुण्यातल्या बुधवार पेठेत श्रीनाथ थिएटरच्या उजव्या बाजूने पुढे गेले की 'आफताब मंजिल' इमारत आहे. सारया बुधवार पेठेत अशा अनेक बहुमजली इमारती आहेत, ज्यात कोंबडयांच्या खुराडयासारख्या खोल्या आहेत. इथं बायकांचा बाजार चोवीस तास भरलेला असतो अन उष्ट्या तोंडाची लाळ गाळत फिरणारी आशाळभूत पुरुषी गिधाडं सदोदित पाहायला मिळतात. या आफताब मंजिलच्या जिन्याच्या तिसरया मजल्यावरील पायरयांवर म्हातारा झालेला विलास अंगाचे मुटकुळे करून पडून असायचा. सगळ्या अंगावर तेलकट धुळीची पुटं चढलेली, कपडे फाटून त्याची लक्तरे झालेली, हातापायाची पिवळी नखे वाढून वाकडीतिकडी झालेली, तळव्यांना मातीचे चिकट थर चिकटलेले, डोळ्याच्या पापण्या नेहमी अर्ध्या मिटलेल्या अन डोळ्याखाली मोठाली काळीवर्तुळे, चेहऱ्यावर पांढरी पिवळी दाढी वाढलेली अन डोक्यावर विस्कटलेले राठ कोरडे केस, काळ्या शुष्क ओठांना भेगा पडलेल्या, गालफाडे आत गेलेली अन समोरचे दात पडल्याने जबडे ढिले झालेले अशा चिंधूकलेल्या अवस्थेत एका जीर्ण फाटक्या सतरंजीच्या तुकडयावर तो पोटात पाय दुमडून पडलेला असे. विलासच्या देहाची वळकटी जिथे असे तिथेच एक काळपट जर्मनचा वाडगा त्याच्यासारखाच निपचित पडून असे. बुधवारातल्या इतर इमारतींप्रमाणेच ही इमारतही गलिच्छ होती, कोंदट - अरुंद होती, कळकटून गेली होती. इमारतीचा रंग इथल्या बायकांसारखा विटून गेलेला अन इथ येणारया बाजारू लोकांची अंधाऱ्या अस्वच्छ गल्ल्यातली घाण सारया इमारतीच्या व्हरांडयात पडलेली असे. सर्व इमारतींच्या खिडक्यांची तावदाने फुटलेली अन त्यावर लटकणारी- वाळत घातलेली तिथली रंगबेरंगी परकर, पोलकी, साडया असं नित्याचं दृश्य तिथं दिसत असे. तिथल्या सर्वच इमारतींचे जिने पानाच्या पिचकारयांनी रंगून विटकरी लाल रंगात परावर्तीत झालेले असत, जोडीला त्यांचे पोपडे निघालेले अन मावा गुटखा खाऊन कोपरया कोपरयात थुंकलेले असायचे. जिन्यांच्या डोक्यावरच्या भागात भली मोठी कोळीष्टके असत अन एखाद दुसरी जाड पिवळी पाल तिथे चिकटून बसलेली असायचीच, भक्ष्याच्या प्रतिक्षेत !

पन्नाशीच्या वयातल्या विलासला डाव्या पायाने चालता येत नव्हते, भल्या सकाळी दिवसातून एकदाच तो तिथून काही काळ उठून आपली सकाळ हलकी करून यायचा. त्याच्या सर्वांगाला एक उग्र दर्प यायचा त्यामुळे त्याला कुणी जवळ उभे करून घेत नसे. त्याच्या समोरच्या वाडग्यात कुणी पैसे टाकले तर ती त्याच्या बिडीकाडीची तजवीज होई. दिवसातून दोनेक वेळा त्याच्या पुढयात तिथलीच एक कंबरेत वाकलेली म्हातारी कधी डाळभात तर कधी रस्साचपाती आणून देई. त्याची तहान भुकेची गरज अशी भागत असे. धुळीने माखलेल्या हाताने तो जेवायचा तेंव्हा त्याच्या ओठातून ओघळ बाहेर पडत. आफताबमध्ये जिन्यातून वर चढणारी माणसे हे दृश्य बघून तोंड वेडेवाकडे करून पुढे निघून जात किंवा एखाददुसरा माजलेला तिथेच पच्चकन थकून जाई. दिनवाण्या चेहरयाने विलास त्याच्याकडे बघत राही अन तो पुढे निघून गेल्याची खात्री होताच शिव्यांची पुटपुट करत तोदेखील थुकत असे. एखादया दिवशी त्याला ती म्हातारी लालपिवळी चपटी आणून देई, त्या दिवशी मात्र त्याच्या चेहरयावर अनेक भावनांचे कल्लोळ बघायला मिळत. ही मदिरा त्याच्या खोल गेलेल्या आतड्यात उतरली की काही वेळाने तो एका पायावरच जिन्याजवळच्या खिडकीपाशी उभा राहून रस्त्याच्या पलीकडे टक लावून बघत राही. त्याच्या पायाला रग लागली की मग तो खाली बसे. मात्र तिथून नजर हटताच त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या उष्म धारा वाहत अन त्याच्या गालावरून ओघळून फाटक्या कपड्यात मिसळून जात….

या उन्हाळ्यातली काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. आफताब मंजिलमधे जिथे विलास पडून असायचा, तिथून रस्त्याच्या पलिकडे समोर बैठ्या घरांच्या रांगेतले एक अड्डावजा घर होते तिथं एका संध्याकाळी मोठा गहजब उडाला. त्या घराची मालकीण होती, पार्वतीबाई. काळीकुट्ट तेलकट अंगाची बऱ्यापैकी थुलथूलीत स्थूल अंगाची अन तुकतुकत्या कायेची चाळीशीच्या उंबरठयावरची पार्वती अत्यंत थंड डोक्याची अन थंड रक्ताची बाई होती. इतर बायकांप्रमाणे ती उठता बसता पांचट बोलत नसे. पण एकदा का तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला की त्याला उसंत नसे. घराबाहेर खुर्ची टाकून भरदार छातीवरचा पदर मुद्दाम वारयावर सोडून ती येणारया जाणारयांचा अंदाज घेत पानाच्या पिचकारया मारत बसलेली दिसे. तिच्या अगदी समोरील बाजूस असणारी आफताब मंजिलची जुनी इमारत तिच्या घरापुढे मान निघालेल्या बगळ्यासारखी वाटायची. पार्वतीच्या त्या अड्ड्यात वीसेक बायकापोरी होत्या. त्या सर्वांची सेफ्टी तिच्याकडे होती अन त्यांच्या कमाईत तिची पाती होती. जेवणपाणी ,जागा, तिथली देखभाल अन पोलिसांचे झंझट तिच्याकडे होते अन त्याबदल्यात त्या पोरींच्या कमाईतली निम्मी बिदागी तिच्याकडे असा या पातीचा साधा हिशोब होता. कधीकधी तिथे एखादे रग्गील माजुरडे गिऱ्हाईक येऊन तिला काव आणत असे. कधी अंगात जवानीची मस्ती अन खिशात पैशाचा खुळखुळाट असणारा एखादा आडदांड या बायकापोरींच्या वाटे जायचा अशा वेळेस तिला एखाद्या निगरगट, राकट हातांची गरज भासे. खरे तर तिच्याकडे असणारया प्रत्येक बाईने एक का होईना मरद राखलेला असायचा, पाळलेला असायचा. मात्र हे सर्व त्या त्या पोरीबाळीपुरते मर्यादित असत अन ते दररोज संध्याकाळी तिथे येत नसत. त्यामुळे एक हक्काचा बैल उस्मानच्या रूपाने पार्वतीने पाळला होता.

सदानकदा तांबारलेले डोळे, रापलेली तांबूस त्वचा अन विंचरलेले भुरकट केस. तलवारी मिशा अन टोकदार दाढीचा उस्मान डबल हाडाचा मजबूत उंचापुरा गडी होता. त्याच्या तोंडाला सदोदित हातभट्टीचा तर्राट वास यायचा मात्र तो कधी दारू पिऊन कुठल्या गल्लीत पडलेला कुणी पहिला नव्हता. कितीही दारू प्यायला तरी दुपार सरू लागली की त्याची पावले पार्वतीच्या घराकडे वळत. तिच्या उंबरयापाशी तो रस्त्याकडं शून्यात नजर लावून खांबासारखा उभा राही. मात्र अधून मधून तिरक्या नजरेने तो आतल्या बायका न्याहाळत बसायचा. खरे तर उस्मान पार्वतीला छळत असायचा, तिला सतत पैसे मागायचा. जुगारात पैसे हरायचा, दुसरीकडे जाऊन बाईवर पैसे उधळून यायचा,सारे नाद होते त्याला. तो कधी सकाळीच येऊन शिवीगाळी करायचा. अलिकडे त्याने तिच्यावर हात उचलायचा देखील प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी नथ न उतरलेल्या कोरया मुलीवर त्याने डाव टाकायचा प्रयत्न केला होता. त्यादिवशी त्याचे आणि पार्वतीचे कडाक्याचे भांडण झाले होते. पार्वतीने त्याला पुन्हा इथं येऊ नकोस असं सुनावून देखील लूत भरलेल्या कुत्र्यागत तो तिच्या दारापाशी निमूटपणे येऊन उभा राहत असे. उस्मान कुठे राहायचा अन त्याला कुणी नातेवाईक होते की नाही हे कुणाला माहिती नव्हते. मात्र तो रोज पार्वतीच्या इथे दल्ला म्हणून उभा राहतो हे तिथल्या परिसरात सर्वांना माहिती होते.

पार्वतीची तिच्याकडच्या पोरींपैकी परवीनवर खास मर्जी होती,. तिच्या पासून आपल्याला बरकत आली असं ती समजायची. नाकीडोळी नीटस असणाऱ्या गोरयापान कमनीय देहाच्या परवीनच्या उफाडया अंगाकडे माणसं भानामती झाल्यागत बघत राहायची तेंव्हा पार्वती शिव्यांची लाखोली वाहून त्यांना हाकलून द्यायची. या परवीनचा एक आशिक होता - बिज्जू . पिळदार देहाचा रसरशीत अंगाचा पठाणी शरीरयष्टीचा तरणाताठा बिज्जू कोणाच्याही नजरेत भरावा असाच होता. शर्टाच्या गुंड्या मोकळ्या टाकून तो वाटेतल्या माणसांना धक्के देत थेट परवीनच्या लाकडी फळकुटे मारलेल्या सांदाडीत शिरायचा. मनसोक्त तिच्या अंगाशी खेळून बाहेर पडायचा. एकदा तो दुपारीच परवीनकडे आला होता, तेंव्हा नशेत तर्र झालेले दोन काळेकभिन्न दांडगे मध्यमवयीन इसम पार्वतीशी पोरींना बाहेर पाठवण्यावरून हुज्जत घालत होते. त्यांचा अजून एक साथीदार बाहेर आला अन त्याने रस्त्यावरूनच पार्वतीला अर्वाच्च शिव्या द्यायला सुरुवात केली. पार्वतीने प्रसंगवधान राखून उस्मानला फोन केला मात्र तो नशेत असल्याने त्याने फोनच घेतला नाही. ती थोडी घाबरली तशी त्यांचा आवाज वाढला, तिच्या बाजूने बोलण्यासाठी पोरी बाहेर आल्या तशा तिने त्यांना नजरेने दटावून आतच थांबण्यासाठी खुणावले. ती हिम्मत एकवटून त्यांच्याशी भांडू लागली, आजुबाजूच्या घरातल्या बायकापोरी हा तमाशा ऐकू लागल्या, त्यात त्यांना नाविन्य नव्हते कारण तिथे रोजच असं कुठं ना कुठं घडत असतंच. पार्वती त्यांच्याशी भांडत असतानाच तिथे बिज्जू आला अन त्याने क्षणात काय चालले याचा अंदाज घेतला अन ढिल्या हाताने त्या धटिंगणापैकी एकाच्या कानशिलाखाली इतक्या जोरात हाणले की त्याच्या मेंदूला मुंग्या आल्या, सर्रकन वळून त्याने दुसऱ्याच्या पोटात पूर्ण ताकदीनिशी ठोसा लगावला. तो काळा कातळ मटकन खाली बसला,त्याची खाडकन उतरलीच ! त्यासरशी बिज्जू बाहेर आला अन त्याने रस्त्यात उभारून शिव्या देणारया तिसऱ्याला लाथाबुक्क्याने तुडवून काढायला सुरवात केली तशी बघ्यांच्या गर्दीची पालं पांगली. रस्ता मोकळा झाला,आस्ते कदम आत मार खाल्लेले दोघे बाहेर आले अन 'तुला नंतर बघून घेतो' असं म्हणत तिथून त्यांनी पोबारा केला. त्या दिवशी संध्याकाळी उस्मान पार्वतीकडे आल्यावर त्याला तिच्या वागण्यातला बदल जाणवला. शेजारच्या घरापाशी थांबणाऱ्या उपीनने त्याला दुपारचा किस्सा सांगितला. ते ऐकून त्याच्या डोक्यात भीतीची एक लहर दौडून गेली.

तर या उन्हाळ्यातल्या एका उफाणलेल्या सांजेला उस्मान पार्वतीच्या दारापाशी असाच येऊन उभा राहिला होता. अंधार चोरपावलांनी बायकांच्या कपड्यात विरघळत गेला अन रस्त्यावरच्या अधाशांची जत्रा तुडूंब भरली. भेलकांडत चालणारे गर्दुल्ले ते पांढरपेशी साळसूद भामटे असे सारेच त्या गर्दीच्या चेहऱ्यात आपले तोंड लपवत तिथल्या असहाय अर्धउघडया देहांवरून नजर फिरवत सावकाश चालत पुढे जात होते तर कुणी एखाद्या बाईकडे पिसाळल्यागत एकाच जागी उभं राहून आपली वखवख शमवत होते. उस्मानची नजर त्या गर्दीवर होती अन दूर उभारून हे सारं एखाद्या बहिरी ससाण्यासारखं बिज्जू निरखत होता. त्याने मनाशी निर्धार केला अन वेगाने तो पुढे झेपावला. वारं पिलेल्या घोडयासारखा तो पुढे गेला अन काय होतंय हे कळायच्या आत वीज कोसळावी तसा उस्मानच्या अंगावर तुटून पडला, बेसावध उस्मानला त्याने सर्व ताकदीनिशी उचलून आपल्या गुडघ्यावर दुमटे तिमटे केले अन त्याचे पाठीचे मणके असे काही ढिले केले की त्याला उठता बसता देखील येईना. दोनेक मिनिटात त्याने त्याच्या मानेवर अट्टल घिसाडी डाव टाकून नसा दाबल्या. तसा उस्मानचा आवाज बंद झाला. त्याचे डोळे विस्फारले होते, सर्वांगाला कंप सुटला होता, हातापायाला आकडी आली होती अन तोंडातून थुन्कीचे लोळ बाहेर पडत होते. उस्मान मेला नाही मात्र त्याने मरणाची भीक मागत फिरावे अशा पद्धतीने बिज्जुने त्याला जायबंदी केले होते की कुठेही रक्तपात झाला नव्हता मात्र त्याची सारी हाडे खिळखिळी केली होती. बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती पण मध्ये पडायची कुणाची हिमंत झाली नाही. अगदी दुरून एक पोलीसशिपाई देखील चोरट्या नजरेने ह्या घडामोडी पाहत होता. बहुधा त्याला पार्वतीकडून काही नोटा ढिल्ल्या करायची ही नामी संधी वाटत असावी. खुद्द पार्वतीही दाराआडून सगळा तमाशा बघत होती मात्र तिनेही बिज्जूला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट तिच्या चेहरयावर नसती ब्याद गेल्याचे समाधान झळकत होते, ज्यावरून तिची याला फुस असावी हे सहज लक्षात येत होते. काही वेळ गेल्यानन्तर बिज्जूने एक रिक्षा बोलावून त्यात उस्मानच्या अर्धवट शुद्ध हरपलेल्या देहाच्या गाठोडयास कोबंले अन रिक्षा ड्रायव्हरच्या कानात तो काहीतरी पुटपुटला.

इकडे विलासच्या कानावर तो आवाज येऊन पडला मात्र त्याला त्याची फारशी दखल घ्यावी असं वाटलं नाही कारण तिथे बारमाही आरडाओरडा अन भांडणे पाचवीला पुजलेली असत. त्यामुळे त्याने तिकडे लक्ष दिले नाही अन तो गपगार पडून राहिला. काही वेळाने त्याला खाऊपिऊ घालणारी म्हातारी त्याच्यापाशी धावतच आली. ती विलासच्या गळ्यात पडून रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, तिचे सर्वांग थरथरत होते. काही सेकंदात तिचा आवेग ओसरला तसा तिने विलासच्या गालावरून हात फिरवला अन ती त्याला म्हणाली,
"अल्लाह बडा है, तेरी फरियाद उसने सून ली, आज हिसाब पूरा हुआ !"
विलासला ती काय सांगतेय तेच कळत नव्हते, मात्र काहीतरी अघटीत घडलेय ज्याने देवाने आपल्याला न्याय दिलाय इतकं त्याने ताडलं होतं.
"बारा साल पहले जिस उस्मानने तेरी ये हालत की थी, आज उसी उस्मानको किसी और ने लहुलुहान किये बगैर बेजान बना दिया, अब वो मौत के लिये तरसेगा लेकीन उसे मौत नही आयेगी !"
तिच्या तोंडून ही वाक्य ऐकताच विलास लहान मुलांसारखा ओक्साबोक्शी रडू लागला. त्याला बोलायला सुचत नव्हते. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या अन तो हंबरडा फोडून त्या म्हातारीच्या कवेत शिरला.

जिन्यात कसला रडारडीचा आवाज चालला आहे हे पाहण्यासाठी काही बघे गोळा झाले होते मात्र त्यांना वरच्या मजल्यावरील आस्माने हाकलून दिले. ती पायऱ्या उतरून खाली आली. तिने त्या वृद्ध स्त्रीला उठवून छातीशी कवटाळले. ती पुटपुटत होती, 'अल्लाह के घर देर है पर अंधेर नही... '
त्या वृद्धेला हाताशी धरून ती तिच्या घरात घेऊन गेली. तिच्या कबिल्यातली नवाडी पोरगी अचंबित होऊन हा सारा नजारा पाहत होती. काय चालले आहे याची तिला उत्सुकता लागून राहिली होती. तिने पुढे होऊन विचारले, 'आखिर माजरा क्या है ?'
'काय सांगू तुला?'
त्या वृद्धेकडे हात दाखवत ती म्हणाली, 'आपल्या बिल्डींग मध्ये धुणेभांडी - स्वयपाक पाणी करणारी ही बुढीया म्हणजे नाझनीन, त्या समोरच्या अड्डयाची एके काळची मालकीण ! हिला फसवून तिथ काम करणारया पार्वतीने तो अड्डा हडप केला अन तिथली मालकीण होऊन बसली. आणि जिन्यात पडलेला तो विलास म्हणजे हिचा दल्ला. हिची देखरेख करायचा. मात्र पार्वतीने ज्या दिवशी नाझनीनला तिचे वय वाढल्यावर हाकलून दिले त्या दिवशी तरण्याताठ्या उस्मानने विलासला इतके मारले की तो अपाहीज झाला !
तेंव्हापासून तो इथेच पडून आहे अन ही नाझनीन ह्या झुठ्या दुनियेत त्याची सच्ची सेवा करते !'

जिन्यात पडून असणारया विलासच्या चेहरयावर आता समाधान झळकत होते. एक वर्तुळ पूर्ण झाले होते. आता तो नाझनीनच्या हिशोबाचे वर्तुळ पूर्ण व्हावे म्हणून मनोमन देवाला प्रार्थना करत होता. आता त्याच्या आयुष्यात एकच स्वप्न आता बाकी राहिले होते मग डोळे मिटायला तो मोकळा झाला होता.

इकडे सरकारी दवाखान्यात बेवारशी माणसाप्रमाणे एका खाटेवर लोळागोळा होऊन पडलेल्या उस्मानच्या एका डोळ्यात विलास झळकत होता तर एका डोळ्यात बिज्जू !

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/05/blog-post.html

kamathipura1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही वेळ गेल्यानन्तर उस्मानने एक रिक्षा बोलावून त्यात उस्मानच्या अर्धवट शुद्ध हरपलेल्या देहाच्या गाठोडयास कोबंले अन रिक्षा ड्रायव्हरच्या कानात तो काहीतरी पुटपुटला. >> इथे बिज्जुने रिक्षा बोलावली असे हवे ना ?

कथा अंगावर शहारा आणणारी आहे. असे कितीतरी हिशोब त्या पेठेत रोज चुकते होत असतील आणि नविन वर्तुळं तयार होत असतील, पुर्ण होत असतील.

केलेलं दुष्कृत्य कुठे ना कुठे कधी ना कधी फेडावं लागतं हे नक्की.

असे कितीतरी हिशोब त्या पेठेत रोज चुकते होत असतील आणि नविन वर्तुळं तयार होत असतील, पुर्ण होत असतील>> +१
लेखनशैली जबरी आहे. एकदम खिळवून ठेवणारी, उत्कंठा वाढवणारी !

आज याहू वर बांगलादेशातील एका बुधवारपेठे संबंधी लेख आला आहे. विषय सारखाच आहे म्हणून टाकत आहे. आपल आक्षेप असल्यास उडवेन

https://in.news.yahoo.com/catch-rare-glimpse-inside-walled-165727426.html

छान लिहीलंय.
एकाच शहरात किती शहरं असतात सामावलेलीं. आणि एका शहराला पत्ताही नसतो त्यातल्या इतर शहरांचा, असं कांहीं वाचेपर्यंत !!