डांबऱ्या !!

Submitted by विद्या भुतकर on 5 June, 2016 - 14:27

डांबऱ्या जन्मला तेव्हा केवळ मुलगा होता म्हणून जिवंत राहिला. इतका काळा होता की मुलगी असता तर केंव्हाच त्याच्या बापानं तिचा गळा दाबून कचऱ्यात फेकून आला असता. त्याचा त्वचेचा रंग, डोक्यावरच्या केसांचा रंग , तळहाताचा गुलाबी शिरा दिसणारा रंग आणि ओठांचा निम्मा लाल रंग मिश्रित काळा रंग हे सगळे म्हणजे एकाच रंगाच्या किती शेड्स असतात याचं जिवंत उदाहरण होते. शाळेत पोरांनी ठेवलेलं हे त्याचं नाव, 'डांबऱ्या'. अगदी गावात डांबरी रस्ते नसेनात का? लहान असताना लई राग यायचा त्याला. हळूहळू त्यानं ते चिडवणं स्वीकारलं, आपलं नाव आणि रूपही.

डांबऱ्या मोठा झाला. जमेल तशी शाळा शिकला. मजुरी, शेती करून पोट भरू लागला. उन्हा-तान्हात काम करून त्याचा काळा रंग अजूनच रापला. वय वाढलं तसं आईने हट्ट केला म्हणून लग्नाला 'हो' म्हणाला. लग्नही मुलगा होता म्हणूनच झालं. नाहीतर इतक्या काळ्या मुलीचं लग्न झालं असतं होय? पण त्याचं झालं. पोरीच्या बापालाही बरंच झालं. त्याची पोरगीही सावळी असून पोरापेक्षा गोरी म्हणून खपून गेली. वर हुंडा कमी बसला ते वेगळंच. संसाराचा गाडा चालू तसा तो जरा खुलला. कुणीतरी घरी आल्यावर विचारणारं होतं. हाता पायाला लागलं, खुपलं तर फुंकर मारायला होतं. तरीही इतक्या वर्षात घुम्यासारखं रहायची लागलेली सवय ती! इतक्या सहज जाणार थोडीच होती.

बायकोला दिवस गेलेत म्हणल्यावर त्याला काळजीने ग्रासलं. होणारंच ना. आयुष्यभर खाल्लेल्या टोमण्यांची, चेष्टांची आणि ठेवलेल्या नावांची आठवण झाली. मुलगा होतो का मुलगी यापेक्षा आपल्यासारखं काळ होतं का बायकोसारखं सावळा याचीच चिंता त्याला पडली होती. कळल्यापासून सात महिने त्याच्या डोक्यावर टांगती तलवार होती. बाळ आपल्यासारखं होऊ नये अशी त्याने दिवसातून हजार वेळा तरी प्रार्थना केली होती. बाळ झाल्यावर सर्वात आधी त्याला ते पहायचं होतं. त्यामुळे तिला माहेरीही पाठवायची त्याला इच्छा नव्हती. पण पहिली वेळ म्हटल्यावर ती माहेरी तर गेलीच. शेवटी माहेरून बातमी आल्यावर पहिल्याच गाडीने तो तिला भेटायला गेला होता. बाळाला पाहीपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता.

इतक्याशा एक दिवसाच्या त्या रडणाऱ्या बाळाला पाहिल्यावर मात्र तो सर्व विसरून गेला. त्याचा आवाज, त्याचा इवलुसा चेहरा, टपोरे डोळे, त्याच्या जवळ जवळ तळहाताइतकंस ते बाळ. पहिला प्रेमाचा भर ओसरल्यावर मात्र त्याने थोडं निरखला त्याचा रंग. त्याची प्रार्थना देवाने ऐकली होती. पोरगा खरंच बायकोसारखा होता एकदम. त्याने मनोमन हात जोडले होते. एकवेळ तो स्वत:ला झालेला अजून त्रास सहन करू शकला असता. पण तो ज्यातून गेला त्या सर्व हालातून इतक्या छोट्याशा जीवाने जावं या कल्पनेनेच तो शहारला होता. मोठ्या ओझ्यातून त्याची सुटका झाली होती. दोन दिवस सासरी राहून तो गावी परतला. बायकोला म्हणालाही,"कधी येतासा घरी परत?" दोन दिवसांची बाळंतीण ती, तिला काय कळणार? शेवटी तिची आईच म्हणाली,"जावईबापू पोरीला लगेच नाही पाठवणार. दो चार महिन्यांनी बारसं करूनच न्या पोरीला आणि बाळाला. " मनावर दगड ठेवून तो त्यादिवशी निघाला.

गेल्या महिनाभरापासून गावातून जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या कामावर लागला होता. त्यात बायकोही नव्हती म्हणून मग रात्रीचं काम लागलं तरी जात होता. शिवाय आता पोरगं झाल्यावर काम करायला अजून जोर आला होता. तिथे जे पडेल ते काम करायचा. उन्हाळ्याची सकाळी ७ पासूनच उन्हं चढायला लागायची. त्यात त्याचं काम हे असं. गेला तसा त्या गोल डब्यात डांबर ओतयचा. त्याच्या खाली लाकडं पेटवायचा. उन्हं वाढू लागली की डांबरही त्या डब्यात वितळू लागायचं. बाकी लोक चेहऱ्याला कापड लावून बसायचे. कधी ते त्याला चिडवायचे,"ह्याला काय? डांबऱ्याच हाय तो". तो बेफिकीर तसाच त्या उन्हात तो काम करत रहायचा.

डांबऱ्या धगीतून डांबर खडीवर ओतून घ्यायचा. मोठ्या लांब दांडक्याने डांबर आणि खडी मिसळून घ्यायचा. आणि एका खोऱ्याने ती खडी एक चाक असलेल्या गाडीत घेऊन हळूहळू करत ती खडी रस्त्यावर मन लावून ओतायचा. दुपारच्या उन्हाच्या झळा आणि डांबराची ती खडी दोन्ही मिळून त्याला तापत रहायचे. त्याच्या सोबत काम करणारी पोरं म्हणायची त्याला, "आरं जरा बस सावलीला? किती येळ झाला तसाच काम करतोयस". पण त्याला कसलीच पर्वा नव्हती. हे काम लागल्यापासून पहिल्यांदा त्याला आपल्या रंगाची, आपल्या ठेवलेल्या नावची लाज वाटेनाशी झाली होती. जणू इथेच काम करायलाच तो जन्माला होता. त्या रंगात एकरूप झाला होता. जसा जसा रस्ता पूर्ण व्हायचा, त्या एकसारख्या झालेल्या रस्त्यावर पांढरे पट्टे उठायचे. मग तो अजूनच खुलून दिसायचा. डांबऱ्या त्या तुकतुकीत रस्त्याकडे बघत रहायचा. आपल्या कष्टाचं फळ त्याला डोळ्यासमोर दिसायचं. एक तुकडा पूर्ण झाला की दुसरा. त्याला मग ध्यासच लागायचा रस्ता पूर्ण करायचा.

आजचं काम पूर्ण करून तो त्यामानानं लवकर घरी निघाला. जरा खुशही होता. आज बऱ्याच दिवसांनी बायको घरी येणार होती. रस्त्याने येताना त्याने स्वत:ला न्याहाळले. आपल्या मळलेल्या कपड्यांना लागलेले डांबराचे डाग आज पहिल्यांदा त्याला जाणवले होते. पायातल्या त्या रबरी चपला, कधीच काळ्या झाल्या होत्या. ठिकठिकाणी त्या स्लीपरला उंचवटे झाले होते सुकलेल्या डांबराचे. त्याने ते एका जागी बसून काढण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. उगाच उशीर नको म्हणून पुन्हा चालायला लागला. बायकोने आपल्याला अशा अवतारात बघायची त्याची मुळीच इच्छा नव्हती. पण पर्याय नव्हता. ती दुपारच्याच गाडीने घरी येणार होती. तो आला तसा पोराकडे धावला. चार महिन्याचं बाळ आणि दोन दिवसाचं यातला फरक बघून दचकलाच. पण पोरगं तब्येतीने सुधारलं होतं आणि रंगंही बराच उजळला होता.

बाळाला घेऊन बायको खाटेवर बसलेली होती. त्याने घाईघाईने हात धुतले आणि खाटेवर बसून पहिला बाळाला हातात घेतला. बाळाला कसं धरावं, कसं बोलावं याची काहीच कल्पना नव्हती त्याला. आणि त्यात हातात घेतल्यावर त्याला जाणवलं की आपले हात किती रुक्ष झालेत. त्या बाळाच्या मऊ कातडीला जणू काट्यासारखे टोचलेच ते. पोर जरा घाबरलाही असा एकदम वेगळा माणूस समोर बघून. त्यात याचा अवतार हा असा. आपल्याकडे बघून रडतंय म्हटल्यावर त्याला क्षणभर वेगळीच भीती मनात आली. आयुष्यभर जगाने पाठ फिरवली तशी आपल्याच पोराने फिरवली तर? आज फक्त आपला चेहरा बघून ते इतकं घाबरलं, रडायला लागलं. आपण त्याला कधी आवडलोच नाही तर? त्याला काही सुचेना, त्याने बाळाला परत आईकडे दिला आणि आत खोलीत निघून गेला. पाठोपाठ बायकोही गेलीच.

म्हणाली, "काय झालं वो?"

आता आपल्या मनातले भाव तिने ओळखलेत म्हटल्यावर त्याला विषय टाळता येईना. "काय नाय. ते बाळ माझ्याकडे बघून रडाया लागलं. "

"अवो, नवीन मानूस बघून रडतंय ते. आणि सगळंच नवीन नवीन हाय ना त्याला. जरा दोन दिस द्या. सवय होत्ये मग." तिने त्याला समजावलं. म्हणाली, "चला आवरून घ्या. आंगोळ घालतो मीच तुमाला आज." त्याने मान हलवली.

तिने दोन बादल्या पाणी गरम केलं. मोरीत त्याला कपडे काढून बसाय लावलं. त्याच्या काळवटलेल्या अंगाकडे बघून तिला वाईट वाटलं. त्याने स्वत:कडे असं दुर्लक्ष करावं याचा रागही आला. कितीही जगाने त्याला 'डांबऱ्या' म्हटलं तरी तिच्यासाठी तो तिचा नवरा होता. पण काय करणार इतक्या वर्षात त्याला सवयच पडली होती असं स्वत:कडे दुर्लक्ष करायची. तिने त्याला अंगाला साबण लावून दिला, राठ झालेल्या हात पायांना चोळला. दगडाने पाठीला घासून दिलं. साबणाने केस चोळून धुतले. त्याच्या अंगाचा डांबराचा वास जमेल तितका काढून दिला. पाट्या उचलून टणक झालेल्या त्याच्या दंडाकडे पाहून त्याचा अभिमानही वाटला. कपडे बदलून तो आवरून बाहेर आला.

थोड्या वेळाने बायकोने झोपेला आलेल्या बाळाला त्याच्या हातात दिलं. हलकेच त्याला कसं मांडीवर घेऊन थोपटायचं हे दाखवलं. मग त्याने बाळाला मांडीवर घेतलं. एक मांडी हलवत उजव्या हाताने थोपटत त्याने बाळाला झोपवलं. त्याला असं झोपलेला पाहून तो सुखावला. मघाचा किस्सा विसरून गेला. बायकोने दिलेलं जेवण मग त्याने तिथेच पोराला मांडीवर घेऊन खाल्लं. शेवटी तिनेच त्याला उठायला लावून बाळाला खाली झोपवलं. तोही मग त्याच्याजवळ पडून त्याच्याकडे बघत बसला. आपलं पोरगं आपल्यावर गेलं नाही याचा आनंद होता त्याच्या डोळ्यात. सगळं आवरून बायकोही बाळाच्या पलीकडे येऊन पहुडली. दोघेही मग बाळाकडे बघत बसले.

तिने बाळाच्या पलीकडून आपला हात त्याच्या दंडावर टाकला. म्हणाली,"कशाला काम करताय इतकं? जरा तब्येतीकड बघायचं ना?". तो नुसताच हसला. पण तिच्या डोळ्यात पाणी आलेलं. त्याने ते हळूच पुसलं. बाळाच्या वरून तो तिच्यामागे येऊन पडला. तिला आपल्याकडे वळवलं, म्हणाला, "इतकी कातडीची काळजी नका करू माज्या. मी हाय तोच हाय. बाकी पोरगं मात्र तुम्ही झ्याकच दिलं आमाला. " ती हसली. त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. शप्पत सांगते, तिच्या ओठाला त्याच्या कातडीचा रंग कणभरही लागला नव्हता. असलाच तर त्याच्या प्रेमाचा थोडासा जरुर लागला होता.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

मस्त!

खुप छान Happy

अगदी एका मित्राची कथा वाटली....त्याला मुलगी झाली, तेव्हा त्याने आवर्जून सन्गीतले, "..आज्जिबात माझ्या रण्गावर नाही गेली...छान गोरी गोरी आहे" ब्रिटीश भारत सोडून गेले तरी, गोर्या वर्णाची हूकूमत गेली नाही अजून भारतामधून Sad

प्रतिसादात आपण सहज साधी म्हणून जातो पण असे लिहिणे कमालीचे अवघड. त्यासाठी हातात सरस्वतीच हवी. थोडासा चटका लावणारा शेवट होणार असे वाटलेले खरे.. तसे न झाल्याने जास्त आवडली Happy

ऋन्मेऽऽष , राधिका
धन्य्वाद. Happy .
ऋन्मेऽऽष मला खरच यापेक्शा वेगळ लिहिता येत नाही. खूप वेगळे शब्द वापरता येत नाहीत याच खरच वाईट वाटत. लिहिलेले असेल तर कितिही अवघड शब्द कळतात, कविता कळतात. पण लिहीता येत नाही. Sad असो. आता काही करु शकत नाही. सर्वाना लिहिलेले आव्डले यातच आनन्द आहे.

विद्या.

सुंदर!
तुमच्या कथा वाचताना कधीच टेन्शन नसतं की पुढे काहीतरी विपरीत होणार आहे... हॕप्पी एंडिंग ठरलेली असते.

Pages