'अंजनेरी'च्या वाटेवर..!

Submitted by Yo.Rocks on 25 May, 2016 - 14:04

पाऊस पडेल या आशेवर संपूर्ण पावसाळा कोरडा गेला..पाण्याच्या दृष्टीने व ट्रेकच्या दृष्टीनेही..! गणपतीत कोकणात गेलो तिथेच भरतगड, विजयदुर्ग पाहिले तीच भटकंती..आता दिवाळी होऊन नोव्हेंबर चा महिना उजाडलेला.. अर्थात आम्हा लोकांची ट्रेक व्याकुळता तीव्र झालेली.. अश्यातच मग अंजनेरी ट्रेक ने भटकंतीला पुन्हा सुरवात करण्याचे ठरले.. ! नाशकात ट्रेकला जायचं म्हटलं की उत्साह जरा जास्तच असतो.. कारण एकट्या नाशिकमध्ये गडकिल्यांची लिस्ट मोठी तेव्हा एकेक गडकिल्ला पार केला कि तेवढंच लिस्ट कमी झाल्याचं समाधान.. गिरीने आपली सिटी होंडा तयार ठेवली.. इंद्रा, रोमा व मी तयारच होतो.. शेवटची शिल्लक जागा माझा चुलत भावाला बोलावून भरून टाकली..याचा पहिलाच ट्रेक ठरणार होता..!

नाशिक मध्ये ट्रेकला जाण असलं कि कसारा घाटच्या आधी लागणाऱ्या 'बाब दि धाबा' मध्ये थांबल्याशिवाय पुढे जायचं नाही हे आमचं समीकरण पक्क ठरलेलं.. दालफ्राय रोटी हा मेनू पण ठरलेलाच.. हाही एक नाशकात ट्रेक करतानाचा आमचा एक अलिखित नियमच..

रात्रीच्या अंधारात अंजनेरीचा फाटा ओळखण्यास त्रास झाला खरा पण पोचलो एकदाचे.. पायथ्याशी असणाऱ्या मंदिराजवळ थांबलो.. उजाडण्यास दीडेक तास शिल्लक होता तेव्हा झोप अटळ होती. रोमा व मी मंदिराच्या बाजूलाच असणाऱ्या स्वयंपाक सामग्री ठेवण्याच्या खोलीत ऐसपैस जागा बघून ताणून दिले तर बाकी मंडळी गाडीतच..

पहाटेची चाहूल झाली नि आम्ही गाडी पुढे नेण्याचे ठरवले पण पुढचा गावठण चढाईचा रस्ता शहरी होंड्याला प्रतिकूल असल्याने वेळीच थांबलो.. नि चालायला घेतले..पाचेक मिनिटांच चढण पार करून आम्ही मोकळ्या रस्त्यावर आलो.. उजव्या बाजूला पहाडी डोंगररांग तर डाव्या बाजूला आकाशात नुकतंच तांबडं फुटलेल.. थंडगार हवेची झुळूक ये जा करत होती.. पक्ष्यांचा मुक्त विहार सुरु झालेला..

काही अंतरावर 'औषधी वनस्पती संवर्धन क्षेत्र- अंजनेरी' नावाचा फलक असलेली कमान लागली व पुढे काही अंतरावरच जिथून पायऱ्या सुरु होतात तिथवर येऊन पोहोचलो.. या परिसरात वनाधिकारांची बंद असलेली चौकी दिसली जिथे परिसरात फिरण्यासाठीचे भाडं लिहिलेला जुनाट फलक दिसला.. आता तर कुणीच जवळपास नव्हतं नि हे ठाऊकही नव्हतं तेव्हा जास्त विचार न करता पायऱ्या चढायल्या घेतल्या..


(ह्या फलकावर दिलेल्या माहितीवरुन खरच ती वनस्पती दिसेल का प्रश्ण पडलाच..)

- - -


(हम पाँच)

सुर्याच्या कोवळ्या पिवळ्या किरणांनी परिसर उजाळून गेला होता.. सुरवातीच्या पायऱ्या संपल्या कि थोडं चढण नि मग वाट कातळकड्याला भिडते.. पण वरती जाण्यासाठी मार्ग मागच्या बाजूने असल्याने पुढे वाट कातळकड्याला चिकटून वळसा घालत जाते.. डाव्या बाजूला दरी असल्याने वाटेला रेलिंगचा कोट चढवलेला आहे.. वळसा घालून मोठ्या घळीत आलो नि कोरलेल्या भल्या मोठ्या पायऱ्या नजरेस पडल्या.. पायऱ्या चढायचं म्हणजे लै कंटाळवाणं काम.. इथेच डाव्या बाजूला कातळात खोदलेल्या बौद्ध लेणीच्या दोन छोट्या गुहा आहेत..

- - -

- - -

एकदाचे पायऱ्या चढून गेलो नि पठारावर आलो.. वाटलं होत ट्रेक इथेच संपेल ..पण या विस्तीर्ण पठाराच्या एका टोकाला अजून एक छोटा डोंगर दिसला.. तिथून घंटानाद ऐकू येत होता.. स्थान कळत नव्हते पण दिशा समजली होती..

पिवळ्या पडलेल्या सोनसळी गवतामधून जाणारी वाट पठारावर असणाऱ्या मंदिराजवळ सोडते.. हे अंजनीमातेचे मंदिर.. आता पुढे आणखीन एक चढ पार करायचा असल्याने इथेच थोडी पेटपूजा सुरु केली.. मंदिरासमोरच टपरी आहे पण चहा उपलब्ध नव्हता तेव्हा वरती जाऊनच मॅगी वगैरे बनवू म्हणत क्षणभर विश्रांती घेऊन निघालो.. वारा असल्यामुळे उनाचा तडका तेवढा जाणवत नव्हता..


( पायर्‍या चढून आल्यावर दिसणारा डोंगर नि पायथ्याला अंजनीमातेचे मंदीर.. अजुन हा डोंगर चढणे बाकी.. )

आता पुढच्या वाटेतदेखील सुरवातीला पायऱ्या.. पण दोन्ही बाजूला गर्द झाडी.. डाव्या बाजूस बऱ्यापैंकी मोठं तळ लागते.. जंगलाने वेढलेले नि एका कडयापाशी असणारे हे तळ जलविहार करण्यासाठी तरी मस्त वाटत होते.... इथेच बाजूला कुठे तरी पिण्याचा पाण्याचा झरा आहे हे नंतर नेटवर धुंडाळताना कळलेे..

- - -

थोडं वरती चढून गेलो कि एक वाट डावीकडे सितागुंफेकडे जाते.. पण आम्ही पहीलं माथ्यावर जाऊ म्हणून पुढे गेलो.. आता दोन्ही बाजूस कारवीची झुडुपं सुरु झाली.. सात -आठ वर्षांनी फुलणारी कारवीच यंदा बहरण्याच वर्ष होत.. पण फारसा पाऊस न झाल्याने व ऋतूही टळून गेल्याने इथे बऱ्याच कारवीच्या कळ्यांची बोण्ड करपून गेलेली.. तरीही एखाद दुसर जांभळ्या गर्द रंगाचं फुललेलं फुल लक्ष वेधून घेत होत..

- - -

आता चढाईचा शेवटचा टप्पा..कातळकड्याजवळ येऊन पोहोचलेलो.. इथे पण एक वाट डावीकडे गुहेकडे जाते.. तिथे कातळावर अंजनीमाता गुंफा हनुमानाचं जन्मस्थान गुंफा अस काहीतरी गिरपटवल होत.. म्हटलं बघू नंतर जाऊन म्हणून आम्ही वरती सरकलो.. हा टप्पा चढेपर्यंत दमछाक झाली.. मागे वळून पाहिलं तर खाली अंजनीदेवीच्या मंदिराजवळ आता बरीच गर्दी चालून येताना दिसली..

डोंगर चढून गेल्यावर लगेच समोर मंदिर येइल अस वाटलं होत खरं पण तसं काही नव्हतं.. माथ्याचा परिसर अगदी लांबच्या लांब पसरलेला.. विस्तीर्ण अश्या माथ्यावर पुन्हा एक ठळक पाऊलवाट मंदिराच्या दिशेने घेऊन जाते.. या माथ्यावरसुद्धा काही रानफुलं अजूनही तग धरून होती.. पक्षीही नजरेस पडत होते.. एकंदर पावसात हा माथ्यावरचा परिसर नक्कीच स्वर्ग भासत असणार..

- - -

अखेरीस मंदिराचं दर्शन झालं.. विस्तीर्ण माथ्याच्या एका टोकाला असलेले हे मंदिर छानच..हनुमानाचं जन्मस्थान म्हणतात.. ( अस तर भारतात अजून दोन- तीन ठिकाणं हनुमानाचं जन्मस्थान म्हणून ओळखली जातात तो भाग वेगळा) असो पण हे ठिकाण अगदी अंजनीच्या सुता या नावाला साजेसं..जिथे वाऱ्याला थारा नाही अश्या या उंच ठिकाणी..

आमची आता भूक चाळवलेली.. तेव्हा मंदिराच्या बाजूलाच एक टपरी होती तिकडे मोर्चा वळवला.. टपरी मालकाची परवानगी घेऊन इंद्राने चुलीवर मॅगीचा टोप पण ठेवला.. मग एक कप चाय व मॅगी.. एंजॉय...
आमच खाणं आटपेपर्यँत बऱ्यांपैकी वर्दळ सुरु झालेली.. एकाने येऊन 'मॅगी मिळेल का' विचारलेलं.. टपरी मालक नाही म्हणणार तोच आम्ही दुजोरा दिला व आमच्याकडच शिल्लक पाकीट त्याच्या हातात टेकवलं.. टपरी मालकाला मॅगी विक्री पुन्हा सुरु झालीय हे माहीतच नव्हतं..

टपरी मालकासोबत टि-सेल्फी..!

त्या गर्दीपैंकी आसपासच्या गावातून आलेल्या एका कुटुंबाने देवाला वाहण्यासाठी नारळाची अख्खी गोणी उचलून आणलेली.. त्यामुळे आम्हाला नारळाचं मस्त आयत खोबर खायला मिळालं.. इथे काही श्रद्धेपोटी म्हणून आलेले तर काही पर्यटक म्हणून.. तर काही आमच्यासारखे भटकंती वेडे.. ! पुन्हा एकदा बजरंगबलीला नमन करून उतरायला घेतले..

उतरताना पहिलं त्या गुहेकडे जाण्याचं ठरलं.. पण जाऊन पाहिलं तर त्या गुहेचा कब्जा कुठल्या तरी पंकजदासबाबान घेतलेला.. त्याच पोस्टर बाहेर लटकत होत त्यावरून भलताच तरुण दिसत होता.. त्या पोस्टरवर पण अंजनीमातेची गुंफा व हनुमान जन्मस्थान अस म्हटलं होत.. हो म्ह्णायचं..! आम्ही गेलो त्यावेळी त्या गुहेत कोणी नव्हत.. एका बाजूला भांडीकुंडी होती तर एकीकडे शेंदूर लावलेली एक शीला दिसली नि समोर दानपेटी !!!

असो पुन्हा मूळ वाटेला येऊन उतरायला घेतले.. काही अंतरावर अगदी वाटेतच मोठी वानरसेना आड आली.. त्यांच्यापुढे आमचा पाचजणांचा गट खूपच फिका होता.. सुदैवाने कसलेही चाळे न करता ती सेना अगदी बाजूने गेली.. आम्ही आता सितागुंफेकडे जाणारी वाट पकडली.. या गुहेजवळच बऱ्यापैंकी मोठा आश्रम बांधलाय.. ह्या गुंफेमागे कथा अशी कि सीता अंजनीमातेला भेटण्यास आल्या होत्या तेव्हा या गुंफेत राहिलेल्या..! हो म्हणायचं..! या गुंफेच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूस शिल्प कोरलेली आहेत.. आत अंधारात प्रवेश केला कि आतल्या आत अशा दोन खोल्या आहेत..एका प्रज्वलित दिपाच्या मंद प्रकाशात उजाळलेल्या त्या शेंदूरमय देवतांच्या प्रतिमा गुढमय भासत होत्या..!

- - -

आश्रमाजवळ पिण्याच्या पाण्याची सोय आहे.. तेव्हा जीव थंड करून आम्ही पुन्हा उतरायला घेतले. शेवटची पायरी उतरताना एक हेल्थी गुजराती कुटुंब भर दुपारचे चढायला घेत होते.. 'बहोत लंबा है क्या' अस विचारल्यावर रोमाने ' ज्यादा नही.. एक घंटा लगेगा' अस काहीतरी बोलला नि आम्ही बघतच बसलो.. जल्ला स्वतःचा स्पीड सांगत होता की त्यांना प्रोत्साहन देत होता कळले नाही.. एव्हाना उष्मां वाढलेला नि आम्ही खाली उतरेपर्यंत घशाला कोरड पडलेली..आणि ही मोठ्या शरीरयष्टीची लोक आता चढत होती.. एकवेळ गावातले असते तर ठीक पण हे शहरीबाबू आश्रमापर्यंत तरी जातील का जातील अशी शंका वाटून गेली.. त्यांची अर्धी फॅमिली मात्र शहाण्यासारखी झाडाखाली मस्त खादाडी करत पसरले होते.. आम्ही तिथेच बसलेल्या ताईकडून लिंबू सरबत घेतले.. नि कल्टी डॉट कॉम...

अगदी ठरल्याप्रमाणे वेळेत मस्त ट्रेक झाला. अंजनेरी डोंगराचा घेरा किती अवाढव्य आहे हेही समजून गेले.. बरेच दिवस सहज साधा सुंदर असणारा हा ट्रेक करायचा राहुन गेला होता... खर तर ऑगस्ट -सप्टेंबर महिना उत्तम काळ या परिसरात येण्यासाठी.. पण म्हणतात ना.. ऋतू कुठलाही असो.. आवड असेल तर भटकंती नेहमी सुखावूनच जाते.. प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गाचे रुपडे लोभसच वाटते... आज असेच अंजनेरीच्या भेटीने सुखावलेलो.. थंडीच्या आगमनासाठी आतुरलेलो.. पुन्हा नव्या गडवाटेला जाण्यास आसुसलेलो....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यो कोणत्या महिन्यात गेला होता? फोटो मस्त आहेत.

सेरोपेजीआ बघायला मिळाले का ? सेरोपेजीआच्या अनेक प्रजाती महाराष्ट्रात सापडतात. बहुतेक सगळ्या दुर्मिळ गटातच मोडतात. फुल दिसायला फारसे आकर्षक नसते पण त्याचे परागीभवनाचे तंत्र खूप मस्त आहे. कमळ भुंग्याला रात्रभर अडकवून ठेवते असं ऐकलय - खरे खोटे माहीत नाही. सेरोपेजीआ मात्र नक्की अडकवते आत शिरणार्‍या किड्याला - आत असणार्‍या चिकट तंतुंमुळे. किडा इकडे तिकडे फिरत राहतो पण उडू शकत नाही. मग काही तासाने त्यांचा चिकटपणा कमी होतो आणि अंगभर परागकण लेऊन तो किडा बाहेर पडतो.

धन्यवाद !
हिम्या Lol
माधव.. नोव्हेंबर महिन्यात गेलो होतो.. त्या वनस्पती बद्दल माहितच नव्हते वा कधी पाहिले नव्हते.. तो फलक वाचला तेव्हा कळले..त्यामुळे त्या वनस्पतीचा शोध घेणं झालं नाही.. बाकी छान माहिती दिलीत.. कधी जाण झालं तर पहायला हवं

खूप छान वर्णन .फोटोही मस्त !

ह्या ट्रेकची डिफिकल्टी लेवल काय आहे? बहुतेक फोटोंमधे पायर्‍या आणि रेलिंग्स दिसतात्,त्यावरुन सोपा असावा असं वाटतयं.

धन्यवाद _/\_ Happy
निरा... आभारी आहे त्या वनस्पतीचा फोटो दिल्याबद्दल
विनी.. कठीण असा नाहीये.. फक्त सकाळीच चढायला घेतले तर उत्तम...

यो - तुझी लेखन ईष्टाईल एकदम भारी .... खुसखुशीत तरीही माहितीपूर्ण .... Happy

सेरोपेजीआला "पुष्पकंदील" असे नाव असल्याचे आठवते - बहुतेल डॉ. संदीप श्रोत्रींच्या कास पठार पुस्तकात ...