चौल्हेर पिंपळा - सह्यमेळावा..!

Submitted by Yo.Rocks on 22 May, 2016 - 13:43

मुंबई पुण्यातून एकेक बस भरून नाशिकच्या दिशेने सुटलेली.. नेहमीप्रमाणे प्रदीर्घ चर्चा झाडून, तारखा पाडून एकदाचा योग जुळून आला होता.. निमित्त सह्यमेळावा.. हेतू एकच.. नेहमी फक्त मोबाईल, इंटरनेट माध्यमातून होणाऱ्या भटकंती गप्पा प्रत्यक्षात भेटून मारायच्या..एकत्रीत ट्रेक करून आनंद लुटायचा.. पाऊस हवा म्हणून जुलै महिन्यात ठरवलेला यंदाचा हा तिसरा मेळावा.. ! आमचे सीएम उर्फ सह्यद्रीमित्र ओंकार ओक ने सुचवलेले ठिकाण सगळ्यांनी अगदी संसद भवनात शोभतील असे मुद्दाम आढेवेढे घेऊन मगच डनडनाडन केले.. आणि हतबल झालेल्या सीएम ने शेवटी मनातून शिव्या घालत 'चौल्हेर- पिंपळा' या आडवाटेवरील गडांवर शिक्कामोर्तब केले !

पुणेकर नेहमीप्रमाणे काटेकोरपणे वेळा पाळत निघालेले..तर मुंबईकर बसच उशिरा आल्यामुळे उशिराने निघालेले.. त्यात गिरी सारखा नवाबी मुकादम ग्रुपमध्ये त्यामुळे आणखीन भर.. बरं कितीही उशीर झाला तरी कसारा घाटाला हात घालण्याअगोदर 'बाबा दि धाबा' मध्ये दालफ्राय-रोटी खाऊनच पुढे जाणार..! पहाटे ४ च्या सुमारास नाशकात पोचलेलो.. इथे शेवटचा नि महत्वाचा पीक आप होता तो म्हणजे हेम उर्फ हेमंत पोखरणकर.. तो कितीही महत्वाचा असला तरी त्याने लादी पाव नि मांडेच ( पुरणपोळीसारखाच गोड पदार्थ) गाठोडं आणण आम्हाला जास्त महत्वाचं होत.. Wink यंदा रविवार चा एक टाइमचा नाश्ता(मिसळपाव) आम्हीच करणार होतो.. त्यासाठी आमच्यातच एक खास नाश्ता मंडळ नेमल होत.. ! मागच्या मेळाव्यास सामील झालेला दुसरा नाशिककर राहुल सोनवणे फक्त आमची गाठभेट घ्यायला आला..

आता चांगलं उजाडेपर्यंत आमच्या गाड्या तिळवण गावात पोहोचलेल्या.. शाळेच्या परिसरात थांबलेलो.. यावेळी आमच्या ग्रुप मध्ये विशेष उपस्थिती म्हणून आलेले ज्युनियर भटके बरेच होते.. त्यांची धाव साहजिकच घसरगुंडी कडे.. आमच्यातले मात्र ससे पकडायला कुठे जंगल दिसतय का म्हणून शोधात... पण सोय नव्हती.. ! नव्याने सामील झालेल्यांसाठी ओळखपरेड झाली आणि पोहे-चहापानाचा फक्कड कार्यक्रम पार पडला.. ससे काय नंतर डोंगर चढताना पकडू म्हणत सगळ्यांनी पोह्यांचा यथेच्छ आस्वाद घेतला..सिएमने इतकी भारी सोय करून ठेवली कि पुढच्यावेळी ससे पकडण्याच्या जागेची पण सोय करावी अस मनात येऊन गेले.. Wink गावकऱ्यानी दिलेला पाहुणचार बघून ओशाळाल्यासारखच झालं.. बर एवढं करूनही मानधन नकोच म्हणत होते.. बाहेरचे पाहुणे गावात आले याचाच त्यांना आनंद जास्त झालेला..!

आम्ही त्या शाळेचा निरोप घेऊन आता चौल्हेर च्या अगदी पायथ्याच्या गावात - चौल्हेरवाडीत आलो.. इथून आम्हाला या प्रदेशातले दुर्गवीर प्रतिष्ठान चे एक- दोन कार्यकर्ते आज दिवसभर आमच्यासोबत माहितीसाठी फिरणार होते.. ट्रेकला सुरवात करण्यापूर्वी हिम्याने त्याची पोतडी उघडली नि ठरल्याप्रमाणे गोल टोपी चे वाटप झाले. ! मागच्यावेळी टिशर्ट छापले होते तर यावेळी गोल टोपी ठरवली होती.. माफक दरात हवी तशी टोपी उपलब्ध केल्याबद्दल हिम्याचे कौतुकच.. फोटोस्कार पार पाडून जथ्था डोंगराकडे निघाला..

जुलै महिन्यातला पहिला आठवडा पण आकाश बघून पाऊस जवळपासदेखील वाटत नव्हता.. फक्त मळभ दाटून आलेलं.. त्यामुळे बरचसं सामान न घेताच मोकळी पाठ घेऊनच चढायला घेतले... चौल्हेर दिसायला अवाढव्य भासत असला तरी चढाई अवघड नाही.. साहजिकच बच्चेकंपनी त्यांच्या बाबालोकांना न जुमानता पुढे पुढे धावत होती.. चढताना उजवीकडे दिरभावजय नावाचा एक डोंगर त्याच्या माथ्याच्या विशिष्ट रचनेमुळे लक्ष वेधून घेत होता..

- - -

चढ अगदी सरळ नव्हती.. अगदी आढेवेढे घेत चढत जाणारी वाट होती.. उन्हाचा तडाखा नसल्यामुळे लवकरच प्रवेशद्वार गाठले.. कातळकड्याला धरूनच बांधलेली तटबंदी व त्यातून केलेला भुयारी दरवाजा...हे बांधकाम बघूनच मन खुश झालं.. त्या दरवाज्यातून वरती आलो की शिवलिंग व नंदीचे अवशेष उघड्यावर दिसतात.. तटबंदीवरुन पाहिलं कि बाजूच्याच कातळात खोदलेल पाण्याचं आयताकृती लांबड टाक दिसलं.. इथे जाण्याचा कुठलाच मार्ग नव्हता.. बहुदा काळाच्या ओघात कोसळला असावा..

डावीकडच्या माचीकडे नंतर जाऊ म्हणत वरती सरकलो नि कातळकड्याला लागून वाट सुरु होते..इथेच कातळात थोडं वरच्या बाजूस खोदलेले मोती टाके नावाचं पाण्याच मोठं टाक लागले.. पाणी अगदी थंड व चवीला मधुर.. अप्रतिम जागा आणि कातळात खोदल्यामुळे टाक उघडयावर नाही.. माझ्यासाठी हे टाक आतापर्यंत पाहिलेल्या अप्रतिम टाक्यांपैंकी एक... या टाकलाच लागून असलेल्या खोबणीत आमचा जमेल तितका जथ्था बसला नि खादाडीचा ब्रेक सुरु झाला.. खाताना लहान कोण मोठं कोण कळतच नव्हते.. सगळेच तुटून पडलेले..

बच्चे कंपनी जोशमे..

- - -


- -

पावसाळा अजुन हवा तसा सुरु झाला नसतानाही पाण्यान भरलेल मोती टाक

या टाक्याच्या बाजूलाच खेकडा टाकं, शेवाळ टाकं, हत्यारा टाकी अशी चित्रविचित्र नावाची टाकं दिसतात.. तशी ही सगळीच टाकं जवळपास कोरडी . ! या वाटेने चालताना मागे दिसणाऱ्या डोंगररांगेचा पसारा मोहक वाटतो..

पुढे टोकाला वळण घेत पायऱ्या चढत माथ्यावर आलो कि वाड्याचे पडीक अवशेष दिसतात..

- -

पुढे टाक्यांचा समूह.. उंच असणाऱ्या भागावर पोहोचलो कि फक्त भवताल नि भवताल पाहायचं..जो तो हा कुठला किल्ला तो कुठला गड असा अंदाज बांधू लागला.. एकीकडे सातमाळा रांग तर एकीकडे सेलबारी डोलबारी रांग .. अजून काय हवं.. यातले बहुतांशी किल्ले आपले झालेत म्हणून जास्त आंनद झाला.. थोडं पाऊस पडून गेल्यावर इथून काय नजारा दिसत असेल हाच विचार सारखा मनात घोळत राहिला.. सिएम ने मोठ्या थाटात धडाधड सर्व किल्ल्यांची नाव सांगून सगळ्यांची उजळणी घेतली.. इथेच मग दुर्गवीरांनी आणलेलं भगवं निशाण फडकावल गेलं.. ग्रुप फोटो झाला..नि अर्थात उडी सोहळा पण.. लोकेशन अफलातून असलं कि उड्या पण अफलातूनच..

- -

- - -


(वरील उडी फोटो नव्याने सहभागी झालेल्या राजेश जाधव कडून)

आम्ही उतराताना आता मोर्चा बाजूच्या माचीवर वळवला.. पहिल्या पावसात धरतीला फुटलेल्या हिरव्या कोंब्यामुळे ही माची डोळ्याला अगदी सुखद वाटत होती..आणि अश्या हिरव्यागार कुरणावर शेळ्या मेंढयांचा कळप चरताना दिसलं कि मन अगदी ताजतवानं बनत.. या माचीवरून चौल्हेरचा माथा नि फडकणारा भगवा अगदी खासच वाटत होता.. गडकिल्याच अस्तित्व दाखवत होता.. या माचीवर देखील एक कोरड टाक आहे नि काही उध्वस्त तटबंदी.. इथून शेजारील डोंगररांग अगदी निवांत हातपाय पसरून बसलेली.. आणि आकाशात धावणारे ढग आपल्या सावलींचे छापे या रांगेवर उमटवत पुढे सरकत होते हे दृश्य पाहण्यातच वेळ गेला..

- - -

- - -

या गडाबद्दल सिएम सायबांना दुर्गवीरांमार्फत चर्चासत्र घडवून आणायचे होते.. त्यासाठी आधी माची मग बदलून भुयारी दरवाजा अशी बदलाबदल सुरु झाली पण यंदा जथ्था मोठा असल्यामुळे कल्लोळ झाला.. भुयारी दरवाज्याची जागा देखील अपुरी पडली नि शेवटी हेही नाही तेही नाही करत उतरायला घेतले.. Lol उतरताना उन्हामुळे काहली झाली.. पाउस काही पडला नाहीच..

उन आता वाढलेल.. आता लक्ष्य दुपारचं भोजन @ आमंत्रण खानावळ, सटाणा ! इथे आम्ही जेवणाची तोंडभरून स्तुती जितकी केली त्याच्या दुप्पट जास्त जेवलो..

विनय भीडे व आशुचँप मुलांबरोबर जेवणात मग्न..

पोट जड झाल कि डोळे जड होणं ओघाने आलंच.. पण पुढे कुठे जातोय हे फक्त सिएम व त्या दुर्गवीरांना माहीत.. खरं तर मधल्या प्रवासात इथला जवळपासचा आणखी एक किल्ला करण्याचा सीएमचा संकल्प होता खरा पण सगळ्यांची जड पोटं बघून गुपचून गुंडाळून ठेवला..

डोळ्यावर झापड येतेय तोच आमच्या बसेस एका मंदिरासमोर येऊन थांबल्या.. स्थळ देवळाणा गाव ! गावच्या एका टोकाला मोकळ्या परिसरात असलेलं हे मंदिर खूप प्राचीन, हेमाडपंथी व सुंदररित्या जपलेल.. बाहेरच्या बाजुने असणार्‍या प्रणय-मुद्रा अवस्थेतील असणार्‍या शिल्पपट्टीका, प्रवेश केल्यावर छतावर असणारे कॄष्णशिल्प, खांब अस बरच काही कुतूहलं सामावून घेतलेलं.. याचा उलगडा करता यावा म्हणून दुर्गवीरांनी जवळच्याच गावातील एक अभ्यासकला बोलावले.. त्यांनी बरीच माहिती दिली..

इथेच मग दुर्गवीरांनी आपल्या कार्याची श्रमदानाची माहिती करून दिली.. आमच्या ग्रुपची ओळख व त्यांच्या कार्याची ओळख हे सारं पडत असताना आमच्यातल्या एकाने दुपारच भारी जेवल्याने वाजवलेला 'नगारा' भलताच हसवून गेला...दुर्गवीरांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून आम्ही त्यांना छोटी मदत सुपूर्त केली.. हे सगळं होईपर्यंत मंदिराच्या आवारातच बच्चाकंपनीने फुटबॉलचा खेळ मांडला.. अगदी खुशाल चेंडू झाले होते..! वीरांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो..

काळोख पडला पण आमचा प्रवास संपत नव्हता.. आणि गप्पपणे बसमधून प्रवास करणं कधी जमलं नाही तेव्हा विन्याच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी घसे साफ करून घेतले.. गाण्यांच्या गरदोळात सावरपाडा गाव कधी आले ते कळलं नाही.. सावरपाडा हे पिंपळाच्या पायथ्यालगतच गाव.. मंदिर शाळा एकाच कुंपणामध्ये.. मस्त मोकळा परिसर.. आता मुक्कामाची वेळ तेव्हा सगळे निवांत.. सिएम ने गावकऱ्यांशी आधीच संपर्क केल्याने व्हेज- नॉन व्हेज अशी जेवणापाण्याची उत्तम सोय झालेली.. शिवाय हेम ने आणलेले मांडे तोंडाला गोड म्हणून..

गप्पाष्टकांचा कार्यक्रम आता शिल्लक राहिलेला.. शाळेच्याच एका वर्गात लहागयांना झोपवताना आता बाबालोकही झोपलेले.. तर बाकी मंदिरात बसलेले.. भरगच्चं जेवण नि आदल्या रात्रीच प्रवासातलं जागरण सो अपेक्षेप्रमाणे गप्पा न रंगताच एकेकाची विकेट पडत गेली..

सकाळची झुंजूमुंज झाली नि नाश्ता मंडळ कामाला लागलं.. बाकी इथेही ससे पकडण्याची बोंब होती तो विषय वेगळा.. फर्मास मिसळ व चहा आटपून आम्ही आता पिंपळाच्या दिशेने कूच केले.. ओंक्याने या गडाची श्रेणी सोप्पी प्रकारात ठेवली होती..पण दूरवर जेव्हा नेढं दिसलं तेव्हा समजून गेलो प्रकरण गंभीर आहे..

आमच्या ग्रुप मधल्या हेवी वेट चॅम्पियन्स लोकांना एकंदर भारी जाणार हे समजून गेलो होतो.. या गडाची फारशी माहिती कुठे उपलब्ध नाही तेव्हा या गडाबद्दल खूप उत्सुकता होतीच.. एकूण तीन चार टप्पे चढून जावे कि मग पोहोचलो अशी वाट होती..आजचा दिवसही कोरडाच होता.. साधी चाल झाली कि पुढील वाट जंगलातून जाते.. इथेच एक आंबट गोड असलेला कोशिंब नावाचा मस्त रानमेवा चाखायला मिळाला..

गावकऱ्यामागोमाग आमचे नवीनशेठ देखील झाडावर चढले नि समद्या ग्रुपला पुरतील इतकी फळं उपलब्ध करून दिली.. जंगलातले चढ संपेपर्यंत काहींचा दम संपत चाललेला.. शापित गंधर्व उर्फ धीरज नि संदीप शिंपी यांनी टांगा वर केलेल्या पण नशिबाने आम्हाला भेटले सो त्यांना प्रोत्साहन देत चालते केले.. आता मोकळ्या पठारावरची चढण होती.. पिंपळाची उभी सोंड पठारावर आलेली आणि ती चढण बघूनच पठारावर ब्रेक घेतला..

हिम्या आमच्या मागं असल्याने त्याने पठारावरच ट्रेक संपवला.. इथवर सगळा ग्रुप विखुरला होता.. आणि अगदी नेढ्यापर्यंत जाईपर्यंत शेवटचा माणूस दिसत होता.. वाऱ्याच आता धुमशान सुरु होत.. आणि सोंडेची चढण ढिसाळ असल्याने लटपटतच सगळे चढले तर काहीजण पहाडाला वळसा घालून गेले.. पावसात हीच चढण अडचण बनून राहिली असती.. सगळे धापा टाकत नेढ्यात पोचत होते पण नेढ्याचा विस्तार पाहून सुखावत होते..आतापर्यंत पाहिलेल्या नेढ्यात हे एक नंबर.. शंभरेक लोकांना सहज सामावून घेईल असा विस्तार..

- - -


- - -

पलीकडे साल्हेर सालोट्याच अप्रतिम दर्शन.. निसर्गाची ही किमया खरच अवाक करणार.. एक निसर्गनवलंच.. एकंदर जीव खुळावतो.. पण भन्नाट वारा आपल्याला भानावर आणतो.. असलं भारी लोकेशन दिसलं कि माझी उडी पण भारी पाहिजेच..


( हा फोटो इंद्राने काढलाय..)

- - -

या नेढ्यातून पलीकडे डाव्या बाजूस सरकलो कि एक मोठ्या तोंडाची गुहा नि तिकडे वैशिष्ट्य म्हणजे छतालाच एक निमुळती गुहा !!! काय हेतू असावा उमजल नाही पण मस्त युक्ती होती.. पुन्हा नेढ्याजवळ येऊन उजवीकडे गेलो कि वर जाणारी वाट.. इथेही दोन-तीन कोरड्या टाक्या..

आता पुन्हा गुहेत.. ग्रुपची फाळणी दोन गटांमध्ये करण्याचे ठरलेले.. एक गट आलेल्या वाटेने उतरणार तर एक गट वळसा घालून दुसऱ्या वाटेने येऊन मिळणार होता जेणेकरून चढाई करतानाचा तो ढिसाळ टप्पा टाळता येईल..

आता पुन्हा सगळे त्या मोहक पठारावर जमलेले.. दोन्ही ट्रेक संपूर्णम झाल्याच्या खुशीत.. त्यात तब्बल सहा बच्चेकंपनी.. विन्या, आशू, आका, संत्या व मल्लि या बाबालोकांचे कौतुक.. सिद चा छोटू तर आमच्यातलाच वाटतो.. एक झ्याकपैकी ग्रुप फोटो काढला नि उतरायला घेतले..

वेळेचं गणित बिघडलं होत.. दोन वाजून गेले तरी जेवण सुरु होती.. खरे तर परतीच्या प्रवासात नुकताच पराक्रम करुन आलेले नाशिकचे सायकल स्वार डॉ. महाजन बंधूंची गाठभेट घेण्याचे ठरलेले.. पण वेळेअभावी तो कार्यक्रम रद्द करून परतीची वाट धरली.. तत्पूर्वी प्रथेप्रमाणे आभार प्रदर्शन सोहळा पार पाडताना विन्याने सिएम च्या धडपडीबद्दल चक्क चांगल्या शब्दात आभार मानले.. नव्याने सहभागी झालेल्यांची फक्त 'चांगलीच' मत जाणून घेतली.. मग गळाभेटी पाठ थोपटीचे सोपस्कार पार पाडून नेहमीप्रमाणे मुंबईकरांनी पहिली कल्टी मारली..

वाटेतच हनुमानाचे एक सुंदर मंदिर लागले.. या सह्यमेळाव्यासाठी नाशिककर हेम व राहुल यांनी पायलट ट्रेक मारला होता त्यावेळी या मंदिराचे फोटो दिले होते.. ते फोटो पाहूनच मंदिराची भेट पक्की केलेली.. आगळ्या वेगळ्या बांधणीच हे मंदिर खासच.. नि लक्षात राहणार..

इथून पुढे मग एका धाब्यावर ट्रेक मधला शेवटचा एकत्रित चहा आस्वाद घेतला.. मग नाशिक जिल्ह्यातील सातमाळा रांगेतील किल्ल्यांचे दर्शन घेत नाशिक शहरात आलो..हेम ला अलविदा केले तर मागाहून पुण्याची गाडी आल्यावर मुंबईच्या गाडीत घुसलेल्या सुन्याला चल निघ आता म्हणून उतरवले.. ! नि मुंबई महामार्गला लागलो.. जल्ला दोन दिवस ट्रेक करूनही गाडीत सुद्धा रायगड, शिवाजी राजे या विषयावर चर्चा सुरूच राहिली.. तीन दिवस फक्त रायगड दर्शन म्हणून पण बेत आखले गेले.. सार आलबेल सुरु असताना गाडी पंक्चर काय होते नि मग उशिरात उशीर..

एकंदर दोन दिवसाचा सह्यमित्रांचा सहवास सुखावून गेला.. एरवी व्हॉट्स अप वरून गप्पा सुरूच असतात पण प्रत्यक्षात गाठभेट करून एकत्रित ट्रेकला जाण्याचा आनंद काही निराळाच..! आणि म्हणूनच अगदी आवडीने पुढच्या सह्यमेळाव्याची चर्चाही सुरु होते..

मुडस ऑफ सह्यमेळावा :

हा मेळावा उपस्थितीच्या दृष्टीने खास ठरला.. एक जिपस्या, सेनापती (रोहन चौधरी) व डिसकवर सह्याद्री (साईप्रकाश बेलसारे) सोडले तर बाकी सगळेजण उपस्थित होते.. शिवाय ज्युनियर भटकेदेखील.. सो

फिर मिलेंगे...

(हा ग्रुप फोटो सिदच्या कॅमेर्‍यातून)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान. विशेष म्हणजे बच्चे कंपनीला काय मजा आली असेअल. निसर्गा च्या सान्निध्यातली धाडसी चढाई! किती शिकायला मिळाल असेल या चढाईत मुलांना!

अरे किती मस्तं बहारदार वर्णन लिहिलंयस..आणी फोटोंमुळे तर अजूनच छान कल्पना आली ट्रेक ची..

बच्चू कंपनी उत्साहाने एंजॉय करताना दिसतीये, भावी ट्रेकर्स ना पाहून आनंद वाटला.. तुमच्यामुळे त्यांच्या मनात ट्रेकिंग बद्दलची ओढ रुजली असेल आतापासूनच!!! खूप छान !अ‍ॅक्टिविटी!!

'फोटोस्कार'.. मराठी डिक्शनरीत यो कडून अजून एक योगदान Lol

_/\_ Happy

Happy अरे आजच वाचला यार हा लेख ! एकदम भारी जमलाय रे यो Happy
आणी फक्त मी आणी धीरज नाही काही, आका ची पण विकेट गेली होती रे Happy तो तर ओजस मुळे वर चढला!!

च्यायला या वेळचा मेळावा आणी ववि पण मिसणार मी Sad