पद्मा आजींच्या गोष्टी १२ : तिप्पट पैसे

Submitted by पद्मा आजी on 11 May, 2016 - 01:17

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.

मी आज तुम्हाला माझ्या मोठ्या मुलीची (ज्योतीची) गोष्ट सांगणार आहे. ती जेव्हा चौथीत होती तेव्हाची गोष्ट.

आम्ही जिथे राहायचो तिथे चांगल्या शाळा तुरळक होत्या. त्या मुळे तिला लांबच्या शाळेत टाकले होते. बरीच लांब होती शाळा. जवळजवळ सहा सात किलोमीटर. तेव्हा तिथे टांगे असायचे. नंतर कधीतरी तुम्हाला टांग्याचे मजेदार किस्से सांगेन. (आठवण करून द्या मला नंतर)

आम्ही एक टांगेवाला लावला होता. मुसलमान होता तो. तो दररोज यायचा, तिला शाळेत न्यायचा, आणि परत घेवून यायचा.

एकदा काय झाले, ती गेली शाळेत. दुपारनंतर मी बसले होते तिची वाट बघत. तेव्हा टांग्याचा आवाज ऐकला आणि पाहते काय तर टांगेवाला आला धावत घाबऱ्याघुबऱ्या. अन विचारतो 'ज्योती आयी क्या घरपे?"
मी म्हंटले, "वोह कैसे आयेगी? तुम्ही तो लाऒगे ना उसको स्कूल से."
"नाही. बहेनजी. मेरेको मिली हि नही. कितना धुंडा. बाकी बच्चे रोने लगे तो उनको लेके वापीस आया. अभी वापीस जाता हून उसको लेने." तो पळाला लगेच.

पण मला तर कापरे भरले. तेव्हा असे फोन नव्हते. आमच्या घरीही फोन नव्हता. म्हणून मी समोरच्या डॉक्टरांकडे गेले. तिथून मी माझ्या मिस्टरांच्या कॉलेज मध्ये फोन केला. तिथल्या शिपायाने त्यांना lecture मधून बोलाविले. तो पर्यत तर मला रडू फुटायला आले होते. माझे मिस्टर लगेच गेले गावात -- ज्योतीला शोधायला.

त्यांनी शाळेत जाऊन सगळे वर्ग तपासले. मुख्यध्यापिकेला वाटले कि चुकून कुठे झोपून तर नाही गेली. सगळे शोधायला लागले पण कुठे दिसली नाही. तेही हैराण. मग ते दुसऱ्या शाळेत गेले जिथली काही मुले तिच्याबरोबर टांग्यातून यायची. पण तिथल्या हि शाळेत सापडली नाही.

मग त्यांनी तिला मधल्या रस्त्यात शोधले. कि चालत घरी जाते आहे कि काय. पण रस्ता लांब होता. जवळपास सात किलोमीटर
चा. मध्ये जास्त वर्दळ नसायची त्यामुळे अजूनच लांबचा वाटे.

तिला बघत बघत तेही घरी आले. झाले, माझे तर काही खरे नव्हते. मिस्टरांनी पोलिस ला हि फोन केला.

तेवढ्यात एका टांग्याचा आवाज आला. नेहमीच्या टांग्यापेक्षा वेगळा आवाज होता. बाहेर गेले तर ज्योती एक टांग्यातून उतरत होती. मी तर जावून तिला कडकडून मिठी मारली.

नंतर समजले कि तिची शाळा लवकर सुटली होती आणि टांगेवाल्याची चक्कर वाचवण्यासाठी ती दुसऱ्या शाळे कडे नेहमीच्या वाटेने चालत गेली. पण नेमके त्याच दिवशी, टांगेवाला गर्दी चुकवावी म्हणून वेगळ्या रस्त्याने गेला ज्योती ला घ्यायला. म्हणून झाली चुकामुक.

ज्योतीने दोन - तीनदा मधल्या रस्त्यावर चकरा मारल्या. पण टांगेवाला काही दिसला नाही कुठे. मग काय करावे? तिच्या कडे पैसेही नव्हे अजिबात.

पण ती धीर करून टांगा stand वर गेली. तिथल्या काही टांगेवाल्यांना तिने विचारले कि मला घरी सोडता का? पण टांगेवाल्यांनी लहान मुलगी बघून तिला पैसे आहेत का असे विचारले. ती नाही म्हटली तेव्हा कोणी तीच्याकडे लक्ष देईना. तेव्हा टांगेवाले जास्त आतमध्ये पण येत नसत. stand ते stand च जायचे.

पण तिने थोडे प्रसंगावधान दाखवून एका टांगेवाल्याला सांगितले कि जर तुम्ही मला घरी सोडले तर मी तुम्हाला तिप्पट पैसे देईन. तेव्हा कुठे तो माणूस तयार झाला. आणि अशी प्रकारे ती घरी आली.

आता मी विचार करते सगळ्यांकडे फोन बघून कि तेव्हा जर तिच्याकडे फोन असता तर तिने टांगेवाल्याला फोन केला असता, "किधर हो आप? मै यहा हुं."

या काळात तो प्रश्न दूर झाला आहे. पण जणू उत्तरांना balance करण्यासाठी नवीन प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुशार आहे ज्योती Happy
इतक्या लहानवयात हे तिप्पट पैसे वगैरे सुचणं Happy प्रसंगावधान यालाच म्हणतात की

मस्त Happy

गोष्ट छान आहे.
पण मला त्या टांगेवाल्याचा राग येतोय.आणि कीव वाटतेय. अशा परिस्थितीत एवढ्या छोट्या मुलीला फक्त तिप्पट पैसे मिळतील ह्या आमिषाने सोडायला तयार झाला? Angry

मस्तच Happy

छान गोष्ट!

सस्मित, नशीब समजा की तो फक्त पैश्याच्या आमीषानेच यायला तयार झाला, नाहीतर आजच्या जगात 'एकटी मुलगी' एवढं आमीष पुरेसं ठरू शकतं, नाही का?

नाहीतर आजच्या जगात 'एकटी मुलगी' एवढं आमीष पुरेसं ठरू शकतं, नाही का?>>>हो आजकाल तर काही बोलायलाच नको. Sad

छान आहे गोष्ट पद्माआजी
आता टांगेवाल्यांच्या गोष्टी सांग
बघ हा, तू म्हणाल्याप्रमाणे आठवण करून दिल्ये Happy

छान लिहीली आहे. ज्योती घरी आल्याचे वाचेपर्यंत टेंशनच होते..

या काळात तो प्रश्न दूर झाला आहे. पण जणू उत्तरांना balance करण्यासाठी नवीन प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत. >>> अगदी खरं. आजच्या जमान्यात घडत असलेले प्रकार डोक्यात इतके फिट्ट बसले असतात की ही गोष्ट जुन्या काळातील आहे, हे विसरुनच गेले आणि जेव्हा ७ किमी. अंतरावरील शाळेत, एक टांगेवाला एका मुलीला ने-आण करायचा हे वाचूनच धस्स झाले.

तीन गुना लगान.. भारी लालच.. भारी दिमाग..

लहानपणी घरी सांगितले जायचे की अश्या प्रसंगी टॅक्सीवाल्याला पैसे आहेत सांगून बसायचे आणि घरी पोचल्यावर घरचे पैसे देतीलच..

बाकी मालगुडी डेज सारखे मालवणी डेज टीव्ही मालिका बनेल या छोट्या छोट्या किश्यांना गुंफून

नाहीतर आजच्या जगात 'एकटी मुलगी' एवढं आमीष पुरेसं ठरू शकतं, नाही का?>> +१ हाच पहिला विचार आला मलासुद्धा.. कधी कधी मोबाईल बरा आहे असपन वाटतं..

गोष्ट छानच..