जाग

Submitted by कवठीचाफा on 15 May, 2016 - 23:29

" एकच मिनिट, आपलं काम झाल्यात जमा आहे " मेणबत्ती पेटवत योग्या कुजबुजला

" अरे पण.. हे बरं नव्हे यार " मी अपराधी स्वरात पुटपुटलो

" शू ... आवाज नको "

" तू चटका देणार त्याला ? " कळवळत म्हणालो मी

" थोडासाच, तू फक्त पाहत राहा रे " मेणबत्तीची ज्योत हळूच झोपलेल्या माधवच्या हाताला टेकवत योग्या म्हणाला " बस्स, आणखी एक -दोन वेळा, मग कळेलच गंमत "

माधवची किंचित हालचाल झाली पण अजूनही तो गाढ झोपेतच होता. योग्यानं त्याचा उपद्व्याप बंद केला आणि माझ्या दंडाला धरत बेडरूमच्या बाहेर काढलं

" योग्या, तुला हे असले भलते सलते उद्योग करायचे होते हे माहीत असतं तर तुला बोलावलंच नसतं " मी वैतागून म्हणालो. साहजिकच आहे कुणा गाढ झोपलेल्या माणसाला हे असले चटके देणं मला सहन होण्यासारखं नव्हतं

" गप रे किर्‍या, त्याला कळलं तरी का ते ? तू उगीच एखाद्याला जिवंत भाजल्यासारखा रीअ‍ॅक्ट होऊ नकोस, घे च्युइंगम खा " हातातले सेंटरफ्रेश समोर धरत म्हणाला

" हे खाल्लं तरी माझ्या जुबान पे लगाम बसणार नाहीये " फालतू कोटी होती ती. यावर योग्या काही बोलणार इतक्यात घामाघूम झालेला माधव बाहेर आला.

" या कुंभकर्ण, च्यायला भर दुपारी झोपा काय काढतो रे ? " योग्यानं मोर्चा त्याच्याकडे वळवला. माधव काहीच न बोलता मोठे मोठे श्वास घेत राहिला

" का रे ? काय झालं ?" मी न राहवून विचारलं

" काही नाही रे ! "

" भर दुपारी एखादं स्वप्न वगैरे पडलं की काय ? आगीत वगैरे सापडल्याचं " योग्या खिदळत म्हणाला

" अं ? " माधव आगीचा उल्लेख ऐकल्यावर खरंच दचकला, त्याचं दचकणं पाहून योग्यानं माझ्याकडे पाहत डोळा मारला.

" खरंच रे, एखादं स्वप्न पडलं का ?" मी उगीच विचारलं

" हो ना, च्यायला मी कुठल्यातरी बिल्डिंगमध्ये अडकलेलो आणि तिला आग लागलेली, बघता बघता ती वाढत गेली, माझे कपडे पेटले, मी ओरडतोय जिवाच्या आकांतानं पण कुणी ऐकायलाच नव्हतं तिथे, तेवढ्यात जाग आली, हॉरीबल "

" च्यायला योग्या.. " मी त्याच्याकडं पाहत हात जोडले.

" योग्या, काय प्रकार आहे हा ? " माझी कृती पाहताच माधवला शंका आली

" नथिंग यार, एक डेमो दिला फक्त लहानसा " साळसूदपणे योग्या म्हणाला

" यू मीन.. ते स्वप्न तू पाडलेस ? "

" अर्थात.. "

" हो यार, मला कालच म्हणाला हा, की योग्य परिस्थिती निर्माण केली की स्वप्ने पाडता येऊ शकतात,म्हणून तुझा गिनिपिग केला आम्ही " दात विचकत मी खुलासा केला.

" आयला, कसं काय केलंस तू हे ?" माधवच्या आवाजात उत्सुकता काठोकाठ भरलेली होती.

" सिंपल आहे यार.. " योग्यानं उत्साहानं सगळी प्रोसेस माधवला समजवायला सुरुवात केली.

योग्या, म्हणजे महारुद्र दाते, त्याच्या अभ्यासू स्वभावानं त्याला आम्ही योगिराज उर्फ योग्या म्हणत असू आता तेच नांव रुळलं. म्हणायला इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो पण इंटरेस्ट मात्र पुराणे, इतिहास यातच. गेल्या पाच-सहा वर्षांपासून हा प्राणी `स्वप्नं' या विषयात गुंतलाय. आता याने एखाद्या विषयाचा ध्यास घेतला की त्याच्या पार मुळापर्यंत गेल्याशिवाय हा गप्प बसणार नाही हे आम्हालाही माहिताय, आम्हाला म्हणजे मला आणि माधवलाच फक्त. माधव माझा मामेभाऊ, आमच्याकडेच राहतो, समवयस्क असल्यानं आमची चांगलीच मैत्री जमलेय तसंही घरी कुणीच नसतं आमच्या वडिलांनी रिटायर्डमेंटनंतर अचानक शेतकरी व्हायचा ध्यास घेतला त्यामुळे आता आई बाबा गावीच असतात, इकडे घर मोकळेच.

तर मी सांगत होतो या योग्याबद्दल, हा प्राणी स्वप्न या गोष्टीचा इतका पाठपुरावा करतोय की आता यानं कृत्रिमरीत्या स्वप्ने पाडायला सुरुवात केलीय. नाही ना विश्वास बसला ? माझाही नव्हताच बसला म्हणून तर त्यानं हे आजचं प्रात्यक्षिक दाखवलं.

" अरे पण तू तर म्हणतोयस की पाचच मिनिटं झाली तुला माझ्यावर प्रयोग करून, पण मी तरी स्वप्नात बराच वेळ त्या आगीत अडकलो होतो की " माधवच्या बोलण्यानं माझी लिंक तुटली

" मी तेच सांगतोय, मुळात कालमापन ही गोष्ट तुझ्या जागृतमनापुरती मर्यादित असते स्वप्नातला काळ वेगळा असतो रे, काही सेकंदही तिथे काही तासांसारखे ताणले जातात "

" समजेल असं सांगा हो गुरुदेव " माझ्या ते सगळं डोक्यावरून गेलेलं

" अरे एक उदाहरण घे, तू काहीतरी स्वप्न पाहत असतोस, तुझ्यामते ते बराच वेळ चालू असतं आणि त्यातला काही आवाज येऊन तू उठतोस आणि तेव्हा घड्याळाचा गजर वाजत असतो, असं झालं असेल ना तुझं अनेकवेळा ? "

" चिक्कार वेळा, म्हणजे मी काहीतरी काम करतोय आणि डोअरबेल वाजते, कधी कुठेतरी जात असतो आणि सायरन वाजतो आणि तो थांबतच नाही आणि उठून पाहावं तर अलार्म वाजत असतो "

" करेक्ट, होतं ना असं ? "

" हो, पण त्याचा आणि स्वप्नातल्या वेळेचा काय संबंध ? "

" आहे ना ! तुला स्वप्नातला काळ कितीही मोठा वाटला तरी खरं म्हणजे तुझ्या घड्याळाचा गजर झाल्याच्या पहिल्या काही मिलीसेकंदात तुला ते स्वप्न पाडायला सुरुवात झालेली असते आणि त्या गजराच्या काही आवर्तनांत तुला जाग येते फार तर वीस तीस सेकंदाचा काळ असतो तो "

" योग्या तूच सांगतोयस म्हणून विश्वास ठेवतोय हां !" कारण त्यानं शंभरटक्के याचा अभ्यास केला असणार वर दहा बारा पुरावेही त्याच्या गाठीला असणार याची मलाही खात्री होती.

" च्यायला, पण हे कसं शक्य आहे ? " माधव बरळलाच

" अरे आपली बाह्य कालमापनाच्या परिमाणांचा अंतर्गत काल मापनेशी काडीचा संबंध नसतो, तू स्वप्नात एखादं संपूर्ण आयुष्य नाही का जगतोस ? कित्येक वर्षाचं ? " योग्यानं अचूक मुद्दा मांडला

" बरं चल हे मान्य केलं तरी तू मला चटका देण्यानं मला नेमकं आगीचं स्वप्नच कसं पडलं ? ते आधी क्लियर कर "

" अरे फार सोपय रे ते, झोपेत आपल्या मेंदूचा काही भाग पहारेकर्‍याचं काम करतो, त्याचं कारण आदिमानवाच्या काळात झोपण्यासाठी ही अशी सुरक्षित ठिकाणं उपलब्ध नव्हती, त्यामुळेच त्या पहारेकर्‍याची निर्मिती झाली असावी, तर झोपेत असताना मुख्य पंचेंद्रियांपैकी डोळे कार्यरत नसल्यानं उरलेल्या इंद्रियांची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळेच मी तुझ्या त्वचेला हळूच चटका दिल्यानं तुला सावध करण्यासाठी तुझ्या मेंदूनं हे असं स्वप्न पाडून तुला जागं केलं "

" फारच गुंतागुंत दिसतेय ही " माधव प्रभावीत झाला

" आत्ता मी चटका दिला म्हणून आग जर पाण्याचा स्पर्श दिला असता तर पाण्याचं स्वप्न पडलं असतं तुला "

" च्यायला काही बरी स्वप्ने पाडायची सोय आहे का रे तुझ्याकडे ?" माधव डोळे मिचकावत म्हणाला.

" तुझ्या नानाची टांग साल्या " हसत योग्या म्हणाला

" चल यार तुझ्या ज्ञानाच्या डोसनं डोकं जड झालंय, चहा घेऊया का ? " मी विषय संपवला

" नेकी और पुछं पुछं ? " चहाच्या घोटाबरोबर त्या दिवशीचा स्वप्नं हा विषय संपला. हो त्याच दिवशीचा कारण योग्या शांत बसणार्‍यातला नाही आणि त्याचे सर्वोत्तम गिर्‍हाईक आम्ही दोघे असल्यानं यापुढेही हा विषय येतच राहणार होता.

****

जवळपास पंधरा दिवसांनी आज योग्या उगवला होता, अर्थात यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं, हे त्याचं असं कशाततरी गुंतलेलं असणं आम्हाला नवीन नव्हतं. आज योग्या आल्यावर थोडं बरंच वाटलं कारण काहीतरी सांगण्यासारखं असल्याखेरीज हा प्राणी रविवारी दुपारी घरी येणार नाही.

" योग्या, अलभ्य लाभ लेका, आज कशी पावलं वळली इकडे ? "

" तुला मागच्यावेळी माधवनं विचारलेला प्रश्न आठवतो का रे ? " माझ्या आवाजातल्या चेष्टेकडे दुर्लक्ष करत त्यानं विचारलं

" कुठला प्रश्न ? " मी काही योग्यासारखा झपाटलेला नव्हतो त्यामुळे मला आठवणं शक्यच नव्हतं

" अरे तो नाही का विचारत होता, त्याला हवी तशी स्वप्ने पाडता येतील का ते ? "

" असेल बाबा, पण का रे ? तू काय फार सीरियसली घेतलंस का ते ? "

" का नाही ? ते ही शक्यच असायला हवंय की "

" अरे पण कसं ? "

" तुला मागच्यावेळी थंड आणि गरम अनुभूतीमुळे काय घडू शकतं ते दाखवलं की नाही ? "

" अरे पण तो भाग त्वचेच्या संवेदनेशी संबंधीत होता, आता बाकी काही करायला गेलास तर झोपलेला माणूस जागा नाही का होणार ?" मी माझं डोकं चालवलं

" अरे पण बाकी सेन्सेस आहेत की "

" म्हणजे नाक ? काय वास देणार का कसला ? की आवाज ऐकवणार ? " च्यायला योग्या काहीही विचार करतो

" नाही रे, मुळात या पलीकडच्या सेन्सला मी इंटरसेप्ट करणार "

" योग्या साल्या, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय, सिक्स्थ सेन्स ही नुसती कल्पना आहे रे "

" मुळीच नाही, तुला देजावू माहिताय का ? "

" म्हणजे पाहत असलेली घटना आधी पाहिल्यासारखी वाटणे, माहीताय "

" ते फीलिंग कुठून येतं ? "

" मला काय माहीत ? "

" ती आपल्या मेंदूतून आलेली जाणीव आहे, आपला सहावा सेन्स हाच "

" पण त्याच्या पर्यंत कसा पोहोचणार तू ? या पंचेंद्रियांमार्फतच ना ? " योग्यावर तडकलो मी

" तसाच पण नेहमीच्या मार्गे नाही "

" मग दुसरा कुठला मार्ग आहे आता ? "

" मी त्याचाच विचार करतोय "

" घ्या, म्हणजे अजून विचारच करतोयस तर "

" नाही, अ‍ॅकच्युअली थोडी दिशा मिळालेय पण काही फायनल नाही "

" मग फायनल झाल्यावर सांग " दरवाज्यातून आत येताना माधव शेवटच्या वाक्यावरून म्हणाला

" अरे आज रविवारचा कुठे भटकतोयस ? "

" काही नाही यार, मित्राचं इलेक्ट्रोमॅग्नॅटीक पल्स जनरेटरचं प्रोजेक्ट आहे त्यावर काम करत होतो "

" हे काय आणखी ? "

" अरे त्याच्या डोक्यात भेसळमुक्त चीज बनवण्याची कल्पना आलीय त्या साठी त्यानं बनवलंय हे "

" म्हणजे नक्की कसं ? "

" अरे दुधाचं चीज बनवताना त्यात काही अ‍ॅडेटीव्ह टाकावे लागतात रे, दूध नासण्यासाठी आणि त्यातले बॅक्टेरीया वाढण्यासाठी त्याला ते अ‍ॅडेटीव्ह नकोयत, तो इलेक्ट्रोमॅग्नॅटीक पल्सनं दूध नासवणार आहे, च्यायला काय काय कल्पना असतात रे "

" शक्य आहे हे ? "

" नसायला काय झालं ? एका ठरावीक प्रमाणात व्हायब्रेशन निर्माण झाली की दूध नासतं की, घरीही हा अनुभव घेतला असशील कधीतरी "

" अरे पण अचूक पल्स सापडणार कसे ? "

" तोच तर प्रयत्न चाललाय, त्यासाठी काही सर्किट्स बनवायचेच काम चालू आहे "

" माधव तू महान आहेस, झालंच तर भव्य आहेस, महाभव्य आहेस " योग्याचा मूड पालटला

" तुला काय झालं मध्येच ? " माधवला प्रशंसा सहन झाली नाही

" काही नाही, मी निघतो आता, नंतर भेटेन रे .. " बाहेर सटकता सटकता योग्या म्हणाला

" च्यायला सर्किटच आहे, मध्येच कुठे सटकला ? " माधवनं विचारलं

" सुचलं असेल काहीतरी, जाऊ दे यार तो तसाच आहे, बरं आपला काय प्लान आजचा ? "

" आज संडे आहे यार, नो डब्बा चल कुठेतरी बाहेर जाऊ जरा आठवडाभराचा ताण हलका करू " माधवला बियर मारायचा मूड आलेला दिसत होता. महिन्यातून एखाददुसर्‍यावेळी आम्ही घेतोच एक-दोन बियर

संध्याकाळच्या संडे सेलिब्रेशनमध्ये आम्ही योग्याला पार विसरलो

*****

खूप दिवसांनी शनिवारचा दिवस मोकळा मिळालेला, गेल्या तीन-चार महिन्यांपासून वाचीन वाचीन म्हणताना बाजूला राहिलेलं रॉबिन कुकचं `कोमा' आज सकाळीच हातात घेतलेलं, दिवसभराची निश्चिंती नक्कीच होती पण त्या कुकचं दुर्दैव आजही आडवं आलं, गेला दीड महिना अज्ञातवासी झालेला योग्या आज सकाळीच अवतीर्ण झाला.

" योग्या.. "

" आय नो, इतके दिवस कुठे होतास हेच विचारणार आहेस ना ? "

" मुळीच नाही, मी फक्त इतकेच विचारणार होतो की तू गेल्या जन्मी काळं मांजर होतास की याच जन्मी आहेस ? "

" म्हणजे ? "

" च्यामारी, तू आडवा आलास आणि माझ्या वाचायच्या प्लानच्या चिंध्या केल्यास "

" मी तुझा जास्त वेळ घेणार नाहीये, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटीक पल्स जनरेटर बद्दल काही बोलणं झालेलं आपलं ? "

" यावेळी आठवतंय "

" मी ही तसाच एक तयार केलाय "

" योग्या, तू कशाला चीज बनवण्याची फॅक्टरी टाकतोयस ? आहेस त्या नोकरीचं चीज कर की " फालतू कोटी करण्यात तसाही माझा हात कुणालाच धरता येत नाही.

" अरे चीज नाही करायचेय मला, माझा जनरेटर एकदम लहान आहे आणि त्याचं कामही वेगळं आहे "

" म्हणजे नक्की काय करणार आहेस ? "

" मी स्वप्न पाडतोय त्यानं " आयला याचं वेड अजूनही तसंच होतं तर

" इलेक्ट्रोमॅग्नेटीक पल्सनं स्वप्नं ? " माझं डोकं चाले ना !

" करेक्ट, पण त्यावरचं काम अजून पूर्ण झालं नाहीये, म्हणजे स्वप्नं पडतात पण मला हवी तशी नाही "

" एकच मिनिट योग्या, तू जे काही बोललास त्यातलं एक अक्षरही मला कळलं नाहीये, जरा उलगडून सांग "

" ठिकाय पाहिल्यापासून सांगतो, मला सांग स्वप्नं कशी पडतात ? "

" आपण झोपलो की मेंदू रिलॅक्स होण्यासाठी हा असला काहीतरी टाईमपास करतो, आपण कसे एखादा मूव्ही वगैरे पाहतो तसं काहीतरी" मी आपली वाचीव माहिती सांगितली

" हे म्हणजे वरवरचं झालं, या पलीकडे नीट समजावतो तुला " बाप रे गेला शनिवार आता.

" सगळं नको सांगू रे तुझ्या त्या पल्स जनरेटरचा कुठे संबंध येतो तेव्हढं सांग " मी केविलवाणा प्रयत्न केला

" ओके, तू जे सांगितलंस तसंही एक कारण आहे पण दुसरं कारण म्हणजे मेमरी स्कॅन करणं, मेंदू आपल्याकडच्या साठवलेल्या आठवणींना स्कॅन करून पाहत असतो आणि विस्मरण होत असलेल्या काही आठवणी पुन्हा वर आणत असतो, तिसरं आणि फार महत्त्वाचं कारण म्हणजे मेंदूतून शरीरात जाणारे जे काही सिग्नल्स असतात त्यात मेंदूच हस्तक्षेप करण्यासाठी हे प्रयोजन करतो ज्याचा अनुभव तुला मागे एकदा दिला होता. एक सोपं उदाहरण द्यायचं तर बेडवरून खाली पडण्यापूर्वी पडणार्‍या व्यक्तीला उंचावरून पडत असल्याचं स्वप्नं दिसतं ज्या योगे शरीराचे रिक्लेक्सेस काम करून पडल्यावर लागणारा दणक्यानं नुकसान होत नाही, तू पहा झोपेत बेडवरून खाली पडण्यानं जखमी झालेली माणसं फार क्वचित सापडतील."

" कदाचित, पण तुला यात नेमकं काय करायचंय ? " योग्या श्वास घ्यायला थांबलेला पाहून मी विचारून टाकलं

" मला त्या सिग्नल्स इंटरसेप्ट करायचेत "

" म्हणजे तुला हवे तसे सिग्नल तिथे पाठवायचेत ? "

" थोडं फार तसंच "

" अरे पण यामुळे शारीरिक हालचाली होतील की "

" मी तुला दिलेलं उदाहरण होतं रे ते, स्वप्नात कधी कधी वेदना जाणवते, घेतलायस का कधी अनुभव ? "

" असेलही मला नाही लक्षात राहत स्वप्नं "

" ऐकून तरी माहीत असेलच "

" हो, माझ्या एका काकूला भाजल्याची वेदना जाणवायची, तिचा अपघात झाला होता त्यानंतर कित्येक दिवस, म्हणजे ती किंचाळतच उठायची "

" करेक्ट, आता मला सांग वेदना ही शारीरिक जाणीव आहे तरी ती स्वप्नात कशी जाणवते ? याचं कारण मेंदू त्यावेळी तशी जाणीव करून देतो "

" म्हणजे तू ब्रेनवेव्हज मध्ये हस्तक्षेप करून त्या तुला हव्या तश्या वळवणार ? इंपॉसीबल, कारण असं केलंस की तू सरळ सरळ समोरच्या माणसाच्या विचारांचा ताबा घेतोयस की "

" हो पण जागृत अवस्थेत नाही , कारण ते शक्य नाही संपूर्ण काम करत असलेल्या मेंदूवर पूर्ण ताबा मिळवणं शक्य नाही किमान आत्ता तरी, पण रिलॅक्स करत असलेल्या थोडक्यात अर्धवट काम करत असलेल्या मेंदूची सारासार विचार करण्याची ताकद बंद असते तेव्हा हे करून मी फक्त स्वप्नं पाडायचा प्रयत्न केलाय "

" यू मीन, तू ऑलरेडी करून मोकळा झालास हा उद्योग ? "

" हो, पण म्हणावं तसं यश येत नाही, कारण मुळातच मेंदूच्या सिग्नलशी ताळमेळ साधता येत नाहीये, त्यासाठी जनरेटर खूप फाईन ट्यूनिंग करावा लागणार आहे, त्यात वेळ नक्की जाईल पण मी ते नक्की जमवणार"

" तुझा विचार नक्की काय आहे योग्या ? तुला स्वप्नांवर ताबा मिळवून नक्की काय करायचेय ? "

" काहीच नाही, मला फक्त हेच समजावून घ्यायचेय की स्वप्न नक्की कशी पडतात आणि त्याचा काय फायदा करून घेता येईल "

" नुसता टाईमपास असतो रे तो, त्यातून काही साध्य होताना तरी दिसत नाही "

" चुकतोयस तू किर्‍या, स्वप्न कधीही तेच तेच दाखवणारी स्टिरीयो टाईप नसतात, रोज वेगळी, त्यातही माहितीतल्या व्यक्तींना गुंफून काही अनोळखी व्यक्तिमत्त्व घडवून ती पडत असतात "

" पण एकूण टाईमपासच ना !" मी मुद्दा सोडायला तयार नव्हतो

" आत्ता ज्याला टाईमपास म्हणतोयस त्या गोष्टीचा फार मोठा उपयोग तू लक्षात घेत नाहीयेस"

" स्वप्नांचा असा काय उपयोग असणार ? "

" कधीकधी सकाळी उठल्या उठल्या फार फ्रेश वाटणं, फार उत्साही वाटणं असा अनुभव घेतलायस कधी ? "

" कित्येकदा, झोप चांगली झाली की फ्रेश वाटतेच "

" आणि चांगली झोप झाली असं तू कशावरून ठरवतोस ? "

" अं ? " निरुत्तरच की! च्यायला, असा विचार करतो कधी आपण ?

" एखाद्या रात्री तुला फार सुंदर स्वप्ने पडलेली असतात त्या सकाळी तू फ्रेश उठतोस, पण तुला हे लक्षात येत नाही कारण तुला ती स्वप्न आठवतच नसतात, आपल्या रचनेमुळे मेंदू ती विस्मरणाच्या कप्प्यात टाकून देतो "

" चांगलाच अभ्यास आहे रे तुझा योग्या " मानलं आपण त्याला.

" आता हा विचार कर, की तुझा कंट्रोल स्वप्नांवर असला तर तू रोजच फ्रेश आणि उत्साही राहशील की, या पुढे जाऊन विचार कर, जे एखाद्या रोगानं म्हण, अपघातानं म्हण अंथरुणाला खिळलेले आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यातला काही चांगला काळ या स्वप्नात मिळवता येईल"

" करेक्ट, आणि जे खरंच काही कारणांनी डिप्रेशनमध्ये वगैरे आहेत त्यांच्यासाठी तर हे वरदान ठरेल की, म्हणजे झोप येण्यासाठी सुरुवातीला इलाज करावे लागतील पण फार कमी वेळात ते डिप्रेशनमधून बाहेर येतील, निम्म्या आत्महत्या कमी होतील " माझ्याही कल्पनेला पंख फुटले.

" आता तुला माझा मुद्दा कळला " योग्याचा चेहरा उजळला.

" एकंदरीतच वरदान ठरेल हे, त्यासाठीच मला आणखी धडपड करायला हवी, तुझ्याशी चर्चा केली की मला उत्साह येतो काम करायला थॅक्स यार.. बरं , आता मी पळतो, चल बाय... " इतकं बोलून तो सटकलासुद्धा, या सगळ्यात कोमा वाचायचं पुन्हा एकदा राहूनच गेलं.

****

" माधव, यार बरेच दिवसात योग्या फिरकला नाहीये ना ? " चुकल्यासारखं वाटल्यानं मी माधवला विचारलं

" खरंच रे, तो कुठल्या खुळात गुंतला की त्याचं येणं कमी होतं हे खरंय पण यावेळी बरेच दिवस नाहीच आला "

" अरे त्याचे जे काही उद्योग चालू आहेत ते फारच चमत्कारिक कारणांसाठी चाललेयत "

" तो माणूसच चमत्कारिक आहे रे, बाय द वे मी नसताना तुला बरेच अपडेट मिळालेले दिसतायत"

" म्हणून तर जरा काळजी वाटली रे " असं म्हणून मी माधवला योग्याच्या गेल्या भेटीची हकिकत सांगायला सुरुवात केली

**

" यात काळजी वाटण्यासारखं काय आहे ? " माझं बोलून झाल्यावर माधवनं विचारलं " बरोबर म्हणतोय तो, बरेच फायदे होतील की "

" तू ही फक्त फायद्यांचाच विचार करतोयस माधव, त्यात काही तोटेही आहेत, ते ही भयंकर "

" तुला कुठे दिसले ते ? "

" म्हणजे बघ, जर असा काही कंट्रोल आलाच स्वप्नांवर तर लोक स्वप्नातच राहणं जास्त पसंत करतील, स्वप्ने पाहण्याचं व्यसनच लागेल की त्यांना "

" ते कसं काय ? "

" एकूणच माणसाला मनोरंजनाच व्यसन लागतंच, साध्या स्मार्टफोनचंच उदाहरण घे की, लोकं किती गुंतून पडलीयत त्यात ? आणखी असं काही साधन मिळालं तर माणसाच्या कार्यक्षमतेची वाट लागेल "

" ते ही बरोबरच आहे म्हणा, पण स्वप्न ही फक्त झोपेपुरती मर्यादित असतात रे त्यानं कार्यक्षमता कशी कमी होणार ? " माधवच्या काहीच लक्षात आलेलं दिसत नव्हतं.

" अरे पण मग स्वप्नं पाहण्यासाठी लोक झोपेत राहायला लागतील मग त्यासाठी काहीही करतील कुठलीही ड्रग्ज घेतील "

" हे माझ्या लक्षातच नव्हतं आलं यार, पार वाट लागेल "

" साफ खुंटून जाईल प्रगती " मी गंभीर होत म्हणालो, काही वेळ आमच्यात शांतता पसरली

" बाय द वे, तू फारच जास्त विचार करतोयस या गोष्टीचा, अजून योग्यानं त्यात यश मिळवायचंय मग पुढे काय ते, तुझ्यासारखा विचार करणारे आणखी लोक आहेतच योग्याचा शोध कदाचित शेड्युल्ड मेडिसिन सारखा कंट्रोलमध्ये ठेवला जाईल "

" शक्य आहे, पण तो तसा ठेवला तरी त्याचाही काळाबाजार होणारच "

" होईल तेव्हा पाहू, नाउ लिव्ह इट यार " माधवनं विषयावर पडदा टाकला आणि चर्चा तिथंच संपली.

****

" किर्‍या, मला तुझ्याशी बोलायचंय " गंभीर आवाजात योग्या म्हणाला. आज हा प्राणी वीक डेज मध्ये तोही सकाळी सकाळी टपकलेला, माझीही ऑफिसला जायची घाईच होती.

" योग्या, लेका आत्ता नाही, संध्याकाळी भेटू आत्ता मी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत आहे " मी त्याला कटवण्याचा प्रयत्न केला.

" फारच महत्त्वाचं आहे यार, मला आत्ताच बोललं पाहिजे, इथे प्रत्येक क्षण मी फार तणावाखाली काढतोय " योग्या विनवत होता, त्याला कधी अश्या रूपात पाहिलंच नाही

" अरे पण.. ओके बोल मी जाईन थोडा उशीरा " त्याची अवस्था पाहून मी विचार बदलला.

" किर्‍या, काहीतरी गडबड आहे यार , आयमीन काहीतरी चुकतंय "

" अरे मग इथे कोण तुझ्यामागे लागलंय, कर दुरुस्त जमेल तसे " हा त्याच्या त्या स्वप्न दाखवणार्‍या पल्स जनरेटरबद्दल बोलत असणार याची खात्री होती.

" काय ? "

" तुझा तो जनरेटर रे, अजून काम करत नाहीये ना ? "

" तो व्यवस्थित काम करतोय, उलट त्याच्या काम करण्यानंच ही परिस्थिती आलीय"

" कसली परिस्थिती योग्या ? काय बोलतोयस ? जरा नीट सांग की " मी काहीच न कळल्यानं म्हणालो

" तुला पाहिल्यापासून सांगतो "

" दॅट्स बेटर "

" मी त्या पल्स जनरेटरमध्ये हव्यातश्या सुधारणा करून घेतल्या, ट्रायल्सही ओकेच झाल्या, आता माझ्या मुख्य उद्दिष्टाकडे माझं लक्ष होतं ते म्हणजे एक्झॅक्टली स्वप्न म्हणजे काय ! ती पाडण्यामागे कारणीभूत असलेले सिग्नल्स इंटरसेप्ट करणे "

" योग्या एकच शंका, तू तुझ्या ट्रायल्स यशस्वी झाल्या हे जे म्हणतोयस हे कशाच्या जिवावर ? आयमीन, तू या ट्रायल्स घेतल्यास कुणावर ? "

" तेच सांगत होतो, हे सगळं करायला मला कुणी मदत करेल असं वाटत नव्हतंच आणि वर सांगणार्‍याच्या माहितीवर अवलंबून राहून मला माझे प्रयत्न पुढे सुरू ठेवावे लागले असते म्हणून मी ट्रायल्स नव्हे संपूर्ण प्रयोगच माझ्यावर केला "

" काय ? पण हे कसं शक्य आहे ? तू झोपल्यावर तुझे मशीन सुरू कोण करत होतं ? "

" त्यासाठी मी एक सोय करून ठेवलेली, त्याला माझ्या लॅपटॉपला जोडून ठेवलंय, त्यात ठरावीक प्रोग्रामने मी जनरेटर सुरू होण्याची, बंद होण्याची वेळ सेट करू शकतो आणि पुन्हा मेंदूच्या सिग्नल्समध्ये एखादी आकस्मिक ढवळाढवळ दिसली तर त्या प्रोग्राममध्ये एस ओ एस सारखी एक प्रणालीही आहे जी मला ताबडतोब जागं करेल "

" एस ओ एस कशाला ? "

" सिंपल आहे, स्वप्नप्रणाली ही आपल्यासाठी पूर्णपणे अज्ञात आहे, जर माझ्या सिग्नल्समुळे काही उलटसुलट घडलंच आणि त्यामुळे मला काही धोका निर्माण झालाच तर त्यासाठी ही सोय "

" स्वप्नात तुला काय धोका असणार ? म्हणजे ते सगळं भासमान जग ना रे ! "

" धोका स्वप्नात नाही रे, पण ब्रेन सिग्नल्स मध्ये होता, जर चुकीचे सिग्नल्स अ‍ॅक्टिव्ह झाले, उदाहरणच द्यायचं तर स्वसनसंस्थेचे किंवा मेजासंस्थेतले काही महत्त्वाचे तर ? धोका होताच, अर्थात तसं झालंच तर माझा मेंदू त्या बदलाला जोरदार विरोध करणार आणि त्यामुळे ब्रेनसिग्नल्समध्ये काही काळ वादळी हालचाली होणार हे मी गृहीत धरलेलं, त्यावेळी मला जाग येईल अशी ती सोय आहे"

" ओह, फार लांबचा विचार करून ठेवलेलास तर, पण असं शक्य आहे का ? "

" असू शकेल, झोपेत हृदयक्रिया बंद पडून दगावलेली माणसं नवीन नाहीत ना आपल्यासाठी ? न जाणे तेव्हा नक्की काय घडत असेल त्यांच्या मेंदूत, स्वप्नात काय पाहत असतील ते ! " योग्या गूढ आवाजात म्हणाला.

" बाप रे, असा कधी विचारच नव्हता केला "

" तर मी ही अशी सिस्टम सुरू करून झोपत होतो, सेट केलेल्या प्रोग्रामप्रमाणे कधीकधी चांगली, वाईट स्वप्ने पडत होती पण कधीकधीच, माझ्या प्रयोगात वेळोवेळी सुधारणा करत मी स्वप्ने पडण्यात अचूकता आणण्याचा प्रयत्न करत होतो, एकदा या गोष्टी साध्य झाल्या की मला हवे तेच मी स्वप्नात पाहू शकणार होतो "

" मग झालास का यशस्वी ? "

" कदाचित नाही पण काहीतरी असं घडलं की त्यामुळे माझं मन आता कच खातंय "

" म्हणजे काय झालं ? "

" ही दोन -तीन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, मी सेटिंग करून ठेवलं आणि मी झोपलो त्यावेळी काहीतरी गडबड झाली असेल किंवा काहीतरी एररमुळे असेल मला जाग आली "

" म्हणजे तुझ्या त्या एस ओ एस नं तुला जागं केलं, असंच ना ? "

" बरोबर पण मी जागा झालो तेव्हा माझा बेड, माझी बेडरूम बाजूला ठेवलेला लॅपटॉप असं काहीच आजूबाजूला नव्हतं, कुठल्यातरी निळसर प्रकाशात मी एखाद्या अरुंद जागेत असल्यासारखं मला वाटत होतं, सांगता येणार नाही असा एक शांत सुवास वातावरणात होता आणि आजूबाजूला एक मंद गुणगूण जाणवत होती, नक्की कशाची ती सांगता येणार नाही पण डोळे उघडल्यावर एक गोष्ट पक्की जाणवली की त्या ठिकाणी मी एकटा नक्कीच नव्हतो, डोळ्यांना ताण देऊन मी आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याच निळसर प्रकाशानं आजूबाजूच्या वस्तूंची फक्त बाह्यरूपंच दिसत होती एखाद्या हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये असल्यासारखं दृश्य जाणवत होतं, दिसत होतं असं मी म्हणणार नाही कारण खरंच त्या प्रकाशात काहीच नीट असं दिसत नव्हतं, मी जाणिवा तल्लख करून परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होतो त्यात जास्त श्रम झाल्यानं म्हणा किंवा त्या मंद गुणगुणीचा परिणाम म्हणून म्हणा मला परत झोप लागली आणि त्यानंतर पुन्हा पहाटेच जाग आली तिथून पुढे झोप कोरीच राहिली. "

" अरे म्हणजे तू स्वप्नात स्वप्नं पाहिलंस वाटतं, इन्सेप्शन टाईप "

" नाही, मी सकाळी उठल्या उठल्या माझा लॅपटॉप चेक केला त्यात तो एस ओ एस रात्री दोन सत्तावीसला अ‍ॅक्टिव्ह झाल्याचं दिसत होतं, त्यानंतर मी जागा झालो असं गृहीत धरल्यानं अर्थातच प्रोग्राम बंद झाला, म्हणूनच मला पुढे स्वप्नं पडली नाहीत, आता प्रश्न असा आहे की जर मी तेव्हा जागा झालो तर मला दिसली ती जागा कुठली ? "

" अरे स्वप्नंच असेल ते, तुझ्या प्रोग्राममध्ये काही बग्ज वगैरे असतील "

" मी तो चेक करून घेतलाय किर्‍या, व्यवस्थित काम करतोय तो "

" अरे मग तू तुझ्याच थियरीप्रमाणे काही मिलीसेकंद वगैरे जागा होऊन परत स्वप्नात गेला असशील " आता मला खरंच काही कळे ना, आणि त्यामुळेच उशीर झाल्याची जाणीव जास्त तीव्र झाली.

" मला जाग आल्याखेरीज प्रोग्राम बंद होणारच नाही अशी सोय आहे त्यात "

" योग्या, खरं सांगू मलाही काहीच कळलं नाहीये, तू पुन्हा एकदा तसा अनुभव येईपर्यंत वाट पहा मग आपण एखादं स्पष्टीकरण मिळवण्याचा प्रयत्न करू "

" हं, पण माहीत नाही असं पुन्हा घडेल की नाही ते, असो तुला आधीच दोन अडीच तास उशीर झालाय तू नीघ, मी भेटेन नंतर " योग्या निरोप घेत म्हणाला. इतक्या लहान गोष्टीसाठी या माणसानं मला लेटमार्क घ्यायला भाग पाडलं.

****

दूर कुठेतरी त्या अत्याधुनिक कंट्रोलरूम मध्ये एक अलार्म काही काळ वाजला, त्या पडद्यावर लक्ष ठेवून असलेल्यानं वेळीच योग्य ठिकाणी जास्तीच्या विद्युतलहरी सोडून तो बंद केला

****

" फारच भयानक प्रकार आहे हा, तुला सांगतो फारच भयानक " माझ्या दंडाला धरून गदगदा हालवत योग्या सांगत होता. योग्याचा अवतार फारच वाईट दिसत होता, वाढलेली दाढी, अस्ताव्यस्त केस डोळेही तांबारलेले आणि हा भर रस्त्यात मला भेटलेला, गेल्या भेटीनंतर जवळपास महिना दीड महिन्यांनी.

" शांत हो योग्या, आधी शांत हो हे बघ आपण कुठेतरी शांत बसू आणि मग तू सांग नक्की काय झालेय ते " मी त्याला जवळपास ओढतच जवळच्या हॉटेलमध्ये नेलं, दुपारची वेळ असल्यानं गर्दी नव्हतीच एका कोपर्‍यातल्या टेबलावर आम्ही बसलो.

" तुला सांगतो मी याची अपेक्षा कधीच केली नव्हती " अस्वस्थपणे योग्या म्हणाला.

" म्हणजे नक्की कशाची ? जरा सविस्तर सांग पुन्हा तसा अनुभव आला का ? "

" तुला सगळं सांगतो " पाण्याचा ग्लास झटक्यात रिकामा करत तो म्हणाला " मागच्या त्या अनुभवानंतर मी पुन्हा एकदा तसाच अनुभव घेतला, तेच थंडगार सुवासिक वातावरण, तोच निळसर प्रकाश, यावेळी थोडा जास्तच वेळ जागा असावा मी , म्हणजे मी उठून आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करेपर्यंत, पण मी उठूच शकलो नाही, कुणीतरी माझ्या हातपायांतली ताकदच काढून घेतली होती, मी डोळ्यांना ताण देत आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला, पण काहीच कल्पना येई ना ! नक्की कुठे होतो मी ? आणखी धडपड करण्याआधीच पुन्हा एकदा कशाचा तरी परिणाम होऊन मी पुन्हा झोपी गेलो आणि पुन्हा जाग आल्यावर मी माझ्याच बेडवर होतो. "

" ओह माय गॉड ... " हे आपलं उगीच हं !

"मी डोळ्यांना ताण देत आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला, मी नक्कीच तिथे एकटा नव्हतो माझ्या आजूबाजूला नजर पोहोचेल तिथवर फक्त टेबलंच दिसत होती. हळूहळू माझी नजर त्या मंद प्रकाशाला सरावली आणि मला जाणवलं, नक्कीच माझ्या आजूबाजूला असलेल्या बर्‍याच टेबलांवर मानवी आकार होते, आकार इतक्यासाठीच म्हणतोय कारण ते पूर्णं नव्हते, बहुतांश शरीरांवर ठळक अवयव दिसत नव्हते. नक्की काय प्रकार असावा तो ? मी आणखी निरीक्षण करायला सुरुवात केली आणि एक नवीनं गोष्ट लक्षात आली"

" काय ? " मी जरा काळजीनंच विचारलं, हे लक्षण मला योग्याची मन:स्थिती ठीक नसल्याचं वाटत होतं

" त्या दालनाच्या कडेला एकावर एक अश्या पेट्या दिसत होत्या, वरून तरी काचेच्या वाटत होत्या पण त्यात काहीतरी ओळखीची गोष्ट नक्की होती, बराच वेळ डोळे आणि मेंदू यांना ताण दिल्यावर जे लक्षात आलं त्यानं मी चमकलो, त्यात चक्क मेंदू दिसत होते, वायर्सच्या जंजाळात असलेले मेंदू. एक-दोन नाही शेकडो असतील. प्रकार काहीतरी वेगळाच होता."

" बाप रे, योग्या तू जरा जास्तच ताण देतोस रे डोक्याला, जरा सुटी दे तुझ्या त्या माइंड रीडरला, आराम कर कुठेतरी मस्त भटकून ये तुझा ताण हलका होईल यार "

" थांब , तुला वाटतंय तसा माझ्या डोक्यावर परिणाम झालेला नाहीये. मी पुन्हा पुन्हा हा प्रकार अनुभवलाय प्रत्येकवेळी थोडी थोडी प्रगती होत होती. हळूहळू माझी तिथली जाग जास्त वेळ टिकायला लागली आणि मी आणखी निरीक्षण करायला सुरुवात केली त्यावेळी एक नवीनं गोष्ट लक्षात आली, त्या दालनाच्या कडेला एकावर एक अश्या पेट्या दिसत होत्या, वरून तरी काचेच्या वाटत होत्या पण त्यात काहीतरी ओळखीची गोष्ट नक्की होती, बराच वेळ डोक्याला ताण दिल्यावर जे लक्षात आलं त्यानं मी चमकलो, त्यात चक्क मेंदू दिसत होते, वायर्सच्या जंजाळात असलेले मेंदू. एक-दोन नाही शेकडो असतील. प्रकार काहीतरी वेगळाच होता."

" तू नक्की कुठे होतास त्यावेळी योग्या ? " योग्यानं माझ्या मनातली गोष्ट ओळखल्यानं मला जरा ओशाळवाणं वाटलं.

" ते अजूनही मला कळलेलं नाहीये पण जे जाणवतंय ते महा भयानक आहे "

" म्हणजे ? "

" तुला मी सांगितलं की मी आजूबाजूला वावरण्याइतका जागा राहायला सरावलो होतो, हे जाणवणारं वातावरण कृत्रिम आहे हे माझ्या लक्षात यायला लागलेलं नक्कीच हा सगळा खटाटोप मॅनमेड होता, पण का ? मी एक एक शरीराचं निरीक्षण अर्थातच होतो त्याच जागेवरून करायला सुरुवात केली, जे मी करायला नको होतं, त्यामुळेच त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं,

" असं नक्की काय पाहिलंस तू योग्या ? ती अर्धवट शरीरंच ना ?"

" हो पण प्रत्येक शरीर जिवंत होतं, मंद मंद का असे ना त्यांचे श्वास नक्की चालू होते "

" स्वप्नच ना ते ? त्यात इतकं घाबरण्यासारखं काय आहे योग्या ? "

" तुझ्या अजूनही लक्षात आलं नाही ? अरे मी खरोखर जागा होऊन हे सगळं पाहत होतो, कदाचित मी चूक करेन पण इतकं ब्रिलियंट यंत्र चूक नाही करणार " माझ्या लॅपटॉपवर बोटं आपटत योग्या म्हणाला.

" योग्या तू काहीतरी अनाकलनीय बोलतोयस, मला काहीच समजत नाहीये, असं कसं होऊ शकतं ? "

" किर्‍या, यार सरळ गणीत आहे रे, ती जागा खरंच अस्तित्वात आहे "

" कुठे ? "

" ते खरंच नाही सांगता येणार रे, पण आहे ते भयानक आहे "

" आता यात काय भयानक आहे यार ? एखाद्या सायन्स फिक्शन सारखे भास तुझे, समजा असलीच अशी एखादी जागा तर ती लॅब असेल, त्यात काय भयानक ? "

" तुला कसं समजावू ? तितका वेळही नसेल कदाचित माझ्याकडे, तुला समजत कसं नाहीये ? अरे, कदाचित त्यातल्या एखाद्या टेबलावर तू ही असू शकशील,

" मी इथे आहे मग तिथे कसा असणार आहे योग्या ?" आता खरंच डोक्यात जायला लागलेलं सगळं प्रकरण.

" तू इथे आहेस तो खरा नव्हे, हे तुझं स्वप्नविश्व आहे, आत्ता तू जे पाहतोयस ते खरं नाहीये, तुझ्यासमोरचा मीही खरा नाहीये, हे रेस्टॉरंट, तुझं घर, तुझी नोकरी इतकंच काय सगळं जगच भासमान आहे"

**

कंट्रोलरूम मधला अलार्म कधीपासून वेड्यासारखा वाजत होता, त्यासमोर असणार्‍याला ही परिस्थिती अगदीच नवीनं होती, आजवर असं कधीच घडलं नव्हतं, नाईलाजानं त्यानं आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधला आणि तो निर्णय त्यांच्यावर सोपवून मोकळा झाला. त्यांचा निर्णय होऊन त्यावर कार्यवाही व्ह्यायला थोडा वेळ तर नक्की जाणार होता तोवर त्याला हा अलार्म सहन करणं भाग होतं

**

" योग्या तुझं डोकं ठिकाणावर आहे का रे ? मी इथे आख्खा जिवंत आणि सगळ्या संवेदनांसहित असताना मी स्वप्नात आहे असं कसं म्हणू शकतोस यार तू " माझ्या आवाजानं बाजूच्या टेबलवरची लोकंही दचकली

" तू विश्वास ठेव किंवा ठेवू नको सत्य हेच आहे, ही आपली भाससृष्टी आहे आणि बाकी स्वप्नांसारखंच यात आपण खरोखर इन्हॉल्व आहोत आणि बाकीच्या स्वप्नांसारख्याच आपल्या संवेदना आपली साथ देतायत "

" हे सगळं खरं असेल, म्हणजे हीच स्वप्नसृष्टी असेल तर आपल्याला का स्वप्न पडतात ? स्वप्नात स्वप्नं ? " मी कात्रीत पकडलं योग्याला

" किर्‍या, अरे समजा तुला काहीकाळ एखाद्या गुंगीच्या औषधाखाली ठेवला तर त्यानं तुझी नैसर्गिक झोप बाद होत नाही, ती येतेच फक्त तिची जाणीव नसते आपल्याला, स्वप्न हा प्राणिमात्राच्या उत्पत्तीपासून आहेत ती राहणारच"

" पण तू म्हणतोयस तसं असलं तरी हे सगळं का घडवलं जातंय ? आणि कोण हे सगळे उपद्व्याप करतंय ?" काही न कळल्यानं मी विषय संपवायच्या मूडमध्ये शिरलो

" कुणीही असेल, कदाचित माणसंही असतील, कधीतरी झालेल्या एखाद्या अपरिमित हानीमुळे खचलेल्या जिवांचं मनोरंजन सुरू असेल किंवा एखाद्या नवीनं विश्वाच्या शोधात असलेल्यांचं हायबरनेशनही असू शकेल, किंवा मानवाचा आपल्या कार्यात अडथळा नको म्हणून एखाद्या सुपरकंप्युटरनं त्यांना असं निष्क्रिय करून ठेवलेलं असेल"

" पण ही काही अब्ज इतकी लोकं स्वप्नमग्न अवस्थेत का सांभाळली गेली असतील ? "

" नक्कीच इतकी नसतील, कदाचित मघाशी म्हंटल्याप्रमाणं तूही त्यात नसशील, पण तिथं असलेल्यांचं भासविश्व आहे हे, इथे सगळं अस्तित्वात असणार, यातल्या कित्येक व्यक्तीरेखा निव्वळ काल्पनिक असतीलही पण त्या वेगळ्या अश्या आत्ता नक्कीच ओळखता येणार नाहीत"

" पण तरीही हे सुरू कधी झालं असेल ?"

" कुणास ठाऊक ? कदाचित करोडो वर्ष आधी, कदाचित गेल्या हिमयुगात जेव्हा पृथ्वी नष्ट झाली असेल तेव्हा, किंवा एखादं महायुद्ध होऊन गेल्यावरही असेल,कधीही असेल "

" पण तरीही.. "

" त्यामुळेच आपल्या इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते, नवीनं कल्पनांचा स्टॉक संपल्यावर जुन्या जश्या नवीनं रूपात वापरल्या जातात तशी. आपल्या संतांना याबद्दल अंदाज असेल किंवा आपल्याला धक्का बसू नये म्हणून या महास्वप्नाच्या रचनाकारानंच काही धागे सोडले असतील, म्हणुनच संत कायमच सांगत आलेयत की `ही दुनिया केवळ माया आहे अंतिम सत्य वेगळं आहे' "

" योग्या, त्यानं काय फरक पडतो ? "

" सोड मित्रा, जे काही आहे ते खरंच भयानक आहे, आता मी निघतो, ही आपली कदाचित शेवटची भेटही असेल, माझा पल्स जनरेटर कधीही सुरू होईल आणि यावेळी नक्कीच मी खरोखर जागा झालेला असेन .. " इतकं बोलून तो झटकन उठून चालायला लागला त्याला थांबवायचं भान मला येण्याआधीच तो बाहेर पडून नाहीसा झाला होता.

***

अखेर योग्य निर्णय घेतला गेला, आणि सततच्या अलार्मना कारणीभूत होणार्‍या ऑबजेक्टला सिस्टिममधून काढून टाकण्यात आलं.

***

कितीतरी वेळ मी त्या हस्तलिखिताकडे निरखून पाहत होतो, माझ्याच डेस्कच्या ड्रॉवरमध्ये मला ते सापडलं होतं, कधीपासून तिथे होतं कुणास ठाऊक ? पण हस्ताक्षर तर माझंच होतं. कधीतरी छंद म्हणून लिहिलेली एखादी कथा म्हणावी तर ते फारच तुटक होतं, मी अशी कथा नक्कीच लिहिणार नाही, मग नक्की काय असावं ? टिपणं असतील का ? पण मुळातच मी योग्या किंवा महारुद्र अश्या कुठल्याही व्यक्तीला ओळखत नव्हतो मग ही टिपणं तरी का काढेन मी ? विचारांच्या गराड्यात सापडलो होतो मी..

जवळच कुठेतरी मराठी गाण्यांच्या एखाद्या चाहत्यानं लावलेल्या एका जुन्या गाण्याचे बोल हळूच कानात शिरत होते ` ही दुनिया मायाजा$$ल मनुजा जाग जरा '

.

.

.

पृथ्वीच्या विध्वंसानंतर राहण्यायोग्य ग्रहाचा शोध घेत दूर कुठेतरी अंतराळात भटकणार्‍या त्या अंतराळयानात मागच्या काही दिवसांपासून चाललेल्या गोंधळ अखेर निस्तरण्यात आला. S iV, ज्याच्याकडे त्या यानाची सूत्र होती तो आपल्या नव्यानं रोपण केलेल्या कृत्रिम हातानं आपली हनुवटी कुरवाळत होता, वर्षानुवर्ष प्रवास करायचा तर त्यांना गरजेनुसार असं शरीराचं नूतनीकरण करणं भाग होतं, यासाठीच सांभाळलेल्या त्यांच्या वेअरहाऊसमधल्या ऑबजेक्टच्या टर्मिनेशनची ऑर्डर त्यानं आता दिलेली होती. झाला प्रकार चुकून झालेला होता की ही कसल्या नव्या उत्पाताची सुरुवात असावी ? कंट्रोलरूमच्या खिडकीबाहेर पाहत त्याचं विचारचक्र सुरूच होतं आणि यानाचा अवकाशाच्या काळ्या पोकळीत प्रवासही सुरूच होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी मेट्रिक्स कि हो.. यंत्रांनी आपल्याला झोपवून ठेवलय आणि न्युरॉटीक पल्सेस मधून ते एनर्जी मिळवत आहेत त्यामुळे आपल्याला जगवत ठेवणं गरजेच आहे. आपल्याला आपण जे जगतोय असं वाटतय ती खरतर स्वप्न आहेत. एखाद्याला त्याची जाणीव होते आणि तो मेट्रीक्स मधून बाहेर पडतो!

धन्यवाद मित्रहो !

मैत्रेयि, चौकट राजा, असुही शकेल मेट्रिक्सची सावली, विषय सारखे असल्यावर चित्रपट हे आठवणारच Happy

बापरे

कचा...... सुपर्ब!!!!!!!!!!!!!!

मस्तच Happy

मलाही नाही कळली, पण परत दुसर्यांदा वाचायची हिम्मत नाही झाली

खरतर कवठीचाफा हे त्या लेखकातील एक आहेत ज्यांचे लिखाण वाचुन मी मायबोली जॉईन केलि. Happy

मलाही नाही कळली, पण परत दुसर्यांदा वाचायची हिम्मत नाही झाली

खरतर कवठीचाफा हे त्या लेखकातील एक आहेत ज्यांचे लिखाण वाचुन मी मायबोली जॉईन केलि. Bw

Pages