मन्या

Submitted by बेफ़िकीर on 7 May, 2016 - 12:57

"बिडी दे"

"तुझी तू विकत घे"

"बेनाम बादशहामधल्या जुही चावलाच्या ब्लाऊजसारखी टाईट हालत आहे आपली"

"घे"

"थँक्स"

मन्याच्या उपमेवर नाही, जुही चावलाच्या टाईट ब्लाऊजवर नाही पण मन्याच्या 'जग इज टेकन फॉर ग्रॅन्टेड'वाल्या देहबोलीसमोर नेहमीप्रमाणे शरणागती पत्करत मी बिडी ऑफर केली. त्याला ब्रँडचे वावडे नव्हते. सिगारेट, बाई, चर्चा, चिता आणि होळी ह्या पेटवण्याच्या बाबी आहेत ह्यावर ठाम असलेला मन्या म्हणाला:

"सॉरी, आज तुझ्याबरोबर बसता नाही येणार"

"बोलवतंय कोण भडव्या तुला?"

आकाशात दुपारीच दिसू पाहणार्‍या चंद्राच्या जखमेवर फुंकर मारावी अश्या आविर्भावात वर बघत धूर सोडत मन्या म्हणाला:

"माझे मी क्लीअर केले. तू बोलवल्यावर तुझा अपमान केला असे तुला वाटायला नको"

"हाड"

मन्याच्या डिक्श्नरीमध्ये 'हाड' ह्या शब्दाचा अर्थ 'तू माझा अजून थोडा वेळ घेऊ शकतोस' असा होता.

"बाकी काय चाललंय?"

"फुकट्यांना बिड्या पाजणे"

"आई कशीय?"

"जाऊन सहा वर्षे झाली"

"तुझी नाही भडव्या, सार्थकची"

सार्थकची आई सेक्सी होती. तिच्याकडे बघण्याचे सार्थक व्हायचे. तिला सार्थक झाला ह्यावर विश्वासही बसायचा नाही. स्माईलही असे द्यायची जसे काही अख्ख्या विश्वात पहिल्यांदाच एक माणूसप्राणी दिसला. हे ह्या अक्कलशून्य मन्याला मी कधीतरी सांगितलेले होते आणि त्याने लक्षात ठेवले होते.

"तो विषय संपला"

"का?"

"बायकोशी मैत्री झाली तिची"

"तुझ्या?"

"मग कोणाच्या?"

"सध्या काय करतोस?"

"फुकट्यांना बिड्या पाजतो"

"हे जरा जास्त होतंय! आजवर मीही तुझ्यासाठी खूप काही केलंय"

"काय केलंय?"

"काहीही केलं नाही?"

"काय केलंय?"

"काहीही नाही?"

"काय केलंय तेवढं सांग"

मन्या एक वलय माझ्या थोबाडावर सोडत म्हणाला:

"एन्टरटेनमेन्ट"

"घंटा"

"चल, निघतो"

"निघ"

मन्या चालत चालत निघून गेला.

मनातील अगम्य भय, चिंता वगैरेंना थोटकाच्या स्वरुपात चिरडत मीही उलटपावली निघालो. मनात विचार आला. एन्टरटेनमेन्ट! दुसरे काय हवे असते मनाला? प्रत्येक क्षणी साली करमणूक हवी. आपण वाईट ठरणे, आपण उदास ठरणे, आपण मायूस ठरणे, आपण विजेता ठरणे, आपण जबरी ठरणे, आपण, आपण, आपण! आपण ठसत राहणे! ह्यातच मन विरंगुळा शोधत आहे. आणि हे फक्त आपलेच नाही. आधीच्या सगळ्या आणि येऊ घातलेल्या सगळ्या पिढ्यांचे हेच आहे. 'आपण' कोणीतरी आहोत हे जगाने अ‍ॅकनॉलेज केले की झाले. 'आपण' कोणीच नसणे उत्तम असते अशी मनस्थिती कोणाची नाहीच! ही कुठली उर्जा?

मन्याचा तोंडावर इन्सल्ट करणे शक्य आहे म्हणून आपण तो करतो. असेच आपण बायकोशी, बापाशी, शेजारपाजारच्यांशी, वॉचमनशी, रिक्षावाल्याशी आणि व्हॉट्स अ‍ॅपवरच्यांशी वागू शकतो का?

प्रथमच मला मन्या ही एक दैवी देणगी वाटली.

असा एक मनुष्य जगात असणे, ज्याच्याशी वागताना तुम्ही मनामधील विचार कोणतेही लिखित-अलिखित नियम मध्ये न आणता व्यक्त करू शकता अशी व्यक्ती! मन्या हा एक 'निनावी इसम' आहे. निगरगट्टपणाचा कळस आहे. गेंडा आपल्या बायकोला विचारेल, मन्याच्या कातडीची आहेस का? बायको लाजत लाजत म्हणेल, इश्श्य, इतकी काही मी 'ही' नाही हं?

मन्याने एकदा कोणाच्यातरी पैशाने स्वतःसाठी भाजी घेत असताना भाजीच्या स्टॉलवरील गर्दीमुळे चुकून खेटून उभ्या राहिलेल्या बाईला सांगितले होते:

"बाई, जरा लांब उभ्या राहा. नंतर म्हणाल ह्याने धक्का मारला"

बाई फणकारत निघूनच गेली तिथून, असे मन्या म्हणाला.

मला पटले. मन्या काहीच्या काही बोलू शकायचा.

'बाई' हा मन्याचा वीक पॉईंट होता. जर्रा कोणी बरे दिसले की आजूबाजूच्या जगाला फाट्यावर मारत मन्या मान वळवून वळवून तिकडे बघायचा. त्या बाबतीत मन्या बोलायचाही आरपार! काही का असेनात, त्यामुळेच मन्या आमच्या गळ्यातला ताईत होता. कित्येक अव्यक्त धुमारे त्याच्या जिभेवर दृश्य स्वरूप घेऊन 'आवाज' ह्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचायचे.

"कसली चालतीय बघ"

"हिला ब्लॅक कलर जास्त शोभतो"

"पापण्या पाहिल्यास का? फडफड नुसती"

"अरे वा, आज जीन्स का?"

मन्या असे बोलत राहायचा आणि आम्ही उघडपणे चोरून हसायचो. काहीवेळा काळजीच वाटायची. आपलीच बायको जायची आणि हा वाय झेड काहीतरी बोलेल की काय? पण त्याला किमान अक्कल होती.

संक्रांत आली की मन्याला जणू मोहर यायचा. सगळ्याच बायका काळ्या साड्या नेसून! कोणाला कोठे ठेवू असे व्हायचे मन्याला! प्रत्यक्षात तो स्वतःलाही एखाद्या जागी नीट ठेवू शकत नसायचा. रथसप्तमीपर्यंत मन्या अस्थिर फुग्यासारखा हवेत उडत राहायचा. एकदा सगळ्या काळ्या साड्या कपाटात जाऊन बसल्या की मन्या जमीनीवर यायचा.

मन्याला कधीच न मिळालेल्या गोष्टींची यादी अगदीच लहानशी होती. तीनच गोष्टी! नोकरी, बायको आणि आदर!

एकदा मन्याने किस्सा सांगितला:

"च्यायला राधिका मुळूर आणि मी लिफ्टमध्ये! पहिल्या मजल्यावर जाईपर्यंत लाईट गेले. थांबली ना येड्या लिफ्ट? टोटल अंधार! तिचे ते श्वास वगैरे काय असते ते! मी येडा! करतो काय?? मला म्हणते कशी? टूडे इज च्यूस्डे! आयला क्षणभर मला तो शब्द ऐकून काहीतरी वेगळेच वाटले. पण आपण सज्जन! म्हंटलं हां ना! आज कशी काय गेली लाईट? तर म्हणे नो इश्यूज! आता हे काय मला माहीत नाही होय कट्या? तेवढ्यात जनरेटरवर लिफ्ट चालू झाली. आम्ही एकमेकांकडे बघितले ना? तुला सांगतो हेम्या, अरे काय नजर होती ती! चाहते तो तुम कुछ भी कर सकते थे असे म्हणणारी! गेले तीन दिवस झोपलो नाहीये भडव्यांनो! रात्रीसुद्धा! कायम पार्किंगमध्ये उभा असतो मी! गाडी काढायला आली की गूढ हसते. खरं सांगू का? काहीतरी घडण्यापेक्षा काहीतरी घडू शकतं हे फीलिंगच जबरी असतं! हम मजामा!"

राधिका मुळूर खिजगणतीतही नव्हती कोणाच्या! मन्याला तो प्रसंगही सूचक वाटला.

विंगमध्येच राहणारा मन्या भेटायचा मात्र ओपन रस्त्यावरच! त्याच्या घरी कोणी जाण्याचे कारणच नव्हते. तो बहुधा एकटाच राहायचा.

मन्या कसा जगतो हे बघायची कोणालाही इच्छा नव्हती. किंबहुना तो का जगतो हेही बघायची कोणाला इच्छा नव्हती.

माणसाने खरे तर असे असावे. असला काय अन् नसला काय! जगाला काही फरकच पडू नये.

पण मन्या दिसत, भेटत, बोलत, वागत आणि व्यापत राहायचा.

मन्या हा आमच्या चर्चेचा विषय व्हायचे कारणही तसेच हॉट हॉट होते.

डोमकुंडवार असे आडनांव धारण करणारी मनीषा पी एच डी होती आणि वय तीस ते पस्तीसच्या दरम्यान! एका फ्लॅटमध्ये एकटी राहायची. नो लग्न बिझिनेस! फिगर, रंग आणि चेहरा सुमारे पाचशे जणींमध्ये उठून दिसतील असे! नो वंडर, तमाम लोकांसाठी ती एक रहस्य होती. म्हातारेकोतारेही 'बाळा', 'ताई' असे संबोधून चार शब्द बोलून घ्यायचे. तरुण पुरुषांची तर हिम्मतच व्हायची नाही. चेहरा हसरा असूनही मनीषा कोणाकडेही बघून हसायची नाही. बिल्डिंगमधील एक म्हणजे एक बाईसुद्धा तिची मैत्रीण नव्हती. त्यामुळे तिच्याबद्दलच्या अफवा अफाट! बायकांच्या भिशी ग्रूपमध्ये तर ती एक विषयच असायची 'म्हणे'! अख्ख्या सोसायटीतल्या बायका एकीकडे आणि मनीषा डोमकुंडवार दुसरीकडे, तरी तिचेच पारडे जड! सोसायटीने नोटिस लावली की एक्स्ट्रॉ हजार रुपये भरा की पहिला चेक मनीषाचा! तिच्याकडे काही जाऊन मागण्याचीही संधी मिळायची नाही. तिला कोणाची गरजच भासायची नाही. तिला कोणाचीही गरज न भासणे इतक्या जणांना खटकत होते की बास रे बास! तिची गाडी स्टार्ट झाली नाही असे कधी व्हायचे नाही. तिच्या घरातील केराचा डबा वॉचमन यायच्या आधी बाहेर ठेवला गेला नाही असे कधी व्हायचे नाही. तिची कोणतीही बिले कधी थकायची नाहीत. ती कधी केस विंचरायला टेरेसमध्ये यायची नाही. ती सोसायटीच्या मीटिंगमध्ये आली तर मेजॉरिटीच्या बाजूने एक मत देऊन निघून जायची.

कोणतीही गरजच लाभत नसलेल्या स्त्रीसाठी हा समाज सर्वाधिक घातक समाज आहे.

नाही म्हणायला ती जवळून गेल्यावर एक अगम्य सुगंध जाणवायचा. ती लिफ्टमध्ये असलीच तर अनेकांना लिफ्ट बंदच पडत नाही ह्याचे दु:खही व्हायचे.

एक दिवस मन्या तिच्या टू व्हीलरवर तिच्या मागे बसलेला सोसायटीने पाहिला.

रात्री चांदनीला पार्टी झाली. प्रमुख आकर्षण मन्या!

"साल्या तुझे नांव मन्या आणि तिचे मनीषा! जोडी भारीच"

"फालतू बकबक नको! निव्वळ लिफ्ट होती ती"

"आम्ही नाही रे कधी मागू शकलो लिफ्ट ती?"

"बुडाखाली चारचाकी असतात तुमच्या"

"तू लिफ्ट घेतलीस कशी एवढे सांग मन्या, भंकस नको"

"थेट विचारले, कॉर्पोरेशनला जायचे आहे, कुठे सोडू शकाल?"

"मग?"

"म्हणाली डेक्कनला"

"मग?"

"म्हंटलं ओक्के?"

"दॅट्स इट?"

"दॅट्स इट"

"कसे वाटले ते सांग आता"

"तेवढे नका विचारू"

"का?"

"भणभण भणभण होते नुसती डोक्याची! यडाबिड्डाय का? मनीषा डोमकुंडवार अर्ध्या फुटावर! आ?"

"तू बोलत राहा रे"

मन्याने न विचारता कोणाच्यातरी पेगमधील एक प्रदीर्घ घोट घेऊन तिसर्‍याचीच विल्स शिलगावत काळ्या आकाशाकडे बघत कवीवत चेहरा केला आणि म्हणाला:

"एक हुरहुर, एक तडफड, एक जळजळ असते त्यात! एक स्वर्गसुख सामावलेले असते. एक अनोखा गंध आपली कानशिले तापवतो"

"हेल्मेट होते का?"

"घंट्याचं हेल्मेट! हे असे भुरभुरणारे केस जातायत नाकातोंडात"

"फेकू नकोस भडव्या"

"तुझ्याच बायकोनी बघितलंय, घरी जाऊन विचार! मनीषा डोमकुंडवारने कधी हेल्मेट घातले असेल तर आपण ही विल्स पिणे सोडून देऊ"

"ब्रिस्टॉल ओढशील"

"मी तुझ्या लायकीला येणार नाही"

"प्रसंगाचे वर्णन कर, मार खाशील बाकीचे बकलास तर"

"अख्खा रस्ता तिच्याकडे बघतो"

"ते माहीत आहे"

"आपण तिचे आपल्या नाकातोंडात जाणारे केस बाजूला सारून तिच्या पाठीकडे बघतो"

"मग?"

"एक नितळ सरोवर, गोर्‍या रंगाने उफाळलेले, उन्हामुळे रक्तिमा पसरलेला"

"थोबाड फोडीन, काही बोलली का?"

"एक शब्द नाही"

"मग?"

"उतरल्यावर म्हणाली तुम्ही मागे असल्यामुळे सगळे सिग्नल पाळले"

"काय?"

"आणि खळखळून हसली. कॅफे गुडलकसमोर भर सकाळी चांदणे सांडले"

"आणखी काही?"

"मी म्हणालो हक्काने सांगत जाईन, लिफ्ट हवी असेल तेव्हा"

"मग????"

"केस झटकत गूढ हसत होकारार्थी मान हलवून निघून गेली"

"जिंकलंस मित्रा"

"पण एक प्रॉब्लेम आहे"

"काय??"

"जाताना गुड डे भैय्या म्हणाली"

ह्या वाक्यामुळे त्या दिवशीची पार्टी, जी मन्याने देणे अपेक्षित होते, ती आमच्या सगळ्यांकडून मन्याला मिळाली. शेवटी त्या मनीषाला एक तरी भाऊ मिळाला होता सोसायटीतून! किंबहुना, एक भाऊ तरी मिळाला होता असे म्हणायला हवे.

कधीतरी वाटायचे की मन्या आपल्याला समजलेला नाही हेच बरे आहे. समजला तर आपल्याला आपण आपल्यासारखे असणे अवघड होऊन बसेल.

आरती जयस्वालने एकदा भर मीटिंगमध्ये मन्याची इज्जत घालवली होती. म्हणाली:

"भाईसाहब, आपको तो पताही नही है फॅमिली क्या होती है, आप क्यूं बात कर रहे है"

आरतीचे बोलणे कोणालाच पटले नाही, आवडले नाही. पण मन्या खदखदून हासला. म्हणाला:

"तभी तो बात कर पा रहा हूं मॅडमजी, शादीशुदा मर्द कहां बात कर पाता है?"

तमाम पब्लिक हसले, आरतीसकट!

एकदा आम्ही मन्याला भाजी विकत घेऊन ती एका भिकारणीला देताना पाहिले. तिरस्कार वाटला. साला स्त्रीला भुलवण्यासाठी हा मनुष्य काय करेल कोण जाणे!

एकदा धरलाच त्याला.

"तू रोज जेवतोस काय रे?"

"नूडल्स किंवा भात, का?"

"कोण करतं?"

"माझ्याघरी काय बायकोय काय साल्यांनो? मीच करतो"

"मग भाजी कशाला विकत घेतोस?"

"भाजी घ्यायला कोण कोण येतं माहितीय का तुम्हाला? अरे एकेकीचे बार्गेनिंग बघून असे वाटते की साला...."

"बकवास करू नकोस, तू भाजी का घेतोस?"

"अरे मी फारशी घेत नाही. त्या पलीकडच्या भिकारणीला देऊन टाकतो"

"ते बघितलेय आम्ही! तिला कशाला देतोस?"

"तुम्ही कोण रे भ्येंच्योत विचारणारे?"

"उत्तर दे भडव्या, तू भिकारणीलाही सोडत नाहीस"

मन्या हवालदिल! निघूनच गेला.

मन्याला त्याच्या सेव्हिंगचे व्याज यायचे. महिना साडे आठ हजार! हा शोध आमच्यातील एकाने लावला. बहुधा मन्या ते पैसे नूडल्स किंवा तांदुळ आणायला वापरत असावा. बाकीचे शौक तो इतरांची त्याच्यामते असलेली 'एन्टरटेनमेन्ट' करून पुरे करायचा.

मन्याचे भेटणे नकोसे व्हायला लागले. काय सारखे बाई बाई! बाकी काही विषयच नाही. च्यायला तो करतो काय, त्याच्यावर जबाबदारी काय, काहीच माहीत नाही. वर त्याला फुकटात बिड्या पाजा, अधेमध्ये दारू पाजा, मनोरंजन करून घ्या, वगैरे वगैरे!

एकदा सगळ्यांचे ठरले. आज मन्याला फाडायचाच! म्हणजे त्याच्याकडून पार्टी उकळायची असे नव्हे. पण तो ज्या बाईबद्दल बोलेल त्या बाईशी त्याला बोलायला पाठवायचेच. मन्याला यत्किंचितही कल्पना नाही.

सगळे पूजा टी स्टॉलपाशी जमले. मन्या आला. चार, सहा बायका गेल्या. मन्याने यथामती कमेंट्सही केल्या.

शेवटी एक अनोळखी बाई आली. ही बाई त्या एरियात आम्ही कोणीच कधीच बघितलेली नव्हती. टीशर्ट, जीन्स आणि एक मुलगी सोबत! लहानशी!

पटाककन् आम्ही डोळे मिचकावले. आमच्यातील एक जण मन्याला म्हणाला:

"मन्या, ह्या बाईला भिड! तर तुला आपण मानले"

मन्याचा चेहरा गंभीर झाला. कोणाचेही काहीही न ऐकता तो त्या बाईपाशी गेला. ती बाईही त्याला बघून थबकली.

मन्या त्या बाईशी काहीतरी बोलून आला. त्या बाईच्या चेहर्‍यावर घृणा होती. हे आम्हाला अपेक्षितच होते. मन्याने मार खाल्ला नाही हेच खूप झाले असे आम्ही म्हणालो.

"काय म्हणालास बे तू तिला?"

"विचारले, बेबी कशी आहे"

"मग?"

"म्हणाली तुझा काय संबंध?"

"मग?"

"मग आलो परत इथे, हा हा हा हा"

मन्या हसला.

मग मन्या अचानक रडला.

म्हणाला:

"ती माझी बायको होती. जी दुसर्‍या कोणावर तरी भाळली. मला सोडले. बेबीशी माझा संबंध नाही हे वाक्य तिने उच्चारले नसते तर अजून काही दिवस जगलोही असतो"

आम्ही धड डोळे मिचकावत होतो ना हसत होतो.

दुसर्‍या दिवशी सकाळी बातमी आली.

'मन्या गेला'

राधिका मुळूरने पहिला हार वाहिला प्रेतावर. म्हणाली 'किती छान माणूस होता'! आरती जयस्वाल लांब उभी राहून रडत होती. आणि मनीषा डोमकुंडवारने एकच फूल वाहिले आणि म्हणाली:

"बहनजी, मुझे डेक्कन पहुंचादोगी क्या, असे विचारणारा एकच माणूस भेटला होता, तोही गेला"

मन्या गेला. जाताना आम्ही कसे असावे हे शिकवून गेला.

'कसे नसावे, हेही'!

============

-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रंगली होती!
पण अचानक 'शेवट' मध्येच आडवा आला, तो ही न पटणारा !

बाकी व्यक्तिचित्र झकास रंगवले आहे !

लेख नेहमीप्रमाणेच जबरदस्त!

>>काहीतरी घडण्यापेक्षा काहीतरी घडू शकतं हे फीलिंगच जबरी असत>> हे वाक्य खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच पटलं आणि रिलेट पण झालं. Happy

मन्याचा शेवट करूण होणार हे कुठंतरी जाणवलं वरती, आणि मनोमन तसं होऊ नये अशी आशा पण करत होते, पण तो झाला तसाच. अशा व्यक्ती मनस्वी असतात बहुधा, तोंड मात्र फाटकं असतं... शेवटी कोणाच्याही मनाचा तळ गाठ्णं अशक्य.

सुंदर व्यक्तिचित्रण.

(जरा लवकर लवकर लिहित जा)

>>कशा हो सापडतात तुम्हाला अशा आउट ऑफ (नॉर्मल) व्यक्ती.<<

अश्या आउट ऑफ (नॉर्मल) व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतातच, फक्त आपण काणाडोळा तरी करतो, किंवा आपल्या कडे बेफीं सारखी नजर तरी नसते. (पुन्हा एकदा) अफाट व्यक्तीचित्रण...

-प्रसन्न

काहीतरी घडण्यापेक्षा काहीतरी घडू शकतं हे फीलिंगच जबरी असत>>> हे वाक्य चेरी ऑन टॉप.. रिलेट झालं Happy

तुम्ही लेखनातुन एका सामान्य जीवन जगणार्‍या माणसाला पन बरेच्दासेलिब्रेटी बनवून टकता बेफि _/\_

मस्त आहे
सिगारेट , दारू हे असल्याशिवाय कथा बेधडक बेफिकीर होत नाही का??

हिंदी सिनेमासारखे हिंसाचार, विनोद, दारू, सेक्स हे सर्व मसाले फोडणीला टाकल्याशिवाय बेफिकिरी बिर्याणी तय्यार होत नाही. च्यव येगळीच हये बेफिकीर रश्शाची.

जव्हेरगंज +१.

> कोणतीही गरजच लाभत नसलेल्या स्त्रीसाठी हा समाज सर्वाधिक घातक समाज आहे. > लाभत? कि लागत?? काहीच नसते तरी चालले असते.