ग्लास टॉप, हॉब टॉप, फॅन्सी गॅस शेगडी - ग्राहकांच्या जिवाशी खेळ?

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 15 May, 2016 - 22:39

LPG-accidents.jpg
परिक्षा संपल्या, त्या परिक्षांचे निकाल लागले. सुट्ट्या सुरु झाल्या आणी संपल्या. लगेच संपल्या? हो... लगेच संपल्या. शाळेत SSC बोर्ड बदलून CBSE चे वारे वाहायला लागल्याने शाळा 4 एप्रिलला सुरुही झाल्या.

दोन्ही चिरंजीवांच्या शाळा सकाळी, त्यात धाकटा CBSE ला तर मोठा SSC बोर्डच्या 10 वीच्या वर्गात पदार्पण. एकाची बस 6.55 ची तर दुसऱ्याची 7.05 ला म्हणजे सकाळी 6.45 ला सर्व म्हणजे डबे - मोठा - पोळीभाजीचा, छोटा - स्नॅक्सचा, या डब्यांच्या बरोबरीने चहा, दूध, एखाद्या वेळेस पाणी नसेल, वीज नसेल तर गॅस च्या चूलीवर पाणी तापविणे - एक ना अनेक कामे फक्त दोन बर्नरच्या शेगडीवर. सगळी कामे एकाचवेळी मल्टीटास्कींग करुन करावी तर काही तरी पर्याय हवा म्हणून "चार बर्नरची शेगडी" असती तर? असा विचार मनात आला आणी आम्ही उभयतांनी - गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर खरेदी करु - असा विचार केला.

गुढीपाडवा आला पण दुपार पर्यंत बाजारात जाण्यास कामातून वेळच नाही मिळाला, पण मुहुर्त साधायचा म्हणून उन्हं कलताच दोघेही बाहेर पडलो. आता पहिला प्रश्न आला कोणत्या दुकानात जावे? मुंबई ग्राहक पंचायतीच्या "ग्राहक पंचायत पेठे" मध्ये प्रेस्टीज (टीटीके प्रॉडक्टस्) चा स्टॉल होता, त्यांचे सिंहगड रोडला कंपनी आऊटलेट आहे असे समजले होते म्हटले श्रीगणेशा तेथून करावा.

प्रेस्टीजच्या दुकानात शिरलो आणी चार बर्नरच्या गॅस शेगड्या दाखवा असे सांगितल्यावर विक्रेत्याने एकदम हॉब टॉप व ग्लास टॉप असे शेगड्यांचे प्रकार दाखवायला सुरुवात केली. आकर्षक असे प्लेटींग केलेले बर्नर, वर लावलेली हार्डन्ड/टफन्ड ग्लास, ऑटो इग्नीशनची सोय, ओट्यावर किंवा ओट्यामध्ये (हॉब असेल तर हॉबमध्ये) ठेवण्याची सोय, पाईप जोडण्याचे नोझल 360 डिग्रीमध्ये फिरणारे अशा एका ना अनेक सुविधा. या शेगड्यांपुढे घरची दोन बर्नरची शेगडी अगदीच छोटी वाटू लागली. या सगळ्या ग्लासटॉप शेगड्यांमधून शेवटी एक निवडली आणी खरेदी अंतिम टप्प्यात येण्यापूर्वी आमच्या दोघांच्याही डोक्यात या शेगड्यांना ISI (Indian Standard Institute) मार्क आहे का? असा प्रश्न आला. आम्ही त्या विक्रेत्याला लगेच ते विचारले आणी आम्हाला उत्तर ऐकून धक्काच बसला. त्याने सांगितले कोणत्याही ग्लास टॉप, हॉब टॉपला ISI मार्क येत नाही.

झालं! , त्या विक्रेत्याला ती शेगडी ठेवायला सांगुन आम्ही घरी परतलो, पण हा ISI चा मार्क डोक्यातूनही जाईना. मग विचार केला की आणखी एखाद्या दुकानात शेगड्या पहाव्यात. सिंहगड रोड वरचे गॅस शेगड्यांचे दुसरे शो-रुम ज्योती गॅस या ठिकाणी आम्ही मग दुसऱ्या दिवशी गेलो व त्यांच्या स्वतःच्या ब्रँडच्या शेगड्या पहायला सुरुवात केली पण यावेळी सुरुवातीलाच आम्ही आम्हाला ISI मार्क असलेलीच ग्लास टॉप किंवा हॉब टॉप दाखवा असे म्हटल्यावर एक आश्चर्यकारक उत्तर या शोरुम मधील विक्रेत्याकडून मिळाले ते म्हणजे या शेगड्यांना ISI मार्कची आवश्यकता नाही. आम्ही थोडेसे हबकूनच गेलो, कारण मुंबई ग्राहक पंचायती मार्फत मुंबईत BIS (Bureau of Indian Standards) च्या प्रशिक्षण शिबिरात घरगुती उपकरणांमध्ये गॅस, विजेची उपकरणे इत्यादींना ISI मार्क असलाच पाहिजे असे सांगितलेले होते इथे काही वेगळेच ऐकायला मिळत होते. याच शोरुम मध्ये इतर कंपन्यांच्याही शेगड्या होत्या व तेथील विक्री प्रतिनिधीने अशा कोणत्याही ब्रँडच्या ग्लास टॉप किंवा हॉब टॉप शेगड्यांना ISI मार्क येत नाही असे ठामपणे सांगितले. वर अशी ISI मार्क असलेली ग्लास टॉप किंवा हॉब टॉप शेगडी आम्हाला दाखवाच असे आव्हानही दिले. आम्ही ज्योती गॅसच्या व्हीजीटर बुक मध्ये आमचा नांव पत्ता नोंदवूनही आलो.

असा शेगडीचा शोध दोन, तीन ब्रँडस् पुरता मर्यादीत न ठेवता हाच शोध लक्ष्मी रोड, अप्पा बळवंत चौक इत्यादी शहराच्या मध्यवर्ती परिसरांतील दुकानांतून घेतला असता विविध ब्रँड्सच्या शेगड्यांचीही हिच परिस्थिती आढळून आली. काही ब्रँडच्या बाबतीत ते ब्रँड्स आंतरराष्ट्रीय (इटली, जर्मनी इ.) असल्याने ISI मार्कचे बंधन नाही असेही काही विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. तर काही विक्रेते ISO असल्याचे सागून ISI मार्कशी साधर्म्य असल्याचे दर्शवित होते. पण त्यांना ISI हा मार्क सुरक्षेचा असतो व ISO हे प्रशासनिक प्रमाणीकरण असते असे सांगितल्यावर, सदर विक्रेत्यांनाच ISI मार्क बद्दलची माहिती नसल्याचे किंवा अपुरी माहिती असल्याचे जाणवले. विक्रेत्यांकडे माहिती घेतली असता "शेगडीमुळे अजुनपर्यंत कोणतेही अपघात झालेले नाहीत" असाही एक शेरा एका विक्रेत्याकडून ऐकायला मिळाला. आमच्या मनात एक प्रश्न आला की जर गॅसला जोडलेले सिलंडर ISI मार्क असेलेले असायलाच हवे, त्या सिलेंडरला जोडलेला गॅस रेग्युलेटर ISI मार्क असलेला हवा, या रेग्युलेटरला जोडलेला रबरी/होज पाईपही ISI मार्क असलेला हवा, पण हे सगळं ज्या शेगडीला जोडायचे ती मात्र ISI मार्क नसलेली? हे काहिसे मनाला पटेना कारण गॅस शेगडीची पुर्ण व्यवस्थाच ISI प्रमाणित हवी, कारण अपघात या व्यवस्थेतील कोणत्या घटकामुळे होतील हे सांगता येत नाही.

हा ISI चा मार्क काही केल्या डोक्यातून जाईना, कारण आम्ही शोरुम्स मध्ये असे पर्यंत इतर ग्राहकांना अशा शेगड्यांची धडाक्यात विक्री सुरु होती.

शेगडीला ISI मार्क सक्तीचा आहे का नाही या करीता अंधेरी, मुंबई येथील BIS कार्यालयातील अधिकाऱ्यांना ई-मेल करुन विचारले असता त्यांनी तो ई-मेल संबंधित तांत्रिक विभागाला तो ई-मेल पाठविलेला आहे असे सांगितले. त्यानंतर या अधिकाऱ्यांना फोन लावून त्यांच्याजवळ चर्चा केली असता सदर शेगड्या ह्या सक्तीच्या 90 उपकरणांच्या यादीत नसून उत्पादकाने ISI मार्क घ्यायला हवा असे सांगितले. पण गॅस सिलेंडर, रेग्युलेटर, त्याला जोडणारा पाईप हे सक्तीच्या 90 उपकरणांच्या यादीत आहेत, पण गॅसची शेगडी मात्र नाही हे जरा अनाकलनीय वाटले. याच अधिकाऱ्यांनी ग्राहकांनी जर मोठ्या संख्येने BIS कडे अशी मागणी केल्यास BIS अशा यादीत हे उत्पादन जोडू शकते व उत्पादकांना ISI मार्क वापरणे सक्तीचे / बंधनकारक करु शकते असे सांगितले. परंतू सर्वसाधारण ग्राहकाचा विचार केला असता असे उपकरण अशा संस्थेने ग्राहकांकडून मागणी आल्यानंतर अशा सक्तीच्या यादीत जोडण्यापेक्षा ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करता आपणहून या सक्तीच्या यादीत (Mandatory List) टाकायला हवे.

या सबंधी आणखी एक बाबही लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे काही ब्रँड्सच्या स्टीलच्या तीन, चार बर्नरच्या शेगड्या ISI मार्क असलेल्या होत्या शिवाय त्यांची किंमतही या हॉब टॉप, ग्लास टॉप शेगड्यांपेक्षा निम्म्यापेक्षाही कमी होती, पण या हॉब टॉप, ग्लास टॉप दिसायला आकर्षक व त्यातील सोयीसुविधांमुळे सर्वसाधारण मध्यमवर्गीय ग्राहक या जास्त असलेल्या किंमतींकडे दुर्लक्ष करुन याच शेगड्या खरेदी करत असल्याचे दिसून येत होते.

घरगुती गॅस शेगड्यांकरीता IS:4246 हे मानक वापरले जाते जे सर्वसाधारणपणे स्टीलच्या दोन, तीन, चार बर्नरच्या शेगड्यांना वापरले जाते असे निदर्शनास आले आहे. या IS:4246 मानकाचे शेवटचे अद्यतन (Update) 2002 या वर्षी केलेले दिसत आहे. गेल्या 14 वर्षात बाजारात या उत्पादनात अनेक बदल झालेले दिसत आहेत. पण वर उल्लेख केलेले हॉब टॉप, ग्लास टॉप किंवा मल्टी बर्नर फॅन्सी कुक-टॉप्स गेले 8 ते 10 वर्षे बाजारात विना-सुरक्षा मानकीकरणाने विकले जात आहेत.

या संदर्भात काही मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्याशी चर्चा / विचारणा करताना या ISI मार्क नसलेल्या शेगड्या किती धोकादायक आहेत याचाही अंदाज आला. शेगडीच्या नॉब मधून गॅस लिक होणे, बर्नरच्या कडेला नॉब बंद केलेला असतानाही बारीक गॅस जळत असणे, ग्लास टॉप शेगड्यांची काच शेगडी वापरल्यानंतर अतिशय तापल्याने लगेच स्वच्छ न करता येणे, हॉब टॉप शेगड्या ह्या ओट्यामध्ये बसविलेल्या असल्याने त्या शेगड्यांमध्ये गॅस मंद पेटणे, या शेगड्यांचे बर्नर आकर्षक दिसण्यासाठी प्लेटेड स्टील, अल्युमिनियम अलॉय अशा प्रकारचे असल्यानेही ज्योत नीट न येणे, ज्योत पेटताना आवाज येणे अशा अनेक समस्यांची यादीच समोर आली.

या सगळ्या बाबींचा विचार करता, सध्या असलेले ISI मार्कचे प्रमाणीकरण हे फक्त स्टीलच्या शेगड्यांपुरते मर्यादीत न ठेवता या हॉब टॉप्स, ग्लास-टॉप्स, कुकटॉप्सनाही किंवा सर्व प्रकारच्या गॅस शेगड्यांना सक्तीचे करावे असे वाटते कारण कोणत्याही प्रकारची गॅस शेगडी ही सिलेंडर, रेग्युलेटर, त्याला जोडलेला पाईप यांच्यासह एक व्यवस्था असते. बाजारात धडाक्याने विकणारे वितरक व उत्पादक,
ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करता याअनुषंगाने ग्राहकांच्या जास्त करुन स्त्री वर्गाच्या जिवाशी खेळ करीत आहेत का? असा प्रश्न पडतो. आणी समजा या प्रकारच्या शेगड्यांना ISI मानकाकरीता नोंदविण्यास काही समस्या असतील तर अशा शेगड्या ग्राहकांनी वापराव्यात की नाही? हे ठरविण्याची वेळ आलेली दिसते. ग्राहक हा अर्थव्यवस्थेतील राजा असतो असे म्हणणारे खरंच ग्राहकाला अशी वागणूक देतात का? पण ग्राहकालाच या समस्यांची जाणीवच नसेल व तो जागृत नसेल तर बाजारात असे जिवाशी खेळ करणारे वितरक, उत्पादक अशी उत्पादने विकायला तयारच आहेत. त्यामुळे ग्राहकांनीच अशा उत्पादनांबाबत तक्रार, संबंधित नियामक संस्थांकडे करुन प्रमाणीकृत उत्पादनेच बाजारात येतील, विकली जातील याची काळजी घेतली पाहिजे. अशा चकचकीत दिसणाऱ्या किंवा भासणाऱ्या उत्पादनांपेक्षाही आपली स्वतःची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळेच “काय भुललासी वरलिया रंगा” या प्रमाणे वरवरच्या अशा उत्पादनांच्या रंग रुपाला न भुलता ती उत्पादने वापरण्यास किती सुरक्षित आहेत हे प्रथम पहावे.

या संदर्भात तेल कंपन्या पुरवित असलेल्या विम्यासंदर्भात इंटरनेटवर शोध घेतला असता अशा उपकरणांना ISI मार्क असलाच पाहिजे असा उल्लेख आढळतो, पण उपकरणे म्हणून त्यात सिलेंडर, पाईप, शेगडी असा वेगवेगळा उल्लेख दिसत नाही. या संदर्भात एचपी गॅस तसेच भारत गॅस या कंपन्याच्या अधिकाऱ्यांनी विमा कंपनी जर गॅस शेगड्यांना ISI मार्क नसेल तर अशा प्रकरणांमध्ये विमा रक्कम देण्यास नकार देऊ शकतात असे सांगितले.

तसेच काही राज्यात व आपल्या राज्यातील नागपूर विभागात घरोघर जाऊन गॅस निरिक्षक गॅस उपकरणांची तपासणी करुन त्यात त्रूटी असतील तर त्या दूर करायला सांगतात किंवा गॅस संदर्भात काही अनधिकृत गोष्टी आढळल्या तर सदर गॅस जोडणीच रद्द करु शकतात अशीही माहिती या संदर्भात समोर आली आहे. या अनधिकृत गोष्टींमध्ये गॅस शेगडीचाही उल्लेख आहे, परंतू गॅस शेगडीला ISI मार्क अशा निरिक्षणांमध्ये असायलाच हवा कि नाही या संदर्भातही गॅस कंपन्यांकडून खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही.

म्हणून अशा सर्व भूलभुलय्याच्या वातावरणात ग्राहकानेच म्हणजेच आपण सर्वांनी सजग राहून आपणच आपली सुरक्षितता ही सर्वोच्च आहे याची मनाशी खूणगाठ बांधून अशा व इतर उत्पादनांना ISI मार्क आहे ना याची खात्री करुनच अशी उत्पादने विकत घ्यावीत व वापरावीत. सदर लेखातील अनुभव हा फक्त गॅस शेगडीकरीता मर्यादीत न ठेवता विद्युत उपकरणे व इतर अशीच महत्वाची उपकरणे यांनाही तपासून पहावा याच करीता हा लेखन प्रपंच.

- सौ. स्नेहल मिलिंद चुटके,
मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग

सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणखी एक मजेची बाब म्हणजे जर एखाद्या ग्राहकाने नवीन गॅसजोडणीकरिता अर्ज केला तर त्याला वितरकाकडून शेगडी विकत घेण्याचा आग्रह केला जातो. जर ग्राहकाने आधीच शेगडी विकत घेतली असेल तर त्या शेगडीला वितरकाकडून पुरविली जाणारी नळी, रेग्युलेटर व सिलींडर जोडण्यापूर्वी त्या शेगडीची तपासणी करण्याच्या नावाखाली रुपये अडीचशे (रु.२५०/-) इतकी रक्कम मागितली जाते. प्रत्यक्षात ही रक्कम घेऊनही अशी कुठलीही तपासणी केली जात नाही.

हे म्हणजे फक्त ग्राहकाने शेगडी वितरकाकडून न घेतल्याने द्यावी लागणारी अतिरिक्त खंडणी असाच प्रकार आहे.

एकदम टायमवर आलाय हा धागा... दुसर्‍या एका धाग्यावर कोणती शेगडी घ्यावी अशी विचारणा नुकतीच झालेली आहे तर तिथे ही लिंक द्यायला पाहिजे...

सौ. स्नेहल मिलिंद चुटके,

खुप छान महिति दिलित, खरच मि पण ति शेगडि घेन्याचा विचारात होते, तुमचा महितिचा खुप फायदा झाला, मनापासुन धन्यवाद.

आय एस प्रंमाणपत्राविषयी

बीआयएस या संस्थेतर्फे कुठल्याही उत्पादनाचे निकष ठरवले जातात. या निकषांच्या कसोट्यांवर उतरणा-या उत्पादनाला आय एस सर्टिफिकेट मिळते. याचा अर्थ ज्या उत्पादनाला आय एस सर्टिफिकेट नाही ते गुणवत्तेत कमी असलेच पाहीजे असं काही नाही. प्रमाणपत्रामुळे विश्वास येतो हे खरे आहे. पण नवे तंत्रज्ञान, नवा धातू हे आय एस ने प्रमाणित करायला वेळ जाऊ शकतो. बीआयएस कडे स्वतःची तज्ञ समिती नाही. निकष बनवताना ते जगातील सर्वोच्च असतात असे काही नाही. ते निश्चित करताना उत्पादकांचा विचार करण्यात येतो. त्यांना उत्पादित करणे शक्य होईल अशा प्रकारे निकष बनवले जातात.

भारतात दुसरे लोकप्रिय असणारे निकष म्हणए ब्रिटीश स्टँडर्ड्स. यांचे निकष थोडेसे कठोर असतात. अनेकदा अमेरिकन स्टँडर्ड्स देखील संदर्भ म्हणून घेतले जातात. लष्करासाठी लागणारे तंत्रज्ञान निर्माण करताना भारतीय आयएस चा उपयोग होत नाही. आपण वापरत असलेल्या कुठल्याही स्मार्ट फोनला आयएस नाही तरी आपण तो वापरतो. सतत बदलत जाणा-या तंत्रज्ञानासाठी बीआयएस कडे वेगाने स्वतःला बदलण्याची क्षमता नाही.

दुसरा मुद्दा ग्राहकांनी मागणी करण्याचा.
हे उत्तर बेजबाबदार आहे. जवळपास सगळेच स्टँडर्ड्स ग्राहकांच्या मागणीनुसार नाही तर त्यांचे काम असल्याने बनलेले आहेत. काही स्टँडर्ड्स न्यायालयाचे आदेशाने अस्तित्वात आलेले आहेत उदा जनरेटर सेटला कॅनापी बसवणे. बॉयलरच्या चिमणीचे स्टँडर्ड अस्तित्वात आले त्याचा आणि ग्राहकाचा काय संबंध ?

तिसरा मुद्दा : आयएसओ प्रमाणपत्राचा

आयएसओ प्रमाणपत्र गुणवत्ता नियंत्रण प्रणाली साठी दिले जाते. गुणवत्ता नियंत्रण प्रणाली मधे उत्पादन कुठल्या निकषानुसार असावे हे लिहीलेले असते. ते निकष योग्य नसतील तर आयएसओ प्रमाणपत्र मिळत नाही.

या संदर्भात तेल कंपन्या पुरवित असलेल्या विम्यासंदर्भात इंटरनेटवर शोध घेतला असता अशा उपकरणांना ISI मार्क असलाच पाहिजे असा उल्लेख आढळतो, पण उपकरणे म्हणून त्यात सिलेंडर, पाईप, शेगडी असा वेगवेगळा उल्लेख दिसत नाही. या संदर्भात एचपी गॅस तसेच भारत गॅस या कंपन्याच्या अधिकाऱ्यांनी विमा कंपनी जर गॅस शेगड्यांना ISI मार्क नसेल तर अशा प्रकरणांमध्ये विमा रक्कम देण्यास नकार देऊ शकतात असे सांगितले.

*

ही महत्वाची माहिती आहे. धन्यवाद.

@ kapoche
बीआयएस या संस्थेतर्फे कुठल्याही उत्पादनाचे निकष ठरवले जातात. या निकषांच्या कसोट्यांवर उतरणा-या उत्पादनाला आय एस सर्टिफिकेट मिळते. याचा अर्थ ज्या उत्पादनाला आय एस सर्टिफिकेट नाही ते गुणवत्तेत कमी असलेच पाहीजे असं काही नाही. प्रमाणपत्रामुळे विश्वास येतो हे खरे आहे. पण नवे तंत्रज्ञान, नवा धातू हे आय एस ने प्रमाणित करायला वेळ जाऊ शकतो. बीआयएस कडे स्वतःची तज्ञ समिती नाही. निकष बनवताना ते जगातील सर्वोच्च असतात असे काही नाही. ते निश्चित करताना उत्पादकांचा विचार करण्यात येतो. त्यांना उत्पादित करणे शक्य होईल अशा प्रकारे निकष बनवले जातात.

गुणवत्तेत कमी नसेल तर किमान आयएस घेण्यास काहीच हरकत नसावी. IS:4246 हे प्रमाणीकरण २००२ तसेच २००९ ला अद्यतनीत करण्यात आलेले आहे. हे प्रमाणीकरण करताना गॅस संदर्भातील पाईप्स, नॉब्ज, बर्नर्स इत्यादींचा विचार होत असल्याने बर्नरकरीता नविन धातू आल्यास १० ते १२ वर्षे इतका वेळ लागणे नक्कीच विलंब आहे. शिवाय या प्रमाणीकरणाच्या समितीत खाजगी उत्पादकांनाही घेत असल्याने उत्पादकांनी तपशिल दिले की ते पडताळून पाहणे व शहानिशा करणे इतकाच भाग शिल्लक राहतो.

बऱ्याचदा ग्राहकांनी मागणी केली की उत्पादक दबाव आणून सरकार दरबारी दिरंगाई, चालढकल अशा गोष्टी प्रमाणीकरणाबाबत होत राहतात. ग्राहकांचा, ग्राहक संघटनांचा अभ्यासपूर्ण दबाव असेल तर सरकारही लक्ष देते.

ISO प्रमाणपत्र गुणवत्ता नियंत्रण करीता आवश्यकही असेल पण सुरक्षितता ही आयएस ने च दर्शविली जाते.