माझा ‘मॉर्निंग वॉक’

Submitted by UMAK on 29 April, 2016 - 08:16

‘माझा मॉर्निंग वॉक’ म्हणजे एक विनोदी प्रकरण आहे. आता ‘मॉर्निंग वॉक’ म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर ‘सकाळी लौकर उठून शूज घालून, एक नाजुकशी पर्स अशी तिरकी अडकवून त्यात मोबाइल घातलेला (मी पर्सला नाजूक संबोधते आहे मला नाही), त्यातून निघालेले इअर प्लग्स कानांपर्यंत पोहोचलेले आणि गाणी ऐकत ऐकत झपाझप चालणारी मी’ असे चित्र उभे राहिले असेल तर ते साफ चुकीचे आहे.

हो! कारण माझ्यासाठी ‘मॉर्निंग वॉक’ म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून जोपर्यंत ‘गुड मॉर्निंग’ म्हणू शकतो त्या कालावधीत केलेला वॉक. तो सुद्धा मी जे मिळेल ते पायात चढवून, एक ढगळसा ड्रेस घालून, बरोबर पर्स आणि एक पिशवीसदृश लोढणे गळ्यात अडकवून रमत गमत करते. ‘काय पण गबाळे ध्यान’ असे आलेच ना तुमच्या मनात? मी कसे ओळखले? तशी हुश्शार आहे बरे का मी!

तर अशा ह्या ‘मॉर्निंग वॉक’ला जाताना माझ्यात काही खोडी आहेत.

काय होते, मी घराबाहेर पडले आणि कोणी ओळखीचे भेटले की मी त्यांच्याकडे बघून हसते. आता ते माझे हास्य चिरकालीन असल्यासारखे माझ्या चेहऱ्यावर पुढील बराच वेळ तसेच असते. इथेच माझी पंचाईत होते. कशी ते सांगते.

एकदा मी आणि माझी लेक जात होतो.
लेक : आई, तो माणूस तुझ्या ओळखीचा होता?
मी : कोण माणूस?
लेक : अग, आता तो तुझ्याकडे बघून हसला नाही का? खरे तर तूच हसत होतीस म्हणून तो बिचारा हसला.

लगेच तो बिचारा झाला. व्वा! तर अशी मी अनोळखी लोकांना ‘स्माइल’ देत चालत असते. आणि कहर मणजे मी ‘थ्रू’ बघत असते. म्हणजे तंद्रीत हो! त्यामुळे मला ह्या कशाची गंधवार्ताही नसते. अशी असंख्य माणसे मला ‘ही येडी का खुळी?’ असे नक्कीच म्हणत असणार. मी आता ठरवले आहे की चालताना मी तोंडाचे ‘आकुंचन प्रसरण’ असे व्यायाम करत राहणार. पण मग मला ‘ठार वेडी’ तर नाही ना म्हणणार? तुम्हाला काय वाटते? असो!

चालताना मी दुरूनच एखादा खड्डा नाही ना ह्याची खात्री करून घेते. उगाच कोणी रागाने कधी काळी म्हंटले असेल ‘गेलीस खड्ड्यात’ तर आपण सांभाळून असलेले बरे! एकदा खात्री केली की मग मात्र मी मस्त इकडे तिकडे बघत चालत असते. ह्या माझ्या बघण्यावर माझ्या प्रिय नवऱ्याची टिपणी असतेच “काय टाळ-भेकऱ्यासारखी चालते आहेस?” म्हणजे नक्की कशी ते मला पण नाही कळले अजुन. अशा या प्रेमळ मार्मिक टिपण्या व सल्ल्यांची देवाणघेवाण प्रत्येक नवरा-बायकोत उभयपक्षी होतच असणार असा दिलासा देत मी त्याचे म्हणणे फारसे मनावर घेत नाही. पूर्वी मला राग फार पटकन यायचा. परंतु हल्ली मी काही मनावर घेतच नाही. राग आला की गिळून टाकते. असे खूप काही गिळून खाउन वजन वाढलंय हो. दुसरे काही कारण नाही. अगदी खरे!

आता असे चालताना काही संभाव्य धोके असतात. मी किनई खूप ठेचकाळते, धडपडते. खरे तर याला सुद्धा आपली पालिका जबाबदार. मी नाहीच मुळी! रस्ते कित्ती ते खडबडीत! मध्यंतरी तर बाका प्रसंगच आला न माझ्यावर. म्हणजे झाले काय मी बापडी रस्ता क्रॉस करत होते आणि पलीकडे मेरु पर्वतासारखा एक भला मोठा पेवर ब्लॉक डोके वर काढून उभा होता. अडकले त्याला आणि पडले ती माझ्या तोंडावरच. ते फाटलेले तोंड घेऊन हॉस्पिटल मध्ये गेले. डॉक्टर म्हणाले की टाके पडतील आणि लागले तयारीला. तरी मी तेवढ्यात प्रसंगावधान दाखवून माझा मोबाइल बाहेर काढला आणि त्या माझ्या अवताराचा एक सेल्फी घेतला. आठवण नको का संग्रही? खरे तर मला तो लगेच व्हॉट्स आप फेसबुक वर घालयचा होता. अगदी चेक इन आणि स्टेटस अपडेट सहित. पण तेवढ्यात माझे डॉक्टरांकडे लक्ष गेले. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून हिम्मतच नाही झाली माझी. चांगली संधी हुकली बघा. जाऊ दे!

घरातून बाहेर पडल्या पासून कैक प्रकारचे सुवास नाकात जात असतात. घरोघरी छान पदार्थ शिजत असावेत. मला खादाडीची भारी हौस! त्यामुळे माझ्या इथे तिथे बघण्याचा एक फायदा होतो. दुकाने आणि खास करून हॉटेल्स माझ्या नीट लक्षात राहतात. ‘खादाडीची अनेक ठिकाणे’ ह्यावर लौकरच प्रबंध सादर करायचा विचार आहे. नक्की वाचा हं!

अगदी प्रवासात सुद्धा मी साइन बोर्ड न बघता खायला कुठे थांबता येईल हेच बघत असते. ह्यावरही माझ्या प्रेमळ नवऱ्याची टिपणी असतेच. “गाई म्हशी जशा चरायला सतत हिरवं कुरण शोधत असतात ना तसंच तुझं आहे.” नाही नाही. मला ‘म्हैस’ आदि म्हटल्याचा अजिबात राग आलेला नाही. सांगितलं ना, मला हल्ली राग येतच नाही. गुणाची गो बाय मी!

आता इथेच बघा ना, चालता चालता मी गाडी, प्रवास, खादाडी कुठे कुठे भरकटले. माझ्या भरकटलेल्या, धावणाऱ्या मनाला कायम सांभाळून घ्यावे लागते माझ्या घरच्यांना. तुम्हीच सांगा कशी बरे रागावू मी?

- उमक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशी मी अनोळखी लोकांना ‘स्माइल’ देत चालत असते. आणि कहर मणजे मी ‘थ्रू’ बघत असते. म्हणजे तंद्रीत हो! त्यामुळे मला ह्या कशाची गंधवार्ताही नसते. अशी असंख्य माणसे मला ‘ही येडी का खुळी?’ असे नक्कीच म्हणत असणार. मी आता ठरवले आहे की चालताना मी तोंडाचे ‘आकुंचन प्रसरण’ असे व्यायाम करत राहणार. पण मग मला ‘ठार वेडी’ तर नाही ना म्हणणार? तुम्हाला काय वाटते? असो!

>>>> खिक्क!
यावरुन आठवले !
असेच रस्त्याने चालत असताना एक विनोद आठवून चेहऱ्यावर स्माईल पसरले होते.
अन समोरुन येणारी एक सुंदर मुलगी गोंधळून माझ्याकडे बघत ओळखीचं हसली.
च्यामारी ही कोण? म्हणून आम्हीबी पुरते गोंधळून गेलो.
पुढे जावून जरा विचार करत मागे बघितले तर तीही तिही वळून बघत होती.
मग मला आमच्या स्माईलचा प्रताप आठवला.

असो.

लेख भारी.
अशी मी अनोळखी लोकांना ‘स्माइल’ देत चालत असते. आणि कहर मणजे मी ‘थ्रू’ बघत असते. म्हणजे तंद्रीत हो! >>>>.हे बरेचवेळा होतं माझ्याबाबतीत.ओळखीच्या लोकांशी हसत नाही म्हणून गैरसमजही झालेत.

छान लिहिलेय...आवडले! माझ्या कडून असे खुप खुप वेळा झालेय.. एकदा एकाने जाता जाता कानावर तर्जनी फिरवून तब्बेतीची चौकशी पण केलेली पणआठवते Sad

{मी काही मनावर घेतच नाही. राग आला की गिळून टाकते. असे खूप काही गिळून खाउन वजन वाढलंय हो. दुसरे काही कारण नाही. अगदी खरे!} .......... मला आवडलं हे वाक्य Happy आणि लेख सुद्धा

Lol Lol Lol Lol