देखे अखंडित प्रसन्नता | आथि जेथ चित्ता | श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग १०

Submitted by पुरंदरे शशांक on 3 June, 2014 - 23:48

देखे अखंडित प्रसन्नता | आथि जेथ चित्ता | श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग १०

देखे अखंडित प्रसन्नता | आथि जेथ चित्ता | तेथ रिगणे नाही समस्तां | संसारदु:खा || अ. २-३३८ ||

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते |
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ||६५||
(प्रसन्नतेपुढे सर्व दुःखे जाती झडूनिया । प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे ॥ गीताई ॥)

या श्लोकावर विवरण करताना माऊलींनी ही अतिशय गोड ओवी लिहिली आहे.

जैसा अमृताचा निर्झरु| प्रसवे जयाचा जठरु| तया क्षुधेतृषेचा अडदरु| कहींचि नाहीं ||३३९||(अडदरु=चिंता)

तैसें हृदय प्रसन्न होये| तरी दुःख कैचें कें आहे ? | तेथ आपैसी बुद्धि राहे| परमात्मरूपीं ||३४०||
(आपैसी=सहज, आपोआप)

जैसा निर्वातीचा दीपु| सर्वथा नेणें कंपु| तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु| योगयुक्तु ||३४१||

या ओव्यातूनही माऊलींनी स्थितप्रज्ञाची लक्षणे वर्णन केली आहेत. जो प्राप्तपुरुष आहे (त्याला भगवद्गीतेत गुणातीत, योगी, कर्मयोगी, संन्यासी, भक्त, महात्मा, स्थितप्रज्ञ, ज्ञानी अशा विविध नावांनी संबोधिले आहे) त्याचे प्रसन्नता हे मुख्य लक्षण आहे.

सर्वसामान्य माणसाची प्रसन्नता कशी असते तर सकाळी पेपर वाचताना बायकोने गरम गरम चहा हातात आणून दिला तर अगदी प्रसन्न मूड ..... आणि त्याच चहात जरा साखर कमी पडली असेल तर लगेच प्रसन्नता संपून हा अप्रसन्न ..... Happy Wink

आत्मज्ञानी व्यक्तिची अशी डुचमळणारी प्रसन्नता नसते, अखंड प्रसन्नता असते. ही प्रसन्नता अनुकूल परिस्थितीवर वा पदार्थांवर अशी अवलंबून नसते तर ती प्रसन्नता आतून म्हणजे चित्तातूनच प्रकटलेली असते. समजा आपल्याला ताप आलाय आणि त्यामुळे आपल्या अंगात अशक्तपणा जाणवतोय, सारखे झोपून रहावेसे वाटते. पण जेव्हा का ताप निघून जातो तेव्हा आतूनच आपल्याला हुशारी जाणवायला लागते - सर्व हालचाली आपण नव्या उत्साहाने करायला लागतो. तसेच ज्या व्यक्तिला ज्ञान होते त्या व्यक्तिला आतूनच प्रसन्नता जाणवायला लागते. बाहेरची परिस्थिती मग कशीही असो - अनुकूल वा प्रतिकूल - या व्यक्तिची प्रसन्नता अखंडच, न भंगणारी अशी असते.

चेहराही चमक दिखलाता है जो ब्रह्मानंद को पाता है |
परमार्थाच्या दृष्टीने प्रसन्नता, शांती, समाधान या गोष्टी इंजेक्शनसारख्या नसतात की ज्या वरुन टोचता येतात. ज्याला आपले स्वरुप (आत्मस्वरुप) नेमके कळले आहे त्याच्या अंतरातच ही प्रसन्नता अगदी भरुन राहिलेली असते. संसारातील सुख-दु:खांनी तो कधीही फसवला जात नाही.

स्थितप्रज्ञ कोणाला म्हणायचं - याचे उत्तर देताना पहिल्याच श्लोकात भगवंत म्हणतात -
कामना अंतरातील सर्व सोडोनी जो स्वये | आत्म्यातचि असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला ||

ज्याच्या अंतरातील सर्व कामना नष्ट झालेल्या आहेत आणि जो आत्मरुपामधे रममाण झालाय त्यालाच खरेखुरे वैराग्य प्राप्त झालेले असते. लौकिकातल्या कुठल्याच गोष्टीतून कधीही समाधान मिळू शकत नाही याची त्याला पक्की खात्री झालेली असते. मात्र याचा अर्थ असा नाही की तो कुठेतरी रानावनात वा झोपडीत रहातोय. जनक राजा हे महालात रहात होते, सर्व सुखोपभोग भोगत होते तरीही ते परमेश्वराशी एकरुप झाल्यामुळे अंतरात पुरेपूर नि:संगता बाणलेले असे "विदेही जनक" म्हणून प्रसिद्ध होते. तर शुकदेवांसारखे (व्यासमहामुनींचे चिरंजीव) ऐहिकाचा संपूर्ण त्याग केलेले महापुरुषही तितकेच आत्मज्ञानी.

पण सर्वसामान्य व्यक्तिला मात्र या अशा आत्मज्ञानी महापुरुषाबद्दल काहीही माहित नसल्याने त्याला वाटते हे विदेही जनक वगैरे सारे ढोंगी आहेत. किंवा आपणही खूप संपत्ती वगैरे मिळवून लोकांना सांगूयात की मी अंतरातून तर पूर्ण विरक्त आहे.

एक आत्मज्ञानी साधू एका झाडाखाली रहात असे. तो त्याच्याठिकाणी मस्त, प्रसन्न असा रहात असल्याने कोणापाशी काहीही मागत नसे. कोणी त्याला काही खायला आणून देत ते खाऊन तो स्वस्थ बसलेला असे. कधी उपास पडले तरी त्याच्या प्रसन्नतेत कधी खंड पडलेला नसे. तिथल्या राजाला या साधूची हकीकत कळते. तो राजा त्याला भेटायला येतो आणि त्या प्रसन्नचित्त साधूची त्याला अगदी भूलच पडते. तो वारंवार त्याला भेटायला येऊ लागतो. हळुहळु राजा त्याला राजमहालात यावे असे सुचवू लागतो. तर तो साधू म्हणतो की मी इथे मजेत आहे. काही दिवसांनी तो राजा जेव्हा फारच आग्रह करु लागतो तेव्हा तो साधू म्हणतो की महालात मी जरुर येईन. मात्र तुझी फारच पंचाईत होईल तेव्हा नकोच ते. राजा म्हणतो - अहो, पंचाईत कसली ? महाल खूप मोठा आहे आणि तुम्हाला हवे त्या खोलीत तुम्ही रहावे - हवे तितके दिवस. माझी अगदी मनापासूनची इच्छा आहे. तरीही साधू नाकारत रहातो. एक दिवस राजा एक घोडा घेऊनच येतो आणि त्यावर बसून त्या साधूने महालात यावे म्हणून हट्टच धरतो. साधू हसून म्हणतो तुझा एवढा आग्रहच आहे तर येतो मी, पण पुन्हा सांगतो - तुझी पंचाईत न होवो. सगळा राजमहाल दाखवून झाल्यावर राजा म्हणतो - कुठल्याही खोलीत तुम्ही राहू शकता... तुम्ही फक्त सांगायचा अवकाश... साधू त्यातील सर्वात सुंदर खोली निवडतो. ती राजाची सर्वात खास खोली असते. पण आता राजा बोलून चुकलेला असतो. तो विचार करतो - राहू दे याला या खोलीत काही दिवस... नंतर ही खोली माझीच असणारे की ... साधू त्या खोलीत मुक्काम ठोकतो. काही दिवस जातात आणि राजा विचार करु लागतो की एवढे मोठे राज्यशकट मी हाकतो आहे आणि मग कुठे जरा विश्रांतीला म्हणून या महालात परतत असतो, मात्र हा साधू काहीही न करता अगदी मजेत इथे हे सगळे सुखोपभोग घेत आहे - हा काय न्याय आहे ? पण परत स्वतःचीच समजूत काढतो की राहू देत काही दिवस. परत काही महिन्यांनी राजाच्या मनात तेच विचार पुन्हा पुन्हा येऊ लागतात - की किती दिवस हा इथे रहाणार आहे आणि सगळे सुखोपभोग घेणारे ?? हे विचार जसजसे दृढ होत जातात तसा राजा सरळ साधूच्या समोर येऊन त्याला विचारु लागतो की तुम्ही तर नि:संगासारखे त्या झाडाखाली बसलेले असायचे आणि आता इथे तर असे रहात आहात की जणू हा महाल तर तुमचाच आहे.. काय म्हणावे या सगळ्याला मला काही कळेनासेच झालंय ...
साधू म्हणतो मी आधीच तुला जाणीव करुन दिली होती या सगळ्याची की तुझी पंचाईत नको व्हायला ... पण चल तर आपण जरा बाहेर जाऊन पाहूयात याचे काही उत्तर मिळते का ? आत्ता लगेच निघायचे आणि मी सांगेन तोपर्यंत काही बोलायचे नाही का विचारायचे नाही....
राजा चकित होतो पण साधू तर महालाच्या बाहेर जाऊन उभा राहिल्याने राजाचा नाईलाज होतो. राजा २-४ सैनिकांना बोलवायला लागतो तर साधू म्हणतो की त्यांचे काही कामच नाहीये. प्रश्न तू विचारला आहेस आणि उत्तर मला द्यायचे आहे. आपण दोघेच आत्ताच्या आत्ता बाहेर पडत आहोत. राजाला काय करावे हेच समजेनासे होते पण साधू ज्या जरबेने त्याला चल म्हणत असतो त्याला अनुसरुन तो साधूच्या बरोबर बाहेर पडतो. बराच वेळ ते चालल्यावर राज्य संपून जाते तरी साधू काही म्हणत नाही की थांबू आता. राजा जरा कळ काढतो व जंगलाच्या आसपास आल्यावर मात्र म्हणतो - थांबूयात की आता. साधू म्हणतो कशाला थांबायचे ? आपल्याला तर अजून खूप पुढे जायचे आहे. राजा म्हणतो - अहो, मला आता खूप भूक लागलीये, तहानही आणि तुम्ही तर थांबायचे नाव घेत नाही आहात.. साधू म्हणतो - तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे की अजून. आणि मी सुरुवातीलाच सांगितले होते की सांगेन तोपर्यंत तू काही बोलायचेही नाही... माझ्याबरोबर पुढे यावेच लागेल तुला. आणि तहान-भूक तर फारच मामुली गोष्ट आहे, मी नाही का चालत आहे तुझ्याबरोबर ??.
राजा चकित होऊन म्हणतो - म्हणजे परत जायचेच नाही का काय? साधू म्हणतो - परत जाऊन काय करायचे आता ?
राजा - अहो, माझे ते राज्य, सर्व परिवार ते कोण पाहिल मग ?
साधू - अरे त्याची कसली फिकिर करतोस - ते पहायला कोणीही पुढे येईल, तुला उत्तर हवे आहे तर तू माझ्याबरोबर चल बरं पुढे ..
राजा जागेवरच थबकून म्हणतो - मी तुमची उगाचच परीक्षा पाहिली. चलावे आता परत. तुम्ही खरोखरंच नि:संग आहात, तुम्ही कशाचीच पर्वा, काळजी करु शकत नाही. आता परत मी तुम्हाला कधीही म्हणणार नाही की तुम्ही राजमहालात असे निवांत कसे काय राहू शकता. तुम्हाला काहीही ददात पडणार नाही याची पुरेपूर काळजी आता मी वाहीन, पण तुम्ही कृपया परत चला.
साधू पुढे जात म्हणतो - तू तुझ्या राज्याची काळजी कर, मी निघालो आता - जिथे माझी काळजी मीच करत नाही तिथे तू काय करणारेस ...

खरा आत्मज्ञानी असा आतबाहेर नि:संग आणि त्यामुळेच सदा प्रसन्न असतो. त्याच्या ठिकाणी काहीही सुखोपभोग येवोत तो प्रसन्नच असतो. आणि प्रसंगवशात विपरीत परिस्थितीतही (जिथे इतर कोणताही सर्व सामान्य माणूस पार उन्मळून पडतो ) हा प्रसन्नचित्त कदापिही खिन्न होत नाही वा दैवाला वा परिस्थितीला दोषही देत नाही.

माऊलींवर तत्कालीन समाजाने कितीही अन्याय केला तरी ते माऊली ह्रदयाचेच होते, त्यांनी त्या अन्यायाची ना कुठल्या ग्रंथात वाच्यता केली ना कोणाला कधी दूषणे दिली.
तुकोबांची लौकिक बाजू कितीही निर्धनतेची असली तरी ते - "आनंदाच्या कोटी साठवले आम्हा पोटी " असे धन्योद्गारच काढत होते आणि संत एकनाथ हे अतिशय सधन असूनही त्यांच्या चित्तामधे ती संपत्ती आणि तो मानसन्मान यांना काहीही स्थान नव्हते तर एकमेव विठ्ठलच (परमात्माच) त्यांना सर्व काही होते.
हे सर्व संत निजधामाला जाऊन कितीतरी वर्षे लोटली तरी जनमानसात जे आदराचे स्थान त्यांनी मिळवले आहे त्याला कशाचीही तुलनाच नाही.

पांवसचे स्वामी स्वरुपानंद यांच्यापाशी ना काही संपत्ती, ना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातले कोणी आसपास. आणि प्रकृती तर अगदी यथातथाच (कारण १९३३ सालच्या आजारानंतर त्यांना जो अशक्तपणा आलेला होता तो जवळजवळ शेवटपर्यंत तसाच होता. ते जरी हिंडत-फिरत होते तरी धट्ट्याकट्ट्या माणसासारखे कष्टाची कामे ते करु शकत नव्हते). तरीही ते परमहंसपदी आरुढ झालेले एक महापुरुष म्हणून प्रसिद्ध झाले. जसजसे त्यांचे वय झाले तसतशी त्यांची शारिरिक स्थिती अजून खालावत गेली व ते त्यांच्या खोलीच्या बाहेरही येऊ शकत नसत. पण देहाच्या अशा विपरीत परिस्थितीतही ते सदा प्रसन्नच असायचे. त्यांच्या केवळ दर्शनासाठी त्यांची शिष्यमंडळी दूरदूरच्या ठिकाणांहून पावसला येत असत.

पाँडेचेरीला वास्तव्य करुन असलेले पूर्णयोगी महापुरुष अरविंद. हे त्यांच्या उतारवयात वर्षातून फक्त एकच दिवस त्यांच्या खोलीच्या गच्चीतून भाविकांना दर्शन देण्यासाठी उभे रहायचे - तेही काही काळच - तरीही त्यांचे हे दर्शन घेण्यासाठी देशोदेशीतून त्यांचे भक्तगण तिथे गर्दी करत असत - याचे कारण सदा प्रसन्न व्यक्तिची ओढ सर्व समाजालाही असतेच असते.

या सर्व महापुरुषांनी असे काय केले होते की जेणेकरुन ते सदा-प्रसन्न चित्त होते. तर सर्व ऐहिक गोष्टी अतिशय अशाश्वत आहेत, त्या खरे समाधान देऊ शकत नाहीत अशी त्यांची पक्की खात्री होती आणि एक भगवंतच त्यांनी ह्रदयात दृढ धरुन ठेवलेला होता..........

भक्तिचे वर्म जयाचिये हाती | तया घरी शांति क्षमा दया |
अष्टमहासिद्धी वोळगती द्वारी | न वजती दुरी दवडिता |
तेथे दुष्ट गुण न मिळे नि:शेष | चैतन्याचा वास जयामाजी |
संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ | तुटली हळहळ त्रिगुणाची |
तुका म्हणे येथे काय तो संदेह | आमुचे गौरव आम्ही करु || ४११४ ||

पांडुरंगस्वरुप झालेले तुकोबा या अभंगात जे म्हणताहेत ते इतके स्पष्ट आणि नि:संदिग्ध आहे की यावर अजून काय विवरण करावे ??

या सगळ्यातून आपण काय बोध घेतो हे जास्त महत्वाचे आहे. त्याकरता या सदाप्रसन्न संतांच्याचरणी मनोभावे प्रार्थना.

हरि ॐ ||

-----------------------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/46338 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग १

http://www.maayboli.com/node/46384 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग २

http://www.maayboli.com/node/46475 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ३

http://www.maayboli.com/node/46591 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ४

http://www.maayboli.com/node/46666 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ५

http://www.maayboli.com/node/46874 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ६

http://www.maayboli.com/node/46911 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ७

http://www.maayboli.com/node/46959 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ८

http://www.maayboli.com/node/48725 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ९
--------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -

१] http://abhangdnyaneshwari.org/

२] http://sanskritdocuments.org/marathi/

३] http://www.gharogharidnyaneshwari.com/

-------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

सुरेख लिहिलंय, शशांक. Happy

थोडेसे अवांतरः
मला "अवचिता परीमळु, झु़ळकला अळुमाळु" यातील

"चांचरती चांचरती बाहेरी निघाले
ठकचि मी ठेलें काय करू

बोधुनी ठेले मन तव जाले आन
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये"
याचा अर्थ सांगाल का?

संपूर्ण रचना इथे पहा.

atishay suMdar lekh. devanaagaree umaTat nasalyaamuLe adhik lihitaa yet naaheey. naMtar lihee.
vaachanakhooN saaThavalee aahe.

शशांक, खूप सुंदर! खूप खूप आतून आलय. Happy

जिप्सी, अर्थ अनेक अंगांनी काढता येईल. मला समजलेला अर्थ सांगतो.

अष्टांग योगातल्या समाधी अवस्थेचे वर्णन आहे ते. यम, नियम, आसने, प्राणायाम ही तर केवळ शरीराने साधायची अंगे आहेत. प्रत्याहारापासून साधक खोल जायला लागतो. तरी प्रत्याहार, धारणा आणि ध्यान या तिन्ही अवस्थात देहबुद्धी ('मी'पणा) शिल्लक असतेच. आत्तापर्यंतच्या ७ साधनांमध्ये तिला कह्यात आणायचा प्रयत्न चालू असतो पण तरी तीच राणी असते, तिचीच अमर्याद सत्ता असते. पण आता तिला गोपाळाची आस लागलेली असते.

आणि अशातच अचानक 'तो' अनुभव येतो - पंचेद्रियांनी अनुभवता येणारा असतो तो अनुभव. स्वर्गीय सुगंध, अनाहत नाद असे काहीही असू शकते. माउलींनी स्वर्गीय गंधाचे उदाहरण घेतले आहे. त्या गंधाने देहबुद्धी संमोहीत होऊन जाते. तिला कळते की ज्याची आस होती तो आलाय. देहबुद्धीच ती ! देह सोडून कधीच बाहेर पडलेली नसते. पण 'त्या'ला बघायची उर्मी एवढी जबरदस्त असते की ती देह सोडून बाहेर येते. चाचरत चाचरत येते, पण येते. बाहेर आल्यावर ती देहाची साम्राज्ञी पूर्णपणे ठकवली जाते, लुबाडली जाते. कशी?

आत्तापर्यंत ज्याच्याबद्दल फक्त ऐकले होते ते सावळे सौंदर्य साक्षात समोर उभे असते. ते दर्शन इतके अलौकीक असते की ती भान हरपते. त्या अवस्थेतच 'तो' तिला बोध देतो. आजपर्यंत अनेक प्रवचने ऐकलेली असतात, बरेच वाचन केले असते. त्यातले काही मनात झीरपलेले असते आणि बाकीचे सगळे वाहूने गेले असते. पण आज सांगणारा 'तो' असतो. साक्षात गीता-कथनाचा प्रसंग! मन प्रत्येक शब्दच काय काना, मात्रा, वेलांटीसह प्रत्येक अक्षर टिपून घेते. मग आत्मबोध झालेले ते मन मन उरतच नाही. दुसरेच (आन) काही बनून जाते.

ज्याच्या जोरावर देहबुद्धी देहावर सत्ता चालवत असते ते मनच तिचे रहात नाही. त्या देहबुद्धीचे सार, तिचा प्राणच तो श्रीहरी शोषून (सोकोनी) घेतो. तिची सत्ता संपते. उरतो फक्त साधक - ज्याचे वर्णन शशांकनी वर केलेच आहे.

शशांकजी,

योगी कथामृतात एका अन्न पाण्या वाचुन जगलेल्या स्त्रीचे वर्णन आहे. ज्यात अशी काही सिध्दी ज्यामुळे तहान -भुकच लागत नाही याचेही वर्णन आले आहे.

डिस्कव्हरी किंवा नॅशनल वर अशी एक व्यक्ती पाहिली जी आजही अन्न पाण्यावाचुन आनंदात आहे.

खेचरी मुद्रेवर वाचताना या संबंधी काही वाचावयास मिळाले. ज्यात या अमृताचा उल्लेख आहे.

खालील ओवी असेच काही दर्शविते की केवळ मनाची अवस्था ?

जैसा अमृताचा निर्झरु| प्रसवे जयाचा जठरु| तया क्षुधेतृषेचा अडदरु| कहींचि नाहीं ||३३९||(अडदरु=चिंता)

नितीनचंद्र, तुमच्या वरच्या पोस्टवरुन मला फेसबुकवरच्या एका पोस्टची आणि त्यावरील प्रतिसादाची प्रकर्षाने आठवण झाली. ते खाली देत आहे.
आनंद मोरे हे कबीरदासांच्या 'सुनता ही गुरु ग्यानी ग्यानी । ' या भजनाचे फार सुंदर निरुपण करत आहेत.

आनंद मोरे:
..... पण त्यातही पहिल्या कडव्यातले नाद बिंदू चे कोडे काही सुटत नव्हते. मग एकदा वाचनात आले की, सहस्रार चक्राच्या खाली आणि आज्ञा चक्राच्या वर, डोक्यावर जिथे शेंडी ठेवली जाते त्या स्थानाला बिंदू असे म्हणतात. तिथून बिंदू विसर्ग होत असतो, म्हणजे जीवन रस पाझरत असतो. कंठाजवळ असलेल्या विशुद्ध चक्राला वापरून त्याचे अमृतात रुपांतर करता येते. हे अमृत, तोंडातील टाळू जवळ ललना चक्र नावाचे एक दुय्यम चक्र असते, तिथे साठवून ठेवता येते आणि मनुष्य मृत्यू लांबवू शकतो. हे वाचताना मला ज्ञानोबा माउलींच्या चरित्रातील १४०० वर्षे जगलेले हठयोगी चांगदेव आठवले. सामान्यांना विशुध्द चक्र वापरून बिंदू विसर्गाचे अमृत कसे करावे ते कळत नाही म्हणून त्यांच्या बाबतीत हा बिंदू विसर्ग नाभीजवळ मणिपूर चक्रात जातो आणि शारीरिक वृद्धत्व येते.

Mansi Ghanekar सुंदर!!!
तुमच्या ललना चक्राच्या विवेचनावरून मला गुरुदेव रानडे यांनी बेलसरे यांना या 'अमृतानुभवा' बद्दल सांगितलेले आठवले. गुरुदेव रानडे अत्यल्पाहारी होते. गुरुदेव रानड्यांनी त्यांना सांगितले होते की सतत नामस्मरण करत राहील्यामुळे भक्त जेव्हा एका उंचीवर पोहोचतात तेव्हा एका रंध्रांमधून पडजिभेवर थेंब पडतात. त्याच्याने दिवसभर तहानभूक लागत नाही. याच अवस्थेत "अमृताहुनी गोड नाम तुझे देवा" म्हटलं गेलं असणार..

धन्यवाद,

माझा असा समज होता की ही सिध्दी फक्त योगमार्गींनांच मिळते. आता हळु हळु लक्षात येत आहे की भक्तीमार्गातील संतांना सुध्दा ही सिध्दी प्राप्त असावी.

भंडारा डोंगरावर जगतगुरु संत तुकाराम महाराज पंधरा दिवस ध्यानमग्न असत. या काळात त्यांनाही तहानभुक नसे ?