वृद्ध पालकांची काळजी व देखभाल

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 7 June, 2014 - 07:37

आपले वृद्ध पालक आपल्यासोबत राहत असोत किंवा वेगळे राहत असोत, त्यांची काळजी वाटणे हे साहजिक, स्वाभाविक आहे. आपल्या मात्या-पित्यांना त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध हा विनासायास, आनंदाने व निरामय आरोग्याने व्यतीत करता यावा असे बहुतेकांना नक्कीच वाटत असणार! परंतु प्रत्यक्षात ते साध्य होतेच असे नाही. नोकरी-व्यवसायातून सेवानिवृत्त होऊन आपला वेळ उत्तम प्रकारे घालवणारे जसे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच व्याधी अथवा अन्य काळजी - चिंतांमुळे ह्या काळाचा व्यवस्थित आनंद न घेऊ शकणारेही बरेच वृद्ध आहेत.

आपल्या वृद्धापकाळाची तजवीज आपणच केली पाहिजे, आपण आर्थिक, व्यावहारिक किंवा शारीरिक बाबींसाठी कोणावरही अवलंबून राहता कामा नये हा निर्धार व त्या दृष्टीने नियोजन करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आजकाल दिसतात. काहीजण स्वेच्छेने वृद्धाश्रम किंवा केअर होमचा पर्याय निवडतात. पण सर्वांनाच ते शक्य होत नाही. अशा वेळी त्यांच्या आर्थिक, व्यावहारिक, आरोग्याच्या व देखभालीच्या गोष्टींकडे त्यांचे जवळचे नातेवाईक, जसे की मुलगा-सून, मुलगी-जावई, बंधू - भगिनी किंवा इतर जवळचे नातेवाईक लक्ष देताना दिसतात. अनुभवातून शिकत जातात.

काही मुख्य गोष्टींचे नियोजन केल्यास ते वृद्धांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी खूप सोयीचे जाते. अर्थातच ह्यातील काही गोष्टी त्या ज्येष्ठांचे सहकार्य व अनुमोदन मिळाल्याखेरीज शक्य होणार्‍या नाहीत. परंतु त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना शांतपणे आपली बाजू सांगून व त्यांच्या आत्मसन्मानाला व निर्णयस्वातंत्र्याला कोठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत पावले उचलली तर बर्‍याचशा गोष्टी शक्य होणार्‍या आहेत.

कोणत्या आहेत ह्या गोष्टी?

१. घरातली व्यवस्था

वृद्ध व्यक्ती जर स्वतंत्र, वेगळ्या घरात राहत असेल तर ते घर वृद्ध व्यक्तीच्या हालचालीच्या व सुरक्षेच्या दृष्टीने सोयीचे बनविणे. जर वृद्ध व्यक्ती तुमच्या सोबत राहत असेल तर घरातला व घराभोवतीचा त्यांच्या वावराचा भाग त्यांना हालचालीसाठी व वावरासाठी सोयीचा करणे.

ह्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींची यादी देता येऊ शकेल. पण तरी मुख्य काही गोष्टी इथे देत आहे :

अ. वृद्धांना चालण्यास आधार लागत असेल किंवा जोर जात असेल तर भिंतीला, जिन्याला व बाथरूम - शौचालयात रेलिंग्ज, हाताने पकडायचे बार्स बसवून घेणे.

आ. बाथरूम व घरातल्या फारश्या / टाइल्स या अती गुळगुळीत, निसरड्या नसाव्यात.

इ. घरातले गालिचे, पायात अडकणारी जाजमे व वाटेत येणारे फर्निचर काढून टाकावे. वाटेत येणार्‍या, जागा खाणार्‍या, बोजड व जास्तीच्या वस्तू कमी कराव्यात. वावरायला सुटसुटीत व स्वच्छ करायला सोपी अशी जागा असावी.

ई. बाथरूममध्ये बाथ स्टूल वर वृद्धांना बसायला उठायला त्रास होत असेल तर तिथे सरळ एखादी न डगमगणारी खुर्ची ठेवावी. त्यावर बसून ते शॉवर घेऊ शकतात किंवा अंघोळ करू शकतात.

उ. रात्री पुरेसा प्रकाश देणारे नाइट लॅम्प्स, पॅसेजमध्ये वृद्धांना न अडखळता चालता येईल इतपत प्रकाश देणारे दिवे - घरात,घराबाहेरच्या पोर्च - जिने - पायऱ्यांजवळ असावेत.

ए. वृद्ध व्यक्ती व्हीलचेअरने घरात वावरत असतील तर त्यांच्या सोयीची रॅम्प्स बसवून घेणे.

तसेच त्या घराचे भाडे, कर, मेन्टेनन्स, कागदपत्रे इत्यादींची व्यवस्था बघणे. तशी व्यवस्था अगोदरपासून अस्तित्वात असेल तर ती सुरळीत चालू राहण्यासाठी हातभार लावणे.

२. वृद्धांचे आरोग्य, तपासण्या, उपचार, व्यायाम व सुरक्षा व्यवस्था

वृद्धांचे आरोग्य, तपासण्या, उपचार, व्यायाम व सुरक्षा व्यवस्था यांच्या दृष्टीने त्यांची व्यवस्था लावून देणे किंवा तशी व्यवस्था लावण्यास त्यांना मदत करणे.

अ. वृद्धांच्या वैद्यकीय तपासण्या, उपचार यांचे नियोजन. आवश्यकतेनुसार त्यांच्या डॉक्टरशी संपर्कात राहणे.

त्यांना उत्तम सुविधा देणारे डॉक्टर, स्पेशालिस्ट्स, पॅथॉलॉजिकल लॅब्ज, हॉस्पिटल, सोयीचे केमिस्ट-फार्मसिस्ट, नर्सिंग ब्युरो इत्यादींबद्दल माहिती पुरविणे. किंवा त्यांच्यासाठी ती व्यवस्था बघणे.

त्यांच्या डॉक्टर व इतर वैद्यकीय अपॉइंटमेंट्सचे रिमाइंडर / कॅलेंडर बनवून देणे वा तसे बनवण्यास मदत करणे. औषधे घेण्याच्या वेळा, डोस, तब्येतीच्या करावयाच्या नोंदींची यादी ही त्यांच्या औषधाच्या ट्रे जवळ किंवा कपाटाजवळ त्यांना किंवा त्यांची देखभाल करणार्‍या व्यक्तीस दिसू शकेल अशी लावून ठेवणे.

आ. वृद्धांना त्यांच्या प्रकृतीप्रमाणे घरात किंवा घराबाहेर व्यायामाच्या सोयी उपलब्ध करून देणे. घरातली वृद्ध व्यक्ती पेशंट असेल व काही कारणाने घराबाहेर जाऊ शकत नसेल तर घरी व्यायामाची साधने उपलब्ध करून देणे. तसा व्यायामही शक्य नसेल तर घरी फिजिओथेरपिस्ट बोलावून डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वृद्ध व्यक्तीकडून योग्य व्यायाम करवून घेणे. हळूहळू त्यांना घराबाहेर पडून व्यायाम करण्यास प्रवृत्त करणे. त्यांचा उत्साह वाढविणे.

इ. वृद्ध व्यक्ती स्वतंत्र, वेगळी राहत असल्यास ते घर जास्तीत जास्त सुरक्षित कसे करता येईल हे पाहणे. तुमच्या सोबत राहाणार्‍या वृद्धांनाही सुरक्षेची गरज असते. त्यांना ती मिळत आहे ना, ह्याची खातरजमा करणे.

ई. कुटुंबातील वृद्धांना त्यांच्या डॉक्टरने सांगितलेले पथ्य, व्यायाम व जीवनशैली राखायला मदत करणे.

३. आर्थिक व्यवहारांचे नियोजन

ही खरे तर अगदी संवेदनशील बाब आहे. अनेक वृद्धांची आपल्या मुलांना किंवा अन्य नातेवाईकांना आपल्या आर्थिक बाबींबद्दल माहिती देण्याची किंवा त्याबद्दल काही सांगण्याची तयारी नसते. त्यांना तसे करणे असुरक्षित वाटते. आणि त्यात चूकही काही नाही. त्यांना तुम्ही त्यांची आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे पाहणे, पडताळणे इत्यादी गोष्टी जर अनकम्फर्टेबल वाटत असतील तर अशा वेळी त्यांना त्रयस्थ अशा प्रोफेशनल व्यक्तीचे साहाय्य उपलब्ध करून देणे हे नक्कीच तुमच्या हातात असते. किंवा त्यांच्या विश्वासातील प्रोफेशनल तज्ज्ञ व्यक्तीकडून ते ही पडताळणी करून घेऊ शकतात. परंतु ते तसे करत आहेत ना, त्यांची सारी कागदपत्रे व्यवस्थित आहेत ना, त्यांना कोणत्या प्रकारच्या साहाय्याची गरज आहे हे पाहणे आपल्या हातात असते.

खास करून विस्मरणाचा त्रास होत असलेल्या, किंवा वयानुसार आपला आत्मविश्वास कमी झालाय असे वाटणार्‍या, गोंधळ उडणार्‍या वृद्ध पालकांच्या बाबतीत अशी काळजी घेणे फार महत्त्वाचे ठरते.

ह्याच बरोबर ते कोणाकडून आर्थिक दृष्ट्या फसवले तर जात नाहीत ना, त्यांना कोणी खोट्या स्कीम्स सांगून गंडवत तर नाही ना, किंवा त्यांच्या भावनांना हात घालून - त्यांच्या विस्मरणाचा वा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून पैसे उकळत तर नाही ना, हे पाहणेही महत्त्वाचे ठरते. अन्यथा ते त्यांच्याच स्वतःच्या हक्काच्या पैशाला, प्रॉपर्टीला मुकू शकतात.

४. कायदेशीर मदत व आरोग्य विमा / योजना

आपल्या वृद्ध पालकांची कायदेशीर व्यवहारांची कागदपत्रे, त्यांचे आरोग्यासंबंधी किंवा अन्य प्रकारचे विमे उतरवले असतील, कोणत्या आरोग्य योजनेत पैसे गुंतविले असतील तर त्याबद्दलची त्यांची कागदपत्रे अद्ययावत आहेत ना, त्यांना त्यात कोणत्या मदतीची गरज आहे का हे पाहणे.

५. वृद्धांचा हुरूप, उत्साह, आनंद टिकविणे आणि स्नेही - मित्रजनांचा सहवास राखायला मदत

अ. आपल्या कुटुंबातील वृद्धांचे स्वतःचे आयुष्य निरामय, आनंदी राखण्यासाठी प्रयत्न चालू असतील तर उत्तमच आहे. परंतु काही कारणामुळे ते त्यात मागे पडत असल्यास त्यांच्या आजूबाजूला आनंदी, उत्साहाचे व खेळीमेळीचे वातावरण निर्माण करायला मदत करणे.

आ. वृद्धांना त्यांचे स्नेही, आप्त, त्यांचे सोशल सर्कल यांच्याशी संपर्क राखायला मदत करणे.

इ. त्यांना ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, ज्या वस्तू व माणसे त्यांना खूप प्रिय आहेत अशा व्यक्ती वा वस्तूंच्या सहवासापासून त्यांना वंचित न ठेवणे. त्यांना अशा अ‍ॅक्टिविटीज करण्यास प्रोत्साहन देणे.

ई. वृद्ध पालक जर ई-साक्षर असतील तर त्यांना फेसबुक सारख्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांच्या संपर्कात राहायला, जगातील बातम्या वाचायला, उत्तम प्रेरणादायी व्हिडियो पाहायला उद्युक्त करणे.

ह्यातील सर्वच गोष्टी सर्व काळ शक्य होतीलच असे नाही. परंतु आपल्याकडून आपण प्रयत्न करत राहायचे हे जर पक्के ठरविले असेल तर कोणता ना कोणता मार्ग निघतच राहील.

आजारी, अंथरुणाला खिळून असणार्‍या वृद्ध पालकांची देखभाल

म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असे म्हटले जाते ते उगीच नाही. आणि त्यातच जर ती वृद्ध व्यक्ती आजाराने, व्याधीने ग्रस्त असेल, तिच्या हालचालीवर - खाण्यापिण्यावर - व्यवहारावर त्यामुळे जर मर्यादा आल्या असतील, आणि त्यातून जर ती व्यक्ती अंथरुणाला खिळून असेल तर हे बालपण हट्टी व चिडकेही होऊ शकते.

अशा वेळी आपल्याला त्यांचे जर कष्टाने करणे जमत नसेल तर सरळ नर्सिंग ब्युरोमधील नर्स / आया / मावशी त्यांच्या देखभालीसाठी ठेवावी. म्हणजे त्यांचीही आबाळ होत नाही व तुम्हालाही पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे त्रास सहन करावा लागत नाही.

आजारी पालकांनाही जितकी शक्य असतील, झेपत असतील तितकी कामे स्वतःची स्वतः करू द्यावीत. (अगदी त्यांच्या कपड्यांच्या घड्या घालणे, वर्तमानपत्राची पाने नीट जुळवून लावणे, पांघरुणाची घडी करणे, स्वतःचे केस विंचरणे - कपडे बदलणे - स्नानादि कार्यक्रम इ. इ.) त्यांची हालचाल होणे आवश्यक आहे. हवे तर तुम्ही त्या कामांवर देखरेख करू शकता किंवा त्यांना त्यात थोडी मदत करू शकता. पण असे स्वतःचे काम स्वतः केल्याने त्यांचा आत्मविश्वास राखला जाण्यात मदत होते.

त्यांना जशी औषधोपचार, शुश्रूषेची गरज असते तशी प्रेमळ स्पर्शाची, आश्वासनाचीही गरज असते. त्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालविणे, मायेचा स्पर्श, त्यांचा हात हातात घेणे, त्यांच्याशी गप्पा मारणे हेही त्यांच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असते. 'आपण इतरांना हवे आहोत' ही भावना त्यांच्यासाठी मोलाची असते.

ह्या खेरीज वरवर किरकोळ वाटल्या तरी वृद्धांच्या मनाला टवटवी देणार्‍या, त्यांना प्रसन्न करणार्‍या अनेक गोष्टी आहेत...

उदा.

१. रोज थोडा वेळ तरी ते सकाळ सायंकाळच्या कोवळ्या उन्हात बसतील असे पाहणे.

२. त्यांना स्वतःचे ग्रूमिंग वृद्धत्वामुळे जमत नसेल तर त्यासाठी त्यांना साहाय्य करणे. अगदी केसांना कलप लावण्यापासून ते पायाची नखे काढण्यापर्यंत! किंवा तुम्ही प्रोफेशनल व्यक्तींना घरी बोलावून घेऊन असे ग्रूमिंग सेशन अ‍ॅरेंज करू शकता. फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, पुरुषांच्या बाबतीत दाढी - कटिंग हेही त्यांचे मन प्रसन्न ठेवण्यास साहाय्य करते. तसेच बदललेल्या आकारानुसार त्यांचे कपडे त्यांच्या मापाचे, आवडीच्या रंगसंगतीचे, कम्फर्टेबल मटेरियलचे व सुटसुटीत आहे ना, हे पाहणे.

३. वृद्धांना आपल्या समवयस्कांशी संपर्कात राहण्यास, स्नेहीजनांच्या भेटीगाठी घडवून आणण्यास प्रोत्साहन देणे.

४. त्यांना समाजोपयोगी कार्यात आपले मन रमविणे शक्य असेल तर त्यासाठी प्रवृत्त करणे.

५. आधुनिक तंत्रज्ञानाशी व सोशल मीडियाशी त्यांची नाळ जोडणे. त्याद्वारे त्यांच्या जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्यास त्यांना मदत करणे. अर्थात या माध्यमांबद्दल त्यांना पुरेसे जागृत करून मगच!

६. हे अतिमहत्त्वाचे : वृद्धांना नित्य उपयोगी पडणारे किंवा त्यांना सेवा पुरवणार्‍या व्यक्ती / संस्थांचे नाव - संपर्क क्रमांक ठळक अक्षरात, त्यांना नजरेस पडेल अशा ठिकाणी नोंदवून ठेवणे. तसेच इमर्जन्सीच्या वेळी ज्यांच्याशी संपर्क साधायचा अशा व्यक्ती / संस्थांची नावे, फोन नंबर्स, पत्ते हे मोठ्या, ठळक अक्षरात फोनपाशी लावून ठेवणे.

सेवा सुविधा

अ. वृद्ध व्यक्ती जर स्वतंत्र , वेगळी राहत असेल तर तिला गरजेप्रमाणे घरपोच सेवा पुरविणार्‍या दुकाने, संस्था इत्यादींची सेवा उपलब्ध करून देणे. ह्यात अगदी घरपोच लाँड्री, औषधे, दूध, वृत्तपत्र, केबल सेवा, जेवणाचा डबा घरपोच देणारे, चिरलेली भाजी व फळे, किराणा सामान, कुरियर सेवा, वेगवेगळे कर भरणे - बँकेचे व्यवहार - बिले भरणे इत्यादी सेवा घरपोच पुरविणार्‍या संस्था, घरपोच लायब्ररी, घरी येऊन ग्रूमिंगची सोय पुरविणारी संस्था, घरातील उपकरणांचा व वाहनांचा नियमित, चांगला मेन्टेनन्स ठेवणारे तंत्रज्ञ, खात्रीलायक प्लंबर - इलेक्ट्रिशियन - सुतार - घरगुती कामासाठी मदतनीस - सुरक्षासेवक पुरविणार्‍या संस्था इत्यादी बरेच प्रकार आवश्यकतेनुसार अंतर्भूत होऊ शकतात.

तसेच घरी येऊन नियमित वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर्स, पॅथ लॅब्ज तंत्रज्ञ हेही उपलब्ध होऊ शकतात. वेळोवेळी ही यादी अपडेट करणे.

वृद्धांना वाहन चालविणे शक्य नसेल व पब्लिक ट्रान्स्पोर्टने जा - ये करणे शक्य नसेल तर ओळखीच्या रिक्षा / टॅक्सी / कॅब सुविधेचे नाव - नंबर्स त्यांना उपलब्ध करून देणे. किंवा त्यांना बाहेर जाण्यासाठी सोबत आवश्यक असेल तर तशी खात्रीलायक व्यक्ती किंवा मदतनीस त्यांच्या बरोबर जाईल हे पाहाणे.

आ. वृद्धांना खात्रीलायक कायदेशीर साहाय्य करणार्‍या, त्यांना संघटित करणार्‍या संस्था व उपक्रमांशी त्यांची ओळख करून दिल्यास तेही त्यांच्यासाठी चांगलेच ठरते.

इ. वृद्ध व्यक्तींसाठी खास बनवलेले मोबाईल्स, वाचण्यास / पाहण्यास मदत करणारी उपकरणे, श्रवणयंत्रे, त्यांना सुलभतेने हालचाल करण्यास किंवा वावरण्यास मदत करणारी उपकरणे उपलब्ध करून देणे व त्यांना ती वापरण्याचे प्रशिक्षण देणे.

ही यादी किंवा सांगितलेल्या गोष्टी परिपूर्ण नक्कीच नाहीत. त्यात त्रुटी असू शकतात. परंतु ह्या काही प्राथमिक गोष्टी आपल्याला माहित असतील तर त्यांच्या अनुषंगाने नियोजन करणे तुलनेने सोपे जाऊ शकते.

अनेकदा आपल्या वृद्ध पालकांच्या काळजीत व देखभालीच्या कामात आपण एवढे गुंतून जातो की मुळात आपण हे सर्व का करतोय त्याचा विसर पडू शकतो. आपल्या इच्छेखातर व त्यांच्यावरील प्रेमापोटी आपण हे करत आहोत हे आपण विसरता कामा नये. तसे विसरले जाण्याचे प्रसंग बरेच संभवतात. पण त्या वेळी धीर राखणे, मनाची ताकद गोळा करणे, स्वतःला थोडा अवधी देणे व किंचित अलिप्त होऊन शांतपणे विचार करणे हे महत्त्वाचे ठरते. त्याचा उपयोग आपल्याला आपले स्वतःचे मानसिक संतुलन राखण्यास आणि त्या वृद्ध व्यक्तीची योग्य देखभाल करण्यास होतो हे नक्कीच!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>Hello Mrunmayee:
Can you please provide more details (names, contact details) about the doctors who provide this type of service in Nagpur?

मंदार आणि ज्यांना नागपुरात या सेवेची गरज लागेल त्या सगळ्यांसाठी:

माझ्या वरच्या पोस्टमधे म्हंटल्याप्रमाणे अनेक डॉक्टरांनी एकत्र येऊन नव्हे तर ही सेवा डॉ. संजय बजाज यांनी उपलब्ध करून दिली आहे. ही त्यांची वेबसाइटः http://www.preventivebajaj.com/

इथे घरी भेट देण्याबद्दलः http://www.preventivebajaj.com/house_visits.php

त्यांचा ई-मेल पत्ता आणि सेलफोन नंबर माझ्याकडे आहे. आवश्यकता असल्यास कृपया मला संपर्कातून कळवा.

अकु उत्कृष्ट लेख.

आजारी, अंथरुणाला खिळून असणार्‍या वृद्ध पालकांची देखभाल>> या मध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट. अंथरुणावर किळून रहायची वेळ आल्यास बेड सोअर्स होउ नये म्हणून त्वरीत वॉटर बेड आणावा. अगदी दोन दिवसात सुद्धा बेड सोअर होउ शकतात व त्याचा प्रचंड त्रास सगळ्यांनाच होउ शकतो. बेड सोअर्स ही एक टाळता येण्या सारखी गोष्ट आहे.

विक्रममकाका, वॉटर बेड्/एअर बेडने सुद्धा बेड सोअर्स होतातच.

सतत कँडिड किंवा तत्सम पावडर अंगावर घालत राहणे, डायपर्स वेळच्या वेळी बदलणे, थोडावेळ अंगाला हवा लागण्यासाठी अधुन मधुन दोन्ही कुशीवर वळवणे, कुशीवर वळवल्यावर पाठीवरचा घाम पुसून अंग कोरडं ठेवणे, अगदी उकडत असेल तर लोअर बॉडीला डायपर आणि अंगावर पातळशी चादर फक्त घालून ठेवणे.

तरीही बेड सोअर्स झालेच तर डॉक्टर्स मलम लिहून देतात. पण अनुभवाने समजलंय की त्याने त्या जखमा ओल्याच राहतात. कधी भरतात कुणास ठाऊक! कारण मला ते न बघवून मी तो भाग उघडा ठेवू लागले एकही कपडा त्यावर न ठेवता. त्या जखमा कँडीड पावडरने पुर्ण भरुन टाकत राहिले. असं साधारण ३-४ तासांनी केलं तर दुसर्‍या तिसर्‍या दिवशी जखमा पुर्ण सुकल्या आणि खपल्या धरल्या.

एकट्या राहणार्‍या वृद्ध व्यक्तींची संख्याही वाढते आहे. (एका जोडीदाराचे निधन झाल्यावर मागे राहिलेली वृद्ध व्यक्ती). अशा व्यक्तींच्या बाबतीत पाहण्यात आलेली एक समस्या :
घरात पडायला झाल्यास, आजारी पडल्यास बाहेरून दार उघडण्याची सोय कशी ठेवायची. सेफ्टी डोर आणि आतले दार दोन्हीला लॅच लावले आणि जास्तीच्या चाव्या शेजारी/नातेवाईक/मुलांकडे ठेवल्या तरी रात्री फक्त लॅच लावून झोपणे सुरक्षित वाटणार नाही. (अगदी चार माणसांच्यासुद्धा घरात). यावर उपाय शक्य आहे का?

वृद्ध व्यक्तींना मोबाईल वापरायला शिकवणे मस्ट आहे. घरात लँडलाइन असेल, ज्ये.ना. अनेकदा तीच सोयीची वाटते, तर कॉर्डलेस एक्स्टेन्शनही असायलाच हवे.

पुढचा मुद्दा लिहिणे अनेक दिवस टाळत आलो आहे. पणं आज लिहितोय. सुमेधाव्ही यांनी कृपया पर्सनली घेऊ नये ही विनंती. तुम्ही लिहिलेले अन्य अनेक मुद्दे आवडले , पटले. पण
<शक्य असेल तर वृद्धांच्या खोलीत वेगळा टीव्ही असावा. त्यावर कोणते प्रोग्रॅम्स पहावेत हा त्यांचा पर्याय असावा. हल्ली हेड फोन्स वाले टीव्ही मिळतात. ते लावले की त्यांच्या आवाजाचा त्रास तुम्हाला होणार नाही. व ते पण खूश. व ९, १०,११ हे मुद्दे :
चालत्या फिरत्या वृद्धांच्या बाबत त्यांना खड्यासारखे बाजूला काढले गेल्याची भावना होणार नाही का?
तसेच हेडफोनचेही दुष्परिणाम असतात. मालिकांच्या वेळाचा कमी असलेला आवाज जाहिरातींच्या वेळी हमखास मोठा होतो. त्याचा वृद्धांना त्रास होईल असे वाटते. वृद्ध मंडळी कमर्शियल ब्रेकच्या वेळीही रिमोटला हात लावत नाहीत.

उत्तम लेख अकु! सुमेधाव्ही, छान पोस्ट!

भरत,
खड्यासारखे बाजूला काढायचा प्रश्नच नाही. पण लिव्हिंग रूममधला टिव्ही लावणे काही कारणाने शक्य नसेल तर /त्यावर सुरु असलेला कार्यक्रम वृद्धांच्या आवडीचे नसल्यास त्यांना अजून एक पर्यायी सोय म्हणून खोलीत त्यांचा स्वतंत्र टिव्ही खूप सोईचा पडतो. बरेचदा पाठीला रग लागत असल्याने फार काळ बसून टिव्ही बघणे शक्य होत नाही. बेडरूममधे टिव्ही असेल तर आरामात बघता येतो. माझ्या ओळखीत्/नात्यात बर्‍याच घरात दोन टिव्ही आहेत. बरेचदा सासूसून बेडरुममधल्या टिव्हीवर मालिंकांचा रतिब, टिनएजर्स आणि पुरुष मंडळी बाहेर स्पोर्ट्स असे चालते. आईबाबा दोघेच रहातात. त्यांनी बेडरूममधेच टिव्ही ठेवलाय. हेडफोन्सच हवेतच असेही नाही.

भरतजी,
वृद्ध जर का बाहेर हॉलमधे येउ शकत असतील व सगळ्यांमधे मिसळू शकत असतील तर उत्तमच पण ते त्यांच्या मर्जीवर असावे. त्याचे कंपल्शन व्हायला नको. पण असे पाहण्यात आले आहे की सिरीअल्स हे जे. ना जास्त सिरिअसली बघतात व त्यांना मधे अधे खंड पडलेला चालत नाही. तसेच बरेचदा बाकी लोक त्या करमणुकीला हीन लेखतात व मग ते त्यांना अपमानास्पद वाटू शकते. जे. नांना त्यांची करमणूक कोणा दुसर्‍या व्यक्तीच्या मनाप्रमाणे ठरवायची गरज नाही. आमच्याकडे आमच्या आजी मी मराठी चॅनेलवरील सर्व देवादिकांच्या सिरिअल्स नित्यनेमाने बघत (अगदी हात जोडून डोळे मिटून नमस्कार वगैरे पण करत) व त्यांना त्यावेळात दुसरे काहीही लावलेले आवडत नसे. बाकी कोणी मॅच किंवा बातम्या लावल्या तर त्यांची फार कुचंबणा होत असे मग. बरेचदा मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे हा अधिकचा खर्च केल्याने ज्ये. नांना मिळणार्‍या मानसिक समाधानाची जमा बाजू दुर्ल़क्षली जाते त्याकरता हा उपाय.

तसेच बाकी गोष्टी पण ऑप्शनल असल्या तरी हरकत नाही. होते काय, सकाळ झाली की कुटुंबातल्या नोकरीवर जाणार्‍या लोकांपेक्षा आंघोळी व इतर अन्हिकांसाठी जास्त घाई जे. नांचीच असते. एकदा भरभर आवरून बसायला त्यांना आवडते. अश्या वेळेस बाकीच्यांना त्यांची लुडबुड वाटु शकते. त्यामुळे अश्या वेळेस त्यांची स्वतंत्र सोय असल्यामुळे होणारी वादावादी, कटकट, मनस्ताप कमी होतो. जे. नांना आवडीचे चांगले चुंगले खायला आवडत असल्यास त्यांना खाण्यापिण्याबाबत संकोच करण्याची गरज नसावी. कोरडे पदार्थ खोलीत ठेवलेले असले की उगीच उठून बाहेर जा वगैरे गडबडीत पडापडी इत्यादीची शक्यता कमी होते. अर्थात त्यांना व इतरांना जमत असेल तर त्यांनी सर्वांमधे मिळून मिसळून वागणे हे सर्वोत्तमच पर्यायच आहे.

अकु चांगला लेख.
सुमेधाव्ही, सूचना एकदम पटल्या. अनुभवातून आल्या सारख्या वाटल्या. अनेक गोष्टी प्रत्यक्ष पहिल्याने रिलेट झाल्या.
पण भरत तुमचं पण पटतंय. Happy
आजीला अशीच सकाळी लवकर आन्हिके उरकायची हौस. टी व्ही वर सासू-सून पण बघायची. आम्ही मुलं चिक्कार टिंगल करायचो ती पण हसत हसत आमचं ऐकायची, इकडे ब्रेक मध्ये आम्हाला हवं ते तिकडे ब्रेक मध्ये सुनेचा छळ असं चालायचं. हेच दुसरा टीव्ही असता आणि ती आत गेली असती तर तुटक वाटलं असतं. अर्थात कुठल्याही बाजूने हेकेखोरपणा केला/ नातवंडा ऐवजी सुनेने/ सासूने तर वरचा पर्याय बेस्ट.
असच वर्तमानपत्राचं आजीला कोड्याचा भाग देऊन आम्ही बातम्या वाचायचो. मग ती बातम्या वाचायची. Happy

टीव्हीबद्दल सुरू आहे तर एक निरिक्षण नोंदवतो.

अनेक घरांत २ टीव्हींची one time investment cost सोडाच, दर महिन्याचं सेकंड कनेक्शनचं बिल भरणे त्रासदायक होऊ शकते याचा विचार आपण केलेला नाही. (किमान ३०० रुपये महिना, = १० रुपये रोज टिव्हीमधे घालताना .. असो. हिशोब करत नाही इथे.)

दुसरे,

नातवंडाने छोटा भीम २४ तास लावला, तर सासू अन सून दोघी स्वतःच्या आवडीच्या सिरियल्स न पहाता गुपचूप बसतात.. पण यात प्रॉब्लेम त्या लहानग्याचा होतो. त्याला एकतर टीव्ही पहात रहावा लागतो, अन वरतून वाईट सवय लागते ती वेगळिच.

सुमेधाव्ही म्हणतायत ना पण
>> अर्थातच ज्याच्या त्याच्या मानसिक, शारिरीक व आर्थिक कुवतीनुसार वापर करावा.<<

टीव्हींच्या संख्येचा काहीही संबंध नाहीये. संवाद असेल तर दहा टीव्हींमधूनही सुरू राहतो आणि नसेल तर टीव्ही नसला तरी नाहीच होत.

अकु, चांगला लेख.

छान लेख आणि चर्चा. ज्या पालकांची मुले भारताबाहेर आहेत, आणि पालकांना भारतात राहायचे आहे परंतु वयोमाना प्रमाणे पूर्णपणे independently राहता येत नाही अशा वृध्द पालकांसाठी काय पर्याय आहेत? वृद्धाश्रम हे एक टोक झाले. असे काही पर्याय आहेत का की ज्यात वृद्धांना स्वतःच्या घरी राहता येईल, वाटले तर स्वैपाक करता येईल किंवा गरज पडली तर जेवण मागवता येईल, वैद्यकीय मदत उपलब्ध असेल, बाहेरची कामे करायला कोणीतरी मदत करू शकेल ,अगदी अंथरुणाला खिळले असतील तर एखादी नर्स दिवसातून एक दोन वेळा येउन त्यांचे सर्व करून जाईल. असे काही पर्याय आहेत का?

अजबराव, तुम्ही म्हणताय त्या सोयी मुंबईततरी स्वतंत्रपणे उपलब्ध असतात. सगळ्याच सोयी एकत्र पुरवणारं कोणी असल्याचं ऐकलेलं नाही.
घरपोच जेवणाचे डबे /हॉटेल्स्/घरगुती जेवण फोनवर ऑर्डर करून घरी मागवायची सोय असते.
डॉक्टरही घरी बोलवायची सोय झालीय. अगदी ब्लड टेस्ट्स, अन्य काही टेस्ट्सही.
आजारी माणसांची घरी येऊन शुश्रूषा करण्याची सेवा पुरवणार्‍या एजन्सीज आहेत.

हे एक मिळालं

http://yourstory.com/2010/02/manjiri-gokhale-joshi-founder-maya-care-ser...
http://timesofindia.indiatimes.com/city/chennai/Wills-bills-or-forms-to-...

Paranjape schemes has such facilities in their Athashri projects. Only I am not sure if residents are allowed to cook or not. The flat's first owner has to be a senior citizen.

अजबराव म्हणतात त्याप्रमाणे हैद्राबादला पण सोय आहे. तुम्ही फ्लॅट विकत घेउ शकता किंवा अथवा भाड्याने.
पूर्ण इमारत ही वृद्धांचा विचार करुन बनवली असते. पूर्ण घरात आणि पॅसेजेस मध्ये अ‍ॅंटिस्कीड टाइल्स बसवल्या असतात आणि सगळ्या पॅसेजेस मध्ये हाताने पकडायला दोन्ही बाजुनी सोय केली असते, मध्ये थांबुन बसायची सोय असते. लिफ्ट मध्ये पण बसायची सोय असते. प्रत्येक रुम मध्ये आणि टॉयलेट मध्ये इमर्जन्सी साठी बटन दिले असते योग्य त्या जागी. कमोड वर बसता उठता आधार देण्या साठी दांडे लावले असतात. टॉइलेटचा दरवाजा आतून बंद केला तरी चावीने तो बाहेरुन उघडता येतो. इंटरकॉमची सोय आहे. मेस मध्ये जाऊन जेवण करता येते अथवा मागवता येते. डॉक्टर ऑन कॉल. तसेच प्रिस्क्रिप्स्न प्रमाणे नर्स येउन वेळच्या वेळीअ औषध देते. अ‍ॅंबुलन्स, टॅक्सीची सोय. वाचनालय, विरंगुळा, बैठे खेळ यांची सोय.

https://www.facebook.com/groups/331285451630205/permalink/682184633206950
'स्मृतीभ्रंश सुरू झालेल्या ज्येष्ठांचं पालकत्व करताना' या विषयावर डॉ.धनंजय चव्हाण, मानसोपचार तज्ज्ञ यांचं मार्गदर्शन.

1930 te 1970 पर्यंत ज्यांचा जन्म झाला आहे त्या पिढी ला वृध्द पणात येणारी संकट कमी असतील
एक तर ह्या पिढी कडे कायम स्वरुपी नोकऱ्या होत्या आणि पेन्शन ची सुविधा पण आहे.
ह्या काळातील पिढी शारीरिक बाबतीत निरोगी आणि सशक्त आहे .
ह्यांना कष्टाची सवय आहे, आहर अत्यंत साधा आहे जे इथे पिकते तेच अन्न ह्यांची आवड आहे.
कठीण स्थिती मध्ये सर्व स्थिती शी जुळवून घेण्याची ह्यांना सवय आहे
ही पिढी भासमय जगात,स्वप्नात जगत नाही.
रिॲलिटी मध्ये जगते.
ह्यांची स्वप्न जास्त मोठी नाहीत.
ऐश आराम ची ह्यांना आवड नाही

खरी मज्जा पुढे येणार आहे
आता जी पिढी एकत्र कुटुंब,कुटुंबाची जबाबदारी नाकारणारी,स्वतःचाच विचार करणारी स्वार्थी आहे..
ही पिढी जेव्हा फक्त पन्नास वर्ष वय ओलंडतील तेव्हा ती असंख्य रोग नी ग्रस्त असतील, लोक संपर्क झीरो असणारी आणि भासमय जगात राहणारी ही पिढी पूर्ण हतबल झालेली असेल.
अशक्त शरीर,असंख्य रोगांनी ग्रस्त,ना कायम नोकरी,ना पेन्शन,ना लोक संपर्क.
खूप दुःख नी ग्रस्त आता च्या पिढी चे म्हातारपण असेल
आणि ठेच लागली की परत एकत्र कुटुंब,कुटुंबाची जबाबदारी घेणारी पद्धत.
ह्याची गरज वाटेल.
फालतू व्यक्ती स्वतंत्र चे
दफन केले जाईल .

Pages