पाव भाजी - एक चिंतन

Submitted by फूल on 27 April, 2016 - 04:31

मी: “काय करू जेवायला?”

नवरा: “काय आहे घरात?”

मी: सिमला मिरची, बटाटा, टोमेटो, थोडासा फ्लोवर आहे, पाव भाजी मसाला, बटर आणि पाव आहेत... काय करू? हा माझा ठरलेला प्रश्न एखाद्या सुंदर, सुरम्य शनिवार किंवा रविवार संध्याकाळचा. सुरूवातीला नवरा अगदी मिश्कील वगैरे हसून बघायचा माझ्याकडे. आणि मग म्हणायचा, “करा आता पाव भाजी काय..”.

आता मात्र असं विचारलं की कधी कधी वैतागून म्हणतो उकडीचे मोदक कर....(आता या शब्दात लग्नाला अनेक वर्ष झालीयेत असं आलंच ओघाने हे सूज्ञास सांगणे न लगे.)

तर पाव भाजी माझं पाणीपुरीनंतरचं अत्यंत आवडीचं खाद्य... हो मीच ती पाणीपुरी बद्दल मायबोलीवर लिहिणारी... आता पाव भाजी...

मी आयुष्यात सगळ्यात पहिली पाव भाजी कधी खाल्ली याचं उत्तर मी आईबाबांना पहिल्यांदा कधी बघितलं या उत्तराइतकंच अवघड आहे. पण ही चटकदार चीज आयुष्य अधिक स्वादिष्ट करून जाते नेहमीच हे मात्र अगदी खरं...

शुरुवातसे शुरू करते है... दोन कांदे असतील तर एक बाssssssरिक चिरायचा एकसाssssssरखा... मोगऱ्याच्या पाकळ्यांचा ढीग घातल्यासारखा दिसला पाहिजे. त्याच्याच जोडीला टोमेटो तोही तसाच बाssssssरिक आणि एकसाssssssरखा, आलं लसूण वगैरे उग्र मंडळींना त्या उरलेल्या एका कांद्याबरोबर चांगलं वाटून घ्यायचं... जोडीला दोन काश्मिरी लाल मिरच्या... पाव भाजीला पाव भाजीचा रंग येण्यासाठी पण रंग न घालता.... फ्लोवरचे पांढरे शुभ्र तुरे, सिमला मिरचीचे करकरीत पुन्हा एकसाssssssरखे आणि बाssssssरिक चिरलेले तुकडे, बटाटा आणि टप्पोरे हिरवे कंच मटार सगळं एकत्र प्रेशर कुकर मध्ये.... त्या कुकरमध्ये सगळ्यांचा ताठा, अहं सगळं सगळं जिरतं.. आणि सगळे एकजीssssव होतात... एकात्म होतात... ही सगळी तयारी झाली की खऱ्या पूजेला सुरुवात... थोडसं तेल आणि हवं तेवढं बटर... हौसेला मोल नाही... चवीला तर नाहीच नाही... म्हणून हवं तेवढं... पहिला मान उग्र मंडळींचा... आलं, लसूण, कांदा आणि काश्मिरी मिरची... चर्रर्र आवाज झालाच पाहिजे नाहीतर आमच्यात फाऊल धरतात.... पाप लागतं ते वेगळंच... या उग्र मंडळींचाहि अहं अस्साच नाहीसा करायला हवा... बटर मध्ये परतून परतून त्यांना पुढे येणाऱ्या मंडळींशी मिसळून घेता येण्याजोगं करायचं... आलं लसणीने बाकीच्या भाज्यांशी फटकून वागता कामा नये... गंध लावल्यासारखं हिंग आणि कसुरी मेथी त्यातच... आता साधारण दरवाज्यापर्यंत वास पोचलेला असतो... मग उरलेला कांदा आणि टोमेटो घालायचा... ही मंडळी तशी कुणाशीही सहज जुळवून घेणारी... कुठेही सहज रमणारी... पुन्हा एकदा परतणं... आता सगळाच लाल रंग... हा कांदा, हा टोमेटो असलं काही काही ओळखू येईनासं झालं आणि कढईच्या बाजूने बटरचं अस्तित्त्व जाणवायला लागलं की... इवलीशी हळद, हवं तेवढं तिखट आणि पावाभाजीतला षड्ज म्हणजे पाव भाजी मसाला... तो एव्हरेस्टचा नसेल तर उगीच चूटपूट लागून राहते... इथवर येउन ठेपलो की मग बाकीची सिमला मिरची वगैरे मंडळी समरसून घ्यायला तयारच असतात... त्यांना हलकेच आत ढकलायचं... तशी ती मिळून मिसळून वागणारच असतात पण आपली थोडी मदत म्हणून smasher नाहीतर blender फिरवायचा... उगाच किंचित हं... पिठलं नाही करायचं...शेवटी मीठ असून नसलेलं... पुन्हा एकदा हातीच्या डावाने सगळ्यांची विचारपूस करायची... कोथिंबीरीचा सडा शिंपायचा की ती तयार झाली पण अजूनही कोवळीच तशी... कुणाला अगदी गाडी पकडायलाच जायचं असेल तर वाढायला हरकत नाही... पण तसं नसेल तर मात्र झाकून वाढू द्यायचं तिला... पोक्त होउ द्यायचं... अशी भाजी मुरायला ठेवून आच बंद करायची... एव्हाना मजल्यावर सगळ्यांना कळलेलं असतं की आपल्याकडे पाव भाजी आहे... मग एकीकडे पाव भाजायला घ्यायचे... पुन्हा हवं तेवढं बटर... एकसाssssssरखा आणि बाssssssरिक चिरलेला कांदा, लिंबाच्या एकसारख्या फोडी आणि सवाष्णीला अपरिहार्य असा हिरवा रंग म्हणून कोथिंबीर ही पूजेनंतर वाहायच्या फुलांसारखी तय्यार ठेवली की... पूजेची यथासांग इतिश्री... पाव भाजी साक्षात तुमच्या घरात...

तोंडाला पाणी सुटलं नै? मुंबईकराच्या खाद्य संस्कृतीत हा खाद्यपदार्थ कसा काय येउन ठेपला देवजाणे... मिल कामगारांना स्वस्तात भरपेट खायला मिळावं म्हणून ही पाव भाजी प्रचलित झाली असं ऐकून आहे मी पण याची पुष्टी द्यावी इतपत ठाम नाही...

या पदार्थावर अतोनात प्रेम जडलं... मुळातच मी आवड म्हणून खाणारी... उदरंभरणं या स्वच्छ हेतूपायी मी कधीच खाल्लं नाही....त्यामुळे चवीन खाणार त्याला देव देणार या न्यायाने मला देव देत असतो आणि मी खात असते... आणि गंमत म्हणजे law of attraction नुसार मला सखे सोबतीही तसेच भेटतात एक नवरा सोडून... तिथे unlike poles चा नियम लागू होतो. त्याला पाव भाजी आवडते पण म्हणून तो तुडुंब पोट भरल्यावर आवडते म्हणून खाणार नाही.... माझ्यामते अशी आवड ही आवड नाहीच... संपूर्ण जेवून झाल्यावर आवड म्हणून जो अजून एक गुलाब जामून पोटात ढकलतो तो खरा खवैय्या... खिलवणाऱ्याना असे खवैय्ये हवे असतात... एवढं बटर???? बाssssssप रे असं म्हणून पाव भाजीकडे तुच्छतेने बघणाऱ्या लोकांची मला प्रचंड चीड आहे...

माझ्या एका डाएट फ्रिक मैत्रिणीने मला आणि माझ्या एका पाव भाजी प्रेमी मैत्रिणीला डाएट पाव भाजी खाण्यासाठी घरी बोलावलं... अगदी तू करतेस तश्शीच होते असं वगैरे सांगून... बटर न घालता ऑलिव्ह ऑइल मध्ये केली होती तिने पाव भाजी आणि बटाटा नाहीच... मल्टीग्रेन ब्रेड नुसतेच तव्यावर भाजून खायला दिली आम्हाला... आम्ही ते रोगण कसं बसं घशाखाली ढकललं आणि त्यावर उतारा म्हणून तिथेच खाली अमृता हॉटेलात जाउन पाव भाजी खाल्ली... तेव्हा कुठे आंतरिक शांती लाभली...

हीच मैत्रीण... तशी बरी आहे ती खाण्याच्याच बाबतीत जरा प्रॉब्लेम आहे तिचा... तर तीच हॉटेल मध्ये पाव भाजी ऑर्डर केली की म्हणायची, “त्यापेक्षा तुम्ही त्याला सांगा एक प्लेट बटरच दे सब सब्जीया और पाव डालके...” त्या रात्री मला खरंच स्वप्न पडलं आणि स्वप्नात भैय्या सांगत होता, “बटर मध्ये थोडा पाव भाजी मसाला आणि भाज्या घातल्या नं की बटर ची चव चांगली लागते...”

एकदा नं असंच आम्ही सगळे पंटर एका मैत्रिणीकडे वाढदिवसाला जमलो होतो... माझ्या एका पाव भाजी प्रेमी मैत्रिणीने भाजीत घोळवलेला पावाचा तुकडा अलगद तोंडात सोडला आणि तिची तंद्री लागली... ब्रह्मानंदी टाळी... त्या ध्यानस्त अवस्थेत तिच्या तोंडून ब्रह्मवाक्य बाहेर पडलं, “ज्याने कुणी पाव भाजी हा प्रकार प्रचलित केला असेल नं तो नं स्वर्गात बसून पाव भाजी खात असणार.” तिच्या वाक्याला दाद द्यायची होती पण सगळ्यांच्याच तोंडात पूर्णब्रह्म.... त्यामुळे सगळेच “ह्म्म्मम्म्म्म” दीर्घ मकारले....

याच प्रेमाचा कडेलोट झालेला पण ऐकिवात आहे माझ्या....अश्याच एका चुलत मैत्रिणीच्या बिल्डींगमध्ये म्हणे एका मुलीने मुलाला पाव भाजी आवडत नाही म्हणून स्थळ नाकारलं... मला या नकारामागची मानसिकता अगदी तंतोतंत पटते असं मी माझ्या नवऱ्याला सांगितलं तर म्हणाला,” त्या मुलाच्या जागी मी असतो नं तर तिला मानसोपचार करण्यासाठीही मीच पैसे दिले असते...” या विषयावर आमची चर्चा फारच रंगली पण ते असो...

या पाव भाजीला नं मी असंख्य रूपात बघितलंय, घडवलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाल्लंय... काही वेळा अपरिमित सुखानुभूती आणि काही वेळी why me सारखे प्रश्नही पडलेत... पण ते “कर्मणि एव अधिकार: ते” सारखं कर्म करणं थांबलं नाही... पाव भाजी, मसाला पाव आणि तवा पुलाव ही पाव भाजीची सर्वमान्य, प्रचलित रूपं... पण मी अजूनही अनेक रूपं न्याहाळली आहेत.... हे अर्थातच प्रेमापोटी...

पाव भाजी डोसा... डोशात पाव भाजीची भाजी घालून... एका अश्याच टपरीवर खाल्ला होता... मस्त लागला... बरोबर चटणी आणि सांबारही दिला त्याने... त्याचं काय करायचं हे न कळून मी तो संपवण्यासाठी साधा डोसा घेतला... सोबत एक खादाड सखी होतीच... मज्जाच....

पाव भाजी पराठा... दोन मैद्याच्या पोळ्या आणि पाव भाजीचं स्टफिंग... मुंबईच्या या माहेरवाशीणीने पुण्यनगरीत या पंजाबी पराठ्याशी लग्न लावले... सोहळा थाट माट उत्तम होता.... पण पाव भाजी ती पाव भाजीच असं आम्हा ताव मारणाऱ्या दोघींचंही मत पडलं....

मसाला इडली... मसाला पावातल्या पावाच्या जागी इडलीचे तुकडे... हा प्रकार झक्कास लागला... घरी अनेकदा करूनही झाला...

इथे सिडनीत आल्यावर pastry sheets आणून त्यामध्ये पाव भाजीची भाजी भरून pattise केले होते... त्यासाठी भाजी मात्र थोडी घट्ट ठेवायला लागते... हे pattise खाताना नवऱ्याला म्हटलं, “बऱ्याच दिवसात पाव भाजी नाही खाल्ली नै? उद्या करूया....” त्याने सभात्याग केला... त्याच्या नेहमीच्या “कठीण आहे style” ने मान हलवून आत निघून गेला...

पाव भाजी fondue…. Facebook वर रेसिपी बघून लग्गेच करून बघितली.... “बटरने माखलेल्या भाजीत चीझची नुसती भरभराट काय वाईट लागणारे?” इति आई आणि नवरा.... मला मात्र मज्जाच आली...

ही झाली तिची सुंदर रूपं आता भायानाकतेकडे वळूया....

याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी... माझी आई एकदमच डाएट वगैरे पाळणारी अज्जिबात माझ्यावर गेली नाहीये... मला पौष्टिक खायला घालण्याचे तिने अनेक प्रयत्न करून बघितले त्यातलाच हा एक प्रयत्न... हवं ते हवं त्या वेळी खाउ न देणारी ती आई असं पुलं म्हणतात... या मताशी मी अगदी अगदी सहमत होते मला मुलगी होईतोवर... मग तिने नको ते नको त्या वेळी मागून मला बऱ्यापैकी वळण लावलं... ते असो.. तर माझ्या आईच्या एका सद्वर्तनी मैत्रिणीने तिला सांगितलं की पावाभाजीत बीट घातलं की अगदी बाहेरच्या सारखा रंग येतो.... पण ते किती घालायचं हे ती मैत्रीण सांगायला विसरली किंवा आई सोयीस्कररीत्या विसरली... बीट मला खायला घालण्याची नामी संधी आई कशी बरं सोडेल... ? बीटाच्या भाजीत पाव भाजी मसाला घातल्यासारखी ती मरून रंगाची भाजी मला आजही आठवते... दुसऱ्या दिवशी डब्यात नेल्यावर ही पाव भाजी आहे हे मैत्रिणीना सांगूनही पटेना.... चव घेउन तर अजिबातच पटलं नसतं.... पाव भाजी पेक्षा बीटाची भाजी आणि पाव असं म्हणणं जास्त योग्य होईल..

पण हौसेने लेकीसाठी म्हणून माझ्या जवळ जवळ प्रत्येक वाढदिवसाला माझीच फर्माईश म्हणून आईने केलेल्या सगळ्या भाज्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते.... ओटा धूउन आणि मागचं सगळं आवरून आई बाहेर येउन बसली की खूप वेळ पाण्यात राहील्याने मउ ओल्या झालेल्या आईच्या हाताला भाजीचा वास यायचा... तसा तो त्या त्या दिवशीच्या सगळ्याच भाज्यांचा यायचा पण या भाजीचा माझ्या जास्त लक्षात आहे...

दुसरी भयावह पाव भाजी म्हणजे वडगाव च्या एका टपरी वजा हाटेलीत खाल्लेली... त्या महामानवाने त्यावर फरसाण घालून आणलं... त्याला सांगून थकलो आम्ही की ही मिसळ आहे... त्यावर त्यांने मिसळ म्हणून जो प्रकार आणला तो त्या पावाभाजीपुढे पूर्णान्न होता... त्याच्यामते मिसळीच्या रश्शात बटाटे घातले की पाव भाजी आणि मटकी घातली की मिसळ पाव... फरसाण आणि पाव दोन्हीतही...

नेपाळला एका मारवाडी चकचकीत हाटेलात पाव भाजी मागवली.... त्याने ताटात एका गोड भाजीचा मोठ्ठा ठिपका आणि दोन बन पाव दिले ते पण गोड होते... मारवाड्याचं बोलणंही गोडच होतं... आम्ही जे समोर आलं ते गोड मानून ढकललं...

कोल्हापूरला मामाकडे चैनीच्या संकल्पनाच वेगळ्या होत्या... पाव भाजी वगैरे प्रकार फार कमी घडायचे... नाहीच खरं तर... मावशीच्या मागे लागून एक दिवस तिला पाव भाजी करायला लावली... ते सुद्धा घरात पाव आहेत ते संपवायचेत या कारणासाठी... त्यामुळे याच्या ऐवजी ते ढकल... त्याला काय होतंय शेवटी सगळं एकच होणार ते घाल तू.. असं करत करत जो काही प्रकार समोर आला तो भयावहच होता... वरती मिसळी सारखं शेव आणि लिंबू... वर झालीये की नै मस्त तुमच्या मुंबैसारखी? या प्रश्नाला हसून उत्तर देणं हे जास्त भयावह होतं...

तर अश्या माझ्या आजवरच्या उभ्या आयुष्यात अनेक पाव भाज्या आल्या आणि गेल्या... पण तरीही माझं पाव भाजीवारचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही... आणि होणार नाही...

विधात्याने अन्नमय देह दिलाय, मुखात रसना दिलीये आणि समोर पाव भाजीची प्लेट ठेवलीये... अश्या वेळी आत्मसंयम, मनोनिग्रह अश्या गोष्टी कश्या सुचायच्या.... अश्यावेळी फक्त पावाचा तुकडा तोडायचा, भाजीत बुडवायचा आणि अलगद जिभेवर सोडायचा... पूर्णात पूर्णं उदच्यते| अवघ्या देहाचे सोने झाले... ते आत्मानुभूती वगैरे काय म्हणतात ना त्याचा अनुभव मी अनेकदा घेउन सोडलाय बघा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त! मीपण पावभाजीप्रेमी! माझी रेसिपी वेगळी आहे पण पावभाजीवर प्रेम वर लिहिलंय तसंच!

आहाहा...अगदीच जिव्हाळ्याचा विषय....
मी कधीही, कुठेही, केव्हाही पावभाजी खाउ शकते...
मी शिकलेला पहिला पदार्थ पाभा च होता....

>>अश्या माझ्या आजवरच्या उभ्या आयुष्यात अनेक पाव भाज्या आल्या आणि गेल्या... पण तरीही माझं पाव भाजीवारचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही... आणि होणार नाही...>>+१११११११११११

खुप मस्त लेख....अगदी माझ्या मनातल्या भावना...

पा. भा. आवडते मला पण अतिप्रेम नाहीये मात्र.
ओटा धूउन आणि मागचं सगळं आवरून आई बाहेर येउन बसली की खूप वेळ पाण्यात राहील्याने मउ ओल्या झालेल्या आईच्या हाताला भाजीचा वास यायचा... > हे आवडलं. Happy

सगळ्यात आधी माझ्या ईतकच पाव भाजी वेडं कुणी आहे हे बघुन आनंद झाला.
बाकी वर्णन छान केलय. मी तर जास्त भाजी करुन ती शिळी करुन पण खाते. शिळी भाजी पण मस्त लागते.
पावा ला बटर लावुन थोडा भाजुन त्यात एकसाssssssरखा आणि बाssssssरिक चिरलेला कांदा, त्यामधे पाव भाजी भरुन, वरुन थोडा पाव भाजी मसाला भुर-भुरुन पुन्हा एकदा बटर लावुन भाजुन मसाला पाव करते. छान लगतो.....

शिळी पा भा भारी लागते हे एकदम सो टके सच्ची बात!
मी पण पा भा वेडी.
दरवेळी आएला सांगायचे खूप उरेल इतकी कर पा भा Happy

आणि पावाभाजीतला षड्ज म्हणजे पाव भाजी मसाला... तो एव्हरेस्टचा नसेल तर उगीच चूटपूट लागून राहते.. >> अगदी बरोबर लिहीले आहे. इथे येऊन इतके वेगवेगळे मसाले वापरून पाहिले, त्यानंतर मात्र कानाला खडा लावला आणि दर देशवारीमध्ये २ तरी एअव्हरेस्टची पाकीटं न चुकता बरोबर येता.

मी सुद्धा पावभाजी प्रेमी आहे ! असंच लहानपणापासून ते पाभा चं वेड लागलंय की ते काही सुटणारं नाही. हे सगळं वाचूनही तोंडाला पाणी सुटलं आहे अगदी !!

पाभा आवडतेच आणि त्यातून भारतातली बेष्टच आणि त्याबरोबर मऊसूत पावच हवेत.
पावभाजीत 'हळद' अगदी औषधालाही नाही. भयाण दिसते पिवळट पाभा.

त्याबरोबर मऊसूत पावच हवेत >>> +१ आणि त्याला व्यवस्थित बटर लावलेलं हवं. नुसतं बटरदर्शन नको Happy

दरवेळी आएला सांगायचे >>> शूम्पी एकदम दादा कोंडके स्टाईल सांगतेयस का? Proud

फुला... मस्तच जमलय पावभाजी पुराण.
वेळोवेळी हे-ते-ढकलपावभाजीच जास्त खाल्ली असल्यानं असेल... पावभाजी आवडते पण तुझ्याssssssssssss इतकी नसावी.

मस्तच जमलंय. अगदी त्या लालेलाल पावभाजीसारखंच. भूक अगदी रसरसून उठली! खर्‍या जबर्‍या फॅन आहात तुम्ही पावभाजीच्या.

छान लिहिलंय.

आमच्याकडे एकदा एक वाढदिवस पार्टी होती मुलांसाठी. एक धिटुकला आईचा निरोप सांगायला थोडा आधी घरी आला, स्वैपाकघरात आल्या आल्या...काकू, कढईत कायआहे? पावभाजी? ....अरे नाही नाही...पुलाव आहे त्यात....तर म्हणाला, पावभाजी नाही ना? मग मी येतोय पार्टीला Happy

अहाहाहा!!! खरोखर तोंडाला पाणी सुटलंय Happy
जीभेला, खाल्लेल्या सगळ्या त-हेच्या पावभाज्यांची चव आठवली Happy मला, जे. एम. रोडवरच्या 'पांचाली' हॉटेलमधली चीझ पावभाजी सगळ्यात जास्त आवडते Happy बाकी, पाभा कधीही, कुठेही खाऊ शकतो. (इथे आल्यानंतर मात्र नाही मिळाली किंवा बनवली.) मस्त लेखनशैली आणि लेख.

अवांतर : “कर्मणि एक अधिकार: ते” यात "एक" असे नसून "एव" असे आहे (उपहासाने लिहिले असल्यास चालेल Happy )

सोलापुरच्या 'सुप्रजा' मधली खाऊन पहा. अजुन प्रेमात पडाल पाभा.च्या>>>>> +१००
तशी पुण्यातपण मिळाली नाहीये अजून Uhoh

पुण्यात पेशवे पार्काजवळची 'जयश्री पावभाजी' आद्य पावभाजी. मग रीलॅक्सची फेमस व्हायला लागली. हळू हळू शिवसागर, पांचाली वगैरे. पण पावभाजी खावी तर (सोलापूरच्या) सुप्रजाचीच. तशी चव बाकी कुठेच मिळाली नाही. बेंगलोरलापण झकास पावभाजी मिळाली होती, नक्की कुठे ते आता आठवत नाही, पण अगदी सेंट्रल भागात होतं ते दुकान.

भारी लिहिलंय. लेख फाsssssर आवडला.
पुण्यात पेशवे पार्काजवळची 'जयश्री पावभाजी' आद्य पावभाजी +१
आमच्या कॉलेजच्या दिवसात कर्वेरोडला आजुबा (आनंद ज्युस बार) ची पावभाजी पुण्यात वर्ल्डफेमस होती. अजूनही असणार !

मस्त लिहिलंय! कित्येक वाक्यांना 'अगदी अगदी' झालं Lol

आमच्याकडेही पावभाजी सगळ्यांनाच खूप आवडते.
माझे बाबा आणि माझी लेक पावभाजीवेडे आहेत. आई तर म्हणते या दोघांना आठवड्याचे सातही दिवस तिन्ही जेवणांत पावभाजी दिली तरी प्रत्येकवेळी यांची ब्रम्हानंदी टाळी लागेल Wink

मस्त मस्त! मीपण पावभाजीप्रेमी,मी कधीही, कुठेही, केव्हाही पावभाजी खाउ शकतो ......

Pages