मी: “काय करू जेवायला?”
नवरा: “काय आहे घरात?”
मी: सिमला मिरची, बटाटा, टोमेटो, थोडासा फ्लोवर आहे, पाव भाजी मसाला, बटर आणि पाव आहेत... काय करू? हा माझा ठरलेला प्रश्न एखाद्या सुंदर, सुरम्य शनिवार किंवा रविवार संध्याकाळचा. सुरूवातीला नवरा अगदी मिश्कील वगैरे हसून बघायचा माझ्याकडे. आणि मग म्हणायचा, “करा आता पाव भाजी काय..”.
आता मात्र असं विचारलं की कधी कधी वैतागून म्हणतो उकडीचे मोदक कर....(आता या शब्दात लग्नाला अनेक वर्ष झालीयेत असं आलंच ओघाने हे सूज्ञास सांगणे न लगे.)
तर पाव भाजी माझं पाणीपुरीनंतरचं अत्यंत आवडीचं खाद्य... हो मीच ती पाणीपुरी बद्दल मायबोलीवर लिहिणारी... आता पाव भाजी...
मी आयुष्यात सगळ्यात पहिली पाव भाजी कधी खाल्ली याचं उत्तर मी आईबाबांना पहिल्यांदा कधी बघितलं या उत्तराइतकंच अवघड आहे. पण ही चटकदार चीज आयुष्य अधिक स्वादिष्ट करून जाते नेहमीच हे मात्र अगदी खरं...
शुरुवातसे शुरू करते है... दोन कांदे असतील तर एक बाssssssरिक चिरायचा एकसाssssssरखा... मोगऱ्याच्या पाकळ्यांचा ढीग घातल्यासारखा दिसला पाहिजे. त्याच्याच जोडीला टोमेटो तोही तसाच बाssssssरिक आणि एकसाssssssरखा, आलं लसूण वगैरे उग्र मंडळींना त्या उरलेल्या एका कांद्याबरोबर चांगलं वाटून घ्यायचं... जोडीला दोन काश्मिरी लाल मिरच्या... पाव भाजीला पाव भाजीचा रंग येण्यासाठी पण रंग न घालता.... फ्लोवरचे पांढरे शुभ्र तुरे, सिमला मिरचीचे करकरीत पुन्हा एकसाssssssरखे आणि बाssssssरिक चिरलेले तुकडे, बटाटा आणि टप्पोरे हिरवे कंच मटार सगळं एकत्र प्रेशर कुकर मध्ये.... त्या कुकरमध्ये सगळ्यांचा ताठा, अहं सगळं सगळं जिरतं.. आणि सगळे एकजीssssव होतात... एकात्म होतात... ही सगळी तयारी झाली की खऱ्या पूजेला सुरुवात... थोडसं तेल आणि हवं तेवढं बटर... हौसेला मोल नाही... चवीला तर नाहीच नाही... म्हणून हवं तेवढं... पहिला मान उग्र मंडळींचा... आलं, लसूण, कांदा आणि काश्मिरी मिरची... चर्रर्र आवाज झालाच पाहिजे नाहीतर आमच्यात फाऊल धरतात.... पाप लागतं ते वेगळंच... या उग्र मंडळींचाहि अहं अस्साच नाहीसा करायला हवा... बटर मध्ये परतून परतून त्यांना पुढे येणाऱ्या मंडळींशी मिसळून घेता येण्याजोगं करायचं... आलं लसणीने बाकीच्या भाज्यांशी फटकून वागता कामा नये... गंध लावल्यासारखं हिंग आणि कसुरी मेथी त्यातच... आता साधारण दरवाज्यापर्यंत वास पोचलेला असतो... मग उरलेला कांदा आणि टोमेटो घालायचा... ही मंडळी तशी कुणाशीही सहज जुळवून घेणारी... कुठेही सहज रमणारी... पुन्हा एकदा परतणं... आता सगळाच लाल रंग... हा कांदा, हा टोमेटो असलं काही काही ओळखू येईनासं झालं आणि कढईच्या बाजूने बटरचं अस्तित्त्व जाणवायला लागलं की... इवलीशी हळद, हवं तेवढं तिखट आणि पावाभाजीतला षड्ज म्हणजे पाव भाजी मसाला... तो एव्हरेस्टचा नसेल तर उगीच चूटपूट लागून राहते... इथवर येउन ठेपलो की मग बाकीची सिमला मिरची वगैरे मंडळी समरसून घ्यायला तयारच असतात... त्यांना हलकेच आत ढकलायचं... तशी ती मिळून मिसळून वागणारच असतात पण आपली थोडी मदत म्हणून smasher नाहीतर blender फिरवायचा... उगाच किंचित हं... पिठलं नाही करायचं...शेवटी मीठ असून नसलेलं... पुन्हा एकदा हातीच्या डावाने सगळ्यांची विचारपूस करायची... कोथिंबीरीचा सडा शिंपायचा की ती तयार झाली पण अजूनही कोवळीच तशी... कुणाला अगदी गाडी पकडायलाच जायचं असेल तर वाढायला हरकत नाही... पण तसं नसेल तर मात्र झाकून वाढू द्यायचं तिला... पोक्त होउ द्यायचं... अशी भाजी मुरायला ठेवून आच बंद करायची... एव्हाना मजल्यावर सगळ्यांना कळलेलं असतं की आपल्याकडे पाव भाजी आहे... मग एकीकडे पाव भाजायला घ्यायचे... पुन्हा हवं तेवढं बटर... एकसाssssssरखा आणि बाssssssरिक चिरलेला कांदा, लिंबाच्या एकसारख्या फोडी आणि सवाष्णीला अपरिहार्य असा हिरवा रंग म्हणून कोथिंबीर ही पूजेनंतर वाहायच्या फुलांसारखी तय्यार ठेवली की... पूजेची यथासांग इतिश्री... पाव भाजी साक्षात तुमच्या घरात...
तोंडाला पाणी सुटलं नै? मुंबईकराच्या खाद्य संस्कृतीत हा खाद्यपदार्थ कसा काय येउन ठेपला देवजाणे... मिल कामगारांना स्वस्तात भरपेट खायला मिळावं म्हणून ही पाव भाजी प्रचलित झाली असं ऐकून आहे मी पण याची पुष्टी द्यावी इतपत ठाम नाही...
या पदार्थावर अतोनात प्रेम जडलं... मुळातच मी आवड म्हणून खाणारी... उदरंभरणं या स्वच्छ हेतूपायी मी कधीच खाल्लं नाही....त्यामुळे चवीन खाणार त्याला देव देणार या न्यायाने मला देव देत असतो आणि मी खात असते... आणि गंमत म्हणजे law of attraction नुसार मला सखे सोबतीही तसेच भेटतात एक नवरा सोडून... तिथे unlike poles चा नियम लागू होतो. त्याला पाव भाजी आवडते पण म्हणून तो तुडुंब पोट भरल्यावर आवडते म्हणून खाणार नाही.... माझ्यामते अशी आवड ही आवड नाहीच... संपूर्ण जेवून झाल्यावर आवड म्हणून जो अजून एक गुलाब जामून पोटात ढकलतो तो खरा खवैय्या... खिलवणाऱ्याना असे खवैय्ये हवे असतात... एवढं बटर???? बाssssssप रे असं म्हणून पाव भाजीकडे तुच्छतेने बघणाऱ्या लोकांची मला प्रचंड चीड आहे...
माझ्या एका डाएट फ्रिक मैत्रिणीने मला आणि माझ्या एका पाव भाजी प्रेमी मैत्रिणीला डाएट पाव भाजी खाण्यासाठी घरी बोलावलं... अगदी तू करतेस तश्शीच होते असं वगैरे सांगून... बटर न घालता ऑलिव्ह ऑइल मध्ये केली होती तिने पाव भाजी आणि बटाटा नाहीच... मल्टीग्रेन ब्रेड नुसतेच तव्यावर भाजून खायला दिली आम्हाला... आम्ही ते रोगण कसं बसं घशाखाली ढकललं आणि त्यावर उतारा म्हणून तिथेच खाली अमृता हॉटेलात जाउन पाव भाजी खाल्ली... तेव्हा कुठे आंतरिक शांती लाभली...
हीच मैत्रीण... तशी बरी आहे ती खाण्याच्याच बाबतीत जरा प्रॉब्लेम आहे तिचा... तर तीच हॉटेल मध्ये पाव भाजी ऑर्डर केली की म्हणायची, “त्यापेक्षा तुम्ही त्याला सांगा एक प्लेट बटरच दे सब सब्जीया और पाव डालके...” त्या रात्री मला खरंच स्वप्न पडलं आणि स्वप्नात भैय्या सांगत होता, “बटर मध्ये थोडा पाव भाजी मसाला आणि भाज्या घातल्या नं की बटर ची चव चांगली लागते...”
एकदा नं असंच आम्ही सगळे पंटर एका मैत्रिणीकडे वाढदिवसाला जमलो होतो... माझ्या एका पाव भाजी प्रेमी मैत्रिणीने भाजीत घोळवलेला पावाचा तुकडा अलगद तोंडात सोडला आणि तिची तंद्री लागली... ब्रह्मानंदी टाळी... त्या ध्यानस्त अवस्थेत तिच्या तोंडून ब्रह्मवाक्य बाहेर पडलं, “ज्याने कुणी पाव भाजी हा प्रकार प्रचलित केला असेल नं तो नं स्वर्गात बसून पाव भाजी खात असणार.” तिच्या वाक्याला दाद द्यायची होती पण सगळ्यांच्याच तोंडात पूर्णब्रह्म.... त्यामुळे सगळेच “ह्म्म्मम्म्म्म” दीर्घ मकारले....
याच प्रेमाचा कडेलोट झालेला पण ऐकिवात आहे माझ्या....अश्याच एका चुलत मैत्रिणीच्या बिल्डींगमध्ये म्हणे एका मुलीने मुलाला पाव भाजी आवडत नाही म्हणून स्थळ नाकारलं... मला या नकारामागची मानसिकता अगदी तंतोतंत पटते असं मी माझ्या नवऱ्याला सांगितलं तर म्हणाला,” त्या मुलाच्या जागी मी असतो नं तर तिला मानसोपचार करण्यासाठीही मीच पैसे दिले असते...” या विषयावर आमची चर्चा फारच रंगली पण ते असो...
या पाव भाजीला नं मी असंख्य रूपात बघितलंय, घडवलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाल्लंय... काही वेळा अपरिमित सुखानुभूती आणि काही वेळी why me सारखे प्रश्नही पडलेत... पण ते “कर्मणि एव अधिकार: ते” सारखं कर्म करणं थांबलं नाही... पाव भाजी, मसाला पाव आणि तवा पुलाव ही पाव भाजीची सर्वमान्य, प्रचलित रूपं... पण मी अजूनही अनेक रूपं न्याहाळली आहेत.... हे अर्थातच प्रेमापोटी...
पाव भाजी डोसा... डोशात पाव भाजीची भाजी घालून... एका अश्याच टपरीवर खाल्ला होता... मस्त लागला... बरोबर चटणी आणि सांबारही दिला त्याने... त्याचं काय करायचं हे न कळून मी तो संपवण्यासाठी साधा डोसा घेतला... सोबत एक खादाड सखी होतीच... मज्जाच....
पाव भाजी पराठा... दोन मैद्याच्या पोळ्या आणि पाव भाजीचं स्टफिंग... मुंबईच्या या माहेरवाशीणीने पुण्यनगरीत या पंजाबी पराठ्याशी लग्न लावले... सोहळा थाट माट उत्तम होता.... पण पाव भाजी ती पाव भाजीच असं आम्हा ताव मारणाऱ्या दोघींचंही मत पडलं....
मसाला इडली... मसाला पावातल्या पावाच्या जागी इडलीचे तुकडे... हा प्रकार झक्कास लागला... घरी अनेकदा करूनही झाला...
इथे सिडनीत आल्यावर pastry sheets आणून त्यामध्ये पाव भाजीची भाजी भरून pattise केले होते... त्यासाठी भाजी मात्र थोडी घट्ट ठेवायला लागते... हे pattise खाताना नवऱ्याला म्हटलं, “बऱ्याच दिवसात पाव भाजी नाही खाल्ली नै? उद्या करूया....” त्याने सभात्याग केला... त्याच्या नेहमीच्या “कठीण आहे style” ने मान हलवून आत निघून गेला...
पाव भाजी fondue…. Facebook वर रेसिपी बघून लग्गेच करून बघितली.... “बटरने माखलेल्या भाजीत चीझची नुसती भरभराट काय वाईट लागणारे?” इति आई आणि नवरा.... मला मात्र मज्जाच आली...
ही झाली तिची सुंदर रूपं आता भायानाकतेकडे वळूया....
याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी... माझी आई एकदमच डाएट वगैरे पाळणारी अज्जिबात माझ्यावर गेली नाहीये... मला पौष्टिक खायला घालण्याचे तिने अनेक प्रयत्न करून बघितले त्यातलाच हा एक प्रयत्न... हवं ते हवं त्या वेळी खाउ न देणारी ती आई असं पुलं म्हणतात... या मताशी मी अगदी अगदी सहमत होते मला मुलगी होईतोवर... मग तिने नको ते नको त्या वेळी मागून मला बऱ्यापैकी वळण लावलं... ते असो.. तर माझ्या आईच्या एका सद्वर्तनी मैत्रिणीने तिला सांगितलं की पावाभाजीत बीट घातलं की अगदी बाहेरच्या सारखा रंग येतो.... पण ते किती घालायचं हे ती मैत्रीण सांगायला विसरली किंवा आई सोयीस्कररीत्या विसरली... बीट मला खायला घालण्याची नामी संधी आई कशी बरं सोडेल... ? बीटाच्या भाजीत पाव भाजी मसाला घातल्यासारखी ती मरून रंगाची भाजी मला आजही आठवते... दुसऱ्या दिवशी डब्यात नेल्यावर ही पाव भाजी आहे हे मैत्रिणीना सांगूनही पटेना.... चव घेउन तर अजिबातच पटलं नसतं.... पाव भाजी पेक्षा बीटाची भाजी आणि पाव असं म्हणणं जास्त योग्य होईल..
पण हौसेने लेकीसाठी म्हणून माझ्या जवळ जवळ प्रत्येक वाढदिवसाला माझीच फर्माईश म्हणून आईने केलेल्या सगळ्या भाज्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते.... ओटा धूउन आणि मागचं सगळं आवरून आई बाहेर येउन बसली की खूप वेळ पाण्यात राहील्याने मउ ओल्या झालेल्या आईच्या हाताला भाजीचा वास यायचा... तसा तो त्या त्या दिवशीच्या सगळ्याच भाज्यांचा यायचा पण या भाजीचा माझ्या जास्त लक्षात आहे...
दुसरी भयावह पाव भाजी म्हणजे वडगाव च्या एका टपरी वजा हाटेलीत खाल्लेली... त्या महामानवाने त्यावर फरसाण घालून आणलं... त्याला सांगून थकलो आम्ही की ही मिसळ आहे... त्यावर त्यांने मिसळ म्हणून जो प्रकार आणला तो त्या पावाभाजीपुढे पूर्णान्न होता... त्याच्यामते मिसळीच्या रश्शात बटाटे घातले की पाव भाजी आणि मटकी घातली की मिसळ पाव... फरसाण आणि पाव दोन्हीतही...
नेपाळला एका मारवाडी चकचकीत हाटेलात पाव भाजी मागवली.... त्याने ताटात एका गोड भाजीचा मोठ्ठा ठिपका आणि दोन बन पाव दिले ते पण गोड होते... मारवाड्याचं बोलणंही गोडच होतं... आम्ही जे समोर आलं ते गोड मानून ढकललं...
कोल्हापूरला मामाकडे चैनीच्या संकल्पनाच वेगळ्या होत्या... पाव भाजी वगैरे प्रकार फार कमी घडायचे... नाहीच खरं तर... मावशीच्या मागे लागून एक दिवस तिला पाव भाजी करायला लावली... ते सुद्धा घरात पाव आहेत ते संपवायचेत या कारणासाठी... त्यामुळे याच्या ऐवजी ते ढकल... त्याला काय होतंय शेवटी सगळं एकच होणार ते घाल तू.. असं करत करत जो काही प्रकार समोर आला तो भयावहच होता... वरती मिसळी सारखं शेव आणि लिंबू... वर झालीये की नै मस्त तुमच्या मुंबैसारखी? या प्रश्नाला हसून उत्तर देणं हे जास्त भयावह होतं...
तर अश्या माझ्या आजवरच्या उभ्या आयुष्यात अनेक पाव भाज्या आल्या आणि गेल्या... पण तरीही माझं पाव भाजीवारचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही... आणि होणार नाही...
विधात्याने अन्नमय देह दिलाय, मुखात रसना दिलीये आणि समोर पाव भाजीची प्लेट ठेवलीये... अश्या वेळी आत्मसंयम, मनोनिग्रह अश्या गोष्टी कश्या सुचायच्या.... अश्यावेळी फक्त पावाचा तुकडा तोडायचा, भाजीत बुडवायचा आणि अलगद जिभेवर सोडायचा... पूर्णात पूर्णं उदच्यते| अवघ्या देहाचे सोने झाले... ते आत्मानुभूती वगैरे काय म्हणतात ना त्याचा अनुभव मी अनेकदा घेउन सोडलाय बघा...
पावभाजीप्रेमींकरता एक टीप.
पावभाजीप्रेमींकरता एक टीप. घरी पावभाजी घातान गरम पावभाजीवर वरुन एव्हरेस्टचा चिमुटभर मसाला घाला. लैच खमंग लागते पावभाजी.
वाचता वाचता पावभाजीत बटर
वाचता वाचता पावभाजीत बटर घातल्यासारखी प्रेमात पडत गेले तुझ्या वाचतानाही ब्रह्मानंदी टाळी लागली.
अगदी तुझ्या इतकी नाही, पण पाभा आवडते. लेकाला पाभा आणि बटरमधे लोळवून काढलेले खरपूस पाव आवडतात. त्याला वाढताना वरून भाजीवर भरपूर चीज किसून. करताना किमान दिड दिवस तरी पुरेल इतकी करते.
होत आली की माझ्यासाठी आधी बाजूला काढते आणि मग पुन्हा सढळ हातानं बटर घालते. स्वतःसाठी बटर घालताना हात थरथरतो आता
आयती खायला कर्वेनगरात मयूरची पावभाजी आवडते. अजुबाबद्दल खुप ऐकलंय, पण अजून खाल्ली नाही.
कर्वेनगरात मयूरची पावभाजी
कर्वेनगरात मयूरची पावभाजी आवडते>> १०१
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
मस्त लिहीलंय, वाचत असतांनाच
मस्त लिहीलंय, वाचत असतांनाच पाणी सुटलं तोंडाला
मस्त! मी पाभाप्रेमी. कधीकधी
मस्त! मी पाभाप्रेमी. कधीकधी मातृकर्तव्य म्हणून किंवा खपवाखपवी म्हणून ढकलंपंची चालते, पण बरेचदा सढळ हाताने बटर घालूनच घडते पाभा. पुण्यात जयश्रीची पाभा आवडायची. रत्नागिरीत मिथिलाची एकदा खाल्ली तीही छान होती. एकूण बाहेर खाणं कमी त्यामुळे हा व्यासंग कमीच आहे
बेश्ट! घरची पाभा कितीही उत्तम
बेश्ट!
घरची पाभा कितीही उत्तम असली तरी तिला हाटेलातील पाभाची सर येत नाही.
सोलापूरच्या सुप्रजाच्या पाभाला जगात तोड नाही, त्या हाटेलावरुन जाताना जो दरवळ येतो तोच इतका टेम्प्टींग असतो की तुम्ही हिप्नोटाईज झाल्यासारखे आत जाताच.
हाहा ... भारी !!!
हाहा ... भारी !!!
मस्त लिहिलेय. पावभाजी प्रेमी
मस्त लिहिलेय.
पावभाजी प्रेमी नसूनही आवडले..
किंवा नसलो जरी मी पावभाजी प्रेमी, तरी एकेकाळी पावभाजीवरच जगलो आहे. हॉस्टेलला स्टडी नाईट मारताना माझ्या त्रिकोणी आहारातील मॅगी आणि भुर्जीपावनंतरचा तिसरा कोन पावभाजी होता.
हल्ली मुद्दामून पावभाजी खाणे नाही होत. तोंड आधीच आंबट होते. पण माझ्या दोन गंमतीने मानलेल्या गर्लफ्रेंड आहेत. बहिणी आहेत. एक चायनीज फूड लवर तर पावभाजी लवर. त्या दोघी भेटतात तेव्हा त्या अनुक्रमे हेच मागवतात आणि मला शेअर करावे च लागते .. या आणि अश्या बरेच आठवणी.. काही पावभाजीशी निगडीत तर काही पावभाजीच्या गाड्यांवरील राड्याशी संबघित.. अगदी ते वास्तव स्टाईल होता होता राहिलेलीही प्रकरणे आहेत..
अहाहा !! केलीच पाहीजे पावभाजी
अहाहा !! केलीच पाहीजे पावभाजी आता मला पण. तोपासु. मस्त लेख.
विद्या.
आगाऊने लिहिलेला एकएक शब्द
आगाऊने लिहिलेला एकएक शब्द दगडावर कोरल्याप्रमाणे खरा आहे. पोटभर जेवण करुन जरी सुप्रजावरुन गाडीवर जात असालना तरी भाजीचा दरवळ वेड लावतो वेड.... चव तर स्वर्गात पाठवते.
मुंबईत एकेकाळी ताडदेवची
मुंबईत एकेकाळी ताडदेवची सरदारची पावभाजी लई फ्येमस होती. अजूनही ते आहे बहुतेक, पण आता कळा गेलीय.
पावभाजी पुर्वी, मुंबईत ऊसळ पाव फ्येमस होता. पण हिप्पी लोक आले त्यांचि पावाची सवय जात नव्हती पण ऊसळ त्यांना ( त्यांच्या पोटाला ) सोसत नव्हती. म्हणून मग कांदे, बटाटे, टोमॅटो असे एकत्र शिजवून काला करून ते पावासोबत खात... नंतरचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहित आहेच.
मस्तच लिहिलंय ! सुप्रजात
मस्तच लिहिलंय !
सुप्रजात पावभाजी खाण्यासाठी तरी एकदा सोलापूरला गेले पाहिजे असे वाटतेय
मी लेखातल्याइतकी पावभाजी प्रेमी नाही पण पावभाजी आवडतेच. हा एकच असा मेन्यू आहे की कितीही घिसापिटा वाटला तरी कधीही बोअर होत नाही, मजाच येते खायला. मऊसूत बटरी पाव जितके आवडतात तितकेच घरचे आतून सोनेरी रंगावर कुरकुरीत भाजलेले पावही आवडतात. वरुन कांदा-कोथिंबीर-लिंबू हवेच.
घरच्या पावभाजीला जशी हॉटेलातल्या भाजीची सर येत नाही तशी बाहेरच्या भाजीलाही घरच्या पावभाजीची सर येत नाही. दोन्ही आपापल्या ठिकाणी बेस्ट ! जरा जास्तच भाज्या ( आणि टोमॅटो कमी ) घातलेली, अधूनमधून आख्खे मटार दिसणारी, ( कृत्रिम रंग नसल्याने ) हॉटेलइतकी लालभडक नसलेली आणि बटर निथळत नसल्यामुळे हेल्दी वाटणारी, फिक्या रंगाची पण चविष्ट अशा घरगुती वाफाळलेल्या भाजीची मजा वेगळी
मस्त लिहिलंय. एकदम खमंग आणि
मस्त लिहिलंय. एकदम खमंग आणि चविष्ट!
आमच्याकडे घरी पाभा दोन वर्षांतून एकदा बनत असावी. यावरून लक्षात आलं की ही सरासरी राखायची तर पुढच्या एक-दोन महिन्यांत घरी पाभा करायला हवी.
बाकी, एल्कोची पाभा लै ब्येश!
पाभा डोसा मी देखिल करते. पण त्यासाठी साग्रसंगित पाभाची गरज नाही. उ.बटाटे, बारीक कापलेले टोमॅटो आणि पाभामसाला असला की झालं. डोसा अतिशयच यम्मी होतो.
मस्त ! पावभाजीसारखाच चविष्ट
मस्त ! पावभाजीसारखाच चविष्ट लेख
मुंबईतल्या सरदार पाभाच नाव ऐकून होते . योगायोगाने इंटर्नशीप करत असताना तिथे जायचा योग आला . सरदारची पाभा म्हणजे आखा अमूलच एक पाकीट बुडवलेली असते . आणि पाव तर बटरमध्ये आंघोळ करून आल्यासारखे . ती प्लेट पाहूनच हजार कॅलरी अंगावर चढतात
सही लिहलं आहे. पावभाजी
सही लिहलं आहे. पावभाजी माझ्याही अत्यंत आवडीची. माझ्याही बहुतेक वाढदिवसाला पावभाजी आणि आइस्क्रिम हाच बेत असायचा. कोणी पाहुणे येणार असले की मेन्यू ठरवताना पहिला पर्याय पावभाजीच असतो सगळ्या भाज्या कुकर मध्ये न घालता फक्त बटाटेच कुकर मध्ये उकडून बाकी तव्यावरच स्मॅश करुन जास्त आवडते.
सुप्रजाच्या पावभाजी बद्द्ल अनुमोदन. सुप्रजाच्या मालकाचा मुलगा माझ्या भावाचा मित्र आहे त्याला एकदा आम्ही सुप्रजा पावभाजी रेसिपी साठी अतिशय पिडलं होतं पण आमचा स्पेशल घरचा मसाला असतो ह्याशिवाय त्यानी वेगळं काही सांगितलं नाही
लेख आवडला!! बे एरीयात चांगली
लेख आवडला!!
बे एरीयात चांगली पावभाजी फक्त आपापल्या घरीच मिळते
लेख वाचल्यानंतर घरी जाऊन
लेख वाचल्यानंतर घरी जाऊन रात्री पावभाजी केली. शिवसागर ची चव नव्हती, पण चालून गेली .........
एव्हरेस्ट च्या पावभाजी मसाल्याने लाज वाचवली, नाहीतर मित्रांनी, 'ईतर दिवशी भाजीत वेगळं काय असतं?' हा प्रश्न नक्कीच विचारला असता ................
मस्तं लिहिलंय. >>तर माझ्या
मस्तं लिहिलंय.
>>तर माझ्या आईच्या एका सद्वर्तनी मैत्रिणीने तिला सांगितलं की पावाभाजीत बीट घातलं की अगदी बाहेरच्या सारखा रंग येतो....
नाविन्याची हौस असलेल्या एका मैत्रिणीच्या आईनं आमच्यावर ह्याचा प्रयोग केला आहे. बिटाची किंचित विचित्र (मातकट?) चव वाटली. पण ते 'बीट आहे' हे माहिती झाल्यामुळेही असेल. रंग अजीबातच बाहेरच्या भाजीसारखा टेम्प्टिंग नव्हता. तरी आवडला. पावभाजीच्या भाजीची नवीनच शेड बघायला मिळाली. मुळातच पावभाजी तुफान आवडत असल्यामुळे सगळं 'वा वा' करत रिचवलं. आणि रंगाचं पण कौतूक केलं.
आमच्या घराजवळच्या देवळाच्या कँटीनमध्ये पावभाजीत बटबटीत गाजर चकत्या घालून मिळतात. सवयीनं ती भाजीही आवडायला लागली.
हा पुरावा:
सुप्रजाच्या मालकाकडून, तिथे
सुप्रजाच्या मालकाकडून, तिथे काम करणार्या नोकरांकडून, पावभाजी करणार्या स्वैपाक्याकडून मसाल्याची रेसेपी मिळवण्याचा प्रयत्न केला, नो लक
एपिक चॅनलवर राजा,रसोई और अन्य
एपिक चॅनलवर राजा,रसोई और अन्य कहानीया कार्यक्रमात एकदा मुंबईमध्ये मिळणार्या स्ट्रीट फुडवर एपिसोड होता. त्यात पावभाजीचा इतिहास सांगितला की पूर्वी नाईट शिफ्ट/सेकंड शिफ्ट मधुन उशीरा सुटणार्या कामगार वर्गासाठी हॉटेलवाले उरल्यासुरल्या भाज्या एकत्र करुन मसाला टाकुन पावाबरोबर सर्व्ह करायचे. त्यातुन पावभाजीचा जन्म झाला.
वा, मस्तं लिहिलंयस.. खरीच
वा, मस्तं लिहिलंयस.. खरीच पंखी आहेस पा भा ची..
मृण्मयी... चक्क गाजराच्या चकत्या... ऊफ!!!!
त्यात पावभाजीचा इतिहास
त्यात पावभाजीचा इतिहास सांगितला की पूर्वी नाईट शिफ्ट/सेकंड शिफ्ट मधुन उशीरा सुटणार्या कामगार वर्गासाठी हॉटेलवाले उरल्यासुरल्या भाज्या एकत्र करुन मसाला टाकुन पावाबरोबर सर्व्ह करायचे. त्यातुन पावभाजीचा जन्म झाला.>>> हे खरं आहे. माझ्या आठवणी प्रमाणे पहिली पावभाजीची गाडी आमच्या वाडीतल्या रानड्यांनी additional income source म्हणून सुरु केली होती. ती गाडी गिरगावात मांगलवाडीच्या समोर लागायची. ही भाजी कधीच लाल भडक नसे. त्यात बटरही नसे. पानांच्या द्रोणात ही भाजी मिळे. ही भाजी जरा घट्टच असे. अगदी गरगट्ट पिठलं केलेलीही नसे. पावही नुसतेच मिळत त्या सोबत. बटर कसे परवडणार? वाडीतल्यांचीच गाडी आमच्या वाडीतली मोठी मुलं ही भाजी बांधून आणत आणि आम्हालाही खाऊ घालत. खाली अंगणात हा पावभाजी खाण्याचा प्रोग्राम चाले. बाहेरची भाजी खाणे ही कल्पनाच तेव्हा अस्तित्वात नसल्याने घरच्यांपासून लपवून एक दोन घास खाल्ले जात. त्यात मिक्स भाजी ही कल्पनाही नविनच होती. घरच्या चिंच गुळाच्या भाजीपेक्षा ही भाजी वेगळी लागत असे म्हणून कुतुहल असे. ह्या गाडीला मिळालेला रिस्पॉन्स पाहून नंतर पाठोपाठ वाडीतल्या शेंड्यांनीही गाडी सुरु केली. नंतर गुलालवाडीची फेमस पावभाजी सुरु झाली.
हळूहळू पावभाजी अख्ख्या मुंबईची झाली. तिचं रुप बदललं. ती लालेलाल आणि बटरने समृद्ध झाली. ती पातळही झाली. पावही बटरमध्ये लोळूनच प्लेटमध्ये येवू लागले.
सर्वांचे खूपच आभार! मज्जा आली
सर्वांचे खूपच आभार! मज्जा आली प्रतिसाद वाचून... सुप्रजा बद्दल खूप्प ऐकून आहे पण अजून योग जुळून आला नाही...
गेल्या भारत भेटीत सरदार ला आवर्जून भेट दिली... पण त्यानंतर बटर चा वीट आला... फार फार बटर... अगदी नको इतकं..
Cannon ची पाभा पण प्रसिद्ध होती पण तिचीही रया गेली...
harshalc: कर्मणि एव च लिहायचं होतं... चूकून एक लिहिलं... धन्यवाद दाखवून दिलंत!
अख्खं गाजर.... कहर आहे...
मुग्धटली: मी पण तेच बघितलं होतं... कामगारांसाठी...मिक्स भाजी आणि पाव...
बाकी सगळ्यांच्या पाभाच्या कडू गोड आठवणी छानच आहेत...
बाकी सगळ्यांच्या पाभाच्या कडू
बाकी सगळ्यांच्या पाभाच्या कडू गोड आठवणी छानच आहेत... >>>>> पाभाच्या आठवणी कडु शक्य नाही, गोड तर नाहीच असल्याच तर आंबट तिखट असु शकतील.
मी पण पावभाजी फॅन.पावभाजी
मी पण पावभाजी फॅन.पावभाजी सँडविच पण भयंकर आवडते.बटर कमीत कमी वापरुन बनवते.आणि पाव बटर वर न भाजता नुसते भाजते
पावभाजी न आवडणारा एक निकटवर्तीय मनुष्य माहिती आहे: माझा भाऊ. तो जिथे जातो त्या पाहुण्यांची पंचाईत होते कारण पावभाजी आईसक्रीम मिल्कशेक आवडत नाही.आणि हे अत्यंत लोकप्रिय आणि कमी वेळात देता येणारे पदार्थ आहेत.
मस्त जमून आलाय लेख - अगदी
मस्त जमून आलाय लेख - अगदी पावभाजीसारखाच.
पावभाजी हा खूप क्रांतीकारी पदार्थ आहे. अगदी सुरुवातीला आई घरीच मसाला (तो पण ऐन वेळी) करून पावभाजी करायची. खूप वेगळी लागायची ती आजच्या पावभाजीपेक्षा, पण मस्तच लागायची. नंतर पावभाजी मसाला मिळायला लागला. त्या निमित्ताने घरात पहिला रेडीमेड मसाला आला. त्याआधी प्रत्येक मसाले घरीच व्हायचे किंवा कोणा काकू/ मावशींकडून यायचे.
मी पण पाभा प्रेमी पण घरी कधी
मी पण पाभा प्रेमी पण घरी कधी केली नाहिये. नवरा आणि लेकीला आवडत नाही म्हणून स्वतःपुरते समुद्र मधुन पर्सल आणते आजपण आणिन म्हणते.
अरे वा मस्त चविष्ट लेख....
अरे वा मस्त चविष्ट लेख.... मी पण पावभाजी क्लबात. कॉलेज मधे असताना पार्ल्यातील शिवसागर ची पावभाजी खूप आवडायची. हा एकच पदार्थ मला लग्ना अगोदर व्यवस्थीत करता येत होता आणि आवडत असल्यामुळे मी मनापासून करायचे. मटार च्या सिझन मधे दर शनिवारी घरी पावभाजी आणि टॉमेटो सूप हा ठरलेला पदार्थ. लग्न ठरल्यावर नवरा पहिल्यांदा घरी आला तेव्हा पावभाजी च केली होती. तो जाम इम्प्रेस झाला, मग त्याला कळले की ह्या एकाच पदार्थात माझी मास्टरी आहे
पावभाजी करताना कांदा टॉमेटो च्या ग्रेव्हीत काश्मिरी मिरच्या भिजवून वाटून टाकल्या की रेस्टॉरंट च्या भाजीसारखा रंग येतो. आता एवढे लिहिल्यावर या शनिवारी पावभाजी करावीच लागणार.
सुप्रजा बद्दल ऐकून पावभाजी खायला सोलापूर ला जावेसे वाटते आहे.
मृण्मयीच्या फोटोत गाजराची
मृण्मयीच्या फोटोत गाजराची चकती बटरात आंघोळ करतीये.
मुळात पाभा.त गाजर आमच्याकडुन पडवत नाही. गोड होऊन जाते पाभा.
अंजलीने दुसर्या धाग्यावर मस्त फोटो टाकुन लिहिलीये तशी आजकाल केली जाते. मस्तच बनते.
फुल, सॉरी, पाभा. हा प्रकारच असा आहे त्याच्या चर्चेला अंत नाही. ती कुठेही, कधीही सुरु होऊ शकते आणि एकदा सुरु झाली की... ...
Pages