गुन्हा नसून

Submitted by संतोष वाटपाडे on 18 April, 2016 - 01:29

निरोप द्यायचा म्हणून ती मिठीत घ्यायची
निरोप देउनी पुन्हा तिथेच घुटमळायची..

निघून जायचे खुशाल तेल पाठ फ़िरवुनी
दिव्यात वात एकटीच रात्रभर जळायची...

तिला समोर पाहुनी जरी न दुःख व्हायचे
जखम जुनी मनातली उगाच दरवळायची...

बघून दुःख भरजरी नकोस जीवना जळू
सदैव वाटते भिती तुझी नियत चळायची...

मनुष्यजन्म दे कधीतरी चुकून विठ्ठला
किड्यासमान जिंदगी किती युगे जगायची...

हवेमुळे तिची खट्याळ ओढणी उडायची
गुन्हा नसूनही प्रिया मलाच दोष द्यायची...

तव्यामधेच बाप राहिला रुतून जन्मभर
चुलीत माय भाबडी अधेमधे दिसायची...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनुष्यजन्म दे कधीतरी चुकून विठ्ठला
किड्यासमान जिंदगी किती युगे जगायची...

तव्यामधेच बाप राहिला रुतून जन्मभर
चुलीत माय भाबडी अधेमधे दिसायची...<<<

सुरेख शेर!

वा

>>>बघून दुःख भरजरी नकोस जीवना जळू
सदैव वाटते भिती तुझी नियत चळायची...>>>बहोत अच्छे!

>>>तव्यामधेच बाप राहिला रुतून जन्मभर
चुलीत माय भाबडी अधेमधे दिसायची...>>>निःशब्द!