मेंदू, भावना व वर्तणूक : भाग १

Submitted by मंजूताई on 12 April, 2016 - 06:45

सेतू – A Conscious Parents’ Forum ह्या पालकांच्या सपोर्ट ग्रुप च्या वतीने नागपुरात दर महिन्यात पालकांसाठी एका चर्चा सत्राचे आयोजन केले जाते. मुलांच्या वाढीच्या वयात शाळा- अभ्यास तर महत्त्वाचे असतातच पण मुलांचा नुसताच बौद्धिक विकास झाला तर तो विकास एकांगी होईल. मुलांसंदर्भात पालक म्हणून आपल्याला इतरही अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. मुलांची शारीरिक - मानसिक - बौद्धिक वाढ, क्तिमत्त्वातील वेगवेगळ्या पैलूंचा विकास, विविध शास्त्रे, समाजजीवन, मूल्य – नैतिकता, कला – संस्कृती, सौदर्यदृष्टी ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच सेतू च्या दर महिन्याच्या मीटिंग मध्ये वेगवेगळ्या विषयात काम करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींना बोलविले जाते. ह्या चर्चे मधून अनेक नवे पैलू त्या त्या विषयातले कळतात. त्याचाच एक भाग म्हणून मार्च महिन्यात झालेल्या चर्चेच्या वक्त्या होत्या डॉ. पौर्णिमा करंदीकर. कन्सल्टींग् न्युरॉलॉजिस्ट म्हणून त्या शांतीनिकेतन नर्सिंग होम, व समर्पण हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. Indian Epileptic Association, Nagpur Chapter च्या त्या २०११-१३ ह्या काळात प्रेसिडेंट होत्या. आणि आता त्या मेंदुविकार तज्ज्ञ म्हणून काम करत असतानाच भावनिक बुद्ध्यांकावर काम करीत आहेत. मुलांसाठी त्या भावनिक बुद्ध्यांकावर कार्यशाळा घेतात. भावनिक बुद्धिमत्ता, ह्यातली आव्हानं, मेंदू, भावना व वर्तणूक ह्यांचा परस्पर संबंध ह्या अनुषंगाने झालेल्या चर्चेचा हा गोषवारा .....
आपण ‘पालक’ होतो... हे बाय डिफॉल्ट घडतं. त्यासाठी कुठलीही परीक्षा द्यावी लागत नाही किंवा अर्ज करावा लागत नाही किंवा परवाना लागत नाही. ‘सुजाण पालकत्व शिकवणी वर्ग’ अशी कुठे पाटी वाचनात आली नाही. मुलाचं वय व आपलं पालक म्हणून वय हे एकच असतं. मुलं जसे घडत जाते तस तसे आपणही ‘पालक’ म्हणून घडत असतो. आपल्या दोघाचंही घडणं भावनिक बुध्यांक्यावर अवलंबून असतं त्यासाठी आधी आपण आपल्या मेंदू विषयी जाणून् घेऊ.
मेंदू हा आपल्या शरीरातला विचार क्षमता, निर्णय क्षमता, वर्तणूक, अस्तित्वाशी, व्यक्तिमत्त्वाशी निगडित असणारा एक महत्त्वाचा जटिल अवयव ! डायबेटीस, हृदय विकार होऊ नये म्हणून प्रतिबंधनात्मक उपचारावर बरंच संशोधन होतंय पण मेंदू विकारांवर होत नाही. मेंदू तल्लख कसा ठेवावा त्यासाठी मार्गदर्शिका उपलब्ध नाही. WHO (जागतिक आरोग्य संघटना) ह्यावर बरंच काम करतेआहे. मेंदूचा अभ्यास करणं म्हणजे समाजशास्त्राचा अभ्यास करण्यासारखं आहे. समोरून गाडी येताना दिसणे व बाजूला होणे.. ही क्रिया घडते ती मेंदूच्या वेगवेगळ्या भागात असणाऱ्या विविध सेल्सच्या समन्वय, सहकार्य व संवादातून ! हो, संवादातून...! जर संवाद नसता झाला तर काय घडलं असतं ह्याची कल्पना न केलेलीच बरी. हे जे सेल्स आहेत ते अगणित आहेत आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे.
मेंदूच विकासाचा अभ्यास करताना त्याची रचना व कार्यपद्धती समजून घ्यायला हवी. मेंदूची उत्क्रांती मासे >> अॅम्फिबीयन >> शार्क >> रेप्टाईल >> बोनी फिश >> पक्षी >> सस्तन प्राणी >> मानवी मेंदू अश्या तऱ्हेने झाली.सर्वसाधारण मेंदूचं वजन १.४ किग्रॅ. असतं. बुद्ध्यांक व मेंदूच्या वजनाचा काहीही संबंध नसतो. तुम्ही नॅशनल जियो चॅनेल पाहत असाल तर मगरीला ही राग येतो हे पाहिले असेल कदाचित. सरपटणाऱ्या प्राण्यांना, पक्ष्यांना, प्राण्यांना भावना असतात पण त्याच्यावर त्यांचं नियंत्रण नसतं. मेंदूच उत्क्रांतीचे टप्पे जर का पाहिले लक्षात येईल की जसे कालपरत्वे संगणक अद्ययावत, विकसीत झाले त्याचप्रमाणे मेंदूही काल सुसंगत विकसीत होतोय. मेंदूच्या विकासात एक गोष्ट सगळ्यांमध्ये सामाईक आहे ती म्हणजे ‘प्रेरणा’. प्रेरणेच्या पाठीमागची कारणे वेगवेगळी आहेत. सस्तन प्राण्यांमध्ये भावनिक गरजांची उत्क्रांती झाली. त्यात हत्तीच्या मेंदूची उत्क्रांती जरा जास्त झाली. गट बांधणी, नेतृत्व करणे व इतर काही कौशल्ये इ.. मानवी मेंदू पण असाच विकसीत होत गेला व होतोय.
वर्षानुवर्षाच्या उत्क्रांती नंतरचा हा आपला जो प्रगत मेंदू आहे तो गर्भात नऊ महिन्यात तयार होतो. पण तो पूर्ण विकसीत नसतो. गर्भधारणेपासून मेंदूच विकास प्रक्रियेला सुरुवात होते म्हणून आईचं आरोग्य व बाळाचा मेंदू विकास ह्यांचा थेट संबंध आहे. प्रतिबंधात्मक मेंदू विकारासाठी अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की ‘फीट चे मुख्य कारण आहे अपघाताने मेंदूला झालेली दुखापत किंवा धक्का आणि ह्याचा वयोगट आहे पंधरा ते पंचवीस वर्ष. ह्या वयात फ्रंट लोबची वाढ झालेली नसते फ्रंट लोबाची पूर्णं वाढ पंचविशीमध्ये होते.
मेंदू विकासाची प्रक्रिया आयुष्यभर चालू असते, थांबत नाही म्हणूनच पक्षाघाताचे रोगी ज्यांच्या मेंदूतले सेल्स मृत झालेले असतात तरी पण उपचारा व प्रेरणेमुळे ते चालू बोलू शकतात ह्याचाच अर्थ असा की त्यांची जागा दुसऱ्या सेल्सने घेतली आहे. त्याला वैद्यकीय भाषेत ‘ न्युरो प्लॅस्टिसिटी’ म्हणतात. पक्षाघाताचे रोगी जर प्रगती करू शकतात तर सर्वसाधारण माणसे तर शिकूच शकतात ना. ‘शिकायला वयाचं बंधन नाही’ वयापरत्वे शिकण्याची गती व प्रगती मात्र व्यक्तिसापेक्ष आहे.IMG_6561.jpg
बाळाच्या ज्ञानेंद्रिय विकासामध्ये बाळाला आधी स्पर्श आवाज, दृष्टी व गंध समजतो, चव उशिरा कळते. स्पर्शातून मुलं अनुभव घेत असतं, शिकतं असतं. बाळाची प्रगती जी आपल्याला दिसते त्याची प्रक्रिया मज्जा संस्थेत होत असते तिला मायलिनेशन (मेंदूतल्या तंतू भोवती आवरण तयार होणे) म्हणतात. मेंदूच विकासात ह्याचा सहभाग महत्त्वाचा आहे. मायलिनेशनमुळे मुलांमध्ये निर्णय क्षमतेचा विकास होत असतो. तुम्ही पहा साधारणतः दोन वर्षाच मुलं मी हे करणारच नाही / अमुकच करणार असे सांगायला लागतं. एक वर्षाच्या मुलामध्ये साधारण सातशे मज्जा तंतूचं जाळं तयार होतं. बुद्ध्यांकाचे अनेक पैलू भावनिक, गणितीय, भाषीय, तार्किक, इ. क्षमता निर्माण होणं ह्या जाळ्यामुळे वा जोडणीमुळे शक्य होते. नर्व्ह सेल्समुळे नाही. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर नर्व्ह सेल्स हे हार्ड वेअर आहे तर हे जाळं, सॉफ्ट वेअर ! ह्या सॉफ्ट वेअरमुळे व्यक्ती प्रगती करत असते. माणूस ज्ञानेंद्रिया व मनेंद्रियाद्वारे (अनुभवाद्वारे) शिकत असतो. मनेंद्रिय भावनिक बुध्द्यांकाचा पाया आहे. आपण आपल्या वागणुकीतून/वर्तणुकीतून मुलांना जसे अनुभव देऊ तसे आपलं मुलं घडेल. मला राग येतो पण आवरता येत नाही ..... कळतं पण वळत नाही.... ही जी स्थिती आहे ती ह्या तंतूच्या जाळ्यात अडकली आहे. स्वभावाला औषध नाही असे म्हणून गप्प बसायचं का ? नाही ! हे एक प्रकारचं कौशल्य आहे आणि ते मिळवावं लागतं, अथक प्रयत्नाने व सातत्यपूर्ण सरावाने. मायलिनेशन पूर्ण झालं म्हणजे हार्ड वेअर तयार झालंय आणि अनुभव हे सॉफ्ट वेअर आहे ते अद्ययावत होत असतं. IMG_6542.jpg
हे खरं आहे की एकदा सेल्स मृत झाले तर त्यांना पुनर्जीवित करता येत नाही. पण आज काल स्टेम सेल्स साठवून ठेवतात कारण ह्यात अशी क्षमता असते की ते इतर कुठल्याही सेल्समध्ये काही रसायनांद्वारे रूपांतरित होऊ शकतात पण मेंदूच बाबतीत अनभिज्ञ आहोत. मेंदूत असा काही कप्पे आहेत जिथे नवीन सेल्स तयार होत असतात. ज्याचा संबंध स्मृती व भावनेशी निगडित आहे. ह्या नवीन सेल्सना कार्यरत ठेवणे गरजेचं असतं अन्यथा ते मृत होतात. मृत होऊ नये म्हणून सतत काहीतरी शिकत राहावं.... काही छंद जीवाला लावून घ्यावे. हे छंद केव्हा लावायचे? लहानपणापासूनच ही आवड विकसीत करावी. आज घडीला तर त्याचा फायदा आहेच पण म्हातारपणी होणारा स्मृतीभंशाचा आजार त्यामुळे रोखल्या जाईल. ९ वी ते १२ वी ह्या काळात छंदांना लगाम लागतो. काही हरकत नाही. पण कदाचित ह्या छंदाचं व्यवसायात रूपांतरही होऊ शकतं किंवा मध्य वयात त्याला त्याचा फायदा होईल. शिकलेलं वाया जातं नाही आपण म्हणतो, ते हेच.
http://www.maayboli.com/node/58330

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान माहिती. Happy
अशाच प्रकारचे लेख डॉ श्रुती पानसे लोकसत्ता मध्ये लिहित असत.

अतिशय सुरेख लिहीलायस... लकीली मी अटेंड केले होते लेक्चर.. खुपच छान सेशन होते...
तु खुपच छान डीटेल मधे आणि सहज समजेल असा लिहीलायस..

एक सुचना ,आहे, सल्ला नाही.
१)लेख वाचायला सुरुवात केली आणि आवडत होताही पण खूपच मोठा आहे. तुम्ही तो विभागून दिला असता तर छान झाले असते.
२) पुर्ण मराठीत वाचताना जड जातेय खरे. 'य' वर्षे झाली मराठीत विज्ञानाची माहिती वाचताना त्यामुळे प्रत्येक शब्द समजायला वेळ लागतोय.

पण वरती म्हटलय त्याप्रमाणे मेंदू हा प्रयत्न्शील असावा , तो प्रयत्न करून वाचेन नंतर... Happy पण समजायला वेळ लागेल. Happy

वेल,सायु,अंजु,नानबा व झंपी धन्यवाद!
झंपी, Happy मेंदूला व्यायाम झाला तर जास्त प्रयत्नशील होतो Happy खरंतर संपूर्ण लेख शुध्द मराठीत लिहायचा प्रयत्न करत होते .... ताणामुळे मेंदू थकला Happy बरं झालं ना ......

छान आणि माहितीपूर्ण लेख आहे! पण मला देखील थोडा विस्कळीत वाटला. उपशीर्षकं द्यायला हवी होती असे वाटले.
मंजूताई, तुम्हाला एवढे सगळे लक्षात कसे राहीले? भारी!

दिनेशदा, जि धन्यवाद! जि, रेकॉर्ड केलेलं असतं , दीड तासाच लेक्चर होतं ते ! मलाही विस्कळित वाटतोय ..

गाडी चालवताना एक वाक्य रस्त्यावर लिहिलेले दिसते,
"चालक थकलाय, थोडं थांबा ना"
तसे हा लेख वाचताना वाटले,
"मेंदू थकलाय, थोडं थांबा ना" Happy Light 1