तर्क, विश्वास, वगैरे वगैरे...

Submitted by सई. on 8 April, 2016 - 04:18

नवं वर्ष सर्वांसाठी आनंदाचं होऊ दे!

असं केवळ मी म्हणत नाहीये, तो बाहेर नटलेला बहरलेला निसर्ग म्हणतोय. आज सकाळपासून तिघा-चौघांकडून माझा विश्वास नाही गं, मी काही हे मानत नाही गं ऐकलं. ओके, अॅग्रीड. अगदी मनापासून आदर आहे. पण प्रत्येक गोष्ट इतकी तर्का-विश्वासाच्या कसोट्यांवर का तासायची आहे? तुमची मतं, तुमचा धर्म, तुमच्या विश्वासानं त्या निसर्गाला काडीचाही फरक पडत नाही, माणसांनो! तुम्ही सण साजरे करा, नका करू, जुळवून आपल्याला त्याच्याशी घ्यायचंय, त्याला कवडीमात्र देणंघेणं नाही. तसंही आता गेल्या काही वर्षांपासून तो 'तडफडा तिकडे' म्हणतोचंय. अरे, बाहेर बहावे, काटेसावर, पळस, अगदी बोगनवेलीही झडझडून उठतात, नव्या कोवळ्या पालव्या फुटतात, त्या केवळ राम वनवासातून परतला किंवा बळीनं दानशूरपणा दाखवला म्हणुन नाही, ना तो केवळ हिंदूंसाठी फुलतो, ना इतर कुणासाठी. आपण मात्र सगळं कोष्टकात बसवतो.

आज कडूनिंब अख्ख्या उष्ण कटीबंधीय लोकांनी खायला हवाय, आजच नाही, आजपासून. नुसता खावा किंवा पाण्यात घालून आंघोळी करायला हव्यात. उष्मा नियंत्रित ठेवण्यासाठी, परंपरा पुढे रेटण्यासाठी नाही. घाम उत्सर्जित होत राहून उर्जा कमी होते, साखरेच्या सेवनाने ती पातळी वाढवू. पन्ह्यानं उन्हाळा बाधत नाही. पटत नाही ना, मग सण म्हणुन नका ना बघू तिकडे. होळी आता हानीकारक म्हणुन पेटवू नये, पण इतकी शतकं होळीनं थंडी काय फक्त हिंदूंसाठी पळवली का, शेवटी ती एक पोर्णिमेचा मुहूर्त साधून पेटवलेली साधी शेकोटीच ना? सुगी झाली म्हणुन त्या निमित्तानं पुरणाच्या पोळ्या होतात. रंगपंचमीला तुम्ही नका हवंतर रंग खेळू, पण बाहेर वसंत जिकडंतिकडं रंगांची उधळण करतोय. ती केवळ हिंदूंसाठी नाही. मार्चएंडला अकौंटींग इयर संपतं तेव्हा करतो का आरडाओरडा? ते आपण सोयीसाठी सर्वमान्यतेनं स्विकारलेलं आहे, पण तेही कुणीतरी कधीतरी म्हणालेलंच आहे ना? शिशिरात पानगळ करून निसर्गाचं वर्ष संपतं. तुम्ही कीर्द खतावण्या नव्या घाला, नका घालू, बाहेर पालव्या फूटून खरोखरचं नवीन वर्षं सुरू झालंय. ते कुणीही कधी सांगितलेलं नाही त्या निसर्गाला. श्रावणात निसर्गातल्या पत्री गोळा करून घरादाराचे कानेकोपरे सजवा ना, इकेबाना करा, कुणी सांगितलं, फक्त मंगळागौरीलाच वहा म्हणुन? अशी निमित्तं इतरेजन कसे साजरे करतात तेही समजून घेता येईल. गुढी उभारली, अगदी एखादी गौर झोपाळ्यात झुलवत दिवाणखान्यात बसवल्यास झकास इंटिरीयर डेकोरेशन होतंय. वर पन्हं, कैरीची डाळ म्हणजे तर दुधात साखर आणि गारेगार! हवेत एखादी हलकी सनईची धून तरंगत ठेवावी. छानपैकी जमेल त्या जीवाभावाच्या सग्यासोय-यांना बोलवावं त्यानिमित्तानं. केवळ बायकांनाच का हा लाभ? असं अधूनमधून निसर्गाशी समन्वय साधून काही केलं तर आपल्या नेहमीच्या रटाळ रुटीनमधून ब्रेक मिळाल्यासारखं वाटत नाही का आपल्याला? का इतके तर्ककर्कश्श होतो आपण?

सणवाराचे दिवस आले की विश्वास नसणारे तथाकथित निधर्मी लोक बेंबीच्या देठापासून कसा सगळा चळीष्टपणा आहे ते सांगत शब्दश: कोकलत सुटतात, विश्वास असणा-यांची यथेच्छ टर उडवत. आहे नाही ते सगळं बुद्धीचातुर्य तिथे खर्ची घालायची जणू अहमहमिका लागते. जे नकोसं आहे ते मान्यच आहे. टाकलंच पाहिजे. पण जिथे डावं आहे तिथे उजवंही आहेच. ते का दिसत नाही? उलट त्यानिमित्तानं पक्वान्नं चापू, मिळालेल्या सुट्टीचा सानंद उपभोग घेऊ, लोळू, फिरू, भेटू, जे हवं ते करू ना. मी निसर्गधर्मी आहे. तो सांगतो ते मनापासून ऐकावंसं वाटतं. आणि मला माझ्या कुवतीनुसार जितकं झेपतं ते मी ऐकते.
इतक्यात एक अफगाणी मित्र गोतावळ्यात सामील झालाय, इस्लामाबादला दोन वर्षं दूतावासात काम करून आलाय. त्याला पाडवा म्हणजे काय ते हवंय. त्याला कडूनिंबाची चटणी खाऊ घालायचं आणि त्याच्या गोष्टी ऐकायचं ठरलंय. त्याचं जग आम्हा बाकीच्यांच्या जगापेक्षा सर्वस्वी निराळं आहे. गुगल आणि सोशल मिडीयाचा जमाना असूनही, प्रत्यक्ष माणसानं सांगितलेल्या गोष्टी डोळे विस्फारत ऐकण्याची मजा आजही जशीच्या तशी टिकून आहे.

माझ्या मनात आपल्यापेक्षाही आपल्या मुलांबद्दल जास्त विचार येतो. आपण ही निमित्तं, क्षण नाकारतोय आणि त्यांना निसर्गचक्र, पर्यायाने जीवनचक्रही याची देही, याची डोळा सोदाहरण समजावण्याची संधी डावलतोय. कुणीतरी, पूर्वी कधीतरी, ह्या ह्या दिवशी हे हे करा असं सांगितलं असेल, ते आज तसंच्या तसंच केलं पाहिजे असं कुठाय? ज्यांना सांगितलंय त्यांनीच फक्त केलं पाहिजे असं तरी कुठे लिहीलंय? बिहू, ओणम आवडेल मला साजरं करायला. मला शीरखुर्मा तुफान आवडतो, लहानपणच्या माझ्या कितीतरी आठवणी ईदशी निगडीत आहेत. मी वाढले त्या परिसरात पाच मशिदी आहेत आणि आमचं घर मधोमध. आजही ईदला बिलाल मुल्लांचा फोन आला नाही तर मी फोन करते आणि शीरखुर्मा ओरपून येते. जेव्हा जाणं जमत नाही, तेव्हा घरी बनवायचा प्रयत्न करते. पण तशी चव येत नाही म्हणा.

आपण आज सर्वार्थाने इतक्या भयंकर वातावरणात जगतोय की मिळतील त्या प्रत्येक बारक्या सारक्या, छोट्या मोठ्या निमित्तांनी आनंद ओढून घेतला पाहिजे. तर तरू. ते करत नाही म्हणुन या भांडाभांड्या, लढाया अन् डोकेफोड्या. प्रत्यक्षही अन् व्हर्चुअलीही. बरं, तुम्हाला नाही करायचं तर नका करू, इतरांच्या आनंदाला कशाला कडवटपणाची विरजणं लावत फिरताय? तेही कडूनिंब न खाताच! उलट तो खाल्लात तर गोड व्हाल जरा. उगीच आपलं कायतरी!

असो. अगदीच रहावलं नाही, म्हणुन बोलत सुटले. आधी वाटलं, नको, कशाला बोलून दाखवायचं, आपलं आपल्याकडं. पण जिथं तिथं नकाराचे गळे काढणारे विचार करत नाहीत, आपण मात्र नको, राहू दे, म्हणत बसतो. मतं प्रत्येकालाच असतात. आणि गप्प बसणारेही विचार करतच असतात. आज त्या 'न'कारकारांनी हे एक व्यक्त होण्याचं निमित्त (की कोलीत?) आयतं पुरवलं. ज्यांना ही मतं पटत नसतील, त्यांनी स्वत:ची मतं कृपया स्वत:पाशीच ठेवावीत. कोणत्याही युक्तीवादात स्वारस्य नाही, तेव्हा क्षमस्व.

पुनश्च सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय अगदी मनापासून! मलाही असं अनेकदा वाटतं की सणांमागचा अर्थ सकारात्मक रित्या समजावून घेतला पाहिजे.

मला नकारार्थी टेप लावून स्पष्ट शब्दांत विरोध करणारे लोक चालतात पण एकीकडे सण समारंभात भाग घ्यायचं आणि दुसरीकडे 'अंधश्रध्दा, अन्यायी हिंदुधर्म' अशी टीका करत काडया घालायच्या असं करणारे दुट्प्पी लोक पथेटिक वाटतात.

अतिशय छान सई. मी एक प्रयत्न करतेय मुलांना आप्ल्याला माहिती असणार्या सणांची सकारात्मक माहिती द्यायची आणि कुठला आधी घरात साजरा न केलेला सणही साजरा करायचा. मुलं परदेशात वाढत असल्याने बरंच व्हर्च्युअलच म्हणायचं. एक कोपरा छोटं डेकोरेशन आणि जमल्यास त्याशी रिलेटेड कुकिंग. याला कुठेतरि भंपक बोट असे देखील म्हटले आहे Wink जोवर मला अडचणीत टाकणारे प्रश्न येत नाहीत तोवर इट्स फन. इस्टरची अंडी घरी बनव वगैरे बंपर असत्तात पण चालायचं Happy कडुनिंब मिळ्णार नसल्यामुळे काढा देता येणे सारख्या ऑपॉर्च्युनिटिज आहेतच. एकंदरित भंपक बोट रॉक्स Happy

छानच ! मला तर खिडकी उघडल्याने मस्त मोकळ्या वार्‍याची झुळूक आल्यासारखं वाटलं वाचताना !
[रच्याकने, हा 'शीरकुर्मा' कधीं चाखला नाहीं; मिळतो का मुसलमानी हॉटेलात ? कीं,फक्त ईदचीच,खास डिश आहे ? ]

अचूक शब्दात मांडलेले निखळ विचार मनाला भावून गेले....

शेवटचा परिच्छेद तर कमालीचा सुंदर...

अतिशय सुंदर, समतोल राखणारे लेखन .... मनापासून धन्स .... Happy

अनेकानेक नववर्ष शुभेच्छा.. Happy

सर्वांना मनापासून धन्यवाद मंडळी.

धनि, काय आणि कसं मांडता येईल सुचवलंत तर तसे बदल करू शकेन. हेतू पूर्ण सकारात्मक असल्यामुळे जर काही विपर्यास होत असेल तर मग मांडणीत दोष आहे.

मेधा, हो, मोबाईलवर झरझर टाईप केलंय. फेबुवर थेट लिहिला तो माबोवर पोस्ट करताना जरा पॅराबिरा पाडून सारखा केला इतकंच.

वेका, आणखी काय पाहिजे? Happy आपल्याला सुचेल, झेपेल तितकं करत रहायचं.

भाऊ, शीरखुर्मा हे माझ्या समजूतीप्रमाणे ईदला केलं जाणारं पक्वान्न आहे. शेवयांची खीरच पण वेगळ्या पद्धतीची. सुका मेवा, सुकं खोबरं, खसखस, भोपळ्याच्या बिया वगैरे घालतात. माझ्या मते, साहित्यापेक्षाही त्या 'माहौल'मुळे तिची खरी लज्जत असते. 'ऑसम' लागते!
नंदिनी, तू जास्त नीट सांगू शकशील त्याबद्दल Happy जमल्यास त्यासंदर्भातल्या आठवणींचा एखादा धागा नाहीतर कृती तरी. धागा आला तर इतरांनाही त्यावर आपापल्या सुखद मजेशीर आठवणी लिहिता येतील. फर्माईश!

लेख छान आहे. विचार आवडले आणि पटले. पण माझ्या आजूबाजूला नाके मुरडणारी कमी आणि उत्साही लोकं जास्ती असल्याने मला असे वाटण्यापेक्षा उलट अधिक वेळा वाटते.
सण साजरे करण्याला ना धर्माचा आधार आहे ना तर्काचा हा केवळ आनंदाचा आणि खुशीचा मामला असला पाहिजे. तो आनंद आतून बाहेर आला पाहिजे. पण आजकाल अनेकदा आनंद हा वरवरचा आणि तात्कालिक आहे असं वाटत राहतं. सकारात्मक पद्धतीने सण साजरे करणे ह्यात काहीच गैर नाही पण जेव्हा सणांचे स्वरूप देखाव्यावर भर देणारे होताना दिसते तेव्हा मात्र साजरेपणा कशासाठी? असा प्रश्न पडतो.

पोटतिडिकेनं लिहिलेलं अगदी पोचलं... मनात जे जसं आलं तसं लिहिलंस, आणि छानच लिहिलंस!
'माझा अमक्याढमक्या गोष्टीवर विश्वास नाही!' हे सांगायचीही फॅशन किंवा ट्रेंड असू शकतो. लोकशाहीत स्वातंत्र्य आहेच प्रत्येकाला! पण समोरच्या व्यक्तीलाही आपला आनंद, उत्साह निरुपद्रवी प्रकारे साजरा करायचं स्वातंत्र्य आहे याचं भान असू द्यावं. सामूहिक उत्सवाबाबत म्हणावंसं वाटतं की जल्लोष करण्याची संधी मनुष्यप्राणी वारंवार शोधत असतो. मग तो एखादा सण असो, की क्रिकेटची मॅच असो, की महत्वाचा राजकीय वा सामाजिक निर्णय असो, वा निवडणुकीत आपला उमेदवार बहुमताने जिंकून येणं असो... सेलिब्रेशन किंवा उत्सव साजरा करण्याचा माणसाचा स्वभावच आहे. त्यात ज्याला सामील व्हायचं आहे त्यानं व्हावं. नकारघंटा लावणाऱ्यांना त्या नकारात सुख मिळत असेल कदाचित. मिळो बापडे! त्यामुळे आपण खट्टू व्हायचं की नाही हेही आपणच ठरवायचं.

आवडलं... पटलं

आपण नाही करणार तर पुढच्या पिढीला तरी काय कळणार? अगदी दारात साधी रांगोळी काढलेली पाहून दोन्ही मुली आनंदल्या ... आणखीन काय हवाय? आपणच जपायला हव ..

जिज्ञासा, बिल्कुल. हेच म्हणायचं आहे मला. इथे मला वैयक्तिक पातळीवरचे आनंदच अभिप्रेत आहेत.
वैयक्तिक वर्तुळात असं म्हणणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत, पण अकु म्हणतेय तसं हा ट्रेंड सोशल मिडियाच्या वर्तुळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाचायला मिळाला. एका परिचित स्त्रीनं मनात नसतानाही केवळ घरच्यांसाठी गुढी उभी करते हे सांगताना 'जनमताचा रेटा' असं म्हणलं आहे Happy

अकु, अगदी!
अर्थात वैयक्तिक काय किंवा सामाजिक काय, कोणतीही गोष्ट मर्यादेत केली तर त्याचा खरा आनंद.

छान लेख आवडला . अकु , जिज्ञासाच्या पोस्टही उत्तम .
आपखुशीने जोरजबरदस्ती न करता सण साजरे केले तर त्यांची लज्जत वाढते. सण हे माणसामाणसामदले बंध दृढ करायला असतात . त्यांचं जाचकपणात तर्ककर्कश्यपणात झालेलं रूपांतर दुःखदायी आहे

भाऊकाका , शिरखुर्मा खायचा असेल तर एखादा मुस्लिम मित्र पकडा . अगदी अस्सल चव चाखायला मिळेल

ऑफिसमधल्या मुस्लिम कलीगच्या घरचा शीरखुर्मा चाखलेली

सईक्का, तू काय फक्त गुढी पाडवा वगैरे मुहुर्त बघत असतेस काय इथे लिहायला?? आम्हाला पण ही मेजवानी नेहमी मिळुदे की तुझा लिखाणाची. की त्याची पण 'शीरखुर्म्या'सारखीच वाट बघायची आम्ही?

मस्त लिहिलयंस. पोचलं ! Happy

[रच्याकने, हा 'शीरकुर्मा' कधीं चाखला नाहीं; मिळतो का मुसलमानी हॉटेलात ? कीं,फक्त ईदचीच,खास डिश आहे ? ]>>>> हॉटेलात मिळतो का माहित नाही. आजवर कधी पाहिला नाही. एरवीपण ओळखींच्या घरात "अहो, मला आवडतो फार. प्लीज करा" म्हटलंतरी "इदिला येशील तेव्हाच करून देइन" असे बाणेदारपणे सांगितले जाते. Proud

शीरकुर्म्याची रेसिपी विचारून टाकते. Happy

सई मस्त लेख! आवडला.

शीरकुर्मा खाल्लाय मी. भरपूर साजूक तुपात शेवया खमन्ग भाजतात. मग दूध घालुन चान्गल्या शिजवतात. प्रमाणात साखर, वेलची पुड आणी भरपूर सुकामेव्याची रेलचेल असते.

नंदिनीची रेसेपी डिटेल आल्यास उत्तम. आमच्या शेजारच्या बिल्डिन्गमध्ये जे ओळखीचे मुस्लिम कुटुम्ब आहे, त्यान्च्या सुनेने आणुन दिला होता ईद च्या दिवशी. तसेच वर्गातल्याच एका बोहरी मुस्लिम मैत्रिणीकडे खाल्ला होता. हातचे न राखता सर्व पदार्थ वापरुन लज्जतदार बनवतात.:स्मित:

आजही ईदला बिलाल मुल्लांचा फोन आला नाही तर मी फोन करते आणि शीरखुर्मा ओरपून येते. जेव्हा जाणं जमत नाही, तेव्हा घरी बनवायचा प्रयत्न करते. पण तशी चव येत नाही म्हणा.>>>> तशी चव येत नाही, कारण वातावरण तसे हवे.:फिदी: इतर वेळी कितीही चकल्या-लाडु खाल्ले तरी दिवाळीतले वेगळेच लागतात. तो आनंद काही वेगळाच.:स्मित:

सई., एकदम पोटतिडीकेने लिहिले आहेस आणि अत्यंत योग्यच लिहिले आहेस.

पण त्याचवेळी तू जो विचार मांडला आहेस तो आजच्या जगासाठी फार आदर्शवादी आहे. खरंच किती लोकं आज सणांमागचा हेतू समजावून घेऊन आणि तू घातली आहेस तशी निसर्गचक्राशी त्याची सांगड घालून सण साजरा करतात ? गुढीपाडवा मला फार सुंदर आणि 'शांत' सण वाटतो कारण गुढी उभारणे, कडूलिंबाची चटणी खाणे, घरी पक्क्वान्न शिजवणे एवढेच. वाह्यात वागायला कुठे वाव नाही. तो वाव इतर काही सणांना मिळतो. ( म्हणजे हेही खरंतर माणसांनीच ठरवून घेतलंय की ह्या सणांना हैदोस घालायचाच, प्रदूषण करायचेच. )
इतरही काही मुद्दे आहेत सणांना धरुन. सामाजिक भेदभाव, शिवाशीव वगैरे.

तू तुमची मतं स्वतःपाशीच ठेवा, युक्तिवादात स्वारस्य नाही असं लिहिलं आहेस तरी ही पोस्ट लिहितेय त्याबद्दल क्षमस्व. तू हा लेख नक्की कुणाला उद्देशून लिहिला आहेस ह्याची कल्पना नाही ( त्यामुळे विरोध करणार्‍यांचा विरोध नक्की सणांनाच आहे की त्याच्या विकृत स्वरुपाला हे माहीत नाही ).
पण एकंदरीत सध्या ( निदान काही ) सणांच्याबाबतीत उजव्यापेक्षा डावं जास्त झालंय आणि अकुने लिहिलंय तो जल्लोषही उपद्रवी पद्धतीने साजरा केला जाताना आपण बघतो. त्यामुळे विरोधाला विरोध हा लेखाचा टोन मला जरा बोचला, त्यातला विचार अगदी पूर्णपणे पटूनही !!

सई.. मस्त लिहिलं आहेस.. तरीही अकु आणि अगोची मतं पटलीच.

शिवाय अमुक सण अमुक प्रकारेच साजरा झाला पाहिजे इ. बंधनं काचतात कधीकधी.. त्यामुळे "कुणीतरी, पूर्वी कधीतरी, ह्या ह्या दिवशी हे हे करा असं सांगितलं असेल, ते आज तसंच्या तसंच केलं पाहिजे असं कुठाय?" असं होत नाही. "साजरा करायचाय तर तो नीट (नीट म्हणजे पुर्वी कुणीतरी सांगितलाय तसा वगैरेच) करा नाहीतर आव कश्याला आणता उगाच?" असा प्रश्न विचारणारे आहेत.

कालच एका गावाने हगणदारीमुक्त झाल्याच्या आनंदात गावातल्या एका शौचालयावर गुढी उभारली. त्यावर ज्येनांची मतं ऐकायला तू हवी होतीस.

Pages