जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग ५): पठाणकोट - निवांत सुरुवात

Submitted by आशुचँप on 24 March, 2016 - 17:41

http://www.maayboli.com/node/57854 - जम्मू ते पुणे सायकल मोहीम - पूर्वार्ध १

http://www.maayboli.com/node/57861 - जम्मू ते पुणे सायकल मोहीम - पूर्वार्ध २

http://www.maayboli.com/node/57936 - जम्मू ते पुणे सायकल मोहीम - जम्मूत आगमन

http://www.maayboli.com/node/58021 - जम्मू ते पुणे सायकल मोहीम - जम्मू (भाग ४)

=======================================================================

आज आमच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार होती. गेल्या राईडच्या कन्याकुमारीच्या तुलनेत हा प्रवास बराच खडतर असणार आहे याची जाणीव होती पण पहिल्यांदा जेव्हा राईडला गेलो होतो तेव्हा झेपेल का नाही याची बरीच धास्ती होती मनात. आयुष्यात पहिल्यांदा इतक्या लांबचा प्रवास केला होता.
आता तिथला अनुभव गाठीशी असल्यामुळे एक थोडा निर्धास्तपणा आला होता. निर्धास्तपणा अशा अर्थी की काय अनुभव येणार आहेत किंवा थोडक्यात कशी वाट लागणार आहे याची कल्पना होती. त्यामुळे मानसिकरित्या थोडे तयार होतो.

पण तरीही थोडी बाकबुक होतच होती मनात. मागच्या राईडला १३०किमी च्या पुढे गेलो की फाफलत होतो. इथे जवळपास रोजच १४० च्या आसपास राईड्स होत्या. पहिले दोन आणि मधला एखादा दिवस सोडला तर. शारिरीक कसोटी तर लागणार होतीच पण त्याचबरोबर मानसिकरित्या टिकून राहणे फार महत्वाचे होते.

जमत नाहीये, त्रास होतोय, कशाला तडफडत आलो, गपगार घरी बसलो असतो असे सगळे विचार येणार हे माहीती होते, पण त्याला दुर सारून पुढे जाणे इथेच तुम्ही अर्धी लढाई जिंकता. इथे यायला कुणीही जबरदस्ती केलेल नव्हती, स्वखुशीने आलोय आणि आता पुणे गाठणे, तेही सायकलवर हाच आता पुढच्या १७ दिवसांचा मोटो होता. बाकीचे सगळे विचार गोळा करून मनाच्या फडताळात कुलुपबंद करून टाकणे. तसेही आता १७ दिवस डेडलाईन्स नाहीत, कामाचे प्रेशर नाही, बॉस नाही, टेन्शन नाही. फक्त दिवसभर सायकल चालवत राहणे हेच एकमेव ध्येय. त्यामुळे मस्त वाटत होते.

हे सगळे विचार मी रात्री झोपताना करत होतो. अर्थात ठरवणे आणि त्यापद्धतीने वागणे जमतेच असे नाही. मीही त्याला काही अपवाद नव्हतो. हे सगळे क्रमाक्रमाने अनुभवलेच पण सुदैवाने त्यातून तावून सुलाखून बाहेर आलो.

तर, पहिला दिवस - पहिला टप्पा -
सुदैवाने पहिल्या दिवसापासून रगडापट्टीला सुरुवात नव्हती आणि पठाणकोटपर्यंत ११० किमी अंतरच जायचे होते. असेही भल्या पहाटे धुक्यात रस्ता दिसलाच नसता त्यामुळे दिवस उजाडल्यावरच निघायचे होते, पण त्याआधी पॅनिअर्स लावणे, सायकल सज्ज करणे यात बराच वेळ जाणार होता. त्यामुळे भल्या पहाटे पहाटे पावणेपाचला उठलो. दोन दिवस मस्त झोप, विश्रांती झाली होती, त्यामुळे ताजातवाना होतो.

थंडी मात्र काय कमी नव्हती. चांगलाच गारठा होता, त्यामुळे सगळे आटपून एकावर एक असे लेअर्स चढवले. सायकल शॉर्ट्स, त्यावर थर्मल, मग फुलट्रॅकपँट, वुलन सॉक्स. उत्तरेला जर्सी, वर थर्मल, वुलन पुलओव्हर आणि त्यावर जॅकेट आणि लोकरी हातमोजे असा सगळा जामजिमा. हे घालून पुण्यात सायकल चालवली असती तर दहाव्या मिनिटाला लिटरभर घाम निघाला असता. पण तिथल्या थंडीच्या मानानी हेही काहीच नाहीये असे वाटत होते. रात्री सगळं पॅनियर लावलेलं असल्याने व सकाळी घालायचे कपडे वेगळ्या पिशवीत ठेवले असल्याने सकाळी सोपं गेलं.

चहावाल्याचे दुकान इतक्या पहाटेही सुरु होते, त्यामुळे घसे गरम केले आणि तिथेच त्याच्या मिणमिणत्या बल्बच्या उजेडात सायकली तयार करणे सुरु केले.

सायकली जरी कालच जोडल्या असल्या तरी हे सगळे सामान त्यावर बसवणे ही एक कसोटी असते.

पॅनिअर्स व्यवस्थित रचणे, मग हँडलबारबॅग, फ्रेम बॅग, अजून अंधार होता म्हणून टॉर्च, त्याची बॅटरी, ब्लिंकर व्यवस्थित आहे का ते तपासणे यात नाही म्हणला तरी बराच वेळ जातो. आणि पहिलाच दिवस असल्यामुळे अजून रुळलो नव्हतो. त्यात काकांनी पुण्यावरून येताना बोर्ड आणले होते. ते प्रत्येक सायकलला बसवणे हा एक दिव्य प्रकार होता. अर्थात त्या बोर्डमुळे प्रचंडच फायदा झाला. जागोजागी ते बोर्ड वाचून इतकी रॉयल ट्रीटमेंट मिळत असे त्याला तोड नाही.

या पांढऱ्याशुभ्र पाटीवर येईपर्यंत मस्त बारा गावची धुळ जमली शेवटी

फ्लॅगअॉफ रघुनाथ मंदिरपासूनच करायचा होता आणि तिथल्या कमांडटच्या हस्ते. काकांनी कालच त्यांच्याशी बोलून वेळ ठरवली होती. ती वेळ पाळण्यासाठी सगळ्यांची धांदल होतीच. हो ना. आर्मीवाले म्हणजे वेळेचे पक्के, आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्यांना सिविलीयन्सना नावे ठेवायचा चान्स द्यायचा नव्हता. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत निघालो आणि मंदिर गाठले.

अपेक्षेप्रमाणेच ते सगळे सज्ज होऊन आमची वाट पाहत होते. त्यांच्याशी जुजबी बोलून आता फ्लॅगॉफ करायचे तर लक्षात आले सुह्द नाहीये. कुठाय कुठाय म्हणून शोधाशोध केली आणि लक्षात आले महाशय चुकले आहेत. आता इतक्याच अंतरात तो चुकला म्हणल्यावर त्याचे बाबा वैतागले आणि त्याला शोधायला रवाना झाले. तर हा भलतीकडूनच उगवला. आता काकांना शोधून आणणे झाले.

म्हणलं, झालं मिळाला यांना चान्स बोलायचा. पण उलटेच झाले. मिळालेल्या वेळाचा फायदा घेऊन त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. कुठुन आला, कुठे चालला, काय उद्देश. सगळे जवान आणि पोलीसांना सायकल बद्दल कुतूहल होते. आणि बरेच प्रश्न विचारत होते.

आम्हाला मेरीडाने जर्सी स्पॉन्सर केल्यामुळे फ्लॅगअॉफचा एक फोटो त्यांना पाठवायचा होता. त्यामुळे त्या थंडीत सगळी आभुषणे उतरवून फक्त जर्सीत कुडकुडत उभे राहीलो. त्यामुळे त्या जवानांनाच कसेतरी होते होते.

अरे पेहन लो कुछ तो, बिमार पड जाओगे, असे काळजीने सांगत होते.

एकाला जेव्हा सांगितले की शांततेसाठी सायकल राईड आहे, तर म्हणला
"बडी सेवा करते हो देश कि"
मी म्हणालो किधर, वो तो आप करते है, करके हम आपको शुक्रिया बोलने आये है।
तर म्हणे "वो भी उतनाही जरुरी है होसला बढाना"

खूपच भारावून गेलो होतो ते ऐकून. इथेच आमची राईड यशस्वी झाली होती. घरादारापासून दूर, कमालीच्या विषम हवामानात, एक हात सदैव रायफलवर, कुठल्याही क्षणी मृत्यु दरवाजा ठोठावेल अशा परिस्थितीत रात्रंदिवस सदैव सज्ज असलेल्या त्या जवानांना कडकडून मिठी मारावी वाटली त्यावेळी, पण ते फारच जास्त झाले असते असे वाटून फक्त शेकहँड केला. अर्थात ते बरेच झाले, कारण त्यांच्या कडक शेकहँडनीच हात चेंबाटला.

मग फार वेळ न घालवता एक फोटोसेशन झाले. एरवी त्याठीकाणी फोटो काढायला मनाई आहे. पण कमांडटच्या हस्ते फ्लॅगॉफ असल्याने आज त्यांनी परवानगी दिली. आम्हीही त्याची बूज राखत पुण्याला परत येईपर्यंत सोशल मिडीयावर तो फोटो प्रसारीत नाही केला. म्हणलं आपल्यामुळे उगाच घोळ नको. आता हरकत नाही असे वाटते, तरी कुणाला काही आक्षेप असल्यास काढून टाकेन.

सगळ्यांच्या शुभेच्छा पाठीशी घेऊन निघालो तेव्हा चांगलेच फटफटले होते आणि जेमतेम चौक ओलांडतोच तो हेमच्या सायकलचे पॅनिअर सैल झाले. अंधारात गडबडीत बांधले गेले होते बहुदा. त्यामुळे ते लावण्यात बराच वेळ गेला. बांधून पुढे जातो तरी ते निट होईना आणि त्याच्या पायाला घासायला लागले. परत ते सगळे सोडून बांधले शेवटी एकदाचे बसले बाबा.

२६ जानेवारी असल्यामुळे इतक्या पहाटेपण बरीच गर्दी होती. लोक ध्वजवंदनाला निघाली असावीत बहुदा आणि जम्मु सेन्सेटीव भाग असल्याने चौकाचौकात बॅरीकेडस लाऊन चेकींग सुरु होते. अर्थात आम्हाला कुणीच अडवले नाही, उलट हात दाखवून शुभेच्छाच देत होते. ही सगळी सायकलवर लावलेल्या तिरंग्याची आणि बोर्डची किमया.

जम्मू शहरातही बरेच चढउतार आहेत, वळणे, चौक आणि हरवायची चांगलीच शक्यता. त्यामुळे सगळेच एकत्र राहून चालवत होते. आम्ही रहात होतो ते हॉटेल आपल्या कसबा गणपतीसारखे अगदी शहराच्या मध्यवर्ती होते, त्यामुळे तब्बल १० एक किमी अंतर चालवल्यानंतर कुठे आम्ही शहर ओलांडून बाहेर आलो.

आता मस्त रस्ता लागला आणि हवाही छान होती. थंडी चांगलीच होती पण सायकल चालवताना फार जाणवत नव्हती. अर्थात थांबलो की मात्र थिजून जायला होत होते. सूर्यमहाराज उगवले होते पण ढगाच्या आणि धुक्याच्या पडद्याआडच होते.

बाबुभाई आणि लान्ससोबत नाशिकचा टग्या Happy

आता मस्तपैकी भुका लागल्या होत्या आणि काहीतरी नाष्टा करण्याची नितांत गरज भासू लागली होती. सुदैवाने थोडे पुढे जाताच एक छानपैकी धाबा दिसला. मालक इतक्या पहाटे कुणी येईल याची कल्पना नसल्यामुळे निवांत बसून होता. त्याला विचारले काय मिळेल तर म्हणे पनीर प्राठा....
म्हणलं, नेकी और पूछ पूछ... सात लगाओ और बाकी बाद मै बोलते है.

आणि मग निवांत तिथेच गप्पा मारत बसलो. हवाही छानशी सुखदायक वाटत होती. थंडी जरा कमी झाल्यासारखे वाटत होती आणि आज अंतर फारसे नसल्यामुळे रिलॅक्स होतो. त्यामुळे तब्बल एक पाऊण तास लाऊन पराठे लावल्याबद्दल फार कुणी कातावले नाही. एकावर एक दोन मउ मउ लुसलुशीत पनीर पराठे, त्याबरोबर ग्रेव्हीसारखी दाटसर दाल आणि ताकाऐवजी गरमागरम चहा असे तब्येतीत हाणले. हा वाया गेलेला वेळ पुढे किती महागात पडणार आहे याची मुळीच कल्पना नव्हती त्यावेळी. आणि अजुन तसे म्हणायचे तर रुळलोच नव्हतो. त्यामुळे मजामजाच चालली होती.

हेमचे फोटोग्राफी प्रयोग

साधारण जम्मूपासून २५ एक किमी गेल्यानंतर मोठे म्हणता येईल असेल विजयपूर गाव लागले. तिथेच आम्ही देविका आणि डेग अशा नद्या ओलांडल्या. या नद्या इथून थोडे पुढे जाऊन संगम पावतात आणि पाकिस्तानमध्ये घुसतात. खरेतर आम्ही जिथून चाललो होतो तिथून पाकिस्तान बॉर्डर जेमतेम ३५ किमी वर होती. पण या दोन्ही नद्या खुशाल तिथून घुसुन पुढे जाऊ शकत होत्या.

त्यामुळे सुह्दची भुणभुण सुरु होती की आपण जाऊन बघूया. पण ३५ आणि ३५ असे ७० किमी सायकल जास्तीची चालवणे शक्यच नव्हते. तर म्हणे आपण सायकली इथे ठेऊन जीप, टेंपो करून जाऊ. तसेही फार कुणाला उत्साह नव्हता पण इतक्या जवळ आलोय तर बघुच म्हणून चौकशी केली तर फु्स्स्स. २६ जानेवारी असल्यामुळे सगळीकडे कडेकोट सुरक्षा आणि बॉर्डरकडे जाणारे सगळे रस्ते बंद केले होते. त्यामुळे मग निरुपाय झाला आणि सगळेच पुढे निघालो.

बॉर्डरकडे इथूनच जायचे ना...रस्ता समजाऊन घेताना आमचा हनुमंत..उर्फ सुह्द

अशा वेळी रेफ्युजीमधले या ओळी आठवायला लागतात....


पंछी नदिया पवन के झोंके
कोई सरहद ना इन्हें रोके
सरहदें इन्सानों के लिए हैं
सोचो तुमने और मैने क्या पाया इन्सां हो के

जावेद अख्तर साहेबांच्या लेखणीतून उतरलेले हे अप्रतिम गीत, तितकीच मधाळ चाल अन्नु मलिकची (देवा रे..माझा अजून विश्वास बसत नाही हे संगीत अन्नु मलिकचे आहे) सानु निगम आणि अलका याज्ञिक यांच्या सुरेल आवाजानी सजलेले हे गाणे एक मास्टरपीस आहे.

ठीक आहे, इथे नाही तर निदान वाघा बॉर्डरला जाऊन पाहू अशी मनाची समजूत काढून पुढे निघालो. पुढे निघालो म्हणजे घाटपांडे काकांना गाठायला. नेहमी मोहीमेची पिछाडी यशस्वीरित्या साँभाळणाऱ्या काकांना आज तुफान उत्साह संचारला होता आणि त्यांनी पॅडल्स सैल सोडून दिले होते. एरवी सुसाट ग्रुप असायचा पुढे पण त्यांनीही काकांना मॅच करणे सोडून दिले.

दिवसाचे मानकरी घाटपांडे काका

एके ठिकाणी हेमच्या पॅनिअर्सची पट्टी सुटली म्हणून थांबायचे ठरले. पण काका थोडे पुढे होते, त्यांना मी गाठतो म्हणून मी सुसाट सुटलो. पण काका थांबतील तर ना. मी घसा खरवडून त्यांना हाका मारतोय तरी नाहीच. मागच्यांना वाटलं मी थांबवतोय म्हणून उत्सुकतेने बघत बसले आणि शेवटी मी दमून थांबलेलो पाहून हशाचे लोट उठले. च्यायला....

पुढे सांबा जिल्हा लागला. सांबा, पूंछ आणि राजौरी ही दुर्दैवाने नेहमीच्या वाचनातली नावे. दुर्दैव अशा साठी की सगळ्यांच बातम्या या पाकिस्तानने कशी गोळामारी केली, घरे कशी पडली, लोक कसे बेघर झाले, मग भारतीय लष्कराने कसे प्रत्त्युतर दिले, याच्याच. जितके वेळा या बातम्या वाचल्या तितके वेळा एक विष्ण्णता येत असे तिथल्या लोकांचा विचार करून. असो, पण हेमच्या माहीतीनुसार तिथे एक किल्लाही होता. सांब्याल राजवटीत बांधलेला.

पण तो बघायला वेळ शिल्लक नव्हता कारण सकाळच्या पराठ्यांमध्ये बराच वेळ वाया गेला होता आणि एक वाजत आला तरी आम्ही जेमतेम ४० किमी अंतर आलो होतो. त्यात दुष्काळात बारावा महिना म्हणतात तसे पुढे पंक्चरनी हजेरी लावली. पहिला मान पटकावला लान्सने.

पटापटा पंक्चर काढून पुढे निघालो तोच परत एकदा. तेच चाक. मग असे वाटले की टायर खराब झाले असावे. सुदैवाने एक टायर स्पेअर मध्ये होते, ते मग बदलले. तोपर्यंत काका लई लांब पोचले होते. त्यांना फोन केला तर मागे यायला निघाले, म्हणलं मागे येऊ नका, तिथेच थांबून रहा फक्त. मग सगळे रामायण आटपून पुढे निघालो.

आता जरा उन्ह जाणवायला लागले होते. सकाळच्या थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी जाणवण्याईतपत होती पण आता घामही येऊ लागला होता. त्यामुळे गरम कपडे गुंडाळून ठेऊन दिले आणि थर्मल आणि वर जर्सी एवढेच घालून चालले.

थकल्या पायांना क्षणभर विश्रांती

दरम्यान, जटवाल हिरानगर (६०कीमी) आदी गांवे मागे गेली. हिरानगरपाशी परशुराम मंदीर दिसलं. आता आम्ही अगदी सीमारेषेला खेटून चाललो होतो, कारण मिळालेल्या माहीती नुसार उजवीकडे पाक सीमारेषा अगदी जवळ होती. सुह्दने पुन्हा एका निष्फळ प्रयत्न करून पाहिला. पण यावेळी कुणीच त्याला साथ दिली नाही.

कठुआ गाठले (८० किमी) त्यावेळी दुपार टळून गेली होती आणि आता पुन्हा एकदा खादाडी करण्याची गरज होती. जरी मध्ये मध्ये चहाची फैर झडत होती तरी भक्कम अशा नाष्ट्यानंतर काही खाल्ले नव्हते. त्यामुळे पुन्हा एका धाब्यावर प्राठा खाऊन निघालो.

लखनपूरच्या अलीकडे रावी नदीचे दर्शन झाले, त्यावेळी सूर्यमहाराज अस्ताला निघाले होते. अशा त्या रमणीय वेळी ती अवखळ अल्लड नदी फारच लोभसवाणी दिसत होती. हीच पुढे पाकिस्तानात जाऊन मुग्धपणा सोडून धीरगंभीर रूप धारण करणार. पण त्यापूर्वी ती सरहद्दीला लागून सुमारे ८०-९० किमी वाहत जाणार. पंजाबच्या पाच प्रमुख नदयांपैकी एक. फाळणीच्या वेळी रावी नदीने काय काय अनुभवले असेल, काय काय पाहिले असेल आणि काय काय वाहून नेले असेल ते देवच जाणे.

लखनपूरच्या पुढेच आम्ही पंजाब राज्यात प्रवेश करत होतो. जम्मुचा प्रवास एका दिवसातच संपला पण आता लागणार होता, मक्के दी रोटी नी सरसोदां साग वाला प्रदेश. आणि त्याची प्रचिती लगेचच आली. राज्य ओलांडताच नद्यांचे कालवे आणि मोहरीची पिवळीधमक शेती सामोरी आली. आहाहा, काय प्रसन्न वाटले ते पाहून.

पुढचे दोन दिवस याच रमणीय पंजाबमधून जायचे होते. त्याच आनंदात पॅडल मारत राहीलो. रावी नदीवरील धरण. पुढे संजाणपूर गांवातून डावीकडे शिरलो.पण मध्ये प्राठा खाण्यात घालवलेला अक्षम्य वेळ आणि पंक्चर यामुळे दिवसाउजेडी पठाणकोटला पोहचूच शकलो नाही. त्यामुळे इथल्या जवानांना भेटण्याचा योगच आला नाही. त्याची शेवटपर्यंत हळहळ वाटत राहीली.

पठाणकोटच्या लष्करी रस्त्यांवरून जाताना पुण्यातल्या कँपाची आठवण येत होती. तसेच रस्ते, तशाच वस्त्या. शेवट १० किमी रेमटाळत पठाणकोट बस स्टँडबाजूचं हॉटेल कंफर्ट गाठलं तेव्हा साडेसहा होऊन गेले होते. रात्री जेवायला पनीर बटर मसाला, जीरा राईस, मसूर दाल असा फर्मास मेन्यू होता.

आज तसे अंतर कमी होते पण टिवल्याबावल्या करत आल्यामुळे ११० किमी साठी तब्बल ११.३० तास घालवले. असो पण त्यातही मज्जाच होती. उद्याही अंतर कमीच असल्याने रिलॅक्समध्ये झोपलो. थंडीचा कडाकाही त्यामानानी कमी होता आणि उत्तरोउत्तर कमीच होत जाणार होता.

==================================================================

इथे जरी १०६ च किमी दाखवत असला तरी प्रत्यक्षात जास्त अंतर होते. स्ट्राव्हानी मधले काही किमी खाल्ले, आणि प्रत्येक दिवशी खातच राहीला. त्यामुळे अॉन रेकॉर्ड अंतर कमीच भरेल.

===============================================================
http://www.maayboli.com/node/58175 - (भाग ६): अमृतसर - लखलखते सुवर्णमंदीर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नंबर!!!!! कौन चले भाई कौन चले साईकलवीर हम चलें!! मस्त वाटले वाचुन! सगळाच् ओळखीचा प्रदेश

क्या बात है..... मस्त लिहीलय रे, अगदी डोळ्यासमोर प्रसंग उभे रहातात, शिवाय जोडिला फोटो आहेतच.....
(अन वाचताना राहुन राहुन सारखे वाटत रहाते, की "काऽश, मी पण तिथे असायला हवा होतो हे अनुभवायला"
वाचकास हे असे वाटायला लागणे, यातच तुमच्या मोहिमेचे अन लिखाणाचे यश आहे )
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

बायदिवे, तुमच्या सायकलिंवर सरासरी किती "ओझे" लादलेले असायचे? आय मीन किती किलोग्रॅम ?

मस्तच सुरुवात झाली आहे प्रवासाला

मित्रा तुझ्या सोबत एकदा / एखादी राईड करायची आहे. कधी ते तू ठरव.

शरिरावर येणारा ताण घालवण्यासाठी काही वेगळे उपाय केले जातात का ?? म्हणजे इतकी मोठी राईड त्याच्या प्रत्तेक दिवशी सुरवात करण्यापुर्वी आणि राईड झाल्यानंतर व्यायामाचे कोणते प्रकार तुम्ही फॉलो करता.

धन्यवाद सर्वांना.....

सोन्याबापू - तुमची आठवण आली हो त्यावेळी....

तुमच्या सायकलिंवर सरासरी किती "ओझे" लादलेले असायचे? आय मीन किती किलोग्रॅम ?
>>>>>>

आम्ही विमानात बसताना केले होते तेव्हा सरासरी १२ किलोच्या आसपास भरले. नंतर मग आम्ही फळे, खायचे पदार्थ, आणि पाण्याच्या बाटल्या असे लादल्यानंतर १३ च्या आसपास गेले असावे.

मित्रा तुझ्या सोबत एकदा / एखादी राईड करायची आहे. कधी ते तू ठरव. >>>>

कधीपण रे...तु बोल फक्त...

शरिरावर येणारा ताण घालवण्यासाठी काही वेगळे उपाय केले जातात का ?? म्हणजे इतकी मोठी राईड त्याच्या प्रत्तेक दिवशी सुरवात करण्यापुर्वी आणि राईड झाल्यानंतर व्यायामाचे कोणते प्रकार तुम्ही फॉलो करता. >>>>>>>

हो करत होतो अगदी नियमाने. त्याबद्दल हेम जास्त सविस्तर लिहू शकेल. तोच आमचा फिजिकल इन्स़्ट्रक्टर होता. रोज सकाळी राईडपूर्वी वॉर्मअप चे प्रकार आणि राईड झाल्यावर स्ट्रेचिंग घेत होता. कडक शिस्तीचा माणूस.

कमांडटच्या हस्ते फ्लॅगॉफ.. बॉर्डरच्या कडेने जाणं.. कसलं भारी वाटलं असेल ना... मस्तच
>>>>>

हो खूप विलक्षण अनुभव होता तो

मस्त चालू आहे.
या पांढऱ्याशुभ्र पाटीवर येईपर्यंत मस्त बारा गावची धुळ जमली शेवटी>> पुण्यात पोचल्यावरचा धुळवाल्या पाटीचा फोटो नक्की येऊदे. अभिमानाने आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी वस्तू आहे ती Happy

मस्त झालाय हा ही भाग . फ्लॅगऑफच्या मोमेंटने कसलं भारी वाटलं असेल . लक्कि यू !!!
बाकी ते प्राठा वाचून आशुचॅम्पच लेखन न वाचता आशु चोप्राच लेखन वाचतोय अस वाटून गेलं Light 1 Lol

पुढचा भाग लवकरच टाका

अप्रतिम चैम्प.. मस्त लिहिलेस.. असलं वाचून सायकल ला टाच मारून तुम्हाला जॉइंड व्हावस वाटत

पाचही भाग आजच वाचले.. तुम्हा सगळ्यान्चे या साह्स मोहिमेबद्दल अभिनन्दन. पुढच्या लेखनाच्या प्रतीक्शेत..!

आज बरोबर एक वर्ष झाले....त्या निमित्ताने शिरवळपर्यंत सगळे जण एक छोटी राईड करून आलो.....

सगळे मेंब्र नव्हती पण....उपेंद्र मामा सायकलवरून नर्मदा परिक्रमा करत आहेत, तर वेदांग पायी....सुह्द पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झालाय तर हेम नाशकात घर संसार नोकरीच्या व्यापात

पण छान वाटते एक वर्षपूर्ती झाल्याबद्दल

अशुचेम्प.. सगले भग वाचले आज... काय सुन्दर वर्नाणं केले आहे.. असा वातात होत कि मी स्वत ह कॅयकिल चालवत आह... खूप चॅन.. पुढील बाग येऊ द्यात अजुन

या प्रवासाच्या स्मृती हा तर तुमच्या जीवनातील अमूल्य ठेवा आहे. आठवणीने ऊर अभिमानाने भरून येणार आणि चेहऱ्यावर स्मित उमटणारच...

@ आशुचँप: सदर लेखमाला खूपच छान होती (पुणे कन्याकुमारीही). अजूनही कधी आठवण आली की
दोन्ही लेखमाला सुरूवातीपासून वाचून काढतो. मोहीमेदरम्यानच्या बारीकसारीक बाबीही इतक्या अचूकपणे टिपल्या आहेत की खुपदा तुमच्याऐवजी मीच सायकलमोहीमेवर होतो असे वाटते. दोन्ही लेखमाला खरंच एवढा आनंद देऊन जातात. आणि आता नम्र विनंती की मागच्या काळात काही नवीन मोहीमा केल्या असतील तर त्याबद्दल वाचायला आवडेल.

जाता जाता आणखी, मी जवळपास दशकभरानंतर पुन्हा सायकल चालवायला सुरूवात केली. काॅलेजात असतांना गाडी व रेंजर सायकल दोन्ही असल्याने सायकल कधीतरी खासगी क्लासला जायला वापरत असे. मात्र एकदा क्लासच्या पार्कींगमधून सायकल चोरीला गेल्याने ती चालवणे पूर्णतः बंद झाले (खरं तर तेव्हा दैनंदिन खर्चासाठी वडीलांवर पूर्णपणे विसंबून होतो. त्यामुळे पेट्रोलचा खर्च आवाक्याबाहेर जावू नये म्हणून खर्चाचा ताळमेळ जमवायला अधूनमधून सायकल चालवली जात असे. (ज्या सायकलीनी बाराव्या वर्गापर्यंत शाळा व क्लासेस केले तीच सायकल कॉलेजात येताच डाऊनमार्केट वाटायला लागली होती. शिवाय मधल्या काही वर्षांत लोकांमधूनही सायकलींगची ओढ/आवड खूप कमी झाली होती)).

पुढे वरच्या शिक्षणासाठी बंगलोर व मुंबई असा दशकभराचा प्रवास झाला आणि सायकलची सोबत कायमची सुटली. मागच्या काही महीन्यातील जागतिक घडामोडींमुळे नागपूरला घरी परत आलो. दरम्यान बाबांनी हिरो जेट सायकल घेतली होती आणि सकाळी दूधखरेदीच्या निमित्ताने एक फेरी मारून आणत आणि मग दिवसभर सायकल झाकून ठेवत असतं. त्यामुळे त्यांनी चार वर्षापूर्वी खरेदी केलेली सायकल अजूनही नवीकोरीच आहे. किंबहूना सायकलींगमुळे गुडघेदुखी होईल म्हणून त्यांना सायकल चालवू नका म्हणून मीच ओरडत असे.

काही दिवसांपूर्वी तुमची ही लेखमाला परत वाचत असतांना अचानक सायकल चालवायची ऊर्मी दाटून आली. मी आधी रेंजर सायकल चालवलेली आणि आता तर बाबांची 24 इंचाची हिरो जेट लेडीज सायकल, काय करावे कळेना. त्यात पुढच्या काही दिवसांत नागपूरातून चंबू गबाळे उचलून नवीन ठिकाणी जायचे आहेच, त्यात नव्या सायकलीची भर नको म्हणून बाबांचीच सायकल चालवायचे ठरवले. दशकभराहून जवळपास मोठा काळ सायकल चालवली नसल्याने आणि दरम्यान बर्यापैकी वजन वाढल्याने आत्मविश्वास प्रचंड ढासळला होता. तो परत मिळवण्यासाठी प्रथम कॉलनीतील रस्त्यावर सराव करायचा ठरवला. तसेही व्यायाम करायला मी पहाटेलाच उठतो, मग सायकलच्या सरावासाठी 15 मिनिटे आधी उठायला सुरूवात केली. म्हणजे पहाटेच्या अंधूक प्रकाशात सराव केल्याने शेजार्यापाजार्यांना दिसणार नाही आणि तोल वैगेरे जाऊन पडलो तर हसू होणार नाही असा उद्देश होता. त्यानुसार दोन दिवस प्रत्येकी 10-15 मिनिटे ठरवल्याप्रमाणे सायकलीचा सराव करून मग नेहमीप्रमाणे व्यायाम केला. आश्चर्य म्हणजे पहील्याच दिवशी आत्मविश्वास आला, तोल गेला नाही, आदळलो किंवा धडपडलो नाही. खूप मोठ्या कालावधीनंतर सायकल चालवतोय असेही वाटले नाही. तिसर्या दिवसापासून दिवसाआड सायकल व व्यायाम असे वेळापत्रक आखून घेतले.

सध्या 1 तासात 13-15 किमी अंतर सायकल चालवतोय. तसेच कधी थंडीमुळे सकाळी उशीरा उठलो तर संध्याकाळी चालवतो. ह्याशिवाय घराच्या आसपास किरकोळ खरेदीसाठी (उदा. दूध, भाजी) हल्ली सायकल नेतो. पण ह्यामुळे बाबा जरा आळशी झाले, हल्ली मीच सायकलींग करून घरी येतांना दूध आणत असल्याने त्यांचे जाणे बंद झाले. रोज सकाळी लवकर उठणारे बाबा उशीरापर्यंत झोपून रहायला लागले. मग मीच त्यांना प्रेमाने फटका देऊन उठवतो आणि आज माझा व्यायामाचा दिवस आहे असे सांगून त्यांना दूध आणायला पिटाळतो. बाकी सायकलींगमुळे खूप छान वाटतं. सकाळी चालवल्यास पुर्ण दिवस उत्साहात व प्रसन्न जातो. तर संध्याकाळी चालवल्यास दिवसभराचा थकवा व शिणवटा निघून जातो. इति सायकलाख्ययानम् संपूर्णम्!

आशूचँप धन्यवाद! तुमच्या लेखमालिकेने मला सायकलींगला पुनश्चः हरिओम् करण्याची प्रेरणा मिळाली.

आशुचँप: सदर लेखमाला खूपच छान होती (पुणे कन्याकुमारीही). मोहीमेदरम्यानच्या बारीकसारीक बाबीही इतक्या अचूकपणे टिपल्या आहेत . दोन्ही लेखमाला खरंच एवढा आनंद देऊन जातात. आणि आता नम्र विनंती की मागच्या काळात काही नवीन मोहीमा केल्या असतील तर त्याबद्दल वाचायला आवडेल.>>>>>>>>>>
+1000

वाह राहुल
मस्त लिहिला आहे अनुभव
फारच छान आणि धन्यवाद

Pages