http://www.maayboli.com/node/57854 - जम्मू ते पुणे सायकल मोहीम - पूर्वार्ध १
======================================================================
खरे सांगायचे झाले तर कन्याकुमारी राईड संपायच्या आधीच आमची जम्मु पुणे बद्दल चर्चा सुरु झाली होती. अर्थात त्यावेळी दोन पर्याय होते, एक म्हणजे पुणे ते पानिपत (शनिवारवाड्यापासून) किंवा मग जम्मु ते पुणे....बरीच चर्चा झाल्यानंतर शेवटी जम्मु पुणेवर शिक्कामोर्तब झाले. त्याचे कारण एकतर मध्यप्रदेशमधले खराब रस्ते आणि पानिपत वरून येताना सायकली आणायची यातायात बरीच करावी लागली असती. त्यामुळे जम्मु पुणे फायनल करून मेंदूच्या डीप फ्रिजरमध्ये ठेऊन दिली.
आणि पुण्याला आल्यानंतर तब्बल ३-४ महिन्यांनी त्यावर मग पुन्हा चर्चा सुरु झाली. आता महत्वाचे काम होते ते म्हणजे रूट ठरवणे, दिवसाकाठी किती अंतर कापायचे, हॉटेल्स शोधायची, आणि सगळ्यांना सोयीस्कर ठरतील अशा तारखा. आणि वाटले तेवढे काम मुळीच सोप्पे नव्हते. कन्याकुमारीच्या वेळीस मी उशीरा सामील झालो होतो, त्यामुळे आधीची डोकेफोड वाचली होती. ती आता अनुभवताना काय काय विचारात घ्यावे लागते याची यादी बघूनच गरगरल्यासारखे झाले.
पण अनुभवी उपेंद्र मामांनी यावेळी कामाची वाटणीच करून दिली. मी आणि ते रुट फायनल करणार होतो, वेदांग आणि ओंकार कडे हॉटेल्स शोधून बुक करण्याची जबाबदारी होती, घाटपांडेकाका नेहमीप्रमाणे टेक्निकल बाजू सांभाळणार होते आणि बाकीच्यांकडे या प्रवासाबद्दल जी काही माहीती मिळेल ती शोधण्याचे काम होते.
आणि बघता बघता कामाला सुरुवात झाली. रुट ठरवण्याचे काम तर अगदी डोके दुखवणारे होते. गुगल मॅप्स, स्ट्राव्हा सगळ्याची मदत घेत त्यातल्या त्यात अंतर वाचेल असा, दाट लोकवस्तीची मोठाली शहरे टाळता येईल असा, फारसे चढउतार नसलेला आणि १३०-१४० किमी अंतरावर मुक्काम करता येईल अशी हॉटेल्स असलेला रूट शोधणे म्हणजे आखुडशिंगी बहुदुधीचाच प्रकार होता.
शेवटी माझा एक रुट, मामांनी केलेला एक रुट, अजून एक असाच असे तीन चार रुट्स घेऊन, नकाशे समोर ठेऊन बरीच घनघोर चर्चा करून शेवटी एकदाचे त्यावर शिक्कामोर्तब झाले. (हुश्श...)
....
कुठुनही केले तरी साधारणपणे २००० किमी अंतरापेक्षा जास्त प्रवास होता. त्यामुळे त्याला किती दिवस द्यावेत हा सर्वसाधारण सभेपुढचा दुसरा मुद्दा होता. घर-संसार, नोकरी-धंदा सगळे व्याप सांभाळून जास्तीत जास्त किती सुट्ट्या काढणे जमेल यावर पुन्हा एकदा चर्चा. काहींना १५ दिवसच जास्त वाटत होते तर माझ्यासारख्यांना वाटत होते १५०० किमी आपण १३ दिवसात केलेय, त्याच हिशेबात २२०० किमी करायला १९ दिवस लागले पाहीजेत.
त्यावर असा मुद्दा आला की आता कन्याकुमारी राईडनंतर सगळ्यांचा स्टॅमिना वाढला आहे, पंजाब, राजस्थान, गुजरात मध्ये चढउतार फारसे नाहीयेत, रस्ते चांगले आहेत त्यामुळे दिवसाला १५०किमी अंतर सहज पार करणे जमू शकेल. यावरही घनघोर चर्चा झाली. तिथले वातावरण, हेडविंड्स याचा विचारही करणे आवश्यक होते. माझे आणि घाटपांडेकाकांचे म्हणणे होते शक्यतो दिवसाला १२०-१३० पेक्षा जास्त अंतर असू नये, कारण मग ती राईड न होता नुसतीच धावाधाव होते. पण जास्त दिवस सगळ्यांना देता येणे शक्य नव्हते त्यामुळे शेवटी १७ दिवसांवर तडजोड झाली.
आता पुढचा मुद्दा होता की कधी करायची. कारण तिढा असा होता की जम्मु काश्मिरमध्ये कडाक्याची थंडी आणि राजस्थानमध्ये कडाक्याचे उन्ह. त्यामुळे हिवाळ्यात गेलो तर थंडीने मरू आणि उन्हाळ्यात उकाड्याने. त्यातल्या त्यात सुवर्णमध्य काढणे गरजेचे होते. मग फेसबुकवरून जम्मु, अमृतसर, अजमेर इथे राहणारे सायकलीस्ट शोधून काढून त्यांना संपर्क केला. सायकल फोरमवर माहीती टाकली आणि त्यातून मिळालेल्या माहीतीनुसार २६ जानेवारीला निघण्याचे ठरवले. (हुश्श...हुश्श....)
हॉटेल्सचाही तसाच त्रास. आमचा रुट अंतर वाचवणारा असल्यामुळे जोधपुर, जयपूर, बिकानेर अशी गावे टाळत हनुमानगढ, सरदारशहर, डीडवाना असा जात होता. सातारा - कराड टाळत भोर-वाई मार्गाने जावा तसा. त्यामुळे कित्येक ठिकाणी हॉटेल्स अशी मिळतच नव्हती. त्यानुसार पण मार्गात बदल करावे लागले आणि पर्याय नसल्याने अमृतसरवरून मुक्तसरसाठी १६५किमी मोठा पल्ला घ्यावा लागला. तसेही अनेकदा दिवसाकाठी १४० पेक्षा जास्त अंतर असणारे बरेच दिवस होते आणि ते ते हॉटेल्सच्या उपलब्धतेनुसार करावे लागले होते.
आता हॉटेल्स बुक करण्याचे मुख्य कारण म्हणजे दिवसभर सायकल चालवून आल्यानंतर पुन्हा गावात हॉटेल शोधणे, ते चांगले असणे आणि १० लोकांना एकाच हॉटेलमधे जागा मिळणे हे सगळे खूपच कटकटीचे होणार होते. त्यामुळे पर्यायच नव्हता. मग त्यांना फोनाफोनी, डिस्काउंट घेणे, अॅडव्हान्स किती, आल्यावर किती हे सगळे रामायण वेदांग आणि ओंकारनी केले. (त्याबद्दल त्यांना खरेच हॅट्स अॉफ...)
हे सगळे इतक्या तपशीलात द्यायचे कारण हेच की मोहीम असते १७ दिवसांची पण त्यामागे १७० दिवसांची आखणी, मेहनत आणि डोकेफो़ड असते. आणि जितकी डोकेफोड जास्त तितका त्या १७ दिवसांत त्रास कमी. अर्थात याविरुद्ध मतप्रवाह असणारे आणि मुक्तछंदात सायकल चालवत जाणारेही काही आहेत. पण मोठ्या ग्रुपमुळे या सर्वाला बंधने पडतात आणि या प्रोसेसमधून जावेच लागते.
अजून यात भर घालायाची म्हणजे, जायची तिकीटे, बरोबर घ्यायच्या सामानाची यादी. किती बारकावे लक्षात घ्यावे लागतात याचे एक उदाहरण दिले की कळेल. २६ जानेवारीला निघणार तर २४ जानेवारीचे आम्ही विमानाचे तिकीट बुक केले, ३ महिने आधीच स्वस्तात पडते म्हणून. २४ ला दुपारी पोचून विश्रांती, २५ सायकली ताब्यात घेऊन जोडायच्या आणि एक छोटी राईड आणि मग काही किरकोळ दुरुस्त्या असतील तर त्या करून २६ ला पहाटे निघायचे. तर हे सगळे झाल्यावर निवांत होतो, तोच मामांनी विचारले की आपल्याला एक बॅकअप म्हणून ट्रेनचे करावे लागेल.
म्हणलं आता कशाला...तर म्हणे की थंडीचे दिवस आहेत, उत्तरेला धुक्यामुळे विमाने रद्द होतात कधीकधी. समजा झालेच तर ऐनवेळी काय करणार. त्यामुळे ट्रेनचेही करून ठेऊ. एक दिवस उशीरा पोचू पण पोचू तर अॅटलीस्ट. मी थक्क झालो, म्हणलं काय काय प्लॅन करावे लागते देवा. आणि त्याप्रमाणे केले आणि खरेच आमचे विमान रद्द होऊन ट्रेननी जावे लागण्याची परिस्थिती ओढवली होती. पण ते पुढच्या भागात.
घनघोर चर्चा
तयारी
आता थिअरी तर पक्की झाली होती आणि वेळ होती प्रॅक्टिकल्सची अर्थात सायकलच्या सरावाची. गेल्या वेळी कन्याकुमारीला मला पुरेशी प्रॅक्टिस नसल्याने बराच त्रास झाला होता त्यामुळे मी यंदा ठरवले होेते की कसून तयारी करायची. पण दुर्दैवाने मी अशा महाभागांपैकी आहे की जे दर वर्षी ठरवतात यंदा जोरदार अभ्यास करायचा, पहिल्या दिवसापासून. पार अगदी टाईम टेबल आखले जाते, दिमाखात चिकटवले जाते. आणि बघता बघता त्यावर धूळ जमते आणि परिक्षा महिन्यावर येऊन ठेपते.
मग एकदम जीवाच्या आकांताने ठरवले जाते की बास्स आता रोज करायचाच अभ्यास. आणि तोही होत नाही आणि परिक्षेची रात्र उजाडतेआणि नाईट मारून, रट्टा देऊन कसाबसा पेपर सोडवला जातो. आणि पुन्हा ठरवले जाते की यंदा आपण फार वेड्यासारखे केले आता पुढच्या वेळी पहिल्या दिवसापासून अभ्यास....
हेच सूत्र सायकलींगला लागू झाले आणि थिअरीच्या नादात प्रॅक्टिकल्सकडे दुर्लक्ष झाले. त्याचा फटका बसलाच. अर्थात, अगदीच काही केले नाही असे नाही. छोट्या मोठ्या राईड्स केल्या. पुणे-खोपोली-पाली आणि येताना बोर घाट चढून लोणावळा मार्गे पुणे. त्यानंतर एकदा पुणे-खोपोली-पुणे एकाच दिवसात केले. भर उन्हात बोर घाट चढण्याचा अचाट प्रकार दोन वेळेला केल्यामुळे आत्मविश्वास वाढला होता.
बोर घाट चढून आल्यावर
त्यानंतर नव्या कात्रज बोगद्याने जाऊन जुन्याने परत, पुढच्या वेळी जुन्याने जाऊन नव्याने परत.
एकदा सगळ्यांच्या बरोबर पुणे सातारा पुणे अशी नाईट २०० किमीची बीआरएम (अनधिकृत) केली. दुपारी ३ वाजता निघून पहाटे चार वाजता परत असा अद्भुत प्रवास करून आलो. तेही काहीही त्रास न होता. रात्रीच्या अंधारात आम्ही सगळे फॉर्मेशन करून एकापाठोपाठ एक जात असताना जी काय धमाल येत होती त्याला तोड नव्हती.
...
२०० किमी अंतर जाऊन आल्यावरही हसरा चेहरा
नंतर सगळ्यात महत्वाची म्हणजे ३ दिवसात पुणे - गोवा अशी राईड. या राईडला सगळ्यात जास्त धमाल आली. एकतर जम्मु पुणे जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही मस्ट करण्यात आली होती. कन्याकुमारीपेक्षा नविन मेबर्स वाढले होते. त्यात डॉ शिरीष देशपांडे आणि डॉ तुषार आपटे ही डॉक्टरद्वयी, हेमंत पोखरणकर, अतुल अतितकर आणि सनत जोगळेकर यांचा समावेश होता. त्यांना ग्रुपमध्ये चालवण्याचा सराव व्हावा आणि सगळ्यांना एकमेकांचे स्वभाव, आचार-विचार कळावेत, स्टॅमिना, फिटनेस कळावा अशा उद्देशाने ही राईड होती.
थोडक्यात सांगायचे तर सहामाही परिक्षा होती. आणि मुख्य राईडला घेऊन जायचे जवळपास तेवढे सामानही घेऊन जायचे होते. आणि या राईडने सगळ्यांचीच कसून परिक्षा घेतली.
पुणे - कराड (१६५ किमी) ला पोत्याने पंक्चर्स झाली.
आणि काळोख्या रात्री कसेतरी कराडला पोचलो. दुसरे दिवशी निप्पाणी मार्गे तवांडी घाट चढून आजऱा गाठायचे होते. गेल्या वर्षीच्या कन्याकुमारीच्या राईडच्या आठवणी जागवत या मार्गावरून जातान फारच मज्जा आली. एकतर सरासरी वेग वाढला होता आणि नविन सायकलही होती त्यामुळे लक्षात आले की आपल्या वाढलेल्या कामगिरीमध्ये सायकलचाही मोठा हात आहे. गेल्या वर्षी जिथे मी धापा टाकत होतो तिथेच मस्तच स्पीड पकडत चाललो होतो. बहुतांश वेळी सुसाट ग्रुपमध्येच. पण वाटेत इतका टाईमपास झाला की आजऱ्याला पोचपर्यंत मिट्ट काळोख. त्यात माझे पॅनिअर्स सरकून घासायला लागले चाकाला, हेमचा लाईट पडला, मग जुगाड करून काहीतरी बसवले आणि त्या सगळ्यात बराच वेळ गेला. युडी काका बरेच मागे पडले होते त्यांना मग जीप करून हॉटेल गाठायला सांगितले.
सुदैवाने जाताना आमच्यापाशी थांबले आणि त्यांच्याबरोबर पॅनिअर्स पाठवून दिले. त्या मिट्ट काळोखात एकापाठी एक असे जाताना प्रचंड चढ उताराच्या रस्त्यावर कोण कुठले गियर्स टाकतोय हेही कळत नव्हतं. अंदाजे चढ अाला की खालच्यावर उतरायचे, उतार आला की वरचे. असे करत तडफडत पोचलो आणि जेवण करून गुडुप.
तिसरे दिवशी मात्र फार टाईमपास केला नाही आणि अंबोली घाट उतरून मुंबई गोवा हायवे ला लागलो. इथे मात्र सगळ्यांचीच हवा गेली. तुफान गरम होत होतं, प्रचंड घाम आणि धारवाडची आठवण करून देणारे चढ उतार. डोक्यावर पाणी ओत, अंगावर ओत, वाटेत लिंबु सरबत, किंवा तत्सम काही मिळाले तर ढोस असे करत कसेबसे गोव्यात प्रवेशते झालो. आणि मग झकासपैकी रिफ्रेश झालो.
थोडक्यात गोवा राईडमुळेही आत्मविश्वास चांगला वाढला होता आणि तो वाढत वाढत अति झाला आणि अंती महागात पडला.
गोवा राईडमध्ये अनेक गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे एखाद दिवशी १०० किमी चालवणे वेगळे आणि सलग दिवसेंदिवस १०० पेक्षा जास्त चालवणे वेगळे. त्यामुळे जम्मु राईड सोप्पी नाही हे कळून चुकले.
हेमचेही त्या निमित्ताने सायकल परिक्षण झाले. त्याची आणि माझी (मी कन्याकुमारीच्या वेळी वापरलेली सायकल) सेम. पण त्याला आमच्याबरोबरीने वेग गाठताना धडपड करावी लागत असल्याचे पाहून मी बुचकळ्यात पडलो. कारण हेमचा फिटनेस कुणालाही लाजवेल असा आहे. आणि त्याच्या फिटनेसच्या मानाने मी तर ढ वर्गात. मग लक्षात आले की प्रॉब्लेम सायकलचा आहे.
स्कॉट स्पी़डस्टर ७० ही आमच्या मेरीडा १०० च्या तुलनेत वेगच घेत नव्हती. म्हणजे कितीही म्हणले की पायात ताकत असली की कुठलीही सायकल मारू शकतो पण एका टप्प्याला सायकलची क्वालीटी, ब्रँड, कॉम्पोनंट खूप महत्वाचे ठरतात. मी त्याला माझेही उदाहरण दिले. काहीच महिन्यांपूर्वी मी याच रस्त्यावरून तडफडत जात होतो आता सुसाट जातोय. फिटनेस वाढलाय पण मेरीडा जास्त स्मूद आहे. त्यालाही पटले आणि त्याने जाताच नव्या सायकलचा शोध सुरु केला. कुठल्याही परिस्थितीत हीच सायकल आणायची नाही हे त्याने ठरवले.
दरम्यान, युडी काकांनी पूर्ण राईडमधून माघार घेतली, त्याचबरोबर तुषारनेही. खरेतर त्याचाही फिटनेस उत्तम होता पण इतके दिवस कामातून काढणे शक्य होणार नाही याची जाणीव झाल्याने त्याने नाव खोडले.
अर्थात त्यानंतरही पाबे घाट, बोपदेव घाट अशा घाटवाटा, ऑफिसला सायकलीने येणे-जाणे असे करत सराव सुरुच होता. जीममध्येही ट्रेडमीलवर रनिंग (अरे हो मध्ये पळण्याचाही सराव सुरु केला होता आणि चक्क एक ५ किमी मॅरेथॉनही पळालो...मस्त वाटले) आणि स्पीनिंग सुरु ठेवले होते. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान जवळपास १२०० किमी सायकलींग झाले होते, व्यतिरिक्त व्यायाम, पळणे इ. इ. त्यामुळे आपण तसे योग्य आहोत हा एक आभास मनात झाला होता. पण जानेवारीत आरामच झाला. खोपोली राईड सोडली तर पाच-दहा किमी च्या वर काही गेलो नाही. आणि याउलट लान्स (अद्वैत जोशी) ने ६०० किमी बिआरएस पूर्ण केली. त्यामुळे नक्की निकाल काय लागेल परिक्षेचा अंदाजच येईना.
दरम्यानच्या काळात नाशिकच्या महाजन बंधुंनी रेस अॅक्रॉस अमेरिका पूर्ण केली. आणि त्यांना पुण्यात भेटण्याची संधी मिळाली. त्यांचे बोलणे ऐकून फारच मोटीव्हेट झालो.
पण पुण्याहुन निघालेल्या तिघांचे माओवाद्यांनी अपहरण केले आणि त्यामुळे सगळ्यांच्या घरी चिंतेचे वातावरण पसरले. मिळालेल्या परवानग्या परत घेतल्या जातायत का अशी भितीही वाटायला लागली. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. त्यानंतरही पठाणकोटला अतिरेकी हल्ल्यानंतरही घरची आघाडी शांत होती त्यामुळेच ही राईड करू शकलो.
धक्का
याच दरम्यान सगळ्यांना एक जोरदार धक्का बसला तो म्हणजे मामांचा. एका प्रॅक्टिस राईडदरम्यान मामांचा अॅक्सिडेंट झाला आणि खांद्याचे (कॉलरबोन) हाड मोडले. त्यांना थेट दवाखान्यातच भरती करावे लागले. त्यावर शस्त्रक्रीया करून प्लेट्स टाकाव्या लागल्या. सगळ्यांनाच प्रचंड वाईट वाटत होते. मामा म्हणजे मोहीमेचे सूत्रधार. कन्याकुमारीच्या वेळी वडीलांच्या आजारपणामुळे त्यांना मोहीम अर्धवट सोडून यावे लागले होते आणि आता तर सायकलच चालवण्याची बंदी होती ३ महिने किमान. त्यामुळे त्यांच्या सहभागाबद्दल मोठे प्रश्नचिन्ह होते.
सुरुवातीचा धक्का ओसरल्यानंतर त्यांनी मग मनाशी ठरवले की अजून ३ महिने आहेत बरोबर. थोडा फिटनेस ठेवला तर कदाचित आपण फिट होऊ आणि जाऊ शकू. पण दुर्दैवाने तसे होणे नव्हते. जानेवारी निम्मा संपत आला तरी डॉ ची परवानगी मिळेना आणि त्यांच्या आशा हळुहळु संपत आल्या. त्यातही एक दिलासा असा होता की ज्यांना पुर्ण राईड करणे शक्य नव्हते ते आम्हा वडोदरापासून भेटून तिथून पुण्यापर्यंत येणार होते. त्यांच्याबरोबर मामा दुधाची तहान ताकावर असे करत येऊ शकले असते. पण त्यांचा प्रचंड हिरेमोड झालेला जाणवत होता आणि समस्या अशी होती की कुणाचेच काही चालण्यासारखे नव्हते.
मामा नाहीत तर त्यांचे मित्र चंद्रशेखर इती यांनीही माघार घेतली.
अजून एक विकेट पडली ती दुसरा डॉक्टर शिरीष याची.
डॉ. तुषार आणि डॉ. शिरिष
त्याच्याबद्दल थोडे सांगणे गरजेचे आहे...आयुर्वेदीक डॉक्टर असलेल्या शिरीषचे योगासने आणि प्राणायामाचे वर्गही चालतात. आणि त्याने सगळ्यांना अत्यावश्यक असे योगासनाचे आणि प्राणायमाचे प्रकार शिकवायला सुरुवात केली. साध्या सोप्या भाषेत प्रत्येक अवयवाचे स्ट्रेचिंग, रिलॅक्सेशन शिकवत त्याने अनेक महत्वपूर्ण टिप्स दिल्या आणि त्या प्रत्येक राईडला खूप उपयोगी पडल्या.
याचबरोबर त्याने जुगाड मास्टर अशी पदवीही संपादन केली. कुठल्याही ब्रँडेड, इंपोर्टेड वस्तूंच्या नादी न लागता त्याने अशी अशी दुकाने हुडकुन सायकलच्या अॅक्सेसरीज जमवल्या की त्याला तोड नाही. कॅरीअर दणकट न वाटल्याने त्याने एक मजबूत कॅरीअर कापून, वेल्डींग करून घेऊन बसवले, कुठल्यातरी पेठेतून धुक्यात उपयोगी पडेल असा अँबर कलरचा ब्लिंकर मिळवला. जम्मुला बर्फ असले तर पाय गोठतील यासाठी त्याने रेनकोटचे कापड आणि बिस्लेरी बाटलीचा भाग असा जोडून एक अद्भुत शुज कव्हर बनवले होते. त्याची ही जुगाड पॉवर बघुन त्याला साष्टांग नमस्कार घालायचेच बाकी ठेवले होते.
तर नेमका हा हरहुन्नरी कलाकार जायचे ३ दिवस आधी आजारी पडला. सणसणून ताप, आणि घसा बसला. त्यातुन त्याला आल्या आल्या परदेशी जावे लागणार होते. मग सारासार विचार करून त्याने न जाण्याचा निर्णय घेतला. पण अर्थात तो वडोदरापासून आलाच आमच्यासोबत.
दरम्यान, बाकीच्याही किरकोळ खरेद्या झाल्या,
नव्या जर्सीज बनवून झाल्या, पुण्यातल्या प्रो स्पोर्टस अँड बाईक यांच्या मदतीने मेरीडाने आम्हाला एक जर्सी आणि एक शॉर्ट स्पॉन्सर केली. त्याचा बराच उपयोग झाला.
पॅनिअर्स नव्यानी बनवले, ज्यांची आधीची होती त्यांनी दुरुस्त करून घेतले.सायकल सर्व्हिसींग करून, पॅक करून कार्गोने दोन दिवस आधीच पाठवून दिल्या आणि सगळे पॅकींग करून आता २४ जानेवारीची वाट पाहत बसलो. सगळे मार्गी लागले आहे आणि आता फक्त विमानात बसून जम्मू गाठायचे इतकेच बाकी होते.
पण हे सगळे इतके सुखाचे होणार नव्हते याची आम्हाला त्यावेळी बिलकूल कल्पना नव्हती.
=================================================================================
http://www.maayboli.com/node/57936 - - जम्मूत आगमन
ग्रेट!!! अतिशय जबरदस्त!!!
ग्रेट!!! अतिशय जबरदस्त!!! सर्वांना एक कडक सॅल्युट! पु. भा. प्र.
कड्डक! मी सुह्रुद व
कड्डक! मी सुह्रुद व घाटपांडेकाकांचा अत्यंत आभारी आहे कारण त्यांनी जीव की प्राण असलेली सुंदर स्कॉट सब४० सायकल मला मोहीमेकरीता दिली. त्या १७ दिवसांत या बाईकने मला प्रचंड जीव लावला. सुह्रुद व काकांएवढीच तीही प्रेमळ बाईक आहे. म्हणूनच तीचं नांव प्रेमा घाटपांडे
लै भारी रे. तू लिहितोस असे
लै भारी रे. तू लिहितोस असे ओघवते की मी तिथेच आहे तुझ्याबरोबर असे वाटते
Champ, मस्त लय
Champ,
मस्त लय पकडलीये...
टाका गियर अन येवूदे पुढचे भाग...
भारीच.. आमच्या सारख्या
भारीच..
आमच्या सारख्या अडाण्यांसाठी ते २८ ७००, BTWIN लिहिलेल्या खोक्यातल्या वस्तू काय आहेत हे ही सांगा हो.
प्रेमा घाटपांडे>>>>
लै भारी! टाका गियर अन येवूदे
लै भारी!
टाका गियर अन येवूदे पुढचे भाग... +१
अप्रतिम!! प्रत्येक धाग्यात
अप्रतिम!!
प्रत्येक धाग्यात कमीत कमी पुढच्या मागच्या भागाच्या तरी लि़ंक्स दे.
पुढचा भाग वाचण्यासाठी अतिशय
पुढचा भाग वाचण्यासाठी अतिशय अतुर झालो आहे
आशु ,जबरदस्त सुरूवात ! खऱच
आशु ,जबरदस्त सुरूवात !
खऱच मानले बुवा तुमच्या अभ्यासाला आणि नियोजनाला !
कोपरापासुन दडंवत !
बहारदार ! येऊ दे अजून
बहारदार !
येऊ दे अजून
झकास !!!! मस्त सुरुवात प्लीज
झकास !!!!
मस्त सुरुवात
प्लीज जरा आधीच्या आणि पुढल्या भागाची लिंक टाका ना !!!!
धन्यवाद सर्वांना.... हेमची
धन्यवाद सर्वांना....
हेमची प्रेमा घाटपांडे आणि माझी 'मेरीडार्लिंग'
२८ ७००, BTWIN लिहिलेल्या खोक्यातल्या वस्तू काय आहेत हे ही सांगा हो. >>>>>
ते स्पेअर ट्युब्स आहेत. पंक्चर होणार, ट्युबची वाट लागणार यासाठी प्रत्येकाकडे किमान दोन ट्युब स्पेअर असायला हव्या होत्या, पण माझे वर्षभरात एकही पंक्चर झाले नव्हते त्यामुळे मी जरा टाळाटाळ केली. सुदैवाने माझे एकच पंक्चर झाले म्हणून ठीक. नाहीतर खरे नव्हते.
प्लीज जरा आधीच्या आणि पुढल्या भागाची लिंक टाका ना !!!! >>>>
अजुन पुढचा भाग यायचा आहे. आधीच्या भागाची लींक टाकलीये.
माझा या ग्रुपमधे प्रवेश केवळ
माझा या ग्रुपमधे प्रवेश केवळ आशुने केलेल्या वकिलीमुळे झाला. पण प्रवेश झाल्यानंतर या सगळ्यांकडून प्रचंड आपलेपणा अनुभवाला आला. मी अगदी ऐन वेळेला प्रवेश केल्याने पूर्वतयारी प्रकल्पात माझा काहीही सहभाग नव्हता. पुणे ते गोवा करण्याआधी मी इतकी सायकल कधीही चालवली नव्हती. २०० च्या २ बीआरएम एवढाच कांय तो अनुभव गाठीला होता. पुणे गोवा राईडला पहिले दोन दिवस १५०+ व तिसऱ्या दिवशी १००+ अंतर होतं. ही राईड केल्यावर एवढं आपण करु शकतो हा आत्मविश्वास मिळाला.
जम्मू पुणे राईड पुर्ण
जम्मू पुणे राईड पुर्ण होण्याआधीचे ५० दिवस माझ्यासाठी महत्त्वाचे व कसोटी पहाणारे ठरले. डिसेंबर अखेर असलेलं, चक्रम हायकर्स आयोजीत ५ दिवसांचं कोकणदिवा ते घनगड खडसांबळे लेणी मार्गावरचं सह्यांकन.. नंतर १७ जाने. ला मुंबई मॅराथॉन.. लगेच १० दिवसांनी ही मोहीम. त्यामुळे सराव कसा व कसला करायचा हा प्रश्न होता. मी रनिंगवर लक्ष दिलं कारण सायकलिंग सराव केला तरी सॅडल सोअर होणारच होतं. पण धावण्याच्या सरावाचा मला खूप फायदा झाला. सॅडल सोअरचा वेगळ्या पद्धतीचा त्रास मला झाला त्याबद्दल नंतरच्या भागात सांगतो..
सर्वांचे अभिनंदन आणि साष्टांग
सर्वांचे अभिनंदन आणि साष्टांग ------/\------
सूंदर वर्णन आणि फोटो.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
लै भारी! टाका गियर अन येवूदे
लै भारी!
टाका गियर अन येवूदे पुढचे भाग... +१ >>> +१:)
हेमाची प्रेमा
लेख संपूच नये अस वाटत होत..
लेख संपूच नये अस वाटत होत.. इतकं ओघवत लिहिलं आहेस.
पुर्व तयारी, ओखळ परेड उत्तम झालेली आहे. लिखते रहो...
निव्वळ अप्रतिम... इथे
निव्वळ अप्रतिम...
इथे मॅपसुद्धा दोन तुकड्यात, तोही स्क्रोल करुन पहावा लागतोय एवढं अंतर सायकल वर पार केलंत... सलाम तुमच्या स्टॅमीनाला.
आणि हेम, तुझा वेगळा लेख येउदे. इथे फक्त गाळलेल्या जागा नको भरुस.
धन्यवाद सर्वांना.... हेमाची
धन्यवाद सर्वांना....
हेमाची प्रेमा हाहा :प
ग्रेट..... सविस्तर परत
ग्रेट.....
सविस्तर परत वाचू....
मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतय
मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतय ते याचे की, वरील शेवटाच्या फोटोत, "विशीपंचविशीतील" कोणीच नाहीये. बहुधा सगळेच ३०+ तर काही ४०+ आहेत. आणि या वयात ही जिगर बाळगणे सोप्पे काम नाही बाप्पा.....
दोन्ही भाग वाचून काढले . मस्त
दोन्ही भाग वाचून काढले . मस्त लिहिताय . पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
अरे केव्हडी ती तयारीचीच मेहनत
अरे केव्हडी ती तयारीचीच मेहनत आहे..... बापरे... पण बरे झाले, इथे लिहिलेस.
(जेव्हा केव्हा भेटू, तेव्हा देईन)
मार्गदर्शनपर फारच उपयुक्त लिखाण. धन्यवाद.
अन तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून अत्तराचि छोटीशी कुपी बक्षिस...
अन तुम्हा सगळ्यांना
अन तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून अत्तराचि छोटीशी कुपी बक्षिस...
वाह धन्यवाद...त्यासाठी आता लवकर भेटावे लागेल...
आमच्यात सगळ्यात लहान घाटपांडे काकांचा मुलगा सुह्रद होता वय २२ वर्षे, तो आणि वेदांग सोडला तर बाकी सगळेच ३५ ओलांडलेले होते.
अॅडमिनना विनंती.. कृपया
अॅडमिनना विनंती.. कृपया सायकलिंगचा वेगळा विभाग करावा..लेख वाढत आहेत.
मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतय
मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतय ते याचे की, वरील शेवटाच्या फोटोत, "विशीपंचविशीतील" कोणीच नाहीये. बहुधा सगळेच ३०+ तर काही ४०+ आहेत. आणि या वयात ही जिगर बाळगणे सोप्पे काम नाही बाप्पा....
>>>
अनुमोदन लिम्बुभाऊ.
आशू, लिही रे पुढचा भाग
आशू, लिही रे पुढचा भाग पटकन.
पाहिले दोन्ही जबरी आहेत !
अशक्य भारी!!! +१ लाख!
अशक्य भारी!!! +१ लाख!
धन्यवाद पराग, दैत्य
धन्यवाद पराग, दैत्य
मस्तच रे आशुचँप!! तुझे
मस्तच रे आशुचँप!!
तुझे कन्याकुमारी राईडचे लेख फार आवडले होते त्यामुळे ह्या लेखमालिकेबद्दल खुप उत्सुकता आहे. पुढचे भाग लवकर टाक. शुभेच्छा.
Pages