लाखमोलाचा कोट्याधीश बाप

Submitted by प्रज्ञा९ on 22 March, 2016 - 08:03

तसे आपण सगळेच गुणदोषयुक्त असतो. माणूस म्हणून परिपूर्ण, आदर्श, सर्वगुणसंपन्न असं या जगात कोणीही नाही. त्यामुळे व्यक्तिपरिचय द्यायचा तरी हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या कामांसाठी परिचय दिला आहे त्यात ती व्यक्ति परिपूर्ण आहे. म्हणूनच मी माझ्या बाबांच्या कार्याचा परिचय देणार आहे. आईबाप हे कायमच लाखमोलाचे- नव्हे पृथ्वीमोलाचेच असतात. कारण 'आईबाप' म्हणून जे जे सर्वोत्तम असतं ते ते द्यायचा त्यांचा प्रयत्न असतो. माझ्याही आईबाबांनी त्यांच्या मते जे जे उत्तम होतं ते द्यायचा प्रयत्न केलाच. आज जेव्हा मी विचार करते तेव्हा हे प्रकर्षाने जाणवतं की फार श्रीमंत-सधन घरात नसूनही जे धन त्यांनी आम्हाला दिलंय ते पुढच्या पिढ्यांनाही पुरणारं आहे. ते धन आहे विचारांचं आणि वागणुकीचं.

बाबा लहानपापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचे. आजच्याइतकं या शब्दाला बरंवाईट कसलंही ग्लॅमर वगैरे नव्हतं. तेव्हा, म्हणजे १९६० च्या आसपास, शाखेत जाणारी मुलं म्हणजे सामन्यपणे मध्यमवर्गातली, जरा जास्तच शिस्त पाळणारी, घरातल्या मोठ्यांचं ऐकणारी असत. शाखेत जाणारा मुलगा आहे म्हटल्यावर 'हो का? वा!!' असं तोंडभर कौतुक करणार्यांची संख्याही खूप होती. बाबा त्यावेळी १०-१२ वर्षांचे होते. आजोबांची रत्नागिरीला बदली झाली आणि लिमये वाड्यात बिर्‍हाड रहायला आलावर बाबांची शाळा आणि शाखा दोन्ही सुरू झालं. बाबा मुळात शांत, अबोल, त्यात आजोबांचा धाक असायचा. दोघांचा संवाद आजीच्या मार्फतच घडे. पण ही गोष्ट बाबांनी खूप मनावर घेतली आणि स्वतःच्या मुलींना संवादाचा धाक वाटता कामा नये याची काळजी घेतली.

सुरूवातीला मलाही बाबांचा खूपच धाक वाटायचा. त्यात ते कमालीचे शांत, आणि मी टोकाची बडबडी. "तू गप्प नाही बसलीस तर मी बाहेरच्या खोलीत बसत जाईन जेवायला" असं ते आठवड्यातून ३ वेळा तरी मला रागवायचे. पण मला गप्प रहाताच यायचं नाही. मग रडूबाई मुळुमुळु रडायची जेवताना. त्यात भर म्हणजे मी मुलखाची आईवेडी. आवडीनिवडी आईवर गेलेल्या. गाणी ऐकणं, भाषण-प्रवचन-कीर्तन-व्याखान ऐकणं, वक्तृत्व, पाठांतर हे सगळं आईने सांभाळलेलं. अभ्यास असा कधी समोर बसून केलेला किंवा आई-बाबांनी करून घेतलेला अजिबात आठवत नाही. बाजारात जाऊन हिशोब, आई घाऊक दुकानातून मारी बिस्किटं आणून किरकोळीत पॅकिंग करून विकायची तेव्हा केलेला नफा-तोट्याचा हिशोब, तिच्या पोस्टाच्या एजन्सीची पासबुकं ने-आण करताना मांडलेली गणितं, तिने शाळेचे पेपर तपासले की बेरजा करून देणं आणि तिने काटेकोरपणे त्या तपासणं, हाताला धरून एक दिवस फडके सरांसमोर बसवल्यावर निमूट गीतेची संथा घेणं, ऐन वेळी संध्याकाळी ७ वाजता दुकानात जाऊन सामान आणून, ताईला मस्का लावून रडतखडत केलेली चित्रकला आणि "वेळेवर करायला काय होतं तुम्हाला! सगळं असं आयत्या वेळी!" म्हणून बोलणी खाणं, मराठीचे धडे पाठ म्हणून दाखवणं, निबंध... काय काय जे केलं ते आईशी संवाद करूनच. या सगळ्यात बाबा कुठेच नाहीत असं तेव्हा वाटायचं. गप्पा अशा नसायच्याच. गणितं अडली तर त्यांना विचारायची. तेही हायस्कुलात गेल्यावर, ८-९-१०व्या यत्तेची. तोवर जे काय मैत्र होतं ते आईशीच. म्हणजे तेव्हा तरी असंच वाटायचं.

पण मग घरातून बाहेर पडल्यावर विचारांचा आवाका वाढला. आईला भक्कम पाठिंबा देणारे बाबा कळायला लागले. लहानपणी कोणी "रायकर सर घरी आहेत का?" असं विचारल्यावर बाहेरच्या बाहेरच त्यांच्या चपला आहेत का ते बघून हो/ नाही सांगितलं जायचं, पण आता घरी फोन केला की "बाबा आहेत ना गं घरी" हा प्रश्न विचारताना आवाज हळवा होत गेला. सुट्टीला घरी गेलो की तिघींच्याही आवडी जपणारे बाबा आता 'दिसायला' लागले. तसे ते तेव्हाही अबोलच होते, पण मनाचा कोपरा हळवा होत होता. मायेचे बंध घट्ट होत होते. मुली मोठ्या झाल्यायत, स्वावलंबी, कणखर होतायत याचा अभिमान त्यांच्या चेहर्‍यावर दिसायला लागला. आणि आता कुठे त्यांनी न बोलता निव्वळ वागणूकीतून केलेल्या संस्कारांची शिदोरी आम्हाला उमजायला लागली.

त्यांचं नाव श्रीराम. लहानपणी कधीतरी आजीने गोष्ट सांगताना 'राम सत्यवचनी होता' हे सांगितलं आणि यांनी ते फार मनावर घेतलं. खोटं बोलायचं नाही हे ठरवलं. पुढे १९७५ च्या आणीबाणीत संघावर बंदी आली आणि अनेक जण कारावासात गेले त्यात बाबाही होते. लग्नाला अगदी २-३ वर्षं झालेली. पण कणखरपणे सगळ्याला सामोरे गेले. १६ महिने तुरुंगवास भोगला, पण त्यात चक्क भगवद्गीतेचा अभ्यास केला. नुसता करून थांबले नाहीत, 'विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून भगवद्गीता' अशी ४ वह्या भरून टिपणं काढली. आणि पुढे स्वतःच्या बुद्धीला अनुसरून जो कर्मयोग आचरला तो आजतागायत. "आपण कष्ट करायचे, त्यात शॉर्टकट नाही शोधायचा, पण काम करून झालं की बाकी देवावर सोडायचं. टेन्शन घ्यायचं असेल तर देवाला घेऊ दे, तुम्ही कशाला घेता!" असं म्हणायचे. याचं प्रत्यंतर मला आलं तेही विचित्रच. आईने फार जपल्या होत्या त्या टिपणं काढलेल्या वह्या, पण कधीतरी त्या गहाळ झाल्या नि परत मिळाल्याच नाहीत. आम्हाला फार वाईट वाटलं. पण "चिंता कशाला करताय! भगवंताची इच्छा नसेल!" म्हणून ते शांत राहिले. शोधायचं काम खूप मनापासून केलं त्यांनीही, पण एका मर्यादेपुढे त्यांनी त्यातून मन वगळून टाकलं. "ते आचरणं महत्त्वाचं. नुसत्या वह्या काय कामाच्या!" हेही वर सांगितलं!

आज हे सगळं आठवलं कारण ते आता कोट्याधीश झालेत. ठरवलेल्या वेळेत, ठरवल्याप्रमाणे त्यांनी एक कोटी रुपये जमवले आहेत. फक्त हे पैसे स्वतःसाठी नाही, समाजासाठी आहेत. झालंय कसं, की रत्नागिरीजवळ गोळवली गाव आहे. रत्नागिरीतून संगमेश्वरापुढे गेलं की धामणी फाट्यावरून आत आहे हे गाव. परमपूज्य श्री गोळवलकरगुरूजींचं हे गाव. अर्थातच संघवाल्यांसाठी ते तीर्थक्षेत्राहून कमी नाही. पण बरीच वर्षं हे गाव दुर्लक्षित राहिलं. बराच शोध घेतल्यावर नक्की जागा सापडली आणि मग गावाचा विकास करायचं कार्यकर्त्यांनी मनावर घेतलं. मला नक्की आठवत नाही, पण २००३ च्या आसपास गोशाळा बांधून प्लॉट डेव्हलप करायला सुरूवात झाली असावी. माझ्या आजीच्या पहिल्या श्राद्धाच्या वेळी एक सवत्स गाय गोशाळेला दिली होती आम्ही. तिथे मग गोमयाचा शाम्पू वगैरे प्रॉडक्ट्सची सुरूवात झाली. हळूहळू प्रकल्प कसा असावा हे ठरू लागलं. बैठकांवर बैठका होऊ लागल्या. बाबांचा सहभाग वाढताच राहिला. तीन वर्षं नाशकात राहूनही त्यांचं या सगळ्यावर लक्ष होतं. वैद्यकीय सेवा, महिलांना रोजगार, व्यायामशाळा असं कायकाय सुरू झालं. दरवर्षी विजयाएकादशीच्या कार्यक्रमाला बाबा न चुकता तिथे असतात. तसे महिन्यातूनही लागेल तितक्या वेळी जातातच. आता ते ६९ वर्षांचे आहेत, पण उत्साह दांडगा आहे. जेव्हा ही एक कोटी रुपयांची गरज नक्की झाली तेव्हा त्यांनी आमच्या नेहमीच्या गुरूजींना घरी बोलवून विधीवत संकल्प सोडला, की अमक्या काळात एक कोटी रुपये निधीसंकलन करायचं आहे. आम्ही संकल्पविधी केला म्हणून जरा चेष्टाच केली. म्हणजे असेच करा की एक कोटी संकलन, संकल्प वगैरे कशाला अगदी... म्हणून. पण त्यांनी दुर्लक्ष केलं. आपल्या मार्गावरून चालत राहिले. मग आम्हाला त्यांच्या दृढनिश्चयाची खात्री झाली.

एरवीही त्यांनी शाळेत नोकरीत असताना लाखो रुपये देणगी शाळेसाठी गोळा केलीच होती. अन्य समाजकार्यासाठी संघमाध्यमातूनच निधीसंकलन केलंच होतं. रायकर सर आले म्हणजे खिसा हलका होतो असं लोक म्हणतील असंही आम्ही गमतीत म्हणायचो. पण रायकर सरांनी त्या गोष्टींची कधीही पर्वा केली नाही. मुंबई, पुणं, अख्खं कोकण, कोल्हापूरपट्टा..कुठेकुठे फिरून कसल्याकसल्या प्रकल्पांसाठी, शाळेसाठी देणग्या मिळवल्या. मग याच वेळी का संकल्प सोडला असेल याचा मीही गांभीर्याने विचार केला. मग बरेच पैलू उलगडले. जेव्हा कामाला सुरूवात केली तेव्हा ६३-६४ वय असेल त्यांचं. त्यामुळे तब्येतीने साथ देणं आवश्यक होतं, शिवाय अलिकडचा बदलता काळ बघता लोकांचा विश्वास सार्थ ठरवून एक कोट रुपये जमवणं तसं अवघडच की! शिवाय प्रापंचिक जबाबदार्‍या, ऐन वेळच्या अडचणी या सगळ्यावर मात करून घेतलेलं काम पूर्ण करायचं तर कुठेतरी परमेश्वरी अधिष्ठान हवं असं त्यांना वाटलं असेल तर काय चुकलं!

आणि मग त्यांच्यातल्या कर्मयोग्याची एक नवी ओळख पटली. धिस वॉज युरेका मोमेंट!! आजवर ते जे जे काही करत आले त्यामागे किती खोल विचार आणि पक्की अध्यात्मिक बैठक असेल याचा अंदाज यायला लागला. जमवलेल्यातल्या एका पैचाही मोह न करता ते ज्यासाठी जमवलंय तिथे देणं हे वरकरणी साधं असलं तर कुठल्याही व्रतापेक्षा कमी नाही हे समजलं. मुख्य म्हणजे या सगळ्यात लोकांचा विश्वास संपादन करणं हे कठीण काम त्यांनी केलं. "बरे तुम्हाला पैसे देतात लोक. आणि तेही अगदी फोन करून बोलवून देतात की!" असं आम्ही म्हणायचो. एक बरं होतं, आम्ही त्यांना घरच्याघरीच "संघिष्ट आहात!" वगैरे म्हणून घ्यायचो, त्यामुळे बाकी कोणीही काहीही म्हटलं तरी घरचा आहेर आधीच मिळालेला असे. पण आम्ही असं म्हणण्यामागे आमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम, त्यांचा कामाचा झपाटा बघून वाटलेलं आश्चर्य आणि आदर या सगळ्याचं आपुलकीचं मिश्रण आहे हे त्यांनाही माहिती असे. आजही आम्ही त्यांना घरात संधी मिळाली की पिडतो. मोदी, संघ, कुणीतरी उधळलेली मुक्ताफळं हे म्हणजे आम्हाला खाद्यच असतं. आम्ही कोणी संघविरोधी नाही, पण बाबांना जरा उचकवलं की मला बरं वाटतं. कारण यात पुन्हा एकदा बाबा लख्ख तेजस्वी दिसतात.

"तुमचे टिव्हीवाले काहीही सांगोत, लोक वाट्टेल ते बरळोत, त्यामुळे गुरूजी, डॉक्टर(हेडगेवार), आणि आपली परंपरा कमी महत्त्वाची ठरत नाही. सावरकरांचं कार्य कमी होत नाही. अटलजींबद्दलचा आदर कमी होत नाही. मला राजकारण करायचं नाही. चांगली वाईट माणसं सगळीकडे असतातच. मी माझं ठरलेलं काम करतोय. माझी नेमणूक परमेश्वराने केली आहे, हे काम तोच माझ्याकडून करून घेतोय. तोच म्हणातो ना, 'योगक्षेमं वहाम्यहम्'.. मग मी कशाची काळजी करू! माझ्या आयुष्याची ४५ वर्षं मी एकाच घरात भाडेकरू म्हणून राहिलो, मालकांनी त्रास दिला नाही, त्यामुळे डोक्यावर छप्पर राहिलं ना! नोकरीत कधी कसूर न करता उदरनिर्वाहाची सोय केली, तुम्हाला काही कमी पडू दिलं नाही, भलते लाड केले नाहीत, पण माणूस म्हणून घडवलं तुम्हाला याचा आनंद आणि समाधान आहे. जी मुलं समोर आली त्यांना मनापासून शिकवलं, जादा शिकवणी करून पैसे मिळवण्यापेक्षा समाजाचं देणं फेडावसं वाटलं, जे मी आता करतोय. मग यात माझं सगळं परमेश्वराने सांभाळलं. उतारवयात स्वतःचा ब्लॉक घेतला, पैसा कमी पडला नाही हे माझं योगक्षेम कृष्णानेच सांभाळलं की!" या त्यांच्या उत्तराने डोळ्यात पाणी आलं माझ्या.

या देणगीच्या कामासाठी २-३ वेळा ते दिल्लीला गेले आईला घेऊन. ज्या श्रीकृष्णाची इतकी भक्ती करतात, त्याच्या मथुरेत जाऊन त्याचं दर्शन घेऊन आले. बहुतेक काशीयात्राही घडलीच आहे. कुठूनकुठून फोन करून लोक यांची माहिती काढतात आणि देणगी द्यायची आहे पण विश्वासू माणूस हवा म्हणून यांना बोलावून घेतात. जेव्हा संकल्प सोडला तेव्हाच देवभोळेपणा न करता गणितही मांडलं. प्रत्येक महिन्याला किती संकलन व्हावं, ते कसं व्हावं, मोठे देणगीदार, दुकानव्यावसायिक, यांना तर ते भेटलेच, पण महिना १०० रुपये देणारा देणगीदारही तितकाच महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी. आणि यात काळ्याचं पाढरं नको याचीही त्यांनी काळजी घेतली आहे. शेंडी तुटो की पारंबी तुटो, मी हे करणार असं आहे त्यांचं. याचा अनुभव अजून एका कसोटीच्या वेळी आला. गरोदरपणी ६ महिने उत्तम असलेली माझी तब्येत ७व्या महिन्यात खालावली. सगळं बाजूला ठेवून आईबाबा माझ्याकडे आले. कित्येक वर्षं बाबा रोज १२ वेळा विष्णूसहस्रनाम म्हणतात, ते आता माझ्याजवळ बसून म्हणू लागले. वैद्यकीय उपायाला दैवी जोड देणं आवश्यक वाटलं त्यांना. डॉक्टरांशी बोलून रोज शंकानिरसन करून घेणारा माझा बाप घरी आला की देवाचं नाव घेताना लहान लेकरागत व्हायचा. या परिस्थितीतही त्यांचा संयम सुटला नव्हता. मला नि आईला रोज धीर देत. फोनवरून कामं करत. "या महिन्यात रत्नागिरीत जाऊन पैसे गोळा करू नका, इथेच रहा, पुढच्या महिन्यात जा" असं आईनंही त्यांना सांगितलं. हळूहळू माझी तब्येत निदान स्थिर होऊ लागली. मग थोडी सुधारली. आईच्या परवानगीने ,माझ्याशी बोलून ते २ दिवसांकरता रत्नागिरीत जाऊन आले. अफाट धावपळ करून ठरल्यापेक्षा १ दिवस आधीच परतले तेव्हा जे काही वाटलं ते शब्दांत नाही सांगता येत. पुढे माझं बाळ सुखरूप जन्माला येईपर्यंत ते माझ्याजवळ होते.
खरंतर या निग्रहीपणाचा त्रास होतोच. या २ दिवसांत आई अक्षरशः एकेक मिनिट मोजायची. "अगदी अडलंय का काही! गेले असते पुढच्या महिन्यात तर काय झालं असतं!" असं म्हणत होती. पण हेही खरं की या दोन दिवसातलं माझं योगक्षेम बाबांच्या कृष्णरावांनी अगदीच सांभाळलं!

हा निग्रहीपणा, हट्ट कधीकधी आईला खूप त्रासाचा ठरतो. पूर्वी तर फार त्रास व्हायचा. शनिवारी दुपारी शाळा सुटली की संघकामासाठी बाहेर पडलेले बाबा रविवारी संध्याकाळी घरी येत. एरवीही कधी नाटक, सिनेमा, गाणं ऐकायला जाणं, समुद्रावर जाणं, इतर कुठे फिरायला जाणं हे नव्हतं. कमालीचं गंभीर व्यक्तिमत्त्व असलेले बाबा आणि अगदी हौशी असलेली आई अशी ही राममिलये जोडी! बाबांच्या या कोट्याधीश होण्यामागे आईचं असलेलं अस्तित्त्व कसं नाकारू? ती ठामपणे बाकीच्या आघाड्या सांभाळत होती म्हणून बाबा निर्वेध होऊन आपलं काम करू शकले.

केवळ पैसा कमवायला म्हणून शाळेत धड न शिकवता खासगी क्लास घ्यायचे नाहीत हे जसं नक्की होतं, तसंच थोडं जास्ती कमवायचं पण योग्य मार्गाने हेही आईने ठरवलं. पूर्वी जेव्हा रत्नागिरीत ब्रँडेड पदार्थ मिळत नसत तेव्हा मारी बिस्किटांच्या दुकानातून दुकानमालकांच्या ओळखीमुळे आई १५ किलोचा बिस्किटांचा डबा आणायची आणि पाव/ अर्धा किलोचे पुडे करून विकायची. तिने पुडे करून ठेवल्यावर पुढे कोणी गिर्‍हाईक आलं की आम्ही व्यवहार करून हिशोब ठेवायचो. पोस्टाची एजन्सी तिने घेतली. मी एकटीने सायकलवरून पोस्टात जाण्याइतकी मोठी झाल्यापासून मग तिची पासबुकं पोचवणे, गाडी चालवता आल्यावर तिला कलेक्शनसाठी नेणे हे करू लागले. यातून जमलेल्या पैशातून थोडीफार गुंतवणूक होऊ लागली. आईनेही ३९ वर्षं नोकरी सांभाळून हे सगळं केलं. आजीचं मोठं आजारपण काढलं. स्वतःचं ऑपरेशन निभावलं. तशी अगदी कायम हसरा चेहरा असलेली सिनेमातल्या आईसारखी माझी आई कधीच नव्हती. काहीशी सडेतोडच आहे ती खरंतर. किंबहुना काही नातेवाईक तर "आई तुझी चिडते बाई पटकन!" असंही पूर्वी म्हणत. पण मनातलं दु:ख मनात गिळून कुढणारी नाही ती. मतभेद होऊदेत, पण मोकळं बोला हा खाक्या. आणि कर्तव्यात कसूर नाही हे तत्त्व. आणि त्रास झाला की राग निघाला तरी इतर वेळी माझी आई ही माझी पहिली मैत्रीणच होती आणि आहे. जशी उगीच गोडगोड नाही, तशी उगीच उग्रही नाही. बाबांइतकीच तिनेही खूप माणसं जोडली. या बाबतीत मात्र दोघं एकसारखी आहेत. अकारण गॉसिपिंग न करता ती अनेकांशी स्नेहबंध जोडून आनंदी रहाते.

आज जेव्हा मी हे लिहितेय तेव्हा मी पाहिलेलं या दोघांचं सहजीवन डोळ्यासमोर येतंय. १९७२मधे ती सरोजिनीची वैदेही होऊन बाबांच्या आयुष्यात आली. अनेक चढउतार आले-गेले. बाबा कारावासात असतानाचे १६ महिने आई आणि आजीने एकमेकींना जपलं. त्या १६ महिन्यांत एकदा १५ ऑगस्ट आणि एकदा अशीच कुठलीतरी रजा मिळाली तेव्हा, आणि एकदा सुटकेपूर्वी अशी या दोघांची भेट झाली होती. बाकी पत्रांतून कळणार्‍या खुशालीवर निभावलं दोघांनी. मधे कधी भेटावं तर रत्नागिरी-येरवडा जेल हा खर्च आईला परवडला नसता. त्या काळात बाबांची नोकरी नाही म्हणून कुणी सहानुभूतीने, आपलेपणाने काही भेट दिली तरी आईने ती न घेता मानाने जगणं पसंत केलं. दैवयोगही असा, की त्याच येरवडा जेलच्या समोरच्या आलिशान इमारतीतल्या दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या ऑफिसेसमधे आज बाबांचे दोन जावई सन्मानाने काम करतात! एरवी देव आहे की नाही हा विषय 'ऑप्शन'ला टाकला तरी बाबांच्या श्रद्धेचं कौतुक वाटत ते अशा वेळी! कारण या येरवडा परिसराशी जे पूर्वी जोडलं गेलं होतं ते आणि जे आता आहे ते चित्र हे बाबांच्या कृष्णरावांनीच घडवलं असणार असं आपलं आम्ही मानतो.

परवा आईचा फोन आला तेव्हा तिने संकल्प पुरा झाल्याचं सांगितलं. शेवटची देणगी मिळाली ती साडेनऊ लाखांची. कोणी एक ज्येष्ठ स्वयंसेवक गेले तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी देणगी दिली. हे स्वयंसेवक आयुष्यभर संघकाम करत होते. ब्रह्मचारी राहिले, मिळालेला पैसा वेळीवेळी गुरूदक्षिणेच्या रूपात संघासाठी निधी म्हणून दिला. अखेरची शिल्लकही अशीच या प्रकल्पाला दिली. बाबा म्हणाले, "हे खरे दधिची!" मी बाबांचं अभिनंदन केलं तेव्हा मला म्हणाले, "माझं कसलं अभिनंदन! गोपाळकृष्णाने करून घेतलन म्हणून झालं! मी काहीसुधा केलं नाही!"

बाबांना ओळखत असूनही मी क्षणभर अवाक झालेच! एवढे एक कोटी रुपये मिळवून दिल्यावरही "मी काही नाही केलं" म्हणणारा हा माणूस आणि त्याला साथ देणारी व्यक्ति म्हणजे माझे बाबा आणि आई आहेत यामागे मात्र खरंच बाबांच्या कृष्णरावांचीच लीला आहे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर...

तुमच्या बाबांसारखी माणसं या देशात, समाजात आहेत हेच खूप छान आहे. तुम्ही लिहिलंही खूप मनापासून आणि ओघवत्या भाषेत. असे पालक व संस्कार मिळाले- यू आर व्हेरी लकी Happy

प्रज्ञा ९, अप्रतीम लिहीलयस. फार छान वर्णन केलस बाबान्चे. तुझ्या तीर्थस्वरुप बाबान्चे मनापासुन अभिनन्दन! व त्याना अनेक शुभेच्छा. व त्याना आमचा नमस्कार सान्ग.
तुमचे टिव्हीवाले काहीही सांगोत, लोक वाट्टेल ते बरळोत, त्यामुळे गुरूजी, डॉक्टर(हेडगेवार), आणि आपली परंपरा कमी महत्त्वाची ठरत नाही. सावरकरांचं कार्य कमी होत नाही. अटलजींबद्दलचा आदर कमी होत नाही. मला राजकारण करायचं नाही. चांगली वाईट माणसं सगळीकडे असतातच. मी माझं ठरलेलं काम करतोय. माझी नेमणूक परमेश्वराने केली आहे, हे काम तोच माझ्याकडून करून घेतोय. तोच म्हणातो ना, 'योगक्षेमं वहाम्यहम्'.>>>>> +१ माझ्या बाबान्चे पण हेच लोक आदर्श आहेत. सन्घाचे चान्गले गुण त्यानी उचलले, जे पटले नाही ते सोडुन दिले.

आणि यांनी ते फार मनावर घेतलं. खोटं बोलायचं नाही हे ठरवलं. >
आणि यात काळ्याचं पाढरं नको याचीही त्यांनी काळजी घेतली आहे>.
केवळ पैसा कमवायला म्हणून शाळेत धड न शिकवता खासगी क्लास घ्यायचे नाहीत हे जसं नक्की होतं, तसंच थोडं जास्ती कमवायचं पण योग्य मार्गाने हेही आईने ठरवलं. > खूप खूप मस्त! दोघांच सहजीवन किती सुरेख! तू लिहिलय्स ही छान. दोघांनाही नमस्कार आणि संकल्पपूर्तीबद्दल हार्दिक अभिनंदन!

मस्त लिहिलं आहेस.

धामणी फाटा, गोळवली वगैरे नावं वाचून मी एकदम नॉस्टॅल्जिक झाले. गोळवली टप्प्याला माझी एक आजी राहायची. आम्ही देवरूखहून तिच्याकडे राहायला जायचो. तिकडे 'उन्हाळे' आहेत. ते बघायला जायचं, जाता जाता वाटेतला रानमेवा खात खात हुंदडत भटकंती करायची अश्या रम्य आठवणी आहेत. आता जाऊ तेव्हा हा प्रोजेक्ट बघायचं नोंदवून ठेवते.

_/\_

सुरेख लिहिलंय! तुझ्या आई आणि बाबांना सलाम!असा कोणत्या तरी गोष्टीचा ध्यास लागणं हीदेखील भाग्याची गोष्ट आहे.

छान ओळख करुन दिलीस!
कसलीतरी अपेक्षा करणं आणि केलेली अपेक्षा पुर्ण होणं ह्या दोन्ही गोष्टींमध्ये माणूस फार चटकन हरवून जाऊन, एखाद्या चक्रात अडकल्या सारखा होऊन जातो. निरपेक्षपणे जगण्यात ज्या माणसाला आनंद सापडतो त्यांचं आयुष्य आपोआपच इतरांकरता एक उदाहरण होऊन बसतं. तुझे बाबाही त्यातलेच. Happy

प्रज्ञा खूप छान लिहिलं आहेस. गोळवली आमच गाव. अनेक वर्षात तेथे जायचा योग आला नाही. पण हे वरच वाचून नक्की जाईन.असे कर्मयोगी आई बाबा मिळण ही भाग्याची गोष्ट आहे.
दोघांनाही नमस्कार आणि संकल्पपूर्तीबद्दल हार्दिक अभिनंदन!

बुवा, मस्त प्रतिसाद!

सगळ्यांचे आभार Happy

मी विचारलं बाबांना, की आता पुढे काय? तर म्हणाले अजून मिळेल तेवढा निधी जमवायचा. बांधकाम खर्च वाढल्यामुळे गरज वाढली. आता सव्वा कोटी हवेयत. अजून २५ लाख मिळवायचे. मिळातील तेही! गोपाळकृष्ण करून घेईल!! Happy

सुंदर लिहिलं आहेस. काही काही वाक्यं फारच आवडली. आम्ही पण सरांना ओळखतो त्यामुळे काही वाक्यं पटलीदेखील. दिखावेपणा न करता गुपचुप कामं करणारी काही माणसं रत्नागिरीमध्ये आहेत त्यापैकी एक रायकर सर.

गोळवलीबद्दल : माझी आजेसासूबाई गोळवलीच्या आहेत. एकदा त्यांच्या गावी जायचं आहे. पण इतक्यांदा हायवे वरून जाऊनही कधीच जाणं होत नाही. या सुट्टीत नक्की जाणार.

सुंदर लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

प्रज्ञा....

~ तुमचे हे लिखाण म्हणजे केवळ "प्रज्ञा" नामक एका मुलीच्या मनातील तिच्या बाबाविषयीचे विचार नसून समस्त समाजाच्या मनातील आरशाचे प्रतिबिंब आहे तुमच्या बाबांच्या रुपातील एका हाडाच्या कार्यकर्त्याच्या अनमोल अशा जीवनप्रवासाचे आणि त्यानी मिळविलेल्या प्रेमआदराचे. खूपच प्रसन्न वाटले अशा एका व्यक्तीबद्दल ज्यांच्याशी आपली ओळख नाही; पण आता ह्या एका लेखाद्वारे उमजून येते की जणू ते आपल्याच गावात अशा कार्यात मग्न आहेत.

ही खरी कोट्याधीश माणसाची ओळख....कधीतरी चरणस्पर्श करण्याची संधी मिळो, इतकेच म्हणतो.

खूप सुंदर लिहिले आहे. सुधीर फडके यांची आठवण झाली. त्यांनीही सावरकरांवर चित्रपट बनवायचा या ध्यासाने महाराष्ट्रभर निरपेक्षपणे दौरे केले.

विकु, या दौर्‍यांच्या काळात शूटिंगसाठी सुधीर फडके जेव्हा रत्नागिरीत आले होते तव्हा त्यांचा आमच्याकडे फोन आला होता. मीच उचलला फोन. "नमस्कार, मी सुधीर फडके बोलतोय. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरच्या जीवनपटाचं शूटिंग सुरू आहे, त्यासंदर्भात काही मदत हवी होती. मला रायकर सरांशी बोलता येईल का? एका स्नेह्यांनी त्यांचं नाव सुचवलंय" हे ऐकून मी आनंदाने गोठले होते. "हो आहेत ते घरात. बोलावते मी त्यांना" असं म्हणून बाबां ना फोन दिला. मग स्वातंत्र्यवीर सावरकर जिथे रहात ते घर आमच्या घराजवळ असल्यामुळे मी शूटिंग बघायला गेले होते. तिथे मला सुधीर फडके यांना ओझरतं बघता आलं!

Pages