कारल्याची भाजी (तूरडाळ घालून)

Submitted by गजानन on 19 March, 2016 - 14:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन मध्यम / मोठी कारली,
एक चिरलेला कांदा,
लसणाच्या पाच-सहा कुड्या चेचून,
मसाला*,
तूरडाळ मूठभर,
ओले / सुके किसलेले खोबरे आणि / किंवा शेंगदाण्याचे कूट (हवेच असे नाही),
कोथिंबीर,
हळद, मोहरी, जिरे, मीठ, हिंग.

क्रमवार पाककृती: 

१. तुरीची डाळ धुवून घेऊन बाकीची तयारी होईपर्यंत पाण्यातच ठेवावी.
२. कारल्याच्या पातळ चकत्या कराव्यात.
३. खोलगट प्लेट / टोपात या चकत्या घेऊन मीठात कुस्कराव्यात. मग त्यात पाणी घालावे आणि चकत्या मुठीत चांगल्या दाबून (पिळून) पाण्याचा निचरा करावा.
४. कढईत तेल तापवून त्यात लसूण, मोहरी, जिरे, हळद, कांदा, हिंग इ. यांची फोडणी करावी.
५. फोडणीत कारल्याच्या चकत्या टाकून वाफलावे.
६. चवीप्रमाणे मीठ आणि मसाला घालावा.
७. खोबर्‍याचा किस / शेंगदाण्याचे कूट मिसळावे.
८. तूरडाळ घालावी.
९. चिरलेली कोथिंबीर घालावी.
१०. शिजण्या इतपत पाणी घालून झाकण ठेवून बारीक आचेवर शिजू द्यावे. एकदम सुकी होईपर्यंत पाणी न आटवता किंचित/अंगलागी रस राहील इतपत आटवावे. डाळ एकदमच मऊ शिजवायची गरज नाही.

वाढणी/प्रमाण: 
३-४
अधिक टिपा: 

* मसाला: आम्ही जो मसाला वापरतो तो कोल्हापुराकडे वर्षभरासाठी एकदम बनवला जातो आणि चटणी म्हणून ओळखला जातो तो. त्याची रेस्पी इथे वाचल्याचे आठवते. थोडावेळ शोधत होतो पण सापडली नाही. सापडली की देईन.

माहितीचा स्रोत: 
आऊसाहेब
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरी मीपन करते.
काहि दिवसांपूर्वीच खाल्ली.
ममस्त लागते.
आम्ही पाणी मात्र ठेवत नाही त्यात. सुकिच ठेवतो. फोटो हवा होता.

भारी कृती. ह्याबरोबर गरमागरम भाकरी जबरदस्त लागेल. अशी करून बघेन आता. कारलं प्रिय आहे.
तू लिहिलेली चटणीही आहे घरात.

वॉव .छान वाटतीये रेसिपी.. ( गूळ साखर न वापरल्याने )सिरियसली, गजानन, तू कुकिंग करतोस?? फोटो काढत जा ना अधून मधून..
आणी मसाल्याची रेसिपी नको देऊस शोधून..सरळ मसालाच दे की पाठवून.. Happy हाकानाका

आज केली. तुरीची डाळ कुकर बाहेर शिजेल की नाही शंका होती पण मस्त झाली. कार्ले मला आवडतात त्यामुळे पुन्हा करणार.

काल केली, पण कोल्हापुरी मसाल्याचा अंदाज जरा चुकला,आणि ते प्रकरण भलतेच जहाल झाले,
दाण्याचे कूट वाढवून ,सवरून घेण्याचा प्रयत्न केला, पण तिखटपणा कमी होईना.
मग नेट वरची दुसरी रेसिपी कामी आली (हैद्राबादी पद्धतीची कारल्याची भाजी), या भाजीत एक टोमॅटो बारीक कापून शिजवून घातला, आणि खूप सारा गूळ घातला,
ते पण चान्गले लागत आहे.

पुढच्यावेळी अगदी कमी प्रमाणात मसाला घालून भाजी चा रिपोर्ट देईन.

काल केली ही भाजी. कांदा परतताना आच जरा जास्त्च होती त्यामुळे फोटो काढण्यासारखा रंग वाटला नाही.
पण चव एकदम भारी. सर्व कार्ले प्रेमी मंडळींनी ' प्रिंट अ‍ॅण्ड सेव्ह' असं रेटिंग दिलंय रेसिपीला Happy