हरिप्रिया...

Submitted by पराग१२२६३ on 10 March, 2016 - 13:45

८ एप्रिल २००५. माझ्यासाठी एक एक्सायटींग दिवस होता. काही कामाच्या निमित्ताने चेन्नईला जायचे होते. मग मी आणि वडिलांनी कोल्हापूरहून रेणिगुंट्यापर्यंत ७३१६ हरिप्रिया एक्सप्रेसने आणि पुढे चेन्नईपर्यंत मिळेल त्या गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. महिनाभर आधी आरक्षण केले आणि मिळालेही. त्यानंतर हा दिवस एक्सायटींग ठरण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कोल्हापुरातून निघून वेगळ्याच दिशेने जाणाऱ्या गाडीने हा प्रवास होणार होता. त्यातच कोल्हापुरातून निघून थेट मिरजेतच थांबणाऱ्या गाडीचा आयुष्यातील तो पहिलाच प्रवास असणार होता. इतकेच नाही तर कोल्हापुरातून सुटणारी ती पहिलीच वेगवान गाडी होती. तोही अनुभव त्या प्रवासात मिळणार होता. तोपर्यंत आम्हाला कायम कोल्हापुरातून पुण्याच्या दिशेने आणि तेही मिरजेपर्यंत जवळजवळ प्रत्येक स्थानकावर थांबणाऱ्या गाडीतून जाण्याचा अनुभव होता.

८ एप्रिल २००५ रोजी आम्ही हरिप्रियातील आमच्या डब्यात एस-८ मध्ये म्हणजे हरिप्रियाच्या तिरुपतीला जाणाऱ्या विभागातील डब्यात जाऊन बसलो. एप्रिल असल्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच होता. १९९८ मध्ये तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांच्या हस्ते या गाडीचे उद्घाटन झाले होते. त्यावेळची ११ डब्यांची हरिप्रिया २००५ पर्यंत १५ डब्यांची झाली होती. त्यावेळी कोल्हापुरातून निघताना हरिप्रिया १५ डब्यांसह निघत असे, पण अप दिशेला ती हैदराबाद दख्खन आणि तिरुपती अशा दोन ठिकाणी पोहचत असे. म्हणजेच कोल्हापुरातून दोन्ही बाजूला जाणारे थोडे-थोडे डबे एकत्रच निघत असत. त्यावेळी कोल्हापूर दक्षिण मध्य रेल्वेतून मध्य रेल्वेत आले होते, त्याचे नामांतरही श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस झाले होते. त्यामुळे हरिप्रियाचा प्रवास करण्याआधी स्टेशन मास्तरला आता पुण्याच्या सेक्शन कंट्रोलरकडून परवानगी घेणे आवश्यक होते. दक्षिण मध्य रेल्वेत असताना ती परवानगी हुबळीच्या सेक्शन कंट्रोलरकडून घ्यावी लागत होती. दुपारी १२.५५ वाजता गाडीची वेळ होत असताना कोल्हापूरच्या स्टेशन मास्तरने पुण्याहून गाडीचा प्रवास सुरू करण्याची परवानगी घेतलेली होती. आम्ही स्टेशनवर पोहचलो, तेव्हा यार्डातील पिटलाईनवरून तपासणी होऊन, पाणी भरून, साफसफाई होऊन हरिप्रिया फलाट क्र. दोनवर आलेली होती.

गाडीची वेळ होताच कोल्हापूरच्या पुढच्याच गूळ मार्केट स्टेशनच्या स्टेशन मास्तरकडून ब्लॉक इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने कोल्हापूरच्या स्टेशन मास्तरने लाईन क्लिअर घेतली होती. कारण त्याशिवाय कोल्हापुरातले सिग्नल्स ॲक्टीव्हेट होणार नव्हते. म्हणूनच हा नित्य खटाटोप करावा लागला. चालक आणि गार्डच्या ब्रेक पॉवर सर्टिफीकेटवर सह्या झाल्या होत्या आणि त्यांच्या कॉप्या त्यांच्याकडे दिल्या गेल्या होत्या. त्या दिवसांमध्ये पुणे-कोल्हापूर मार्गावरील इलेक्ट्रॉनिक सिग्नलिंग यंत्रणेचे काम पूर्ण झालेले नव्हते. जुन्या पद्धतीचे सेमाफोर सिग्नल कोल्हापूर-मिरज मार्गावर अजून कार्यरत होते. लाईन क्लिअर मिळताच गाडीची वेळ झाल्यावर होम सिग्नलची लाल पट्टी ४५ अंशाच्या कोनातून आणि ॲडव्हान्स स्टार्टर सिग्नल्सची लाल पट्टी ९० अंशाच्या कोनातून वर उचलल्या गेल्या. दोनच मिनिटात गार्डने सिग्नल देताच हरिप्रियाने तिरुपती/हैदराबादच्या दिशेने कूच केले.

कोल्हापुरातून निघाल्यावर पंचगंगा ओलांडली आणि रुकडीमध्ये पहिल्या क्रॉसिंगसाठी थांबावे लागले. हरिप्रिया रुकडीत येण्याआधी हातकणंगल्याहून येणाऱ्या ६५८९ बेंगलोर-कोल्हापूर राणी चन्नम्मा एक्सप्रेसला लीन क्लिअर देण्यात आल्यामुळे आम्हाच्यासाठीचे सिग्नल्स लॉक झाले होते. त्यामुळे आम्हाला पुढे जाता येणार नव्हते. म्हणूनच रुकडीत आम्ही चन्नम्मा क्रॉस होईपर्यंत थांबणे आवश्यक होते. काही वेळात क्रॉसिंग झाल्यावर हरिप्रिया पुढे निघली आणि थेट मिरजेत जाऊन पोहचली. तिथे पोहचल्यावर हरिप्रियाला तिची दिशा बदलण्याची गरज होती. म्हणून इथे थोडा जास्त वेळाचा थांबा हरिप्रियाला दिलेला आहे. पुढचे इंजिन काढून मागे लावण्याची प्रक्रिया लगेचच सुरू आणि पूर्ण झाली होती. तसेच इंजिन बदलल्यामुळे गाडीच्या ब्रेकमधील प्रेशर कमी झाले होते, ते लवकर वाढविण्यासाठी चालकाचे प्रयत्न चालू झाले होते. त्यासाठी मिरजेत अर्धा तास गेला. इथून पुढे दक्षिण पश्चिम रेल्वे सुरू होणार असल्यामुळे हरिप्रियाला पुढच्या प्रवासासाठी सिग्नल देण्याआधी मिरजेच्या स्टेशन मास्तरला पुण्याच्या सेक्शन कंट्रोलरकडून परवानगी घेणे आवश्यक होते. पण त्याचवेळी पुण्याच्या आणि हुबळीच्या सेक्शन कंट्रोलर्समध्ये संदेशांची देवाणघेवाण होणे आवश्यक होते. ही देवाणघेवाण पूर्ण होताच पुण्याहून हरिप्रियाला पुढे सोडण्यासाठी मिरजेच्या स्टेशन मास्तरला परवानगी मिळाली आणि हरिप्रियाचे नियंत्रण करणारे मिरजेतील होम आणि ॲडव्हान्स स्टार्टर सिग्नल ऑफ झाले. आता इथून पुढे इलेक्ट्रॉनिक सिग्नलिंग यंत्रणा असल्यामुळे प्रवास तसा जलद होणार होता. पण सिंगल लाईनमुळे अधेमध्ये क्रॉसिंग करता थांबावे लागणार होते.

आता पहिल्यांदाच रेल्वेने कर्नाटकात प्रवास करू लागलो होतो, त्यामुळे सगळच नवनव वाटत होतं. विजयनगरला डाऊन हरिप्रिया क्रॉस झाली, तर रायबागला मिरड-लोंढा पॅसेंजरला ओलांडून आम्ही पुढे निघून गेलो. मध्ये घटप्रभाचा बोर्ड वाचल्यावर म्हटले - अरे घटप्रभा नदीच्या नावाने गावही आहे तर. दरम्यानच्या काळात गाडीत नेहमीप्रमाणे फेरीवाल्यांची वर्दळ सुरू झाली होतीच. पण हा सगळाच प्रवास नवा असल्यामुळे फेरीवाल्यांच्याकडे माझे फारसे लक्ष नव्हतेच. काही वेळातच बेळगाव आले. तब्बल १६ वर्षांनी बेळगाव पाहिले होते. तसे जरा जुनाटच वाटले ते शहर मला. कदाचित सीमावादामुळे याचा विकास खुंटला असेल असे वाटले. बेळगाव सोडल्यावर पुढच्याच देसूर स्टेशनला हुबळी-धारवाड-मिरज पॅसेंजरचे क्रॉसिंग झाले. पुढे हरिप्रियाचा वेग वाढत गेला.

गुंजीला बेंगलोर-मुंबई चालुक्य क्रॉस झाली आणि आम्ही लोंढ्याला पोहचलो. या ठिकाणी पश्चिम घाट जो आतापर्यंत दूर होता त्याचे दर्शन झाले. तसे मिरजेनंतर तांबड्या मातीच्या प्रदेशातूनच प्रवास सुरू झाला होता. लोंढा म्हणजे गोव्याचे पूर्वेचे प्रवेशद्वार. येथून एक फाटा हुबळीकडे, एक मिरजेकडे आणि एक मडगावकडे जातो. तिथे पोहचलो तेव्हा वास्को द गामाहून आलेली आणि मिरज, पुणे मार्गे निझामुद्दीनला जाणारी गोवा एक्सप्रेस थांबलेली होतीच. तिचे येथे डबे जोडणीचे काम सुरू होते. म्हणजे बरेचसे डबे वास्कोहून आलेले होते, त्यांच्याशी हुबळीहून आलेले पाच डबे जोडले जात होते. तर पलीकडे डब्ल्यूडीजी-४ या कार्यअश्वांसह गोव्याहून आलेली आणि हुबळीच्या दिशेने जाणारी बीओएक्सएन (बॉक्साईट वाहणाऱ्या) वाघिण्यांची मालगाडी थांबलेली होती. मात्र आता हरिप्रियाला प्राधान्य मिळणार असल्यामुळे या मालगाडीला तेथे अजून थांबावे लागणार होते. संध्याकाळचे सव्वासहा होऊन गेले होते. आता हरिप्रिया लोंढ्याहून निघाली आणि १८.२५ वाजता अलनावरला पोहचलो, तर तिथे पुन्हा बीओएक्सएन वाघिण्यांच्या दोन मालगाड्या - एक लोंढ्याकडे आणि दुसरी लोंढ्याहून आलेली - आमच्यासाठी रोखून धरलेल्या होत्या. मी कोल्हापूरहून निघालेल्यापासून असे पहिल्यांदाच होत होते की, मी ज्या गाडीत बसलेलो आहे, ती कमीतकमी थांबे घेत आहे आणि तिच्यासाठी बऱ्याच गाड्या वाटेत रोखून धरलेल्या आहेत.

लोंढ्यापासून मालगाड्यांची वाहतूक एकदम वाढलेली होती. त्यातच एकएक ब्लॉक स्टेशन ओलांडत हरिप्रिया रात्री ८.२० वाजता हुबळीत पोहचली. त्याआधी रेल्वेचा एक जण येऊन जेवणाच्या ऑर्डर घेऊन गेला होता. त्यामुळे हुबळीत आल्याबरोबर आम्हाला गरमगरम जेवण आणून दिले गेले. त्यावेळी रात्रीच्या जेवणाच्यावेळी हरिप्रिया हुबळीत पोहचत असल्यामुळे आणि झोनल हेडक्वार्टर असल्यामुळे तिला इथे जास्त वेळेचा थांबा देण्यात आला होता. इथेच आमच्या गाडीचे चालक-गार्ड पहिल्यांदा बदलले गेले. त्यांची नव्या क्रूने जागा घेतल्यावर त्यांचेही डॉक्यूमेंटेशन पूर्ण झाले. ही सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रात्री पावणेनऊनंतर हरिप्रिया पुढच्या प्रवासासाठी निघाली.

पहाटे अडीच वाजता हरिप्रिया गुंटकलला आली, तेव्हा इथे तिच्या प्रवासातील रोजचा इटरेस्टींग भाग आला. त्या दिवसांमध्ये हरिप्रिया लिंक एक्सप्रेसप्रमाणे धावत होती. त्यामुळे कोल्हापूरहून निघताना तिरुपती आणि हैदराबादकडे जाणारे डबे एकत्र घेऊन निघालेली हरिप्रिया गुंटकलमध्ये दुभंगली. हैदराबादला जाणारे मागचे पाच डबे कोल्हापूरहून आलेल्या हरिप्रियापासून वेगळी करण्यात आले. थोड्याच वेळाने पलीकडच्या फलाटावर गुंटकलला आलेल्या तिरुपतीहून आलेली रायलसीमा-हरिप्रिया लिंक एक्सप्रेस आणि तिसऱ्या फलाटावर हैदराबादहून आलेली रायलसीमा-हरिप्रिया लिंक एक्सप्रेस वाट पाहत उभ्या होत्या. त्यानंतर त्या दोन्ही गाड्यांचेही दोन-दोन तुकडे करण्यात आले. अशा प्रकारे तीन एक्सप्रेस गाड्यांचे एकूण सहा तुकडे करण्यात आले. काहीच वेळात कोल्हापूरहून आलेले आणि हैदराबादला जाणारे पाच डबे शंटर इंजिनाच्या मदतीने तिरुपतीहून आलेल्या आणि हैंदराबादला जाणाऱ्या रायलसीमा एक्सप्रेसला डब्यांना जोडण्यात आले. त्याआधी त्या डाऊन रायलसीमाचे तिरुपतीहून आलेले आणि कोल्हापूरला जाणारे ९ डबे वेगळे करण्यात आले होते. ते डबे घेऊन दुसरे शंटर इंजिन पुढे गेले. त्याने ते ९ डबे डाऊन रायलसीमाच्या हैंदराबादहून आलेल्या आणि कोल्हापूरला जाणाऱ्या डब्यांच्या पुढे आणून जोडून टाकले. त्यानंतर एका शंटरने आमचे ९ डबे पुढे नेले आणि पलीकडच्या फलाटावर शिल्लक राहिलेल्या तुकड्याला म्हणजेच हैदराबाद-रायलसीमा एक्सप्रेसच्या मागे नेऊन जोडून टाकले. अशा पद्धतीने दोन तासांनंतर तीन दिशांहून आलेल्या तीन गाड्यांचे सहा तुकडे करून पुन्हा त्यापासून तीन गाड्या तयार करून झाले होते. आता या नव्या तीन गाड्या तीन दिशांना म्हणजेच कोल्हापूर, तिरुपती आणि हैदराबादला रवाना होणार होत्या. पण गुंटकलला नवा झोन आणि डिव्हिजन येत असल्याने या तिन्ही गाड्यांचे चालक-गार्ड येथे बदलले गेले. त्यानंतर काही वेळात पुन्हा डॉक्यूमेंटेशन आणि ब्रेक पॉवर सर्टिफीकेटवर चालक-गार्डच्या सह्या झाल्यावर तिन्ही गाड्या आपापल्या गंतव्याच्या दिशेने निघू लागल्या. त्या दिवसांमधील गुंटकलमधील हे सोपस्कार नित्यनेमाचेच होते. मधल्या काळात मालगाड्या आणि अन्य गाड्यांचे क्रॉसिंग सुरू होतेच. (सर्व डिटेल्स इथे दिलेली नाहीत.)

जसजसे उजाडू लागले, तसतसे एकेक जण उठू लागले आणि प्रत्येकाची गडबड सुरू होऊ लागली. आता डबल लाईन सेक्शन सुरू झालेली असल्यामुळे आमच्या पलीकडच्या खिडकीतून गुंटकलच्या दिशेने धडाडत जाणाऱ्या गाड्यांची झलक मला इथून मिळत होती. अखेर मजल दरमजल करत हरिप्रिया सकाळी ठीक ९.०५ वाजता रेणिगुंट्याला पोचली. तिथे आम्ही उतलो आणि चहा-नाश्ता करून चेन्नईसाठी सप्तगिरीची वाट पाहत उभे राहिलो. गाडीला तसा दोन तासांचा वेळ होता. त्यामुळे मी माझ्या अंगभूत सवयीप्रमाणे रेणिगुंट्याच्या स्टेशनवर फेऱ्या मारू लागलो. कारण? कारण, मी पहिल्यांदाच या प्रदेशात आलो होतो आणि या स्टेशनवरही. मग काय अशा नवख्या स्टेशनवर मला एकाच जागी जांभया देत, रेल्वेला नावे ठेवत वेळ घालवायला कसे आवडेल?
---०००---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.. एकदा वास्को हून निघणार्‍या गाडीतून पण प्रवास करा.

कोल्हापूरची अंबाबाई हि तिरुपतीची पत्नी हे लहानपणी केवळ उडत उडत ऐकलेले. तिच्यासाठी मानाची साडी, तिरुपतीहून येते हेही ऐकले होते. पण गेल्या काही वर्षांत, अंबाबाईचे दर्शन घेतल्याशिवात तिरुपतीची यात्रा पूर्ण होत नाही , असा समज पसरलाय. आणि त्यासाठी ही गाडी सोयीची पडते.

याचे अनेक साईड इफेक्ट्स झालेत. १) अंबाबाईला , महालक्ष्मी असे संबोधू लागलेत २) मंदीरावर असलेल्या तिरुपतीच्या मूर्तीला रंग लावून ठळक केलेय ३) कोल्हापूरला पण आता बुंदीचे लाडू मिळू लागलेत

भारी अनुभव आहे Happy

तीन गाड्या तोडणे आणि जोडणे प्रकार भारी आहे. >>> याला इट हॅपन्स वोनली ईन इंडियात घेता येईल Happy

मस्त लिहिलं आहे. इतक्या बारीक सारीक तपशीलांसह तुम्ही लिहिता त्याचं कौतुक आणि प्रचंड उत्सुकता वाटते. रेल्वेबद्दल इतकी तांत्रिक माहिती इतक्या तपशीलात तुमच्याच लेखांत वाचायला मिळतें, तीही कंटाळवाणी न होता.
हे तुमचं प्रोफेशन आहे की छंद आणि त्यासाठी केलेला अभ्यास?

घटप्रभा वाचल्यावर लंपन आठवलाच.

पराग, आपले रेल वेवरचे लेख अतिशय आवडतात. किती तपशील. किती गाड्यांची नवनवीन नावे. अख्खे दख्खन पठार उभे आडवे ओलांडत जाणार्‍या किती गाड्या. भारतीय रेल वे हे प्रकरण किती अजस्र आणि जगद्व्याळ आहे आणि तरीही त्याचे इंजीन कार्यक्षमतेने धडधडते आहे हे पाहून स्तिमित व्हायला होते. अभिमान वाटतो. आपले तांत्रिक ज्ञानही आम्हांला वेगळ्या विश्वात घेऊन जाते. इतक्या बारीकसारीक नोंदी आपण अजूनही जपून ठेवल्या आहेत, याचे आश्चर्य आणि कौतुक वाटते. ह्या सर्व लेखांचे एक पुस्तक केल्यास ते गतकाळातील रेल्वे तंत्रज्ञानाच्या एका अंगाचे उत्तम डॉक्युमेंटेशन होऊ शकेल.

दिनेश,
कोल्हापुरच्या अंबाबाईवर 'शिवभार्या ते विष्णुप्रिया असा प्रवास' असा एक शोधनिबंध नुकताच ऐकला. अर्थात हे मत नवे नाही. अनेक संशोधकांनी त्याचा सूचक उल्लेख केला आहे.

मस्त लिहिलेय . तांत्रिक माहिती असूनही कंटाळा आला नाही वाचताना . शेवटचं वाक्यही मस्त आहे

या गाडीच्या प्रवासातला तोच तीन गाड्या सहा भागांमध्ये तोडून पुनहा ३ नव्या गाड्या तयार करण्याचा रोमहर्षक अनुभव इथे शेअर करावासा वाटला.

छान लिहिला आहे पण तुम्हाला इतके सगळे डीटेल्स कसे काय माहिती आहे त्याबद्दल जरा सांगाल का? रेल्वेनी आम्हीही प्रवास केला आहे पण कधीच किती डबे आहेत, कुठे तुटतात, जोडतात, आदेश देतात-घेतात हे मला कधीच माहिती नव्हते. डब्याच्या खाली उतरून पण बघितले असेल ना तुम्ही हे डबे जोडताना तोडताना? त्याचे फोटो असतील तर दाखवा..

छान लेख आहे. मडगाव सुंदर शहर आहे जुने आहे पण एक मस्त शहर आहे. जाऊन या एकदा.

व्वा काय मस्त लिहीलंयं ... तुम्ही इतक्या बारकाईने इतक्या सहज सोप्या वाचनीय तर्हेने लिहता ....रेल्वे फैन आहेच तसेच तुमच्या लेखनाचीही Happy

पराग, मस्त लेख. आम्हाला रत्नागिरीला जायचं असल्यास चेन्नईवरून ही गाडी बरी पडते. पण आम्ही कोल्हापूरला चढत उतरत नाही. त्याऐवजी बेळगावला थांबा घेतो. कोल्हापूर बेळगाव रस्त्याने अंतर जास्तीत जास्त दोन अडीच तासांचे आहे. ही हरिप्रियाबाई चक्क साडेपाच सहा तास घेते. आम्ही बेळगावला उतरून जेवून कारने रत्नागिरीला येऊन पोचतो तेव्हा या बाई कोल्हापूरला नुकत्या पोचत असतात.

तुमच्या लेखामधली तांत्रिक माहिती वाचयाला सर्वात जास्त मजा येते. ते तीन गाड्यांचे सहा तुकडे फारच मजेदार होतं. हे घडत असताना प्रवासी फलाटावर उतरून याची मजा घेऊ शकतात का?

मस्त माहितीपूर्ण लेख. नक्कीच तुम्हाला रेल्वेबद्दल 'पॅशन' (मराठी??) आहे आणि ते लेखातून दिसतच.
माझे काही ओळखीचे फोटोग्राफर मित्र केवळ आणि केव्ळ रेल्वेचेच फोटो काढतात. त्यांच्या बोलण्यातून पण हे प्रेम दिसून येतं.

आभार हीरा, लहानपणापासून जिला अंबाबाई म्हणत आलोय, तिला अचानक महालक्ष्मी म्हणू लागले, हे जरा खटकलेच.

पराग, वास्को - लोंढा मार्गावरच दूधसागर ( कॅसल रॉक ) लागतो ना ? चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटानंतर तिथे अचानक गर्दी वाढलीय.

खूप छान लिहिल आहे. चुकून एकदा हरीप्रिया एक्सप्रेसने तिरूपती-हैद्राबाद प्रवास केला आहे त्याची आठवण झाली. जनरल डब्याची तिकिट काढली होती, आम्ही दोघीजणी होतो. लेडीज डब्यात तुम्ही कुठे आम्ही कुठे करताना समजल की ही ट्रेन डायरेक्ट हैद्राबाद नाही. Uhoh खूप घाबरलो कारण मध्यरात्री २ -३ वाजता गुंटकलला पोहचणार होती. गुंटकलला उतरून टी सी ला विचारून रायलसीमा हैद्राबाद ट्रेनमध्ये धावत जावून चढलो. ही पॅसेंजर ट्रेन आहे. Sad ही ट्रेन दुपारी १२.३० ला हैद्राबादला पोहचली. Sad वन नाईट जर्नी आहे ट्रेनने तिरूपती - हैद्राबाद. बाकी सगळ्या ट्रेन हैद्राबादला सकाळी ७ ला पोहचतात. पुन्हा कधी ह्या ट्रेनच्या वाटेला नाही गेलो.

भारीच एकदम.. गाड्यांची तोडणी आणि जोडणी तर एकदम मस्त..

गाडीत बसलेल्या प्रवाश्यांना कसलं वेगळंच वाटत असेल तेव्हा.. बाहेर उतरलेल्यांसाठी तर फुल टू धावपळ अरे गाडी सुरु झाली.. पळा पळा.. अरे हे काय गाडी परत थांबली.. आत परत कधी सुटणार.. उगाच धावाधाव केली..

मस्त वर्णन.. स्टेशनमास्तर ने लाईन क्लिअर घेतली वगैरे वाचताना अगदी एखादी रहस्यमय कादंबरी वाचायला घेतलीय आणि हिरो मागावर निघालाय वाटायला लागते. Happy

रेल्वे माझे प्रोफेशन नाही. असते तर अतीव आनंदच झाला असता. म्हणून आता रेल्वेची आवड अशा पध्दतीने जपण्याचा प्रयत्न करतोय.

हे फारच मोघम उत्तर मिळाल Happy तुमच्या ह्या अभ्यासाबद्दल जाणून घ्यायची संधी दिलीच नाही Happy

असो..

मी फ्रान्समधे असताना मार्सेयी पासून ट्रेन घेऊन पॅरीसला निघालो. ट्रेन खूपच आरामदायी होती आणि ट्रेनमधील लोक फार शांत, आनंदी, टवटवीत, व्यवस्थित पोशाख घातलेली, बोललो तर बोलणारी होती. मी मुद्दाम लोकांशी बोलायचो तर तीही बोलायला लागायची. मी ५ ला सकाळी प्रवास सुरु केला तर ६ ला मला बाहेरचे जग उजाडल्यामुळे दिसायला लागले. मला फ्रान्स इतके आवडले होते की ट्रेनच्या खिडकीतून जे दिसेल ते डोळ्यात साठवायचे होते. पण झाले असेल की पॅरीस शहर येईपर्यंत फार असे काही दिसलेच नाही. तो महिना हिवाळ्यामुळे गारठलेला आणि कुंद कुंद हवेचा होता. बाहेर सुर्य प्रखर उगवलेला नव्हता. सगळी झाडी विरक्त आणि पक्षी सन्यासाला निघून गेलेली होती. शेवटी पॅरीस आले आणि तिथे बघण्यासारखे तर खूप खूप काही होते. पण ट्रेनमधून निसर्ग असा दिसलाच नाही. परतीचा प्रवास रात्रीचा होता. दुरवर कुठेतरी ढग मोकळे होऊन चांदण्या माझ्या डोळ्यात चमकायला बाहेर आल्या होत्या Happy

ह्याच उलट, मी ईंडोनेशियाला गेलो होतो. बांडूंग वरुन ट्रेन घेतली. ९ तासाचा प्रवास. योग्यकर्त्याला पोचायचे होते. सकाळी सुर्य उगवणार त्याच्या १० मिनिटे आधी ट्रेन सुरु झाली. आणि ईंडोनेशियाचा निसर्ग इतका अविट इतका हिरवागार इतका वैविध्यपुर्ण इतका भरगच्च इतका फुललेला इतका मोहरलेला की माझे ९ तास कसे संपले हे मला कळले सुद्धा नाही. ट्रेनचा प्रवास करावा तर तो खास ईंडोनेशियामधे.

हिम्मकूल जी, आता गुंटकलमधली हरिप्रियाची अशी तोडणी-जोडणी बंद झालेली आहे. कारण आता कोल्हापुरातून हैदराबाद आणि तिरुपतीसाठी दोन स्वतंत्र गाड्या वेगवेगळयावेळी जाऊ-येऊ लागल्या आहेत. पण त्या काळातही हे सर्व मार्शलिंग गुंटकलमध्ये पहाटे अडीच वाजता होत असे. अशा वेळी गाडीत सारेच गाढ झोपलेले आणि माझ्यासारखे काहीच रेल्वेप्रेमी हे सर्व अनुभवत असल्याचे मी पाहिले त्या प्रवासात.

तुम्ही लिखाण केलेल्या जवळ जवळ सर्व ट्रेन्स मधे बसण्याचा योग आलाय फक्त पुणे-नवी दिल्ली दुरोंतो सोडुन. हरिप्रिया मधे बसणं झालेलं नाही पण एकदा कॉलेजच्या बेंगलोर ट्रिप ला निघालेलो असताना मिरजेतुन राणी चन्नम्मा एक्स्प्रेस येईपर्यंत तिथं तिरुपतीहुन येऊन पोचलेल्या 'हरिप्रिया' मधुन उतरलेली जवळ जवळ सर्वच प्यासिंजरं टकले होते ते बघुन आम्हाला खूप हसु आलं होतं. त्यावेळी तिरुपती वरुन येणारे मुंडण करुन यायचे पण एकाच वेळेस ट्रेन मधुन आलेले अन मुंडण केलेले असंख्य श्रद्धाळु उतरताना पहाणे एक अविस्मरणीय अनुभव होता Proud . आमचं हसणं बघुन आमच्या सरांनी 'हरिप्रिया' बद्दल माहिती सांगितली होती अन तिच्या सर्व कोचेस मधुन एक रपेट मारुन कोणकोणत्या प्रकारचे कोचेस असतात ते दाखवले होते. ए.सी. कोच कसा असतो हे मी त्यावेळी पहिल्यांदा पाहिला होता.