महिलादिन - पत्नी म्हणून कुटुंबातील स्थान

Submitted by बेफ़िकीर on 6 March, 2016 - 01:52

पत्नी म्हणून कुटुंबात वावरताना जे स्थान मिळते त्याची ही काही उदाहरणे! ही रँडम उदाहरणे आहेत.
====================

सोनल - पुण्यातील अत्यंत प्रतिष्ठित घराण्यातील सर्वात धाकटी सून! प्रचंड श्रीमंती, राजवाड्यासारखा बंगला, दिमतीला कित्येक नोकर, घरातील प्रत्येक पुरुष कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात अग्रगण्य अशी एकंदर परिस्थिती! चुलत सासरे हे भारतीय राजकारणातील एक जुने व धुरंधर नेते! घरात रोजच किती पाने जेवून उठतात ह्याची गणती नाही. घरातील बहुतेक स्त्रिया कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या, मंडळाच्या वगैरे चेअरपर्सनपदी! प्रत्येक व्यक्तीला एक वलय! सोनलही महिलांसाठी मोठी चळवळ चालवते. सोनलला दोन मुले आहेत. मोठी मुलगी आता उच्चशिक्षणासाठी परदेशी आहे आणि धाकटा मुलगा कॉलेजमध्ये! एरवी घरात काडीही इकडची तिकडे करावी लागत नाही. पण सासरचे मोठे मोठे लोक जेवायला आले की साडी नेसावी लागते. पदर डोक्यावरून घ्यावा लागतो. प्रथम बाहेरच्या दिवाणखान्यात सर्व पुरुषांची जेवणे होतात. तेथे वाढावे लागते. आतल्या खोलीत त्याचवेळी सर्व लहान मुले जेवत असतात. त्यांनाही वाढावे लागते. त्यानंतर घरातील सर्व सासवा आणि नणंदा जेवायला बसतात. त्यांना सर्व सुना वाढतात. नंतर वयानुसार सगळ्या सुना जेवायला बसतात. त्यांना सर्वात धाकटी असलेली सोनल वाढते. शेवटी मग सोनलची जेवायची वेळ येते तेव्हा साडे चार वगैरे वाजलेले असतात. नवरा व धाकटे दीर सोडून इतर सर्व पुरुषांसमोर आवाज हळू ठेवण्याची संस्कृती आहे. हा एवढा समारंभ उरकून सगळे निघून गेले की मग सोनल पुन्हा आपल्या साम्राज्याची राणी होते. लग्नानंतर काही काळ ही अशी संस्कृती पचवण्यातच खर्ची पडली. नंतर तिला त्याचे काही वाटेनासे झाले. बहुतेकदा रात्री कोणत्यातरी व्यावसायिक मीटिंग किंवा समारंभासाठी पतीबरोबर शोभा म्हणून जावे लागते. तेथे अती उच्चभ्रू वर्तुळातील स्त्रियांशी गप्पा मारत बसणे इतकेच काम असते. सोनलची स्वतःची ओळख काहीही असली तरी अजूनही ती 'ह्यांची पत्नी' म्हणूनच अधिक ओळखली जाते. बाहेरही आणि घरातही!

नेहा - पुण्यातील प्रतिष्ठित आय टी कंपनीत काम करणारी तरुणी! गेल्या वीस वर्षांत कामानिमित्त जगातील प्रगत असे किमान दहा देश पाहून झालेले आहेत. अमेरिका, कॅनडा व जपान येथे वेगवेगळ्या कंपन्यांतर्फे दीर्घकाळ वास्तव्य! आता गेली काही वर्षे भारतातच! अधूनमधून फ्रान्सला जावे लागते पंधरा एक दिवसांसाठी तेवढेच! नवरा अतिशय हुषार पण काही मानसिक व्याधीमुळे गेली कित्येक वर्षे कामच करत नाही. घरात बसून असतो. मात्र तो प्रेमळ आहे. त्या व्याधीसाठी घ्यावी लागणारी जी औषधे आहेत त्यांचा साईड इफेक्ट असा होतो की त्याची कार्यशक्ती कमी होते. त्यामुळे तो बसून असतो. त्याच्या रिअ‍ॅक्शन्सही मंद असतात. सासू नाही. सासरे प्रत्येक लहानसहान गोष्टीत नाक खुपसणारे! प्रत्येक गोष्टीत उपदेश करणारे! इर्रिटेट करणारे! नेहा पहाटे साडेपाचला उठते. सव्वासहा वाजता घरातील सगळ्यांचा स्वयंपाक व स्वतःचा डबा तयार करून ठेवते. पावणे सातला कार घेऊन बावीस किलोमीटरवर असलेल्या कंपनीत पोचते. तेथून सगळ्यांना सुप्रभात अशी बल्क मेल पाठवून कामाला जुंपते ती रात्री आठ वाजता घरी येते. आल्यावर पुन्हा स्वयंपाक करते. सासरा व नवरा ह्या दोघांना वाढते. सासरे हाताने पाणी किंवा मीठही घेत नाहीत. नेहा तिथेच उभी असते. एखाद्या पदार्थात मीठ कमी वगैरे झाले असेल तर सासरे तेवढे नक्की सांगतात. चुका अनेकदा काढतात. तुला सासू नाही हे नशीब समज असे चेष्टेत म्हणून हसतात. नेहा केव्हाही बघावे तेव्हा हसरा चेहरा करून वावरत असते. तब्येत नाजूक आहे.

माधवी - आज वय पासष्ट! लग्न झाल्यावर कळाले की नवरा जुगार खेळतो व खूप दारू पितो. माधवी सासरी मन रमवू शकत होती. तितपत सालस व सोशिक वगैरे होती. पण भडकली की भडकली. घरात सगळ्या नणंदा माहेरवाशीण म्हणून आलेल्या असताना उशीरापर्यंत जर नवरा परतला नाही तर डोळ्यातून पाणी न काढता घराच्या दारात अबोलपणे उभी राहायची. कोणी विचारले का उभी आहेस म्हणून तर काहीही सांगायची नाही. सगळ्याजणी आतल्या खोलीत प्रचंड गप्पा आणि हास्यविनोद करत असताना ती तिथून जात असली तर तात्पुरता हसरा चेहरा करून जायची. पण जसजसा घड्याळाचा काटा नऊकडे सरकायचा तसतशी अस्वस्थ व्हायची आणि एकच वाक्य बोलून चपला घालून घराबाहेर पडायची. 'मी आलेच हं' इतकेच सांगून जायची. कोणालाही माहीत नसायचे की ही आत्ता कुठे गेली असावी. एक तासाने दोघे बरोबर परत यायचे आणि माधवीचा नवरा खालमानेने जेवायला बसायचा. जेवून वरच्या खोलीत झोपायला निघून गेला की माधवीला नणंदा म्हणायच्या की आजही पिऊन आलाय का! त्यावर माधवी हसून 'ते नेहमीचंच आहे' म्हणायची आणि स्वतःचे पान वाढायची. नणंदा मग प्रेमाने तिला वाढायच्या आणि कोणीतरी थोपटायचेही. पण माधवी डोळ्यातून पाणी काढायची नाही. एकदा भडका उडाला. असेच सगळे जमलेले असताना रात्री सगळ्यांनी मिळून काहीतरी करायचे ठरत होते. अचानक माधवीचा नवरा उठला आणि कुठेतरी निघाला. माधवीने त्याचा पटकन् हात धरला आणि तिचे डोळे प्रथमच पाणावले. ती त्याला म्हणाली की आज नका ना जाऊ, आज सगळे घरात आहेत. त्यावर तो म्हणाला 'आलोच थोड्या वेळात'! आणि मग भडका उडाला. माधवीने खसकन् त्याचा हात खेचून त्याला खुर्चीत बसता केला आणि म्हणाली. 'हरामखोर, मला कशाला लग्न करून आणलीयस इथे? रोज रात्री तुला त्या भिकारचोटांच्या गर्दीतून पत्ते खेळताना उठवून घरी आणायला? त्यांच्यातल्या कोणी माझ्यावर हात टाकला तरी तू पीत बसशील. आज तू जाऊनच दाखव, नाही चामडी सोलली तुझी तर बघ'! माधवीचा हा रुद्रावतार नणंदा, भाचरे, सासू आणि सासरे ह्या सगळ्यांनाच थक्क करणारा होता. ही अशी बोलू शकते हेच मुळी इतके वर्षांनी समजत होते. ती रात्री कुठे जाते ह्याचेही सगळ्यांना आकलन झाले. तेव्हापासून तिचे घरातील स्थान वधारले. पण नुकतेच समजले की आता दोघेही म्हातारी झालेली असून आताही माधवीचा नवरा रोज पितो आणि कधीकधी तिला मारतोही! काय मिळाले माधवीला ह्या संसारातून? तर एक मुलगी आणि जावई! जोडीला अशांत मन!

अपूर्वा - अपूर्वाला पुरुषांना खेळवायला आवडते. अनेक नजरा स्वतःवर झुलवत ठेवून ती वावरत असते. शॉपिंग ही तिची पॅशन आहे. नवीन भेटवस्तू मिळणे हा अत्यानंद आहे तिच्यासाठी! मग ती भेटवस्तू देणार्‍याने थोडी लगट केली तरी चालते. नवर्‍याला बोटाच्या इशार्‍यावर नाचवते आणि तो नाचतोही! दोघेही कमावतात पण नवरा अपूर्वाला कोणत्याच प्रकारे मार्गावर आणण्यास असमर्थ आहे. एकदा अपूर्वाने परगावी असलेल्या सासूला फोन करून झापले. तुम्ही तुमच्या मुलाला ज्या सवयी लावलेल्या आहेत त्यामुळे तो मी केलेल्या भाज्या खात नाही. त्याला जरा अक्कल शिकवा इथे येऊन! चारचौघांमध्ये नवर्‍याची थट्टा करण्यात तिला विशेष काही वाटत नाही. खरे तर संसार किंवा सहजीवन ह्या संकल्पनाच तिला मान्य नसाव्यात असे वाटते. एखाद्या कारणामुळे चिडली की चेहरा भयंकर हिंस्त्र होतो. एरवी आकर्षक दिसणारी अपूर्वा अचानक राक्षसिणीसारखी भासू लागते. अर्धा अर्धा तास घशाच्या शिरा ताणून आरडाओरडा करू शकते. आजूबाजूच्यांना सवय झालेली आहे. अपूर्वाला एक मुलगा आहे ज्याला आईबद्दल विशेष माया वाटत नाही. तेही साहजिकच आहे. प्रेझेंटेबल असण्याबाबत ती इतकी भयंकर दक्ष असते की एखादी नटीही अशी नसावी. म्हातारपणी अपूर्वाचे आयुष्य कसे असेल ह्याचा अंदाज लावता येत नाही.

नेत्रा - नेत्राचे कुटुंबातील स्थान बघितले तर धक्का बसेल. राजेशाही राहणी! अफाट श्रीमंती! पुण्यात चार मोठी साड्यांची आणि रेडिमेड्सची दुकाने! लक्ष्मी नुसती वाहत असते. पण नेत्रा शोभेची बाहुली आहे. घरात नोकरचाकर आहेत. पण वेळेवर नाश्ता मिळाला नाही तर नवरा आणि मुलगा किंवा मुलगीही सर्वांदेखत पाणउतारा करतात. अबोल नेत्रा घाईघाईने कामे उरकू लागते. आता नोकरही तिच्या म्हणण्याला देत असलेली किंमत जरा कमी झाली आहे. सिंध हाऊसिंग सोसायटीसारख्या पुण्यातील अतीप्रतिष्ठित कॉलनीतील प्रासादतुल्य बंगल्यात राहणारी नेत्रा घराबाहेर पडते ती फार तर देवाला जाण्यासाठी! अगदीच सोसायटीतील बायकांचा काही समारंभ असला तर तिला सहभागी होता येते. अन्यथा तिला सोशल लाईफ विशेष नाही.

वरील उदाहरणे पूर्णपणे सत्य आहेत मात्र नांवे बदललेली आहेत. प्रत्येक कुटुंबातील पत्नीचे स्थान व्यक्तीपरत्त्वे बदलत असते. त्यापैकीच ही काही खास उदाहरणे!

==========

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रयशक्ती-

म्हणजे वस्तू विकत घेण्याची क्षमता!
तुम्हाला बहुदा कार्यशक्ती म्हणायचे असावे.

आत अगेली काही वर्षे भारतातच!

आता अगेली!

मागच्या दोन तीन दिवसांपासूनच या प्रकारच्या चुका लेखन करताना माझ्याकडूनही होत आहेत.
मागच्या शब्दाचा स्वर पुढच्या शब्दाच्या सुरूवातीस लागणे.
काय कारण असावे?

बिच्चार्‍या बाया,बिच्चारे नवरे..
यांना सावित्रीबाई फुले वाचायला द्यायला पाहिजे म्हणजे खरे सहजिवन दांपत्य जिवन काय असते व कसे असायला हवे ते समजेल.

छान लिहिलेय, मीही माझ्या आजूबाजूला खूप अशी उदाहरणे पाहिलीत.

साती क्रोममुळे माझ्या हातूनसुद्धया अशा चूका होतात आणि त्यानिस्तरायला गेले कि अजून भरपूर जंक तयार होते. भीक नको कुत्रे आवर अशी स्थिती होते, त्यामुळे कि कित्येकदा चूक तशीच रेटते.

बेफीजी, आवडले लिखाण .

निदान आजच्या काही स्त्रियांसंबंधीच्या प्रश्नांना मुर्त स्वरूप तरी दिलेत. असो यापेक्षा भयंकर परिस्थिती आहे.

बेफि, तूम्ही वाचला असेलही कदाचित, गेल्या वर्षीच्या एका दिवाळी अंकात ( बहुतेक म.टा. ) पितृसत्ताक कुटुंबपद्धती चा प्रयोग, जो आपण गेली किमान ४००० वर्षे करतो आहोत, तो अयशस्वी ठरल्याचे आता लक्षात आले आहे, अश्या आशयाचा एक लेख होता. नसला वाचलात तर अवश्य वाचा.

हम्म, बाकीच्या उदाहरणांबाबत काही बदल शक्य होईल का ते माहीत नाही पण नेहाबाबत काही प्रश्न पडले.

नेहा उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. नोकरीचे स्वरुप पाहता उत्तम कमवत असावी. तिने दोन्ही वेळच्या स्वयंपाकाला बाई का ठेवली नाही ? नवरा आणि सासरे घरी असतात म्हणजे बाई तिच्या सोयीनुसार येऊन स्वयंपाक करुन जाऊ शकेल. सकाळचा वेळ तिला वॉक घेण्यासाठी, वा आरामात उठून आवरुन तयार होण्यासाठी वापरता येईल.

सासर्‍यांचे टोमणेही का सहन करते ते कळले नाही. एखाद्याला बोलण्याची सवयच असेल तर दुर्लक्षच करावे लागते शेवटी. वाद किती घालणार ! पण एकंदरीत त्यांचे चुकीचे वागणे गप्प बसून सहन करत राहावे अशा परिस्थितीत ती नक्कीच नाही.

नेहा उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. नोकरीचे स्वरुप पाहता उत्तम कमवत असावी. तिने दोन्ही वेळच्या स्वयंपाकाला बाई का ठेवली नाही ? नवरा आणि सासरे घरी असतात म्हणजे बाई तिच्या सोयीनुसार येऊन स्वयंपाक करुन जाऊ शकेल. सकाळचा वेळ तिला वॉक घेण्यासाठी, वा आरामात उठून आवरुन तयार होण्यासाठी वापरता येईल.

सासर्‍यांचे टोमणेही का सहन करते ते कळले नाही. एखाद्याला बोलण्याची सवयच असेल तर दुर्लक्षच करावे लागतेशेवटी. वाद किती घालणार ! पण एकंदरीत त्यांचे चुकीचे वागणे गप्प बसून सहन करत राहावे अशा परिस्थितीत ती नक्कीच नाही........<+११११

मला वाटत माधवीने घटस्फोट घ्यावा
कशाला सहन करायचं नवऱ्याच हे असलं वागण
सगळ आयुष्य तर गेलच ,किमान आता तरी तिने स्वतःसाठी जगावं......

अगो, नेमके लिहिलेत. नेहाच्या स्वभावात हेच दोष आहेत. ती कमी बोलणारी आणि सोशिक आहे. बाई लावायला घरचे तयार होत नाहीत. मध्यंतरी पोळ्यांसाठी बाई लावण्याचा प्रकार करून झाला पण तो अयशस्वी ठरला. ती एकटी राहू शकते असे सगळेच म्हणतात पण तिला वेगळेही व्हायचे नाही आहे. ह्यामागे तिचे मानसिक बळ कमी असणे व इतर कारणे आहेत.

मनाली, आयुष्याच्या ह्या पातळीला घटस्फोट घेण्याचा विचार लोक करू शकतात की नाही हे माहीत नाही. मला वाटते करू शकत नसावेत.

दिनेश - धन्यवाद! विषय भारी वाटला तुम्ही लिहिलेला. जमेल तसे नक्की वाचेन.

नेहाच्या बाबतीत समुपदेशाने घरच्यांमध्ये फरक पडु शकेल काय?
एकटी सर्व करते, घरात एकतर्फी टोमणे नकोत, प्रेमाचे शब्द हवेत, स्वयंपाकीणीची गरज .. या सहज दिसणार्‍या गोष्टी आहेत.

ती एकटी राहू शकते असे सगळेच म्हणतात पण तिला वेगळेही व्हायचे नाही आहे. >>> हे समजू शकते. एकटं राहणे हा टोकाचा निर्णय आहे. सगळ्यांनाच शक्य होईल असे नाही. वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळी कारणे असू शकतात.

तिच्या सोशिक स्वभावामुळे घरचे फायदा घेत आहेत हे तर स्पष्टच दिसते आहे. तरीही तिने मनात आणले तर तर परिस्थिती बदलणे सहज शक्य आहे. स्वभाव, वागणे कायमस्वरुपी बदलायची गरज नाही. स्वभावाविरुद्ध जाणे इतके सोपेही नाही. फक्त एकदा ठामपणे निर्णय सांगता यायला हवे. नेहाची केस वाचून हताश वाटले एवढे खरे !

तिने मनात आणले तर >> यातच खरी गोम आहे.. झोपलेल्याला उठवता येत पण ज्याने झोपल्याच सोंग घेतल आहे त्याला कस उठवणार ? माझ्यामते security या गोष्टीसाठी बर्‍याच जणी त्यांच्या नवर्‍याला सासर मंडळींना झेलत असतात अस मला वाटत.. भरीस भर माहेरच्यांनी पन सपोर्ट काढून टाकला तर मुळात घाबरट असलेल्या त्या इतके मोठाले डिसिजन घेउ शकत नाही.. वेगळे झाल्यानंतर फेस करावे लागणारे चॅलेंजेस यांना आधीच मारुन टाकतात मग काय डोंबल्याचे डिसिजन घेणार..

माझ्यामते security या गोष्टीसाठी बर्‍याच जणी त्यांच्या नवर्‍याला सासर मंडळींना झेलत असतात अस मला वाटत. >>> तिला जाऊ देणे तिच्या सासरच्यांनाच परवडणारे नाही. ह्याची जाणीव दोन्ही पार्टींना करुन द्यायला पाहिजे मात्र !

बेफिकीर ह्यांचा हेतू केवळ निरीक्षणे नोंदवण्याचा असावा त्यामुळे ह्या विषयावर हेमाशेपो Happy

चांगला लेख बेफिकीर! दिनेशदा म्हणतात त्या विषयावर एक लेख नुकताच लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत आला होता. सापडला तर दुवा देते.

माझे फेसबुकवरील मित्र यान्नी सान्गीत्ल्याप्रमाणे हा लेख वाचला. त्यान्नी इथे लेख छान आहे असे लिहायला सान्गीतले आहे. त्याबद्दल मी गटगकर या मित्राचे आभार मानतो. व हा लेख छान आहे.

चांगला लेख.

नेहाच्या सासऱ्यांचा राग येतो, एवढी सून करते तर चार शब्द प्रेमाचे बोलता येत नाहीत का. माधवीने फार सहन केलं. नेत्रा सोन्याच्या पिंजऱ्यात राहतेय.

छान लिहिलय.

पण हे व्यक्ती तितक्या प्रकॄती ह्या प्रमाणे आहे. वरील स्त्रीया दिसतात त्याच प्रमाणे सगळं घर स्वतःच्या इशार्‍यावर चालवणार्‍या पण दिसतात. माझ्या माहितीत एक बाई आहेत. त्यांचा घरावर येवढा पगडा आहे की बास !!!

ही सगळी उदाहरणे अन-बॅलन्स्ड रेलेशन्स ची आहेत. अशी अनेक घरं आपल्याला दिसतात. पण त्या संबंधांना बॅलन्स्ड म्हणता येत नाही.

इकडे कोण चूक कोण बरोबर हे त्या त्या परिस्थीतीवर आहे.

नेहा आर्थिक द्रुष्ट्या स्वतंत्र आहे, पण मुळातच तिचा स्वभाव कणखर किंवा तोडुन टाकायचा नसेल तर तिच्या कडुन सासर्‍यांना दुखवणारी क्रुती होणारच नाही. कारण तो तिचा स्वभाव नाही. नवरा तर आधीच आजारी आहे. प्रेमळ आहे. तिचंही त्याच्यावर प्रेम असावं. मग तर मार्गच खुंटला. कारण तसे पहाता त्याचा काही च दोष नाही. पदरी पडलं पवित्र झालं असे ती म्हणत असणार. बाई ठेवली तर घरात जे संघर्ष होतील त्यांना तिलाच तोंड द्यावे लागेल. म्हणजे रोजची अशांतता!!!! हे तिने करुन पाहिले असणार वा हा विचार तिच्या मनात नक्की आला असणार. पण एकंदर सासर्‍यांचा तोरा पहाता ही व्यवस्था यशस्वी होणार नाही. सासरे आज नाही उद्या थकतिल. तेंव्हा बघु. हा सुज्ञ विचार ... भले तो जगाच्या द्रुष्टीने चुकीचा असेल, तिने केला असावा.

बाकी नेत्रा किंवा सोनल हे टिपिकल उदाहरण आहे. ज्यांना स्वतःची ओळख नाही. त्यांच अपब्रिंगिंग च तसं झालेल आहे. कारण बायकांनी इतर काही करायचे असतं हे त्यांच्या गावी नाही. वेगळी ओळख मिळवायची त्यांची तयारी नाही. त्यांनी कधी प्रयत्नच केलेले नाहीत. इकडे दोश कोणाचाच नाही. कारण ही सुरक्षितता ही त्यांची गरज आहे. बंडखोरी करुन वा प्रयत्न करुन वेगळे अस्तित्व ठसवण्या साठी जी मानसिक ताकद लागते ती त्यांच्यात नाही. मुळात ती व्यक्ति जर ह्या व्यवस्थेबद्दल तक्रार करत नसेल तर आपण कोण बोलणारे !!! साधारण घरच्या बिझनेस मधे मदत करणार्‍या बायका खुप असतात. पण त्यासाठी त्यांचीही बाहेर वावरण्याची तयारी लागते.
मी ज्या उद्योग समुहात काम करत होते तिकडे तर घरच्या एका सुनेकडे कंपनीच्या कॅश चे व्यवहार होते. तिला दाखवल्या शिवाय पाच रुपये पण सुटत नसत. अगदी नवरा व दिर ही तिच्या विरुध्ध जात नाहीत. ते घराणं तर वरील सगळ्या घराण्यांपेक्षा अति अति श्रीमंत आहे. पण तिच दुसरी सून काहीही करत नसे. नुसती श्रीमंत नवर्‍याची गुडी गुडी बायको. म्हणजे हे त्या त्या व्यक्तिवर अवलंबुन आहे.

माधवी च्या बाबतित तिला फसवले आहे तिच्या सासरच्यांनी !!! ते तिचे अपराधी आहेत. ते तिच्याशी चांगल वागतात ते उपकार नाही. तिने तिच्या परीने विरोध केला. कदाचित घटस्पोट घेण्या येवढे आर्थिक स्वातंत्र्य तिच्या कडे नसावं. हे ही उदाहरण खुप वेळा दिसणारं.

माझ्या जवळ्च्या नात्यात एकदम उलटे उदाहरण आहे. नवर्‍याने कंटाळा आला म्हणुन ३५ वयाचा असताना नोकरी सोडली. घरची बरीच प्रॉपर्टी. दुकान. बायकोच्या वडिलांचे उत्पन्न खुपच चांगले. बायको तिच्या वडिलांची एकटीच लेक. आई नाही. बायकोचे वडिल नियमीत पैसे देतात. नवरा काहीही करत नाही. बायको छोटेसे दुकान चालवते. मिळणारे भाडे, व सासर्‍यांचा पैसा. ह्यावर गाडे चालु आहे. इकडे तो एकदम कर्तुत्व हीन आहे. काही करावे हे त्याला वाटतच नाही. बायकोही फारशी उमेदीची नाही. पण गाडे चालु आहे.

<< कदाचित घटस्पोट घेण्या येवढे आर्थिक स्वातंत्र्य तिच्या कडे नसावं. हे ही उदाहरण खुप वेळा दिसणारं. >>
------- आर्थिक स्वातन्त्र्य सोबतच समाजात सुरक्षित रहाणे हे पण तेव्हढेच महत्वाचे आहे. परिस्थिती खुप आव्हानात्मक असते आणि स्त्री खुप मनाने खम्बिर असायला हवी...

चांगला लेख. आजुबाजुला बरीच उदहरणे पाहिलीत अशी वेगवेगळी.

मागच्या दोन तीन दिवसांपासूनच या प्रकारच्या चुका लेखन करताना माझ्याकडूनही होत आहेत.
मागच्या शब्दाचा स्वर पुढच्या शब्दाच्या सुरूवातीस लागणे.
काय कारण असावे?>>>>>>>>>>> क्रोम.

मोहन की मीरा छान लिहिलंय.
आपण आपल्या दृष्टीकोनातून बघतो आणि हे चूक ते बरोबर म्हणु लागतो. ते अनेकदा तसे असेलही पण अनेकदा तसे नसते सुद्धा. या परिस्थीतीत आपण काय केले असते असा सहज विचार येतो. पण त्या व्यक्तीची आवड/नावड, तिचा स्वभाव, तिच्या खुबी आणि कमजोरी इत्यादि विचार करता आहे त्या परिस्थितीत तिचा निर्णय योग्य सुद्धा असू शकतो.

या विषयाचे आणखी काही पैलू

१. स्त्रीचा मूळ स्वभाव भित्रा असतो. त्यामुळे त्याना प्रोत्साहन दिले आणी "मी आहे पाठीशी , तू कर्त्रुत्व दाखवत रहा " असे पाठ्बळ दिले तर ९० % स्त्रिया उत्तम कार्य करू शकतात.
२. मुळात आपण काही करावे असे खूपश्या स्त्रियानाच वटत नाही.

३. वरील लेखातील उदाहरणान्मध्ल्या सोन्याच्या पिन्जर्यातील स्त्रियान्च्या या स्थितीला त्यान्च्या वरील (माहेरचे देखील) सन्स्कार जबाबदार असतात असे माझे वैयक्तीक मत आहे. "दिल धदकने दो" मधली प्रियन्काची व्यक्तीरेखा पहा , तिच्या आइ बापाचे त्याबाबतचे वागणे हे या व्रुत्तीचे "representation" करतात.
४. व्रुद्ध आइ-वडिलाना "कशाला या वयात विवन्चना !" असा विचार करूनही महिला मानसिक अत्याचार सहन करत असाव्यात.
५. कोउटुम्बिक जबाबदार्या वाहायला लागणारी मानसिकता कित्येक पुरुषान्मधे नसते . (यात २ "catagories" असतात,,१ घाबरट आणी २ फुलपाखरू व्रुत्तीचे )त्यानी लग्न करण्याच्या भानगडीत न पड लेले बरे!

स्त्रीचा मूळ स्वभाव भित्रा असतो. >>>>

खरच ?

त्यामुळे त्याना प्रोत्साहन दिले आणी "मी आहे पाठीशी , तू कर्त्रुत्व दाखवत रहा " असे पाठ्बळ दिले तर ९० % स्त्रिया उत्तम कार्य करू शकतात.>>>>>

वॉव!!! टिपिकल विचार !!! कोणाच्याही मागे कोणीतरी उभेच रहायला लागते ? खरच?

खुपच उथळ वाक्य.

मी आहे पाठीशी , तू कर्त्रुत्व दाखवत रहा " असे पाठ्बळ दिले तर ९० % स्त्रिया उत्तम कार्य करू शकतात.>>>>> अच्छा, म्हणुनच प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते अशी म्हण तयार झालीय, पण अजुन प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे एक पुरुष असतो अस कुणी कधी म्हनाही/लिहिलेल ऐकल नाही/वाचल नाही.

Pages