इंस्टंट माहेर

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

गेल्या आठवड्यात अचानकच हार्टफर्डला भावाकडे जायचा योग आला. माझा अमेरिकेतला सर्वात जवळचा- अंतराने आणि मनाने- नातेवाईक. त्याने लग्नानंतर यंदा प्रथमच गणपती बसवला आहे. माझ्या वहिनीने अगदी दगडुशेठचे चित्र समोर ठेऊन घरी मूर्ती बनवली आहे. त्यांच्या गणपतीचे दर्शन घ्यायचेच होते. शिवाय माझा किडक्या दातांच्या बाईबरोबर सकाळी-सकाळी interview होता. मग आम्ही सगळेच आदल्या दिवशी हार्टफर्डला गेलो. संध्याकाळी निघतो म्हणेतो आठ वाजले निघायला. ९५ ची डागडुजी काढलीये, रात्रीचं काम सुरु होतं त्यामूळे दोन-तीन वेळा रहदारीत अडकलो. पोचायला बराच उशीर झाला. भावाला आणि वहिनीला जेऊन घ्या सांगितले होते. तरी ते वाट बघत थांबलेच.

भावाचे लग्न झाल्यापासून सगळेच कसे बदलले आहे. त्याच्या लग्नाआधी आम्ही जायचो तेव्हा इशानचे खाण्या-पिण्याचे तर न्यावे लागायचेच पण भावासाठी पण काहीतरी करुन न्यायचे. त्याबरोबर डिस्पोजेबल ताटं/वाट्या/चमचे/पेले आणि अगदी पेपरटावेल्स पण न्यायचे. ह्यावेळेस जायचे ठरले तेव्हा मी सवयीने सर्व तयारी केली. रहायला जायचे म्हणून उशा/चादरी पण नेल्या. पण तिथे पोचल्यापासून कसा अगदी 'पाट बसायला..ताट जेवायला' असा थाट होता. वहिनी माझी पोलिश आहे. पण तिने खपून छोले, नारळाची चटणी, जीरा राइस, सायोच्या मलई बर्फी कृतीने पेढे असा बेत केला होता. स्वच्छ बाथरुममधे स्वच्छ धुतलेले टावेल्स घडी करुन ठेवले होते. आमच्यासाठी गादी घालुन तयार होती. सकाळी आवरुन येईपर्यंत नाष्टा टेबलवर वाट बघत होता.

एरवी इशानला पाळणाघरात सोडुन माझी मी कुठे जायचे ते गेले असते. आज मात्र डाउनटाउनमधे सकाळी कुठे पार्किंग मिळणार, आता मला हार्टफर्ड सवयीचं नाही इ. म्हणून वहिनी मला सोडवायला आली. त्यांच्या घरापासून अर्ध्या तासाचं तरी ड्राइव्ह आहे. इंटरव्यु अपेक्षेपेक्षा लवकरच संपला (किडक्या दातांच्या बाईशी कितीवेळ बोलणार :अओ:). मग घाई घाई घ्यायला आली.

वहिनीला माझ्या वेगवेगळे फ्रूट स्प्रेड्स बनवायची फार आवड आहे. सारखे काही न काही विणकाम पण सुरु असते. माझ्या गाडीतल्या गणपतीसाठी आसन विणले आहे. निघताना ते आसन, २-३ प्रकारचे स्प्रेड्स, पेढे असे काय काय बांधुन दिले. आईची आठवण झाली. आईकडे गेले की काही हवे आहे म्हणावे लागत नाही. मी भारतात पोचायच्या २-३ दिवस आधीच ताजे मसाले, भाजणी असे काय काय तयार असते. आता आईकडे माहेरपणाला जायचे झाले तर अजून वर्षभर तरी वाट बघावी लागेल. पण काल अगदीच ध्यानी मनी नसता भावाकडे माहेरपणाचे सूख अनुभवुन आले. परत येताना विचार करत होते, 'हे बरंय, आता माहेरी जावसं वाटलं की हे आहेच माझं इंस्टंट माहेर' Happy

प्रकार: 

<< वहिनी माझी पोलिश आहे. >> मी चुकून पोलीस वाचलं Light 1

मस्त लिहीलय. किती बरं वाटत ना अशी नाती सांभाळली गेल्यावर. Happy

मस्त लिहीलेस गं!
माझेही इथे २-२ इन्स्टन्ट माहेर आहेत...
एक तर अगदी कोपर्‍यावर असल्याने व ती बहीण आईसारखीच प्रेमाने करते सगळे, त्यामुळे फार बरे वाटते...

हेहे आशू, तसं असतं तर अजुन छान वाटले असते! पण माझ्या बाबतीत तरी मी दोन्ही घरांत शेंडेफळ आहे..
त्यामुळे दुसर्‍याचे लाड करण्यापेक्षा लाड करून घ्यायचीच वेळ जास्त येते.. Happy

अस्सं माहेर इंन्स्टंट बाई सगळ्यांना मिळावं...
मस्तं...
नुक्तीच माझी एक हॉस्पिटलवारी झाली. काळजी वाटून भाऊ भारतातलं सगळं हातातलं सांडून पळत आला सिडनीला.
दोन आठवडे होता... बरोबर मला आवडतं ते काय काय घेऊन आला होता. होता तेव्हा किती काम केलन त्याला सुमार नाही... माझ्यासारखीच त्याला घरातली कामं "दिसतात"... सांगायला लागत नाहीत. (ही माझ्या वहिनीने लावलेली सवय हं).
घरातल्या घरात माहेर म्हणजे काय ते कळलं, दोन आठवडे.
काही नाती अशी रक्ताची... काही तुझ्यासारखीला लाभलेली हक्काची... सुंदरच! आपण भाग्यवान नै?

छान लिहिलंय! तू नशिबवान आहेसच अशी भाऊ/वहिनी मिळाल्याबद्दल पण तेसुद्धा नशिबवान आहेत तुझ्यासारखी appreciate करणारी, नात्याची जाण असणारी बहिण असल्याबद्दल. Happy

मस्त. नशिबवान आहेस.
मला वाटतं दूरदेशी ज्याना असं माहेर नाही त्या मैत्रिणीनीच इकमेकींचं माहेरपण करावं. म्हणजे मैत्रिणीला बोलावून एखाद्या दिवशी पूर्ण आराम द्यावा.

झेलम , अगदी मस्त कल्पना. मी एक दोन नात्यातल्या बायकांना माझ्या घरात 'लक्ष्मणरेखा' घालून देते. ओटा, फ्रीझ , डिशवॉशर, पँट्री , ओव्हन , मायक्रोवेव्ह , ग्रिल या कशाही जवळ जायचं नाही . टेबलच्या भोवती किंवा घरात इतर कुठेही जायला हरकत नाही . अगदी पाणी किंवा काही ड्रिंक हवं असलं तरी मी किंवा नवरा देतो! खरं तर त्यांच्या हातचा वरणभात सुद्धा ओरपून खाईन मी, पण माझ्या घरी आल्यावर त्यांना सुट्टी!!

धन्यवाद सगळ्यांना Happy शोनु, अगदी. मी पण घरी मैत्रिणींपैकी कोणी आले की सहसा काही करु देत नाही. एरवी आपल्या घरी असतातच कामं. तशी माझी पण हक्काची घरं आहेत जिथे गेल्या गेल्या चहा टाक, आलं जरा सढळ हाताने घाल अशा ऑर्डरी देता येतात Happy

सिंडे, छान लिहिलं आहेस. अगदी मनापासून भारावून! Happy

तू पण माझं 'अचानक माहेरपण' मस्तं केलं होतंस! हातात जेवण, चहाचा कप, आयता घातलेला बिछाना आणि पोटभर गप्पा, सगळं मिळालं! माहेरपण म्हणजे दुसरं काय?

मस्त लेख सिंडे!! आत्ता शांतपणे वाचला!!
माझी खरतर मज्जा आहे. सायो म्हणते त्याप्रमाणे ड्ब्बल्ल माहेर आहे इकडे. Happy आणि गेले की माहेरपण अनुभवतेच नेहमी! Happy

अगदी परवाचाच अनुभव सांगायचा तर गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी माझा मुक्काम सायोकडे होता. चुलत बहीण पण आलेली तिकडे. मी आरामात लॅपटॉपला चिकटलेले आणि ह्या दोघींनी मस्त पैकी चहा, पाणी, जेवण, ब्रेफा वगैरे करून वाढलं! कॉन्फरन्स कॉलवर काम (ते कमी अन गप्पाटप्पा जास्त) करत असताना मधेच चिठ्ठी लिहून प्रश्ण विचारणं, काम करत असतानाचे फोटो काढणं (थँक्स टू दादा....), अधून मधून सटर- फटर भरवणं असले भरपूर लाड केले. Happy

पण नंतर नवर्‍यालाच सगळं क्रेडीट .. मानलं तूला, तू म्हणून सांभाळतोस आमच्या बहीणीला .. असलं काहितरी. Uhoh रात्री घरी भारतात फोन झाला तर आई-बाबांना सांगत होते की हिच लक्षच नाही मुलाकडे..तो हडकूळलाय .. बिचारा नवरा केवढा बारीक झालाय..नवरा येतो ऑफिसहून अन स्वयंपाकाचं बघतो... सगळा टीपी नुसता ..

खरे खूप सुन्दर. अशी वहीनी मिळायला भाग्य लागते. कालच मी रात्री मैत्रीणी कडे गेले होते. ती स्वयंपाक करत होती तेन्वा गप्पा मारता मारता तिची तीन दिवसाची भांडी घासून दिली. वहिनी साहेबांना गोड धन्यवाद. काही काही लोकं जगात नुसती असली तरी जीवन मस्त होते आपले. त्यातलीच ती एक. भाउराया लकी आहे. माझी नणंद पण अशीच आहे. गोड स्वभावाची.

मस्त आहे तुझं इंस्टंट माहेर, पण मी खात्रीने सांगु शकीन की तु ही तेव्हढ्याच प्रेमाने तुझ्या वहिनीचं आगतस्वागत करशिल. Happy तुझ्या लेखांवरुन तुझ्या स्वभावाचा अंदाज येतो. मस्त लिहिलाय लेख, आणि सगळ्यांच्या प्रतिक्रीया पण छान.
धनु.

मस्त. Happy
पण मीच एकटा बाप्प्या दिसतो आहे इथे. सार्‍या सासुरवाशिणी कशा अगदी माहेरपणासाठी आल्यागत इंस्टंटली जमल्यात एकाच पानावर. Proud

वहिनीसाहेब खरच प्रेमळ आहेत........आणि मोठ्या मनाच्याही........अगदी तुझ्यासारख्या!!!

Pages