तेवढ़यासाठी तिच्या गावीच जावे ...

Submitted by सुप्रिया जाधव. on 29 February, 2016 - 09:57

जाणिवांचे लख्ख ताजे ऊन यावे
संभ्रमांच्या सावल्यांनी गुदमरावे

घेतला हातात त्याने हात माझा
वाटले की त्याक्षणी अदृश्य व्हावे

स्पंदनांचा वाढतो एकेक ठोका
वेगळे याहूनही का आठवावे ?

लावला बुक्का कपाळावर विठूचा
फ़क्त त्याचे फ़क्त त्याचे गीत गावे

वेदना कळणार नाही अंतराहुन
तेवढ़यासाठी तिच्या गावीच जावे

जर तिचे माझ्याविना कोणीच नाही
यातनेने बोट कोणाचे धरावे ?

दुःख कुंतीचे मिळाले भाग्य माझे
श्रेय हे कुंतीस की कृष्णास दयावे ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users