'स्मरणे गोनीदांची' - 'मागे परतोनि पाहे' - श्रीमती वीणा देव

Submitted by संयोजक on 29 February, 2016 - 12:38

gonida - 2.JPG

आप्पा,

कल्पनेच्याही पल्याड गेलेल्या तुमच्या स्मृती क्षणाक्षणाला मनात दाटून येत आहेत. तुमचं हसणं, बोलणं, रागावणं सतत कामात असूनही सगळीकडे लक्ष असणं अन् सगळ्यांची काळजी करणं, असं किती किती. तसं हे सगळं सगळ्यांमध्ये असतंच. पण ह्या सगळ्याला खास तुमचा असा रंग होता.

आता तुमचं अन् माझंच बघा ना!... बत्तीस वर्षांचं अंतर होतं आपल्यात. पण किती रंग होते आपल्या नात्याला. बापलेकीच्या नात्याचे. मैत्रीचे. सल्ला देणाइतपत बरोबरीचे. साहित्याच्या, संगीताच्या आवडीचे. निसर्गाच्या मैत्रीचे. अन् तरीही तुमचं पित्याचं हृदय वत्सलतेनं सतत अधिक वर डोकावत असायचं. पण नुसतं पित्याचं तरी का म्हणू? तुमच्या मनात स्त्रीसुलभ असा एक हळुवार कप्पा होता. त्यामुळं तुम्ही मला आईनं जपावं, तसंही जपत होतात.

तुमचं मन हळुवार. मोकळं. मनात येईल ते व्यक्त करायचा स्वभाव. त्यामुळं तुमचं अन माझं अधिक जुळलं. त्या अर्थानं मी 'वडिलांची मुलगी'च.

तुमच्या स्नेहाच्या पहिल्या आठवणी आहेत, त्या खोकल्यानं त्रासलेल्या रात्रींच्या. डांग्याखोकला झाला होता मला. जीवघेणी ढास लागली, की आईच्या बरोबरीनं तुमची घालमेल व्हायची. तुम्ही कळवळून पाठीवर हात फिरवत राहायचात माझ्या. माझ्या डोळ्यात खोकून-खोकून पाणी आलं, की तुमचेही डोळे भरून यायचे. एखाद्या कोकरागत बिलगायची मी तुम्हांला. तुम्ही खांद्यावर उचलून डॉक्टरकडे न्यायचेत मला. त्यांच्यापाशी माझ्या त्रासाचं असं वर्णन करायचात, की जणू तो त्रास तुम्ही स्वतःही सोसला आहे.

एकदा स्टेशनवर लोकलची वाट पाहात उभे होतो. ऊन खूप होतं. सावलीला झाड नव्हतं. लहानगी मी तुमच्याबरोबर होते. म्हणालात,

'राजी, तू माझ्या पुढ्यात उभी राहा. माझ्या सावलीत.'

मग माझं डोकं आपल्या नेहरूशर्टाच्या पुढल्या पाख्यानं झाकलंत अन् अंगाच्या सावलीत ओढून घेतलंत. डोळ्यांवर येणार्‍या त्या शर्टाच्या खालून, गाडी कधी येतेय, म्हणून मी वाकून पाहत उभी अन् तुम्ही मला ऊन लागू नये, म्हणून निश्चल खांबासारखे उभे.

आपण कोकणात गेलो होतो एकदा. कुठंतरी चालत बागांमधून. वाटेत कोणी ओळखीचा माणूस भेटला. नमस्कार-चमत्कार झाल्यावर तुम्ही त्यांना विचारलंत,

'कुठं निघालात?'
तर त्यांनी सांगितलं,
'ती अमक्या तमक्यांची लेक गेली, त्यांना भेटायला निघालो.'
'कशानं ?' म्हणून तुम्ही विचारलंत, तर त्यांनी सांगितलं की,
'साप चावून गेली.'
'केवढी होती?'
ते म्हणाले,
'ह्या तुमच्या लेकीएवढी.'

बोलणं तिथंच थांबलं. तुम्ही गप्प झालात.

त्या क्षणाला तुम्ही मला जवळ घेतलंत अन् घट्ट धरून ठेवलंत, तो मुक्कामावर पोहोचेपर्यंत. तुमची कातरता मला स्पष्ट जाणवत होती त्या स्पर्शातून.

तुम्हांला आठवतं? सातआठ वर्षांची असेन मी त्या वेळेला. दिवस उन्हाळ्याचे होते. खरं तर, तळेगावची हवा थंड. पण तुम्हांला तीही मोकळी हवी असायची. आणि त्यासाठी तुम्ही आपल्या पत्र्यावर झोपायला जायचात. एकटेच बहुधा. मला काही नेत नव्हतात वर. मी आपली आईजवळ उबेत झोपायची.

एक दिवस सकाळी येउन मला म्हणालात,
'राजी, बघा तर एकदा वर येउन काय मज्जा असते!'

आईचे कान होतेच तुमच्या बोलण्याकडे. ती म्हणाली,
'हे पहा, तुम्ही जाताय, तेवढं पुरे. तिला आणि वर नेऊ नका. एक तर पत्रे उतरते आहेत. पन्हाळीचे आहेत. चढणं अवघड आहे.'

तेव्हा तिचं ऐकून घेतलंत तुम्ही. पण नंतर एक दिवस हळूच म्हणालात,
'तुला यायचंय वरती? चल.मी घेऊन जातो.'

मी खूश झाले. मग म्हणालात,
' हे बघ. मी पुढं जाईन. तू तसं मागोमाग चढायचं.'

मला खूप गंमत वाटली.

दोन फूट अंतरावर असलेल्या दोन भिंतींच्या विटांवर पाय देत-देत एका उतरत्या पत्र्याच्या टोकावर जायचं अन् मग आमच्या घराच्या उतरत्या पत्र्यावर. अवघड होतं. पण मी अगदी तुमच्या पावलावर पाऊल टाकून चढले. वर तुम्ही अंथरुण घातलेलं होतं. खालचा पत्रा टोचू नये, अशी खबरदारी घेतली होतीत. आणि भरपूर गोधड्याही आणल्या होत्या पांघरायला. त्या पत्र्यावर चालताना होणारा पायांचा आवाज, अंथरुणावर उतरतं झोपणं, त्या सगळ्याची गंमत वाटत होती मला. तो माझ्या उत्साहाचा भर जिरू दिलात तुम्ही अन् म्हणालात,
'राजी, इथं का आणलं तुला ठाऊक आहे? तुला मोकळी हवा मिळेल थंड. भल्याभल्याना हेवा वाटेल, अशी. वर आकाशाचं छत. ते किती पाहशील? डोळे भरून. हे बघायला पैसे पडत नाहीत. हवं तेवढं साठव डोळ्यांत. हा चंद्राचा प्रकाश कसा झरतोय, पाहिलंस? चान्दण्यांचं झळाळणं? हे सगळं शीतलपण फार सुंदर आहे, गं! आणि ती पिंपळाची सळसळ ऐकलीस?'

तुम्ही बोलत होतात, तसतसं मला एकेक जाणवत होतं. खूप खूप सुखावून मी झोपी गेले.

जागी झाले, तेव्हा तुमचा हात माझ्या अंगावर होता. उतरत्या, अरुंद पत्र्याचं भान सुटलं नव्हतं तुमचं.

तुम्हांला माझी ख़ुशी पाहून किती आनंद झाला होता, आप्पा!

एकदा आपण कुठंतरी प्रवासाला निघालो होतो. तुम्ही, मी आणि विजय. कारनं जात होतो. बराच वेळ झाला आणि मी कंटाळले. तुम्ही पुढं बसला होतात. अन् आम्ही दोघे मागे. मी जरा पहुडते म्हटलं. प्रवासात असं झोपायची माझी सवय तुम्हांला ठाऊक होती. मी आडवी होणार, तेव्हढ्यात तुम्ही म्हणालात,
'राजी, रस्त्याच्या बाजूला डोकं नको, पाय करा.'

तुमच्या त्या तत्पर सूचनेचं त्या क्षणी एवढं काही वाटलं नव्हतं. पण मग जाणवलं की, शेजारून जाणा-या गाडीनं धक्का दिलाच, तर? अशी भीती तुमच्या मनात होती, म्हणून मला असं सुचवून तुम्ही खास तुमच्या पद्धतीनं काळजी केलीत, हो ना?

मुंबईला मी एकटी निघाले, की तुम्हांला खूप काळजी वाटायची. अगदी माझं लग्न झाल्यावरही. किंबहुना अखेरपर्यंत. लग्नानंतर काही वर्षं आमची आर्थिक चणचण असायची. तरीही सर्व धावपळ करीत होतोच. तर मुंबईला जाताना तुम्ही हळूच माझ्या हातात पैसे द्यायचात. माझ्या नकाराला मुळीच न जुमानता मुठीत नोटा ठेवताना हळूच म्हणायचात,
'राजी, दगदग करू नका, टॅक्सीने जात जा.'

मग जरा वेळाने आवर्जून सूचना द्यायाचात,
'आणि एखादा म्हातारा शीख बघून टॅक्सीत बसा.'

आता, आप्पा, मुंबईत नशिबाला येईल ती टॅक्सी घ्यावी लागते, हे तुम्हांला माहीत नव्हतं का? पण हे सुचवल्याशिवाय राहवायाचं नाही तुम्हांला.

मीही वरवर हसायची. पण तुमच्या मायेनं मन हलायचं माझं.

माझ्या आठवणी माझ्याच आहेत हे खरं आहे. पण अशी माया तुम्ही अनेकांवर केली. किती तुमच्या मानसकन्या, किती मानसपुत्र, किती गडमित्र. त्यांच्याबद्दलच्या तुमच्या खूप खूप आठवणी आहेत. तुमच्या सहवासाच्या, तुमच्या बोलण्याच्या, तुमच्या पत्रांच्या. त्यांच्या सुखदु:खात सहभागी झाल्याच्या. तुम्ही त्यांना आपुलकीनं, जिव्हाळ्यानं, प्रेमानं किती बांधून ठेवलं ह्याचा अनुभव आम्ही सारखा घेतो आहोत.

तुमचा कोणाशी लेखक म्हणून परिचय झाला, तरी लेखकपणाचं वलय घेऊन तुम्ही वागत नव्हता. त्यामुळं माणसं बिचकत नसत. तुमच्या साधेपणानं ती तुमच्या जवळ यायची. मुळात तुमच्या साहित्यातल्या व्यापक सहानुभूतीनं, उत्कटतेनं, वाचकाशी जवळीक करणा-या शैलीनं वाचकांना तुमच्यातल्या लेखकासंबंधी जवळीक वाटायची. तुमच्या व्यक्तिरेखा त्यांच्या मनात जागा मिळवायच्या, त्यातून तुमच्या वागण्यात सहजपण, जिव्हाळा. महाराष्ट्रात अन् महाराष्ट्राबाहेरही जिथं जिथं मराठी बोलली, वाचली जाते, तिथं तिथं तुमच्याशी जोडली गेलेली किती असंख्य माणसं आहेत त्याचा प्रत्यय आजवर येत होताच. पण आता तुम्ही गेल्यावर तो सर्वाधिक आला.

ह्या सगळ्यांचं तुमच्याशी असलेलं नातं खास तुमचं. त्यातल्या काहींचं आमच्याशीही नातं आहे. पण काहीजण आम्हांला परिचित, तर काही पूर्ण अपरिचित. ह्या अशा सगळ्यांना तुमच्या जाण्यानं दु:ख होईल, हे स्वाभाविक होतं.

तुम्ही शेवटचा श्वास घेतलात, एक जूनला सकाळी आठ वाजून एकोणीस मिनिटांनी. दुपारच्या आकाशवाणीवरच्या बातम्यांत सांगितलं. पण त्या वेळच्या बातम्या फार लोक ऐकत नाहीत. संध्याकाळी दूरदर्शनच्या बातम्या 'बजेट'मुळे वेळेत झाल्या नाहीत. परिणामी दुस-या दिवशी सकाळी वर्तमानपत्रातूनच बातमी ख-या अर्थाने पोचली अन् शोकमग्न माणसांचे थवेच्या थवे आपल्या घरी आले. फोन क्षणभरही रिकामा राहत नव्हता.

आप्पा, गेली जवळपास दहा वर्षं तुम्ही समाजापासून दूर होतात. घरात. पक्षाघातातून तुम्ही हळूहळू बरे झालात. पण बाहेर जाणं त्रासाचं वाटायचं तुम्हाला. लिहिणं, बोलणं, चालणं कमी झालं होतं. अगदी जवळच्या माणसांना एखादी ओळ लिहिण्याइतपतच उत्साह होता. म्हणजे ज्या माणसांना कोणत्याही कारणासाठी तुमच्यापासून दूर जायचं होतं, त्यांना संधी होती. तेरा सप्टेम्बरपासून एकतीस मेपर्यंत तर तुम्ही अगदी पडून होतात. वाचणं, ऐकणं, पाहणं सगळं अर्धबेशुद्धीमुळं दोन-अडीज महिने बंद होतं. त्यानंतर तुम्ही थोडा प्रतिसाद द्यायला लागलात. पण तो आम्हा घरच्यांना, मुख्यत: मलाच. तुमची तब्येत बघायला शेकडो लोक येऊन गेले. पण मौनाची मिठी घेऊन बसलेले तुम्हीच त्यांना दिसलात अन् हताश झाले ते. तुमच्या चैतन्यपूर्ण, आत्मीय वागण्याच्या आठवणी ते काढत अन् डोळ्यात पाणी आणत. तुमच्याकडून काहीही प्रतिसाद नसताना ज्यांना तुमच्यामागं दु:ख करावंसं वाटलं त्यांची संख्या हजारात होती. त्यातले अनेक असे होते की आमच्यापर्यंत न येता त्यांना दु:ख करता आलं असतं. आपल्याआपल्याशी. पण त्यांना राहावलंच नाही. कोणाला उपचार म्हणून येऊन जावंसं वाटावं, असं काही नव्हतं. पण तरी माणसं आली. शोकमग्न. बेचैन. उदास.

जन्माला आलेला कधी ना कधी जाणार, हे त्यांना ठाऊक होतं. अन् तुम्ही अखेरच्या प्रवासाला निघाला आहात, त्याची अनेकांना कल्पना होती. पण तरीही तुम्ही गेल्यावरचा त्यांचा शोक अस्सल होता. कारण तुमचं त्यांचं नातं तितकंच अस्सल होतं. तुमच्या उत्कट लेखनाशी होतं. पण तुमच्या लेखनातून मिळालेला आनंद, दिलासा, ऊब, दिशा, आधार ह्यांच्याशीही होतंच. त्यामुळेच तर त्यांच्या मनात तुमच्याविषयी आत्मियता निर्माण झाली अन् म्हणूनच तुमचं जाणं त्यांच्या जिव्हारी लागलं. इतकं, की कित्येकांना आम्हालाच समजावावं लागलं. त्यांचे डोळे पुसावे लागले.

अहो, लहान-मोठ्या सगळ्या वर्तमानपत्रांनी तुमच्याबद्दल किती जिव्हाळ्याने अन किती लिहिलं होतं. मृत्युलेखामध्ये एरवी झिजल्यासारखे वाटणारे शब्द, पुन्हा आपले मुळातले उत्कट भाव घेऊन हजर होते. परोपरीनं लिहिलं गेलं. अगदी तुम्ही गेल्यावर पत्रव्यवहारातही तुमची स्मरणं जागत होती.

आम्हाला आलेली पत्रं तर किती किती व्यक्त करीत आहेत! तिसेक वर्ष मी तुमच्याबरोबर साहित्यविश्वात वावरले. पण तुमच्याशी ज्यांचा फारसा प्रत्यक्ष आला नव्हता, अशा अनेक मातब्बर रसिक साहित्तिकांनि, 'आमच्या आयुष्यातून काहीतरी मोलाचे गेले', 'घरातले माणूस गेल्यासारखे वाटते', 'माझा मोठा भाऊच गमावला', 'उघडे पडल्यासारखे वाटले', 'माझा आधारवड गेला', 'ज्यांच्यामुळे आम्ही संस्कारक्षम झालो, ते आप्पाच उरले नाहीत', ' ज्यांच्या वाङ्मयानं आम्हाला अंकित करून ठेवलं, ते आप्पा गेले अन काही उमगेना झालंय ', ' माझं जीवन त्यांच्या लेखनानं श्रीमंत केलं', 'कळत नकळत ते मला घडवीत गेले' - असं म्हटलं आहे. रुढार्थानं ज्यांच्याशी प्रत्यक्ष स्नेह जुळला नव्हता, उत्कटपणे लिहिलंय. त्याना लिहिल्याशिवाय राहवलं नाही, ह्याचं मला फार वाटलं.

लेखक नसलेल्या रसिकांचीही शेकडो पत्रं आली. तुम्ही किती खोलवर पोचला होतात त्यांच्या मनांत! त्यांतल्या कितीकांशी तुमचा परिचय होता. कधी व्याख्यानाच्या निमित्तानं गेलेले असताना तुम्ही त्यांना भेटला होतात. कधी त्यांच्या घरी राहिला होतात. जेवला होतात अन् तेवढ्या छोट्याश्या वास्तव्यात त्यांच्या मनात स्थान मिळवलं होतं. दोन ओळींचं तुमचं पत्र जायचं. कधी गृहिणीच्या स्वयंपाकाचं कौतुक, कधी घरातल्या बाळाची चौकशी. कधी आजारी माणसाची काळजी. तर कधी एखाद्या तरुणाच्या अभ्यासाचं, धाडसाचं कौतुक. त्याला प्रोत्साहन देणं. कधी एखादी आनंदवार्ता आठवणीनं त्याना कळवणं. तर कधी त्यांच्या गावावरून जाताना त्यांच्या भेटीची इच्छा व्यक्त करणं. केवढा आनंद व्हायचा त्यांना तुमचं पत्र मिळाल्यावर! असंख्यांनी तुमची ती पत्रं अजून जपून ठेवली आहेत. एक मोठा लेखक आपलं स्मरण ठेवतो, आपल्याला लिहितो, लेखकपणाची झूल झुगारून आपल्याशी इतक्या जिव्हाळ्यानं संवाद साधतो, यामुळं त्यांचं तुमच्यातल्या माणूसपणावरही प्रेम जडलं. तुमचं जाणं त्यांना फार फार जाणवलंय.

त्यांच्याही कितीकिती आठवणी. तळेगावची एक माहेरवाशिण आली होती, म्हणाली, 'आप्पा रोज पोस्टातून पत्रे आणायचे ना स्वत:ची? तर त्या काळात माझे यजमान देशाच्या सीमेवर होते. अन् मी एकटी माहेरी. वीणा, आप्पा स्वत:बरोबर माझीही पत्रं आणायचे. मी पत्राची किती वाट बघत असते याची जाण होती त्यांना. इतकं मनातलं जाणणारं माणूस कसं विसरणार गं?'

एखाद्या दुर्गप्रेमी मित्राला तुमचं पत्र जायचं, 'असंच नवं नवं करीत राहा. तुमचे पराक्रम ऐकण्यासाठी मला जगले पाहिजे.' तर कधी एखाद्या जिवलगाला लिहायचेत, 'अहो, किती दिवसांत तुम्हाला पाहिले नाही . एकदा या ना!'

किती किती माणसं! त्यांची तुमच्याशी जोडली गेलेली मनं. ती जपायचा तुमचा प्रयत्न. 'अशी सरळ स्वच्छ माणसंच मला आवडतात. आता तुमचा - आमचा संबंध शेवटपर्यंत तुटायचा नाही.' - असं हे जिवाला भिडणारं लिहून अन् त्या प्रमाणे वागून वर्षानुवर्ष तुम्ही स्नेह जोडलेत, जोपासलेत. माणसांना त्यांच्या गुणदोषांसह तुम्ही स्वीकारलंत. गुणांचं कौतुक केलंत. दोषांबाबत कधी त्यांना रागावत राहिलात. पण तुमच्या सौम्य लेखणीनं. त्यांनीही तुमच्यातली वैगुण्यं स्वीकारली.

त्यांतल्या सारख्यावारख्या अभिरुचीच्या माणसांना तुम्ही एकत्र जोडत गेलात. तुमच्या जिव्हाळ्याचा गाभा अन् त्यांच्या त्यांच्या नात्यांचे स्वतंत्र पदर. ते सगळे तुमच्याशी स्वतंत्रपणे अन् गटागटानं जोडले गेलेले.

ह्याखेरीज तुमचे चाहते, ज्यांना तुमच्यात अन् तुमच्या साहित्यात अंतर दिसलं नाही, म्हणून तुमच्यावर प्रेम करणारे.

ह्या सगळ्यांच्या चेहर्‍यावरील गाढ खिन्नता. आमचं सांत्वन करताना फोटोत जाऊन बसलेल्या तुम्हाला पाहून त्यांच्या डोळ्यांत तरारलेलं पाणी अन् फुटलेले हुंदके. त्यांचं आम्हाला भेटायला येणं, पुन्हा पत्र लिहिणं, फोनही करणं - पुन्हापुन्हा त्यांना मोकळं व्हावसं वाटणं, ह्याचा अर्थ एकच ना, आप्पा, की त्यांच्या हृदयांत तुमच्यासाठी खास जागा आहे.

आप्पा, हे सगळं अनुभवते आहे, आठवते आहे. डोळ्यांतुन झरझर पाणी झरतंय, पण ते आवरते आहे. कारण एका मोठ्या लेखकाचीच नव्हे, तर एका भल्या माणसाची छाया माझ्यावर आहे. अन् त्यानं छाया दिली त्या असंख्यांचा आधार माझ्या एकटेपणाला आहे. हे माझं भाग्य आहे. अन् त्याचं कारण तुम्ही आहात.

तुमचं नसणं, 'असणं' होतंय, ते असं.

हे पावलेलं मी निवांतपणे साहून जाईन, आप्पा.

***

हा लेख 'स्मरणे गोनीदांची' व 'परतोनि पाहे' या लेखसंग्रहांतून मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित केला आहे. पुनर्मुद्रणासाठी परवानगी दिल्याबद्दल श्रीमती वीणा देव व मृण्मयी प्रकाशन यांचे मनःपूर्वक आभार.

***

लेखातील छायाचित्र श्रीमती वीणा देव यांच्या खाजगी संग्रहातून.

छायाचित्रकार - श्री. शेखर गोडबोले

हे छायाचित्र वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती वीणा देव यांचे आभार.

***

हा लेख लेखक व प्रकाशक यांच्या परवानगीशिवाय इतरत्र प्रकाशित करण्यास अनुमती नाही.

***

टंकलेखन - साधना

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा, काय मस्त आहेत या आठवणी......
या वीणाताईंबद्दल बहुतेक लिंबीच्याही आठवणी आहेत, कधीमधी बोलते ती त्याबद्दल, एकदा नीट समजुन घेतले पाहिजेत संदर्भ. Happy

सुंदर लेख.....

हा लेख इथे प्रकाशित केल्याबद्दल मायबोली प्रशासनाचे आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीसाठी संयोजकांचे खुप खुप आभार.

अगं मनीमोहोर, मला ३ तास लागले कारण माझ्याकडे मराठीत लिहिण्यासाठी चांगले सॉफ्टवेअर नाहीय याचा त्रास झाला, वेगावर खुप मर्यादा आल्या. नाहीतर हा लेख टायपायला मला तासभरच लागला असता.

फोटोमधली फॅमिली एकदम पर्फेक्ट फॅमिली आहे. पैकी त्यांच्या पत्नी सौ. निरा दांडेकर म्हणजे माउली शब्दाच मूर्तीमंत उदाहरण..

सुंदर लेख एका सुंदर नात्यावरचा. धन्यवाद साधना,मायबोली. +१
काही नाती अजुनही जोडली जात आहेतच Happy

खुप छान लेख !
अशी स्वत:च्या सावलीत आपल्याला लपेटून घेणारी माणसं जितकी असताना पुरती कळत नाहीत तेव्हढी नसताना क्षणोक्षणी उमगत जातात . शब्दात मावेनाशी होतात.
धन्यवाद ,मायबोली या सुंदर लेखासाठी .

साधना ताई मी वापरलेले सर्वात साेपे मराठी साफ्टवेयर आकृति फाँट फ्रीडम हे हाेते, आता मिळतेय का मला माहीती नाही. पण खुपच साेपे आहे ते.

सुंदर लेख! सुंदर आठवणी!
एवढ्या मेहनतीने टाईप केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

अतिशय सुरेख लेख आहे. बाप-लेकीच्या नात्यातले हळुवार पदर उलगडलेत. >>>>+११११

साधना - एवढ्या मेहनतीने टाईप केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! >>>>+११११