कधी शाप जहरी, कधी वर मिळाले

Submitted by बेफ़िकीर on 24 February, 2016 - 10:35

कधी शाप जहरी, कधी वर मिळाले
मला जे मिळाले, भयंकर मिळाले

तिने आसवे सांडली ओढणीवर
जणू आरमारास लष्कर मिळाले

तुझे अंगप्रत्यंग घामेजलेले
हवेला नवे एक अत्तर मिळाले

तुझ्या अडचणी सर्व तिसर्‍याच होत्या
सुगंधात तिसरेच उत्तर मिळाले

घरे देशदेशी, स्वतःचे न कोणी
असे आजवर खूप बेघर मिळाले

प्रवाहीपणाने किती घुसमटावे
नदी पाहिजे तर सरोवर मिळाले

करावे घरी ते घरी फक्त केले
मिळावे घरी ते घरोघर मिळाले

हवे ते मिळो ना मिळो, फक्त म्हण तू
मला जे हवे ते बरोबर मिळाले

कधी वाक्य पुरते न बोलायची जी
तिचे पत्र त्याला सविस्तर मिळाले

तहानून मी खोदली व्यर्थ सारी
मनातून एका न पाझर मिळाले

लपवले सदा जे कलेवर मिळाले
तुला फक्त माझे कलेवर मिळाले

तुझी काळजी वाटते बोलणारे
मला 'बेफिकिर' लोक जगभर मिळाले

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा...

तुझे अंगप्रत्यंग घामेजलेले
हवेला नवे एक अत्तर मिळाले

घरे देशदेशी, स्वतःचे न कोणी
असे आजवर खूप बेघर मिळाले

तहानून मी खोदली व्यर्थ सारी
मनातून एका न पाझर मिळाले

सुरेख...

कोणता शेर सांगू सर्वच एकापेक्षा एक सरस असे आहेत ! अप्रतिम,,,,,,,शब्द कमी पडतात !
खूप छान गजल,

>>>तिने आसवे सांडली ओढणीवर
जणू आरमारास लष्कर मिळाले>>>क्या बात है!

>>>तुझे अंगप्रत्यंग घामेजलेले
हवेला नवे एक अत्तर मिळाले

तुझ्या अडचणी सर्व तिसर्याच होत्या
सुगंधात तिसरेच उत्तर मिळाल>>>आहाहा..

>>>घरे देशदेशी, स्वतःचे न कोणी
असे आजवर खूप बेघर मिळाले

प्रवाहीपणाने किती घुसमटावे
नदी पाहिजे तर सरोवर मिळाले>>>बहोत खूब,बढिया!

सविस्तर,पाझर आणि मक्ताही खासंच!
क्या ब्बात है!