अ‍ॅनिमेशनच्या दुनियेत...

Submitted by मी मुक्ता.. on 16 February, 2016 - 02:46

अ‍ॅनिमेशन चित्रपट म्हणजे फक्त लहान मुलांसाठी असलेला प्रकार हा आपल्याकडचा एक सर्वसाधारण समज आहे. पण परदेशातले अ‍ॅनिमेशन चित्रपट, त्यांतील विषयांचं वैविध्यं आणि प्रगल्भता बघता कोणत्याही प्रौढाला खिळवून ठेऊ शकतील असेच हे चित्रपट आहेत. त्यातही खास उल्लेखनीय म्हणजे अमेरीकन आणि जपानी चित्रपट. आणि अजूनच स्पेसिफिकली बोलायचं झालं तर जपानमध्ये अबालवृद्धांसाठी म्हणून जे काही अ‍ॅनिमेशन चित्रपट बनवले जातात त्यासाठी अ‍ॅनिमे (anime) ही संज्ञा वापरली जाते. या विभागात केवळ प्रौढांसाठीच असलेल्या अतिशय किचकट, गुंतागुंतीच्या विषयापासून लहान मुलांसाठी असलेल्या हलक्याफुलक्या विषयापर्यंत सगळ्याचा समावेश होतो. त्यामानाने अमेरीकन अ‍ॅनिमेशन अजून तरी 'फक्त प्रौढांसाठी' या विभागात तशी मोजकीच आहेत.

अर्थातच यात डिस्नेचा सिंहाचा वाटा नाकारण्याचा प्रश्नच नाही. पण तो मान्य करुनही पिक्सरने बनवलेली अ‍ॅनिमेशन जास्त गोड, गोंडस, लोभसवाणी वाटतात हे मान्य करायलाच हवं. २००६ मध्ये डिस्नेने पिक्सर विकत घेतली खरी तरीही पिक्सर च्या नावाखाली बनणार्‍या चित्रपटांचं वलय काही कमी झालं नाही. या बॅनरखाली बनणारे चित्रपट आणि त्यातील पात्रं मनात घर करुन जातात हे नक्की. मग तो 'टॉय स्टोरी' मधला 'वूडी' असो की 'मॉन्स्टर्स' मधला 'सुली'. 'फायंडिंग निमो' मधला 'मार्लिन' असो की 'अप' मधला 'रसेल'.

फक्त एखाद्या ठराविक साच्यामधल्या नीतीकथा किंवा सुष्ट-दुष्ट संघर्ष दाखवण्यापलीकडे या चित्रपटांमध्ये बरंच काही दाखवलं गेलंय. माणसांचे राग, लोभ, प्रेम, माया, स्वार्थ, भीती, दुष्टपणा.. सगळंच... आणि फक्त इतक्यावरच न थांबता माणसाच्या अशा वर्तणूकीला त्याची परिस्थिती जबाबदार असते, असू शकते आणि प्रेमाचा, सहकार्याचा हात मिळाला तर माणूस कोणतीही, कितीही त्रासदायक परिस्थिती बदलू शकतो या सगळ्या गोष्टी कोणताही उपदेशाचा आव न आणता अतिशय मनोरंजक रीतीने आपल्यासमोर उलगडत जातात. आणि हे मनुष्यीकरण (humanization) ते कोणत्याही, अगदी कोणत्याही वस्तूला लागू करु शकतात. आणि ते ही इतक्या चपखल की आपण प्रेमातच पडावं त्यांच्या. 'कार्स' मधल्या गाड्या, 'वॉल-इ' मधले रोबोटस्, 'टॉय स्टोरी' मधली खेळणी, 'रॅटाटूई' मधला उंदिर या सगळ्या मनुष्येतर गोष्टींचं इतकं छान चित्रण केलंय की ही पात्रं माणसांइतकीच आपल्या जवळची होऊन जातात. रडत, धडपडत, थोडं घाबरत चाचरत आपल्या आतल्या भीतीवर मात करत नवा रस्ता शोधणारे हे सगळे जण मग आपलंच रुप वाटायला लागतात.

चित्रपटाचं किंवा कोणत्याही कलाकृतीचं यश यातच सामावलेलं असतं की किती लोकं तिच्याशी नाळ जोडू शकतात, रिलेट करु शकतात. त्यामुळेच प्रत्येक काळाच्या मानसिकतेनुसार त्या त्या काळाचे नायक-नायिकांचे साचे बदलत गेलेले आपल्याला पहायला मिळतात. पण हे निर्जिव किंवा मनुष्येतर प्राण्यांच्या संदर्भात करणं किती जोखमीचं काम असेल याची कल्पना ते काम करणार्‍यांनाच असावी. आणि असं जोखमीचं काम असूनही पिक्सर त्यात दर वेळी उत्तमरित्या यशस्वी होत आलेत हे नक्की..

जपानी अ‍ॅनिमे मात्र जरा गंभीर मामला आहे. त्यात हलकेफुलके चित्रपट नाहीतच असं नाही पण त्यातल्या गंभीर विषयांचं प्रमाण आणि प्रत बघता त्यांचा उल्लेख अत्यावश्यक आहे. पहिल्यांदा असा गंभीर चित्रपट पाहिला तेव्हा अ‍ॅनिमे ही काय भानगड असते हे मला माहिती नव्हतं. आणि चित्रपट होता, 'ग्रेव्ह ऑफ फायरफ्लाईज'. चित्रपटाची कथा दुसर्‍या महायुद्धात होरपळलेल्या एका बहिण-भावाभोवती फिरते. हल्लीच माझ्या वाचनात आलं की ही अकियुकी नोसाका यांच्या खर्‍या आयुष्यातली घटना आहे. हा चित्रपट पाहिला तेव्हा रडू आवरेचना. अर्थात चित्रपट फार सुंदर आहे आणि माणसाचं माणसाशी वेदनेच्या पातळीवर असं जोडलं जाणंही तितकच खरं. पण चित्रपट झाल्यावर, रडून झाल्यावर विचार आला की काय म्हणून लहान मुलांनी असे चित्रपट पहावेत? आणि मग त्यावेळी मला भावाकडून कळालं की हा लहान मुलांसाठीचा चित्रपट नाहीये. अ‍ॅनिमे वगैरे वेगळा प्रकार असतो. मग मात्र वेड्यासारखी या चित्रपटांच्या पाठी लागले मी. किती किती विषय आणि किती भावगर्भ चित्रपट. आणि काही तर इतके गुंतागुंतीची की त्यावर बेतलेल्या चित्रपटांनी हॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली. उदाहरणच द्यायचं झालं तर 'घोस्ट इन द शेल' वर बेतलेला 'मॅट्रिक्स' किंवा 'पॅपरिका' वरुन नोलान ला सुचलेला 'इनसेप्शन'. या चित्रपटांच्या विषय वैविध्यामुळे आणि गुंतागुंतीमुळे जसं थक्का व्हायला होतं तसंच त्यात जाणवणार्‍या तीव्र जपानी संस्कृती आणि तत्वज्ञानाच्या दर्शनानेदेखिल.बर्‍याचदा विदेशी चित्रपट म्हटले की त्यात अमेरिकन आणि युरोपियन चित्रपटांचाच भरणा असतो. अर्थात त्यांचं श्रेय तेवढं आहेच या उद्योगाला पण ते सगळे चित्रपट थोड्या फार फरकाने एकाच मातीतले, एकच संस्कृतीचे वाटतात. आणि मग त्या पार्श्वभूमीवर इराणी किंवा जपानी चित्रपट नजरेला, मनाला आणि बुद्धीलाही सुखावणारे, वेगळं काहीतरी बघितल्याचं समाधान देणारे वाटतात. पाश्चिमात्यांच्या तोडीस तोड तांत्रिक प्रगती पण त्याच वेळी जपानी लोकांनी त्यांच्या संस्कृतीची मर्मस्थानं ज्या कसोशीने जपली आहेत किंवा त्यात काळानुरुप बदल केले आहेत ते बघून कौतुक वाटायला लागतं. Spirited away, Howl’s moving castle, Secret world of arrietty, princess mononake.. स्वप्नकथेपासून अगदी ग्लोबलायझेशन, क्लायमेट चेंजपर्यंत कोणत्याही विषयावर आणि साध्या कौटुंबिक, आत्मचरीत्रात्मक ते sci-fi पर्यंत सगळ्या प्रकारात जपानी अ‍ॅनिमेशनने बाजी मारली आहे. पण हे असं ग्लोबल आणि प्रगत होत असतानाही चित्रपटभर तीव्रतेने जाणवणारा जपान फॅक्टर अनुभवायला भारी वाटतो. जणू काही दोन तास दुसर्‍या जगाची सफर करुन आलो आपण.

असाच काहीसा अनुभव 'पर्सेपॉलिस' आणि 'वॉल्ट्ज विथ बशीर' बघताना आला. 'पर्सेपॉलिस' हा चित्रपट त्याच नावाच्या आत्मचरीत्रात्मक चित्र-पुस्तकावर (कॉमिक बुक) बेतलेला आहे. ज्यात लेखिकेने इराणमधल्या इस्लामिक क्रांतीच्या आधीच्या आणि नंतरच्या आयुष्याचं चित्रण केलं आहे. तसंच 'वॉल्ट्ज विथ बशीर' या इस्त्रायली चित्रपटामध्ये अंशतः स्मृती हरवलेला एक सैनिक लेबॅनॉन युद्धातल्या त्याच्या भूतकाळाचा शोध घेताना दाखवलाय. हाही चित्रपट खर्‍या घटनांवर बेतलेला आहे. पण हे असे चित्रपट विरळाच. मक्तेदारी म्हणावी अशी अमेरीकन आणि जपानी चित्रपटांचीच.
हे सगळं आठवण्याचं कारण? उगाच विचार करताना वाटलं बिम्मच थोडा मोठा होऊन रसेल बनतो आणि तोच पुढे जाऊन लंपन होतो. (जी.ए.कुलकर्णींच्या धीरगंभीर आणि गूढ व्यक्तिमत्वाशी विसंगत असे लहान मुलांसाठी 'बखर बिम्म ची' नावाचे एक भन्नाट पुस्तक त्यांनी लिहिलय. सर्वांनी अगदी आवर्जून वाचावं असंच पुस्तक आहे ते.) आणि मग विचार आला की आपल्याकडे को बिम्म आणि लंपनच्या रुपाने आनंदाचा खजिना आहे तो कधी असा अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून जगासमोर येणार?

वास्तविक या सर्व चित्रपटांवर स्वतंत्र लेख होतील इतके भारी चित्रपट आहेत हे, पण त्यावर नंतर कधीतरी.. सवडीने. तूर्तास मात्र बिम्म आणि लंपनच्या संदर्भात पडलेले अनुत्तरीत प्रश्न घेऊनच थांबते.

merakuchhsaman.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्टून्स् जिव्हाळ्याचा विषय
टॉय स्टोरी, कार्स, प्लेन्स, वॉल ई, अप, इपिक, जंगलबुक, बोल्ट,.....
यादी खरंच खूप मोठी होईल.

कार्टून्स् जिव्हाळ्याचा विषय >> +१

माझी हार्डडिस्क खराब झाली तेव्हा फोटोंखालोखाल इतके जमा केलेले अ‍ॅनिमेशनपट मला कुठं मिळतील याची काळजी ..

'ग्रेव्ह ऑफ फायरफ्लाईज'.>> हा चित्रपट पाहताना खरचं रडू आवरत नाही.. खरतर मन कधीही खट्टू होण्याच्या मार्गावर आलं तर त्याला सरळ करण्यासाठीचा हुकुमी पत्ता म्हणजे अ‍ॅनिमेटेड सिनेमे पाहणं.. कित्येक तर मला तोंडपाठ झालेत पण हा चित्रपट परत बघायचा म्हटलं तर खुप हिम्मत लागेल मला..
तो भाऊ, त्याची ती लहानगी बहीण, त्यांच फोस्टर होम मधुन पळून जाणं, जगण्यासाठी युद्धकाळात होणारी ससेहोलपट, तिचं आजारपण.. अय्यायी गं.. आठवूनच काटा येतो Sad

जपानी मंगा सिरीज चे कार्टुन्स सुद्धा खुप आवडतात मला..
सगळेच बघीतलेले नाही..आत्ता कुठं ओळख झालीय त्यांच्याशी.. माझा छोटा भाऊ अ‍ॅनिमेशन चे क्लासेस करतो म्हणजे शिकतो तेव्हा अभ्यास म्हणुन त्यांना वेगवेगळ्या देशातील या अ‍ॅनिमेशपटांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो तेव्हा त्याने मला दिलेले ब्लीच आणि नारुतो च्या प्रेमात पडली मी..

एक विनंती..तेवढ लेखनात दोन पॅरा मधे जरा एका ओळीची गॅप सोडली तर वाचायला जरा हलकं जाईल.. सलग लिहिलं कि वाचायचा कंटाळा येतो.. छान लिहिलयं पण थोड एडीटींग करावी हि विनंती..

आपल्याकडे कितीतरी गोष्टी आहेत . सगळ्यात मस्त म्हणजे रामायण , महाभारत, शिव चरित्र . मध्यंतरी एक चित्रपट पहिला अर्जुन द warrier प्रिन्स अप्रतिम अनिमे चित्रपट. खुद्द महाभारातातच इतक्या कथा आहेत कि किमान १० ते १२ अनिमे तयार होतील पण अजून ह्या चित्रपटांविषयी भारतात तेवढा प्रेक्षक वर्ग नाही अजून सुद्धा भारतात अनिमेशन म्हणजे लहान मुलांसाठीच अशी समजूत आहे.

माझ्याघरचे माझ्यावर चिडतात अजूनही कार्टून बघतो म्हणून. पण त्यांच्या जीवघेण्या सिरीअल्स पेक्षा कार्टून्स बरे.

माझ्याघरचे माझ्यावर चिडतात अजूनही कार्टून बघतो म्हणून. पण त्यांच्या जीवघेण्या सिरीअल्स पेक्षा कार्टून्स बरे.>> +१
म्हणुन घरातली सगळे बच्चेपार्टी मी असली कि टिव्हीसमोर येऊन बसतात.. Lol

टीनाताई तुम्हाला कोणते कार्टून्स सगळ्यात जास्त आवडतात?
मला शिनचॅन, कित्रेत्सु, टॉम & जेरी, डिस्नेचे सगळे कार्टून्स आवडतात
रच्याकने माबोवर कार्टून्स फॅन क्लब सुरू करायला हवा.

संशोधक,
एक हो तो बताऊ..
प्रवास सुरु झाला तो मोगली पासुन..टिव्हीवर यायच..आणि मग अलादिन, टॉम अँड जेरी, पोकेमॉन, ट्रान्सफॉर्मर्स अरमाडा, डक टेल्स, स्कुबी डू, गुफी वगैरे भरपूर.. मग टिव्ही आणि चॅनल्स दोन्ही बंद झाले.. आता त्यांची जागा चित्रपटांनी घेतलीए पण तरी चान्स मिळाला कि डोरेमॉन, छोटा भीम सुद्धा बघते मी मन लावून... Proud
मंगा सिरीज मधलं ब्लीच आणि नारुतो पाहिलयं..खुप खुप आवडलं..
कुठल्या एका स्टुडीओची फॅन नैए मी पण त्यातल्या त्यात पिक्सर, डिस्ने, ड्रिमवर्क्स चे सगळे चित्रपट जातीने पाहते; पण त्याचबरोबर ट्रॅडीशनल टेकनिकने बनवलेले सिनेमे सुद्धा आवडतात मला पाहायला Happy

आजकाल तर जवळ जवळ सगळेच अ‍ॅनिमेटेड मुव्ही थेटरातच पाहते..असली मज्जा येते ना...

अवांतर झाल असेल धाग्यावर तर क्षमा असावी Happy

मी मुक्ता च्या इतक्या छान धाग्यावर कुणी आलेलं नाही जास्त यावरुन इथं कार्टून प्रेमी कमी असतील असा दाट संशय येतोय त्यामुळं असुच दे असं वाटतयं..

मी आहे कार्टून फॅन क्लबमध्ये! डिस्ने, पिक्सार पासून घिबली, मांगा सगळं पाहतो. मस्त धागा उघडला तुम्ही मुक्ता.
टीना - सुरु केला क्लब तर हम है तुम्हारे साथ
टीप : रिक्षा फिरवत आहे म्हणून माफ करा पण लेखात पॅप्रिकाचा उल्लेख पाहून राहवलं नाही, माझा पॅप्रिकाचा रिव्ह्यू http://www.maayboli.com/node/53832

.

म्हणजे दिसायला म्हातारे सुद्धा मनाने बाल अथवा तरुणवयात असतात..
आता मी छोटा भीम, डोरेमॉन बघण्यासाठी बरीच मोठी आहे पण तरी त्यांच्या कल्पना खुप एंजॉय करते..
याचा अर्थ मी डोक्यानी तेवढीच असेल अस नै ना Proud

ओह सॉरी ते लक्षातच आलं नाही माझ्या
लहान आहे हो अजून समजून घ्या थोडं!
पुसतो तो प्रतिसाद जास्त कुणी नसेल वाचला अजून नाहीतर अर्थाचा अनर्थ व्हायचा

Happens Happy

Thanks all.. इतक्या मनापासून ॲनिमेशन ला दाद देणारे आणि नॉस्टँल्जिक होणारे लोक बघून भारी वाटलं.

मोगली, अरेबियन नाइटस्, टॉम ॲंड जेरी, डक टेल्स.. व्वा! काय आठवणी निघाल्या Lol यावर सविस्तर लिहा कोणीतरी..

पायस,
मस्त लिहिलाय रीव्ह्यु तुम्ही.. त्यादरम्यान माबोवर फारसं येणं नसल्याने वाचनात नाही आला. शेअर केल्याबद्दल धन्यवाद Happy

मस्त परीचय Happy
अ‍ॅनिमेटेड मुव्हीजचा मी ही पंखा Happy आणि जुन्या अ‍ॅलिस इन वंडरलँड (सलग-चित्रांच्या माध्यमातून बनवलेला सिनेमा) पासून तर आजचे... टँगल्ड, मिनियन्स, इन्साईड आऊट, वॉल ई, हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन्स १,२, अजूनही बरेच...
पण भाचेकंपनीबरोबर बसलो असतांना झुरळांचे कार्टून्स बघून असं वाटतं ह्याला काय कार्टून्स म्हणतात, कार्टून्स बघायची तर आमच्या काळातली (आणि मग वय झाल्याचं पण फीलींग येऊन आहे ते छान आहे असं वाटतं Proud )

Sandip, Harshal

thanks a tonn Happy

Just watched the tale of princess kaguya yesterday... These guys are awesome Lol

tale of princess kaguya... तुम्ही लोक ना एक एक आणखी नाव वाढवत चला माझ्या लिश्टीत..कस व्हायचं माझं.. आता हिला पन शोधते.. धन्यवाद मी_मुक्ता Happy

मला खरंतर कार्टुन्सचं वेड वगैरे नाहीये. कधी बघितलंही जात नाही. पूर्वी एकदा टि.व्ही.वर एक सिरीज चालू झाली होती ती मात्र प्रचंड आवडीने बघितली. आत्ता परत बघायला घेतलीये मी.

'हाईडी' (Heidi) नावाने शोधलं तर यूट्युबवर सगळे भाग आहेत. खूप साधी, सरळ स्टोरी व मस्त अ‍ॅनिमेशन.

मी मुक्ता मस्त लेख आहे अगदी. पिक्सार च्या अ‍ॅनिमेशनचा मोठा पंखा आहे मी. रॅटॅट्युइ म्हणजे माझ्या दोन अतिशय आवडत्या गोष्टींचे भन्नाट मिश्रण होते अगदी त्याच्या त्या पदार्थासारखेच - अ‍ॅनिमेशन चित्रपट आणि कुकींग !! जपानी अ‍ॅनिमीज इतक्या जास्ती पाहिलेल्या नाहीत पण काही काही पाहिल्या आहेत आणि त्यांनी खरंच किती सुंदर काम केलेले आहे त्याचे कौतूक वाटते.

टीना, तुझ्या सारख्याच हे सगळे कार्टून्स पाहिलेले आहेत मी सुद्धा आणि शिनचॅन तर अजुनही देशात आल्यावर पहात असतो माझ्या कझिन्स बरोबर Lol