पॅप्रिका

Submitted by पायस on 8 May, 2015 - 11:52

स्वप्नात स्वप्नात स्वप्न
दुसर्‍याच्या स्वप्नांमध्ये घुसून त्यांना नियंत्रित करणे

कथा कल्पना ओळखीच्या वाटतात ना? आता जर चित्रपटाचे नाव विचारले तर हमखास उत्तर येईल इन्सेप्शन. आता हे नोलनचे यश कि मूळ कल्पनेला अधिक खुलवून त्याने इन्सेप्शनच्या रुपाने पेश केले. पण त्याच्या १७ वर्षे आधी या संकल्पनेवर पहिल्यांदा सायफाय कादंबरी लिहिली गेली पॅप्रिका आणि इन्सेप्शनच्या ४ वर्षे आधी तिच्यावर त्याच नावाने अ‍ॅनिमेटेड सिनेमा निघाला. मूळ कलाकृती व चित्रपट जपानी आहे पण त्याला नंतर बर्‍याच ठिकाणी प्रदर्शित केले, अमेरिकेत तरी त्याने व्यवस्थित गल्ला जमवला. स्वतः नोलन इन्सेप्शनच्या काही दृश्यांवर पॅप्रिकाचा प्रभाव कबूल करतो (संदर्भ : गुलेर्मो डेल टोरोबरोबर झालेली मुलाखत) उदा. आरसा फुटण्याचा सीन. अर्थात दोघांची कथानके फारच वेगळ्या वाटेने जातात व दोन्ही चित्रपट पुष्कळच वेगळे आहेत.

कथानक
कथानक म्हटले तर फारच सोपे आहे, म्हटले तर कथानकच नाही. एक डीसी मिनि नावाचे मशिन आहे ज्याच्या द्वारे तुम्ही स्वप्ने एकमेकांना जोडू शकता व इच्छाशक्तीच्या बळावर इतरांचे स्वप्न नियंत्रित देखील करू शकता. पण हे मशिन परिपूर्ण नसल्याने काही मानसशास्त्रज्ञ वगळता कोणाला याचे अस्तित्त्व माहित नाही. ते मानसशास्त्रज्ञ उपचारांसाठी या मशिनचा प्रायोगिक स्वरुपात वापर करतात - एक पोलिस अधिकारी स्वतःहून या प्रयोगासाठी तयार झालेला आहे. डॉ. चिबा अत्सुको त्यातील एक असून, ती या सर्वात इतरांपेक्षा अधिक वाकबगार आहे व ती स्वप्नांच्या दुनियेत पॅप्रिका या रुपाने वावरते. त्यामुळे ती प्रत्यक्षात कोण आहे हे तिच्या सहकार्‍यांशिवाय कोणाला माहित नाही. अशातच एक मशिन चोरीस जाते व लोकांच्या स्वप्नात घुसखोरी सुरु होते. हा नवीन प्रोटोटाईप अधिक ताकदवान असून हा जागा असलेल्या माणसालाही नियंत्रणाखाली आणू शकतो कारण मेंदू सबकॉन्शसली स्वप्नांच्या दुनियेशी अजूनही जोडलेला आहेच. जेवढे जास्त हे यंत्र वापरले जाईल तेवढे सत्य आणि स्वप्न याच्यात फरक धूसर होत जाईल. त्यामुळे जर थांबवले नाही तर तो चोर हळू हळू करत संपूर्ण जगाला स्वप्नांच्या जगात ओढून घेऊन जाऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. अशा परिस्थित चिबा उर्फ पॅप्रिका या चोराला कशी शोधून काढते हा प्रवास हा चित्रपट दाखवतो.

पण खरे तर या कथानकापेक्षा देखील या चित्रपटात सत्य आणि स्वप्न यांच्यात फरक धूसर झाला तर काय होईल? सत्य हेच स्वप्न आणि स्वप्न हेच सत्य अशा उड्या मारत हा चित्रपट तुम्हाला नक्की सत्य म्हणजे तरी काय? डोळ्याला दिसते तीच खरी दुनिया का? आभासी दुनियेत जगताना काय वेगळे घडते अशा प्रश्नांना प्रचंड प्रभावीपणे मांडतो. माझ्या वैयक्तिक मते पॅप्रिकातील आभासी जग इतर कुठल्याही या थीमच्या चित्रपटापेक्षा १००० पट वैविध्यपूर्ण, भव्य आणि विचित्र आहे - जी खरे व आभासी जग एकत्र होत असतानाची गरज आहे.

अ‍ॅनिमेशन
या चित्रपटावर बर्‍याच दिवसांपासून लिहायचे होते पण हा आधी लिहू कि घोस्ट इन द शेल कि अकिरा हे नक्की होत नव्हते. आपल्याला अ‍ॅनिमेशन म्हटले पहिल्यांदा डोळ्यासमोर डिस्ने येते. डिस्नेच्या अ‍ॅनिमेशनला तोड नाही हे खरेच पण याने आपल्या डोक्यात एक चुकीची संकल्पना फिट्ट बसते - अ‍ॅनिमेशन नव्हे कार्टून हे लहान मुलांसाठी असते, मोठे ते एंजॉय करू शकतात पण टारगेट ऑडिअन्स लहान मुलेच! या समजाचा परिणाम म्हणून आपण सध्या भारतीय अ‍ॅनिमेशनच्या नावाखाली छोटा भीम व इतर गोष्टी भोगतोय. हे अर्थातच खरे नव्हे. उलट बर्‍याचशा देशात, यात जपान खूपच पुढे आहे, अ‍ॅनिमेशन एक माध्यम आहे व त्याच्यात अधिक मॅच्युअर कथानके बनवता येतात हा समज पक्का आहे. निदान हा गैरसमज तोडण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहावा.

संगीत
सुसुमु हिरासावाने दिलेले संगीत अप्रतिम आहे. त्याने यात मुद्दाम लोला या सॉफ्टवेयरचा वापर करून यांत्रिक गायक वापरले आहेत. त्याने पुन्हा सत्य व आभास यातला फरक अधिकच धूसर बनून अनुभव जबरी होतो.

अभिनय
ध्वनि अभिनय ही वेगळीच कला आहे. केवळ आवाजाच्या मदतीने पात्राला जिवंत करणे कठीण आहे. मेगुमी हयाशीबारा हिचा ध्वनि अभिनय कमाल आहे. ती ज्याप्रकारे अत्सुको मधून पॅप्रिकामध्ये बदलताना आवाज बदलते त्याला तोड नाही. इतरही छान आहेत.

शेवटी जाता जाता
याचा दिग्दर्शक सातोशी कॉन अ‍ॅनिमेशन मधला दादा मानला जातो. स्टुडिओ घिबलीचा हयाओ मियाझाकी, पिक्सारचा जॉन लॅसेटेअर यांच्या बरोबर त्याचे नाव घेतले जाते, जायचे. हो...... २०१० मध्ये त्याचे कॅन्सरमुळे निधन झाले. सातोशी कॉनचे एक वाक्य या चित्रपटाला अ‍ॅनिमेट का केले हे सांगून जाते - तो म्हणतो कि त्याचे संकलन प्रचंड वेगवान आहे. उदा. समजा तुम्ही एक वस्तु उचलून खिशात ठेवली तर हा सीन दाखवायला तो जेमतेम १० फ्रेम्स घेईल याउलट जिवंत चित्रणात त्याला ५० फ्रेम्स पर्यंत लागू शकतात. या वेगाने त्याला स्वप्नांची थीम योग्य रीतिने दाखवता आली. जिवंत चित्रणात ते कितीही प्रयत्न केला तरी थिटेच पडते. त्याच्या संकलनाविषयी अधिक चांगले भाष्य करणार्‍या एका व्हिडिओची तुनळी लिंक देत आहे.
त्यामुळे हा चित्रपट सीन्सला संकलित करत नाही. तो तुमच्या जगाला संकलित करतो - सत्य, आभास यांच्या जाणीवा चित्रपट बघताना सतत प्रश्न विचारून जाग्या ठेवाव्या लागतात अन्यथा तुम्हाला हा चित्रपट देखील एक स्वप्नच भासेल.

पहावा कि न पहावा?
हा पाहाच वगैरे माझा अजिबात सल्ला नाही कारण अ‍ॅनिमेशनचा वापर करून काहीतरी मोठ्यांसाठीचे, डार्क स्टोरीलाईन असलेले दाखवले आहे हा कल्चर शॉकच अनेकदा सहन होत नाही. दुसरे म्हणजे सिनेमा भयंकर वेगवान आणि गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे ज्यांना फक्त मसाला, करमणूकप्रधान चित्रपट आवडतात त्यांनी अजिबात पाहू नये, पचणार नाही. ज्यांना गुंतागुंत, रहस्यमय आणि बौद्धिक कथानक आवडतात त्यांनी मात्र हा जरूर पाहा.
जाता जाता याचा एक प्रिव्ह्यू देखील देत आहे. अधिक लांबवत नाही कारण हा समजण्याचा किंवा नुसता पाहण्याचा नव्हे तर अनुभवायचा चित्रपट आहे. काहीतरी वेगळं पाहणार्‍यांसाठी मस्ट वॉच!!!

वि.सू. - इंग्रजीत डब केलेली आवृत्ती डबडी आहे, सबटाईटल्स असलेली मूळ जपानी आवृत्ती पाहणे.

प्रिव्ह्यू - Paprika Opening Sequence
सातोशी कॉनच्या संकलनाचा आढावा - Satoshi Kon - editing space and time

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख छान आहे. इथे ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. अजून त्या बाकीच्या चित्रपटावर पण नक्की लिहा.

लहानपणी Johnny Quest नावाचे कार्टून पाहायचो. त्यातही असेच काहीतरी होते. त्यात बहुतेक मनोरुग्ण आणि paralysis च्या रुग्णांवर उपचारासाठी ती मशीन वापरायचे.

जॉनी क्वेस्ट पण भारी होत पण ते स्वप्न नसतं. क्वेस्ट वर्ल्ड म्हणून वेगळी डायमेंशन असते. बाकी मनोरुग्णावर उपचार एका एपिसोड मध्ये आहेत. अजून एका एपिसोड मध्ये इनसेप्शन प्रमाणे या डायमेंशन मधून घुसून चोरी करायची असते. ओव्हरऑल मोअर एडवेंचर, वरचे सिनेमे थ्रिलर म्हणावे लागतील.
अवांतर : सध्या टोरंट वर संपूर्ण जॉनी क्वेस्ट सीरीज आहे. काढून टाकण्याच्या आत इच्छुकांनी लाभ घ्यावा.

मला माझ्या मित्राने हा चित्रपट बघायला सान्गितला आहे. इन्सेप्शन आवडला त्यामुळे हा तर नक्कीच आवडेल अस वाटतय! पण चित्रपट मला जपानीतुन मिळतोय इन्ग्रजी सबटायटल्स बरोबर! कंटाळा येतो सबटायटल्स वाचायचा!

kulu, ओरिजनल ची गोडी वेगळीच असते..मला सुद्धा कंटाळा येतो पण जपानी भाषा खुप गोड आहे ऐकायला..
नारुटो शिप्पुडेन बघताना पहिले ३०० एपिसोड्स मी सबटायटल वाचत बघितले अन नंतर जेव्हा इंग्रजी डब बघायला लागली तेव्हा यक असं झाल.. त्याचा आवाज इतका वियर्ड वाटला कि ति नारुटो नव्हेच अस झालं..

Yuhooo.. I got Paprika..
Damn excited... थँक्स पायस.. आता बघेल येत्या दोन दिवसांत Happy
सद्ध्या ब्लीच बघतेय Happy