विविध प्रकारातील कोलंबी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 16 February, 2016 - 02:13

अगदी लहान थोर सगळ्यांनाच ओळखीचा व आवडणारा माशाचा प्रकार म्हणजे कोलंबी.
काट्याची कटकट नसलेली, फक्त मांस असणारी अशी कोलंबी विविध आकारात व
प्रकारात मार्केट मध्ये उपलब्ध असते. तर अशा ह्या कोलंबीच्या विविध
प्रकारच्या आपण आज माहीती करून घेऊ.
१) कोलिम

कोलंबीची प्रथम अवस्था म्हणजे कोलिम. हा प्रकार शहरात थोडा अपरीचीत
असावा. हा समुद्रात आणि खाड्यांमध्ये दोन्ही ठिकाणी मिळतो. समुद्रातील
कोलिम पांढरट असतो तर खाडीतील काळपट. ह्या प्रकारात कोलंबीला अजुन आकार
आलेला नसतो. सगळे दिसायला काळ्या वाटणाप्रमाणे दिसते. खाडीतील कोलिम
जास्त चविष्ट लागतो.

कोलिम साफ करून घ्यावा. कोलिम मध्ये बर्‍याचदा तांदळातल्या टोक्याप्रमाणे
काही पाखरे असतात व काही प्लास्टीक वगैरेही आलेले असते. तांदूळ
निवडल्याप्रमाणे ही पाखरे व प्लास्टीक किंवा इतर एखाद्या प्रकारचे छोटे
मासे आले असतील तर ते काढून टाकावेत. मग कोलीम चाळणीत किंवा फडक्यात धरून
धुवून घ्यावा. बर्‍याच ठिकाणी कोलिम धुवत नाहीत त्यामुळे चव बदलते असे
म्हणतात. पण त्यासाठी तो स्वच्छ आहे ह्याची खात्री हवी.

आपण आता कोलिमचा कांद्यावर तळलेला प्रकार पाहुया.

भांडे गरम करून तेलावर लसूणाची फोडणी द्यावी व त्यावर कांदा गुलाबी
रंगाचा होईपर्यंत शिजवावा. मग त्यात हिंग, हळद मसाला हे नेहमीच जिन्नस
घालून त्यावर कोलीम टाकावा. आता भांड्यावर झाकणात पानी ठेउन कोलिम वाफेवर
शिजु द्या. मधुन मधुन झाकण काढून परतवा. १५ ते २० मिनीटे चांगला खरपुस
झाला की त्यात मिठ, मोडलेली मिरची, कोकम किंवा आंबोशी, कोथिंबीर टाका व
परतुन परत एक वाफ येउ द्या. मग गॅस बंद करा. हा कोलिम भाकरी सोबत जास्त
रुचकर लागतो.

कोलीमच्या वड्याही करतात. त्यासाठी कोलिम, बेसन १ ते दिड वाटी, १ कांदा
बारीक चिरुन, आल लसुण, पेस्ट, २-३ मिरच्या बारीक कापुन किंवा २ चमचे
मसाला, थोडी कोथिंबीर चिरुन, हिंग, हळद,अर्धा चमचा गरम मसाला, चविपुरते
मिठ, थोडा लिंबाचा रस. सगळे साहित्य एकत्र करावे. मिश्र्ण पातळ वाटले तर
अजून थोडे बेसन घालावे व पुन्हा सगळे एकत्र करून गरम तव्यावर वड्या
शॅलोफ्राय कराव्यात.

कच्च्या कोलीमच्या वड्या थापुन साठवणीसाठी त्या वाळविल्या जातात. साधारण
त्या पापडासारख्या दिसतात. ह्या वड्या नुसत्या भाजून, मोडून त्याचे
कांद्यावर सुके करून खाल्या जातात.

कोलीम सुकवून वड्यांच्या स्वरूपात ठेवतात. पापडासारख्या वड्या बाजारात विकायला येतात. ह्या वड्या निखार्‍यावर भाजून भाकरी बरोबर अप्रतिम लागतात.

२) जवळा.

कोलंबीची दुसरी स्टेप म्हणजे जवळा. ह्या प्रकारात कोलंबीचा शेप दिसायला
लागतो. जवळा निवडून धुवुन घ्यावा. निवडायचा म्हणजे कधी कधी ह्यात दुसरे
बारीक मासे, छोट्या चिंबोर्‍या असु शकतात ते काढायचे.जवळा कोलीम प्रमाणेच
कांद्यावर तळतात व कोलीम प्रमाणेच जवळ्याच्या वड्याही करतात.

जवळ्याच्या वड्या

हाच जवळा सुकवून सुका जवळा तयार करतात. सुक्या जवळ्याचेही सुके, रस्सा,
चटणी केली जातो. सुक्या प्रकारांमध्ये वांगे, शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो
घातल्यास ते प्रकार अजुन चविष्ट होतात.

३) करंदी

करंदी म्हणजे बाळसे धरू लागलेली कोलंबी. करंदीला अंबाड असेही म्हणतात.
उन्हाळ्यात करंदी भरपुर आणि चांगली येते. त्यामुळे करंदी आणि आंब्याची
कढी हे कोम्बीनेशन चांगले जमते. करंदी ही गुलाबी आणि चकचकीत असली म्हणजे
चांगली ताजी असते.

करंदीचे डोके, शेपूट काढून मधले साल काढून टाकायचे. हल्ली बाजारात
सोललेली करंदी कोळणी ठेवतात.
भांड्यात तेल गरम करा मग ४-५ ठेचलेल्या लसुणपाकळ्यांची मस्त फोडणी द्या.
आता त्यावर दोन कांदे चिरून घालुन बदामी रंग येईपर्यंत तळा. त्यावर पाव
चमचा हिंग, अर्धा हळद, १ ते २ चमचे लाल मसाला (मिरची पुड वापरायची असेल
तर १ चमचा) घालुन ढवळून त्यावर करंदी घाला व वाफेवर ती शिजवा. शिजताना ती
थोडी अळते. म्हणुन शिजल्यावर मिठ घाला म्हणजे मिठाचा अंदाज चुकत नाही.
मिठाबरोबर कोकम किंवा कैरी, हिरवी मिरची (स्वादासाठी) आणि कोथिंबीरही
घाला. परत एक वाफ आणुन गॅस बंद करा.

हे सगळे फोटो अगदी सुरुवातीचे आहेत त्यामुळे तितकेसे क्लियर नाहीत. आता पुन्हा फोटो काढून नव्याने जळवण्याचा विचार आहे. Lol

करंदीचा रस्साही चांगला लागतो. वाटण घालून वा न घालता दोन्ही प्रकारे हा
रस्सा करतात.

करंदीचा रस्सा

भांडे गरम करून त्यावर ४-५ लसुण पाकळ्यांची फोडणी द्यायची मग त्यावर १ ते
दोन चिरलेले कांदे गुलाबी रंग येई पर्यंत परतवायचे. पाव चमचा हिंग, १
चमचा हळद, २ चमचे लाल मसाला किंवा १ चमचा मिरची पुड, घालून लगेच चिंचेचा
कोळ घालावा. करंदी घालून हव्या असलेल्या रश्याच्या गरजे नुसार पाणी
घालायचे व मिठ घालून रस्सा ८-१० मिनीटे उकळू द्यावा. वरून थोडी चिरलेली
कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा.

सुकी करंदीही बाजारात मिळते. सुक्या करंदीचे डोके व शेपटे मोडून
कांद्यावर सुके केले जाते तसेच रस्सा व चटणीही केली जाते.

३) कोलंबी

लाल कोलंबी आहे ह्यात.

करपाली/टायगर प्रॉन्स

रुप,रंग, आकार पुर्ण झाल्यावर जे रुप दिसते ती कोलंबी. लाल कोलंबी,
पांढरी कोलंबी, काळी कोलंबी, करपाली म्हणजेच टायगर प्रॉन्स असे कोलंबीचे
विविध प्रकार येतात. खाडीतील कोलंबी काळपट असते. पण ही कडक सालाची व
तितकीच चविष्ट असते. आमच्या उरणच्या खाडीत मिळणार्‍या कोलंब्यांना आम्ही
तुडतुडी कोलंबी म्हणतो कारण त्या जिवंत असताना तुडतुड उडत असतात. लाल
कोलंबी पचायला जड असते तर पांढरी कोलंबी हलकी असते पण पथ्यात कोलंबी
वर्जच असते.
ताजी कोलंबी ओळखण्यासाठी तिचे डोके शरीरापासून वेगळे झालेले नाही हे
पाहून घ्यावे. बर्फात ठेवलेल्या कोलंबीचे थोडे डोके सुटलेले दिसते पण
कोलंबीची साल नरम पडलेली नसावी.

कोलंबी साल व डोक्याचा थोडा टोकाचा भाग काढून डोके ठेवून शिजवली तर अधिक
चविष्ट लागते. पण लहान मुले किंवा खाणारे साल काढायला कंटाळत असतील तर
पुर्ण कोलंबी साफ करावी म्हणजे कोलंबीचे डोके, शेपूट काढून मधले सालही
काढून टाकावे. कोलंबी मोठी असेल तर मधला काळा धागा काढून टाकावा. कोलंबी
किंवा कुठलाही माशाचा प्रकार तिन वेळा पाण्यातून धुवून घ्यावा.

साल ठेवलेल्या किंवा पुर्ण सोललेल्या धुतलेल्या कोलंबीला आल-लसुण पेस्ट लावून ठेवा.

सुकी किंवा कांद्यावरची कोलंबी :

भांड्यात तेल करम करुन ४-५ लसुण पाकळ्यांची फोडणी देउन त्यावर २ मोठे
कांदे चिरलेले टाकून गुलाबी रंग येईपर्यंत तळा.त्यावर पाव चमचा हिंग, १
छोटा चमचा हळद, २ चमचे मसाला टाकुन थोडे परतवा.आता ह्यावर कोलंबी घालुन
ती परतवा.भांड्यावर झाकण ठेउन झाकणावर पाणी ठेउन मिडीयम गॅसवर कोलंबी
शिजु द्या. मधुन मधुन ढवळा. साधारण १० ते १५ मिनीटांनी त्यात कैरी किंवा
कोकम किंवा टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर व मिठ टाका आणि परतवा थोडासा गरम
मसाला आवडत असल्यास घाला. पुन्हा एक वाफ येऊ द्या व गॅस बंद करा.

कोलंबीचे कालवण्/रस्सा.

भांड्यात तेल करम करुन ४-५ लसुण पाकळ्यांची फोडणी देउन त्यावर २ मोठे
कांदे चिरलेले टाकून गुलाबी रंग येईपर्यंत तळा.त्यावर पाव चमचा हिंग, १
छोटा चमचा हळद, २ चमचे मसाला टाकुन थोडे परतवा. आता ह्यावर आधीच तयार
करून ठेवलेले (१ वाटी ओले खोबरे, ५-६ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल, २
मिरच्या, थोडीशी कोथिंबीर एकत्र करून वाटणे) वाटण घाला. त्यावर थोड्या
चिंचेचा कोळ घाला. मिठ घाला व मिडीयम गॅसवर १० मिनीटे रस्सा उकळू द्या.
ह्या रश्यात शेवग्याच्या शेंगा, माठाची जाडी देठे, सुरण, भोपळा, बटाटाही
घालू शकता.

तळलेली कोलंबी

कोलंबीला १ ते २ चमचे आल-लसुण पेस्ट, थोडेसे हिंग, अर्धा चमचा हळद, २
मसाला लाल मसाला, मिठ लावून एकत्र करा. तवा तापला की त्यावर तेल टाकून
कोलंबी सोडा.जर कोलंब्या मोठ्या असतील तर वरून झाकण द्या म्हणजे निट
शिजतील. गॅस मिडीयम पेक्षाही कमी ठेवा म्हणजे मसाला करपणार नाही. साधारण
७-८ मिनीटांनी कोलंबी पलटून पुन्हा बाजूने थोडे तेल सोडा व कोलंबी
शिजेपर्यंत साधारण ७-८ मिनीटांनी गॅस बंद करा. जर कोलंबी जास्तच जाडी
असेल तर बारीक गॅस वर जास्त शिजवा.
ही कोलंबी खरपूस व स्वादिष्ट लागल्याने लहान मुले नुसतीच खातात. तसेच
तुम्ही स्टार्टर म्हणूनही वापरू शकता.

कोलंबी भात :
साहित्यः
२ वाटे कोलंबी सोलून.
२-३ कांदे उभे चिरुन
३ टोमॅटोंची मिस्करमधून काढलेली प्युरी
१ बटाट्याच्या किंवा गरजेनुसार बटाट्याच्या फोडी
बासमती किंवा कोणताही जुना तांदूळ ४ वाट्या.
२ चमचे आल लसुण पेस्ट
१ चमचा मिरची कोथिंबीर पेस्ट
३-४ दालचीनीचे तुकडे
४-५ लवंगा
७-८ मिरी
२-३ वेलच्या
३-४ तमालपत्र
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला
चवीनुसार मिठ
२ पळ्या तेल

कृती :
तांदुळ धुवुन निथळून ठेवा. (जमल्यास १ तास आधी). कोलंबीला आल्,लसुण,
मिरची,कोथिंबीर पेस्ट लावून घ्या. भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यात
प्रथम दालचीनी, वेलची, तमालपत्र, मिरी, लवंग टाकून त्यावर कांदा टाका व
कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजू द्या. कांदा कुरकुरीत झाल्यास अजून
चविष्ट लागतो पण त्यासाठी थोडे जास्त तेल वापरावे लागते.शिजलेल्या
कांद्यावर हिंग, हळद, मसाला, कोलंबी व बटाटे घाला व चांगली एक वाफ येऊ
द्या. (जर कुकर मध्ये करणार असाल तर बाकीचे सगळे एकत्र टाकले तरी चालते
वाफ न आणता). आता टोमॅटो प्युरी, घाला व जरा परतवा. ह्या मिश्रणावर
तांदूळ, मिठ घाला भात शिजवण्यासाठी लागते तेवढे पाणी घाला व ढवळून मध्यम
आचेवर पुलाव शिजत ठेवा. ७-८ मिनीटांनी ढवळा व पुन्हा शिजू द्या पाणी आटले
की गॅस मंद करुन झाकण ठेवून पुलाव वाफेवर ठेवा. हा कोलंबी भात कुकरमध्ये
पटकन होतो. फक्त पाणी थोडे कमी घालावे.

टिप : सगळ्या रेसिपी मध्ये कोलंबीचे प्रमाण दोन वाटे घ्यावे. मसाला
आग्री-कोळी मसाला वापरला तरी चालेल. नसल्यास मिरचीपूड कमी प्रमाणात
घालावी.

कोलंबी साले काढून कडकडीत वाळवली की त्याला सुके सोडे म्हणतात. ह्या
सोड्याचेही वाटण न घालता कालवण, सुके, सोडेभात छान होतो. फक्त हे
शिजवण्यापुर्वी १५-२० मिनीटे पाण्यात ठेवावे म्हणजे पटकन शिजतात.

माहेर - अन्नपूर्णा विशेषांक २०१५ मध्ये प्रकाशीत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विलक्षण जळजळ!!!

______/\________

दंडवत घ्या तै

का? का छळ मांडलाय असा? नेमका मंगळवारीच उघडायचा होता का हा धागा?
एकतर आमच्याकडे अशी कोलंबी मिळत नाही आहे त्यामुळे आधीच जीव जळतोय त्यात हे जीवघेणे फोटो.
कुठ फेडाल हि पापं जागू ताई?

Angry

एक कोलंबीच तेवढी माहित होती ती सुध्द्धा ऐकूनच.

आज त्यात भर पडली ( स्मित)

बाकी लिहीलयस अप्रतिमच. मी अगदी चवीने वाचते हे सगळ.

अवनी, सोन्याबापू, स्वरा, प्रिती, हेमाताई, सस्मिता, आशिका धन्यवाद.

सोन्याबापू, स्वरा मी समजू शकते Lol जेलूसील जवळ ठेवा.

सोन्याबापू, स्वरा मी समजू शकते हाहा जेलूसील जवळ ठेवा.

<<<<<<< का म्हणून? मला तर जेवायला यायचंय तुमच्याकडे Proud Proud

मेरा तो आज का दिन बन गया,,, सगळेच प्रकार आवडतात.
सगळ्याच डीशेस पाहुन तोपांसु,.... मस्त... सुपर्ब Happy

सगळे प्रकार माहित असुन खातेही नेहमी तरीही जळजळ झालीच मंगळवारी धागा आला म्हणुन Proud

कोलीम खाऊन बरीच वर्षे झाली. गावी गेल्यावर आजीने खापरीत बनविलेला कांद्या तेलावरचा कोलीम आणि सोबत पाण्यावर थापलेली पांढरीशुभ्र भाकरी आहाहा! आठवुनच किबोर्ड ओला झाला Lol

जागु, आज दिवसभर माझ्या डोक्याला कामाला लावलसं, उद्या वरीलपैकी कोणता पदार्थ करु यासाठी Proud

जागु, मस्त Happy
सोड्याची खिचडी, कोलंबी भात हे माझे वीक पॉईंट्स तर तळलेली कोलंबी हा वीकेस्ट पॉईंट.

तळलेल्या कोलंबीला तु लिहिलेला मसाला लावून रवा लावून तळतो. काहीवेळा रव्याऐवजी तांदळाचे पीठ लावूनही तळतो,

जागू तै,

इंग्लिश मधे ज्याला फिश रो किंवा कैवियार म्हणतात त्या मासळीच्या अंड्यांना मराठीत काय म्हणतात कोकणी बांधव? गाभुळ्या का काय से ऐकल्यासारखे वाटते आहे एक लेख त्या बद्दल अन त्याच्या रेसिपीज वर होऊन जाऊ दे प्लीज!!

एकदम..एकेकाला घेऊ घेऊ मारला गं जागू तुने तो..
आता झिंगे खायची हुक्की आलीये..
आम्ही सुक्या झिंग्यांना आधी जरास उकडतो. मग त्यातलं पाणी झारुन घेऊन दोन बारीक कांदे, आलं लसणाची पेस्ट, तिखट मिठ हळद मसाला, अधिक धने पावडर अन भाजलेल्या सुक्या खोबर्‍याची जर्‍राशी पेस्ट टाकुन सुकीच भाजी बनवतो.. लाजवाब.. काय लागते ती.. झालं आज काही खर नै..

माजी गुणाची जागु बाय ती!:स्मित: जागुले, माझ्या नवर्‍याला दाखवते हे सगळे.

आणी तुला मी नक्की नक्की म्हणजे नक्कीच प्रॉमिस करते की मी तुझ्या घरी मासे खायला येईनच.....................................पुढल्या जन्मी.:खोखो::दिवा:

या जन्मी शक्य नाही.:अरेरे: शाकाहारी असल्याचा अभिमान आम्ही मिरवतो, पण जागुचे हे मत्स्य पुराण बघीतले की अभिमानाचे कवच गळुन पडते. सुरेख माहिती दिलीस.

JahabaharaT

Sonya bapu, jaguchach ek lekh aahe ithe. Fish eggs baddal.

जागु तै. सुकटीची कोरडी चटणी कशी करावी ? आमच्याकडे त्यात थोडे पाणी टाकतात त्यामुळे पचपचीत लागते क्रिस्पी नसते.

सोन्याबापु, जागुने गाबोळीची रेसीपी दिली आहे आधी. ही घ्या.
http://www.maayboli.com/node/42357

हि पण तिचीच पण माझी फेव्हरेट. काय दिसतायत अंडी

http://www.maayboli.com/node/26257

मस्त माहिती, लेख आवडला.
(एवढी जाणकार आहेस पण कुठेही लेखनात "मला सगळच माहिती "असा आविर्भाव कधीही नसतो हे फार आवडत)

एवढी जाणकार आहेस पण कुठेही लेखनात "मला सगळच माहिती "असा आविर्भाव कधीही नसतो हे फार आवडत)>>> +१.

मला कोळंबी अतिशय आवडते. जवळ्याह्च्या त्या वड्या!!! अहाहा!

बडवा रे हिला कोणी तरी असे फोटो टाकल्याबद्दल>> अगदी अगदी

महिनाभर श्रावणी शुक्रवार अन मग महिनाभर चतुर्थी येऊ दे हिच्या वाट्याला Happy

कातिल रेसिपी अन फोटो.

Pages