युध्दस्य कथा : ५. प्राक्तन

Submitted by ललिता-प्रीति on 3 September, 2009 - 05:23

लोलाब व्हॅली, ‘फ्रुट बाऊल ऑफ काश्मिर’ असं ज्याचं सार्थ वर्णन केलं जातं तो काश्मिर खोर्‍यातला एक भाग. श्रीनगरच्या वायव्य दिशेला १३० वर्ग कि.मी. प्रदेशात पसरलेल्या या व्हॅलीचं ‘फळांची परडी’ हे नाव किती सार्थ आहे हे तिथे भेट देणार्‍या तुरळक पर्यटकांच्या लगेच लक्षात येतं. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली हिरवी कुरणं, काश्मिरच्या वैशिष्ट्यपूर्ण मानल्या जाणार्‍या फळांच्या बागा, इथला शुध्द, स्वच्छ, निर्मळ निसर्ग बघणार्‍याला एक प्रकारची मनःशांती देतो; एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. पण या प्रदेशाला आजपर्यंत अश्या प्रकारची प्रसिध्दी म्हणावी तेवढी मिळालेली नाही आणि त्याला कारण आहे त्याचं भौगोलिक स्थान. पाकिस्तानची सीमारेषा इथून अगदी जवळ आहे. त्यामुळे इथली कूपवाडा, तंगधर ही गावं पाकिस्तानी घुसखोरी आणि अतिरेकी कारवायांमुळेच जास्त चर्चेत राहिली आहेत.
१९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युध्दाच्या वेळी तर लोलाब व्हॅली म्हणजे एक धगधगतं कुंड होतं. त्या धगीच्या झळा सोसलेलं एक ठिकाण - दृगमुल्ला. तिथल्या भारतीय सैन्याच्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स शाखेच्या ‘२३६, फील्ड वर्कशॉप’मध्ये इन्स्टृमेंट विभागाचा प्रमुख म्हणून मला रुजू होऊन एक वर्ष होत आलं होतं. सैन्यांच्या चकमकीत, लढाईत वापरल्या गेलेल्या साधनसामुग्रीची - अगदी साध्या दुर्बिणीपासून ते पार मोटारी आणि तोफांपर्यंत - ठिकठिकाणी जाऊन तपासणी करणं, दुरुस्तीची गरज असल्यास त्यांची दुरुस्ती करणं, त्यांना पुन्हा एकदा युध्दसज्ज परिस्थितीत आणून ठेवणं हे आमचं मुख्य काम. आमच्या युनिटमध्ये एकूण तीनशेच्या आसपास तंत्रज्ञ होते. त्यांपैकी वर्कशॉपच्या जागी दीडदोनशे जण तरी हजर असायचेच. उरलेल्यांपैकी काहीजण सुट्टीवर गेलेले असायचे तर काहीजण पायदळाबरोबर सीमारेषेवर गेलेले असायचे. (सैनिकी भाषेत त्याला इन्फंट्री डिटॅचमेंट असं म्हणतात.)
वर्कशॉपच्या अवतीभोवती भाताची हिरवीगार शेतं होती. लांबवरचे सूचीपर्णी वृक्षांनी मढलेले उंचच उंच डोंगर बर्फ पडल्यावर फारच सुंदर दिसायचे. पण शेवटी तो सर्व परिसर म्हणजे एका जगप्रसिध्द शापित नंदनवनाचा भाग होता. हिंसाचाराचं गालबोट सावलीसारखं सतत त्याच्या पाठीशी होतं. अलौकिक सृष्टीसौंदर्यानं मोहून गेलेल्या कुणा मुसाफिराची वाहवा कानावर पडण्याऐवजी त्याच्या नशिबी होत्या धडधडणार्‍या तोफा आणि मशीनगनच्या फैरी, घुसखोरांची कपट कारस्थानं आणि स्थानिक लोकांची भेदरलेली घुसमट...

आसपासच्या छोट्याछोट्या वस्त्यांमधून काहीजण आमच्याकडे काम मागायला यायचे. वर्कशॉपच्या भटारखान्यासाठी जंगलातून लाकडं तोडून आणणं किंवा आचार्‍यांच्या हाताखाली वरकामं करणं अश्यासाठी मग त्यांची नेमणूक व्हायची. त्याबदल्यात त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची ददात मिटायची. त्यांना आम्ही पैश्यांची मदत मात्र कधीही केली नाही. त्यांचीही तशी अपेक्षा नसायची.
आमच्या वर्कशॉपपासून ५-६ कि.मी. अंतरावर कूपवाडा गाव होतं. तिथून पुढे ५-६ कि.मी. वर लोलाब व्हॅली आणि जवळच पाकिस्तानला भिडलेली भारताची वायव्य सरहद्द. तिथूनच पाकिस्तानी घुसखोर चोरवाटेनं आपल्या हद्दीत घुसत. सीमेपलिकडून होणार्‍या घुसखोरीबद्दल गावकर्‍यांकडूनही कधीकधी महत्त्वाची माहिती मिळायची. **

ऑगस्ट महिन्याची १० तारीख... नारळीपौर्णिमेचा दिवस होता. त्यानिमित्त सकाळी आमच्या मंदिरात पूजाअर्चा पार पडली. (सैन्याच्या प्रत्येक छावणीत एकतरी मंदीर असतंच.) दुपारच्या जेवणात खीर-पुरीचा मस्त बेत होता. सुग्रास(!) जेवणाची चव जिभेवर घोळवत घोळवत दिवस कलायला लागला होता. आपापल्या घरांपासून हजारो कि.मी. दूरवर सर्वांनी अजून एक सण आठवणींसोबत साजरा केला होता.
आधीच्याच आठवड्यात काही पाकिस्तानी आपल्या हद्दीत घुसल्याची खबर स्थानिक लोकांकडून आणि आपल्या गुप्तहेरांकडून मिळालेली होती. वर्कशॉपवर सहसा त्यांचा हल्ला होत नसे. कारण त्यात त्यांना फारसा फायदा नसायचा. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त नुकसान करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं जे थेट पायदळावर हल्ला केला तरच साध्य व्हायचं. पण तरीही वर्कशॉपच्या चारही बाजूंनी खंदक खणून आम्ही आमच्या परीनं सज्ज झालेलो होतो.
त्यादिवशी संध्याकाळी एका शक्तिशाली दुर्बिणीतून जवळच्या एका डोंगरावरच्या झाडीत हालचाल दृष्टीस पडली होती. त्यावरून सगळ्यांनीच हे ताडलं होतं की आज काहीतरी होणार! जागा वर्कशॉपची असल्यामुळे आमच्याकडे शस्त्रं तरी काय, तर मोजक्याच मशीन गन्स्‌, रायफल्स्‌, स्टेनगन्स्‌ आणि जरूरीपुरती काडतुसं...
अंधार पडला, सामसूम झाली. लवकर जेवणं आटोपून सर्वांनी खंदकांत आपापल्या जागा घेतल्या...
रात्र वाढायला लागली. मिट्ट काळोख डोळ्यांत मावत नव्हता. रातकिड्यांची किरकीर, वार्‍यानं हलणार्‍या झाडांची-पानांची सळसळ, दूरवर जंगलात घुबडाचं ओरडणं यातून वाट काढत जीवघेणी शांतता कानांत घुसत होती. एक प्रहर असाच उलटला.
...आणि अचानक रात्री दीड-दोनच्या सुमाराला आमच्या दिशेनं गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. मशीनगनचेच आवाज होते ते. बंदुका चालवण्याचं आम्हाला मिळालेलं प्रशिक्षण हे रात्रीच्या काळोखात तसं फारसं उपयोगी पडणारं नव्हतं. तरीसुध्दा आम्ही जमेल तसा प्रतिकार करायला सुरूवात केली. अर्धा तास दोन्ही बाजूंनी गोळीबार चालू होता. तेवढ्यात आमच्या समोरच्या शेतात तोफेचा एक गोळा येऊन आदळला. कानांचे पडदे फाडणारा आवाज झाला. आगीचा प्रचंड मोठा लोळ उठला.
त्यांच्याजवळ केवळ मशीनगन्स्‌ नव्हत्या तर...!
तोफांसारख्या मोठ्या शस्त्रांचा मुकाबला आम्ही किती काळ करू शकणार होतो...? आमच्या वरिष्ठांची धावपळ सुरू झाली. पण वायरलेसवरून माहिती मिळाली की तोफेचे गोळे आमच्या संरक्षणासाठीच येत होते. वर्कशॉपपासून ३ कि.मी. अंतरावर आमच्या ब्रिगेडचं हेडक्वार्टर होतं. घुसखोरीची खबर मिळाल्यामुळे तिथून आलेल्या आज्ञेनुसार तोफखाना विभागामार्फत जवळच आमच्या मदतीसाठी अतिरिक्त तोफा तैनात केल्या गेलेल्या होत्या आणि गोळीबार सुरू झाल्यावर त्यांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली होती. आपल्या रक्षणासाठी इतक्या जवळ इतक्या संख्येनं तोफा सज्ज आहेत हे तोपर्यंत आम्हा कुणालाच माहीत नव्हतं.
त्या तोफा पहाटेपर्यंत धडधडल्या. सकाळी सगळं शांत झाल्यावर आम्ही आजुबाजूच्या वस्त्यांत चौकशी केली असता घुसखोरांनी काही प्रेतं पायांना दोरी बांधून ओढत नेल्याचं गावकर्‍यांनी सांगितलं! तोफगोळ्यांनी आपलं काम केलं होतं. सुदैवानं आमच्या छावणीतलं कुणीही कामी आलं नव्हतं.

पाकिस्तानच्या अश्या सततच्या कुरापतींचं पर्यावसान शेवटी १९६५ सालच्या ‘प्रसिध्द’ लढाईत झालं. आपले तत्कालीन पंतप्रधान कै. लालबहाद्दुर शास्त्री यांची रेडियोवरून प्रसारित होणारी भाषणं ऐकून आम्हाला तेव्हा स्फुरण चढत असे.
अवघ्या काही आठवड्यांची धुमश्चक्री... आणि सप्टेंबरमध्ये यूनोनं हस्तक्षेप केला. २३ सप्टेंबरला लढाई अधिकृतरीत्या संपुष्टात आली. नैतिकदृष्ट्या भारताचा विजय झाला, पाकिस्तानचं नाक कापलं गेलं. जगाला दाखवायला पाकिस्ताननं यूनोचा युध्दबंदी प्रस्ताव विनाअट स्वीकारला.

कुठल्याही लढाईनंतरच वर्कशॉपवाल्यांचं काम खर्‍या अर्थानं वाढतं. तंगधर या सरहद्दीजवळ असलेल्या गावाबाहेर आपली शीख रेजिमेंट कार्यरत होती. तिथे मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीच्या कामांची आवश्यकता होती. म्हणून मी आणि माझे सहकारी इन्फंन्ट्री इन्स्पेक्शनसाठी तिथे गेलो होतो. कडाक्याची थंडी होती. पण स्वच्छ ऊनही पडलेलं होतं. आम्ही उन्हात मोकळ्या जागेत आमचं काम करत होतो. दरम्यान दूरवर गोळीबाराचे ध्वनी-प्रतिध्वनी ऐकू यायला लागले. कामांत व्यग्र असूनही ते आवाज आमच्या चेहर्‍यांवर प्रश्नचिन्हं उमटवून गेले. युध्दबंदीनंतर आता खरं म्हणजे गोळीबाराचं काहीही प्रयोजन नव्हतं. तिथले लोक मात्र हे रोजचंच आहे असं सांगत होते.
दुपारच्या जेवणानंतर आमचं काम पुन्हा सुरू झालं. आता गोळीबार अगदी जवळ ऐकू येत होता. युनोच्या निरिक्षकांच्या गाड्यांची धावपळही सुरू झाली होती. काम अर्धवट टाकायला लावून रेजिमेंटच्या लोकांनी आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवलं. जेमतेम दहा मिनिटं झाली असतील नसतील आणि... जिथे आम्ही सकाळपासून काम करत होतो त्या जागी पाकिस्तानच्या हद्दीतून एक डोंगरी तोफेचा गोळा येऊन पडला!! मोठा स्फोट झाला. तोफगोळ्याचे कितीतरी तुकडे आमच्या पायांजवळ येऊन पडले. तिथल्या अधिकार्‍यांनी आम्हाला शेवटी अक्षरशः एका गाडीत कोंबलं आणि वर्कशॉपकडे परत पाठवून दिलं.
युध्दबंदीच्या कराराचं उल्लंघन झालं होतं. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा कुरापत निघाली होती. सैनिकांनी पुन्हा एकदा बंदुका सरसावल्या होत्या. तोफा पुन्हा एकदा धडधडण्यासाठी तयार झाल्या होत्या. स्थानिक लोक पुन्हा एकदा जीव मुठीत धरून आपापल्या घरांच्या बंद दारांआड भेदरून बसले होते...

काश्मिर खोर्‍याचं मूकपणे अश्रू ढाळणं सुरूच होतं!!

------------------------------------

(माझ्या सासर्‍यांचे आर्मीमधले मित्र श्री. कमलाकर प्रधान हे १९६४ ते १९६८ या काळात काश्मिरमधल्या सीमाप्रदेशात लोलाब व्हॅलीजवळ कार्यरत होते. या वेळची कथा त्यांच्या तिथल्या आठवणींवर बेतलेली आहे.)

(** वास्तविक हे घुसखोर म्हणजे प्रत्यक्षातलं पाकिस्तानी सैन्यच होतं. भारताच्या हद्दीत घुसून आपण काश्मिरी जनतेला चिथावणी देऊ शकू असा फाजील आत्मविश्वास त्यांना वाटत होता. ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ या नावानं ओळखली जाणारी पाकिस्तानची ही मोहीम शेवटी पूर्णपणे फसली.)

गुलमोहर: 

लेखन जबरदस्त आहे घटना साकक्षात डोळ्यांसमोर घडतेय असं वाटलं .असे प्रसंग वाचायला छान वाटत असले तरी अनुभवनार्‍यांना पुर्नजन्म झाल्याची प्रचिति येते.

छान लिहीलय नेहेमीप्रमाणेच Happy
>>>> ऑपरेशन जिब्राल्टर’ या नावानं ओळखली जाणारी पाकिस्तानची ही मोहीम शेवटी पूर्णपणे फसली.)
ती मोहीम जरी त्यावेळेस फसली, तरी नन्तर "खलिस्तानच्या" निमित्ताने तिने उचल खाल्लिच होती, अन आज पन्नासेक वर्षान्नी तर काय बोलावे?
असो

"आपापल्या घरांपासून हजारो कि.मी. दूरवर सर्वांनी अजून एक सण आठवणींसोबत साजरा केला होता" ... सैनिकांचे हे ॠण फेडता येणार नाहीत पण किमान त्यांच्या जीवावर आपण सुरक्षित आयुष्य जगतोय एवढं भान प्रत्येकाच्या मनात जागं राहिलं तरी पुरे !

लले नेहमी सारखच ग मस्त लिहीलयस !!एकदम चित्र उभ केलस डोळ्यासमोर !!! थरारक
खरच आशु, दाद ,कवी ला अनुमोदन Happy

ललीता-प्रिती,
लेखन अप्रतिम आहे. फारच मस्त....
पण यासोबतच मला एक आठवण नमुद कराविशी वाटते....साधारण १९८९-१९९० च्या दरम्यान मी तरुण भारत- नागपुर रविवार पुरवणीत युध्दस्य-रम्यस्थ कथा सदरात काही मिळत्याजुळत्या कथा वाचलेल्या स्मरतात. सगळ्या १९६२-चिनी आक्रमण आणि १९६५-पाकीस्तान युध्दाची पारश्वभूमी असलेल्या. या कथा वाचतावाचता त्या रोमांच उठवणार्‍या दिवसांची आठवण झाली.
धन्यवाद....

ललीता-प्रिती,
"हकीकत" सुन्दर लिहिली आहे. pravesh125 ने वाचलेल्या कथा मलाही वाचल्याचे आठवते. बहुदा डॉ. विनय वाईकर यानी लिहिल्या होत्या, अंगावर काटा आणणार्‍या त्या कथांचा संग्रह सुद्धा 'रक्तरंग" या नावाने प्रसिद्ध झाला होता. उर्दु शायरीचाही गाढा अभ्यासक असलेल्या सैन्यातल्या या वैद्यराजानेच 'आईना-ए-गजल' हा पण सुंदर ग्रन्थ लिहिला आहे. कधी वाचायला मिळेल कुणास ठाऊक.
त्या रक्तरंग मधिल एक कथा अशी होती की एक वैमानिक, त्याचे विमानाला पाकी सैन्याच्या गोळ्या लागुन विमान कोसळते, पण भारताच्या हद्दीत. हे सुदैव म्हणावे कि दुर्दैव अशी स्थिति निर्माण होते कारण कि तेथिल लोक त्याला पाकी वैमानिक समजुन मारहाण करु लागतात. जेव्हा वेदने मुळे "आई ग!" असा उदगार त्याचे मुखातून ऐकु येतो तेव्हा महाराष्ट्रात बालपण गेलेला एक हा मराठी भारतीय आहे हे काही लोकांना समजते. व मग त्याचा जीव वाचतो.अशी ती गोष्ट मला नीट आठवते.

Good to notte some members do care for,
Men Of War.
Thak you and,
Keep it flying,
at,
CL 9.
...

जबरदस्त खुप छान, पण एका गोष्टीचे वाईट वाटते अजुनही अश्याच प्रकारचे आक्रमण होत आहे, पण आपण ते परतावुन लावण्याशीवाय काहीच करु शकत नाही.
आपले नेते म॑डळी या बाबत कधी कडक भूमिका घेणार? ह्या नेते म॑डळी॑ना काळजी आहे ती आपल्या मता॑ची ह्या॑ना भर चौकात उभे करुन........
गेल्या साठ वर्षात जे झाले नाहि ते आत्ता काय होणार?
पण हा प्रस॑ग छान र॑गवून सा॑गितला आहे. हे अस काही वाचल की रक्त सळसळते.