युध्दस्य कथा : ४. रात्रंदिन आम्हा युध्दाचाच प्रसंग...

Submitted by ललिता-प्रीति on 11 August, 2009 - 01:16

पाकिस्तान आणि चीनच्या सीमारेषांलगत आपल्या भारतीय सैन्याला हिमालय पर्वतानं युध्दकाळात नेहमीच वडीलकीच्या नात्यानं साथ दिली आहे. भारतीय सैन्याला त्याचा किती आधार वाटतो ते तिथे सतत जागरुक राहून काम करणारा एखादा सैनिकच जाणे. पण कधीकधी हाच हिमालय आपल्याच सैन्याला आपल्या रौद्र रूपाची, लहरी हवामानाची प्रचितीही देतो; युध्दकाळातल्या आणीबाणीसाठी तयार असणार्‍या सैनिकांना शांततेच्या काळातही बिकट प्रसंगांना तोंड द्यायला लावतो. अर्थात, आपले शूर सैनिक त्यातूनही शिताफीनं मार्ग काढतातच. शिवाय हिमालयाकडून मिळालेलं हे ‘कडक ट्रेनिंग’ सैनिकांना अधिक काटक, अधिक चिवट, अधिक धाडसी बनवतं आणि मग त्या ट्रेनिंगची ‘कथा’ ऐकताना सामान्यांच्या अंगावर रोमांच उभे राहतात.
असाच ‘कडक ट्रेनिंग’चा एक धडा आम्हाला मिळणार होता. मृत्यूच्या दाढेतून परत येणं या शब्दांचा खराखुरा अर्थ समजणार होता. एखादी व्यक्ती किंवा प्रसंग देवदूत बनून येतात म्हणजे नक्की काय होतं याची प्रचिती येणार होती. हिमालयाच्या साथीनं शत्रूवर वर्चस्व गाजवणं शक्य असलं तरी त्याच हिमालयासमोर आपण किती कःपदार्थ ठरू शकतो हे उमजणार होतं...
पण, १९६१ सालच्या मे महिन्याच्या एका संध्याकाळी दिवसभराचं काम आटोपून जोरहाटला जाणार्‍या विमानात थकून-भागून चढताना मात्र आम्हा सहाजणांपैकी कुणालाच याची कल्पना असणं शक्य नव्हतं...!
त्यादिवशी त्या ए.एल.जी.वर आम्ही दिवसभर तळ ठोकला होता आणि त्याला कारण होतं आमचंच एक बिघडलेलं विमान. ते दुरुस्त करण्यासाठी भल्या पहाटे ‘एअर टॅक्सी’च्या पहिल्याच फेरीला वैमानिकानं आम्हाला तिथे नेऊन सोडलं होतं. दिवसभराची त्याची कामं उरकून संध्याकाळच्या शेवटच्या फेरीला तो आम्हाला जोरहाटला परत घेऊन जाणार होता.
चार वाजून गेले होते. आमचं काम जवळजवळ पूर्ण झालं होतं. आमचा वैमानिक निघायची घाई करत होता. कारण सूर्य मावळायच्या आत विमान जोरहाटला पोहोचणं गरजेचं होतं. ‘ऑटर्स’च्या वैमानिकांना हे एवढं एकच पथ्य पाळावं लागायचं. बाकी आमच्या त्या ‘एअर टॅक्सी’ची दुसरी काहीही मागणी नसायची! आपापल्या डांगर्‍या (दुरुस्ती कामाच्यावेळी तंत्रज्ञांनी घालावयाचा पोषाख) झटकत आम्ही आमची अवजारं आणि इतर सामान आवरायला सुरूवात केली. आमचा गणवेष वापरायची आमच्यावर तशी कमीच वेळ यायची. काही कार्यालयीन काम असेल किंवा काही विशिष्ट प्रसंग असेल तरच गणवेष आमच्या अंगावर चढायचा. नाहीतर काम करायला सोयीची अशी ही डांगरीच आमची साथीदार असायची.
सर्व सामानासकट आमचा सार्जंट आणि आम्ही चौघं विमानात चढलो तेव्हा पावणेपाच वाजत आले होते. म्हणजे निघायला तसा उशीरच झालेला होता. तरीही योग्य वेळेत जोरहाटला पोहोचणं वैमानिकाच्या अगदीच आवाक्याबाहेरचं नव्हतं.
विमानानं उड्डाण केलं तसं दिवसभराच्या कामाचा आढावा घ्यायच्या निमित्तानं आमच्या गप्पा सुरू झाल्या. आमचा वैमानिकही अधूनमधून संभाषणात भाग घेत होता. काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण झालेलं असल्यामुळे एक प्रकारचं समाधान होतं. थकायला झालेलं असलं तरी आम्ही सगळे बर्‍यापैकी सैलावलो होतो.
विमानाच्या खिडकीतून दूरवर पसरलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत होत्या. आसाम-अरुणाचल प्रदेशात वर्षभर हवा तशी पावसाळीच असते. त्यामुळे इकडे तिकडे पावसाचे ढगही तरंगत होते. विमानाच्या डावीकडे अगदी जवळ एक उंचच्या उंच डोंगरकडा होता. खाली घनदाट जंगल होतं. त्या गर्द हिरव्या जंगलाच्या मधोमध ‘ए.एल.जी’चा ठिपका लहान लहान होत चालला होता. दिवस मावळतीला आला होता. सूर्यही पेंगुळला होता. अजून अर्ध्या-एक तासातच त्या परिसरावर अंधाराचं साम्राज्य पसरणार होतं. त्यानंतर ते जंगल अजूनच भीषण वाटणार होतं. डोंगररांगा अजून भयाण होणार होत्या. दिवसभर जवानांची, विमानांची जिथे वर्दळ चालू असते ती ए.एल.जी.ची जागा अंगावर सर्रकन्‌ काटा आणणार्‍या रात्रीत मग शोधूनही कुणाला सापडली नसती. आम्ही मात्र त्यापूर्वीच जोरहाटच्या तळावर सुखरूप पोहोचणार होतो. निदान त्याक्षणीतरी त्याबद्दल काही शंका यावी अशी परिस्थिती नव्हती. पण पुढच्या पाच मिनिटांतच या निवांतपणाला जोरदार तडा जाणार होता...

आमच्या गप्पा चालू असताना अचानक वैमानिकानं मागे वळून आम्हाला सुरक्षा-पट्टे बांधायला सांगितले. आधी आम्हाला तो गप्पांच्या ओघात काहीतरी बोलतोय असंच वाटलं. पण पुढच्याच क्षणी तो काय सांगतोय ते आमच्या लक्षात आलं. आपापले सुरक्षा-पट्टे आवळता आवळता साहजिकच आमचं खिडकीतून बाहेर लक्ष गेलं. बघतो तर काय... डोंगररांगा, खालचं गर्द जंगल सगळं नाहीसं झालं होतं आणि नजर जाईल तिथपर्यंत काळ्या ढगांचं साम्राज्य पसरत चाललेलं होतं. वातावरण किती झपाट्यानं बदललं होतं! काही मिनिटांपूर्वीचं विहंगम दृष्य बघताबघता भूतकाळात जमा झालं. एक मोठा पावसाचा ढग आमच्या पुढ्यात उभा ठाकला होता आणि त्याला पार करून पुढे जाण्यासाठी वैमानिकाची धडपड सुरू झाली होती. ढगाच्या प्रभावामुळे अचानक वावटळ सुरू झाली आणि वार्‍याच्या जबरदस्त झोतामुळे आमचं विमान त्यात हेलकावे खाऊ लागलं - कधी उजवीकडे तर कधी डावीकडे! त्याचा जोर इतका असायचा की वैमानिकाला तिथल्या तिथे विमान ३६० अंशात वळवून परत मूळ दिशा पकडावी लागत होती. मध्येच विमानाची शेपटी अचानक इतकी वर ढकलली जायची की विमान वेगानं जमिनीच्या दिशेनं जायला लागायचं. पण वैमानिकावर आणि सुरक्षा-पट्ट्यांवर पूर्ण विश्वास असल्यामुळे आम्हाला आधी त्याची मजाच वाटली. एखाद्या मोठ्या ‘जायंट व्हील’मध्ये बसल्यावर जसे लहान-थोर सगळेच आरडाओरडा करत त्याची मजा घेतात तसाच आरडाओरडा आम्ही चालू केला. अचानक आमच्या सार्जंटकडे माझं लक्ष गेलं. जराश्या गंभीर चेहर्‍यानं तो उजवीकडच्या एका खिडकीतून एकटक बाहेर बघत होता. मी ही त्या दिशेला पाहिलं आणि चरकलोच! बाहेरचं आकाश अजूनच गडद झालं होतं. आम्ही सर्वांनी चपापून एकमेकांकडे बघितलं. प्रसंगाचं गांभीर्य आता आमच्या लक्षात आलं!
आता वावटळीचा जोर वाढला होता. ढग जरासा विरळ होतोय असं वाटलं की वैमानिक विमान आत घुसवे. पण अंतर्गत भागात इतका अंधार दाटलेला असायचा की तिथल्यातिथे मागे वळून परतावं लागे.
जास्त उंचीवर पावसाचे ढग अधिक दाट असतात. म्हणून वैमानिकानं विमान थोडं खाली घेतलं. पण तरीही तेच! मग त्यानं विमान अजून‌अजून खाली नेलं. पण ढगाचा पडदा भेदण्याचा त्याचा प्रयत्न पुनःपुन्हा अयशस्वी होत होता. विमान आता अति खालून धोकादायकरीत्या उडत होतं. खालचे झाडांचे शेंडेही दिसायला लागले होते. डावीकडचा उंच पर्वत ओलांडून पलिकडे जाण्याइतकी क्षमता आमच्या विमानात नव्हती आणि उजवीकडे खिडकीतून तो एकच एक आक्राळविक्राळ ढग क्षितिजापर्यंत पसरलेला दिसत होता. नाकासमोर सरळ जाण्याशिवाय वैमानिकाजवळ कुठलाच पर्याय नव्हता. ‘फोर्स लँडिंग’ करायचं तर खाली कुठेच शेत अथवा सपाट जमीन नव्हती. आता मात्र आमचं धाबं दणाणलं.
वार्‍याच्या तडाख्यामुळे विमान कोसळलं असतं तर एखाद्या झाडाच्या शेंड्यावर वेडंवाकडं अडकून बसलं असतं. अश्या वेळेला काहीही होऊ शकलं असतं... विमानाला आग लागली असती, इंधनाचा स्फोट होऊन सगळं खाक झालं असतं...
अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत आम्ही जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवर येऊन पोहोचलो होतो. मृत्यू आपला दरवाजा सताड उघडा ठेवून जणू आमच्या सर्वांची वाट बघत होता. होता होईल तेवढं डोकं शांत ठेवून समोरच्या परिस्थितीला तोंड देणं इतकंच वैमानिकाच्या हातात होतं आणि त्याची सुटकेसाठी चाललेली धडपड बघत राहणं इतकंच मागच्या आम्हा पाचजणांच्या हातात होतं. आता आठवून आठवून मला आश्चर्य वाटतं की त्यादिवशी आमचा सार्जंट सर्वात जास्त घाबरला होता. वास्तविक आमच्या तुकडीचं तो नेतृत्व करत होता. सेवाज्येष्ठतेमुळे तसाही तो आमचा वरिष्ठच होता. पण एक विलक्षण योगायोग म्हणजे त्यावेळी घर-संसार-मुलंबाळं असलेला तो एकटाच होता. बाकीचे आम्ही चौघं अजून अविवाहित आणि त्यामुळे त्यादृष्टीनं सडेफटींग होतो. मृत्यू पुढ्यात उभा असताना त्याला त्याचे पाश मागून आकांतानं हाका मारत होते आणि त्या हाकांना ‘ओ’ देण्याची ताकद त्या रौद्रढगानं त्याच्यापासून हिरावून घेतली होती. भीतीनं जणू शक्तिपात झाल्यासारखा तो निश्चल बसून होता. मनातल्यामनात देवाचा धावा करत असावा बहुतेक... आणि अचानक आशेचा एक अंधुकसा किरण आम्हाला दिसायला लागला.
आसपास सोसाट्याचा वारा जोरानं घुमत होता पण त्यातच उजवीकडून, खूप उंचावरून येणारा विमानाचा एक क्षीणसा आवाज आमच्या जिवाच्या कानांनी टिपला! एक संधी... कळत नकळत... मदत मिळण्याची एक बारीकशी आशा... पण ती आशा आमच्यात एक प्रकारचं चैतन्य खेळवून गेली. खरंच एखादं विमान आपल्या दिशेनं येतंय का? आपण संकटात आहोत हे त्या विमानाला कळेल का? त्यांची मदत आपल्यापर्यंत पोहोचेल का?... जणू या प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठीच आमच्या नजरा आता उजवीकडच्या खिडकीवर खिळल्या...
पुढच्या काही सेकंदांत लांब, उंचावर अजून एका विमानाची पुसटशी आकृती दिसायला लागली. म्हणजे आम्ही ऐकलेला आवाज खरंच एका विमानाचा होता. नशीबानं मृत्यूवर विजय मिळवायला सुरूवात केलेली होती! आता फक्त त्या विमानापर्यंत संदेश पोहोचवायचं काम आम्हाला करायचं होतं. एखादी आज्ञा मिळाल्यासारख्या आमच्या नजरा आता वैमानिकाकडे वळल्या. पण समोरच्या काळ्या राक्षसाचा सामना करण्यात तो इतका गर्क होता की अजून त्या दुसर्‍या विमानाचा आवाज त्यानं ऐकलाच नव्हता. मग मात्र आम्ही आरडाओरडा करून त्याचं त्या आवाजाकडे लक्ष वेधलं. ते विमान आता अजून जवळ आलं होतं. आकार, आवाज आणि वेगावरून ते एक ‘डाकोटा’ जातीचं विमान आहे हे आमच्या लक्षात आलं. ‘डाकोटा’तली एक वैमानिक, एक सहवैमानिक, एक ‘एअर-सिग्नलर’, एक ‘फ्लाईट-इंजिनीयर’, एक ‘नॅव्हिगेटर’ इ. तंत्रज्ञांची तुकडी आणि इतर १५-२० जण हे त्याक्षणी अक्षरशः देवदूत म्हणून अवतरले होते. संकटकाळी एखादी वडीलधारी, अनुभवी व्यक्ती अनपेक्षितरीत्या मदतीला आल्यावर जसा आधार वाटतो तसं काहीसं आम्हाला वाटलं. आता काय वाट्टेल ते करून आम्ही त्यांची मदत मिळवण्याचा प्रयत्न करणारच होतो...
आमच्या वैमानिकाच्या हालचालींनाही आता निराळ्या तर्‍हेनं वेग आला. विमानाची दिशा सांभाळता सांभाळता त्यानं त्या दुसर्‍या विमानाशी संपर्क साधायची धडपड सुरू केली. सर्वांच्याच सुदैवानं २-३ प्रयत्नांतच त्याला यश आलं आणि आमचा ‘एस्‌-ओ-एस्‌ (सेव्ह अवर सोल)’ चा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला.
डाकोटाच्या वैमानिकानं सर्वात आधी आम्हाला धीर दिला, स्वतःचं विमान जरा वरच्या दिशेला नेऊन उजवीकडे पसरलेल्या ढगाच्या आकाराचा अंदाज घेतला आणि ढगाला वळसा घालून उजव्या बाजूनं आम्ही जाऊ शकू असं आम्हाला कळवलं. जिवात जीव येणं म्हणजे काय ते त्याक्षणी कळलं.
दरम्यान आमच्या सार्जंटच्या चेहर्‍यावर आता निराळीच चिंता दाटून आली होती. ढगाच्या विळख्यातून सुटका करून घ्यायला अजून किमान १५-२० मिनिटं तरी लागणार होती. दिवसभर ‘शटल सर्विस’ करून परतीच्या वाटेला लागलेली आमची एअर-टॅक्सी... तिच्यात आता पुरेसं इंधन शिल्लक असेल की नाही??... पण नशीबानं एव्हाना आमची पुरेशी परिक्षा घेतलेली होती... आमच्या सुटकेच्या मार्गात आता कुठलाही नवीन अडथळा येणार नव्हता... विमानात पुरेसं इंधन शिल्लक होतं!
आम्हाला दिलासा देण्यासाठी डाकोटाच्या वैमानिकानं विमान अगदी खाली आमच्या पातळीपर्यंत आणलं. ढगाची व्याप्ती एव्हाना त्याच्या लक्षात आलीच होती. उजवीकडे वळून त्यानं आम्हाला पाठोपाठ येण्यास सांगितलं. मोठयांचं बोट पकडून निर्धास्तपणे त्यांच्या १-२ पावलं मागून चालणार्‍या लहान मुलांप्रमाणे आम्ही डाकोटाच्या मागेमागे जात राहिलो. ढगाला वळसा घालून आम्ही परत जोरहाटची दिशा पकडेपर्यंत त्यांनी आमची सोबत केली...
जिवावरचं संकट टळलं होतं. डाकोटाच्या मदतीनं ढगाला भेदून पुढे जाण्यात अखेर आम्हाला यश आलं होतं...

ढगात विमान अडकण्याचे प्रसंग तसे अनेकदा यायचे. पण ते इतके गंभीर कधीच नव्हते. खरंतर सैन्यात नोकरी पत्करल्यावर आम्हाला कुणालाही मृत्यूचं भय बाळगण्याचं कारण नव्हतं... पण तो मृत्यू शत्रूशी लढताना येणारा असणार होता; अश्या प्रकारे दुर्दैवी अपघातात सापडून येणारा नव्हे!
दोन सैन्यातली धुमश्चक्री, त्यातला थरार, शस्त्रास्त्र-दारूगोळा यांचा वापर, ती विमानं, सैनिकांच्या त्वरेनं हालचाली, ते एकमेकांना संदेश पाठवणं... हे सगळं सामान्य माणसाला खिळवून ठेवतं. पण या प्रसंगानं हे अधोरेखित केलं की थरार फक्त युध्दकाळातच असतो असं नाही.
तसंही, युध्दकाळ आणि शांततेचा काळ ही विभागणी सामान्यांसाठी असेल पण सैनिकांसाठी मात्र ‘रात्रंदिन आम्हा युध्दाचाच प्रसंग...’ हेच वास्तव असतं.

गुलमोहर: 

ललु, जबरदस्त वर्णन केलयस, डोळ्यासमोर चित्र उभ राहिल, अतिशय थरारक , खिळवउन ठेवणार वर्णन

ग्रेट! छान लिहीलय, अगदी नजरेसमोर चित्र उभ रहात! Happy
मराठीत अशा कथान्ची वानवा आहे, पुढेमागे जमल्यास जरुर पुस्तक काढा

एकदम खिळवून ठेवणारं वर्णन केलयस्.मी ही खुप वेळा हेलिकाँप्टर ने प्रवास केलाय आणि काही वेळा खराब हवामानात सापडलोय्.तु लिहिल्याप्रमाणेच माझ्या ही मनात हेच विचार यायचे त्या वेळी.

छान लिहलस्.......या मालिकेतल्या सगळ्याच कथा अप्रतिम आहेत.

बाबांच्या अनुभवाच्या गाठोड्यातल्या काही गाठी सोडल्यास का इथे.?.......... खूपच छान लिहिलं आहेस लली.

अतिशय सुंदर वर्णन! डोळ्याम्समोर चित्र उभे राहिले. या मालिकेबद्द्ल धन्यवाद!

म्हणजे हे सारं खोटयं? अरे या प्रतिक्रिया काय म्हणताहेत? हे निव्वळ लिहिलय की खराखुरा अनुभव आहे? मी त्या थरारातून अजून बाहेर येतोय

Pages