मधुमेहः आयुर्वेदिक औषधोपचार

Submitted by गजानन on 11 February, 2016 - 09:11

मधुमेह आणि आयुर्वेदिक उपचार आणि त्यांचे (सु)(दु:) परिणाम यावर इथे चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे.

तुम्हापैकी कोणाला मधुमेहावर आयुर्वेदिक औषधांचा अनुभव आहे का?

मधुमेही व्यक्तींना अनेकदा आयुर्वेदिक औषधे घेऊन बघा, तुमची सगळी औषधे बंद होतील, असा सल्ला दिला जातो. त्या अमक्या अमक्याची औषधे पूर्णपणे बंद आहेत, असे ऐकून त्या संबंधित रुग्णाकडे खोलात जाऊन चौकशी केली असता त्यांना अजूनही रक्तशर्करा नियंत्रणासाठी अ‍ॅलोपथिक औषधे (गोळ्या किंवा/आणि इन्शुलीन) घ्यायला लागतात असे समजले. (आयुर्वेदात मधुमेहावर उपचार उपलब्ध नाहीत, असे इथे अजिबात म्हणायचे नाही. किंबहुना रोजच्या गोळ्या आणि इन्शुलीनमधून सुटका करून देणारी आयुर्वेदिक औषधे मिळाली तर कोणताही मधुमेही तुम्हाला आशीर्वादच देईल. पण एक-दोन उदाहरणात खोलात गेल्यावर वरीलप्रमाणे समजले, म्हणून नमूद केले इतकेच.)

मुंबई, नवी मुंबई अथवा पुण्यात चांगले आयुर्वेदिक मधुमेहतज्ज्ञ माहीत असतील तर कृपया इथे माहिती द्या.

आमच्याकडे एका मधुमेह्याकरता एका नातेवाईकांनी आस्थेने (अर्ध्या दिवसाचा प्रवास करून) एक आयुर्वेदिक औषध आणून दिले आहे. ते औषध म्हणजे कसल्यातरी झाडाच्या पातळ तासलेल्या साली/ढपल्या आहेत. त्या पाण्यात भिजत ठेवून ते पाणी प्यायचे असे त्या नातेवाईकांनी ते औषध देताना सांगितले. डॉ. सल्ल्याशिवाय असे काही अज्ञात देणे नको वाटते. त्या सालींविषयी कोणाला काही माहिती आहे का? आम्हाला त्या सालींविषयी अगदी प्राथमिक स्वरुपाची देखील माहिती मिळू शकली नाही. दुसरे म्हणजे आम्ही अ‍ॅलोपॅथिक डॉ. ना व्यवस्थित कल्पना देऊन दुसरे एक आयुर्वेदिक चूर्ण आधीच चालू केले आहे. तेंव्हा सध्या हे सालींचे औषधही आताच चालू करण्याचा विचार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या बाबांनी आधी बरेच महिने (ज्यावेळेला शुगर डिटेक्ट झाली आणि बरीच कमी प्रमाणात होती) त्यावेळेला जाभंळाच्या बियांची पावडर नियमितपणे घेतली होती. आमचे फॅमिली डॉक्टर आयुर्वेदिक वैद्य आहेत; त्यांच्या सल्ल्यानी पावडर घरीच करून वापरायचे. पण नंतर गोळ्यांवर आलेच कारण साखरेचं प्रमाण वाढलं आणि वयही. आता नियमित गोळी घेतात + बाकी सगळी नेहेमीची पथ्य आहेतच.

बाबांना गेली २०-२५ वर्षं मधुमेह होता.२ वर्षापूर्वी गेले.
त्यांनी नियंत्रण जे काही ठेवले होते ते इन्स्युलीन इंजेक्शन, प्राणायामाने आणि चालण्याने. आयुर्वेदिक औषधे मागवली होती पण त्याचा विशेष व्हिजीबल परीणाम दिसला नाही.मी डॉक्टर नाही पण जे जाणवले ते सांगते: मधुमेह अन्कंट्रोलेबल झाला(क्रियाटिनीन वाढणे झपाट्याने चालू झाले) ते काही ताणतणाव चालू झाल्यावर.ताण हा सर्वात मोठा शत्रू आणि मधुमेह्याचा स्वभाव हा त्याखालोखाल. 'मी हे का खाऊ, ते का खाऊ नको, डॉ ने गोळ्या दिल्या आहेत पण मला दिवसातून तीनदा ऐवजी दोनदाच घ्यायच्या आहेत,औषध महाग आहे,या महिन्यात स्किप करतो(पैसे असून), आता ते आयुर्वेदिक औषध चालू आहे ना, मग अ‍ॅलोपथीचं बंद करतो, नाहीतर नक्की कशाने परीणाम झाला कळणार नाही' या सर्व गोष्टी आल्या की उताराला लागलेल्या पाण्याला आवरणे कठीण.(हे इतक्या निराशावादी सुरात लिहायचं नव्हतं पण आजूबाजूच्या २-३ केसेस आठवल्या त्यामुळे हा सूर आला.)

'मधुमेहाला मित्र बनवून सांभाळा आणि काळजी घ्या, त्याची साथ आयुष्यभर आहे.' असं कोणीसं म्हटलंय.
बाकी डॉ लोक करेक्ट दिशा दाखवतीलच.

त्या ढलप्या सात्विन या झाडाच्या असणार. माझ्या गावी एकाच्या अंगणात हे झाड आहे आणि ती बाई खूप छोट्या मोठ्या आजारांवर त्याच्या ढलप्या काढून देते. सात्विन उर्फ alstonia scholaris मध्ये औषधी गुणधर्म आहेत.

आमच्या गावी gymnema sylvestre बेडकीचा पालाही बरेच लोक मधुमेहावर घेतात. इथेही सरस महोत्सवात हा पाला एका स्टॉलवर मी पाहिला. हा कितपत उपयोगी आहे माहीत नाही पण मला तरी तो अजिबात उपयोगी वाटत नाही. माझे काका नियमित घेत होते पण आहाराकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले आणि शेवटी मधुमेहानें त्यांचे हृदय निकामी केले.

एकदा का तुम्हाला मधुमेहाने गाठले कि असले गावठी उपचार करण्यात अर्थ नाही असे मला वाटते. मधुमेह हा खूप लोकांना होतो, त्यामुळे परिचयाचा झालाय आणि त्यामुळे कधीकधी आपण तेवढ्या गाम्भिर्याने त्याच्याकडे पाहात नाही. पण हा गुपचूप आतल्या आत एकेक अवयव निकामी करतो. याला रोजच्या दिनक्रमात आणि आहारात योग्य बदल करून काबूत ठेवणे आवश्यक आहे. माझ्या वडलांच्या कुटुंबात हा विकार आहे. माझ्या वडलांच्या पिढीपर्यंत सगळ्या पुरुषांना हा विकार झाला. माझ्या सख्ख्या व चूलत भावंडांना अजून तरी त्रास नाही. स्त्रिया आजवर नव्हत्याच, मीच पहिली. त्यामुळे मी शक्य ती काळजी घेते. पण उद्या मधुमेह आढळलाच तर डॉक्टरकडेच जावे लागणार. मी तरी अशा उपायांवर विसंबून आयुष्य धोक्यात घालू इच्छित नाही.

माझ्या आईला दम्यासाठी असंच एक रामबाण औषध कुणी तरी दिलं होतं. दमा इतका दम काढणारा आजार आहे की कुठल्या का होइना औषधानं बरं वाटलं तर बघावं अशा विचारानं आईनं अगदी श्रद्धेनं ते औषध बरेच महिने घेतलं पण फार उपयोग झाला नाही. अर्थात तिची इतर औषधं (नेब्युलायझर वगैरे) सुरूच होती, बंद करून चालण्यासारखं नव्हतं. सर्दी-खोकल्यासारख्या औषधांवर आयुर्वेदिक किंवा घरगुती उपचार करणे वेगळे. अस्थमा किंवा मधुमेहासारख्या विकारांवर करणे जीवघेणे ठरू शकते असे एकुणात मत झाले आहे.

आमच्या घरीच आयुर्वेदिक वैद्य आहेत, मात्र मधूमेहासाठी मुख्य डॉक्टर हे अ‍ॅलोपॅथीचेच आहेत. आयुर्वेदाच्या सल्ल्यानुसार जीवनपद्धतीत बदल, पुरक औषधे आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार नियमित टेस्ट्स, औषधे असे करतात. कुणी मुळ्या, साली वगैरे सुचवल्या तरी तज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा. ड्रग इंटरअ‍ॅक्शन चा धोका लक्षात घेवून जे काही उपचार आहेत ते सर्व डॉक्टरांना माहित असणे फार महत्वाचे.

मी_अनु, चांगली पोस्ट. अशा अनेक केसेस आणि तुम्ही सांगितलेली कारणं अनेक वेळा ऐकली आहेत. या सापळ्यात अडकू नका.

"मधुमेह" नामक आजारात लघवीतून साखर जाते, हे निरिक्षण करणे, व हा एक वेगळा आजार आहे, हे व्याख्यित करून त्या आजाराची लक्षणे इ. शास्त्रीय पद्धतीने नोंदविणे हे इतक्या जुन्या काळात आयुर्वेदाने केले. बहुदा चरक नामक वैद्याला याचे श्रेय दिले जाते, व त्या अचाट निरिक्षणशक्तीसाठी व इतक्या अ‍ॅडव्हान्स्ड विचारांसाठी त्या वैद्यराजास माझे विनम्र व मन:पूर्वक नमन.

परंतु,

या आजाराची डेफिनिशन व अनुभवसिद्ध आहार पथ्य, व विहार सांगितल्यानंतर, मधुमेह हा आजार, आयुर्वेदातही असाध्य आहे, असेच नमूद केलेले आहे, हे कृपया ध्यानी ठेवावे. (असाध्य = बरा करता न येणारा. कोणत्याही औषधोपचारांचा उपयोग न होणारा.)

हे↑ फक्त, 'आयुर्वेदिक औषधांनी मधुमेह बरा होतो. इन्शुलीन, गोळी सुटते,' इ. दावे करणार्‍या 'आयुर्वेदिक' 'डॉक्टरां'च्या प्रचाराच्या संदर्भाने लिहिले आहे.

*

(इथून पुढच्या प्रतिसादाचा संबंध आयुर्वेदाशी नाही. तसाच तो कोणत्याही ट्रीटमेंटशीही नाही. कदाचित हे मी पूर्वी लिहिले असेल इथे.)

डायबेटीस डिटेक्ट झाला की माणूस घाबरतो. अन पहिले वर्ष दीड वर्षं वगैरे पथ्य, उपचार इ. व्यवस्थित करतो.

नंतर आपल्याला हळूहळू वाटू लागतं, की 'अरे! मला 'त्रास' तर काहीच होत नाही. च्याय्ला, दर २-३ महिन्याने लॅबला जा, तपासण्या करा. हे xxxx एका कागदावर शुगर प्लस प्लस लिहितात अन माझ्याकडून पैसे काढतात. परवाच त्या अमक्याच्या लग्नात मस्त ४ गुलाबजाम हाणले तरी मला त्रास तर काहीच झाला नाही.'

मग हळूच डायबेटिस 'मित्र' होतो, अन त्याची अतिपरिचयात् अवज्ञा होऊ लागते.

(याचाच फायदा हे तथाकथित जांभळाच्या खोडाचं पाणी, लाकडाच्या ढलप्या, झाडपाले, अन अमुक पुड्या अन तमुक भंडारे - ताईतवाले उचलतात. डिनायल फेजमधला पेशंट याला बळी पडतो.)

लोकहो, प्ली ज लक्षात घ्या, डायबेटीस तुमचा मित्र नाही. शत्रूच आहे. त्याला नीट ओळखा, त्याच्यासोबत जगायला शिका. पण त्याच्याशी 'मैत्री' करू नका, त्याच्या उपचारपद्धतीशी व डायबेटीक जीवनपद्धतीशी मैत्री करा. (Lifestyle modification)

तुमचा डायबेटीस जोपर्यंत कागदावर दिसतो आहे, तुमच्या शरीरास व्हिजिबल्/जाणवणेबल त्रास देत नाहिये, तोपर्यंत त्याची ट्रीटमेंट करण्यात मजा आहे.

एकदा त्याने गुण "दाखवला" की आमच्याकडे पॉझिटिव्ह ट्रीटमेंट नाही. तुमच्या पायाला जखम झाली, आम्ही बोट किंवा पायही कापून टाकायचा सल्ला सांगतो. रेटिना खराब झाला, आम्ही लेझरने खराब भाग जाळून टाकतो. किडनी खराब झाली, आम्ही डायलिसिस किंवा किडनी बदलायला सांगतो. अन ही तर फक्त झलक आहे.

ज्या वेळी तुम्हाला 'त्रास होत नाही' असे वाटत असते, त्या वेळात हा डायबेटीस गुपचुप तुमचे शरीर पोखरत असतो. त्याला आटोक्यात ठेवले नाही, तर कालांतराने 'त्रास' देतो, अन मग त्यावेळपर्यंत आमचे उपचार खुंटलेले असतात.

तेव्हा, "ऑन पेपर" डायेबेटीक आहात तोवर

१. व्यायाम
२. पथ्य
३. औषधे
४. नियमीत तपासणी*.

या बाबी गरजेच्या आहेत.

नंतर तर आहेतच आहेत, पण एकदा झटका खाऊन सुधरण्यापेक्षा आधीच सुधरलेत तर बरे नाही का ? Wink

*अ‍ॅलोपथी डॉक्टरकडून. दरमहा लघवीतील साखर घरी. वर्षातून किमान ४ वेळा लॅबमधून रक्तातील साखर, त्यानंतर फिजिशियनकडून डाएट/ड्रग मॉडिफिकेशन. दर वर्षी डोळे तपासणी : यात विशिष्ट जाडीच्या रक्तवाहिन्या त्या डॉक्टरला डायरेक्ट दिसतात. या रक्तवाहिन्या बंद पडणे हा खरा डायबेटीसचा आजार आहे. लघवीत साखर हे केवळ लक्षण.

योकु, सुरुवातीला आमच्याकडेही जांभूळचूर्ण, कारल्याचे चूर्ण, मेथीच्या बियांचे चूर्ण वगैरे चालू होते. आणि अनेक वर्षे जुजबी* गोळीवर एकदम टकाटक चालू होते. पण मग अचानक गाडी इन्शुलीनवर घसरली आहे.
अनु, हो. <<पाण्याला आवरणे कठीण>>अगदी.

साधना, सिंडरेला, स्वाती. आयुर्वेदाचे औषध सुरू केल्यावर मोजता येण्याइतपत अथवा डोळ्यांना, शरिराला जाणवतील इतपत परिणाम सहज दिसू न आल्याने तिकडे विश्वास डळमळायला लागतो. मला व्यक्तिशः राहून राहून असे वाटते की आयुर्वेदाच्या पोटात भरपूर जालीम इलाज दडलेले आहेत पण काहीसे विस्कळीत झाले आहे सगळे.

साधना, झाडाच्या माहितीबद्दल धन्यवाद.

* - दिवसातून अर्धी / एक इतपतच

दीड मायबोलीकर, तुमचा मोठा प्रतिसाद आता दिसला. नंतर निवांत वाचतो. तो उद्बोधक असेल याची खात्री आहे. म्हणून आधीच धन्यवाद.

दीमा, खुप छान पोस्ट.

गजानन, माझी आई गेल्या तीस वर्षांपासून मधुमेह ताब्यात ठेवून आहे. अर्थात ती अलोपथीचीच औषधे घेतेय.
नियमित तपासणी, जरुर तेवढा व्यायाम आणि आहार नियंत्रण याला पर्याय नाहीच.

बाकीचे सर्व उपाय केवळ मानसिक समाधान देतात. पण कधी कधी हि पाने खा मग हवी तेवढी साखर खा, असे सांगत जे उपाय केले जातात ते जीवावर बेतण्याचीच शक्यता आहे.

अशीच एक पाने खाऊन, जिभेच्या संवेदनाच जातात असा अनुभव मी स्वतः घेतला आहे.

दिमा चांगली पोस्ट पण थोडीशी निगेटिव्ह वाटली (कितीही सत्य आणि अंतिम सत्य असली तरी).
म्हणजे मी डायबेटिक असते तर तुमची पोस्ट वाचून घाबरून गेले असते आणि आणखी तणावात राहिले असते.
पण तरीही शांत डोक्याने प्रॅक्टिकल विचार करायचा म्हणलं तर प्रचंड सुंदर पोस्ट आहे.

येस. करेक्ट दिमा. त्यामुळे आजकाल बाबा सरळ अ‍ॅलोपॅथी डॉक कडे नियमित चेक अप आणि गोळ्या + बाकी व्यायाम (रोजचा बर्‍यापैकी मोठा राऊंड वॉक, योगा); वेळेवर जेवण, नाश्ता, खाणं ते ही प्रमाणात हे सगळं असतंच

दिमा, उत्तम पोस्ट.

गजानन, आयुर्वेदिक उपचार पद्धती उत्तम आहे मात्र त्या उपचार पद्धतीच्या स्वतःच्या अशा मर्यादा आहेत. चांगले वैद्य या मान्य करतात. त्याच जोडीला काही आजार हे व्याधी स्वरुपाचे असतात ते मॅनेज करावे लागतात त्यामुळे त्या बाबत पूर्ण बरा झाला हा दावा चुकीचा असतो. माझ्या आजोळच्या घरात ३ पिढ्यांपासून आयुर्वेदाचे अभ्यास-वैद्यकी. मात्र हा काढा, चूर्ण घ्या आणि मधूमेह पूर्णपणे बरा होइल असा दावा कुणी केला नाही. जीवनपद्धतीत बदल केल्याने कागदावर बॉर्डरलाइन असलेला मधुमेह आवाक्यात येणे, रिवर्स होणे झाले तरी पुन्हा चुकीची जीवनपद्धती अंगिकारली की स्थिती जैसे थे होते.
माझ्या काकांना ४० व्या वर्षी मधुमेह झाला. जीवन पद्धतीत बदल/व्यायाम, नियमित वैद्यकीय तपासण्या, पथ्य , औषधे यामुळे शेवटपर्यंत व्याधीचा फारसा त्रास न होता ८०+ वर्ष अतिशय प्रॉडक्टिव आयुष्य जगले.

मागच्या महिन्यात एका कलिगचा चाळीसावा वाढदिवस साजरा झाला

"Now I can say I lived with diabetes for 30 years" असं तो म्हणाला तेव्हा खरंच काय प्रतिक्रिया द्यावी कळेना. हा माणूस वयाच्या दहाव्या वर्षापासून फॅमिलीमध्ये असलेला टाइप१ डायबेटिसबरोबर जगतो आहे. अमेरिकन असल्यामुळे त्याचा आणि आयुर्वेदिक औषधांशी काही संबंध अर्थातच नाहीये. सध्या तो इंन्सुलिन पम्प वापरतो (इतर औषधंही/रेग्युलर चेकअप्स असतीलच). या ऑफिसला तो अलमोस्ट त्याच्या इंजि.नंतर पासून काम करतो त्या काळात एकदाच त्याची ब्लड शुगर प्रचंड कमी झाल्यामुळे अँम्ब्युलन्स बोलवावी लागली होती. बाकी "आय एम फाइन" सगळ्या तपासण्या करणे, डाएट चक्र सांभाळणे करत असतो. गोड खावंच लागलं तर पम्प वापरतो असं मिश्किलीने म्हणतो. फॅमिलीचा प्रचंड सपोर्ट आहे असं त्याच्या बोलण्यात जाणवतं कारण घरातच डायबेटीस आहे पण तरी हे मला महत्वाचं वाटतं. कधी या विषयावर त्याच्याशी आणखी दीर्घ चर्चा झाली तर इथे लिहेन सध्या इतकंच. नॉट शुअर मी इतकं पर्सनल होऊ शकेन Happy

एक अवांतर म्हणजे तो जिथे आहे तिथे एकंदरित इंश्युरन्समुळे किंवा जे काही कारण असेल मिळणारी साधनसामुग्री, रोज चार वेळा पॉकेट साइज यंत्राने रक्तातली साखर मोजू शकणे, वर्क-लाइफ बॅलन्स पर्याय आणि अवेअरनेस/अफोर्डेबिलीटी आपण आपल्या देशाशी तुलना अर्थात करू शकत नाही. जे निदान अफोर्ड करू शकतात त्यांनी अवेअरनेस आणला तरी खूप होईल असं नात्यातल्या काही उदा. वरून वाटतं.

दिमा चांगली पोस्ट Happy

वेका, माझ्या मुलाचा मित्र देखील टाइप १ आहे. इथे शाळेत देखील फार छान काळजी घेतली गेली. दरवर्षी त्याला शिकवणार्‍या शिक्षकांना स्कूल नर्स सुचना पत्रक द्यायची. मुलांनाही अपडेट केले जायचे. शिक्षक आपापल्या वर्गात त्याची शुगर मेन्टेन करण्यासाठी योग्य स्नॅक्स ठेवायचे.

"Now I can say I lived with diabetes for 30 years" >>>> अमेझिंग!

थोडं अवांतर पण बारीक-सारीक दुखण्यांची स-त-त वाच्यता करून अटेन्शन सीकिंग करणार्‍यांनी बोध घ्यावा खरंच.

मी सुरुवातीला १ वर्ष आयुर्वेदिक उपचार करुन बघितले.. उपयोग होतो अथवा नाही ह्यापेक्षा आयुर्वेदिक औषधी घेणे मला जास्त कठीण गेले... कारण त्या औषधात ४/५ गोळ्या... ३/४ चुर्ण... आणि २/३ लिक्विड औषध असे होते.. जे की मला जेवण झल्यावर घ्ययचे जीवावर येत होते... वर्षभर हे सर्व केले आणि मग मात्र बंद केले..
आता डॉ ने सांगितलेल्या गोळ्या... चालणे... जिम...आणि सगळ्यात महत्वाचे डायट सांभाळने...असे रुटीन चालु आहे.

माझ्या घरी आजी, वडील सर्वांना डायबेटीस. त्यात इतर दुखण्यांमुळे प्रकरण अधिकच क्लिष्ट झालेले. पण आजीचा हट्टीपणा, वय त्यामुळे होणारे दुष्परिणाम, सतत हॉस्पिटलच्या वार्या, इतरांना होणारा त्रास, मला तिला रोज तीनदा द्यावी लागणारी इंजेक्शन्स पाहून वडिलांनी बोध घेतला व सुरवातीपासूनच नियंत्रण ठेवले. त्यात शुगर जास्त झाली की त्यांच्या मूळ आजारावरची औषधे कमी परिणाम करतात व आणखीच त्रास वाढतो हे पाहिल्यावर त्यांनी धसकाच घेतला. दुर्दैवाने आजीच्या दोन्ही पायांचे अंगठे व वडिलांच्याही एका पायाचा अंगठा काढावा लागला जखम बरी होत नाही कळल्यावर. जेव्हा हाताच्या अंगठ्याला जखम झाली तेव्हा तर ते पूर्ण खचले. पण नशीबाने ती जखम बरी झाली. पण 'असाध्य' अशा ज्या मूळ आजारासोबत ते वीस वर्षं जगत होते तिथे या मधुमेहाने तीन चार वर्षांतच त्यांचे मनोधैर्य ढासळवले. दीमांची पोस्ट वाचताना त्या आठवणींनी डोळे भरून आलेत. कुणालाही होऊ नयेत इतकी कॉम्प्लिकेशन्स! काळजी घ्या.
वडिलांना डॉ नेच सुचवलेले एक आयुर्वेदिक सिरप होते 'यसाका' नावाचे. मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध आहे. यामुळे त्यांना विशेष चांगला परिणाम जाणवायचा. त्या बाटलीवरच प्रमाण लिहीलेले असते. हे च्यवनप्राश वगैरेसारखे काम करते बाकी औषधे चालू होतीच.

दिमा खूप चांगला प्रतिसाद.

दरमहा लघवीतील साखर घरी. >>>
दिमा, मुळात मधुमेह नसतांना precution म्हणून टेस्ट केली तर चालते का? मला मधुमेह नाही पण फॅमिलीहिस्ट्री डायबेटीसची. अ‍ॅन्युअल चेकअप लॅब मध्ये करत असते. पण असे किट मिळत असेल तर precution म्हणून घरी टेस्ट करेन.
घरी टेस्ट करण्यासाठीचे ब्ल्ड टेस्ट किट बघितले आहेत पण त्यात टोचवून घ्यावे लागते. तुम्ही सांगितलेले युरीन टेस्ट कीट मेडिकलमध्ये मिळेल का?

आजच्या व्रुत्तपत्रात मधुमेहावरील एक रिपोर्ट वाचला त्यावरुन डाएटमधे जर कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी व प्रोटीनचे व unsaturated fats प्रमाण जास्त असेल तर type 2 मधुमेहिन्च्या औशधात ४० टक्के कपात होउ शकते. काही जण तर औशध मुक्त झाले आहेत. हा रिसर्च प्रोफेसर ग्रान्ट ब्रिन्कवर्थ यानी केला आहे. ६ वर्शापूर्वी मी स्वतः त्यान्च्या एका रिसर्च प्रोजेक्टमधे भाग घेतला होता. ग्रान्ट अनेक वर्शे मधुमेहावर रिसर्च करत आहेत. अधिक माहिती साठी त्यान्चे नाव गुगल करा .

चांगला आहे धागा. जेवढे मधुमेहाबद्दल वाचत आहे तेवढी ह्या आजाराची भिती वाढत आहे पण त्याचसोबत एक जागरुकता येते आहे. वर्षभरापासून साखरविरहीत चहा पितो आहे. त्यात दालचिनी, लवंग, वेलची, गवतीचहा हे सर्व घालतो. पुर्वी दालचिनीची चव अजिबात आवडायची नाही पण त्याचा फायदा आहे हे माहिती झाल्यावर रोज दालचिनीची एक काडी चहात घालतो. इथे श्रिलंकन दालचिनी मिळते ती भारतीय दालचिनीपेक्षा जास्त चांगली लागते चवीला. सध्या माझ्या रक्तातील साखर ४.७ आहे. मागच्या वर्षी ती ४.५ होती. ह्याचा अर्थ वाढत्या वयानुसार साखर वाढते आहे.

इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो. मधुमेह होऊच नये म्हणून काही दक्षता बाळगता येते का? जसे मी रोज दालचिनी सेवन सुरु केले आहे. योगा तर रोज असतोच असतो. पुर्वी मी अडीच चपात्या खायचो आता दीड केली आहे. कारण कार्बो कमी केले की साखर निर्मिती कमी होते.

ज्यात स्टार्च खूप असते असे पदार्थ खात नाही. जसे की बटाटे, मका हे मी केंव्हाच सोडले आहे. भात सुद्धा महिन्यातून एक ते दोन वेळा. तोही अर्धा वाटीभर. जास्त भर पालेभाज्या, फळभाज्या, फळफळावळ, अगोड सुकामेवा. कारली, काटुरली हे महिन्यातून एक दोन वेळा.

माझा एक मित्र आहे तो इथे सी. ई. ओ. आहे. तो माझ्याकडे योगाभ्यास शिकायला यायचा. त्याला मी अर्ध-मच्छिद्रासन शिकवले आणि त्याने ते नियमित केले.. रोज तीनदा करतो. हे आसन मधुमेहींसाठी एक फार मोठे वरदान आहे. किडनीसाठी हे आसन अत्यंत प्रभावी आहे. तर मीही हे आसन रोज करतो.

तर असे प्रीवेन्शन आहेत का मधुमेह न होऊ देण्यासाठी? मला अस वाटत की कुठल्याही वाईट गोष्टींचा स्वानुभव येण्याआधी माणसाने प्रीवेन्शन करायची सवय लावायला हवी.

दिमांची पोस्ट मस्त आहे, एक नंबरी!

घरात सासर्‍यांना डायबेटिस होता. डायबिटिस डिटेक्ट झाल्यापासूनची पहिली १०-१२ वर्ष व्यवस्थित गेली. ते नियमित योगासनं करायचे, दर महिन्याला लॅबमधे रक्त/ लघवी तपासणी, औषधं वेळेवर घेणं वगैरे व्यवस्थित असायचं. नंतर स्वतःवरच्या एकेक जबाबदार्‍या कमी कमी होत गेल्यावर ते प्रकृतीबाबत बेफिकिर झाले. स्वतःच्या आजाराचं गांभीर्य त्यांना जाणवेनासं झालं. आणि डायबेटिसने आपली लीला दाखवायला सुरूवात केली. डायबेटिसमुळे रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट्स साठत जातात आणि त्या शब्दशः चोकप होतात. सासर्‍यांना हार्ट अ‍ॅटॅक आला, स्ट्रोकचा अ‍ॅटॅक आला आणि पायाचा अंगठाही काढून टाकावा लागला, त्याआधी पायाची अँजिओग्राफी आणि प्लास्टी करावी लागली. म्हणजे ब्लॉकेजेस मेंदूत, हृदयात आणि शरीरातही सर्वत्र होते.
यावर अ‍ॅलोपअ‍ॅलोपथीचीचाअणि त्याबरोबरच आहार नियंत्रण, व्यायाम, योग्य जीवनशैली हीच सगळ्यात योग्य उपचारपद्धती आहे.

दिमा , उत्तम पोस्ट.

माझ्या दीराचा डायबेटीस डीटेक्ट होउन १५-१६ वर्ष झाली. जेव्हा डीटेक्ट झाला तेव्हाच हाय डायबिटीस. अगदी कोमात जाण्याइतपत वेळ आलेली. त्यातुन बरे झाले. पण ह्या रोगाने शरीर हळुहळु खंगत गेलं. दीड वर्षापुर्वी दोन्ही किडन्याच चेकप करावं लागलं. तर क्रीएटीन जास्त आलं. दोन्ही किडन्या निकामी होण्याच्या मार्गावर. गेले दीड वर्ष दोन दिवस आड डायलिसिस करतात. एका डोळ्याने दिसण जवळ जवळ बंद झालं होतं. रक्तवाहिन्यात ब्लड्क्लॉट होते. आता १५ दिवसांपुर्वी डोळ्यावर शस्त्रक्रिया केली आहे.

दीड मायबोलीकर, सविस्तर प्रतिसादासाठी पुन्हा धन्यवाद.

आणि वरच्या प्रत्येक पोस्टीतून जास्तीची माहिती मिळतेय, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. सध्या इतकी वर्षे नियंत्रणात असलेली आणि मध्येच इतर उपचारांमुळे नियंत्रणाबाहेर गेलेली रक्तशर्करा पुन्हा नियंत्रणात आली आहे.

आम्ही Meha Vyri Choornam हे औषध आमच्या नेहमीच्या डॉ.ना विचारून त्यांच्या औषधांबरोबरच सुरू केले आहे. Meha Vyri Choornam या औषधाच्या बाबतीत असे सांगण्यात आले की तुमच्या अ‍ॅलोपॅथीच्या औषधासोबतच हे सुरू करा. तुम्हाला १५ दिवसांनंतरच्या तपासणीत साखरेची पातळी कमी झालेली आढळेल. त्याप्रमाणात तुमचे डॉ. अ‍ॅलोपथीच्या औषधाची मात्रा कमी करतील. आणि हळुहळू पुढे ते अजून कमी होत जाईल. साधारणतः बारा पॅकेटांनंतर याही चूर्णमची गरज उरणार नाही.

यात किती तथ्य आहे आणि आम्हाला याचा काय परिणाम दिसेल ते कळेलच. पेशंटच्या समाधानासाठी म्हणून त्यांना इतर काही त्रास होत नाही तोवर घेऊ देऊ, असे आमच्या डॉ. चे म्हणणे. (कारण मध्यंतरी आमच्या बाबतीत कोणतेही उपचार पुढे सुरू ठेवण्यासाठी पेशंटची मानसिक तयारी हाही एक महत्त्वाचा फॅक्टर होऊन बसला होता.)

या चूर्णमने रक्तशर्करा नियंत्रणात आली आहे का? तर ते सध्या सांगणे कठीण आहे. डॉ. च्या औषधयोजनांनी ती आधीही बर्‍यापैकी योग्य मार्गाला लागलेली होती. या औषधाचे सकारात्मक परिणामही होत असतील तर पुढे जाऊन चूर्णमच्या गुणाप्रमाणे अ‍ॅलोपॅथीक औषधांची मात्रा कमी होत जायला हवी. त्यामुळे आता हो किंवा नाही हे ठरवणे योग्य नाही.

Pages