घटना आणि स्वातंत्र्य

Submitted by जिज्ञासा on 25 January, 2016 - 12:13

हा लेख मायबोलीवर पुनःप्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल माहेर मासिकाच्या संपादिका सुजाता देशमुख यांचे आभार! हा लेख फेब्रुवारी २०१५ च्या माहेर च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. उद्याच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इथे प्रकाशित करत आहे.
____________________________________________________________________________

अमेरिकेत आल्यानंतर पहिल्याच आठवड्यात अरेच्चा! हे तर अगदी आपल्यासारखं आहे! असं वाटायला लावणारी एक गोष्ट म्हणजे विद्यापीठाच्या आवारातील इमारतींना दिलेली व्यक्तींची नावे! जशी आपल्याकडे दिली जातात. अर्थात इथे ही नावे बरेचदा त्या दानशूर व्यक्तींनी दिलेल्या भरभक्कम रकमेमुळे दिली जातात पण काही वेळा व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वामुळे देखिल त्या व्यक्तीचे नाव इमारतीला दिले जाते. आमच्या घराकडे येताना लागणारी एक लांबलचक बिल्डिंग लगेच ओळखीची झाली. एलबीजे लायब्ररी. मग विद्यापीठाचे लॉ कॉलेजदेखिल याच नावाचे आहे असा शोधही लवकरच लागला. हळूहळू ऑस्टिन शहराची माहिती झाल्यावर अजून ठिकाणं कळत गेली. कोलोरॅडो नदीवरचे लेक लेडी बर्ड असो किंवा वसंत ऋतूत आवर्जून पाहावं असं लेडी बर्ड वाईल्ड फ्लॉवर सेंटर. ओघाने एलबीजे हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि लेडी बर्ड ह्या त्यांच्या पत्नी म्हणजे फर्स्ट लेडी ही माहिती कळली. पण एलबीजे ह्या नावाचं अमेरिकन इतिहासातलं बहुमोल योगदान समजण्याचा योग यंदा एप्रिलमध्ये आला.

निमित्त झालं ते एलबीजे प्रेसिडेन्शियल लायब्ररीने आयोजित केलेल्या नागरी हक्क शिखरपरिषदेचं (Civil Rights Summit). ८ एप्रिल ते १० एप्रिल २०१४ ह्या काळात ही परिषद आयोजित करण्यात आली होती. ह्या परिषदेला अमेरिकेचे तीन माजी आणि एक विद्यमान (बराक ओबामा, बिल क्लिंटन, जॉर्ज बुश (ज्यु.) आणि जिमी कार्टर) असे चार राष्ट्राध्यक्ष हजेरी लावणार हे कळल्यापासून माझी उत्सुकता फारच वाढली! इतक्या महत्वाच्या व्यक्तींनी एकत्र हजेरी लावण्याचे काय कारण? ही परिषद आहे तरी कशासाठी? थोडी माहिती गोळा केल्यावर कळलं की एलबीजे राष्ट्राध्यक्ष असताना जो नागरी हक्क कायदा १९६४ साली मंजूर झाला त्या घटनेला यंदा २०१४ साली ५० वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने ही शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. परिषदेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १० एप्रिलला दुपारी १२ वाजता राष्ट्राध्यक्ष बराक ओमाबा मुख्य अतिथी म्हणून भाषण करणार होते. हे भाषण विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात मोठ्या पडद्यावर दाखवलं जाणार होतं. शिवाय त्याचं एका संकेतस्थळावर जाहीर प्रक्षेपण देखिल होणार होतं. माझी प्रयोगशाळा मुख्य प्रांगणापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. पण मला वाटलं की कुठे उन्हात उभं राहून ऐकायचं भाषण त्यापेक्षा संगणकावर अधिक चांगल्या तऱ्हेने ऐकता येईल. मी १० तारखेला वेळ काढून भाषण ऐकायला बसले. कार्यक्रम सुरु झाला तो नागरी हक्क चळवळीत योगदान दिलेल्या ग्रॅमी विजेत्या गायिका मेव्हीस स्टेपल्स यांच्या गाण्याने (अगदी आपल्यासारखं!). We shall overcome! गाण्याची पहिली ओळ ऐकली आणि पुन्हा एकदा अरेच्चा झालं! हे तर आपलं हम होंगे कामयाब! ते गाणं ऐकता ऐकता अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यात पाणी! ध्यानी आलं की चार भिंतीआड संगणकासमोर बसून ऐकण्याचं हे भाषण नाही. अनेकांच्या साक्षीने ऐकण्याचं आहे. लगेच मुख्य प्रांगणाकडे धाव घेतली. तिथे साधारण शंभरएक विद्यार्थी जमले होते. मला धक्काच बसला. फक्त एवढेच विद्यार्थी? पण मग लक्षात आलं की आज वर्ग नेहमीप्रमाणे चालू होते त्यामुळे बहुतांश विद्यार्थी वर्गात होते. ज्यांना मोकळा वेळ होता असे मोजकेच जण उपस्थित होते.

ओबामांचे भाषण सुरु झाले आणि त्यांच्या भाषणातून मला एलबीजे यांची ओळख होत गेली. एलबीजे : लिंडन बेन्स जॉन्सन. टेक्सासच्या एका छोट्याश्या खेड्यात एका अत्यंत गरीब घरात त्यांचा जन्म झाला. या गरिबीच्या दिवसांविषयी बोलताना एलबीजे एकदा म्हणाले होते की त्यावेळी गरीबी इतकी सार्वत्रिक होती की ह्या स्थितीला गरीबी म्हणतात हेच आम्हाला माहिती नव्हते! एकीकडे पैसे कमावण्यासाठी शिक्षक म्हणून शाळेतल्या गरीब विद्यार्थ्यांना शिकवत अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तरुण वयात राजकीय महत्वाकांक्षेने प्रेरित होऊन आधी टेक्सास राज्याच्या आणि मग देशाच्या राजकारणात प्रस्थापित झाले. हळूहळू त्यांची राजकीय उत्कर्षासाठी उत्तम डावपेच लढवणारा कुशल राजकारणी म्हणून ओळख निर्माण झाली. टेक्सास राज्याचा रिप्रेझेंटेटिव्ह, सिनेटर अशी महत्वाची पदे भूषवल्यानंतर एके दिवशी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी पोहोचले. आणि २२ नोव्हेंबर १९६३ रोजी जॉन एफ केनेडी यांची एका माथेफिरूने गोळ्या घालून हत्या केल्यानंतर रातोरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले! एका लहानश्या खेड्यातला गरीब मुलगा ते अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा एलबीजे यांचा प्रवास प्रेरणादायी खराच पण ते इतिहासात अजरामर झाले ते त्यांच्या कारकीर्दीत घेतलेल्या निर्णयांमुळे. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांनी नागरी हक्क कायद्याचे विधेयक पास करण्यासाठी सभागृहात मांडण्याचे ठरवले. त्यांना याची जाणीव होती की जोवर न्याय रंगभेदावर, शिक्षण हे वंशांवर आणि संधी मनुष्याच्या त्वचेच्या रंगावर अवलंबून असेल तोवर सबलीकरण हे एक स्वप्नच राहील. अर्थात त्यावेळी त्यांच्या सर्व सल्लागारांनी हे विधेयक मांडू नये असाच सल्ला दिला होता. स्वतः एलबीजे यांनी ह्यापूर्वी आपल्या राजकीय महात्वाकांक्षेपायी याच कायद्याला विरोध केला होता. मात्र जेव्हा नशीबाने त्यांच्या हाती डाव दिला तेव्हा त्यांनी त्यांची सर्व राजकीय इच्छाशक्ती, चातुर्य पणाला लावलं आणि नागरी हक्क कायदा मंजूर करून घेतला. “जर ह्या सर्वोच्च स्थानी बसून देशासाठी आवश्यक असे अवघड परंतु योग्य निर्णय घेण्याचे बळ दाखवता आले नाही तर असले पद काय कामाचे? (What the hell is presidency for?)” हे त्यांचे उद्गार प्रसिद्ध झाले.

काय आहे हा नागरी हक्क कायदा? आपल्यापैकी अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल पण अमेरिकेतील सर्व नागरिकांना कायद्याने समान नागरी हक्क १९६४ साली ह्या हक्काने मिळाले. कोणत्याही बाबतीत (शिक्षण, नोकरी, राहण्याची जागा इत्यादी) वर्ण, रंग, वंश, लिंग ह्यावर आधारीत भेदभाव करणे हा त्यापूर्वी गुन्हा मानला जात नसे. “कुत्रे आणि काळे यांना प्रवेश निषिद्ध” ही पाटी सर्रास लावली जायची. मार्टीन ल्युथर किंग यांच्या नेतृत्वाखाली ह्या नागरी हक्क चळवळीने मोठे रूप धारण केले. परंतु केवळ चळवळीने आणि जागरुकता निर्माण होण्याने बदल घडणार नाही याची एम एल के यांना जाण होती. त्यासाठी कायदा हवा होता. त्यावेळी एम एल के म्हणाले होते की हे खरे आहे की कायदा एखाद्या माणसास माझ्यावर प्रेम करायला लावू शकत नाही पण कायदा धाकदपटशापासून माझे रक्षण करू शकतो आणि ही फार मोठी गोष्ट आहे! ही गोष्ट एलबीजे यांना पक्की ठावूक होती. आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाचे आणि अमेरिकन लोकशाहीला मजबूत करणारे कायदे पास करवून घेतले. १९६५ साली सर्वांना मतदानाचा अधिकार देणारा मतदान हक्क कायदा मंजूर केला गेला. तोवर अमेरिकेत निवडणुकीत सर्व नागरिकांना मतदान करता येत नव्हते!

पुढे एलबीजे दुसऱ्यावेळी पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. राजकीय महत्वाकांक्षेने प्रेरित असलेल्या एलबीजे यांचे काही निर्णय चुकले, काही वादग्रस्त ठरले. केनेडी यांच्या हत्येत सहभाग असल्याचाही त्यांच्यावर आरोप झाला. मात्र ह्या परिषदेच्या निमित्ताने आणि विशेषतः ओबामा यांच्या भाषणातून मला अमेरिकेच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या एका कर्तृत्ववान व्यक्तीची नव्याने ओळख झाली. नागरी हक्क कायद्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ओबामा यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्याने परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे किती औचित्यपूर्ण होते हे मला प्रकर्षाने जाणवले!

त्या दिवसानंतरही ओबामांचे भाषण माझ्या डोक्यात सतत विचारांना चालना देत राहिले. कारण होतं भारतात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुका! भारताबाहेर राहून तिकडच्या तापलेल्या वातावरणाचा कानोसा घेणाऱ्या भारतीयांमध्ये मी ही होते. एप्रिल २०१४! भारतात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला जाऊन पोचला होता. आमीरच्या सत्यमेव जयते पासून ते गुगलच्या जाहिरातीपर्यंत सगळीकडे मतदानाचं महत्व ठसवलं जात होतं. आणि त्याचा सुयोग्य परिणाम प्रत्यक्ष निवडणुकीत दिसून आला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची विक्रमी टक्केवारी नोंदली गेली. भारतीयांना पुन्हा एकदा लोकशाहीच्या ताकदीची आणि मुख्य म्हणजे एक नागरिक म्हणून मिळणाऱ्या मतदानाच्या मुलभूत हक्काची जाणीव झाली.

माझ्या नकळत मी जेव्हा ह्या बाबतीत भारत आणि अमेरिकेची तुलना करू लागले तेव्हा मला प्रजासत्ताक दिनाचे महत्व नव्याने जाणवले. स्वातंत्र्याचं महत्व कळण्यासाठी पारतंत्र्यात जन्माला येण्याची गरज नसते. ते महत्व स्वतंत्र भारतात जन्माला आलेल्या तुम्हा आम्हा सर्वांना जाणवतं. म्हणूनच १५ ऑगस्टला आपण भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व नेते, क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक यांचे अभिमानाने आणि कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. पण प्रजासत्ताकदिनी हीच भावना आपल्याला घटना समितीच्या सर्व सदस्यांप्रती जाणवते का? २६ जानेवारीला उत्साह तेवढाच असतो पण त्या दिवसाचे महत्व आपल्यापर्यंत खरोखरीच पोहोचते का? ५० वर्षांपूर्वीपर्यंत स्वतंत्र अमेरिकेत जन्मलेल्या सर्वांनाच स्वातंत्र्याचे सर्व फायदे मिळत नव्हते मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अडीच-तीन वर्षांत म्हणजे जवळपास लगेचच भारतात संविधान लागू झाले. आपण हे विसरतो की मतदानाचा हक्क किंवा भारतीय नागरिक म्हणून मिळणारे इतर मुलभूत हक्क हे काही ब्रिटीश आपल्याला स्वातंत्र्याच्या सनदीबरोबर देऊन गेले नव्हते. उलट नजीकच्या भविष्यात ह्या देशाची शकले होतील अशी शापवाणीच उच्चारून गेले होते. भारतासारख्या बहुपेडी देशासाठी मिळालेलं स्वातंत्र्य हे अराजकतेकडे नेणारं ठरलं असतं जर त्या स्वातंत्र्याला राज्यघटनेचं मजबूत कोंदण लाभलं नसतं. स्वातंत्र्य ही एक भावना आहे आणि ती वैश्विक आहे. पण राज्यघटना आणि नागरिकशास्त्र हे विचार आहेत. आणि ते रुजवावे लागतात. गेल्या ६७ वर्षांत भारतीयांच्या अंगी स्वातंत्र्य चांगलेच मुरले आहे. पण नागरिकशास्त्र मात्र तितकेसे रुजलेले नाही. आपल्याला स्वातंत्र्यासाठी जसा प्रदीर्घ लढा द्यावा लागला तसा आपल्या मुलभूत हक्कांसाठी कोणताच लढा द्यावा लागला नाही. संविधान आपल्याला तसे आयतेच मिळाले म्हणून आपल्याला त्याची जाणीव नाहीये का? तसे असेल तर हे चित्र बदलले पाहीजे. भारतीय संविधानकर्त्यांनी दाखवलेल्या प्रगल्भतेचा आणि दूरदृष्टीचा आपल्याला प्रचंड अभिमान वाटला पाहीजे!

माझ्या विद्यापीठातल्या एका कार्यक्रमाने माझा मायदेशातील्या लोकशाहीवरचा विश्वास आणि अभिमान दोन्ही वाढवला. आणि मला खात्री आहे की ह्या स्वातंत्र्यदेवतेच्या देशाच्या नव्याने कळलेल्या इतिहासामुळे ह्यापुढे २६ जानेवारीला तुमचा उर आपल्या घटनाकारांबद्दलच्या अभिमानाने भरून येईल!

(संदर्भ: विकिपेडिया आणि बराक ओबामा यांचे नागरी हक्क शिखरपरिषदेतील १० एप्रिल २०१४ रोजीचे भाषण )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

We shall overcome! गाण्याची पहिली ओळ ऐकली आणि पुन्हा एकदा अरेच्चा झालं! हे तर आपलं हम होंगे कामयाब! ते गाणं ऐकता ऐकता अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यात पाणी!
>>>
+१ होते असे.. आवडीचे गाणे .. Happy
लेख आवडला.. थोड्या वेळाने पुन्हा सावकाश वाचेन..

इथे कॉपीपेस्ट करताना बहुतेक पॅराग्राफ एकत्र झालेत.. मध्ये एका लाईनीची स्पेस टाकलीत तर वाचकफ्रेंडली होईल

छान लेख.
एलबीजे आणि नागरी हक्क याबद्दल उलट सुलट वाचलंय. सेल्मा आठवला. अर्थात तो मुख्य विषय नाही.
राज्यघटना आणि त्याचं महत्त्व सांगणारा पॅरा मस्त लिहिलाय. ते तेव्हाच लगेच झालं ही सगळ्यात बेस्ट गोष्ट, स्वातंत्र्याइतकीच.
भारतीय संविधानकर्त्यांनी दाखवलेल्या प्रगल्भतेचा आणि दूरदृष्टीचा आपल्याला प्रचंड अभिमान वाटला पाहीजे! >> +१ आणि तेव्हाच्या राज्यकर्त्यांना त्याचं महत्त्व उमजलं आणि त्याला पाठींबा दिला याचा ही.

खरे सांगायचं तर लेख काल रात्री पाहिला होता...पण का वा कसे कोण जाणे मनी ठरविले की उद्याच्या प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन झाल्यावरच वाचायचा...विषय लेखाचा तसाच असल्यामुळे.....आणि आज सकाळी घरी परतल्यावर वाचला...अभिमान वाटला.

जिज्ञासा यानी लेखात दिलेला "..स्वातंत्र्य ही एक भावना आहे आणि ती वैश्विक आहे. पण राज्यघटना आणि नागरिकशास्त्र हे विचार आहेत. आणि ते रुजवावे लागतात..." ~ हा विचार सर्वांनीच अंगी रुजवायला हवा. सुंदरच.

घटनेने काही मुलभूत हक्क दिले त्याच बरोबर कल्याणकारी राज्य हि संकल्पना सुध्दा दिली आहे . हे नेमके काय आहे ?

घटनेने काही मुलभूत हक्क दिले त्याच बरोबर कल्याणकारी राज्य हि संकल्पना सुध्दा दिली आहे . हे नेमके काय आहे ?

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!

लेख या आधी वाचला होता तेव्हाही आवडला होता. इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद.

खूप छान लेख आहे. लेखातील विचारांशीही सहमत.

लिंडन बी जॉन्सन बद्दल फारशी माहिती नाही. तीही यामुळे थोडीफार मिळाली.