एक बॅग ; दोन भानगडी - १

Submitted by प्रकु on 19 January, 2016 - 23:44

बऱ्याच दिवसांपासून लिहायचं होत या विषयावर, पण मला सगळे मुर्खात काढणार आहेत हे वाचून. म्हणून विचार करत होतो लिहाव...? कि नाही.? आज म्हणलं लिहूच, आपण मूर्ख ठरून इतर चार जण सतर्क झाले तर काय वाईट आहे. नैका !

तर हे एकुणात दोन किस्से आहेत. दोन्ही बंगलोर ते नासिक व्हाया पुणे प्रवासात घडलेले. पहिला सौम्य, यामुळे माझी फक्त टिंगल झाली बाकी काहि नाही. दुसरा मात्र थोडा आहे, थोडा म्हणजे बऱ्यापैकी सिरीयसे. लै म्हणजे लै नाचक्की झाली आपली यामुळे बरका. काय करणार पण आता. असो.

====

भानगड १ : बंगलोर ते पुणे प्रवास.

रात्री बंगलोरहून स्लीपर कोच बस मध्ये बसलो (झोपलो). सकाळी उठलो. तोपर्यंत ठीक होत सगळं.
मग गाडी पुण्याला पोहोचली. पहिला स्टॉप कात्रजचा होता. मला तिथे उतरून शिवाजीनगर बस स्टँडवर जायच होत. गाडी कात्रजला पोहोचली तेव्हा भुरभूर पाऊस चालू होता. मला इतका कंटाळा आला पाऊस बघून कि बास. एरवी आवडतो मला पाऊस. पण अस झोपेतून उठल्या उठल्या एकदम, गार गार पाणी थोंडावर शिंपडल कि कस इरिटेट होत तस वाटलं मला. मग मी जाऊन दारात पायरीवर नुसता उभा राहिलो. मागून तो ड्रायव्हर मला उतर उतर म्हणून तगादा लावत होता. तरी एक दोनदा दुर्लक्ष करून थांबलोच तिथे थोडावेळ. मग म्हणलं आता हा लाथ घालून बाहेर पाडेल आपल्याला, त्यापेक्षा उतरू स्वखुशीने.

तोपर्यंत मी एक पत्र्याची शेड हेरून ठेवली होती. मला पावसात भिजायची आजिबातच इच्छा नव्हती कारण अजून ५ तासाचा प्रवास बाकी होता. मग काय, उसेन बोल्टाच नाव घेतलं आणि धावत सुटलो. क्षणार्धात माझ्या पायांनी माझ शरीर शेडखाली आणून उभ केलं. म्हणलं व्वा! मग इकडे तिकडे बघत दोन तीन श्वास घेतले.

शेजारी एक माणूस पेपर वाचत उभा होता. माझ्या मनात विचार आला म्हणलं यांना विचारव शिवाजीनगरची बस कुठे मिळते बुवा. पण तेवढ्यात मला आठवलं आपण पुण्यात आहोत. इथे लोकांना बाळबोध प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. तसे केल्यास उत्तर तर मिळत नाहीच वरून बोलणे बसतात.
म्हणून मग मी स्वतःच चौफेर नजर फेकली. शिवाजीनगर बस समोरच उभी होती, म्हणलं बर झाल नाही विचारल. ‘इतका सोपा प्रश्न विचारून आमच्या बुद्धिमत्तेवर शंका घेतली’ म्हणून एखाद्याने अब्रुनुकसानीचा दावा केला असता तर काय घ्या.

बस समोर दिसल्यावर पुन्हा उसेन बोल्ट, रेडी स्टेडी गो केल. पापणी लवण्याच्या आत मी बसमध्ये चढून सीटवर स्थानपन्न झालेलो होतो. मला इतक ‘हलकं हलकं’ वाटत होत त्या दिवशी कि बास. ‘काय उपमा काय द्यावी या हलकेपणाला’ असा विचार करत मी खिडकीतून बाहेर भुरभुरणाऱ्या पावसाकडे पाहू लागलो.

एकदम अचानक प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसा, शेपटीवर पाय पडल्यावर कुत्रा वस्सकन चावायला येतो तसा किंवा चटका बसल्यावर हात झट्कन मागे घेतला जातो तसा मी ताड्कन उठलो, जवळजवळ निघालेल्या बस मधून रस्त्यावर उडी मारली आणि धावत जाऊन पुन्हा त्या शेडखाली उभा राहिलो.

याच कारण स्पष्ट होतं. इतक हलक हलक कसकाय वाटतंय याचा मला उलगडा झालेला होता. मी मगाशी बंगलोरच्या बसमधून उतरताना पाठीवरची बॅग तेवढी घेतली पण चाकाची मोठी बॅग जी मागच्या डिक्कीत ठेवलेली होती, ती तिथेच राहून गेली. पावसाच्या नादात मी विसरूनच गेलो ती बॅग घ्यायचं. माझं सगळं सामान त्याच बॅग मध्ये होतं. लॅपटॉप पाठीवरच्या बॅगेत होता हि त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट होती.

मी लांबवर पाहत ती बस कुठे दिसतेय का ते पाहू लागलो. पण बस काहि दिसेना. मी तात्काळ त्या बसवाल्याला फोन लावला आणि बॅग राहिल्याचे सांगू लागलो.
त्याचे हिंदी एकतर जेमतेमच होते, त्यात रेंजचा प्रॉब्लेम असावा. त्याला काहि ऐकूच येईना.

मी फोन कट करून बंगलोरला त्यांच्या ऑफिसमध्ये फोन लावला आणि दुसरा नंबर पाठवण्याची विनंती केली. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्परतेने मला फोन नंबर एसएमएस केला.

दरम्यान मी एक रिक्षा पकडून बसचा पाठलाग करायचे ठरवले. 'पुण्यात कुठल्या स्टॉप उतरायचे' यावर बरीच काथ्याकुट झालेली असल्यामुळे नशिबाने मला पुढच्या स्टॉप्सचे नावं माहित होते. रिक्षावाल्याला एकंदर घटनेची कल्पना दिली. पुढचा स्टॉप बराच लांब होता. रिक्षावालाच मीटरप्रमाणे जाऊ अस म्हणाल्याने त्याच्याशी घालाव्या लागणाऱ्या संभाव्य हुज्जतीचा वेळ वाचला.

रिक्षा सुरु झाल्यावर मी बंगलोरहून आलेल्या नंबरवर फोन लावला. त्यांनी पांडित्य वापरून दुसऱ्या नंबरच्या ऐवजी जुनाच नंबर पाठवला होता. मी पुन्हा त्यांना फोन करून प्रयत्नपूर्वक सौम्य शब्द वापरून दुसरा नंबर मागवला. तेव्हा तेवढा एकच नंबर आहे असे नम्रपणे सांगण्यात आले. म्हणल आरे वा छान. एक नंबर!

मी आता जीवाच्या आकांताने ओरडून बोलण्याची तयारी ठेऊन पुन्हा बस वाल्याला फोन लावला. पहिल्या हॅलोलाच मी अस्सा सूर लावला, ‘हाल्लोssssss’, कि बास! रिक्षावाला वळून माझ्याकडे बघत हसायलाच लागला.

मला रीक्षेवाल्याचा खूप राग आला. चालू असलेला मी फोन बाजूला धरला, तसेही पलीकडे काहि ऐकू जात नव्हते. आधी आपल्यावर हसणाऱ्या या रीक्षेवाल्याशी निपटून घेऊ म्हणून मी त्याच्याकडे मोर्चा वळवला.
‘ओ’!’ म्हणल, ‘काये.? तो माणूस एकतर कानडी आहे, त्याला हिंदी नीट समजत नाही. त्यात रेंजचा प्रॉब्लेम असतो बसमध्ये, त्यामुळे ऐकू येत नाहीये. म्हणून मला जोरात ओरडून बोलाव लागतंय कळाल का.? हसण्यासारख काहीच नाहीये यामध्ये.’

रिक्षावाल्याला एवढ समजावून होत नाही तोवर माझ्या फोनमधून ‘टुंग’ असा बारीकसा आवाज आला.
बसवाल्याने माझा फोन कट करून टाकल्याचे ते द्योतक होते.
त्याक्षणी मला रीक्षेवाल्याशी मारामारी करण्याची फार मनापासून इच्छा झाली. तरी मी संयम ठेऊन मनात विचार केला, म्हणल झाली मारामारी आणि आपण त्याला लोळवला तरी नंतर आपल्यालाच रिक्षा चालवत न्यावी लागेल. आपल्याला रिक्षा कुठे चालवता येते. त्याहून भयानक जर त्याने आपल्याला लोळवले तर किती वाईट. एकतर बाहेर खूप चिख्खल आहे. पाण्यात पडून मोबाईल खराब होईल. हा रिक्षावाला आपले पैसे घेऊन पळून जाईल. मग आपल्याला चालत नासिकला जाव लागेल.

पेपरात बातमी येईल ‘चिखलाने बरबटलेला, एक युवक विद्यानगरीतून पायी चालत कुंभनगरीत आला.’ बापरे बाप! मिडीयावाले लोक मग धक्काबुक्की करत मला विचारतील,
‘आपण किचड में कैssसे गिरे.? जब आप किचडमें पडे हुए थे तब आपको कैssसा लग रहा था.? क्या किचडकी स्मेल आपको पसंद आयीs.? आपण फिरसे किचडमें कssब गिरना चाहेंगे.? किचडसे लथपथ होने के बावजूद आप २०० किमी चलके आए.क्या आपके पैरोमें दर्द नही हुवा.? क्या रास्तेमें लोग आपको देखकर हस रहे थे.?’

हातातल्या फोनच्या व्हायब्रेशनने माझी तंद्री भंग झाली. मिडीयाच्या प्रश्नांपासून मला वाचवल्याबद्दल मी कृतज्ञतेने फोन कडे पहिले. बसवाल्याचाच फोन होता. त्याला माझी कीव आली असावी. मी पटकन फोन उचलला. आमचे आवाज स्पष्टपणे एकमेकांना ऐकू जात होते. तेव्हा ते पुढच्या स्टॉपवर थांबलेले होते. मी त्याला म्हणलं जरा बाहेर पहा चितळे, जोशी वडेवाले अस एखाद दुकान पाहून तिथे बॅग ठेवा, मला दुकानाच नीट नाव सांगा आणि जा तुम्ही पुढे. त्याला मी काय म्हणतोय ते काही कळेना. ‘दस मिनिट रुकताहू, जल्दी आजाव’ त्याने माझ्या सर्व वाक्यांवर एवढी एकच प्रतिक्रिया दिली.

आता काहि पर्यायच नव्हता. रिक्षावाल्याला म्हणलं भाऊ जोरात चालव. तो बिचारा इमानदारीत एक्सलरेटर पिळत होता पण त्या रिक्षात तेवढा जीवच नव्हता. ती आपली संथ गतीने हवी तशी चालत होती. माझ्या मनातली लगबग तिच्या पर्येंत काहि पोहोचलीच नाही. शेवटी जे व्हायचं तेच झालं. आम्ही तिथे पोहोचे पर्येंत बस निघून गेलेली होती.

मी परत बसवल्याला फोन केला. त्याने मला अजून पुढच्या स्टॉपवर यायला सांगितले. तिथेतरी नक्की थांबणार आहे का मी येईपर्यंत.? मी त्याला दोनतीनदा विचारून कन्फर्म करून घेतले. तो हो म्हणाला. मग त्याच रिक्षेतून मग माझा पुढचा प्रवास सुरु झाला.

एव्हाना मी एकदम शांssत झालेलो होतो. जास्तीत जास्त काय होईल, शेवटच्या स्टॉप पर्यंत जाव लागेल, थोडा जास्त वेळ जाईल थोडे पैसे खर्च होतील. याहून काय वाईट होणारे असा विचार करून मी शांतपणे बसून राहिलो. उगाच याला त्याला फोन करून डोक्याला ताण करून घेण्यात अर्थ नाही हे मला कळाले होते.

पुढच्या स्टॉपवरहि तेच झालं, बस निघून गेलेली होती. ‘प्रतिकूल तेची बहुदा घडे’ हे आता माझ्या डोक्यात होतंच. त्यामुळे यावेळी मला फारसं काही वाटलं नाही. मी शांतपणे पुढच्या पर्यायांचा विचार करायला सुरुवात केली.

पाठलाग निष्फळ झाल्याने रिक्षावालाही तापला होता. त्याने बसवल्याला अर्वाच्च्य शिव्या देण्यास सुरुवात केली. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत बंगलोरच्या ऑफिसला फोन करून बस शेवटी कुठे थांबणार आहे ते विचारून घेतले. बस निगडीच्या डेपो मध्ये संध्याकाळ पर्येंत थांबणार होती.

एव्हाना माझा रिक्षाने अठरा-वीस किमीचा प्रवास झाला होता. पैसे बरेच वाढले होते. शिवाय निगडी फार लांब आहे असे रिक्षावाल्याने सांगितले. मग मी सिटी बसने तिथे जाण्याचे ठरवले. निगडीमध्ये बस बराच वेळ थांबणार असल्याने तेथे पोहोचण्याची घाई नव्हती. रिक्षावाल्याने मला कुठल्याशा मोठ्या बस स्थानकापाशी सोडले. तिथून मला आर्ध्या तासाने निगडीची बस मिळाली.

बस मध्ये बसल्यावर थोड्याच वेळात मला डुलकी लागली. प्रवास बऱ्यापैकी लांबचा होता. मध्ये एकदा घरचा फोन येऊन गेला. बसला का म्हणे नासिकच्या गाडीत. म्हणलं बसतोच थोड्यावेळात. तर म्हणे आता काय करतोय. म्हणलं ‘कै नै. ट्राफिक जाम आहे.’ काय सांगणार आता.
बॅग बसमध्ये राहिली म्हणलं असत तर ‘वाटलंच होत हा हा हा.’ हे पहिले ऐकायला मिळालं असत. आणि मग ‘आता आहे तिथे थांब मी अमक्याला पाठवतो मग अस करा वगेरे वगेरे.’ त्यापेक्षा म्हणलं आपली भानगड आपणच निस्तरावी.

मजल दरमजल करत मी बॅगच्या दिशेने कूच करत होतो. पुन्हा त्या बसवाल्याचा फोन आला. आता आवाज स्पष्ट ऐकू येत होता. तो म्हणे नासिक फाट्याला या आणि मला फोन करा. थोड्याच वेळात नासिक फाट्याला उतरून त्याला फोन केला, तर महाशय म्हणे ‘हा बरोबर आले का.? आता तिथून सरळ पुढे भक्तीशक्ती चौक आहे तिथे या.’ अरे म्हणलं मुर्खा! आधीच भक्तीशक्ती नाही सांगता येत का. त्या बस मधून उतरलोच नसतो ना मी. असो.

मी पुन्हा दुसरी बस पकडून भक्तीशक्तीला गेलो. त्या कुठल्याशा मंदिरामागे थोडा चढ चढून बस डेपो होते. तिथे मला माझी बॅग मिळाली. एव्हाना माझं डोकच बधीर झालं होतं. मला आनंद दुःख काहि वाटलंच नाही. मी पटकन बॅग उचलून एक फॉर्मल थँक्स टाकून निघालो. नासिक फाट्यावर येऊन नासिकची बस पकडली. घरी फोन केला म्हणलं ‘बस मध्ये बसलोय, नासिक फाट्याला पोहोचलो आता.’ मनात म्हणलं ‘नासिक फाट्याला पोहोचलोय, बस मध्ये बसलो आता' :p

घरी पोहोचल्यावर मग यथासांग हकिकत सांगितली. सगळ्यांनी आपापले अभिप्राय दिले. ‘तेच मला वाटलच होतं काहीतरी घोळ झालाय’ इति बाबा. ‘आम्हाला वाटलं बंगलोरला जाऊन तरी सुधरशील, पण काय...’ आई. ‘हरे राम’ आज्जी. ‘खाल्ली का माती.?’ भाऊ.

अस सगळं चालू असताना मित्र मैत्रिणी आलेच. मग काय. यथेच्छ हसवणूक. मी कॉलेजात कसे काय काय विसरायचो, माझ्या assignments कशा इतरस्त्र पसरलेल्या असायच्या आणि मग ते कसे सांभाळून ठेवायचे वगेरे वगेरे बिनगरजेची चर्चा झाली.

माझ्या ‘खास मैत्रिणीने’ फक्त मला समजून घेतलं. ती म्हणली ‘जाऊदे, होतं अस कधी कधी.’ Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो नं,काय करणार वत्सलाताई. होतं असं कधिकधी....
हे फारसं मोठं प्रकरण नाहीये तस पाहिलं तर (पुढच्याच्या मानाने) ..

संशोधका आता 'प्रकरण'चा अर्थ सांगशिल ना तू .? :p

किस्सा मस्तय. तुमची बॅग मिळेपर्यंत उगा आम्हाला टेन्शन आलं ना!

घरी फोन केला म्हणलं ‘बस मध्ये बसलोय, नासिक फाट्याला पोहोचलो आता.’ मनात म्हणलं ‘नासिक फाट्याला पोहोचलोय, बस मध्ये बसलो आता' >>> Lol मस्त!

अँडृयु सर्कल .... Proud

Pages