शक्य नाही ...

Submitted by कविता क्षीरसागर on 3 January, 2016 - 21:50

शक्य नाही ...

वाटले होते तुझा होकार मिळणे शक्य नाही
वाटते आता मला की काय करणे शक्य नाही

ठेविला विश्वास इतका आंधळ्यागत मी तुझ्यावर
मागुनी तू वार केला ... घाव भरणे शक्य नाही

काढले डोळ्यांत पाणी पावसाने या सुगीला
देव घेतो ही परीक्षा मज हरवणे शक्य नाही

कापसाच्या बाहुलीसम देह का देशी असा तू
जाळती दुःखे अशी की श्वास उरणे शक्य नाही

गाळल्या अश्रूंस तारण ठेविले आहे तिने रे
हासणे भेसूर वाटे ... ते विसरणे शक्य नाही

लपव ना रे वर्तमाना काळसर ह्या भूतकाळा
प्राक्तनापासून पण का हे लपवणे शक्य नाही

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>गाळल्या अश्रूंस तारण ठेविले आहे तिने रे
हासणे भेसूर वाटे ... ते विसरणे शक्य नाही>>>मस्त!