मिळाला जन्म हा ताटातुटीचा

Submitted by सुप्रिया जाधव. on 25 December, 2015 - 10:58

असावा दोष अपुल्या कुंडलीचा
मिळाला जन्म हा ताटातुटीचा

मनाला मागणे सुचण्याअगोदर
उडाला केस माझ्या पापणीचा

भरारा धूळ जर डोळ्यात गेली
असर होईल का रे फुंकरीचा

दिले बदल्यात आहे मन मनाच्या
ठरावा गौण मुद्दा ऐपतीचा

तुझ्या नशिबातले अपसूक मिळते
पुरवठा होत नसतो मागणीचा

प्रकाशाला तुझ्या आधार माझा
जरी मी क्षुद्र आहे कण धुळीचा

विदारक सत्य रेखाटून जाते
गुन्हा अक्षम्य घडतो लेखणीचा

तुझ्या हव्यास ना तारांगणाचा
मला दे चन्द्र माझ्या वाटणीचा

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>विदारक सत्य रेखाटून जाते
गुन्हा अक्षम्य घडतो लेखणीचा>>>क्या बात!

तुझ्या हव्यास ना तारांगणाचा
मला दे चन्द्र माझ्या वाटणीचा>>>खास!

_/\_