भाकरी ...

Submitted by कविता क्षीरसागर on 25 December, 2015 - 23:49

भाकरी …।

वाढल्या ढे-या तयांना का न रुचते भाकरी
कष्टणा-या झोपड्यांचे पोट भरते भाकरी

लेक मागे लागलेला पुरणपोळी दे मला
आसवे लपवून आई गोड करते भाकरी

दोन भावांच्या मध्ये ही फुट पडली का अशी
कोप-यामध्ये चुलीवर बाल्य स्मरते भाकरी

ध्यान नाही जेवण्याचे वेळ झाला हा किती
वाट पाही घरधन्याची हाय ! झुरते भाकरी

पोट लावी हे कराया चोर नाही तो खरा
दोष सारा हा भुकेचा रडत म्हणते भाकरी

टाकुनीया माजलेल्या भव्य ह्या खानावळी
पोट भरताना भुकेले तृप्त हसते भाकरी

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>टाकुनीया माजलेल्या भव्य ह्या खानावळी
पोट भरताना भुकेले तृप्त हसते भाकरी <<<

छान!

(खयाल मांडणीने स्वच्छ व आशयाने गहिरे व्हावेत इकडे बघितले जावे अशी विनंती)